Friday, July 15, 2011

अबब अमेरिका

(लहानपणी मावसभावाकडे सोवियत रशियाचा कुठलातरी अंक यायचा त्यावरुन आम्ही अमेरिका कशी आहे ते ठरवायचो :-). त्या अमेरिकेत पंधरा वर्षापूर्वी पाऊल ठेवलं तेव्हा असलेल्या आमच्या अज्ञानाचा हा मजेशीर आलेख. आताच्या सारखं अद्यायावत माहितीच्या आधारे 'आलो की झालो इथलेच' पेक्षा फार वेगळा काळ होता तो हे लक्षात घेऊन वाचावे.)

"प्लीज कॉम्प्रमाईज विथ देम"
"सॉरी, नो कॉम्प्रमाईज. इफ यू वॉट यू कॅन कॉल द अ‍ॅथॉरिटी"  मोटेल व्यवस्थापक आणि टॅक्सी ड्रायव्हरचा वाद चालू होता. मी, माझा नवरा आणि त्याचा मित्र  ’दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ’ या उक्तीच्या प्रत्ययाची वाट बघत उभे होतो.  सॅनफ्रनस्किस्को ते सॅटारोझा असं टॅक्सीचं भाडं दोनशे डॉलर्स झालं होतं. ड्रायव्हर दिडपड मागत होता तर मोटेलचा मॅनेजर मीटरप्रमाणे घ्यायला सांगत होते.  दोनशे म्हटल्यावर माझ्या पोटात खड्डा पडला, त्याचे  दिडपट... मनातल्या मनात हिशोब चालू झाला.  भांडण ऐकायचं की हिशोब करायचा या कात्रीत सापडायला झालेलं. पण मला त्या दोघांच्या  उच्चाराची प्रचंड गंमंत वाटत होती. भारतात आम्ही  बिल क्लिंटनचं भाषण लागलं की अपूर्वाईने  ऐकायला  बसायचो  (ऐकायचो म्हणण्यापेक्षा पाहायचो) तेवढाच माझा अमेरिकन इंग्लिशशी संबंध त्यामुळे  कसे इंग्लिशमध्ये भांडतायत बघ अशा  नजरेने मी नवर्‍याकडे पाहात होते. तो आपला परत परत पाकिटात दिडशे डॉलर्स आहेत का ते तपासत होता. नाहीतर येणारा पोलिस अनायसे गिर्‍हाईक मिळालं म्हणून आम्हालाच घेऊन जायचा बरोबर. पण रात्री अडिचच्या सुमाराला  हा प्रसंग आपल्या भारतीय मनाला न मानवेल इतक्या शांततेत पार पडला. पाचच मिनिटात पोलिसांची गाडी हजर झाली. आता त्याच्या त्या ऐटदार पोषाखाकडे पाहत मी निस्तब्ध. हे सगळं असंच चालू राहावं असं वाटायला लागलं.  पण मी कुरकुर न करता उभी आहे हे पाहून नवर्‍याला काहीतरी गोंधळ आहे याची जाणीव झाली.  मी नक्की कशावर भाळले आहे  या  कोड्याने त्याच्या कपाळावर एक आठी उभी राहिली. आठ्या एकाच्या दोन  आणि दोनाच्या काहीपट व्हायच्या आत सगळं आटोपलं आणि  काहीही करायला लागलेलं नसतानाही  वेगवेगळ्या अर्थांने आम्ही तिघांनी  निश्वास सोडले.

अमेरिकन  भूमीवरच्या या पहिल्या प्रसंगाची उजळणी करत मोटेलच्या मऊ मऊ गाद्यांवर अंग टाकलं. सकाळी जाग आल्या आल्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक कार्ट पडलेली होती. (तेव्हा तर कार्ट म्हणजे काय हे ही माहित नव्हतं.) अमेरिकेत गाड्या जुन्या झाल्या की रस्त्यावर टाकून देतात हे  लहानपणी ऐकलं होतं तेव्हापासून आपण त्यातली एखादी उचलून आणावी असं वाटायचं. मी नवर्‍याला गदगदा हलवलं.
"अरे काहीतरी हातगाडी सारखं पडलंय बघ. आपण आणू या?"
"अं...काऽऽऽय?" असं काहीसं पुटपुटत त्याने कुस वळवली.
" अरे इकडे लोकं गाड्या टाकून देतात ना, तशी ती गाडी असावी असं वाटतय. जरा वेगळीच आहे पण आणते मी. फुकट मिळेल."  त्याच्या घोरण्याचा आवाज म्हणजे मुक संमती समजून मी  बाहेर डोकावले.  घाईघाईत मधलं अंगण ओलांडलं, थोड्याशा उंच भागावर झाडालगत ती कार्ट होती. कुणी बघत नाही हे पाहून आले घेऊन. अमेरिकेतली माझी पहिली चकटफू गाडी दाखविण्यासाठी विलक्षण आतूर झाले होते मी.
"अगं ही सामानाची गाडी आहे. तुला कसं बसता येईल यात? आणि ते फुकट बिकट सोडा आता." माझ्या उपदव्यापाने तो चांगलाच चिडलेला.
"बरं मग सामान आणू यातून."  आलेला राग गिळत मी  तहाच्या गोष्टी कराव्यात तसं माझं म्हणणं शांततेत मांडलं. तो काही बोलला नाही. त्याला स्वत:ला नक्की काय करावं ते कळत नसलं की तो मुक धोरण स्विकारतो (असं माझं मत)  कार्ट घेऊन आमची वरात थोड्याच वेळात बाजारात चालत जायला निघाली.

रस्त्यात माणसं फार नव्हतीच पण गाडीतली  एकजात सगळी लोकं कुतहलाने आमच्याकडे पाहात होती.
"भारतीय फार नसावेत इथे. सगळे पाहातायत आपल्याकडे." मला एकदम माधुरी दिक्षित झाल्यासारखं वाटत होतं. नवर्‍याला असं कधी कोणासारखं झाल्यासारखं वाटत नाही. तो कायम तोच असतो.
"आहेत थोडेफार असं ऐकलय. आणि तू काय भुरळल्यासारखी करते आहेस. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो परदेशात येऊन हे विसरु नकोस."
"म्हणजे मी नक्की काय करायचं, तू पुरेसा आहेस भारताचं प्रतिनिधित्व करायला आणि चालते आहे की नीट."
"हवेत गेल्यासारखी चालते आहेस."
"मी नेहमी तशीच चालते, शाळेत उड्या मारत चालते म्हणायचे मला."
"इथे नका मारु तशा उड्या."
"आधी माहित होतं ना कशी चालते ते मग कशाला केलंस......" विषय वेगळ्या दिशेने वाहू लागला तो पर्यंत  लोकांच्या नजरांना झेलत दुकानापाशी आलो म्हणून थांबावं लागलं आणि त्याचवेळेला त्या नजरांमधला छुपा अर्थ कळला. इतर लोकं कार्टमधून सामान आणून गाड्यात भरत होते. जिथे तिथे कार्ट आवाराच्या बाहेर नेऊ नका असं लिहलेलं. मग ती कार्ट आमच्या मोटेलपर्यंत कशी पोचली. कुणीतरी माझ्यासारखंच.....?

मी महतप्रयासाने मिळवलेली गाडी तिथेच सोडून देताना फार जड झालं मन.  हातात सामान घेऊन आम्ही परत निघालो तेव्हा लक्षात आलं की रस्त्यात अधूनमधून दिसणारी माणसं तोंडभरुन हसतात आणि हाय हॅलो करतात.  इकडे तिकडे बघत आपलं लक्षच नाही असं भासवत ओळखीच्या लोकांनाही टाळण्याची कला इथे उपयोगी पडणार नाही हे पटकन समजलं. आधी अवघडल्यासारखं, मग जिवणी ताणून चेहर्‍यावर भलं थोरलं स्मितहास्य ठेवत मोटेलमध्ये पोचलो. पण तोपर्यंत तोंड इतकं दुखायला लागलं की हुप्प करुन गप्प राहावसं वाटायला लागलं.  नवरा तर इतका खुष झाला या लोकांवर की सारखं आपलं रस्त्यावर रस्त्यावर चल सुरु झालं त्याचं.

दुसर्‍यादिवशी नवर्‍याचा एक मित्र आला तोही नवीनच होता  अमेरिकेत पण जुना झाल्यासारखा वागत होता. एक दिवसाचा जास्त अनुभव होता ना त्याच्या गाठीशी. त्याने मग आम्हाला रस्ता कसा ओलांडायचमा असे मुलभूत धडे दिले.  आम्ही निघालो त्याच्या मागून. त्याने असे आणखी दोन तीन नवखे पकडून आणले होते तेही निघाले बरोबर.  आता प्रात्यक्षिक. रस्ता ओलांडण्याच्या जागी आलो आणि त्या मित्राने पुढार्‍यासारखा हात वर केला 'थांबा' या अर्थी.  सगळे पावलांना ब्रेक दाबल्यासारखे जागच्या जागी खिळले.
एकदम पावलं जड झाली. भरधाव वेगाने धावणार्‍या मोटारी, रस्त्यावर कर्फ्यू असल्यासारखा माणसांचा शुकशुकाट आणि लाल, पिवळा, हिरवा असे झटपट बदलणारे सिग्नल ’रस्ता फक्त वाहनांसाठीच’ चा सूर लावून दटावतायत असंच वाटत होतं. यातून पलिकडे जायचं कसं.  पण तिथे एक बटण होतं ते दाबलं की चालायची खूण येते. मित्राने बटण दाबलं. तो आता टेचात निघाची खूण करणार तितक्यात 
"अरे वा"
 असं म्हणत मी लांब उडीच्या शर्यंतीत भाग घेतल्यासारखं साईडवॉकवरुन रस्त्यावर  उडी टाकली. माझ्या मागून बाकिच्यानी पण चार पावलं टाकली आणि भयाने अक्षरश: थरकाप उडाला. आमच्यासमोर  त्या सिग्नलचा रंग बदलला आणि आता तो लाल हात डोळे मिचकावल्यासारखा थांबण्याची खूण करत होता. नजर टाकू तिथे  चारी बाजूने खदाखदा हसत कारची चालू इंजिन्स आमच्याकडे पाहात उभी.  आतले डोळेही आमच्यावर रोखलेले. या लोकांना इतकी कमी लोकं रस्त्यावर पाहायला मिळतात ना, की बघत राहातात सर्कशीतला प्राणी रस्त्यावर आल्यासारखं. आता काय करायचं? मागे जायचं की पळत पुढे? आमच्यातले निम्मे आले तसे मागे गेले, उरलेले धावत पुढे. मी थोडं मागे पुढे केलं आणि  नवर्‍याच्या मागून पुढे धावले. पलिकडे जाऊन मागे गेलेले परत येतील याची वाट पाहात उभे राहिलो, तितक्यात  पाहिलं  की आमच्याबरोबर रस्त्यावर उतरलेली काही अमेरिकन माणसं हलत डुलत मजेत येत होती.  त्यांना आमची त्रेधातिरपीट म्हणजे गंमंतच असावी. पण मग हे का नाही धावले  हे रहस्यच होतं. आता ते उलगडल्याशिवाय चैन पडणार नव्हतं.

त्यांच्या त्या हलत डुलत चालीचं रहस्य कळायला मात्र बरेच दिवस लागले. तोपर्यंत ’वॉकिग सिग्नल’ दिसला  की ’अरे, चलो, चलो’ म्हणत आमची सगळी गॅग धावण्याच्या शर्यंतीत भाग घेतल्यासारखी पळत सुटायची. आता मागे पुढे न करता पुढेच पळायचं असं त्या मित्राने बजावलं होतं.  कधीतरी  वाहन चालनाचा परवाना वाचताना  कळलं की तो लाल हात डोळे मिचकावयला लागतो ते रस्त्यावर पाऊल न टाकलेल्यासाठी. एकदा तुम्ही रस्त्यावर आलात की जा अगदी आरामात. हे कळल्यावर मग आम्हीही कुणाच्या बापाचं काय जातं थाटात......चालायला लागलो.

मोटेलचे दिवस संपले आणि अपार्टमेंटमध्ये राहायला आलो.  आल्या आल्या आवारात कचर्‍याच्या पेटीत मायक्रोव्हेव टाकलेला पाहिला. कार्टसारखं करावं का असं वाटून गेलं पण.... खूप गोष्टीचं अप्रूप होतं, पण आवारातला पेपर रॅक  मला अतिशय आवडला. एकदा पैसे टाकले की कितीही प्रती घ्या. माझ्या दृष्टीने हा रॅक मल्टीपर्पज होता.
"भारतात असतो तर  शेजार्‍यापाजार्‍यांसाठी पण घेता आली असती नाही वर्तमानपत्र?" नवर्‍याने थंड नजरेने पाहिलं. (नशीब मायक्रोव्हेव बद्दल काय वाटतं ते बोलले नव्हते.) त्या थंड नजरेचा अर्थ मुर्ख, बावळट, जास्त शहाणी असा असतो. बोलण्याचं धाऽऽऽडस नाही ते असं नजरेतून डोकावतं. (ह्या माझ्या वक्तव्याचा त्याच्याकडून निषेध) तरीही मी खुंटा बळकट केल्यासारखं म्हटलं.
"आणि केवढी रद्दी जमवता आली असती. ती विकून...."   त्या रॅकचं दार आत्ताच ही सगळी वर्तमानपत्र काढून घेते की काय या भितीने त्याने धाडकन लाऊन टाकलं.

हे घराच्या बाहेरचं. आत गेल्यावर ते भलं मोठं घर आधी फिरुन पाहिलं.  ठिक होतं सगळं पण मोठा प्रश्न पडला, कपडे वाळत कुठे घालायचे? ही माणसं काय करतात कोण जाणे. सारखी मेली स्विमिंग पूलमध्ये धपाधप उड्या मारत असतात. यांच्या ओल्या कपड्याचं काय? बाल्कनीतून स्विमिंग पूलजवळ्च्या अर्धवस्त्र नार्‍यांकडे बघत मी विचारात गुरफटले. तितक्यात ’ हे ’आलेच
"स्विमिंग पूल बघायचाय?" माझा खोचक प्रश्न.  पण तो माझ्या बाजूला उभा राहून  निसर्ग सौदर्य पाहाण्यात इतका मग्न झाला की माझा प्रश्न त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. ती संधी साधून म्हटलं,
"कपडे धुवायचे आहेत."
"अरे देना मग, मी धुऊन आणतो"
"तू?" मी नुसतीच त्याच्याकडे अवाक होऊन पाहात राहिले. स्विमिंग पूल याला दारुसारखा चढला की काय?
"अगं पूलच्या बाजूलाच असतं मशीन, तिथे येतात धुता"
"तरीच" मी माझ्या नजरेत ’तरीच’  मधला भाव आणला.
"अरे पण पैसे, आय मीन डॉलर्स?"
"पंच्याहत्तर सेंट मध्ये कितीही कपडे धुता येतात."
"बाप रे, मग रांगच असेल मोठी"
"मशिन नाही गं बाई मशिन्स असतात"
"बरं बरं कळलं." असं म्हणत मी भारतातून आणलेल्या सगळया बॅग्ज रिकाम्या केल्या.
"एवढे कपडे?" तो दचकलाच ढिग पाहून.
"७५ सेंट मध्ये कितीही धुता येतात ना?" तो कपडे घेऊन घाटावर  आय मीन मशिनवर गेला.

मी जेवणाच्या तयारीसाठी आत वळले.  पोळीसाठी कुणीतरी ऑल परपज फ्लॉवर मिळतं ते वापरायचं म्हणून सांगिंतलं होतं. आम्हीही बिनदिक्कत एक मोठं पोतंच आणलं त्याचं. मी खा किती खायच्या त्या पोळ्या या थाटात आणि नवरा घे गं बाई तुझी एकदाची कणीक या आनंदात.  त्याच उत्साहात मी ते पोतं उघडलं.
’अगं बाई इकडची कणीक पांढरीशुभ्र असते की काय?’ अमेरिकेचं सगळंच बाई न्यारं या कौतुकात मी पिठाकडे पाहात राहिले, विचारायला कुणी नव्हतं म्हणून पिठालाच विचारल्यासारखं. पाणी घातलं तर त्या पीठाचं पिठलं झालं. पोळ्याऐवजी आंबोळ्या मिळाल्या आणि आम्ही आपलं, नाहीतरी आंबोळ्या होतच नाहीत फारशा तर खाऊया आता म्हणून दोन महिने ते पीठ संपेपर्यंत समाधान करुन घेतलं.

ऑलपरपजसारख्या (मैदा) कितीतरी शब्दांनी आम्हाला फसवलं पण आम्हीही पुरुन उरलो, आमच्या अज्ञानात कुणी ना कुणी भर घालत राहिलं. त्यानंतर ही साखळी गेली पंधरा वर्ष चालूच  आहे. एका अज्ञानातून ज्ञानाच्या कक्षेत प्रवेश केला की नवीन काहीतरी येतंच......

5 comments:

  1. छान लिहलं आहे, मस्तच

    ReplyDelete
  2. तुम्ही छान लिहिता. अजून वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  3. मस्त लिहलं आहेस.

    ReplyDelete
  4. Sahi ga Mohana! Tujha Ucccha Marathi kadhi kadhi jhepat nahi, pan hasoon hasoon majhe ithle pahile kahi divas athavale! POt dharoon Hasale, Manu vichar kartoye hila kaay jhalay mhanoon!

    ReplyDelete
  5. लेख खूप छान!! वाचताना खूप हसू येत होते. आम्ही पण आमच्या अपार्टमेंट मध्ये रहायला जायच्या आधी लाँग ग्रेन राईसचे पोते आणि ऑल परपज फ्लोअरचे पोते आणले होते सॅम्स मधून म्हणजे विनायकचे प्रोफेसर यांनी आम्हाला सर्वांनाच तिथे नेले होते. अजूनही अशा बर्‍याच आठवणी आठवल्या!

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.