Monday, October 19, 2015

झलक

 ’वेषांतर’ एकांकिकेची झलक.



वेषांतर: तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?  सत्यघटनेवर आधारित एकांकिका.

Monday, October 12, 2015

काळीज कुरतडणारी वेदना


"आर यू ख्रिश्चन?" या प्रश्नावर ज्यांनी माना डोलवल्या, उभे राहिले त्यांच्यावर "गुड, विदीन अ मिनिट यु विल सी गॉड" असं म्हणत त्या तरुणाने गोळ्या झाडल्या. ऑरेगन राज्यातील एका आडगावातील कम्युनिटी कॉलेजमधील अनेक तरुण जीव नाहक प्राणाला मुकले. या वर्षात विद्येच्या आवारात घडलेली ही ४५ वी घटना. दरवेळेसारखाच पुन्हा एकदा ’गन कंट्रोल’ हा विषय चघळला जाईल ते पुढची घटना घडेपर्यंत. मोजणंही कठीण होऊन जावं इतक्यांदा हे असे प्रसंग घडतायत या देशात. दरवेळेला भयभीत चेहर्‍याची मुलं शरण आल्यासारखी दोन हात डोक्याच्या मागे धरुन आवाराच्या बाहेर पडतात. पोलिस, ॲम्युबलन्सेस, प्रसारमाध्यमांसमोर हमसाहमशी रडणारे तरुण जीव आणि पोटच्या जीवांच्या काळजीने धावत पळत पोचलेले पालक हे असं दृश्य दुर्देवाने वारंवार पाहायला मिळतं. दरवेळेला कुणाच्यातरी माथेफिरुपणामुळे निष्पाप मुलांना, त्यांच्या शिक्षकांना प्राण गमवावा लागतो. धक्कादायक म्हणण्याच्या पलिकडे गेलं आहे हे.
शाळांमध्ये होणार्‍या गोळीबारांबद्दल चर्चा सुरु झाली की हमखास ती पोचते १९९९ सालापर्यंत. २० एप्रिल १९९९ साली कॉलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली. ह्या घटनेने देश हादरला पण त्या आधी आणि नंतरही सातत्याने हे सत्र चालूच आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलिटेक्नीक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि शिक्षक मारले गेले. या घटनांचा गाजावाजा जास्त झाला कारण मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या. इतर ठीकाणी बळी गेलेल्यांची संख्या कमी असली तरी शाळेत होणार्‍या गोळीबारांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. वर उल्लेख केलेल्या घटनांचे पडसाद हळूहळू हवेत विरतायत तोच २०१२ साली सॅंडीहूक प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. या घटनेने सारा देश सुन्न होऊन गेला. त्यानंतर म्हणजे, १ ऑक्टोबर २०१५ ला घडलेला हा वर्षभरातला ४५ वा गोळीबार. प्रत्येकवेळेला मारेकर्‍यांने हे का केलं असावं याचा शोध, सोशल नेटवर्कवरचा मारेकर्‍याचा वावर, त्याने वेळोवेळी व्यक्त केलेली मतं, फोटो यावरुन बांधला जाणारा अंदाज यालाही अंत नाही. यात भर म्हणून आता कधी गोळीबार करणार्‍या मुलांच्या पालकांना, त्यांचं आपल्या मुलांवर नियत्रंण नाही म्हणून, सरकारला, शाळा मुलांचं रक्षण करु शकली नाही म्हणून, काही ठीकाणी शाळेतील कर्मचार्‍यांना, सरतेशेवटी आता बंदूक उत्पादक तसंच २५ कंपन्यांना चित्रपट आणि संकेत स्थळांवर खेळल्या जाणार्‍या खेळांमुळे मुलं हिंसकतेचा मार्ग चोखाळतात म्हणून काही पालकांनी कोर्टात खेचलं आहे. या सार्‍यातून अशा घटनांना आळा घातला जाऊ शकेल असा मार्ग खरंच सापडणार आहे की त्यातही स्वत:च्या फायद्याचा रंग आहे हे उमजणं आतातरी कठीण आहे. काळच ते ठरवील. दरवेळेला अशा घटनांची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न होत राहतो. निघालेल्या निष्कर्षातून उपायाची अमंलबजावणी किती वेळा होते हा भाग वेगळा. राजकारणाचे रंग इतके गडद आहेत की त्यातून ’गन कंट्रोल’ सारखे सर्वसामान्यांच्या दृष्टीने सहजसाध्य असणारे उपाय किती जणांचे बळी गेल्यावर होणार ते राजकारणीच जाणोत. तोपर्यंत हे असे प्रसंग वारंवार सर्वांच्या वाट्याला किती दिवस येत राहणार याचाच विचार मन कुरतडत राहणार. ह्याच पार्श्वभूमीवर गोळीबार करणार्‍या काही तरुणांच्या आई - वडिलांच्या मनाचा प्रसारमाध्यमांनी घेऊ पाहिलेला वेध महत्वाचा ठरावा.
कोलंबाईन हायस्कूल मधील गोळीबार करणार्‍या डिलनच्या आई - वडिलांनी त्या घटनेनंतर जवळ जवळ १५ वर्षांनी ’फार फ्रॉम द ट्री’ या पुस्तकासाठी अॲड्रुयु सोलोमनला मुलाखत दिली. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी संपर्क साधूनही इतके दिवस मौन बाळगलेल्या सुझनने अखेर आपलं मन मोकळं केलं. गुन्हा करणार्‍या मुलांच्या पालकांकडे सर्वात प्रथम दोषी म्हणून पाहिलं जातं. पालक म्हणून या मुलांचे आई - वडिल काय करत होते असं म्हटलं जातं. डिलनची आई सुझन यावर सांगते, की जेव्हा कोलंबाईन शाळेत गोळीबार झाला तेव्हा डिलनच्या मित्राचा, डिलनचा पत्ता लागत नाही हे सांगण्यासाठी फोन आला. त्यावेळेस आपला मुलगाच यात सहभागी असेल अशी पुसटशी शंकाही मनाला शिवली नाही. पण सुझन घरी येईपर्यंत घराला पोलिसांनी वेढा घातला होता. हताशपणे या सार्‍याला सामोरं जाताना इतक्या जणांच्या मृत्यूला आपला मुलगा कारणीभूत ठरला यावर विश्वास ठेवणं सुझनला कठीण जात होतं. डिलनबद्दल सांगताना ती म्हणते, ’चार चौघांच्या मुलांसारखाच तोही वाढला. किंबहुना त्याची ओळख हुशार मुलगा म्हणूनच होती. जी गोष्ट करेल ती मन लावून करणारा मुलगा होता तो. वडिलांबरोबर तास न तास बुद्धीबळ खेळणं हा त्याचा आवडता छंद. पालक म्हणून आमच्या समोर कधीच कोणतीही आव्हानं त्याने उभी केली नाहीत. व्हिडीओ गेम्स, स्वत:च्या खोलीत तास न तास काढणं हे जी इतर मुलं या वयात करतात तेच तोही करत होता. एकमेव प्रसंग होता तो, कधीतरी रात्री त्याने आणि एरिकने रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी उघडल्याचा. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. मात्र त्यावरुन तो हे टोक गाठेल किंवा ही त्याच्यातील विक्षिप्तपणाची लक्षणं आहेत अशी शंकाही आली नाही.’
डिलनच्या या कृत्यानंतर सुझनच्या मनात कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार डोकावून गेला. तिचं बाहेर जाणं बंद झालं, नोकरीवर पुन्हा रुजू होऊनही कामातलं लक्ष उडालं. तिच्या वेळी अवेळी रडण्याने आजूबाजूच्या लोकांची अवस्था अवघड होऊन जाई. ते जाणवत असूनही तिला जोरजोरात रडावंसं वाटे. आडनाव सांगण्याचीही शरम वाटायला लागली. रेडिओ, टीव्ही लावण्याचं बळ गेलं. आपल्या मुलाने असं करावं यावर विश्वास ठेवणं जितकं कठीण जात होतं तितकाच पालक म्हणून डिलन आणि एरीकचे आई - वडिलच गुन्हेगार आहेत असा प्रसार माध्यमांतून आळवला जाणारा सूरही सुझनचं काळीज भेदून टाकत होता. मुलाखतकर्त्याला ती सांगते, ’माझं मुल गमावल्याचा शोकही मी करु शकत नव्हते अशी अवस्था होती. काय चुकलं माझं? लाड केले जास्त की फार जास्त स्वातंत्र्य दिलं? नक्की काय चुकलं की त्याने असं वागावं? पालक म्हणून आमचं काय चुकलं ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही का? हे कृत्य करण्याच्या थोडे दिवस आधी मी त्याचा हात तळव्यात धरुन माझं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, आई म्हणून त्याचा अभिमान वाटतो हे सांगायला विसरले नव्हते. याचाच विपरित परिणाम झाला असेल? माझ्या अपेक्षांना तो पुरा पडणार नाही हे तर त्याच्या मनाने घेतलं नसेल? खूप विचार करते तेव्हा आता मनातल्या मनात मीच त्याची क्षमा मागते कारण, कदाचित त्याला माझ्या मदतीची गरज असेल हे ओळखण्यात मी अपयशी ठरले.’ हे सांगून त्या गोळीबारात बळी पडलेल्या काही पालकांनी संपर्क साधला तो क्षण गहीवरुन टाकणारा असल्याचं ती सांगते. या गोळीबारात ठार झालेल्या मुलांच्या आई - वडिलांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा गहिवरलेल्या डिलन आणि एरिकच्या आई - वडिलांनी मुलांनी आपल्याला मुर्ख बनवल्याची भावना व्यक्त केली.

सॅंडी हुक प्राथमिक शाळेत गोळीबार केलेल्या घटनेतला गुन्हेगार होता अॲडम लान्झा. याच्या बाबतीत मात्र त्याचे वडिल त्याचं वेगळेपण नमूद करतात. लहानपणी लक्षात न आलेलं अॲडमचं वेगळेपण तो माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर जाणवायला लागलं. काहीतरी चुकत होतं. अॲडम एक्कल कोंडा व्हायला लागला, नजर टाळायला लागला. त्याची झोप हरवली. शाळेत येऊन गोळीबार करणार्‍यापूर्वी स्वत:च्या आईला ठार मारणार्‍या अॲडम बाबत पालक म्हणून त्याची आई कमी पडली हे मात्र ते अमान्य करतात. अॲडम वडिलांबरोबर राहत नसला तरी अॲडमच्या आईने त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न केला होता. मात्र आपल्याला उपचाराची गरज आहे हे मान्यच नसणार्‍या अॲडमचा उपचारांना दिला जाणारा प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता. मानसोपचार तज्ञांकडे त्याने कधीच मोकळेपणाने आपल्याला काय वाटतं ते सांगितलं नाही. यामुळेच पालक म्हणून आपण काही निराळं करु शकलो असतो हे त्यांना मान्य नाही. या सार्‍याचा वडिल म्हणून झालेल्या परिणामाबद्दल ते म्हणतात, ’रात्री खूपदा एकच स्वप्न पडतं. ज्यात दाराच्या पलिकडे कुणीतरी संतप्त नजरेने आपल्याकडे पाहतंय असं वाटतं. त्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर माझी गाळण उडते. विचार केल्यावर लक्षात येतं की दारात उभा असलेला तो चेहरा अॲडमचा असतो आणि अॲडमच्या हातून प्राण गमावलेल्या मुलांचं मी प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे माझी भितीने गाळण उडते. ’
वरील २ उदाहरणं सोडल्यास आत्तापर्यंत शाळेच्या आवारात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांतून गुन्हेगारांचे पालक फारसे बोलते झालेले दिसत नाहीत. जे झाले ती घरं आपल्यासारखीच मध्यमवर्गीय वातावरणाची वाटतात. ते सांगतात त्यापेक्षा खरंच काही पालक म्हणून ते वेगळं करु शकले असते असं वाटत नाही. मग ही मुलं अशी का वागतात या प्रश्नाची उकल तशीच राहते. मुलांच्या कर्मांचं ओझं वाहण्याखेरीज पालकांसाठी अशाने काही पर्यायच उरत नाही. मग नक्की प्रतिबंध तरी कसा करणार या गोष्टींना? बंदूक नियत्रंण? मानसिक विकृतीचा वेळीच शोध आणि त्यावर त्वरित योग्यं उपचार? सळसळत्या तरुणाईला अयोग्यं मार्गाकडे जाण्यापासून रोखणं? मुलांमध्ये होत असलेल्या सुक्ष्म फरकाचीही नोंद घेऊन त्यांना बोलतं करणं? प्रश्नांच्या जंजाळातून खात्रीलायक नसले तरी हे काही मार्ग दिसतात. प्रश्न आहे तो त्या मार्गावर पाऊल टाकण्याचा. कधी होणार हे, कोण करणार आणि कसं?


लोकसत्तेच्या, ११ ऑक्टोबरच्या ’लोकरंग’ मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.   दुवा:काळीज कुरतडणारी वेदना