Sunday, December 18, 2016

पो पो

चौकात गाडी उभी केली. लाल दिवा हिरवा व्हायची वाट पहात होते. गाडीत  पोरं, म्हणजे दोनच आणि नवरा कोंबलेला. हीऽऽऽ बडबड प्रत्येकाची. काय झालं कुणास ठाऊक पण डावीकडे वळण्याचा दिवा चमकत होता आणि मी गाडी नेली सरळ.
"आई.....लाल वरुन नेलीस गाडी."
"पकडलं तुला कॅमेर्‍यात."
"आता येईल पत्र, भरा पैसे." नवरा आणि मुलगा दोघांच्या आवाजात आनंद मावत नव्हता. एकाच्या मनात सुडाचा आनंद, तर एकाला फुकट करमणुक असा मामला.
"अरे गाढवानो, अपघात नाही झाला ते सुदैव समजा. मला तिकीट मिळणार याचाच आनंद तुम्हाला." हे माझं पहिलंच तिकीट असणार होतं त्यामुळे नव‍र्‍याला मिळालेल्या तिकीटाचा पाढा माझ्यावर गाडी घसरायच्या आधीच मी घडाघडा म्हणत दु:खद विधान टाकलं.
"तुझ्यामुळे इन्शुरन्स वाढला आहे."
"आता तू भर घालते आहेस.  सारखी माझ्या ड्रायव्हिंगच्या नावाने खडे फोडायचीस ना. बघू या तुमची मजा." त्याच्या हातात चांगलंच कोलीत मिळालं होतं.
दुसर्‍या दिवसापासून माझा बराचसा वेळ पोस्टमन कधी येतो त्याची वाट पहाण्यात जायला लागला. धावत पळत जावून पत्रपेटी उघडायची ही घाई उडे. महिना झाला तरी प्रेमपत्र आलं नाही. नवरा आणि मुलगा दोघांनाही फार दु:ख झालं. नवरा तर तिकीट देणार्‍या माणसांना शोधायलाही निघाला. कसंबसं थोपवलं त्याला तरी म्हणालाच,
"कासवाच्या गतीने चालवतेस म्हणून मिळत नाही कधी तुला तिकीट. च्यायला, एक संधी होती तीही घालवली या लोकांनी. कॅमेरे नीट तपासत नाहीत लेकाचे."
"माझी गती काढू नकोस. तू सशाच्या वेगाने जातोस आणि मग लागतात पोलिस मागे."
"मी बाकीच्या गाड्या जेवढ्या वेगात जात असतात त्यांच्यामागून जातो."
"पण पोलिस तुलाच का पकडतो? बाकिच्या गाड्यांना का नाही?"
"ते तू पोलिसांना विचार."
"तू सगळ्या गाड्यांच्या पुढे जात असशील. मागून वरात गाड्यांची. लिडींग द ट्रॅफिक म्हणतात त्याला." त्यावर जास्त वाद घालण्याच्या फंदात न पडता कधी ना कधी बायकोला तिकीट मिळेल या आशेवर त्याने तो विषय सोडून दिला. 

मध्ये बरेच दिवस गेले आणि एका सुप्रभाती आम्ही सफरीला निघालो.  वहातूक फार नव्हती.  रस्त्यावर वाहनच नाहीत म्हटल्यावर मला चेव चढला. नाही तरी कधीतरी सशाची गती मलाही दाखवून द्यायचीच होती. मी गाडीचा वेग एकदम वाढविला. नवरा अचंबित झाला, मुलगा ताठ होवून बसला. मुलीने देहाभोवती आवळलेला पट्टा हाताने घट्ट धरला.
"अगं, अगं सावकाश चालव. घाई नाही आपल्याला."
"आता का? कासवाची गती ना माझी?" पुन्हा मी पाय जोरात दाबला. गाडी जीव घेवून पळायला लागली. पाचावर धारण बसल्यासारखी शांतता गाडीत पसरली.  आजूबाजूच्या थोड्याफार गाड्या किती सावकाश जातायत असा तुच्छ कटाक्ष प्रत्येक गाडीला देत मी मैलांचा हिशोब  करत होते. अजून दहा मैल. थोडा वेग वाढवला तर पाच मिनिटात मुक्कामाला. दोन तासाचं अंतर जेमतेम दिड तासात. गाडीच्या वेगामुळे की धास्तीने कुणास ठाऊक  सर्वाचाच डोळा लागला. माझा आत्मविश्वास दुणावला. सशाची गती माझ्यातही येवू पहातेय या कल्पनेनेच मी खुष झाले.

 त्या दिवशीची ती सफर माझ्यादॄष्टीने स्वर्गसुखाची झाली. कासवाने कवच टाकलं, आत्मविश्वसाने कळस गाठला. मला परवाना काही सरळ मिळाला नव्हता.  त्याचं असं झालं, मी खूप सराव केला,  परिक्षक कोणत्या मार्गावरुन नेतात तिथे तिथे जाऊन गाडी चालवली. पण दरवेळेस हात हलवत परत. तिसर्‍यावेळेला त्याच सदगृहस्थांना परत बघितल्यावर  आधी लाच द्यायचा प्रयत्न करायचा, ते नाही जमलं तर धमकी असा माझा बेत ठरला. पण  मला बघितल्यावर तेच घाबरले.
"ही आपली शेवटची भेट ठरो." मला कसंनुसं हसायचं होतं पण त्यांची उडालेली भंबेरी बघून खो खो हसायलाच यायला लागलं.
"मॅम, आर यू ओके?" माझा मानसिक तोल ढळला असावं असं वाटलं बहुधा त्यांना. तरी बसले बिचारे बाजूला. मान हलवत मी गाडी आवारातून बाहेर काढली.  जे काही करायला सांगितलं ते नीट केलं.
"लेफ्ट, लेफ्ट...." विचाराची साखळी त्यांच्या कर्कश्यं सूचनेने तुटली आणि मी गाडी धाडकन डावीकडे घातली.
"आय आस्कड यू टेक लेफ्ट टर्न."
"आय वॉज गोईंग टू"
"थॅक गॉड, अग महामाये (एका विशिष्ट पद्धतीने मॅम म्हटलं की ते ’महामाये’ असतं)  डावीकडे वळवताना गाडी डावीकडे वळण्याच्या लेनमध्ये न्यायची असते."
"ओऽऽऽ" एवढाच उद्गगार निघाला माझ्या तोंडून. अतिशय सुतकी चेहर्‍याने त्यांनी माझ्या हातात  परवाना सुपुर्त केला. माझं चालनकौशल्यच इतकं की धमकी, लाच असे आपली पातळी खाली आणणारे प्रकार करावेच लागले नाहीत. त्या परवान्याची कुणालाच खात्री नसल्यामुळे माझी गती इतके दिवस कासवाची होती पण आता मात्र उठलं की चालवायची गाडी आणि घुसवायची कुठेही हे सत्र मी चालू केलं.
 आजही तसचं झालं. बाहेर पडायचं म्हटल्यावर किल्ली घेण्यासाठी मी धावले. पण आज किल्ली नवर्‍याच्या हातात होती.
"फाटली वाटतं आता. स्वत: शर्यतीत भाग घेतल्यासारखा चालवतो तेव्हा?" मी पुटपुटले.
"पुटपुटू नकोस" त्याने गाडीचं दार जोरात आपटलं. मी खुषीत ड्रायव्हरच्या बाजूची जागा अडवली. मुलगा चरफडत मागे बसला. बाजूलाच बसायचं म्हटल्यावर गप्पा मारायचे विषय  सुचायला लागले. तितक्यात नवर्‍याने एम. एस.. सुब्बलक्ष्मी लावली.
"३० मिनिटं, १० सेंकद गेले आता." मुलाचा हिशोब.
"असा काय काढते ती आवाज?" मुलगी वैतागली.
"लोकांना गप्प करुन टाकायचा मार्ग." मी ही टोमणा मारला.
मुंबईच्या लोकलमध्ये चढल्यासारखी आवाजांची गर्दी उडाली गाडीत. नवरा  सुब्बलक्ष्मींबरोबर स्तोत्र म्हणायला लागला आणि  सगळं शांत झालं. मुलाच्या कानात यंत्राद्ववारे गाणी शिरली. मुलीने डोकं पुस्तकात खुपसलं. मी एकटीच निरुद्योगी.  कुणी गाडी चालवायला बसलं की माझा जीव धोक्यात आहे ह्या कल्पनेने छाती धडधडते, कापरं भरतं.  मी बसले होते तिथे नसलेला ब्रेक मी पायाने दाबायला लागले. तो दाबतानाच  उजव्या हाताने वरची कडी घट्ट धरली. डाव्या हाताने खाली बस, खाली बस अशी आपण खुण करतो ना तशी खुण करत राहिले, म्हणजे तुझा वेग कमी कर अशा अर्थाने. काही परिणाम दिसेना.
"यापेक्षा मी चालवते गाडी" म्हटल्या म्हटल्या नवरोजींचा हात स्टेअरिंग व्हिलवर घट्ट दाबला गेलेला दिसला मला. गाडीचा वेग अचानक नको तितका वाढला. माझ्या अंगविक्षेपानी तो हळूहळू भडकत चालला होताच. त्यात मी गाडी चालवते म्हणणं म्हणजे त्याच्या भिक्कार ड्रायव्हिंगला  आणखीनच भिक्कार म्हटल्यासारखं झालं ना?
" अरे, अरे, घासटणार ती गाडी आपल्याला. तू लेनच्या बाहेर गेला आहेस." मी दोन्ही कानावर हात घेऊन किंचाळले, त्यामुळे मला सोडून सर्वाना प्रचंड दचकायला झालं. 
"मॉम इज सच अ हॉरिबल पॅसेंजर" वर तोंड करुन मुलगा.
" शी ओनली नोज हाऊ टे येल अ‍ॅड स्क्रिम." कन्यारत्नाने तारे तोडले.
 आता नवर्‍याचं ड्रायव्हिंग सुधारु की मुलांना सरळ करु? 
एव्हांना नवरोजींनी पुन्हा आपला वेग वाढवला.
" अरे, इथे पोलिस लपलेला असतो." असं बिनदिक्कत विधान करुन मोकळं व्हायचं हे  अनुभवाने जमलेलं तंत्र वापरलं.  बायको खोटं सांगतेय हे ठाऊक असलं तरी प्रतिक्षिप्त क्रिया होवून आपोआप वेग कमी झाला. गाडीचा वेग कमी करता करता एकदम माझ्या नवर्‍याला पुढच्या कुठल्या तरी गाडीत त्याचा मित्र असल्याचा भास झाला. बिचार्‍याला माझ्यावरुन लक्ष उडवणं आवश्यक वाटत असावं. झालं, त्याची गाडी पुढे आमची गाडी त्याच्या मागावर. वेग वाढत गेला आणि एकदम आमच्या मागे दिवे फाकफुक करायला लागले. मुलाने यंत्र काढलं. मुलीने पुस्तक बाजूला ठेवलं. मी अंग आक्रसून घेतलं.
"बाबा, तुला पकडायला आला." मुलगा आनंदातिशयाने.
आरशातून मागे बघत  गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवत  नवरा म्हणाला,
"आता हा विषय पुरे. यावर चर्चा नको."
विषय सुरुच झाला नव्हता मग आधीच चर्चा कशी बंद करायची? पण आत्ता काही बोलले असते तर त्याने मलाच पोलिसाच्या ताब्यात देवून टाकलं असतं. नवर्‍याच्या मागे पहिल्यांदा पोलिस लागला तेव्हा त्याला समजेचना आपण काय करायचं  ते. तो आपला पोलिसाला पुढे जायला द्यावं म्हणून आणखी जोरात चालवायला लागला.  चकाकत्या दिव्यांबरोबर आवाजही सुरु केले  पोलिसाने. शेवटी दोघंही थांबले.
"थांबवायची असते गाडी दिवे चमकताना दिसले की." पोलिस चांगलाच गोंधळला होता. नवर्‍याच्या डोळ्यासमोर दिव्यांऐवजी काजवे चमकले असावेत.
"घाबरायला झालं, म्हटलं रस्त्यात थांबवली तर ओरडाल म्हणून थांबवायची जागा शोधत होतो."
 त्यानंतर बरीच तिकीटं जमा झाली होती. हे कितवं ते मोजून त्याला सांगणार तर त्याने चर्चा नको म्हणून आधीच विषय गाडून टाकला. मुकाट्याने डोळे मागून येणार्‍या पोलिसाकडे वळवले. तेवढ्यात मी नवर्‍याला म्हटलं.
"वेगात चालवतोय हे कळलंच नाही असं म्हटलं की पोलिसांना दया येते असं ऐकलंय. बघ सांगून."
तितक्यात पोलिसमहाशय आले.
"काय कसं काय? कुठे जाऊन आलात? बरे आहात ना?" ततपप करत नवर्‍याने उत्तरं दिली. गाडीतले आम्ही सगळे फार सज्जन असल्यासारखे मुग गिळून बसलो होतो. कशाला उगाच मधे पडा, नाही का? नवर्‍याने  विचारलं नसतानाही वेगात चालवतोय हे कळलंच नाही असं आधी सांगून टाकलं आणि लगेच आरशातून एक काम उरकल्यासारखं त्याने मागे नजर टाकली. माझ्याही डोळयात  शाबासकी मावत नव्हती.
पोलिसाने ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं, काहीतरी वाचलं आणि एकदम म्हणाला,
"वॉव, वुई आर मिटींग अगेन."
मला  ओशाळल्यासारखं झालं. पुन्हा पुन्हा त्याच पोलिसाकडून तिकीट की काय? एकाच माणसांकडून घ्यायची तरी कितीवेळा. संकोच वाटतो ना.
तेवढ्यात तो म्हणाला.
"मी आलो होतो तुमच्या घरी."
आता मात्र माझ्या अंगात उत्साह संचारला.
’अगबाई? हो का? केव्हा? आठवत नाही.’ वगैरे म्हणावसं वाटत होतं पण हे सगळं मनात भाषांतरीत करुन इंग्लिशमध्ये तोडांवर येण्याआधी तोच म्हणाला
"तुमच्याकडे चोरी झाली तेव्हा."
जळल्लं मेलं ते लक्षण. तेव्हा आला होता होय. चोरी म्हणजे काय तर आमचा जुना पुराणा फ्रीज आम्ही गराजमध्ये ठेवला आहे. गराजचं दार सतत उघडं. फ्रिजमधले मसाले सोडून सगळं गेलं. म्हणजे चोर अमेरिकनच. समोरचे, मागचे, येणारे जाणारे असे तर्क वितर्क करुन झाले. शेजारी पाजारी कोण कोण आपल्या डोळ्याला डोळा देत नाहीत याची यादी काढली.  पण चोरी कधी झाली होती याचाच अंदाज नव्हता त्यामुळे पाच पंचवीस डॉलर्स साठी कुठे पोलिस तक्रार. चोराच्या मागे लागायचं नाही असं ठरवलं.  पण आमच्या अमेरिकन शेजारीणीने भरीला घातलं आणि आम्ही तक्रार नोंदवली. पोलिस घरी आल्याचा काय तो आनंद. त्यांनाही अशी गिर्‍हाइकं क्वचितच मिळत असावीत. मुलीने आपल्या बोटाचे ठसे त्यांना घ्यायला लावले. मी आभार म्हणून आपला भारतीय चहा पाजला. प्यायले बिचारे. पण तो अन्याय विसरता आला नसावा बहुधा त्या पोलिसाला. म्हटलं हा दंड दुप्पट करतोय की काय वचपा म्हणून?
"मी तिकीट देत नाही. इशारा देवून सोडून देतो. पण सावकाश चालवा. चहा प्यायला येवू कधीतरी. " त्याने मागे बघून म्हटलं
’माझ्यासारखा चहा होतच नाही बाई कुणाचा’ मी आनंदाने चित्कारले. नवर्‍याला वाटलं, तिकीट टळल्याचा आनंद.
"आपण अगत्याने केलं ना त्यांचं आपल्या घरी आले तेव्हा, म्हणून सुटलो." मी अभिमानाने म्हटलं,
"कदाचित मी म्हटलं वेगात जातोय ते कळलच नाही तेही कारण असेल." नवरा म्हणाला. त्यातलं कुठलं खरं यावरुन घर येईपर्यत आमचं वाजलं. 

त्या दिवशी तिकीट पदरात न पडल्याच्या समाधानात घरी आलो. थोडे दिवस गाड्या सरळ धावल्या, म्हणजे चाकाच्या आणि आमच्या वागण्याच्याही.  पण आता माझे माझ्या आयुष्यातले तिकीट मिळण्याचे दिवस पापाचे घडे भरत आल्यासारखे जवळ येत चालले होते. अखेर तो दिवस आलाच.

नेहमीप्रमाणे सावळ्या गोंधळात चौकडी गाडीत स्थिरावली. माझ्या हातात सारथ्य होतं. मी ते कुशलतेने पार पाडत होते. जवळजवळ दिड तास सुखरुप पार पडला आणि शत्रुपक्षाने मात केली. अचानक माझ्या मागे लांबवर दिवे चमकायला लागले.
"कोण चालवतंय इतक्या वेगात? तू तर बाजूला बसला आहेस. कोण सापडला बकरा सकाळी सकाळी." मी उत्साहाने म्हटलं. वर्षानुवर्ष मी हे दृश्य पहातेय. पोलिस माझ्या गाडीच्या बाजूने दिवे चमकवत जातात. पुढे जावून कुणाला तरी पकडतात. मग मुलगा किंवा नवरा म्हणतो,
"परत येताना तो तुला थांबवणार आहे."
"का?" मनात नसतानाही पटकन प्रश्न तोडांतून बाहेर पडतोच. मग नवरा आणि मुलामध्ये नेत्रपल्लवी. तू सांग, तू सांग  असा एकमेकांना दिलेला धीर.
"सावकाश चालवतेस ना म्हणून तिकीट द्यायला. एका दगडात दोन पक्षी पोलिसाला."  मुलगा पटकन सांगून टाकतो. प्रत्युत्तर ऐकायचं नसतंच, त्यामुळे आपण त्या गावचे नसल्यासारखं करत बाहेर बघायला लागतो. आत्ताही तसंच काहीतरी असणार. पोलिस दुसर्‍या कुणाला तरी पकडणार याची मला शंभर टक्के खात्री. मी आजूबाजूला कोण गाडीला ब्रेक नसल्यासारखं चालवतंय ते बघण्यासाठी नजर टाकली.
"यावेळेस बकरा नाही बकरी."  नवर्‍याच्या आवाजातल्या गर्भित अर्थाने माझी पाचावर धारण बसली. उजवा हात स्टिअरिंगवर घट्ट दाबत, डाव्या हाताने मी त्याला ओढायला सुरुवात केली.
"अग ओढतेस काय मला?"
"तू बस ना माझ्या जागेवर. तुझा अनुभव दांडगा आहे पोलिसांच्या बाबतीतला." त्याच्या अनुभवाला इतकी किंमत दिलेली पाहून नवरा एकदम हळवा हळवा झाला.
"चालत्या गाडीत कसा येऊ मी तिकडे. घाबरु नकोस. मी आहे ना."
माझ्या गुन्ह्याचं पातक नवरा अंगावर घेत नाही म्हटल्यावर हात, गाडी, पाय सगळं गार गार पडलं.
"अरे, आता करु काय? थांबवू कुठे? कुठे थांबवू गाडी...?" ओरडता ओरडताच मी भररस्त्यात करकचून ब्रेक दाबून गाडी थांबवलीही. मागे लागलेला पोलिस हाताने खुणा करायला लागला. कसं मॅनेज करतात कोण जाणे हे पोलिस. एकाचवेळी कुणाच्या तरी मागे लागायचं, दिवे लावायचे, आवाज सुरु करायचे, खाणाखुणा... पोलिसांचं एकदम कौतुकच वाटायला लागलं मला. गाडीचे चकाकते दिवे, कर्कश्य आवाज, इतक्या लांबून तावातावाने  चाललेले  हातवारे आणि विचारलेल्या प्रश्नाला कधीही वेळेवर उत्तर न देणारा नवरा... फार काही एकाचवेळी घडत होतं.  शेवटी माझ्या लक्षात आलं की गाडी रस्त्याच्या कडेला उभी करण्याच्या त्या खाणाखुणा आहेत. खड्ड्यात जाणार नाही अशा बेताने गाडी थांबवली.
हाय, हाऊ आर यू त्याने मला विचारलं, मग मीही त्याला तेच विचारलं. पकडायला येतात आणि ख्यालीखुशाली का विचारतात कोण जाणे.
"इज देअर एनी रिझन यु वर स्पिडींग?"
मी रडायलाच लागले.
"मॅम, मॅम..." त्याच्या आवाजातल्या मृदुपणाला दाद म्हणून मी धाय मोकलून रडायला सुरुवात केली. क्षणभर शांतता पसरली. मला वाटलं माझं रडणं चांगलं परिणामकारक आहे. तितक्यात त्याने एकदम आवाज चढवला.
"व्हाय आर यु क्राईंग?"
"अं?" हा तर माझ्या नवर्‍याच्या वरताण निघाला. रडणार्‍या बाईला असं दरडावतात का?
"यु डिडंट रिअलाईज यु वर स्पीडींग?"
मला पुन्हा एक उमाळा आला. किती बाई मनातलं ओळखलं. तोंड उघडून सांगायचीही आवश्यकता भासली नाही. मी डोळे पुसत हसर्‍या चेहर्‍याने पाहिलं.
"ओल्ड ट्रिक्स मॅम. यु वर १० माईल्स ओव्हर.  लायसन्स, रजिस्ट्रेशन प्लीज." कुसकटपणाची हद्दच झाली की. नवर्‍याने पुढे होवून सगळी कागदपत्र त्याच्यापुढे केली.
तो परत आपल्या गाडीत जाऊन बसला. आम्ही न बोलता एकमेकांकडे पहात, ताटकळत. जे काही होणार होतं ते ’तो’ गेल्यावर.  बराचवेळ आकडेमोड झाली. एक कागद माझ्या हातात आला.
"हॅव अ नाईस डे" जखमेवर मीठ चोळत महाशय निघून गेले.
कागद उघडून बघितला.
दोनशे सत्तावीस डॉलर्स दंड. कागदाचा बोळा करुन बाहेर भिरकवावा असं  वाटलं. पण बोळे फेकून देऊन दंड भरणं कसं वाचणार?
"कोर्टात जावून विनंती करता येते. पहिलंच तिकीट असेल तर फक्त कोर्टाची फी घेवून बाकी माफ करतात." माझं रडणं, उतरलेला चेहरा पाहून नवरोजीनी सल्ला दिला.
"तू बाबाला घेवून जा बरोबर. तो सांगेल तुला नीट." मुलगाही एकदम सुतासारखा सरळ आला आणि अखेर मी कोर्टाची पायरी चढले. आयुष्यात प्रथमच.

कोर्टाची पायरी:
चढण्याची दोन आठवडे जोरदार तयारी केली. नवरा जज्ज, मुलगा वकिल आणि मुलगी माझ्या सोबतीला असा सराव रोज चालायचा घरात.  करायचं काय?  दोषी म्हणून मान्य करुन दंड कमी करा, इन्शुरन्स कंपनीला कळवू नका अशी विनंती करायची. सराव पूर्ण झाला आता नाटकाचा दिवस. कोर्टात पोचलो तर ही गर्दी. काही माझ्यासारखे बावचळलेले, काही सराईत, काही हातापायावर ट्यॅट्यु  असलेले तर काही घसरणारी पॅट सावरणारे. बरेच होते. एकूण सतराशे पन्नास! खरचं, वकिलच म्हणाले आज जरा जास्त गर्दी आहे, सांभाळून घ्या. सर्व तयार ठेवलंत तर काम पटापट होईल.
"काय आज काय करुन आलात?"  कुणाला तरी तिथल्या पोलिसांनी विचारलं.
बापरे, म्हणजे इथे वारंवार हजेरी लावणारीही माणसं आहेत की काय? तेवढ्यात मलाच कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारला.
"माझी पहिलीच वेळ आहे हो."  मी अनुभवी असल्यासारखं तिला का वाटलं  या शंकेने माझा चेहरा नेहमी असतो त्यापेक्षा चिंताक्रांत झाला. ’नो प्रॉब्लेम’ म्हणत तिने दुसरीकडे मोहरा वळवला.  पोलिसांनी सतराशे पन्नास लोकांच्या तैनातीला चार वकिल असतील, ते नावाप्रमाणे बोलावतील असं सांगितलं. नंतर वकिलांनीही बाहेर येवून नावाप्रमाणे आम्ही बोलावू, कागदपत्र, तुमचं म्हणणं तयार ठेवा म्हणून दहावेळा सांगितलं. मी ही जे काही माझ्याकडे होतं ते खरच दहा दहा वेळा तपासून पाहिलं. आता सर्वांची रवानगी एका मोठ्या खोलीत झाली. नावाप्रमाणे बोलवत होते वकिल. दहा एक लोकांची नावं घेत, मग तेवढ्या लोकांनी उठून जायचं. गर्दी खूप. ऐकू येणं कठीणच होतं. जो वकिल जरा थांबेल, अडखळेल तो माझं नाव घेत असणार याची खात्री होती मला. तसंच झालं. कुणीतरी खूप वेळ थांबलं तसं मी कान दिले तिकडे. माझंच नाव घ्यायचा प्रयत्न चालू होता. मी उठणार तेवढ्यात अचानक लोकं रांगेत उभे रहायला लागले. मी आपली त्या रांगेच्या मागे मुखदुर्बळासारखी सर्वात शेवटी जावून उभी राहिले. बर्‍याचवेळाने सगळ्यांना आपण उगाचच उभे आहोत हे समजलं. बसा, बसून घ्या. नाव घेतलं तरच उठा अशी खड्या आवाजातली विनंती झाली तेव्हा. माझा तर नंबरच गेला. तासाभराने परत नावाचा पुकार झाला.
वकिलमहाशयांनी मला काय काय पर्याय आहेत ते सांगितलं. काय विचारतील, काय उत्तर द्यायचं याचा अंदाज दिला.  आता रवानगी दुसर्‍या कोर्टात.  तिथे सारं काही शांत शांत. न बोलता मुकाट्याने प्रत्येक जण आत जात होता. बाकड्यावर आता उठवतील की मग अशा अवस्थेत अवघडल्यासारखा बसत होता. सगळीच मंडळी भितीने थंडगार पडल्यासारखी.
मी ही त्यातलीच एक. माझं नाव आलं. गुन्हा वाचला गेला,
"दोषी?" प्रश्न आला.  एकाच शब्दात उत्तर द्यायचं होतं. म्हटलं.
"दोषी."
तिथल्या कारकुन महाशयांनी  हिरवा कागद हातात दिला. एक भला मोठा उसासा टाकत मी बाहेर आले. बघू बघू करत मुलाने कागद ओढला.
२२७ डॉलर्सचा दंड १६६  झाला होता. किती वाचले याचा हिशोब करत गाडीत बसलो. गाडी चालू केली, मुलाने खांद्यावरुन हात टाकला आणि कानात कुजबूजला.
"आई, अगं पोलिस येतोय बघ तुझ्यामागे."
"काय?" मी घाबरुन मागे पाहिलं.
"एप्रिल फूल." लेक जोरात हसला. त्याच्या टपलीत मारलं आणि मी पुन्हा एकदा कासवाच्या गतीने गाडी चालवायला सुरुवात केली. कितीतरी दिवसांनी. 

Tuesday, November 29, 2016

मंतरलेली चैत्रवेल

आम्ही १० डिसेंबरला सादर करणार आहोत त्या नाटकाची, ’मंतरलेली चैत्रवेल’ ची झलक.
एक झंझावत. झोडपलं गेलेलं घर आणि त्या पडझडीत स्वत:चं रहस्य जपत वावरणारी माणसं. आपापल्या  रहस्याला कवटाळून बसलेली. या माणसाच्यासहवासात बाहेरच्या व्यक्तींचा प्रवेश होतो आणि ती देखील या रहस्याचा एक भाग बनून जातात. प्रत्येकाचं आयुष्य बदलून जातं. गुंतागुंत वाढत जाते. कसा सोडवतात हा गुंता  ही सारीजणं? काय होतं अखेर?...रहस्यमय, उत्कंठावर्धक नाटक!




सरावाची झलक




यापूर्वीच्या आमच्या एकांकिकांची झलक पाहण्यासाठी दुवा

https://marathiekankika.wordpress.com/


Monday, November 21, 2016

आत्ता चोर आला होता!

खरंच! झालं काय मी मुलाशी फोनवर बोलत होते. नाटकाच्या नेपथ्याचं काम गॅरेजमध्ये चालू आहे म्हणून सायकली घराच्या पुढच्या व्हरांड्यात ठेवल्या आहेत. सोफ्यावर बसलं की व्हरांडा खिडकीतून दिसतो. एक तरुण मुलगा घराच्या दिशेने येताना दिसला. म्हटलं, आता हा दार वाजवेल. कुठलं काय तो सरळ सायकलींच्या दिशेने गेला. आमच्या तीन सायकली तो हात लावून पाहत होता.  मी फोनवर कुजबूजत्या आवाजात म्हटलं,
"थांब थांब कुणीतरी सायकल चोरतंय." मुलाला  ते नीट ऐकू जाईना. पण सायकली जायच्या आधी दार उघडणं भाग होतं.  तो मुलगा पटकन वळला.
"काय करतोयस?" मी ओरडून विचारलं.
"काही नाही." हे म्हणजे कुठल्याही प्रश्नाला माझी मुलं उत्तर देतात तसं वाटलं मला. शाळेत काय शिकवलं? ’काही नाही’ पद्धतीचं.
"काही नाही कसं?"
"माझी सायकल चोरीला गेली आहे. यातली कुठली माझी आहे  ते पाहत होतो." तो मुलगा म्हणाला.
"या आमच्या सायकली आहेत."
"तुम्ही चोर आहात असं नाही म्हणत मी." चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा खरा अर्थ त्या क्षणी मला समजला.
"सायकल तुझी नाही ना याची खात्री करायची होती तर तुला दार वाजवायला काय झालं?"
"चुकलं माझं." केसाची झुलपं उडवत तो तरुण मुलगा आला तसा निघून गेला.

आमचं हे संभाषण चालू असताना पुत्ररत्न फोन तसाच धरुन होते. थरथरत्या स्वरात मी  ’हॅलो’ म्हटलं. म्हणजे आताच एका चोराला मी पळवून लावलं होतं. हातापायाला कंप सुटलेला. पण खूश होते. चोर कसा पळाला मला घाबरुन म्हणून.
"अगं आई, तो चोर बाहेर होता तर तू माझ्याशी का कुजबूजत का बोलत होतीस?"
"त्याला ऐकू गेलं असतं ना?" मी कुजबूजले. अजून चोरातच गुंतले होते.
"त्याला कळायलाच हवं ना आता कुणीतरी आहे. तो गेला ना. बोल मोठ्याने आता." मुलगा खिजवल्यासारखा म्हणाला.
"बरं, बरं...अरे तुझ्याएवढा आहे. त्याची सायकल हरवली म्हणत होता." मला जरा त्या चोराचा कळवळा यायला लागला होता.
"माझ्या वयाचा आहे तर कॉलेज किंवा कामावर का नाही तो?"
"तू मलाच काय बडबडतोस. मी नाही विचारलं त्याला." माझी चिडचीड जाणवून त्याने समजूतीने घेतलं.
"आणि पोलिसांना फोन करते सांगायचं ना त्याला."
"आता गेला तो. दिसतोय. बोलवून सांगू का?"
"आई..."
"मग? कोणत्याही बर्‍यावाईट प्रसंगाला तुम्ही उपस्थित नसता. तू असा फोनवरुन भाषण देणार. तुझा बाबा समोर उभं राहून. सतराशेसाठ सूचना तुमच्या."

तेवढ्यात वरती नवर्‍याला काहीतरी गडबड झाली असावीच याचा अंदाज आला. थोडीफार वाक्यही ऐकली असावीत त्याने. तो धाडधाड खाली आला.
"तुला फोडणीला टाकल्यासारखा मी लागतोच का? जिथे तिथे माझं नाव घुसडवतेस. आणि  फोटो काढायचास ना त्याचा. पोलिसाना देता आला असता लगेच. लक्ष ठेवतात मग ते."
"सुचलं नाही. घाबरले होते. पण थांबा तुम्ही दोघं. तू फोनवर थांब तसाच. आणि तू तिथेच जिन्यावर राहा." एकाला समोर आणि एकाला फोनवर बजावलं. दोघंही स्तब्ध झाले.
"काय करायचा बेत आहे तुझा?" बापलेकाने एकाचवेळी तोच प्रश्न विचारला.
"मी धावत जातेय त्या मुलाच्या मागून. त्याला पुन्हा चोरी करायला बोलावते. मग एकाने पोलिसांना फोन करा, दुसर्‍याने फोटो काढा..."

चला, हे लिहून झालं. आता खरंच बघते तो मुलगा कुठपर्यंत पोचलाय :-)

Tuesday, November 1, 2016

नशीब

’अनुराधा’ दिवाळी अंकातील कथा संपादकांच्या परवानगीने इथे प्रसिद्ध करीत आहे.  श्री. व सौ, कथाश्री, साहित्य सहयोग, प्रसाद, सामना या भारतातील तसंच अमेरिकेतील ज्योती, अभिरुची, बुकगंगा श्रवण दिवाळी अंक यात माझ्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. नक्की वाचा ही विनंती.




नशीब

व्यंकट आणि लता दिङ्मूढ अवस्थेत बसून राहिले. वकिलांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा की नाही तेच त्यांना ठरवता येईना. दहा लाख डॉलर्स! मिळालेल्या पैशांचा आनंद मानायचा की भळभळणारी जखम पैशाच्या उबेखाली झाकून टाकायची? वकील निघून गेले तरी कितीतरी वेळ काही सुचत नव्हतं दोघांना.
"मिलियन डॉलर्स." व्यंकट खाली मान घालून पुटपुटला.
"काय करायचे रे हे पैसे घेऊन? काय करायचे ह्या पैशांचं? काही अर्थ आहे का यात? कशाला खटला भरला आपण? साध्य काय झालं? खरंच कुणी शिकलं धडा की आपल्या जखमेवर केलेली मलमपट्टी आणि त्यांच्या सुटकेचा मार्ग हा? अपार्टमेंटचं व्यवस्थापन ढिसाळ आहे, सिक्युरिटी कंपनीला धडा शिकवायला हवा असं वकिलांनी सांगितलं आणि आपणही लगेच तयार झालो. असं कुणी काही शिकत नाही.  पुढचं सगळं टाळायचं म्हणून वकिलांची मध्यस्थी आणि हा पैसा. मला नकोय हा पैसा. मला नकोय.  खरंच नको." लता धाय मोकलून रडायला लागली. व्यंकटने तिला घट्ट धरलं. एकमेकांच्या मिठीत दोघंही कितीतरी वेळ हमसाहमशी रडत राहिले. ते तीन दिवस आणि त्यानंतर वेगवेगळ्या अर्थी बदललेली सार्‍यांचीच आयुष्य. आजच्या ह्या बातमीने निकराने गाडून टाकलेल्या त्या तीन दिवसांच्या अक्राळविक्राळ आकृत्या त्यांच्यासमोर नाचायला लागल्या.

 स्निग्धाच्या ओढीने लता घाईघाईने दार वाजवायला गेली आणि दार एकदम उघडलंच. मागोमाग आलेल्या व्यंकटकडे लताने आश्चर्याने पाहिलं.
"तू आईंना बजावून सांगितलं होतंस ना कुणीही आलं तरी दार उघडायचं नाही म्हणून?" लताच्या प्रश्नावर काही उत्तर न देता व्यंकटने दार लोटलं. शांतता. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडत होतं. एरवी दार उघडायला हसतमुखाने आई समोर यायची. आईच्या कडेवरुन स्निग्धा त्या दोघांकडे झेप घ्यायची. आई गेली कुठे? व्यंकट आईला हाका मारतच आतल्या खोलीत जाण्यासाठी वळला आणि लताच्या किंचाळीने तसाच मागे फिरला. स्वयंपाकघरात थरथर कापत उभ्या असलेल्या लताला सावरत त्याने आत नजर टाकली आणि व्यंकटही थिजल्यासारखा उभा राहिला.
"९११" फिरव. ताबडतोब लता. आईचा श्वास चालू आहे अजून. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला तो जिवाच्या आकांताने हलवित राहिला. तिने डोळे उघडावे, त्याच्याकडे पाहावे यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहिला. स्निग्धा घरात नाही हे देखील तो विसरला. आई, त्याची आई जिवंत आहे एवढी खात्री हवी होती त्याला.  लताचे पाय जड झाल्यासारखे झाले. शरीराला, मनाला ढकलत तिने कसेबसे आकडे फिरवले. पलिकडच्या माणसाला काय झालंय ते कसंबसं सांगत  स्निग्धाला हाका मारत या खोलीतून त्या खोलीत ती फिरत राहिली. शोधत राहिली. पलंगाखाली, दारामागे, कपाटांच्या आत जिथे जिथे स्निग्धा जाऊ शकते त्या त्या जागा ती पुन्हा पुन्हा पाहत होती. स्निग्धाला जोरजोरात हाका मारत होती. काही क्षणात इमारती बाहेर गाड्यांचे आवाज, भोंगे वाजायला लागले. रुग्णवाहिका आली.  वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध झाली. व्यंकटच्या आईसमोर कोंडाळं झालं. जे काही तातडीचे उपचार करता येतील ते केले गेले पण रुग्णालयात हलवण्याअगोदरच व्यंकटच्या आईने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू नैसर्गिक नव्हता त्यामुळे शवचिकित्सा होणार. व्यंकटच्या आईला त्याच रुग्णवाहिकेतून शवचिकित्सेसाठी नेलं लता, व्यंकटला आईच्या मृत्यूचा शोक करायलाही सवड नव्हती. दहा महिन्याची स्निग्धा घरातून नाहीशी झाली होती,  व्यंकट, लता पोलिसांच्या प्रश्नांना सामोरं जात होते.  त्यांच्याबद्दल माहिती विचारता विचारता त्या दोघांचा यात काही हात नाही ना याची चाचपणी झाल्यावर स्निग्धाच्या नाहीसं होण्याबद्दल,  त्यांना कुणाचा संशय आहे याबाबत प्रश्न सुरु झाले. एकमेकांच्या आधाराने जमेल तशी उत्तरं  देत होते दोघं. जे झालं ते इतकं अनपेक्षित होतं की दोघांनाही पटकन कोणतीही गोष्ट धड सांगता येत नव्हती. मनातले विचार बाजूला ठेवून तर्कसंगत उत्तरं देणं कठीण पडत होतं. दारात उभ्या राहिलेल्या रघू आणि कोमल ला पाहिलं आणि आपलं असं कुणीतरी सोबत आहे या विश्वासाने दोघांच्याही चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली. पोलिसांच्या परवानगीने दोघं आत येऊन बसले. त्या दोघांनीही जी काही माहिती होती ती द्यायचा प्रयत्न केला.  स्निग्धाचा शोध तातडीने घेतला जाईल याचं आश्वासन देत पोलिस निघून गेले. आणि अर्धवट राहिलेलं काम पुन्हा करायला उठल्यासारखं लता उठली. पुन्हा पुन्हा त्याच सगळ्या जागा ती शोधत राहिली. स्निग्धाला हाका मारत राहिली. व्यंकटला तिची अवस्था पाहवत नव्हती. हताश होऊन ती सोफ्यावर पायाची जुडी करुन बसली. आणि जोरजोरात रडायला लागली. व्यंकट तिला सावरायला पुढे झाला पण ओंजळीत तोंड लपवून लता रडत राहिली.
"व्यंकट तुझी आई गेली रे. कुणीतरी मारलं त्यांना. आपल्या मुलीला सांभाळण्यासाठी आल्या होत्या त्या. आता कसं तोंड दाखवायचं  आपण तुझ्या बाबांना? तुझी आई गेली व्यंकट, तुझी आई गेली..." लताच्या बाजूला बसून व्यंकटने तिच्या खांद्याभोवती हात टाकले. लताने आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकलं. दोघं रडत राहिले.
"लता आईला परत नाही आणत येणार. पण स्निग्धाला शोधायला हवं. ताबडतोब. तिला काही झालं तर मी नाही जिवंत राहू शकणार. लता आपण शोधू आपल्या पिल्लाला. चल ऊठ लता. रडत नको बसू. नाहीतर मीच पडतो बाहेर. काहीतरी करायला हवं लता. काहीतरी करायला हवं." लताचा हात धरुन त्याने तिला उठवलं. ती न बोलता त्याच्या मागून चालायला लागली. रघू आणि कोमलने त्यांना थांबवलं. आता इतक्या रात्री कुठे शोधणार होते ते स्निग्धाला. पण काहीतरी करायला हवं होतं. दहा महिन्यांची मुलगी आपली आपण बाहेर पडणं शक्य नाही. कुणी नेलं असेल तिला? का? रात्री कुठे शोधायचं? व्यंकटच्या आईचा देह कधी मिळेल ताब्यात? देहाचं पुढे काय? प्रश्न असंख्य होते आणि कुणालाच उत्तरं  सापडत नव्हती. कशाचंच  त्राण लता, व्यंकटमध्ये उरलं नव्हतं.  रघूने पुढाकार घेतला. व्यंकटच्या ओळखीच्यांना तो कळवणार होता. भारतातल्या नातेवाईकांशी कोमल संपर्क साधणार होती. व्यंकटच्या आईचे अंत्यसंस्कार  इथे की भारतात करायचे ते ठरवायचं होतं. अमेरिकेतच करायचे तर नक्की काय करायचं हे देखील शोधावं लागणार होतं. व्यंकटच्या ओळखीपैकी, नाहीतर आपल्या समाजाचं मंडळ करेल मदत असा विचार करत रघू आणि कोमल उठले. बाजूचंच घर होतं त्यांचं. ते दोघं काय करणार आहेत ते रघूने नीट समजावून सांगितलं. दोघांनी ऐकलं, त्यांच्या लक्षात आलंय याची खात्री करुन ते निघून गेले तसं व्यंकट आणि लता डोळ्यावर हात घेऊन आडवे पडून राहिले. कधीतरी थकव्याने दोघांचे डोळे मिटलेही. सकाळी जाग आली ती दारावर बसणार्‍या धक्क्यांनी.

रघू आणि कोमल चहा घेऊन आले होते. स्निग्धा नसताना आपल्याला झोप लागली तरी कशी या विचाराने व्यंकट, लताला  अवघडल्यासारखं झालं पण रघू, कोमलचं लक्ष नव्हत. कोमलने चहा पुढे केला. दोघं पटकन तोंडावर पाणी मारुन आले.  चहा पिऊन होईपर्यंत रघू अस्वस्थपणे हातातल्या कागदांशी चाळा करत राहिला.
"कसले कागद रे?" व्यंकटने चहा पिता पिता विचारलं.
" बाहेर होते दाराच्या."
"पाहू?" व्यंकटने हात पुढे केला पण रघूने ते कागद दिले नाहीत.
"चहा होऊ दे." व्यंकटने काही न बोलता मुकाट्याने चहा संपवला आणि रघूने कागद पुढे केले. व्यंकटच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला. लता काळजीने पुढे झाली.
"काय आहे?"
"स्निग्धाला कुणीतरी ओलीस ठेवलंय. ५०,००० डॉलर्स मागतोय. चिठ्ठी तुझा नावाने आहे." लताने कागद हिसकावलाच.
"काय म्हणतोय हा माणूस? संध्याकाळी मला एकटीला पैसे घेऊन बोलावतोय. पोलिसांना कळवलं तर स्निग्धा हाती लागणार नाही असं लिहिलंय यात." लता रडायलाच लागली.
"तू रडू नकोस गं." व्यंकट चिडून म्हणाला. त्याच्या मनावरचा ताण प्रचंड वाढला होता. लताने मान खाली घातली. दोघं अस्वस्थ, सैरभैर झाले. काय करायचं तेच कळेना. शेवटी रघूने म्हटलं.
"मी पोलिसांना फोन करतो." कोमलने दचकून पाहिलं.
"पोलिसांना कळवू नका म्हटलंय त्यात."
"असं करुन कसं चालेल?" रघू कोमलवर वैतागला.
"पोलिसांना कळवायचं नाही म्हटलं तरी ५०,००० डॉलर्स आणायचे कुठून? आणि मी लताला एकटं पाठवणार नाही. कुठे यायचं पैसे घेऊन तेही लिहिलेलं नाही." व्यंकटला परिस्थिती कशी हाताळायची तेच कळेनासं झालं होतं. रघू  आणि व्यंकट  पर्याय पडताळत राहिले.
"आपल्या मागे का हे सगळं? आपलं कुणाशी वैर नाही. श्रीमंत आहोत म्हणायचं तर तेही नाही. भाड्याच्या घरात राहतोय. सगळं विकलं तरी ५०,००० हजार डॉलर्स कसे उभे करणार? कोण असेल ह्या मागे? आणि आईंना का मारलं त्यांनी? " लताला तिच्या मनातल्या शंकाची उत्तर हवी होती. व्यंकटला तिच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तर द्यायची इच्छा होत नव्हती.
"कुणीतरी भुरटा चोर असणार. आईंनी विरोध केला म्हणून भडकला असेल." रघूने अंदाज बांधला.
"भुरटा चोर खून करेल?" व्यंकटची विचारशक्ती  गोठली होती. काहीतरी विचारायचं म्हणून त्याने विचारलं.
"त्याने स्वयंपाकघरातली सुरी वापरली याचा अर्थ त्याच्याकडे सुरी नव्हती."
"स्निग्धा?" लताच्या मनातला प्रश्न कोमलने विचारला.
"आईंना मारल्यावर स्निग्धा दिसली असणार."
"हं." लता विचार करत राहिली. एव्हाना बातमी सर्वत्र पसरली होती. ओळखीच्या लोकांची रीघ लागली.  माध्यमांचे प्रतिनिधी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते. भारतातले नातेवाईक काळजीत होते. व्यंकटच्या आईचा देह शवचिकित्सेनंतर कधी  ताब्यात मिळणार ते कळत नव्हतं.  ५०,००० डॉलर्स आजच्या आज उभे करायचे. कुणाकडे हे बोलायचं की नाही हेच दोघांना ठरवता येईना. दोघांना खाजगी बोलण्यासाठी जागाच नव्हती इतकी त्या छोट्याशा घरात गर्दी होती. वेळ टळायच्या आधी काहीतरी ठरवायला हवं होतं. अखेर व्यंकटने निर्णय घेतला. त्याने पोलिसांना सारं सांगून टाकायचा निर्णय घेतला.

पोलिस हातातलं पत्र पुन्हा पुन्हा पाहत होते. ५०,००० डॉलर्स घेऊन लताने कुठे यायचं ते लिहिलेलं नव्हतं त्यामुळे पैसे घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता. हाती लिहिलेलं पत्र असतं तर हस्ताक्षराचा शोध सुरु करता आला असता पण तेही शक्य नव्हतं. पोलिसांनी लता आणि व्यंकटला शांत राहण्याचा दिलेला सल्ला त्या दोघांना पटत नव्हता.  त्या माणसाने पुन्हा संपर्क केला तरच काही प्रकाश पडण्याची शक्यता वाटत होती. तो दिवस वाट पाहण्यात गेला. लता आणि व्यंकटचा जीव घुसमटत होता. असहाय्यताने घेरलं होतं.  पैशाची मागणी करुनही स्निग्धाला ओलीस ठेवणारा माणून संपर्क का साधत नाही ते कळत नव्हतं. पत्रामुळे तपासणीच्या चक्राची दिशाही बदलली. दोघांच्या परिचयातल्या व्यक्तींवर  पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं. मुख्य कारण होतं त्या पत्रात असलेला लताचा उल्लेख. लतिकाला ’लता’ म्हणून ओळखणारी मोजकीच मंडळी होती.  पोलिस निघून गेले.
"आपण इथून बाहेर पडू या थोडावेळ? माझा जीव घुसमटतोय व्यंकट."
"चल." व्यंकटने मुकाट्याने पायात चप्पल सरकवल्या. जिने उतरुन दोघं खाली आले. वाट फुटेल त्या दिशेने चालत राहिले. इमारतीच्या बाहेर पडले. डोळ्यातलं पाणी पुसत लता म्हणाली,
"तुझी आई गेली याचं दु:ख करायलाही सवड नाही रे आपल्याला. काय झालं असेल आपल्या पिलाचं? आपण पैसे दिले नाहीत म्हणून मारुन टाकलं नसेल ना त्या दुष्टाने?" व्यंकटने लताचा हात घट्ट पकडला.
"असं बोलू नकोस ना लता."
"किती वेळा पाहिलंय आपण बातम्यांमध्ये. मुलांना मारतातच रे. नाही कुणी जिवंत ठेवत."
"काय बोलतेस हे लता." व्यंकटने लताला जवळ घेतलं. त्याच्या शर्ट तिच्या अश्रूंनी चिंब भिजला. तिची समजूत घालता घालता तोही रडत राहिला. आजूबाजूला काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. आसपास चिटपाखरुही नव्हतं. त्या काळोखात व्यंकटने टाहो फोडला.
"माझी आई गमावली मी लता. आई गेली माझी. पुन्हा कधी दिसणार नाही ती. अमेरिकेत आणलं मी तिला म्हणून किती खूश होती आणि काय झालं हे. कुणी केलं." लताचा जीव गलबलला. ती थरथर कापायला लागली.
"व्यंकट माझा जीव घुसमटायला लागलाय. मला नाही जगता येणार स्निग्धाला काही झालं तर. वाचवा रे तिला, कुणीतरी वाचवा." लताने तिथेच फतकल मारली. व्यंकटला आता स्वत:चाच राग यायला लागला होता. कुठे शोधायचं स्निग्धाला? पोलिसांना फोन केला नसता तर त्या माणसाचा फोन आला असता?  फोन केलेला कळलं असेल त्याला? त्याने खरंच स्निग्धाला मारलं असेल? रडत बसलेल्या लताला व्यंकटने हात धरुन उठवलं,
"लता, मला माफ कर गं. मी फोन करायला नको होता पोलिसांना. तूच सांग मी काय करु. तूच सांग." व्यंकटनेच धीर सोडलेला बघितल्यावर लताने स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला. ती स्निग्धा मिळेल असं त्याला पुन्हा पुन्हा सांगत राहिली. त्याच्या आणि स्वत:च्या मनाची समजूत घालत राहिली.  दोघंही पुन्हा घराच्या दिशेने चालायला लागले.

रघूच्या घराबाहेर गर्दी पाहून व्यंकटला आश्चर्यच वाटलं. गर्दीला बाजूला करत तो आत गेला. मागोमाग लता. पोलिस कोमल आणि रघूला प्रश्न विचारत होते.
व्यंकटच्या लक्षात आलं. पोलिसांनी आता त्यांच्या मित्रमैत्रिणींवर लक्ष केंद्रित केलं होतं. पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. आधी आमच्यावर, आता मित्र मंडळीवर संशय मनातल्या मनात पुटपुटत तो पोलिस काय प्रश्न विचारतात ते ऐकत राहिला.
लता आणि व्यंकटशी त्यांची ओळख कशी झाली, किती दिवस ओळखतात असे प्रश्न चालू होते. व्यंकटच आता पोलिसांच्या त्याच त्याच प्रश्नांना कंटाळला होता. लता  व्यंकटचा हात हातात धरुन रघूवरच्या प्रश्नांची सरबत्ती ऐकत होती. लताने त्याचा हात दाबला आणि तो दचकला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने कोमल काय म्हणतेय ते ऐकण्याची खूण केली.
"हो. त्या दिवशी व्यंकट आला नव्हता घरी दुपारी जेवायला."
"नेहमी येतात?"
"हो." कोमलच्या उत्तरावर रघूने तिला थांबवलं.
"काम जास्त असेल तर नाही येता येत."
"पण जेवायला येतोसच तू घरी."
"नाही. कधीकधी नाही जमत."
"रघू?" कोमलने रघूकडे आश्चर्याने पाहिलं. रघू उठलाच तिथून.
"मी आलोच." तो घाईघाईने दरवाज्याच्या दिशेने निघाला.
"असं नाही जाता येणार तुम्हाला. चौकशी संपलेली नाही."
"मला वेगळं काही सांगायचं नाही. कोमलने सांगितलं त्यापेक्षा वेगळं सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही."
"असं असेल तर तुम्हाला ठाण्यात यावं लागेल." तिथे असलेल्या पोलिसापैंकी वरिष्ठ म्हणाले आणि रघूचा तोल सुटला.
"हो. हो. मी मारलं व्यंकटच्या आईला. झालं समाधान? मी मारलं त्या दोघींना. पकडा मला. पकडा." वेड्यासारखा त्या लहानश्या खोलीत तिथल्या तिथे फिरत ओरडत राहिला.
"मी मारलं रे, मी मारलं तुझ्या आईला. स्निग्धाला सुद्धा. मला नव्हतं मारायचं दोघींना." रघू व्यंकट समोर उभा राहिला. व्यंकट दगडासारखा उभा होता. आपल्याला काय वाटतंय हेच त्याला कळेना. सार्‍या जाणिवा गोठून गेल्या होत्या. लताच्या डोळ्यापुढे काळोखी आली. कोमल धाय मोकलून रडायला लागली. पोलिसांनी व्यंकटसमोर माफी मागणार्‍या रघूला बाजूला घेतलं. त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. आणि व्यंकट धावला. त्याने थाडथाड रघूच्या थोबाडीत मारल्या. आयुष्यात कधीही न दिलेल्या शिव्या त्याने रघूला घातल्या. शिव्या घालता घालता तो रघूला मारत राहिला. पोलिसांनाही बोटाच्या इशार्‍यावर थांबवलं त्याने आणि रघूला मारता मारता तो एकदम  पाया पडला.
"रघू, तू खोटं बोलतोयस मित्रा. हो ना? स्निग्धा कुठे आहे ते दाखव रे मला. कृपा कर आणि मला स्निग्धा आणून दे परत. तू खरंच मारलंयस का रे स्निग्धाला? का रे तू असं केलंस. का? का? माझ्या आईला मारलंस, मुलीचा जीव घेतलास.  आता मी कसा जगू? लताला काय सांगू. मित्र ना रे तू माझा...." व्यंकट बोलत राहिला. थिजलेल्या नजरेने रघू त्याच्याकडे पाहत राहिला. पोलिसांनी महत्प्रयासाने व्यंकटला बाजूला केलं.  कोमल रघूच्या हातात बेड्या घालून नेणार्‍या पोलिसांच्या मागून धावली. व्यंकट आणि लता एकमेकांच्या आधाराने आपल्या घरात परत गेले.

"रघू? रघूने खरंच मारलं असेल?" लता उत्तर नसलेला  प्रश्न व्यंकटला पुन्हा पुन्हा विचारत राहिली.
"मला माझी स्निग्धा आणून दे रे आताच्या आता." लता हट्टाला पेटली. पण तिची विनवणी व्यंकटपर्यंत पोचत नव्हती. व्यंकटच्या मनात विचारांचा, भावनांचा कल्लोळ माजला होता.
"स्निग्धा किती छान राहायची रे त्याच्याकडे. मित्र ना तो आपला. का केलं त्याने असं?" लताने व्यंकटकडे पाहत हताश स्वरात विचारलं.
"पण खरंच केलं असेल त्याने असं की काहीतरी गफलत होतेय?" मनात घोळत असलेला प्रश्न व्यंकटने जोरात विचारला आणि लता चमकली. हा विचार मनाला शिवलाच नव्हता. पण आता तिलाही वाटायला लागलं, स्निग्धाला नाही मारणार रघू. तो हे असं अघोरी कृत्य करणार नाही.  दोघंही त्या दिशेने विचार करायला लागले.
"स्निग्धाला काही झालं नसेल. पोलिसांचा गोंधळ झाला असेल. शोधतील पोलिस तिला." दोघं एकमेकांना समजावत राहिले.
"स्निग्धाला कसं मारेल तो? मुलीसारखीच होती ती त्याला."
"रात्रंदिवस आपल्याबरोबर आहेत दोघं."
"रघूच तर सगळं करतोय."
"पण रघूने का घेतला आरोप स्वत:वर?" लताने विचारलं आणि दोघांनाही जाणवलं आपण स्वत:चं फसवं समाधान करतोय. स्निग्धाला त्याने मारलंय हे मन स्वीकारत नाही त्यामुळे तो निरपराधी आहे असं पटवतोय आपणच एकमेकांना. दोघांच्याही लक्षात आलं की रघूने त्या दोघांना एक क्षणही एकटं सोडलेलं नाही. पोलिसांच्या हालचाली, घडामोडी सारं काही इत्यंभूत माहिती आहे त्याला. दोघं मुक झाले. इतका मोठा विश्वासघात ज्याला मित्र म्हणवतो त्यानेच करावा हे पटवून घ्यायलाच जमत नव्हतं दोघांना. आतल्या आत दोघंही तुटून गेले. आणि  व्यंकट ताडकन उठला. कोमलच्या दारावर रघूला तुडवून काढल्यासारख्या लाथा मारल्या त्याने. तांबारलेल्या डोळ्यांनी कोमलने दार उघडलं. व्यंकटच्या बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या लतासमोर कोमल उभी राहिली.
"मला खरंच यातलं काही म्हणजे काही माहीत नाही. रघू जेवायला आला नाही हे खरं पण तो काम होतं म्हणून येऊ शकला नाही. मी बोलले होते त्याच्याशी. तो तिथेच होता. त्याचा नाही ह्यात हात. माझा तर कशाशी काहीही संबंध नाही." कोमलच्या रडण्या ओरडण्याने आजूबाजूची दारं उघडली गेली. व्यंकट आणि लता न बोलता पुन्हा घरात येऊन बसून राहिले. इतका मोठा घात रघूने  का केला असेल? कसा ठेवायचा विश्वास कुणावर यापुढे? कोमल खरंच अंधारात असेल? स्निग्धा कुठे आहे? काय जाब देईल रघू पोलिसांना? कधी कळेल नक्की काय झालं आणि का? का? का केलं रघूने हे पाशवी कृत्य?

रघू पोलिसांसमोर बसला होता.  त्याचा कबुलीजबाब समोरच्या यंत्रात बंदिस्त होणार होता. आता हा खेळ संपवायचा होता त्याला. काय ठरवलं आणि काय झालं, सगळं कबूल करुन त्याला स्वत:च्या डोक्यावरुन गेले ३ दिवस आलेलं प्रचंड दडपण उतरवायचं होतं. त्याने बोलायला सुरुवात केली.
"दुपारी मी व्यंकटच्या घरी गेलो. स्निग्धाच्या आजीने दार उघडलं. हातातली सुरी रोखून मी त्यांना मागे व्हायला सांगितलं. घाबरुन त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्निग्धा सोफ्यावर होती. मी तिला उचलल्यावर आजी मध्ये आल्या. आजींना माझा  कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही असं जीव तोडून सांगत होतो मी. मला फक्त स्निग्धा हवी होती. पण त्या मध्ये आल्या. ती माझ्या डाव्या हातात होती. मी आजींना उजव्या हाताने मागे करायला गेलो. स्निग्धा हातातून पडली. तिला सावरायला मी डाव्या बाजूला वाकलो त्यामुळे हातातली सुरी सपकन आजींच्या गळ्यावरुन फिरली. त्या खाली पडल्या. मी स्निग्धाला सावरलं. आजींची अवस्था पाहून मी घाबरलो तेवढ्यात स्निग्धा रडायला लागली. खिशातला रुमाल मी तिच्या तोंडात कोंबला. मी स्निग्धाला घेऊन आतल्या खोलीत गेलो. तिथली हाताला आली ती बॅग घेतली आणि त्यात स्निग्धाला ठेवलं. बॅग पूर्ण बंद केली नाही मी. मला स्निग्धाला मारायचं नव्हतं. मी तिथून बाहेर पडलो. आणि आमच्या इमारतीच्या आवारातल्या व्यायामशाळेत गेलो. तिथे कुणी नव्हतं. कधीच कुणी नसतं.  बाजूची खोली रिकामी असते तिथली. तिला तिथे खोलीत बाकड्याखाली ठेवलं. बाहेर पडलो आणि स्निग्धासाठी दूध घेतलं. पुन्हा तिला ठेवलं होतं तिथे गेलो. पण स्निग्धाचा श्वास थांबला होता. स्निग्धा तिथेच आहे. कुणीतरी आणा रे तिला. कुणीतरी आणा. बघा रे ती जिवंत आहे का. बघा ना लगेच." रघूने श्वासही न घेता काय घडलं ते सांगितलं. गेल्या तीन दिवसातलं मनावरचं प्रचंड ओझं उतरलं होतं. आता त्याला कशाचंच काही वाटत नव्हतं. मान खाली घालून तो बसून राहिला.  त्याचा कबुलीजबाब ध्वनिमुद्रित झाला होता. तेवढ्यात रघूने विनंती केली.
"माझ्या मित्राला निरोप द्यायचा आहे." पोलिस काही न बोलता त्याचं बोलणं ध्वनिमुद्रित करत राहिले.
"माझ्या हातून चूक घडली. मला कुणालाच मारायचं नव्हतं. मला हवे होते फक्त ५०,००० डॉलर्स.  मित्रा, मला माफ कर. मी कर्जबाजारी आहे रे. जुगाराच्या व्यसनाने मी कर्जबाजारी झालोय. ते कर्ज फेडायचा हाच मार्ग दिसला मला. अचानक दिसला. तुम्ही दोघं कमावता. मुलीसाठी सहज द्याल ५०,००० असं वाटलं रे. फार विचारच केला नाही मी. स्निग्धासाठी तुम्ही काहीही कराल हे ठाऊक होतं मला. मला कुणालाच मारायचं नव्हतं. खरं सांगतो कुणालाच मारायचं नव्हतं.  मला माफ कर व्यंकट आणि लता. मला माफ करा..."

Thursday, October 27, 2016

समाधान

'कथाश्री' च्या दिवाळी अंकात माझी कथा. या कथेशी माझं घट्ट नातं आहे. ही कथा माझ्या आईवर आहे. तिचं लहानपण, तो काळ आणि काही घटनांचा खोलवर झालेला परिणाम. परिस्थिती बदलत जाते तशी माणसंही. त्यातूनच आपलं आपण स्वत:ला शोधायचं, जपायचं, समाधान मानायचं. तीच ही कथा - ’समाधान’. खाली काही भाग तुमच्यासाठी. पण अंक मिळवून नक्की वाचा. मला आणि अर्थातच माझ्या आईला खूप आनंद होईल.

"मी तयार आहे. चल ना." ठेवणीतला फ्रॉक घालून कमू गीताईसमोर आली आणि तशीच थबकली. काळ्याभोर केसांवर अबोलीचा गजरा माळलेली गीताई आरशात स्वत:ला निरखीत होती. आरशातलं तिचं ते प्रतिबिंब कमूला इतकं आवडलं की गीताईला मागून मिठीच मारावी असं वाटून गेलं. पण ती गीताईला पाहत खिळल्यासारखी उभी राहिली.
पाहणार आहोत ठाऊक आहे का?"
"मीनाकुमारीचा परिणीता." कमूने नुसतीच मान डोलावली. तिला कोणता पिक्चर याच्याशी काहीही देणघेणं नव्हतं. पिक्चर पाहून आलं की तिचा दुसरा दिवस खूप छान जाई. घरातली सगळी मुलं तिला घेरुन टाकत. सगळ्यांना गोष्ट ऐकायची असे. त्यातली गाणी तर कमूची लगेचच पाठ झालेली असत. ती गायचीदेखील सुरेल. गोष्ट, गाणं यात कमूचा दिवस खूप छान जायचा. गीताई बरोबर दर आठवड्याला पिक्चरला जायची कमू आतुरतेने वाट पाहायची.


"बांध ना वेण्या तुझ्या रिबीनीने. का मी बांधून देऊ?""नको." कमू पळालीच तिथून. जिन्याच्या पायर्‍या धाडधाड चढत कमू खोलीत गेली. काळोख्या खोलीची खिडकी तिने गडबडीने उघडली आणि कोपर्‍यात ठेवलेल्या पत्र्याच्या ट्रंकमधला छोटासा आरसा आणि फणी बाहेर काढली. केळ्याच्या दोराने बांधलेल्या वेण्या तिने घाईघाईने सोडल्या. बराचवेळ ती त्या रिबीनी कुरवाळत राहिली. पुन्हा पुन्हा केस विंचरुन तिने वेणी घातली. लाल रिबीनीने बांधलेल्या वेण्यांकडे डोळे भरुन पाहत राहिली. या दोन रिबीनी तिच्या हक्काच्या होत्या. या पूर्वी तिने एकदाच तिच्या केसांना रिबीन बांधली होती. ती सुद्धा चोरुन. घरात सगळ्यांकडे रिबीनी होत्या. त्यातलीच कुणाचीतरी तिने हळूच आपल्या केसांना बांधून पाहिली होती. आज प्रभाने आणलेल्या रिबीनी मात्र तिच्या होत्या. स्वत:च्या.


"आत्या, अगं पाहतेस काय अशी. मी पास झाले. पाऽऽस झाले. आता प्रभा मला पोस्टात नोकरी लावून देईल. द्यायलाच हवी तिने. देईल ना गं?"
"देईल हो. अगदी नक्की. हे बघ आधी साखर ठेव देवाजवळ. चल मीच ठेवते." सुधाआत्याने कमूचा हात धरुन स्वयंपाकघरात नेलं. फडताळातला साखरेचा डबा काढून वाटीत साखर घेतली आणि त्या तिला माजघरात घेऊन गेल्या. देवाजवळ साखर ठेऊन दोघी हात जोडून उभ्या राहिल्या.

"आलास. वाट पाहून पाहून डोळा लागला कमूचा." पलंगावर झोपलेल्या कमूच्या डोक्यावर हात फिरवीत आबा बसले. सुधाने लगबगीने खोबर्‍याच्या वड्या पुढे केल्या.
"नको, खाऊनच आलो." आबा नुसतेच कमूच्या डोक्यावर हात फिरवीत बसून राहिले.
"थोडं बोलायचं होतं तुझ्याशी."
"बोल." सुधा काय बोलणार ह्याची कल्पना आलीच आबांना. त्यांच्या स्वरातला निरुत्साह जाणवूनही सुधाने बोलायचं ठरवलं.



Wednesday, October 26, 2016

वेगळी

श्री. व सौ. दिवाळी अंकात माझी ’वेगळी’ कथा प्रसिद्ध. अंक विकत घेऊन, शेजार्‍यापाजार्‍यांकडून आणून (परत द्यायला न विसरता), वाचनालयात जाऊन काहीही करुन मिळवा पण वाचाच :-).





-)



Friday, October 21, 2016

द्या ना मला तुमचं लहानपण

आई म्हणते,
बालपणीचा काळ सुखाचा
कुणीतरी सांगा तो कसा शोधायचा!
शाळेची वेळ संपत नाही
नंतर असते छंद वर्गांची घाई!
मेजवानी शनिवारी, तिथे
फोन, व्हीडीओ गेम्सची संगत भारी!
झोपायला पापणी मिटत नाही
दिवस कधी संपणार उमगत नाही!
विचार करायलाही फुरसत नाही
तुम्ही, नाही म्हणायची
संधी हाती लागूच देत नाही!
तुम्हाला पाहिजे म्हणून करायचं
आम्हाला काय आवडतं ते कधी कळायचं!
कसा गं असतो बालपणीचा काळ सुखाचा
आई तूच सांग, कसा तो शोधायचा!
पायावर पडलं पाणी की
तुला खेळायला जायची घाई!
शुंभकरोतीला घरी आलं
की दिवस संपून जाई!
बाबाचं लहानपण भारी
सारखी आपली मारामारी!
द्या ना मला तुमचं लहानपण!
जपेन मी हृदयात ते क्षण
मोठी झाले की मी ही म्हणेन
रम्य ते माझं बालपण! - मोहना जोगळेकर

Thursday, October 6, 2016

माझ्या मुलाचा विनोदी अनुभव

ऋत्विक सहावीत असताना त्याने ओरलॅंडो महाराष्ट्र मंडळात सादर केलेला त्याचा विनोदी अनुभव. आजी आजोबा अमेरिकेत आल्यावर त्यांच्याबरोबर प्रवास करताना, भारतात गेल्यावर आणि अर्थात आमच्याबाबतीत त्याला आलेले अनुभव :-). हा त्याचा पहिला प्रयत्न. त्यानंतर त्याने माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमासमवेत खूप महाराष्ट्र मंडळात हा अनुभव सादर केला.


Tuesday, August 2, 2016

स्त्रीत्वाच्या पिढ्या!

आजी म्हणायची...
खरं तर काहीच म्हणायची नाही
तिने स्वीकारलं होतं तिचं गृहिणी असणं
वेगळं नव्हतंच तिच्या दृष्टीने
घरच्या परिघात ’स्व’ ला विरघळू देणं!

आई म्हणायची,
घरच्या जबाबदार्‍यांनी बांधून ठेवलं
असलेलं काम सोडायला लागलं!
पसर पंख, मार भरारी
लाभू दे स्वावलंबनाला
कर्तुत्वाची झळाळी!

आम्ही म्हटलं,
आजीचं पाहिलंय
आईने सांगितलंय
बदलायला हवं!
फडकवले झेंडे
स्त्रीमुक्तीचे, स्वतंत्रतेचे,
कर्तुत्वाचे, स्वावलंबनाचे!

वाटलं,
मिळालं सारं,
स्त्रीने स्वत:ला शाबित केलं
स्त्रीमुक्तीचं पेव फुटलं!
"स्व" ला उधाण आलं
कुठे थांबायचं कळेना
काय कमावलं काय गमावलं समजेना
स्त्रीत्व म्हणजे नेमकं काय ह्याचा उलगडा होईना
हातात शून्य मावेना!

आई, आजी, आमची पिढी
सर्वांकडे पाहून स्वप्नातली स्त्री हसली,
म्हणाली,
अगं मीच ती
दृष्टी असून तू अंध
स्त्रीत्व म्हणजे गंध
बकुळीच्या फुलासारखा
हळुवार पसरणारा
दरवळणारा, मोहवणारा,
आणि तरीही,
स्वतंत्र अस्तित्व जपणारा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Monday, July 25, 2016

सवंगडी

कधीतरी मोठं व्हायला झालं
आणि लक्षात आलं
लहानपण पळून गेलं!
थांबवलं नाही तर हातातून जाईल
अधिकच मोठं व्हायला होईल!
धावत जाऊन बोट धरलं, आणलं त्याला परत!
जरा कुरकुरलं, दमलंही, धाप लागली म्हणालं
पण वळलं अखेर हसत हसत!

सागरगोटे खेळू, पारंब्यांना लटकू
आंब्याच्या झाडावरच्या कैर्‍या तोडू
तिखट मीठ लावून झाडावरच खाऊ!
नदीत डुंबू,  मस्ती करु, गप्पा झोडू
थापा मारु, मोठेपण विसरत  हुंदडत राहू!

बालपण घरात आलं
मुलीचंही सवंगडी बनलं!
तुझी आणि माझी जोडी
लहानपणची शर्यत खोटी
तरी पैजेची आस मोठी!
माझं लहानपण दमत होतं, थकत होतं!
मुलीचं बालपण उत्साहात होतं
माझ्यातली उमेद जागवत होतं!

बसलो एकमेकींना लगटून
लेक हसली खुदकन
गळ्यात पडली पटकन!
किती गं छान तुझं लहानपण
बोलवून आण अधूनमधून
आवडेल माझ्या बालपणाला
तुझ्या लहानपणाचं सवंगडी बनायला! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Sunday, July 10, 2016

आत्मा


शाळेच्या दिवसात मैत्री हेच सूत्र असतं
आमचा समाज, आपल्यातलेच असं काही नसतं!
आपल्यातले, आमच्या समाजातले
कुणास ठाऊक हे विष कुठून येतं
कळेपर्यत मनात भिनून जातं!

वाटतं,
आमचा समाज, आपल्यालेतच
हा जातीवाद राहिलाय माघारी!
तेव्हा कुठे ठाऊक होतं
वर्णभेद उभा ठाकलाय ठायीठायी!
’लेबलं’ आहेतच सर्वत्र
आधी जातीवरुन, आता वर्णावरुन
गोरे काळ्यांना मारतात!
काळे पेटून उठतात
’मायनॉरिटी’ सुन्न होतात!

माणूस नावाची जात हरवली आहे
माणूसकी नावाचा धर्म गाडला गेलाय!
आत्मा सापडत नाही म्हणून
त्यांचा  श्वास कोंडत चाललाय!

कदाचित दिसतील दोघं तुम्हाला!
हिंसेच्या प्रागंणात गोंधळलेले, घाबरलेले
विसरु नका त्यांची समजूत घालायला
 हात धरुन स्वत:च्या घरात आणायला! - मोहना