Thursday, November 30, 2017

भूक

"ए, अंग चोरून बसायचं नाही. गुमान उभं राहा माझ्यासमोर...हा, असं. उतरव कपडे अंगावरचे. रडायचं, भेकायचं नाही. जीव नाही घेत तुझा. ड्रामाबाजी बंद एकदम. मी सांगेन ते चाळे करायचे आणि चालू पडायचं दुसर्‍या सैनिकाकडे. काय समजलं का? एऽऽऽऽऽऽ" गोर्‍या कातडीच्या त्या माणसाकडे ती भेदरून पाहत राहिली. तो माणूस काय म्हणतोय तेच तिला कळत नव्हतं. त्यात त्याच्या हातातली बंदूक पाहून तिला जोरजोरात ओरडावंसच वाटत होतं, पण तो सारखा काहीतरी बोलत होता आणि त्याच्या न समजणार्‍या खाणाखुणांनी ती ओरडायचं विसरून वेंधळ्यासारखी उभी होती.
त्यालाही भाषेची अडचण जाणवत होती. आता समजुतीने काही सांगायचं तर शांतपणे खाणाखुणा करून संवाद साधता येतो; पण बोलणं सुरू होण्याआधीच त्या पोरीचा घाबरलेला, गोंधळलेला चेहरा पाहून त्याच्या मस्तकात तिडीक गेली. त्याच्या भाषेत तो जोरजोरात हातवारे, आरडाओरडा, खाणाखुणा करायला लागला. तो संभोगासाठी भाषेची गरज नसतेच हे तिला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता. तिच्या डोळ्यातले भेदरलेले भाव त्याला उत्तेजित करत होते. उंदीर - मांजराच्या खेळाला एक प्रेक्षकही लाभला होता. त्याला मात्र त्याची कदर नव्हती. गाव सोडून तो सैन्यात आला तेव्हापासून शारीरिक उपासमार फारच वाढली होती. इतकी वर्ष बर्‍यांचदा गावी जायला तरी मिळत होतं; या वेळेस थेट युद्धालाच भिडायचं त्यांच्या देशाने ठरवलं तसं चित्र बदललं. सहा महिने झाले तरी युद्ध सुरू होण्याचं नाव नव्हतं. घाबरला होता त्याचा संरक्षणमंत्री. जगानेच विरोध करायला सुरुवात केल्यावर युद्धाची कळ दाबायला सारं सैन्य एकत्रित जमवूनही तो तयार नव्हता. दिवसा अंगाची लाही लाही होईल एवढं तापमान चढणार्‍या आणि रात्री गारठून अंग ताठ पडेल अशा या प्रदेशात प्रश्न होता तो किती महिने काढावे लागणार याचाच. पण ते निश्चित नव्हतं. युद्ध खरंच सुरू झालं तर या सैनिकी पोषाखातल्या देहाचं काय होणार ते काळच ठरवणार होता. त्यामुळे आता ताळतंत्र सोडून वागायचंच हा त्याचा निर्धार होता.
’मजा मारायचा साला. कोणाला पर्वा आहे आपली नाही तरी आपली. मेलो तर एक दिवस फोटो झळकेल सगळीकडे. आता उदो उदो करता आहेत सैनिकांच्या नावाने, मिडियावाल्यांनी तर कहर केला आहे. कुणाच्या तरी घरातल्यांना गाठतात आणि व्ही. डी. ओ. भेट घडवतात त्या घरातल्या सैनिकाशी. अरे, आणखी जीव तळमळतो घरच्या आठवणींनी. दोन मिनिटं बघायचं आणि आय लव्ह यू चा धोशा लावायचा. सध्या भाव आहे, मेलो तर वर्षातून एकदा करतीलच तो मेमोरिअल डे साजरा आमच्या नावाने की झालं. एक बायको आणि पोरं चार दिवस अश्रू ढाळतील तेवढे...’ जागृत होणार्‍या भावना टाळत त्याने समोरच्या काळ्याभोर शिल्पाकडे पाहिलं. त्या पोरीबरोबर मजा मारायला बाकीच्या सैनिकांनी त्याला समजून एकांत दिला होता. खूप दिवसांची खुमखुमी काढणार होता तो.  कोपर्‍यात उभ्या असलेल्या  दुसर्‍या मुलीचं अस्तित्वं त्याला जाणवलं नसतं तर तो पुरुष कसला. मुद्दामच त्याने तिची दखल न घेतल्यासारखं केलं होतं. मिळालेल्या संधीचा त्याला सिनेमास्टाईलने उपयोग करायचा होता. तरीही त्याची आशाळभूत नजर कायलंचं शरीर भेदून आरपार शिरत होती. त्याच्या नजरेला ठळकपणे पडण्याआधी शरीर जेवढं आक्रसता येईल तेवढं आक्रसून घेत तिने थिजल्या नजरेने पाय मुडपून स्वत:ला अधिकच कोपर्‍यात रेटलं. आपलं अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न ती होता होईल तेवढा करत राहिली.

गुरगुरत्या पुरुषी आवाजाने कायलचा थरकाप उडाला. पायात मणामणाच्या बेड्या अडकल्यागत तिने आपला देह त्याच्यासमोर रेटला. आपल्याच वर्गातल्या शेवंताचा उघडानागडा देह पाहताना तिने शरमेने मान खाली घातली होती, पण आता तिच्याच बाजूला उभं राहिल्यावर आपली अवस्था काय होणार हे तिच्या लक्षात आलं होतं. तरीही प्रतिकार करायची ऊर्मी तिला आवरता आली नाही. तिने शेवंताशी चाळा करणार्‍या त्याच्या हाताला जोरदार चिमटा घेतला. भडकलाच तो.
"थांब तुला पण मजा चाखवतोच." दातओठ खात त्याने तिचा शाळेचा पोषाख टराटरा फाडला. कायलने हाताने शरीर झाकायचा तोकडा प्रयत्न केला. आता दोन जीवांची मेजवानी त्याच्यासमोर होती. कशाची पर्वा करायची गरज नव्हती. दोघींचा आक्रोश, सैनिकी पोशाख, त्याच्या वाटेकडे डोळे लागलेली त्याची बायको, मुलं सगळं धूसर झालं होतं. उरला होता तो पशू. पशूसुद्धा बरा म्हणायची वेळ आणणारं वर्तन तो करणार होता आज. पहिल्यांदाच दाखवत असलेलं हे पुरुषीपण जरा जास्तच होतं आहे हे त्याला पटत होतं. तो इतका वाईट नाही असं त्याचं त्यालाच आतून आतून कुणीतरी सांगत होतं; पण वासनेने त्याच्या मनाचा तोल ढळलाच.

’युद्ध संपेल म्हणून गेले सहा महिने शरीर खितपत पडलंय एका एका सैनिकाचं, जागं होणारच ते. माणसाचंच लक्षण म्हणायचं असतं त्याला. पण ह्या पोरींनी जरा जाणीव दाखवली असती तर ही वेळ कशाला येईल? समजुतीचा मामला असला की बरं पडतं. प्रेतासारख्या थंड उभ्या आहेत दोघी.’ एकदम त्याचा पारा चढला.
"एऽऽऽ मी नाही तुम्हाला इथे बोलावलेलं. मेजरनेच सांगितलं आम्हाला की पैसा फेकला की तुमचा समाज पोरी पुरवतो म्हणून. त्यानेच केली ही व्यवस्था आणि तुम्ही काय चालवलाय हा तमाशा? बास झालं आता रडणंभेकणं. नीट वागलात तर मी सुद्धा प्रेमाने वागेन, नाहीतर माझा सैनिकी खाक्या दिसेलच ." दोघींच्या अंगावर धावलाच तो. त्यांना मारत, आडवंतिडवं तुडवीत आळीपाळीनं त्याने त्या दोघींना उपभोगलं. सुख ओरबाडलं.
पन्नास हजार सैनिकांचा तो फक्त एक प्रतिनिधी होता. गेले सहा महिने नुसतीच प्रतीक्षा चालली होती. सुरुवातीचे दिवस बरे गेले म्हणा. वातावरणातला बदल, वेगळं अन्न, सगळ्याची बदललेली चव बरी वाटत होती; पण काही दिवसांतच नावीन्य संपलं. रटाळ कंटाळलेपण भरून राहिला सर्वत्र. आता युद्ध सुरू होण्याची वाट पाहण्याव्यतिरिक्त काहीच उद्योग उरला नाही. त्यांचा देश पुढारलेला. इ मेल, व्हिडिओ टेप अशा अत्यानुधिक सोयींनी घरच्यांशी संपर्क होताच. पण ह्याच गोष्टी मनाचा ताबा ढासळवून टाकणार्‍या ठरत होत्या हे कोण सांगणार त्याच्या देशातल्या प्रसारमाध्यमांना. ती तर चेकाळल्यासारखी देशभक्तीच्या भावनेने सैनिकांचं मनोबळ वाढवायच्या प्रयत्नात होती. आधीच भौतिक सुखाला सरावलेल्या सैनिकांना या वातावरणात रुळणं कठीण पडत होतं. प्रशिक्षण वेगळं आणि प्रत्यक्ष रणभूमी निराळी. खाण्यापिण्याच्या वेगळ्या सवयी,  आजारपणं, वैफल्य याच्याच जोडीला विषयवासनेने उद्दीपित झालेल्या सैनिकांना आवरण्यासाठी शेवटी मेजरला अतिशय धाडसी पाऊल उचलावं लागलं.

हवेत मातीचा धुरळा उडवीत चार जीप गावात शिरल्या तशी तिथली शांतता ढवळून निघाली. भटकणारी काही पोरं गाड्यांच्या मागे धावत सुटली. शहरातला साहेब आला तरच दिसणारी गाडी वाड्यातल्या लोकांचं आकर्षण, विरंगुळ्याचं साधन होतं.  चारदोन पोरं, भुंकणारी एक दोन कुत्री याव्यतिरिक्त कंटाळवाणी स्वस्थता नांदत होती. वातावरणात कसलीच हालचाल नसलेलं ते गाव सुस्तावल्यासारखं भासत होतं. वाडीतल्या गर्द लाल विटांच्या झाडीत वसलेल्या घरांसमोरही तसाच आळसावलेला कंटाळा जाणवत होता. दुपारची निवांत वेळ. कामधाम आटपून मिश्री लावत बायकांचा आराम चालला होता. ही वेळ त्या सगळ्यांच्याच आवडीची. पुरुष शेतावर नाही तर रोजंदारीत गुंतलेले, पोरीबाळी टेकडीवरच्या शाळेत अडकलेल्या. जेवणखाणं आटोपलं की गप्पा मारता मारता गोधड्या शिवत बसणं हा नेहमीचा उद्योग. नीनाने ह्या गोधड्या शहरात नेऊन विकल्या की थोडेफार पैसेही मिळत. जेमतेम चार महिनेच त्यांना मिळत. एकदा का बर्फ पडायला सुरुवात झाली की चार भिंतींच्या आता राहणं सक्तीचं. मग सगळं ठप्प. अगदी कोंडल्यागत. त्यामुळे जीवघेणा उकाडाच बरा वाटायचा. निदान एकत्र जमून गप्पा मारत मारत गोधड्या शिवण्याचं काम चालू राहतं. आता तर लोणची, मसालेसुद्धा एकत्र बसून एकाच ठिकाणी करायचे असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. गप्पा होतात आणि कामाचा थकवा जाणवत नाही.  मुलं पण शाळेत गेलेली. चार खणांची टेकडीवरची शाळा म्हणजे बायकांची संजीवनी होती. शहरातले इनमिन दोन शिक्षक चार पाच वर्ग चालवत होते. गावातल्याच एक दोघांच्या घरी तो शिक्षकवर्ग रहायचा. चार महिने शिकवायचं. बर्फ पडायला लागला की गावाचा संपर्क तुटायचा जगाशी. त्याच्या आधी शाळा बंद करून शिक्षक शहरात परतत. गावाकडून दोन्ही शिक्षकांना प्रेमाची वागणूक मिळे. त्यामागे पोरंबाळं लिखापढी करून शहराचा मार्ग धरतील. आपल्या नशिबी दोन वेळची रोटी तरी येईल ही भावना तर होतीच; पण पोरं शाळेत गेली की चार क्षण निवांत घालवायला मिळतात. सुखदु:ख उगाळता येतात यातलं समाधान अधिक होतं.
आजही गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. नीनाने नेहमीप्रमाणे काही तरी नवीन योजना त्यांच्यासमोर मांडली होती. तिचा उत्साह, हुशारी सगळ्या गावाला नेहमीच थक्क करून जायची. बुकं न शिकता ही एवढी हुशार कशी हे त्या वाडीच्या दृष्टीने कोडंच होतं. पण तिला कुणी विरोध केला नाही. झाला तर फायदाच झाला होता  सगळ्या वाड्यांना तिच्या नवीन नवीन योजनांचा. शाळासुद्धा तिच्याच पुढाकाराने चालू झाली. मुलांना शाळेत पाठवून काय करायचं असं विचारणार्‍या बायाबापड्यांना तिने पोरांच्या कचाट्यातून कशी सुटका होईल हीच लालूच दाखविली होती. नंतर मग सगळे फायदे आपोआपच लक्षात आले होते प्रत्येकाच्या. आत्ताही उत्साहाने ती काही तरी बोलत होती. तेवढ्यात तिच्या कानावर कसलासा आवाज आला. त्यानंतर जोरजोरात आरडाओरडा. क्षणभर हृदयाचे ठोके थांबल्यासारखं वाटलं नीनाला. एव्हाना बाकीच्यांच्या कानावरही आरडाओरडा पडला. ’साळा, साळा’ कुणीतरी आवाजाच्या दिशेचा वेध घ्यायचा प्रयत्न केला तशा जीवाच्या आकांताने सगळ्या जणी शाळेच्या दिशेने धावत सुटल्या.

चार खोल्यांच्या त्या शाळेच्या आवारात क्रूरतेने थैमान घातलं होतं. आरडाओरडा, रडारड, पळापळ आणि हातात बंदुका घेतलेली दोनचार अनोळखी माणसं एवढंच दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. बंद ट्रकमध्ये टिपलेल्या मुली बंदुकीच्या नळीने ढकलल्या जात होत्या. आक्रोश, आरडाओरडा, जीपच्या टायर्सनी उडविलेले धुळीचे लोट आसमंत लालसर करून टाकत होते. आपापल्या मुलींना शोधता शोधता प्रसंगावधान राखून जिची सुटका करता येईल तिला हाताला ओढून बाजूला काढत होत्या सगळ्या जणी. थरथर कापणार्‍या नीनाचे डोळे कायलला शोधत होते. दरम्यान दोन तीन बायकांना झाडाच्या मागे आडोशाला धाडलं तिने. बाजूला ओढून घेतलेल्या मुलींना ती तिकडेच ढकलत होती. त्या दोघी मग हळूच बंदूकधारी माणसांना चुकवून उतारावरून लपतछपत त्या मुलींना वाडीकडे जायला मदत करीत होत्या. पण किती? दोन चार मुलींनाच सोडवता आलं. बंदुकीच्या नळ्या त्या माणसांनी आता या बायकांच्या जमावावरही रोखल्या तशी त्यांना माघार घेणं भागच होतं. तेवढ्यात घामाने थबथबलेल्या कायलचे वर्गाच्या दाराच्या आडचे डोळे नीनाच्या दृष्टीला पडले तशी तिने कायलच्या दिशेने धाव घेतली. ती कायलपर्यंत पोचेपर्यंत अंगाखांद्यावर पडलेल्या दंडुक्याच्या माराची तिला पर्वा नव्हती; पण ती कायलपाशी पोचून तिचा हात धरणार तोच बंदुकीचा दस्ता तिच्या डोक्यावर एवढ्याने बसला की ती कोसळलीच. अवघे चाळीस सेकंद. खाली पडता पडता तिच्या कपाळावरची शीर तडतडली. हाच क्षण आहे कायलला वाचवायचा. एकदा हा पोटचा गोळा हातातून सुटला तर पुन्हा म्हणून भेटायचा नाही.
"कायलऽऽऽ, कायलऽऽऽ" उठण्याचा प्रयत्न करीत तिने हात पुढे करण्याचा प्रयत्न केला पण पूर्ण शाळाच तिच्याभोवती गरगरा फिरली. तिने पुन्हा एकदा स्वत:लाच बजावलं. या क्षणी तिला उभं राहणं भाग होतं. जबरदस्त इच्छाशक्तीने ती कशीबशी उठून बसती झाली. डोळे उघडून तिने  इकडे तिकडे पाहिलं. पण सगळीकडे शांतता पसरली होती. शांतता, भयाण शांतता! डोक्यातून भळभळा वाहणारं रक्त थोपवण्याचा प्रयत्न करत ती उठून बसली. आजूबाजूला सगळ्या बायका असूनही तिथे पसरली होती शांतता. काळीज चिरून जाणारा आक्रोश बरा असं म्हणावंसं वाटणारी शांतता. प्रत्येक जण हृदयात न मावणारा आकांत अश्रूंनी ढाळत बसला होता. मूकपणे. बाकी सारं कसं अगदी शांत शांत होतं. थोडा वेळ नीना काय घडलं त्याचा विचार करत तशीच बसून राहिली. पण आता काहीतरी करायला हवं याचं भान लगेच आलं तिला.
"चला, रडून न्हाई काम व्हनार. आदमी धुंडाळा कुटं हायेत. त्येंच्या कानावर घालू म्हनत व्हते मी."
नीनाने थरथरणारी बोटं दोघींच्या हातात गुंतवली. एकदोघींनी तिच्या गळ्यात पडून दु:खाला वाट मोकळी करून दिली. एकमेकीचा आधार घेत सार्‍याजणी उठल्या.
"माजी शेवंता, अगं नीना तू भैनीवानी ग आमाला. आनून दे माजी शेवंता. दे ना गं. दे..."
शेवंताची आई धाय मोकलून रडायला लागली तसा सगळ्याजणींनीच गळा काढला. नीनाची त्यांना शांत करण्यासाठी तारांबळ उडाली. शेवटी सगळ्या जणी फॅक्टरीच्या दिशेने निघाल्या.
"कुटं नेलं असेल नराधमांनी या पोरींना? कुटं सोधायचं?कसं आननार परत त्येंना?कोन व्हती ती मानसं?आनी बंदुका गावल्या कुटं?" प्रत्येक जण नीनालाच जाब विचारत होती. प्रत्येकीलाच आपल्या पुरुषाला काय जाब द्यायचं या चिंतेने घेरलं होतं.
"मले काय बी मायत नाय ग बये. बंदुका व्हत्या सगल्यांजवल. पोरी पलवल्या म्हंजी पोलिसांकडं जाया लागेल येवढंच माज्या द्यानी येतं बग. टकली नगं उटवू कुनी माजी. आनी पोलिसात जायाचं तर किती घंटं लागतील कोनाला ठाव." नीनाने बायकांचं बोलणं थोपवलं.
"बापय मानसाला धाडू, मिट्ट कालोक पडल वापीस यायचं मंजी."
"कसापायी या साळा सुरु केल्या मास्तरानं देव जानं. तुज्यामुलं जालं ह्ये रामायन" रुपा कावल्यागत पुटपुटली तसं नीनाने तिला थोपवलं.
"तू सबुद बोलायची कोसीस काय उगा करती व्हय? सालत सिकून पोरांनी आपल्याला बी आकल दिलीच की. या परसांगातून निबवायला पन त्येचाच उपेग व्हईल. पोरांकडून चार अकलंच्या गोस्टी सिकलो तेचा उपेग व्हनारच ना?"
नीनाचं म्हणणं पटल्यासारख्या सगळ्याजणींनी मान डोलावली आणि त्या छोट्याशा गावातल्या कारखान्यासमोर पोचण्यासाठी  धावपळ उडाली. आजूबाजूच्या वाड्यांतले सगळे पुरुष इथेच कामाला होते. दिवसपाळी रात्रपाळी आटोपली की दारूच्या अड्ड्यावर धिंगाणा घालणं हे सगळ्या वाड्यांतल्या पुरुषांचा आवडता उद्योग. पुरुषांनी कामावरून दारूच्या अधीन व्हायच्या तिथे पोचणं भाग होतं. दारवानाने पांडेवाडीतल्या बायका आल्याचं सांगितल्यावर पुरुष धावत बाहेर आले. सगळ्या बायका एकदम का आल्या असाव्यात हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता.
रडत भेकत बोलणार्‍या बायकांना नीनाने आवरलं. काय झालं आहे ते तिने समजावून सांगितलं. बायकांना जबरदस्तीने परत पाठवून पुरुषांनी पोलिसचौकीच्या दिशेने धाव घेतली. फॅक्टरीभर ही बातमी वार्‍यासारखी पसरली. वाड्यावाड्यातले पुरुष मुलींचा शोध घ्यायला इकडे तिकडे पांगले.
पोलिसचौकीत तक्रार नोंदवून, शक्य तिथे शोधण्याचा प्रयत्न करून वाडीतल्या लोकांना यायला मध्यरात्र उलटली. कुणाला काही अंदाज करता येत नव्हता. पुन्हा हे असं काही तरी प्रथमच घडत होतं. त्या भागातल्या वाड्या वाड्यांमध्ये तसा सलोखा होता त्यामुळे वातावरण शांतच असायचं. काही कुरबूर असली तरी पंचायत होतीच. आत्तापर्यंत भरदिवसा शाळेवरच धाड घालून मुलींना पळवून नेल्याची ही पहिलीच घटना. गाव सुन्न झाला.

शाळेतल्या पंधरा मुली नाहीशा झाल्या होत्या. तरीही वाडीतली शाळा मात्र नीनाने बंद पडू दिली नव्हती. तिने वाडीतल्या बायकांची समजूत घातली. आळीपाळीने बायका, मुलं दंडुके, दगड घेऊन जवळपास लपून बसत होते शाळेच्या. पण तरीही शाळेमधली हजेरी कमी होत चालली होती. पुन्हा गेलेल्या मुलींचा शोध लागायचा होताच.  आता हे नित्याचं होत चाललं होतं. दर आठ दिवसांनी कुठल्या तरी वाडीवरची शाळा लुटली जायची. पुन्हा तोच आक्रोश, शोधाशोध आणि नंतर सगळीकडे रिक्त पोकळ मनं. शहरातली गुंडगिरी गावाच्या उंबरठ्यापाशी पोचली होती.
रात्र रात्र विचार करून नीनाची रया गेली. कायलच्या बापाने तर पोरीचं नावच टाकलं. आता ती परत आली काय किंवा नाही त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच. तिच्या नावाने आंघोळ करुनही तो मोकळा झाला.
"नीना, तू बी सोडून दे पोरीचा इचार. एक बी पोर परत गावली नाय गावाला. सहा मयनं व्हतील. पोरी फकस्त चालल्या आहेत गावातून." सदाने नीनाला समजावण्याचा प्रयत्न केला तशी ती चवताळलीच.
"भाड्या लाज नाई का तुला?तुजी पोरगी कसातून जातीया तितं ते बग माज्या राजा."
तो गप्प झाला. आपली बायडी येताजाता उखडलेली का असते हे बिचार्‍याला कधी उलगडलंच नव्हतं. शेजारच्या वाडीतली ही मुलगी लहानपणापासून अशीच. सगळ्या वाड्यात तोंडाळ म्हणूनच ओळखली जायची. येता जाता तिच्या दादल्याचं काय होणार लग्न झाल्यावर ही चिंता व्यक्त करायचा प्रत्येकजण. पण एकीकडे सगळ्यांना तिचं कौतुक पण होतं. बंडखोर, उद्योगी नीना कुठल्याही बाबतीत पुढाकार घ्यायला तयार असायची. तो तिच्या याच गुणावर भाळला होता. मामाच्या मागे लागून या मुलीशी त्याने पंचवीस वर्षापूर्वी सोयरीक जमविली तेव्हा वाड्यातल्या प्रत्येकाने त्याला तो निखारा पदरात बांधतो आहे असं म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण पुरुषांना काय पदर असतो निखारा बांधून घ्यायला असा विनोद करीत तो ठाम राहिला होता. पुढेमागे होईल शांत असं स्वत:लाच समजावत तो तिच्या स्वभावातल्या तिखटपणाचं मनातून कौतुकच करत असे. पण नीना तशीच राहिली. हळूहळू वाडीनेही तिचा स्वभाव स्वीकारला. कुठल्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडायचं तर वाडीसाठी नीना नक्कीच तिथे असणार हे प्रत्येकाला माहीत होतं, अपेक्षित होतं. आताही तिचं बोलणं त्याला झोंबलं तरी नवीन नव्हतं. नीनाचे विचार, कृती सगळ्यात कुठेतरी बंडखोरपणा असतो हे त्याला परत नव्याने जाणवलं. तो थोडा वेळ शांतपणे पडून राहिला. ती त्याच्याकडे नजर लावून बसली.
"नाही, सगलं थांबवनार हाय मी. ती पोर काई खुसीनं गेली? मी रान उटवनार, सगल्यांना जागं केल्याबिगर र्‍हानार नाय. पोरीचा सोद असा गुमान बसून न्हाई लागायचा."
"कर काय करनार ते. माज्या मागं लागू नको म्हंजी जालं. ती माजी बी पोर हाय नी मला बी कालीज हाय येवडं द्यानात ठीव बरीक."
’मग कालजावर दगुड ठीवल्यागत कसापायी वागनं तुजं?’ मनातला प्रश्न ओठावर येऊ न देता तिने विषय संपवला.
"सा मयनं जालं. कुनी बी गावात येतं. बंदूक दावतं आनं घेऊन जातं आपल्या पोरींना. आपण सोदंत रातो. पोलिस येतात निवांत. त्येच्या नंतर काय? सालंत बी जायला तयार न्हाई कुनी आता. आपनंच सोदून काडायला हवं ही मानसं कोन हायेत ते. उगी राहून न्हाई चालायचं."

नीनाने वाडीतल्या पारापारावर भाषणं द्यायला सुरुवात केली. कधी गावच्या गाव लोटायचा तर कधी पडेल चेहर्‍याने ती घरी परतायची. शेवटच्या वाडीपर्यंत पोचेपर्यंत तिने चार पाच तासांची पायपीट केलेली असायची. हळूहळू नीनाबरोबर काम करणारे हात वाढले. कुठल्याकुठल्या वाडीतून येऊन लोक दु:ख मोकळं करायला लागले. आठवड्यातून एकदा वाडीतल्या पारावर बसून ती शोधकामाचा आढावा घ्यायला लागली.
आणि अचानक एक दिवस रामवाडीतल्या ठाकुराने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. कॅमेरा घेतलेल्या माणसाला पाहून तिने आपला अचंबा पदरात लपवला. तिची धडपड, मुली हरवलेल्या लोकांचा आक्रोश सारं कॅमेर्‍यात बंदिस्त झालं.
गावातल्या तरुण पोरांनी तिचा कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेला फोटो दाखवायला गर्दी केली तेव्हा ती मात्र एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहिली.
"पुडं काय? काय व्हनार या फोटु आनि बातमीनं. परत येनार का पोरी? सोदनार का ते आपल्या पोरींस्नी? फोटु आला पेपरात म्हनून गुमान बसून नाइ चालनार.  काय तरी आनी कराया पायजे."

अचानक तिला धागा सापडला. तिची मुलाखत घ्यायला आलेल्या वार्ताहरानं तिला विचारलं होतं की ती पंतप्रधानांकडे गार्‍हाणं घेऊन जाणार का? त्या वेळेस तिला पंतप्रधान कुठे राहतात तेही माहीत नव्हतं. पण त्या प्रश्नाने तिला एकदम जाग आली. शाळेतल्या मुलांच्या मदतीने तिने शुद्ध भाषेत  गावाची फरफट पंतप्रधानांना कळवली. आता पुन्हा तिच्या आशा पालवल्या होत्या. राहून राहून तिला वाटत होतं, एवढा अख्खा देश या माणसाला पंतप्रधान करतो म्हणजे त्याच्या इशार्‍यावर नक्की कामं होत असणार.

ती दर पंधरा दिवसांनी येणार्‍या डाकेनं पंतप्रधानांच्या पत्राची वाट पाहत राहिली. दोन महिने झाल्यावर प्रयत्न निष्फळ ठरला या जाणिवेने निराश झाली. तिच्याबरोबर अथकपणे काम करणार्‍या वाड्यांमधल्या लोकांना तिची निराशा पाहवत नव्हती. कुणीतरी तिलाच पंतप्रधानांकडे भेटायला पाठवू अशी कल्पना व्यक्त केली आणि ती त्या कल्पनेने झपाटली.  पंतप्रधानांपर्यंत पोचायचंच हा निर्धार तिने वाडीवाडीतून व्यक्त केला. त्यांनीही तिला निराश केलं नाही. पै न पै जमवून तिला राजधानीत पाठवलं. सतत दोन दिवस ती पंतप्रधानांच्या निवासस्थानावर बसून राहिली. त्यांची भेट मिळाली नाही तर वर्तमानपत्र, दूरदर्शनवरून सतत मिळणार्‍या प्रसिद्धीने आपलं काम होणारच हे समजण्याइतपत खेड्यात वाढलेली नीना नक्कीच चलाख होती. पंतप्रधानांच्या भेटीशिवाय ती परत आली तरी देशाला नाहीतर मुली पळवून नेणार्‍यांना काहीतरी हालचाल करावीच लागेल याची तिला खात्री होती. तिला खात्री होती आणि गावाला तिच्याबद्दल प्रचंड विश्वास होता.

तिच्या अविरत प्रयत्नांना यश म्हणून की काय अचानक नीनाला भेटीसाठी शहरातून सांगावा आला. गावात चेतना जागृत झाली. वर्तमानपत्रातल्या प्रसिद्धीने गावाला आवाज मिळवून दिला.  नीनाने ताबडतोब होकार कळवला,  गाव तिला एकटीला पाठवायला तयार नव्हतं. पण पर्याय नव्हता. तिला एकटीलाच भेट मिळेल हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. पुन्हा वाडीवाडीत तिने सभा घेतल्या. गावाबाहेर वाटाघाटी करून योजना तयार झाली.

बघता बघता भेटीचा दिवस उजाडला. काळ्या रंगाची मोठी गाडी गावाच्या वेशीबाहेर उभी होती. अख्खा गाव तिला निरोप द्यायला उभा होता. बुरखा घातलेल्या चालकाने तिच्या पुढ्यात फडका टाकून डोळ्याला घट्ट बांधायला लावला. पट्टी बांधता बांधता तिने निसटता अश्रू सांभाळत तिने सदाकडे पाहिलं. त्याची मूक नजर तिच्या काळजावर चरा उमटवत गेली. ती कुठे चालली आहे, तिचं काय होणार, मुलींना ती आणू शकणार का, कशाचीही तिला अंधुकशीही कल्पना नव्हती. कायलसाठी, बाकीच्या मुलींसाठी ती परत आली नाही तरी हे काम चालू ठेवायला तिने सदाला बजावलं होतं. त्यानेही तिचा हात घट्ट दाबत मूक संमती दर्शवली होती. शांत कुणाच्या अध्यामध्यात नसणारा सदा तिचं काही बरं वाईट झालं तर तग धरू शकेल का याचीच तिला शंका होती. त्यामुळे मुलींचा शोध घेण्याचं काम नक्कीच त्याच्यासारख्या माणसाचं नव्हतं याची जाणीव असूनही त्याने मोडता तर घातला नाही या समाधानात ती गाडीत बसली. गाडीच्या काळ्या खिडक्यांपलीकडचं जग आता तिला दिसत नव्हतं. किती वेळ आपण गाडीत बसलो हेही तिला उमजलं नव्हतं. पण काही तास नक्कीच गेले होते. कोवळी उन्हं रणरणीत झाली होती. चालकाने गाडीतून उतरून तिला मूकपणे चलण्याची खूण केली.

छोट्याशा झोपडीवजा खोलीत ती शिरली. उन्हामुळे डोळ्यासमोर एकदम अंधार आला. त्यात बरेच तास बांधलेल्या पट्टीमुळे तिला नीट दिसायला काहीसा वेळच लागला. खोलीतलं दृश्यं पूर्ण दिसायला लागलं आणि सैन्यातल्या कपड्यांतील माणसांना पाहताच तिला सारा उलगडा क्षणात झाला.
"अक्की दुनिया तुमासंग पारथना करतं तर ह्यो धंदं तुमचं. इतकी जवल हाय हद आनि आमाला संसय बी नाय आला तुमा लोकांचा. देसापायी लडनारी भली मानसं म्हनतो आमी तुमाला आनि ह्ये असलं उद्येग तुमचे."
"शांत व्हा बाई. बसा इथे या खुर्चीवर."
तिच्यासाठी भाषांतर करणार्‍या वाडीतल्याच श्यामच्या अंगावर ती चवताळून धावली. तिथल्याच सैनिकाने तिला अडवलं. जबरदस्तीने त्या सैन्याच्या अधिकार्‍याच्या समोर बसवलं.
"माज्या पोरी कुटं हायती? आनी कसापायी तुमी गेवून आले त्येंना ते बी कललं पायजेल." तीव्र कटाक्ष फेकत तिने त्या अधिकार्‍याला विचारलं.
"बाई, आम्ही बोलावलं आहे तुम्हाला. मला पाहिजे तेवढीच माहिती देईन. तुम्ही आवाज कमी करुन बोललात तर चांगलं. शांततेने बोलणी पार पडावीत हीच अपेक्षा आहे माझी."
"तुज्या बाला सांग सांत व्हायाला. मला बी नाय चालत आसं बोललेलं. पर  येल आलीच तर बोलती मी या बासत." नीनाने त्याला प्रत्युत्तर केलं.
"आधीच आकाशपाताळ एक करुन तुम्ही आमची झोप उडवली आहे. मी आपली बोलणी शांततेने पार पडावीत या अपेक्षेने तुम्हाला बोलावलंय. तुम्हाला हे मान्य नसेल तर परत जाऊ शकता तुम्ही."  अधिकार्‍याचा रागरंग ओळखत नीनाने पडतं घ्यायचं ठरवलं. ती एकदम गप्प झाली.
"हो. आम्ही तुमच्या मुली वापरतो सैनिकांसाठी. आता लवकरच वर्ष होईल आम्हाला आमच्या देशातून आल्याला. युद्ध सुरु होण्याची चिन्ह नाहीत. युद्धाची वाट बघत किती दिवस भावना काबूत ठेवणार आमचे सैनिक? शरीरधर्म कुणाला चुकले आहेत?"
"हा ते काय पन असेल. आमच्या पोरी कसापायी वापरता तुमी? सेहरात पाटवा त्येंना. तितं मिलतात अस्या बायका." नीनाला त्या अधिकार्‍याच्या बोलण्याचा रोख कळत नव्हता. पण त्याने तिला एकदम थांबवलं.
"कशासाठी? आम्ही तुमच्या मुलींसाठी पैसे मोजतोच की. मलाच समजत नाही की सगळा मामला खुशीचा असताना पेपरवाल्यापासून पार तुमच्या पंतप्रधानापर्यंत पोचण्याचा आटापिटा का केलात तुम्ही? तुम्ही काय साध्य केलंत असं करून ह्याचं उत्तर हवं आहे मला. मुलींची किंमत कमी वाटत असेल तर सांगा. करू काही व्यवस्था."
"तू काय बोलून राह्यला? मला काय बी उमज पडत नाय. कुटल्या पैक्याची बासा करतो तू? आमाला काय पैका मिलाला नाय आन असला पैका नगंच. आनी कुनीबी खुसीनं नाय गेलं. बंदुकीला घाबरलं त्ये. पैका दिला म्हनं. आमी काय पैक्यासाटी पोरीबालींची सरीरं विकनारी मानसं नाय सायब. सगल्य पोरीस्नी गुमान आना हिथं."
काही क्षण गेले. सैन्यातल्या त्या अधिकार्‍याला नव्यानेच सगळा उलगडा झाल्यासारखा त्याचा चेहरा लालबुंद झाला. तो ताडकन उठला. बाजूला उभ्या असलेल्या माणसांच्या कानात पुटपुटला आणि ताडताड पावलं टाकत चालता झाला. क्षणभरात एक माणूस आठ दहा मुलींना घेऊन तिच्यासमोर येऊन उभा राहिला. सगळ्या गोर्‍या कातडीमध्ये तिच्याच रंगाचा तो माणूस पाहून नक्की काय चाललं आहे याची पुसटशी कल्पना तिला यायला लागली होती. ती खवळली.
"कोनाचा रं तू? तू पुरवतोस मुली या गोर्‍या राक्ससांना? पैका करतो तू आनी ते म्हनतात आमी खुसी खुसी देतो आमच्या पोरी त्येंना."
दातओठ खात तो तिच्याकडे बघत राहिला. तेवढ्यात तो अधिकारी परत आला.
"इथल्या कँपवरच्या मुली ताब्यात घ्या बाई. या प्रकाराची कल्पना नव्हती. पण लवकरात लवकर सगळ्या मुली तुम्हाला परत मिळतील याची खात्री मी देतो तुम्हाला."
नीनाला तो माणूस साक्षात देवमाणसासारखा वाटला. लवकरच सगळ्या मुली गावात परत येतील या भावनेने तिचे डोळे ओलावले.
"सायबा, इस्वास टेवायचा का नाय तुज्यावर ते मला ठाव नाय. पन तुजा सबुद तू पालसील असी आसा हाय. तुला ह्यो चाल्ला व्हता तो प्रकार कलला नवता. पण आता सारं ठाव जालंया. तू सगल्य पोरींना पाटीव परत. मायबापाचं दुवं मिलतील तुला." अधिकारी काहीही न बोलता निघून गेला.
नीना आठ मुली घेऊन परतली. सगळा गाव तिच्याभोवती जमा झालं. ओलावल्या डोळ्यांनी तिनं ज्याच्या त्याच्या मुली ताब्यात दिल्या. मायलेकरांची गळाभेट डोळेभरुन पाहिली. सदाबरोबर ती घरात शिरली आणि हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदलं.
"त्या मुलीमदं मी कायलला सोदत व्हते. ती दिसली नाय तसं मन लई उदास जालं. कसापायी करतीया मी ह्यी वनवन उपेग नसेल तर?"
सदाने तिच्या हळव्या मनावर फुंकर घातली.
"तुजं काम वाया नाई जानार. कायल गावलंच बग. पण आज किती जनाचं दुवं मिलालं तुला. त्या बी आपल्या लेकीच ना. पोरी कुटं हायेत येवडं कललं ना. पुडं लई सोप हाय आता."

नीनाला, तिच्या कामाला या सुटकेने अफाट प्रसिद्धी मिळाली. सैन्याविरुद्ध, दलालाविरुद्ध पावलं उचलण्याची सरकारने ग्वाही दिली. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी तिची जाहीर माफी मागितली. मुलींच्या सुटकेचं आश्वासन दिलं. गाव नीनाबरोबरच स्वत:वरही खूश झालं. मुलींच्या वाटेकडे डोळे लावून बसलं. परत आलेल्या मुलीचा आनंद त्यांच्याबरोबर जगाने साजरा केला. सैनिकांनी केलेले अत्याचार ऐकताना  मुलींबरोबर सगळी गळ्यात गळे घालून रडली. नीना प्रत्येक मुलीला वाडीवाडीतून फिरवून तिच्या यातना व्यक्त करायला सांगत होती. त्या निमित्ताने आणखी हात एकत्र येतील, मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे सरकार जागं होईल या अपेक्षेत होती ती. पण वाटलं तेव्हढं सोपं नव्हतंच काही. मुली बोलायला तयार नव्हत्या, आई वडिलांना त्यांच्या हळव्या मनावर फुंकर कशी घालायची ते समजत नव्हतं.   आपल्या मुलीचं लग्न कसं होणार या विवंचनेत होते घरातले. त्यात भर म्हणून त्यातल्या एका मुलीला दिवस गेले. लक्षात आल्यावर वाडी बेचैन झाली. पळवून नेलेल्या मुली सगळ्याचं दु:ख होतं तरी अशा परिणामांची कोणाचीच मानसिक तयारी नव्हती. सैनिकांनी केलेले अत्याचार परवडले इतकं लाजिरवाणं वाटत त्या मुलीला. वाडीत कुजबूज सुरू झाली, वाढली आणि वाडीने संगनमताने त्या मुलीला जाळून मारलं. त्या दिवशी मध्यरात्री हा प्रकार कानावर घालायला दहा मैल धावत आलेल्या कातांचा चेहराच नीनाला दुसर्‍या लढाईची सुरुवात सांगून गेला.

नीना पेटून उठली. स्वत:वरच उसळली. हे असं काही होऊ शकतं याचा विचार का केला नाही म्हणून स्वत:लाच दोष देत राहिली. सरकारने आश्वासन पाळलं नव्हतंच. ना सैन्यावर कारवाई झाली, ना त्या दलालावर. भरीत भर म्हणून परत आलेल्या मुलींच्या सुरक्षिततेची काळजी हा मोठा प्रश्न तिचं काळीज पोखरून काढत होता. आपल्याच पोटच्या गोळ्यांना त्यांचा दोष नसताना आयुष्यातून उठवणं म्हणजे सैनिकांच्या अत्याचारापेक्षाही भीषण आहे. असं काही घडलं तर सार्‍या गावाने एकत्रित मार्ग काढायला हवा; पण जीव घेणं हे माणुसकीचं लक्षण नाही हे समजविण्यासाठी ती वाड्यावाड्यातून फिरत रक्ताचं पाणी करत राहिली. मुलींच्या सुटकेचे प्रयत्न चालूच होते. आता तिने थेट गोर्‍या लोकांच्या राष्ट्राध्यक्षांनाच पत्र पाठवलं. ते पत्र पोचण्याआधीच प्रसारमाध्यमांनी तिचं गार्‍हाणं त्या देशातल्या जनतेसमोर मांडायला सुरुवात केली. अस्वस्थ मनाने ती वाट पाहत राहिली. तिकडून हालचाल होण्याआधीच सीमेवरून तिला पुन्हा बोलावणं आलं. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. पुन्हा एकदा गाव तिच्या पाठीशी उभं राहिलं. या वेळेस परत आलेल्या मुलींना अमानुषपणे वागवणार असाल तर मला भेटीसाठी जायचंच नाही म्हणून ती सांगत राहिली. तिच्यावर अवलंबून असलेल्या, मुलींचा वाट पाहणार्‍या गावकर्‍यांच्या माना लाजेने झुकल्या. पुन्हा असं होणार नाही याचं आश्वासन मिळाल्यावरच  ती तयार झाली. या वेळेस इतर मुलींबरोबर कायलला घेतल्याशिवाय परत फिरायचं नाही हा तिचा ठाम निश्चय होता.

पुन्हा तीच गाडी गावाच्या वेशीबाहेर उभी राहिली. मात्र या वेळेस चालकाचा चेहरा झाकलेला नव्हता. त्याने तिलाही डोळे बांधायला लावले नाहीत. जेमतेम अर्ध्या तासात ते मागच्या ठिकाणी उभे होते.
पुन्हा तोच अधिकारी आणि तोच दलाल तिच्यासमोर उभे होते.
"बाई, तुम्ही पार आमच्या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोचलात. रान उठवलंत तुम्ही. हालचाल करण्याशिवाय पर्याय नाही ठेवलात."
"तुमी येवडं सुसिक्सित लोक सबुद पालायच इसरुन गेला नसताव तर ह्ये रामायन कसापाई जालं असतं? अजूनबी इचार करा. पोरी देवा आमाला परत. लई उपकार व्हतील. आनि सरिराची काज आसल येवडी तर तुमच्या पंतपदानाना सांगा आनि सागांवा पाटवा तुमच्या बायका पोरास्नी." सगळ्या वाड्यांच्या मनातलं ती त्या अधिकार्‍यांना म्हणाली.
"बाई, पंतप्रधानांना काय विनंती करावी हा आमचा प्रश्न आहे. पण तुम्ही म्हणता त्याच इराद्याने तुम्हाला बोलावलं इथे. परत करणारच आहोत तुमच्या लेकीबाळी आम्ही."
"या टायमाला सगल्या पोरीस्नी घेऊन जानार हाय मी."
"तसं करून चालणार नाही. आणि माझं बोलणंही पूर्ण करू दिलं नाहीत तुम्ही. आम्ही सांगत होतो की या वेळेस पोरी नाहीत फक्त एक पोर ताब्यात देणार आहोत आम्ही तुमच्या."
त्या अधिकार्‍याचं बोलणं संपतंय तोच बंदुकीचा दस्ता पाठीला टोचलेल्या अवस्थेत कायल समोर आली. नीनाचे डोळे तुडुंब भरले.
"काय दसा जाली गं माज्या बयेची." ती स्वत:शीच पुटपुटली. एकदम तिला थकल्यासारखं वाटलं. ज्यासाठी गेले वर्षभर वणवण केली, जिवाचं रान केलं ती पोटची पोर मिळाली होती. एक अध्याय आता संपणार याचा आनंद होताच पण अचानक रिक्त गळलेपण तिच्यासमोर आलं. त्याला बाजूला ढकलायचा प्रयत्न करत तिने डोळे पुसले. आता फक्त कायल दिसत होती. सारं विश्व स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं तिला. ती क्षणभर तशीच कायलकडे पाहत उभी राहिली. तेवढ्यात तिथल्याच एका सैनिकाने जोरदार हिसडा दिला आणि कायलचा तोल गेल्यासारखी ती धडपडली. नीना तिला सावरण्यासाठी पुढे धावली.
"थांबा."
करड्या स्वराने ती दचकली. खिळून उभी राहिली.
"तुमच्या मुलीला तुम्ही परत नेऊ शकता. अट एकच. यानंतर तुमचं तोंड बंद राहिलं पाहिजे. आमच्या विरुद्ध ब्र काढायचा नाही. आणि तसं झालं तर इथली कुठलीच मुलगी जिवंत हाती लागणार नाही तुमच्या."
नीना तशीच पुढे धावली. त्याने पुन्हा तिला थांबवलं.
"तुम्हाला आमच्या अटी मान्य आहेत असं समजायचं का आम्ही?"
"आर, जवल तरी गेवू दे पोरीला. नंतर सांगतू मी काय हाय माज्या मनात."
"नाही, तुम्ही मुलीला स्पर्श केलात तर आमच्या अटी मान्य आहेत असं समजून मुलीला न्यावं लागेल." सैन्यातला तो अधिकारी रुक्षपणे म्हणाला.

नीना पुतळ्यासारखी स्तब्ध झाली. क्षणभर मायलेकी डोळ्यात डोळा घालून एकमेकींकडे बघत राहिल्या. हाताच्या अंतरावर असूनही त्याच्यांत अंतर शिल्लक राहिलं नव्हतं. नजरेने दोघींनी एकमेकांना काय सांगितलं कोण जाणे. कायलने शांतपणे मान फिरवली आणि नीना पाठमोरी झाली. त्या सैन्यातल्या अधिकार्‍याकडे, दलालाकडे तुच्छतेचा कटाक्ष फेकत ती वेगाने बाहेर पडली.


परत आलेली नीना नेहमीची नीना नव्हती. बंडखोर, उस्ताही नीनाचा लवलेश तिच्या जागी नव्हता. वाड्यावाड्यातून रोजचे सात आठ तास  केवळ लोकांना या प्रश्नावर पेटून उठवण्यासाठी फिरणारी नीना हरवून गेली. स्वत:ला घरात डांबून ठेवल्यासारखी बाहेर फिरकेनाशी झाली. असं होऊन चालणार नव्हतं. लोकांना पूर्वीची नीना परत हवी होती. आपल्या मुली प्रत मिळवण्याचं बळ त्यांच्या एकेकट्याच्या अंगी नक्कीच नव्हतं. एव्हाना सीमेवरचं हे गाव आणि मुलींवर होणारे अनन्वित छळ पार बाहेरच्या देशांपर्यंत पोचले होते. जशा त्या मुली, ते गाव, तशी हे सारं रामायण पुढे आणणारी नीनाही लोकांच्या मनामनात रुजली होती. तिथं काय झालं या प्रश्नाला नीनाकडे उत्तर नव्हतं की तिला ते द्यायचं नव्हतं? कुणकुण लागली होती पण नक्की काहीच समजत नव्हतं. वर्तमानपत्र, दूरदर्शनच्या वार्ताहरांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. नीनाचं मौन संपत नव्हतं. सगळ्यांनी हार पत्करली. वेळ आली की मी बोलेन हा एकच धोशा तिने लावला होता. आणि आता सगळे त्या वेळेची वाट पाहत होते.
शेवटी तिने जाहीर केलं.
"आज मी लोकांनी आपली दुगं मोकली करावी, सगल्यांनी मदत कलावी म्हनून चालं जालंल्या आनि पंचवीस वरसं प्ररसिद आहे त्या पोग्रॅम मदे बोलनार हाय. त्यो बगा आनि सांगा मी येगलं काय कराया पायजे व्हतं ते."

नीना गोर्‍यांच्या देशातल्या प्रसिद्ध कार्यक्रमात सारं काही सांगणार होती. तिच्या गावासाठी या शोचं खास सॅटेलाईट प्रक्षेपण होणार होतं. किंबहुना तिचं बोलून झाल्यावर गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय हेही हा कार्यक्रम लगेच दाखविणार होता. गावकर्‍यांना जशी काय घडलं ते ऐकण्याची उत्सुकता होती तशी तिच्या माणसांच्या सगळं ऐकल्यावर काय प्रतिक्रिया होतील या शंकेने नीना अस्वस्थ होती.
वरवर पाहता ती शांतपणे बसली होती. जगातले लाखो लोक आज तिला पाहत होते. तिच्या कर्तृत्वाची गाथा माहितीपटाने संपली. कॅमेरा तिच्याकडे वळला. तिची अश्रूभरल्या नजरेने प्रेक्षकांचा जीव हेलावला. कॅमेर्‍याकडे स्थिर नजरेने पाहत ती बोलत राहिली.
"त्यांनी मला सांगितलं तू तूजी मुलगी गेवून जा आनी बस गप. कायलला आनलं बी माज्या म्होरं. किती आसुसलं माजं मन तिला जवल घेयाला. पन तेंची अट व्हती. लेकीला गेवून जायाचं तरच हात लाव म्हनाले. आनि सबुद नाई काडायचा त्येंच्याइरुद. लेक माजी लई खराब जाली व्हती. उबी व्हती डोल्यात पानी व्हतं. आमी येकमेकींना डोलाबरुन पायलं. कायलनं मान वलवली. आन मी उटलं तितून. पोरगी सिकली बगा माज्याकदून. मागं लागती तर काय कलनाल व्हतं मी? आनलं आसतं गुमान माज्याबरुबर, पन कोन सोदवनार मग माज्या तितं रावलेल्या लेकीबालींना? मी काय मोटी बाई नाई. मला मोटेपना बी नगं. मी बोलत नवती, वाटायचं मी केलं त्ये बरुबर केलं की नाय. नाय तर लोग मनायचं की आई हाये की वैरीन. म्हनून चुप बसली मी. मी आईच हाये पण तितं अदकून रायलेल्या सगल्यांची. माज्या सगल्या कायल मला परत आनायच्या हायत गरी."
"आणि अजूनही कायलची, इतर मुलींची सुटका झालेली नाही?" तिच्या निश्चयाला, टाळ्यांच्या मिळालेल्या कडकडाटाला भेदत निवेदिकेनं तिला बोलतं ठेवलं.
"नाय, पाच साल जालं या गोस्तीला. येक पल नाय जवा मी सोताला इचारते की कायलला परत आनलं नाय यात माज चुकी नाय ना जाली? पन ही लदाई लदायची हाये मला. सगले आले माज्यासंगत तर सगल्यांना गेवून नायतर येकलीने. जागं करायचं हाय मला या प्रसनावर सगल्यांना. मला पोरीचा लई अबिमान वाटतुया. ती म्हनली असती तर मी आनलं बी असतं तिला. सेवती आयेचं दिल हाय, पन कायलंनं रोकलं मला. आता तिला आनि सगल्या मुलींना आननारच परत. माजी बुमिका मी दावलीया आता. पक्की हाय मी माज्या निचयावर. फकस्त गाववाल्यांनी माग याया हवं. इस्वास टेवाया हवा तेंनी."
कॅमेरा गावातल्या लोकांवर वळला. आपल्या मुलीसाठी स्वत:च्या लेकीला परत आणायची संधी नाकारलेल्या बाईच्या मोठेपणाला दाद मिळत होती अश्रूने.
गोर्‍यांच्या देशांतील लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शाळेचं तोंडही न पाहिलेल्या बाईच्या शहाणपणाला, धडपडीला मानवंदना दिली. भरल्या डोळ्यांनी नीना उभी राहिली. आता तिला नव्याने बळ आलं. मरगळ कुठल्या कुठे उडाली. परतल्यावर पुन्हा त्याच जोमानं मुलींच्या सुटकेचे प्रयत्न चालू ठेवायचे हा निश्चय तिने समोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांत डोकावत केला.

हुंदक्याच्या आवाजात एका कहाणीत पुन्हा रंग भरले जात होते. एका आईच्या अनेक लेकी सोडवून आणायला सारी दुनिया पुढे सरसावली. त्याच कार्यक्रमात वाडीवाडीतून फिरणार्‍या तिच्या थकल्या पावलांना विश्रांती मिळावी म्हणून गाडी देण्यात आली. ही फक्त सुरुवात होती......

Monday, October 23, 2017

ध्वनिमुद्रीत कथा - पोस्ट

फेसबुकवर ’माझा मराठीचा बोल’ नावाने काही लिहिणारी मित्रमंडळी एकत्र आलो आहोत. या दिवाळीला निवडक मामबो हे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालं आहे तसंच श्राव्यस्वरुपातही. त्यातील माझी ही विनोदी कथा - पोस्ट. जरुर ऐका.

Sunday, October 15, 2017

सोबतीचं नाट्य


"आता हातापाया पडून काही होणार नाही. काही बरं वाईट घडलं असतं तर तुझ्या आईला तोंड दाखवायला जागा उरली नसती. आता काही लहान नाहीस तू छाया." सुजाताचा पारा चढला होता. रंगीबेरंगी परकर पोलका घातलेली छाया निर्विकारपणे नखं कुरतडत तिच्यासमोर उभी होती.
"ठोंब्यासारखी काय उभी आहेस? आवर तुझं पटकन." 
"सुजाताई, मी परत सांगते तुला; माजं टकुरं फिरलं म्हनून वंगाल वागले. पुना न्हाई व्हनार. देवाची आन." छायाने गळ्याची शपथ घेतली.
"काय व्हायचं राह्यलं आहे छाया? तुझ्यामुळे त्या गलिच्छ झोपडपट्टीत पाऊल टाकावं लागलं. आयुष्यात अशा जागी कधी पाय ठेवेन असं वाटलं नव्हतं." सुजाता चांगलीच वैतागली होती.
"ताई, झोपडपट्टी इतकी खराब नस्ती." रुसक्या आवाजात  छाया म्हणाली.
"छायाऽऽऽ" सुजाताच्या आवाजातली जरब छायाला जाणवली. मुकाट्याने खोलीत जाऊन तिने स्वत:चे चार कपडे आणि किडूकमुडूक सामान गोळा करुन  पिशवीत कोंबलं. पिशवीचे बंद घट्ट धरुन ती सुजातासमोर उभी राहिली. सुजाताने गडबडीत कापलेल्या केसावरून पुन्हा कंगवा फिरवला. ओठावरून लिपस्टिक फिरवली. अपराधी चेहर्‍याने तिच्याकडे पाहणार्‍या सासुबाईंकडे दुर्लक्ष करत त्यांना काहीही बोलायची संधी न देता ती छायाला घेऊन बाहेर पडली. छाया आणि सासूबाई, दोघींनाही समजावणं म्हणजे दगडावर डोकं फोडून घेण्यासारखं वाटत होतं सुजाताला. तसंही अधिक बोलण्याचं त्राण उरलं नव्हतं आणि इच्छाही. उल्हासच्या ताब्यात छायाला दिलं की ती सुटकेचा श्वास सोडणार होती. पुढे ठरल्याप्रमाणे तो सारं पार पाडेल याची तिला खात्री होती.

उल्हासबरोबर छाया निघाली खरी. पण नक्की काय झालं आणि सुजाताई इतकी वेड्यागत का ओरडत होती तेच छायाला कळत नव्हतं.  वरडली तर वरडली वर उल्लासदादाबरुबर सोडून निगून बी गेली. कशापायी आनलं मग हितं? सुजाताईला  झोपडपट्टीत जावं लागलं तर येवडं नाटक? नाटकीपना लई हाय तिच्यात.  ताई  रुबाबदार हाये. राहती बी असी टेचात की जीव दडपतो. पैका हाये तर उडवती कसा बी.  हापिसीण हाय म्हनं. टकटक करत चाल्ती उंच टाचच्या चपला घालून आनि घरात फटाकफटाक स्लीपर उडवती. केसं इतक्या येलंला सरल करती, सारका चाला हातानी केसाबरुबर. हात कसं दुकत नाय देवजाने.  जितं तितं केस पडत्यात. घानच की. पन त्येचं काय नाय. गरीब मानसं म्हंजी या लोकास्नी घान वाटती.  सारकी नाक दाबत व्हती झोपडपट्टीतून येताना. मनातल्या विचारांना थोपवताना गावाकडे पाहिलेली सुजाताई आता फार बदललेली आहे याची छायाला खात्री पटली.  वैनीबायची मुलगी तर ती अजिबात शोभत नाही या बद्दल मनात शंकाच उरली नाही छायाच्या. शहरातली माणसं एवढ्या तेवढ्याला घाबरतात का हे कोडंही सोडवता येत नव्हतं तिला. बाजूला बसलेल्या उल्हासकडे तिने पाहिलं.  उल्हासदादाच्या बावळटपणाचीही तिला गंमत वाटत होती. सुजाताई आणि उल्हासदादा. डरपोक! त्यांचे त्यावेळचे चेहरे आठवून हसू दाबत राहिली ती कितीतरीवेळ. पण आता तिला वाईट वाटायला लागलं, चिडचीड व्हायला लागली. रडावंसं वाटत होतं. आईच्या आठवणीने छायाच्या डोळ्यांना धार लागली. उल्हासदादासमोर तिला रडायचं नव्हतं आणि ती रडतेय हे कळू पण द्यायचं नव्हतं. ती समोर बघत राहिली.  डोळ्यांतून वाहणारं पाणी आपोआप सुकायला लागलं.  मन थोडं शांत झाल्यावर सुजाताईची सासू महामाया वाटायला लागली छायाला. तिच्यामुळेच तर घडलं सारं. शहरातली माणसं  पराचा कावळा करणं कधी सोडणार तेच तिला समजत नव्हतं.  सुजाताईच्या तापट स्वभावाबद्दलही वैनीबायकडे तक्रार करावी लागणार होती. कळू दे वैनीबायला तिची लेक कशी आहे ती. गेल्या वर्षी गावाहून इथे यायचं पक्कं करायलाच नको असं वाटून गेलं छायाला. बेक्कार माणसं शहरातली. गावीच बरं होतं. मधलं एक वर्ष पुसून ती नांदगावला पोचली.

धो धो पावसात अंगावरचं कांबळं छायाने झटकलं आणि बंधार्‍यातल्या चिखलात हात घातला. भरपावसात दोन तास काम करुन ती वैतागली होती. 
"ए, अगं द्यान कुटे तुजं? वैनीबाय बोलवती बग." आईच्या आवाजाने वाकलेली छाया ताठ झाली.
"कशापायी? तूच जा. मी नाई येनार आता."
"अगो, जा च्या देनार आसल. जा. तू परत आली की मी जाईन." चहाच्या नावानेच छायाला तरतरी आल्यासारखं वाटलं.  पावसाच्या संततधारेमुळे चांगलंच अंधारुन आलं होतं. हवेतला गारवा अंगाला झोंबत होता. पळत पळत ती पडवीत येऊन विसावली. अंगावरचं कांबळं बाजूला ठेवून ओला झालेला चेहरा तिने पुसला. पाण्याच्या थेंबाआडून स्वयंपाकघराच्या पायर्‍या उतरुन येणार्‍या वैनीबाय कडे ती पाहत राहिली. वैनीबायचं टिळ्याएवढं कुंकू तिला फार आवडायचं. आणि नऊवारी साडी नेसावी तर वैनीबायनंच इतकी छान वाटायची तिला वैनीबाय नऊवारीत. वैनीबायच्या प्रसन्न चेहर्‍याकडे पाहिलं शांत वाटायचं. छायाच्या हातात चहा देऊन वैनी बाय बाजूलाच बसली. छायाने फुर्र, फुर्र करत चहा तोंडाला लावला.
"तू बेंगलोर बघितलं आहेस का गं छाया?" बशीतला चेहरा छायाने वर केला.
"हे काय हाय?"
"अगं आपल्या सुजाचं गाव."
"नाई ब्वॉ. मुंबयच्या जवल हाय का?" वहिनींना हसायला आलं.
"छे गं. पण जायचंय का तुला बेंगलोरला? सुजा म्हणत होती छायाला पाठवून दे म्हणून."
"अय्याऽऽ. मी नाई बाई. आनि सुजाताई मला का बोलावती?"
"मदतीसाठी."
"नाई जमायचं वैनीबाय. मी हितंच बरी  हाये. आयेला हाय कोन माज्याबिगर." छाया पुटपुटली.
"तुझ्या आईशीच बोलते मी." छायाने नुसतीच मान डोलवली आणि निमूटपणे ती चहा पीत राहिली. वहिनींनी तिथूनच यमुनाला हाक मारली. यमुना येईपर्यंत पुन्हा चुलीवरचा चहा कपात ओतून त्यांनी गरम दूध टाकलं.
"घे. आभाळ भरुन आलंय आज अगदी." यमुना पुढे चहाचा कप धरत त्या म्हणाल्या.
"आये, वैनीबायला कायतरी विचारायचं हाये म्हनली ती." वहिनी हसल्या.
"अगं. चहा तरी होऊ दे पिऊन तिचा." यमुनाने घाईघाईत चहा ओठाला लावला. चहा पिऊन ती लगबगीने विहिरीपाशी गेली. कठड्यावरचा तांब्या तिने उचलला. पाणी होतंच त्यात. तिने पटकन दोघींचे कप धुऊन टाकले.  धुतलेले कप उलटे करुन कट्ट्यावर  ठेवले. पदराला हात पुसत ती वहिनी बसल्या होत्या तिथल्याच खालच्या पायरीवर टेकली.
"काय म्हनत व्हता वैनीबाय तुमी?" तिने उत्सुकतेने विचारलं.
"छायाला बेंगलोरला पाठव असं म्हणत होते."
"बेंगलोर? म्हंजी?" यमुनाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं.
"सुजाताकडे."
" अगोबाई,  सुजाताईचं गाव."
"सुजाता मागे लागली आहे छायाला पाठवून दे म्हणून."
"व्हय की काय. पन कसापायी म्हनायचं?"
"मदत हवी आहे तिला घरकामात."
"अवं दोन मान्सं ती. मदद कसली लागते म्हंते मी." यमुनाला खुदकन हसायलाच आलं.
"तिच्या सासूबाई असतात तिच्याघरी. आमचे जावईबापू सतत देशाच्या बाहेर. सुजापण साहेबीण आहे कुठल्याशा कंपनीत. वेळ कुठे असतो तिला. घरात दिवसभर कुणी असेल तर बरं. सोबत होईल सासुबाईंना असं म्हणतेय ती. पत्र आलंय काल."
"तिकडं राजेस खन्नाचा पिक्चर गावल काय बगायला?"  छायाने उत्सुकतेने विचारलं.
"सुजाता नेईल तुला पिक्चर दाखवायला." वहिनी हसून उत्तरल्या.
"आनि फॅसनची कापडं?"
"ती पण देईल सुजाता तुला. झालं समाधान?" वहिनींनी पुन्हा हसून विचारलं.
"हा. जाती मग मी. आये, आदी मी बगती कसं हाये सुजाताईचं गाव. मग तुला बी घेऊन जाईन." छायाला आता कधी एकदा बेंगलोर गाठतोय असं झालं.  तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती आणि अचानक स्वर्गाचं दार दिसायला लागलं होतं.  तरी पत्रापत्री होऊन सारं ठरेपर्यंत  महिना गेलाच.

शेजारच्या वाडीतल्या जाधवांबरोबर रात्रीच्या गाडीत तिला आईने बसवून दिलं तेव्हा पंधरा वर्षाच्या छायाच्या डोळ्यात उत्सुकता, भिती, आईला सोडून राहण्याच्या कल्पनेनं झालेलं दु:ख सार्‍या भावना एकवटून आल्या.  आई एकटीने कसं निभावेल या शंकेने डोळ्यात अश्रू जमा झाले. अण्णा फणस उतरवताना झाडावरुन पडून वारले त्याला कितीतरी वर्ष झाली. तिला ते आठवतही नव्हते. तिच्या विश्वात ती आणि आई. दोघीच.  वहिनींच्या घरातल्यांचाच आधार होता आणि ती सर्व खूप काळजी घेत मायलेकींची. वहिनींनी तर छायाने शाळेत जावं म्हणून कितीवेळा सांगून पाहिलं होतं. पण छायाला आवड नव्हती शाळेची. वहिनी मागे लागल्या की ती फक्त मान डोलवायची. चार घरची कामं करुन रोजचा दिवस सुखात जात होता मायलेकींचा. अधूनमधून टूरींग टॉकीजचा पिक्चर पाहिला की महिनाभर छाया त्या दुनियेत वावरायची. आता बेंगलोरला भरपूर पिक्चर पाहायचे सुजाताईबरोबर, काम करायचं, गाव फिरायचं, नवीन नवीन कापडं घालायची अंगावर अशी स्वप्न पाहत ती निघाली होती. सुजाताई गावी आली की किती छान गप्पा मारते, चौकशी करते. तिच्याबरोबर राहायचं म्हणजे मजाच.  विचारांच्या या फांदीवरुन त्या फांदीवर उड्या मारणं चालू होतं छायाचं. बेंगलोरला कधी एकदा पोचतोय असं झालं होतं त्याचवेळी किती दिवसांनी परत यायला मिळेल असाही विचार डोकावत होता मनात. सुजाताई वर्षातून एकदा येते हे आठवलं आणि  तिच्याबरोबर येता येईल या खात्रीने ती निश्चिंत झाली.  सुजाताईला सांगितलं तर ती तिच्या आईलादेखील बेंगलोरला आणेल याचाही तिला भरवसा होता.   बेंगलोर आवडलं तर बघू, ठरवू काय करायचं. विचारांचे तुकडे जोडता जोडता हातातलं बोचकं सांभाळत छाया खिडकीला डोकं टेकवून झोपायचा प्रयत्न करत राहिली. बेंगलोरला जायला खूप दिवस लागतात इतकंच ठाऊक होतं. मुंबईला सुजाताई तिला न्यायला येणार होती.  सकाळी जाग आली तेव्हा परळ आलेलं होतं. अधीर नजरेने तिने बाहेर डोकावलं. सुजाताई दिसल्यावर बावरलेल्या नजरेने जाधवांचा निरोप घेऊन ती सुजाताईच्या मागून निघाली. एक दिवस मुंबईत राहून रेल्वेने बेंगलोरला पोचायचं होतं. पण सुजाताताईचा आधार होता त्यामुळे मनावर दडपण नव्हतं.

 छाया बेंगलोरला पोचल्यावर भांबावलीच.  खेडेगावातली छाया उच्चभ्रू वस्तीत येऊन पोचली होती.  भाषेचा प्रश्न होता आणि त्यात येता जाता छायाच्या कानावर इंग्रजीच पडायचं. त्यातल्या त्यात संध्याकाळी खाली गेलं की तिच्यासारख्या गावाकडून आलेल्या मुलींबरोबर मोडक्या तोडक्या हिंदीत ती गप्पा मारायची.  इमारतीच्या रखवालदाराबरोबर गप्पा मारण्याचं तर तिला वेडच लागलं होतं. तेवढाच विरंगुळा. दिवसभर कामापेक्षाही सुजाताच्या सासूच्या बडबडीची तिला कटकट वाटे. सुजाता येण्याच्या वेळेस तिच्या सासुबाईंच्या बडबडीकडे कानाडोळा करायला ती शिकली लवकरच. काहीतरी खुसपट काढून सुजाताची सासू बडबडायला लागली की तिला खूप राग येई. फुटाणा फुटल्यासारखी तीही तडतडायला लागायची. सात जन्म घेतले तरी म्हातारीचं समाधान करणं कठीण असं तिला ठामपणे वाटत होतं.   केर काढायला लागलं की  बसल्या बसल्या हाताने इथून केर काढ, तिथून केर काढ, भाजी चिरायला घेतली की अशी काप न तशी काप, कपडे वाळत घालायला गेलं की आडवे घाल नी उभे घाल सारखं तोंड चालू. कटकट! मग छाया पण काहीतरी खोड काढायची. त्रास द्यायची मुद्दाम. रात्री सुजाता यायच्या वेळेस मात्र छायाचं रुप वेगळं असायचं. आपण ताईच्या सासूची  किती काळजी घेतो हे ती दाखवून द्यायची.  त्यामुळे सासूने छायाबद्दल केलेल्या तक्रारी सुजाता ऐकून घ्यायचीच नाही. सुजाता सासूवर डाफरली की छाया मिष्कील नजरेने पाहत राहायची. पण आज मात्र अती झालं. सकाळपासून पिरपिर आणि चुका दाखवणं त्यात त्या तिच्या कपड्यांवर घसरल्या.
"छाया, जरा कपड्याचं भान बाळग." सुजाताच्या सासूबाईंनी रेडिओचा आवाज कमी केला. त्यांच्यासमोर तांदूळ निवडत बसलेल्या छायाच्या उघड्या पडलेल्या गुडघ्यांकडे नजर टाकत त्या म्हणाल्या.
"काय जालं? तुमी आनि मी. हाय कोन दुसरं हितं?" पटकन कपडे नीट करत छाया गुरकावली.
"तसं नाही. सवय होते. तरुण वय आहे तुझं. जपावं  स्वत:ला."
"सुजाताई स्लिवलेस घालून जाती की कामाला. तिला न्हाय काय सांगत तुमी."
"सुजाताईचं तू मला नको सांगू. पायरी सांभाळून राहावं माणसानं." छायाने नाक मुरडलं तशा त्या आणखी चिडल्या. "आणि बघावं तेव्हा बाहेर पळत असतेस. काय खाणाखुणा चालू असतात गं तुझ्या त्या रखवालदाराबरोबर?" छायाने चमकून पाहिलं.
"कोन रखवालदार?" निर्विकार चेहरा करत तिने विचारलं. त्या काहीच बोलत नाहीत हे पाहून पुढे छायाच म्हणाली, "तुमची नजरच वंगाल तर मी काय करु?"
"चार शहाणपणाच्या गोष्टी सांगतेय तुला. ऐकायंचं की नाही तू ठरव. पण अशीच वागत राहिलीस तर सुजाताला सांगून गावी पाठवून देते तुला." सुजाताच्या सासूबाई समजुतीने सांगत होत्या पण छाया भडकली.
"ए, ऐकून घेती म्हनून लई शानपना कराय लागली तू. " छायाने तांदळाचं ताट दाणकन फरशीवर आपटलं आणि ती त्यांच्या अंगावर धावून गेली.
"काय करशील गं तू? अक्कल नाही काडीची आणि मला तोंड वर करुन बोलतेस?" सुजाताच्या सासूबाईंनी तिचा हात घट्ट धरला. मनगट लाल झालं छायाचं. सुजाताने हजारवेळा बजावूनही त्यांना शांत राहता येईना.  छायाही त्यांच्या डोळ्याला डोळा देऊन उत्तरं देत राहिली.  दोघी कडाकड भांडत राहिल्या. कुणीतरी दार जोरात वाजवलं आणि चपापून दोघी शांत झाल्या.
"दार उघड." सुजाताच्या सासूबाईंनी हुकूम सोडला. पाय आपटत छायाने दार उघडलं आणि दारात कोण आहे हे ही न बघता ती जिन्याच्या दिशेने निघाली. पायर्‍या उतरेपर्यंत तिचा श्वास फुलला होता. इमारतीच्या खाली उतरल्यावर फाटक जोरात उघडून बंद करुन ती रस्त्यावर आली. आता? क्षणभर रस्त्यावरची कुठली दिशा पकडावी या संभ्रमात ती तशीच थांबली. तिडीक आल्यासारखी समोरची रिक्षा तिने थांबवली.
"राजिंदरनगर"  दाणदिशी ती रिक्षात बसली. इमारतीत काम करणार्‍या खूप मुली तिथे राहतात एवढंच माहीत होतं छायाला. तिच्या मनातला संताप खदखदत होता.
"साली, रोजची कटकट. मरत पन  न्हाय लवकर..." मनातले विचार बाहेर आले असावेत. रिक्षावाला आरशातून मागे बघायला लागला.
"पुडं बग." छाया वसकन ओरडली. रिक्षावाल्याला काही कळलं नाही तरी पटकन त्याने  नजर वळवली. छाया रस्त्याच्या दोन्ही बाजूने मागे पडणार्‍या गर्दीकडे बघत राहिली. ’थेरडीचं तोंड बघणार नाही पुन्हा.’ गार वारा अंगावर झेलत तिने मनात पक्कं केलं तसं तिला बरं वाटलं. पण संतापाने का कशाने डोळ्यातून पाणी गळायला लागलं होतं. रिक्षा गचकन थांबली तशी ती भानावर आली.
"काय जालं दादा?" गोंधळून तिने विचारलं.
"राजेंन्द्रनगर आलं. कुठं जायचं आहे? पत्ता काय आहे?" राजेन्द्रनगर म्हटल्यावर ती उतरली. पुढचं ऐकायला ती थांबलीच नाही तसंही तो माणूस कानडीत  बोलत होता. ती त्याच्याकडे पाठ करुन चालायला लागली. रिक्षा घाईघाईत बाजूला उभी करुन रामण्णा तिच्यामागे धावले.
"मुली, अगं पैसे दे. इथपर्यंत आणलं तुला." छायाने मागे वळून पाहिलं नाही. रामण्णांनी धावत येऊन तिचा हात पकडला. तिने मान वळवून पाहिलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून रामण्णा गडबडले.
"काय झालं? हरवली आहेस का बेटी? कुठे जायचं, कुठून आलीस?" छाया नुसतीच त्यांच्याकडे पाहत राहिली. एक अक्षर कळत नव्हतं.
"इथे जवळच  पोलिसठाणं आहे. तिथे सोडतो मी तुला. पोलिस मदत करतील." छायाला फक्त पोलिस हा शब्द कळला आणि रामण्णांचा हात झिडकारुन ती पळायला लागली. आजूबाजूला जमलेल्या लोकांना रामण्णा काय झाले ते सांगत होते तोपर्यंत छाया लांबवर पोचली होती. काही सुचत नसल्यासारखी ती भरकटत फिरत राहिली. वाटेत एका दुकानाच्या आडोशाला बसून तिने गुडघ्यात डोकं खुपसलं. रडावंसं वाटत होतं. आई पाहिजे होती. नाहीतर सुजाताई तरी. आता तिला घरी परत जावंसं वाटायला लागलं. पण सुजाताईच्या सासूबद्दल भिती दाटून आली. सुजाताईला एव्हाना काय झालं ते कळलं असेल. ती घरी आली असेल. भिरभिर्‍या नजरेने ती इकडे तिकडे पाहत राहिली.  रस्त्यावरची गर्दी, गाड्या, कानडी भाषा कान किटायला लागले छायाचे. किती वेळ गेला कुणास ठाऊक. तास, दोन तास... ती तशीच बसून राहिली. हातापायातलं त्राण गेल्यागत. राजेन्द्रनगरात ती पोचली होती. आता तिला एखाद्या तरी मैत्रिणीला गाठायचं होतं. उठावसं वाटत होतं तरीही ती हलली नाही. येणारी जाणारी माणसं बघत राहिली. त्या तेवढ्या माणसात कुठेतरी तिला रामबहादूर दिसला. आनंदाने उडी मारावी असं वाटत होतं छायाला. उठलीच ती. धावत जाऊन तिने त्याला गाठलं.
"तू इकडे?" त्यालाही आश्चर्य वाटलं.
"तू राजिदंरनगर मदी रातोस?" त्याने मान डोलवली. पण ती या भागात कशी ते त्याला समजत नव्हतं.
"तू मला गावाकडं जानार्‍या गाडीत बसवून देसील?" तिने हळूच विचारलं. रामबहादूरच्या ती घरुन निघून आली आहे हे लक्षात आलं.
"भांडलीस?" त्याने विचारलं. तिने उत्तर दिलं नाही. रडायलाच यायला लागलं तिला. रामबहादूर गडबडला.
"छाया, रस्त्यावर नको रडूस. असं करु, तुला भूक लागली असेल ना? समोरच्या हाटेलात जाऊ चल." त्याच्या आपुलकीच्या स्वराने तिला अजून मोठ्यांदा रडावंसं वाटत होतं. पण डोळे पुसत ती त्याच्या मागून चालत राहिली. इडली, डोसा पोटात गेल्यावर तिला बरं वाटलं.
"चल, जाऊ या?" तिला कधी एकदा नांदगावला परत जाऊ असं झालं होतं.
"तुझी गाडी रात्रीची असेल. आणि मुंबईपर्यंत जाशील इथून. तिथून पुढे कशी जाणार?" रामबहादूरलाही नीट काही ठरवता येत नव्हतं.
"मी गाडी येईस्तो थांबती ना तितंच. मुंबयला पोचले की बगीन माजं मी कसं जायचं गावी ते. पन इतं नाही रानार मी."
"ऐक माझं. मॅडमला मी सांगतो काहीतरी. घरी सोडतो मी तुला. तिथून दुसर्‍या बिल्डिंगकडंकडं जाईन. रात्री तिथं ड्युटी आहे."
"मग आदी मला गाडीत बसव आनि जा."
"तुझ्या मॅडमला कळलं तर माझी नोकरी गेलीच समज." त्याला हे नसतं झेंगट कसं दूर करायचं ते कळत नव्हतं.
" तिला नाय कलनार पन मला गावीच जायाचं हाय." छाया ठाम होती.
"कामावर सांगून यायला लागेल. न सांगता आलो तर नोकरी जाईल."
"मी पन येते." ती त्याच्याबरोबर निघाली. त्याने आपल्या कामाच्या जागी आज रात्री येणार नसल्याचं सांगितलं आणि पुन्हा रस्ता पकडला. मुंबईला जाणार्‍या गाड्या सगळ्या रात्रीच्या. दहानंतर.   अजून पाच सहा तास कुठे काढायचे? विचार करुन त्याने तिला खोलीवर न्यायचं ठरवलं. पण लगेच त्याच्या डोळ्यासमोर खोलीतलं दृश्य आलं. नेहमीप्रमाणे दोन - चार जणं पडीक असणार तिथे आजूबाजूच्या खोपटातली. काय करायचं? गाडीची वेळ होईपर्यंत थांबण्यासारखं ठिकाण त्याला आठवेना. खोलीवर पोचलो की बघू असा विचार करत तो छायाबरोबर चालत राहिला. आज पहिल्यांदाच तो असा एखाद्या मुलीबरोबर चालला होता. उगाचच काहीतरी पराक्रम गाजवल्यासारखं वाटत होतं त्याला. छाती ताठ करुन खूशीत गप्पा मारत तो छायाबरोबर चालायला लागला.  गल्लीबोळातून चालताना छायाचा नकळत होणारा स्पर्श त्याला आवडायला लागला. एक दोनदा त्याने उगाचच तिच्याशी जवळीकही केली. छाया सुजाताच्या सासूच्या तक्रारीमध्ये इतकी गर्क होती की तिला त्याने जाणूनबुजून केलेला स्पर्श जाणवलाही नाही.  रामबहादूर मात्र आता अस्वस्थ व्हायला लागला. छायाला एकदम जवळ घ्यावं असंच वाटायला लागलं त्याला. मनातल्या विचारांना थारा न देण्यासाठी तो झपाझप पावलं टाकत चालायला लागला. छाया मागे राहिलेली लक्षातच आलं नाही त्याच्या. पळतपळत छायाने त्याला गाठलं आणि त्याचा हात पकडला तसा तो थांबला. छायाच्या स्पर्शाने अंगातून वीज गेल्यासारखं वाटलं त्याला. 

घरुन फोन आल्याचं तिच्या सेक्रेटरीने सांगितल्यावर सुजाताला आश्चर्यच वाटलं. सासूबाई कधीच फोन करत नसत. काय झालं असेल? गडबडीने तिने फोन घेतला.
"अगं, छाया गेली घरातून निघून."
"बाहेर गेली असेल. येईल. इतक्या का घाबरताय तुम्ही?" सुजाताने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्या श्वासही न घेता सांगत राहिल्या.
"रागावून गेली आहे ती सुजाता. मी दोन तास वाट पाहूनच फोन करतेय तुला. तू ये बाई घरी." सुजाताने  फोन ठेवला आणि ती निघालीच. तिला सासूचा राग आला.  ’नवरोजींनी इथे मला ठेवलंय आईच्या दिमतीला स्वत: गर्क  परदेश वार्‍या करण्यात. येता जाता छायाचा उद्धधार चालू असतो. गेली असेल डोकं शांत करायला. येईल. आणि शोधायचं तर कुठे शोधायचं आता तिला आणि कसं?’ मनातल्या मनात तिने सासू, नवरा दोघांना शिव्या घातल्या. पण छाया घरी येणं महत्वाचं होतं. वाट चुकली तर सांगताही नाही येणार तिला परत कसं घरी जायचं ते याची सुजाताला खात्री होती.  आणि काही बरंवाईट झालं तर कोणत्या तोंडाने ती यमुनाकाकूंना, छायाच्या आईला तोंड दाखवू शकली असती? काहीतरी करणं भाग होतं. तातडीने. विचार करुन तिने उल्हासला बरोबर घेतलं. उल्हास आणि ती कंपनीत एकत्रच लागले होते आणि तेव्हापासून चांगले मित्रही झाले होते एकमेकांचे.  तो चटकन निघाला सुजाता बरोबर.
"आधी घरी जाऊ. कदाचित आली असेल घरी ती. तिला बेंगलोर नवखं आहे अजूनही. जाणार नाही लांब. " उल्हासचं म्हणणं  सुजाताला पटलं.  तिची गाडी होतीच. तरी पोचायला अर्धा तास लागला. छाया आलेली नव्हती. सासूबाईंकडे रागाचा कटाक्ष टाकत सुजाता शेजारच्या घरांची दारं ठोठवायला लागली. तिथे काम करणार्‍या मुलींकडून छायाबद्दल काही कळेल अशी  अपेक्षा होती. कुणीतरी रामबहादूरचा उल्लेख केला. घाईघाईत सुजाता खाली गेली. उल्हास आधीच तिथे चौकशी करत होता.  रामबहादूरला आज सुटी होती. तो दुसरीकडेही कुठेतरी काम करतो एवढंच चौकीवरचा माणूस सांगू शकला. त्याच्या घराचा पत्ता चौकीदाराने कागदपत्रातून शोधून दिला. उल्हास आणि सुजाता राजेंन्द्रनगरशी पोचले. वाटेत जाताना प्रत्येक वळणापाशी सुजाता गाडी थांबवायला लावत होती. कुठेतरी रस्त्यातच कदाचित सापडेल. फिरत असेल इकडेतिकडे असं तिला वाटत होतं. सुजाता बेचैन व्हायला लागली. छायाने काय कपडे घातले आहेत तेही तिला आठवेना. छायाच्या अंगयष्टीची, साधारण तिच्यासारखेच कपडे घातलेली प्रत्येक मुलगी तिला छाया वाटत होती. पण गाडी राजेन्द्रनगरपाशी पोचली तरी वाटेत कुठे छाया नजरेला पडली नाही. सुजाताने आजूबाजूचा गलिच्छपणा पाहिला आणि छाया रामबहादूर बरोबर इथे येईल हे तिला पटेनाच. खेडेगावात शुद्ध हवेत वाढलेली मुलगी होती ती. पण आता विचार करण्यात अर्थ नव्हता. गाडी राजेन्द्रनगरच्या बाहेर उभी करुन गल्लीबोळातून कसंबसं त्यांनी रामबहादूरची खोली शोधली. आजूबाजूच्या नजरा दोघांवर रोखलेल्या होत्या. दोघांनाही अवघडल्यासारखं झालं होतं पण विचार करायची वेळ नव्हती. रामबहादूर आणि छाया दिसल्याशिवाय चैन पडणार नव्हतं. दोघं  खोलीशी पोचले.  दार उघडंच होतं. आता दोघं तिघं जोरजोरात गप्पा मारत होते. समोर रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्यातलाच एखादा रामबहादूर असेल असं वाटलं उल्हासला. पण तिथेही तो नव्हता. खोलीतलं कुणीच धड काही सांगू शकतील अशा अवस्थेत नव्हतं. तो आणखी कुठे काम करतो त्या ठिकाणाचा पत्ता मिळवायला हवा होता.  दोघं दिसेल त्याला  विचारत राहिले. अखेर कुणीतरी तो मिळवला. उल्हास आणि सुजाता तिथे पोचले तर तो तिथून अचानक निघून गेलेला. का, कुठे याबद्दल काही समजलं नाही तरी आता असली तर छाया त्याच्याचबरोबर असेल याबद्दल दोघांनाही खात्री पटली होती. पण  रामबहादूरला कुठे शोधायचं हा पेचच होता. सुजाता आणि उल्हास दोघंही थकले होते. जरा बर्‍या दिसणार्‍या हॉटेलमध्ये जाऊन  काहीतरी पोटात ढकलायचं त्यांनी ठरवलं. रस्त्यावर नजर ठेवता येईल असं हॉटेल निवडून ते दोघं अस्वस्थपणे बसून राहिले. बराचवेळ  गर्दी निरखित राहिले. छाया दिसेल असं उगाचच वाटत होतं सुजाताला. पण रस्त्यावरच्या गर्दीत छाया ओळखू येणं कठीणच होतं. सासूबद्दलची नाराजी ती उल्हाससमोर व्यक्त करत राहिली. उल्हास निमूटपणे सुजाताला तिच्या भावना व्यक्त करु देत होता. तासाभराने दोघं तिथून बाहेर पडले.  परत रामबहादूरच्या गल्लीत पाऊल टाकायची इच्छा नव्हती. पण तो परत आला असण्याची शक्यता होती. त्याच्या खोपटापाशी पोचेतो वाटेत दारु पिऊन बरळणारी, आरडाओरडा करणारी माणसं,  गटारातलं सांडपाणी, येता जाता इथेतिथे थुकणारी पोरं नकोच वाटत होतं पण इलाज नव्हता. तोंडावर हात दाबत, घाणीत पाय पडणार नाही याची काळजी घेत  दोघं खोलीशी पोचले. आतून जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. मगाचीच असतील सगळीजणं की आला असेल रामबहादूर परत? हळूच उल्हासने वाकून पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. खोलीतली तरुण मुलगी छायाच असणार हे त्याच्या लक्षात आलं. छायाची नजर आणि तिच्याशी लगट करणारे चार पुरुष! उल्हासच्या शरीरातून भितीची लहर आरपार गेली.  मागून डोकावणार्‍या सुजाताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसं तो गरकन वळला. सुजाता छायाला हाक मारेल नाहीतर आत शिरेल ह्या कल्पनेनेच त्याचं धाबं दणाणलं. त्याने सुजाताला हाताने बाजूला खेचलं. भिंतीशी पाठ करुन तो कुजबूजला.
"तिला हाक मारु नकोस. सोडणार नाहीत ते तिला. अंगावर धाऊन येतील आपल्या."
"अरे पण काही तरी करायला हवं ना. मुर्ख मुलगी. काडीची अक्कल नाही." सुजाता पुटपुटली.
"भरपूर प्यायलेली आहे ती."
"बेभान झाल्यासारखी वागतेय." सुजाताच्या मनात छायाच्या वागण्याची चीड साठत चालली होती.
"काय करायचं? तिला तिथून सोडवायचं कसं?" छायाला तिथून तातडीने बाहेर कसं काढायचं याच विचारात होता उल्हास.
"पोलिसांकडे जाऊ या?" इतकी सोपी गोष्ट सुचली कशी नाही याचं आता तिला आश्चर्य वाटलं.
"पोलिसांना घेऊन येईपर्यंत काय होईल कुठे ठाऊक आहे आपल्याला? आत्ताच लांडग्यांसारखे तिच्या अंगाशी झोंबतायत. तिला पाजली  आहे भरपूर. शुद्ध हरपल्यासारखी बरळतेय ती." दोघं काही न सुचल्यासारखे आत मध्ये डोकावून पाहत होते. दारासमोरुन येणार्‍या जाणार्‍यांच्या नजरा अंगाला बोचत होत्या ते वेगळंच. आतमध्ये चाललेला गोंधळ तिथे राहणार्‍या लोकांना नवीन नसावा. आजूबाजूच्या झोपड्यातून भांडणांचे, बरळण्याचे आवाज येतंच होते. पण सुजाता आणि उल्हास सारखी माणसं तिथं येणं त्यांच्यासाठी नवीन होतं. सुजाताला तिच्यावर खिळणार्‍या नजरा देहाची चाचपणी करतायत असंच वाटत होतं. अंगावरचा शर्ट सहजासहजी झाकताही येत नव्हता. ओढणी असती तर बरं असं तिला प्रकर्षाने जाणवायला लागलं.  दोघांची बेचैनी वाढत होती. नक्की काय करायचं ते उलगडत नव्हतं. अखेर इकडे तिकडे पाहत धाडसी निर्णय घेतला सुजाताने. उल्हासला हाताने बाजूला करुन ती आत धावली. छायाच्या कपड्यांशी चाळा करणार्‍या चौघांना काही कळायच्या आत तिने छायाला खेचलं. जोरात ओरडत ती छायाला बाहेर काढू पाहत होती. छाया काही न कळल्यासारखी तिथेच उभी राहिली. तोपर्यंत उल्हास आत आला. त्या एवढ्याशा खोलीत इतकं माणसं मावतही नव्हती. तारवटलेल्या डोळ्यांनी सगळेजण सुजाताकडे पाहत होते. उल्हासने सुजाताला दाराच्या बाहेर ढकललंच. तिच्या दिशेने येणार्‍या रामबहादूरला पोटात त्याने गुद्दा हाणला. रामबहादूरचा तोल गेला. दोघं स्वत:चा तोल सांभाळत त्याला सावरायला पुढे झाले. तिसरा उल्हासच्या अंगावर धावून आला. उल्हासने स्वत:ला कसंतरी त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि तो खोलीच्या बाहेर पडला. झोपडीच्या बाहेरच वाहणार्‍या गटारात त्याचा पाय जाताजाता वाचला. छायाला घट्ट धरुन धडधडत्या काळजाने सुजाता बाहेर उभी होती. रामबहादूर बरळत बाहेर आला आणि त्याने छायाचा हात पकडला.
"तिला मी गाडीत बसवून देणार आहे. सोडा तिला." सुजाताचा पारा चढला. पण सुजाताने काही करण्यापूर्वीच उल्हासने रामबहादूरचा शर्ट पकडत सणसणीत ठेवून दिली.  रामबहादूर गाल चोळत राहिला तसं तोच हात खेचून सुजाताने पिरगळला.
"बेशरम. तुला कळतंय का काय करतो आहेस तू? नोकरी गेलीच आता तुझी. तुरुंगाची हवा खायला पाठवते थांब तुला." सुजाताचे डोळे आग ओकत होते. झोपडपट्टीतली माणसं जीन्समधली बाई रामबहादूरचा हात पिरगळते आहे हे बघून फिदीफिदी हसत जमा झाली होती. पण हळूहळू उल्हासला त्या घोळक्याची भिती वाटायला लागली. थोबाडीत खाल्लेल्या रामबहादूरचा खाऊ का गिळू आविर्भाव त्याला अस्वस्थ करायला लागला. त्याच्या बाजूला येऊन उभे राहिलेले त्याचे मित्र आणि तो आता शांत राहणार नाहीत असं त्याला राहून राहून वाटत होतं. आपल्यासारखी दोन पांढरपेशी माणसं क्षणात नष्ट करायला या लोकांना वेळ लागणार नाही असं त्याला वाटायला लागला. पन्नास साठ चेहरे नाकेबंदी केल्यासारखे खुणावत होते. काही झालं तर मुंगीसुद्धा सहज बाहेर पडू शकणार नाही इतकी गर्दी तिथे होती आणि ती देखील झोपडपट्टीत राहणार्‍यांचीच. त्यात दोघांचा निभाव लागणं निव्वळ अशक्य होतं. छाया चाललेला गोंधळ विस्फारीत नजरेने नुसताच पाहत होती. घाबरुन, गोंधळून. इंग्रजीचा आधार घेत सुजाताला तिथून निघायला हवं असं तो परोपरीने सांगत होता पण सुजाता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.  रामबहादूरने सुजाताचा हात झटकला आणि तो उल्हास समोर तोल सावरत उभा राहिला.
"साहेब, माझ्या थोबाडीत मारली हे चांगलं नाही केलं तुम्ही. ह्या मॅडमना सांगा, पुरुषाची जात आहे माझी. त्यांनी नाही मला शहाणपणा शिकवायचा. माझी चूक नाही. ही पोरगीच माझ्याकडे आली. गलती हो गयी. माफ कर दो. नौकरी से मत निकालो साब मुझे. आपही बताओ मॅडमको. जेल मे नही जाना है मुझे. मै तो उसे कल ले के आनेवाला था...." उल्हासने मान डोलवली. पण सुजाताला राहवलं नाही.
"कल? पळून आलेल्या मुलीला रात्रभर ठेवणार होतास?  तुझ्याबरोबरच्या दारु प्यायलेल्या त्या धटिंगणाबरोबर? आणि काय चाळे चालले होते रे तिच्या अंगाशी?" उरलेले तिघं फिस्सकन हसले.
"मॅडमऽऽ"  किंचाळत रामबहादूर सुजाताच्या अंगावर धावला. उल्हास चिडलाच सुजातावर.
"सुजाता, पाऊल उचल पटकन. क्षणभरही थांबून चालणार नाही. ऐकलं नाहीस तो काय म्हणत होता. सगळे अंगावर धाऊन आले तर मेलोच समज आपण. आता आणखी कसली भर पडायला नको." सुजाताला उल्हासचं ऐकायचं नव्हतं पण गोंधळ वाढत चालला होता. आणखी काही घडण्याच्या आत निघणं भाग होतं. रामबहादूरकडे नजर टाकून छायाचा हात धरुन सुजाता निघाली. छायाला उभं आडवं फोडून काढावं छायाला असं वाटत होतं. संतापाने तिच्या अंगाची लाही लाही झाली होती. घरी पोचलं की सासूबाईंवर तोंडसुख घ्यायचं, सोसायटीत रामबहादूरची तक्रार नोंदवायची की पोलिस चौकीत आताच छायाला घेऊन जायचं अशा विचारांचं चक्र सुरु झालं तिच्या मनात. गल्ली, बोळ तुडवता तुडवता पोलिसांकडे न जाण्याचं तिने निश्चित केलं. एकदा पोलिसांकडे गेलं की छायाला ते प्रकरण संपेपर्यंत इथेच राहावं लागेल हे तिला कळत होतं आणि यानंतर एक क्षणही तिला छायाची जबाबदारी नको होती. छायाला नांदगावला ताबडतोब परत पाठवायचं एवढंच तिचं ध्येय होतं.  उल्हासला ती पुन्हा गळ घालणार होती. छायाला नांदगावला पोचतं करायचं. कसंही, आजच, लगेचच!  - मोहना.