Wednesday, November 23, 2011

माझा स्पेलिंग बी स्पर्धेतील सहभाग

"आई, मी स्पेलिंग बी मध्ये भाग घेतेय."  मुलीने जाहीर केलं आणि माझा चेहरा खाडकन उतरला.
"अगं त्यासाठी स्पेलिंग यावी लागतात." माझ्या स्वरातली अजिजी तिच्या पर्यंत पोचली नाही.
"मग?"
"मला येत नाहीत."
"पण भाग मी घेणार आहे. खी खी खी...."
"हो, पण तुझी तयारी मला करून घ्यावी लागेल नं." माझं केविलवाणं स्मित.
"ईऽऽऽ त्यात काय आहे. तू मला शब्द विचार, मी स्पेलिंग सांगेन."
"अगं पण ते शब्द विचारता यायला हवेत ना मला?"
मुलगा फजिती बघायला उभा होताच. फजितीची फटफजिती झाली तर पाहावी म्हणून तोही मध्ये पडला.
"बाबा तर म्हणत होता तुझ्याकडे इथली पण पदवी आहे."
"शिक्षणाचा काही उपयोग नसतो काहीवेळेस"
"हं..........खरंच की." एकदम साक्षात्कार झाल्यासारखं तो म्हणाला.  घाबरायलाच झालं. पठ्ठ्या एकदम शाळा सोडून द्यायचा, शिक्षणाचा उपयोग नसतो  त्याचं उदाहरण समोरच आहे म्हणून.

तो पर्यंत मुलीने शाळेतून आलेला शब्दांचा कागद पुढे केला. पाहिलं आणि धडधडलं. किती हे शब्द. हे सगळे विचारायचे?
"विचार ना." मुलगी वाट बघत, मुलगा आव्हान दिल्यासारखा.
एकदा कागदावर नजर रोखत, एकदा तिच्याकडे कटाक्ष टाकत पटकन किती शब्द विचारता येतील याचा मी अंदाज घेतला.  मला उच्चार करता आले आणि तिला स्पेलिंग्ज सांगता आली. दोघी खूश.
"उरलेले शब्द नंतर. आता कंटाळा आलाय."
"दे मग तो कागद."
"नको राहू दे माझ्याकडे."
"कशाला?" ती तशी सरळ आहे त्यामुळे तिचे प्रश्न पण सरळच असतात. उगाच वाकडा विचार, कुसकट प्रश्न असं मिश्रण नसतं. पण सुपुत्र कडमडलेच मध्ये.
"राहिलेल्या शब्दांचा अर्थ गूगल करणार असेल आई. उरलेले शब्द नंतर विचारते म्हणाली ना."
"शाबास! कसं बरोबर ओळखलंस. फुटा आता."
"म्हणजे?"
"निघा इथून असा आहे त्याचा अर्थ."

माझी खरी कसोटी होती उच्चारांची. गूगल करून उच्चार थोडेच सापडतात? माझ्याच वाट्याला असे शब्द का येतात कुणास ठाऊक. पुन्हा आपण उच्चार चुकीचा करतोय हे कळत असतं तर तो चुकीचा कसा करू? ते नेमकं दुसर्‍यालाच समजतं. चुकीचं हे नेहमी असं असतं. आपल्याला आपली चूक वाटतच नाही. परवा एका मैत्रिणीकडे गेले होते. अपार्टमेंटचा नंबर सांगणारा बाण होता. त्या बाणाच्या दिशेने तीन वेळा गाडी नेली पण इमारत काही दिसेना. म्हटलं. अपार्टमेंटवाले बाणाची दिशा दाखवायला चुकले बहुतेक. तसं असतं हे. आपण चुकलो असं वाटतच नाही त्यामुळे सगळ्या समस्या.

माझा वाढदिवस नोव्हेंबर मध्ये. ऑफिसमध्ये कुणी विचारलं की दुसराच महिना सांगावा असं वाटतं. नोव्हेंबर म्हटलं की लगेच
"ओ यू मीन नोवेंबर?" आलंच. पुन्हा आमच्या मराठीत असंच म्हणतात असं कसं सांगणार, तरी कधीतरी पुराव्यानिशी सिद्ध करता यावं म्हणून भिंतीवर लटकवलेल्या कालनिर्णयवर  पाहून खात्री केली नोव्हेंबरची. हापिसात सर्वांना तेवढं मराठी यायला लागलं की दाखवेन. नाहीतरी उठसूठ ’नमस्ते’ करत राहतात त्याऐवजी असं काहीतरी शिका म्हणावं.

हल्ली तर कुणाचं लक्ष नाही किंवा नीट ऐकलं नाही म्हणून  कुणी ’से इट अगेन’ म्हटलं की मला वाटतं, चुकला उच्चार. मग बरोबर केलेल्या उच्चाराचीही वाट..... सगळी अक्षरं एकत्र करून शब्द म्हणण्यापेक्षा सुट्टी अक्षरं खपवावीत त्यापेक्षा, नाहीतर सगळा व्यवहार इ मेलने. बोलायचं म्हणून नाही. या सगळ्या युक्त्या मुलीसमोर चालणा‍र्‍या नव्हत्या. घरात पितळ फार लवकर उघडं पडतं/ पितळी फार लवकर उघडी पडतात.

दुसर्‍या दिवशी ज्या शब्दांचे अर्थ माहीत नव्हते त्यांचे गूगल करून शोधले. उच्चारांची बोंब होतीच पण आता निदान अर्थ तरी माहीत होते. तरीही संकट 'आ' वासून उभं होतंच. ते कधी पडत नाही, उभंच राहतं.  उच्च्चार नीट झाला नाही तर मुलगी स्पेलिंग कशी सांगणार? चुकली की स्पेलिंग सांग म्हणणार. स्पेलिंग सांगितलं की चुकीचा उच्चार केला म्हणून डोळे गोल बिल फिरवून नाराजी व्यक्त करणार. इतकी वर्ष अशा प्रसंगातून सुटण्याचा माझ्याकडे उत्तम मार्ग होता,
"माझ्या मागे काय लागता. मी किती करू, नोकरी पण करायची, घरकाम पण करायचं, अभ्यास पण घ्यायचा...."  अर्धा तास तेच तेच ऐकायला नको त्यामुळे पोरांनी आधीच पोबारा केलेला असायचा. पण आता तेही फारसं मनावर घेत नाही कुणी. बाकिची कामं करून टाकतात तेवढ्या वेळात.

Liz - मराठी इंग्लिशमध्ये 'लिझ' म्हटलं की इंग्लिश इंग्लिश मध्ये त्याचं Lease होतं.  Rich आणि Reach, be आणि bee माझा उच्चार दोन्हीसाठी एकच असतो.  थोडे दिवस मग मी असे आणखी कुणी उच्चार करतं का यावर पाळत ठेवली.  बर्‍याच मैत्रिणी निघाल्या तशा. पण हा पुरावा फारसा मौल्यवान नव्हता मुलांसाठी.
आमच्या  स्पॅनिश बंधू भगिनी माझ्या 'स्टाइल'चेच उच्चार करतात हे कळल्यावर आधी पोरांना सुनावलं.
"बघा, हा काही आमच्या इंग्रजी शिक्षकांचा दोष नाही. त्यांनी बिचार्‍यांनी आम्हाला नीटच शिकवलं होतं. हे इंग्लिशच विचित्र आहे." दोघा भावंडांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं.

"जाऊ दे ना मी वेगवेगळ्या उच्चारांचा सराव करते. परीक्षक स्पॅनिश, चायनीज असले तर"  मुलीने शरणागती पत्करली. एरवी प्राण गेला तरी लढा, वगैरे धडे देते मी, ते आवरले यावेळेस. गेल्या तीन आठवड्यात वेगवेगळ्या उच्चारात शब्दांची तयारी झाली आहे. लवकरच किल्ला सर करायचा आहे."  बघू काय होतं ते.

ता. क. -  या वर्षी मी देखील तिच्या शाळेत स्पेलिंग बी च्या प्राथमिक फेरीसाठी  परीक्षक आहे :-) फक्त तिच्या गटाला नाही. सुटली....


7 comments:

  1. छान लेख. आणखी लिहित जा.

    ReplyDelete
  2. Ekunch bhasha ha vishayach tirkas. Manus bolto, shabdancha arth kalto, mhanun aapan mhanto kalal. Pan gammat ashi tyatun aaplyala tyachya manatal khar kaltach as nahi. hech jagan.(life)

    ReplyDelete
  3. धन्यवाद, केशव, साधक, अनिल.

    ReplyDelete
  4. रमेश झवर निवृत्त तीडर रायटर, लोकसत्ताNovember 26, 2011 at 7:27 PM

    माझे संगणक ज्ञान थातूरमातूर आहे. तुम्ही लिहीलेल्या स्पेलिंग-पुराणावर मी लिहीलेली प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचली की नाही कोण जाणे. म्हणून हा दुस-यांदा प्रयत्न. स्पेलिंग-पुराण म्हणजे खरे तर शब्द-पुराण. जितके लिहाल तितके थोडेच आहे. तुमचे स्पेलिंग चुकीचे की बरोबर ह्याची चिंता न करता दडपून लिहीत राहा.कारण मोठे अजब आहे. एका प्रुफरीडरला मी चुका राहिल्या त्याबद्दल मेमो दिला. त्या संदर्भात त्याने खुलासा केला, आपण लिहीलेला मजकूर वाचता वाचता वाचक मनातल्या मनात चुका शुद्ध करून घेतात.(कृपया हा खुलासा मुलांना सांगू नये.)
    रमेश झवर
    निवृत्त तीडर रायटर, लोकसत्ता

    ReplyDelete
  5. नमस्कार झवर साहेब,

    आधीची प्रतिक्रिया पोचली नव्हती. तुमच्याकडून माझ्या लेखनाला प्रतिसाद हे उत्साह वाढविणारं आहे. ओऽऽड्य़ुड सदराबाबत तुम्ही पत्र पाठवलं होतं ते अजून तसंच्या तसं लक्षात आहे माझ्या. मन:पूर्वक धन्यवाद!

    <<< एका प्रुफरीडरला मी चुका राहिल्या त्याबद्दल मेमो दिला. त्या संदर्भात त्याने खुलासा केला, आपण लिहीलेला मजकूर वाचता वाचता वाचक मनातल्या मनात चुका शुद्ध करून घेतात.(कृपया हा खुलासा मुलांना सांगू नये.) >>> :-)

    स्पेलिंग आजकाल वेगवेगळ्या प्रकाराने दुरुस्त करता येतात पण प्रश्न/मजा/गोंधळ असतो तो उच्चारांचा. मराठी माध्यमातून शिकलेल्यांना तर जागोजागी धडपडावं लागतं. त्यातून बर्‍याच गमतीजमती घडत असतात.

    ReplyDelete
  6. very honest post and written so well that I could actually see the scene happening right in front of me :)

    ReplyDelete
  7. Vandana thanks. bagh tula mala pahata aale ya lekhatun :-)

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.