Tuesday, May 14, 2013

माझं घर, माझं गाव

श्री. व सौ. या मासिकाने  'लेखकाचा गाव' या नव्याने सुरु केलेल्या सदरा मधील माझा लेख - माझं घर, माझं गाव.                              


"कधी होणार स्वत:चं घर देव जाणे, पण मी काही फ्लॅटमध्ये राहणार नाही. टुमदार घर हवं." आई नेहमी म्हणायची. कार्यालयातून मिळणार्‍या घरातून (क्वार्टर्स)  स्वत:च्या टुमदार बंगल्यात ती राहायला आली ते वडील सेवानिवृत्त झाल्यावर आणि आम्ही बहिणी सासरी गेल्यानंतर त्यामुळे माझं घर माझं गाव म्हटलं की प्रश्न पडतो, खरंच नक्की कुठलं गाव माझं आणि कुठलं घर? आणि तरीही इतक्या वर्षात काही काळ का होईना माझं झालेलं प्रत्येक घर, गाव मला माझंच वाटतं.  किती घरं आमची झाली, गावं पालथी घातली गेली. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे  तीन चार वर्षांनी  मुक्काम हलायचा. घराची, गावाची ओळख होते आहे तोच वेगळ्या गावी पोचलेलो असायचो. पण तरीही प्रत्येक घराचं, गावाचं आणि घर आणि गावामुळे सहवासात आलेल्या माणसाचं स्थान माझ्या हृदयात  वेगवेगळं आहे.
>>

"नदीवर जाऊ या?" संध्याकाळी बाहेर खेळता खेळता सुनिता, नीलिमा आणि मी तिघीपैकी कुणीतरी टूम काढली आणि घराजवळच्या नदीवर आम्ही पोचलोही. वाटेत झाडावरच्या कैर्‍या दगड मारून पाडायच्या आणि च्यकच्यक करत खायच्या यातली मजा औरच. पाण्यात मनसोक्त डुंबलो आम्ही पण नंतर काठावरच्या म्हशींना घाबरून पाण्यातून बाहेर पडण्याचं कुणाचंच धाडस होईना. काळोख पडायला सुरुवात झाली होती. रात्रीच्या गाडीने सुनिताला आई वडिलांबरोबर जळगावला जायचं होतं. असतील मुली बाहेर खेळत म्हणणार्‍या आमच्या आयांच्या तोंडचं पाणी पळालं. शोधाशोध सुरू झाली, कुणीतरी मुली नदीवर दिसल्याचं सांगितल्यावर त्या धावतपळत नदीपाशी आल्या.  त्यानंतर आठवतात त्या तिघींच्या चिडलेल्या आया. देवरुख म्हटलं की नदी, म्हशी आणि आमचं हरवणं हमखास आठवणींच्या गाठोड्यातून बाहेर येतं.  चौथीत असतानाचा हा प्रसंग.

देवरुख नाटकवेडं. जवळ जवळ दर आठवड्याला नवीन नाटक यायचं. अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, रायगडाला जेव्हा जाग येते अशी एकापेक्षा एक नाटकं. आई वडिलांबरोबर आम्ही मुलंही आपसूक  नाटकं पाहायला शिकलो, ती पाहता पाहता नाटकं बसवायलाही लागलो. कागदाची तिकिटं, चादरींचे पडदे असा सरंजाम आणि मोकळं मैदान एवढ्या गोष्टीवर आम्हीच लिहिलेलं नाटक पार पडायचं. आजूबाजूची  टारगट मुलं पडदे पाडण्याच्या तयारीत सज्ज असायचीच. खेळ, दंगा, उनाडपणा असं सगळं एकच सूर गवसल्यासारखं आयुष्य होतं चौथीपर्यंत.

कोकणातून बदली झाली ती एकदम गुजराथजवळच्या पालघरला. कळत्या वयात गाव सोडण्याचा हा पहिला प्रसंग होता.  रडायला येत होतं सारखं. वडील आधीच पालघरला नोकरीवर रुजू झाले होते त्यामुळे आई सारं सांभाळत होती.  वार्षिक परीक्षा झाल्यावर आई आणि आम्ही तिघी बहिणी पालघरच्या दिशेने ट्रकने निघालो.  आता ट्रकमधून इतक्या तासांचा प्रवास कसा केला असेल आम्ही याचं आश्चर्य वाटतं, आईने एकटीने कसं सगळं सांभाळलं असेल असा प्रश्न पडतो. निघताना देवरुखमधल्या एकमेव हॉटेल ’विहार’ मध्ये जेवलो होतो ते आजही पक्कं आठवतंय, म्हणजे आईने आम्हा बहिणींना पाठवून दिलं, जेवून या म्हणाली. ट्रकमध्ये पाय टाकताना, गावाचा,  घराचा निरोप घेताना आईच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं नाही की धो धो रडण्यात आमच्या ते लक्षातच आलं नाही?
>>

पालघरचं हायस्कूल. संध्याकाळची वेळ.
"सुजाऽऽऽता" रमत गमत, गप्पांच्या नादात चाललेल्या आम्ही त्या आवाजाने आणि नंतर सुजाताच्या डोक्यावर मारलेल्या टपलीने आश्चर्याने खिळलोच. काय झालं ते कळेपर्यंत सुजाताला हाक मारणारा तो मुलगा तिथून पसारही झाला. हायस्कूलच्या मैदानावर खो खो चा सराव करून घरी जाताना घडलेला हा प्रसंग. आम्ही तिघी चौघी सराव संपला की गप्पा झोडत घरी जायला निघायचो.  गप्पांच्या नादात शाळेच्या आवारापासून मुख्य रस्त्यावर येईपर्यंतची  पाच मिनिटांची  काळोखी आडवाट कशी संपायची ते कळायचंही नाही. नेहमीसारखाच तोही दिवस, या अनुभवाने बदलला. नंतर हे रोजचंच झालं आणि  त्या वाटेवर पाऊल टाकायच्या कल्पनेनेच पोटात गोळा यायला लागला. गुंड प्रवृत्तीचा कमलेश भरधाव वेगाने सायकल घेऊन यायचा. आमच्या तिघी चौघींपैकी कुणाचंतरी नाव घेऊन शिट्टी वाजवायचा, डोक्यावर टपली मारुन पसार व्हायचा. नंतर नंतर मुख्य रस्त्याला लागलं, प्रत्येकजण आपापल्या घराच्या दिशेने वळली की तो  माझ्या मागे यायचा. घाबरून धावत सुटलं की सायकलचा वेग  वाढवायचा. एकदा घामाघूम होऊन घरात शिरताना वडिलांनी पाहिलं आणि काय झालं ते कळल्यावर त्यांनी त्याला चांगली समज दिली. त्याच्या वडिलांशीही ते बोलले. त्याच दरम्यान वडिलांची बदली झाली आणि एक दुस्वप्न संपल्यासारखं वाटलं. पालघर म्हटलं की ही कटु आठवणच प्रथम मनाचा तळ ढवळून काढते.

गावाने नाही पण इथल्या घराने, आवाराने सहज जवळीक साधली. कार्यालयाचंच निवासस्थान केलेलं भलंमोठं घर होतं आमचं.  अंगणात  नादुरुस्त ट्रॅक्टर, ट्रॅक, आवारात खजुराची भरपूर झाडं आणि त्यावर लटकलेले साप. भितीने पाचावर धारण बसायची, पण त्याच आवारातल्या चिंचेचा कोवळा पाला खाण्याच्या नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटतं. गाभुळलेल्या चिंचा डोळ्यासमोर नाचतात. बाजूच्या तीन घरात आमच्यासारखीच तात्पुरत्या वास्तव्याला असलेली  कार्यालयातील कुटुंब. सगळी मिळून तेरा जणं आवारात धुमाकूळ घालायचो. क्रिकेट, लगोरी, विटी दांडू असे खेळ सतत चालू असायचे. त्याचदरम्यान दूरदर्शन सुरू झालं होतं. शाळेच्या वसतिगृहात टी. व्ही. वर दहा पैसे देऊन क्वार्टर्स मधली सगळीच्या सगळी चित्रपट पाहायला जायचो, प्रत्येकाच्या घरी टी. व्ही. येईपर्यंत रस्त्यापलीकडच्या शिद्यांच्या घरी टी. व्ही. वरचे कार्यक्रम पाहायला धक्काबुक्की करून जागा पटकावायचो. गावातल्या जत्रा, टूरिंग टॉकीज सगळीकडे  वर्णी लावत फिरायचो.

 पाच वर्षांनी कणकवलीला बदली झाली. निघायचं ठरलं तेव्हापासून मैत्रिणींना, गावाला, घराला रामराम ठोकायचा या कल्पनेनेच रडू फुटायचं. या वेळेसही आईच्या डोळ्यात पाणी नाही. इतकी सवय झाली होती का आईला वारंवार गाव, जागा बदलण्याची?
>>

"या आपल्या झाशीच्या राणी" असं म्हणून जाधवसरांनी माझी उत्तरपत्रिका वर्गासमोर फलकावली. कोणत्यातरी धड्यातल्या राणीला मी उचलून नको त्या प्रश्नाच्या उत्तरात आणलं त्याची ही शिक्षा. मग रडणं, खाली मान घालणं, सरांवर ’डुख’ धरणं, आणि शेवटी पुढच्या वेळेला पैकीच्या पैकी गुण नाही मिळवले तर नाव नाही लावणार.... असे ’पण’ झाले, ते पूर्णत्वाला गेले आणि त्यांच्या हाताखाली येणार्‍या प्रत्येक वर्गाला ’झाशीच्या राणी’ ची चिकाटी जाधव सर सांगायला लागले. मी शाळेची ’झाशीची राणी’ झाले. ही कणकवलीच्या शाळेतील सलामीची झडती. पालघरच्या शाळेत मुलामुलींनी एकमेकांशी बोलण्याची पद्धतच नव्हती, पण कणकवलीसारख्या छोट्या गावात असा भेदभाव नव्हता. पण हे गाव  आणि इथलं घरही काही केल्या  सुरुवातीला आपलंसं वाटेना. रोप उखडून दुसरीकडे लावल्यासारखं झालं होतं. आगगाडीच्या डब्यासारख्या खोल्या असलेल्या त्या घरात क्वार्टर्स रिकामी होईपर्यंत राहायचं होतं. महामार्गाच्या बाजूला वसलेल्या या गावात घरातून बाहेर पडलं की रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणारे ट्रक, गाड्या जीव घाबरवून टाकायचे. पण हळूहळू इथेही रुळायला झालं. घर, गाव माझं आहे ही जाणीव नकळत मनात रुजायला लागली.

 ’अभिनयाचं प्रथम पारितोषिक ...’ कणकवली म्हटलं की नाथ पै एकांकिका स्पर्धा आणि अभिनयासाठी मिळवलेली बक्षिसं डोळ्यासमोर येतात. नाताळची सुट्टी स्पर्धेच्या वातावरणाने भारुन जायची. रात्री दोन दोन वाजेपर्यंत सलग आठ दिवस या स्पर्धा असायच्या.  पालघरने खेळाची आवड निर्माण केली तर कणकवलीने अभिनयाची. तुलनेने छोटं गाव आणि छोटं घर होतं इथलं. बहुतांशी सगळी लोकं एकमेकांना ओळखणारी. त्यामुळे मुलांचं बरं वाईट वागणं ताबडतोब घरात कळायचं. आमच्या शाळेचे  खामकर सर विद्यार्थ्यांना शांतपणे अभ्यास करायला मिळावा म्हणून स्वत:ची खोली देत. कधीही या आणि तिथे अभ्यासाला बसा अशी व्यवस्था होती. अट एकच, भरपूर अभ्यास करा आणि चांगले गुण मिळवा. लोहार, साळुंके सर, करंबेळकर मॅडम यांना एकांकिकांचा ध्यास. त्याच्यांमुळे अभिनयाची  आवड लागली, अमेरिकेत स्वत:ची संस्था निर्माण करण्याचं धाडस आलं. कणकवलीची सगळी माणसं कोणत्या ना कोणत्या छंदाने, ध्यासाने भारलेली.
>>
 "गणपती पुळ्याला जायचं आहे, टिळकाचं जन्मस्थान आहे ना रत्नागिरीत? आणि ते पतितपावन मंदिर पण पाहावं म्हणतो आहोत. पावसला जायला जमेल का?"  घरी येणारे नातेवाईक विचारायचे. आम्हीही उत्साहाने सांगायचो,
"हो नक्की. आणि भगवती किल्ल्यावर जाता येईल, पांढरा समुद्र पाहायचा असेल ना? आणि हापूस आंबे, कोकम, काजू........सगळा कोकणी मेवा. खाणं आणि प्रेक्षणीय स्थळं पाहणं याची रत्नागिरीत चैन  होती. कणकवलीहून रत्नागिरीला आल्यावर दमट हवा सोडली तर सगळं कसं छान, छान वाटत होतं. आमचं इथलं घर वडिलांच्या कार्यालयाला लागूनच होतं. महाविद्यालयात  येता जाता आम्ही कार्यालयात डोकावू शकायचो इतकं बाजूला.  इथेही सांस्कृतिक दृष्ट्या काही ना काही चालू असायचं सतत.

 ’हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे....’ काय मस्त वाटायचं हे म्हणताना.  थिबा पॅलेसच्या बाजूचं आकाशवाणी केंद्र म्हणजे नुसतं नोकरीचं ठिकाण न राहता रुसवे फुगवे, मजाच मजा, कल्पनाशक्तीला वाव असं स्वरूप होतं. उसळता उत्साह आम्हा सर्वांच्याच लेखणीतून बाहेर यायचा. ’रत्नभूमी’ वर्तमानपत्रात मला ’तरुणाई’ सदर लिहिता आलं ते आकाशवाणीमुळे. जिल्ह्याच्या या ठिकाणाने आयुष्यभराचा छंद ओंजळीत टाकला. लेखन! कितीतरीजणं रत्नागिरी टाईम्स, रत्नभूमी, आकाशवाणी मुळे लिहायला लागली असतील. मी देखील त्यातलीच एक.
>>
"सॅन्टारोझाला जायचं आहे". अमेरिकेत जायचं आहे हे ठाऊक होतं पण आता हे सॅन्टारोझा कुठे आलं? माझ्या प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याकडे पाहून नवरा म्हणाला.
"कॅलिफोर्निया."
विमानतळावर सोडायला आलेल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि इतकी वर्ष मनातच ठेवलेला प्रश्न आईला विचारला.
"आपण इतकं फिरलो, दरवेळेस बदली झाली की  निघताना आमचा रडण्याचा कार्यक्रम असायचा. तुला रडायला नाही आलं कधी?" आई हसली.
"नाही. आपल्याला जसे अनुभव येत जातात तसे आपणही घडत जातो ना?"
"म्हणजे?"
"अगं, देवरुखला शेजारच्या वहिनी रोज म्हणायच्या, पालघरला जायला निघाल ना त्या दिवशी जेवायला आमच्याकडे या.  आपला ट्रक आला एक दिवस आधी त्यामुळे मनात असूनही आधी सांगायला जमलं नाही त्यांना."
"पण आम्ही तर हॉटेलमध्ये जाऊन जेवलो होतो." मला ’विहार’ हॉटेल पुन्हा आठवलं.
"तेच. त्यामुळी डोकावल्याच नाहीत बाहेर. पाच सहा तास ट्रक होता दाराबाहेर तो पाहिला असणारच त्यांनी. चार वर्ष शेजारी होतो आपण.  माझं सोड पण तुम्ही तिघी लहान म्हणून तरी वरण भाताचा कुकर लावायचा.  नुसतं तोंडदेखलं म्हटलेलं होतं त्यांनी ते लक्षात आलं म्हणून तुम्हाला हॉटेल मध्ये जेवायला पाठवलं. पण माणसांची अशी खरी ओळख झाली की अंतरच पडतं आपसूक.  मन घट्ट होऊन जातं. गाव, घरही दुरावल्यासारखं वाटतं, तो बंध गळूनच पडतो." भरल्या डोळ्यांनी निरोप देत आई म्हणाली.

>>
"आर यू ऑलराईट?" वळणावळणाच्या रस्त्यावर पुढे अपघात झाला म्हणून थांबलेल्या गाडीवर पतिराजांनी आपलीही गाडी नेऊन आदळली होती. रस्त्यावरून जाणारे सदगृहस्थ त्यांची गाडी थांबवून आम्हाला विचारत होते. आम्ही नुसत्याच माना हलवल्या. गाडी बाजूला लावत ते गृहस्थ मदतीला आलेदेखील. मागे बसलेल्या आमच्या मुलाच्या रडण्याच्या आवाजाने रस्त्यापलीकडच्या घरात रहाणार्‍या आजीबाईही डोकावल्या. मुलाला खाऊ देऊ का  म्हणून त्यांनी आस्थेने चौकशी केली.
"तुमची गाडी चालणं शक्य नाही." डोळ्यासमोर काजवे चमकले. २५०० डॉलर्स घालून (कर्ज काढून) नुकतीच घेतलेली जुनी पुराणी गाडी दुरुस्त झाली नाही तर...? आमच्या विचारमग्न चेहर्‍यांकडे पाहत त्यांनी पुढचा प्रश्न टाकला.
"घरी कसे जाणार तुम्ही?"
 रात्रीचे नऊ वाजलेले. रस्त्यावर गुडुप अंधार. आम्ही एकमेकांकडे पाहिलं.
"मी सोडतो तुम्हाला. गाडी राहू दे इथेच." हे होतं अमेरिकन माणसातल्या माणुसकीचं दर्शन. तसं ते फार लवकर झालं. अमेरिकेत येऊन दोन महिने होत आहेत तोच. नकळत चित्रातल्या गावाइतकीच इथली माणसंही आपली वाटायला लागली.

गेल्या सतरा वर्षात इथेही आम्ही खूप फिरलो. आम्ही राहिलो ती सगळी गावं लहानशीच त्यामुळे गावाने, तिथल्या घरांनी पटकन आपलंसं केलं, इतकं की आपण मुळी दुसर्‍या गावात आहोत असं वाटूच नये. दुकानं, घर, सोयीसुविधा सगळं सारखं.  पण माणसं? आपल्याकडे दर दहा कोसावर भाषा बदलते तसंच इथेही. माणसाची वृत्ती, उच्चार बदलतात प्रत्येक ठिकाणी. गावाने, माणसांनी बरेवाईट अनुभव देत जिथे जातो तिथले होऊन राहायचं शहाणपण दिलं.

अमेरिकतेल्या माणसांमधला मला जाणवलेला एक गुण मात्र सगळ्यांमध्ये सारखाच आहे.  या लोकांचा, ’जे आहे ते आहे’ हा दृष्टिकोन. उगाच कोणतंही सोंग घेऊन ही माणसं जगत नाहीत.   मुलं, बायको, आई, वडील सावत्र असतील तर तशी निःसंकोच ओळख करून देतात, बोलताना, संदर्भ देताना असेच उल्लेख करत बोलतात. कार्यालयात महिना अखेरीला माझे सहकारी जेव्हा बाहेर खायला जाण्याचं आमंत्रण नाकारतात तेव्हा ’आय ॲम ब्रोक’ असं सांगण्यात त्यांना कुठे कमीपणा वाटत नाही.  लपवाछपवी नाहीच कशाची. आपण समाजनियमांच्या भ्रामक समजुतींनी किती, आत एक बाहेर वेगळं वागतो ते  इथल्या माणसांच्या सहवासात जितकं जास्त येत जाऊ तसतसं प्रकर्षाने जाणवतं.

"ती तुझ्यासोबतच आहे गं. हृदयात. आठवणींच्या रूपाने." जवळ घेऊन आई इतक्याच प्रेमाने समजूत घालणारी मेरी, माझी तेरा वर्षाची सख्खी शेजारीण. अचानक हासभास नसताना आई गेल्याचा फोन आला मायदेशातून तेव्हा नवर्‍याने मेरीला बोलावून घेतलं. मला मुलगी मानणारी, आमच्या घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवशी केक करून आणणारी, अडल्या नडल्याला कायम मदत करणारी. माझ्या आईला मी तिची ओळख माझी अमेरिकेतली आई अशीच करून दिली ती मेरी. मेरी सारखी माणसं  हळूहळू भेटत गेली आणि मायदेश सोडून आल्याची रुखरुख नक्कीच कमी झाली.

 माझं घर, माझं गाव म्हटलं की माझं असं एक गाव नाही असं म्हणत मी देवरुख, पालघर, कणकवली, रत्नागिरी... बद्दल ज्या उत्साहाने बोलायला लागते त्याच आपलेपणाने माझा देश म्हटलं की भारत आणि अमेरिकेबद्दलही...

9 comments:

 1. Farch Chaan writing ahe..! Chan athavahi hi..!
  Ekda vel nighun gelya ver tich ter ek rahun jate..!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद श्रीकांत. एकदा वेळ निघून गेल्यावर....अगदी खरं.

   Delete
 2. स्मरणचित्र छान झालंय - गावांच, गावांशी असलेल्या नात्याचं ..!

  ReplyDelete
  Replies
  1. वा, खूप दिवसांनी प्रतिसाद सविता. छान वाटलं:-)

   Delete
 3. khup chan mohana, tuzya lekhanat itki takat ahe ki sarva prasang dolyasamor ubhe rahatat, hats off to u

  ReplyDelete
  Replies
  1. अंजू,
   धन्यवाद. प्रसंग डोळ्यासमोर उभे करु शकले याचा आनंद वाटला.

   Delete
 4. Pratyek Mosamat Ek Gav Gheoon likhan keles tar Chhan Pustakach Hoeel.

  ReplyDelete
 5. sunder lekh
  gavache ani tithlya lokanche agdi jivant warnan
  lok dolyasamor agdi ubhe kele ahet
  shewat wachun parat ekda porka zalyachi janeev jagi zali

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद राजेश. ...पोरका झाल्याची जाणीव झाली... वाईट वाटलं वाचून. माझी आई गेल्यावर वडिलही (माझी ’आस’ कविता) अचानक वर्षभरात गेले. दोघांनीही अनपेक्षितपणे निरोप घेतल्याने ५ वर्ष झाली तरी अजूनही सत्य स्वीकारणं जमलेलं नाही. तुमच्या भावना समजू शकते.
   http://mohanaprabhudesai.blogspot.com/2012/03/blog-post_17.html

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.