Monday, December 2, 2013

कृतज्ञ

इराने धडधडत्या हृदयाने दार वाजवलं. करकर करत मोडकळीला आलेलं दार एकदम उघडलंच. दारावरची रंग
उडालेली चित्रविचित्र नक्षी पाहून आत जावं की नाही या विचारात ती तिथेच थबकली.
"कोण आहे?" क्षीण आवाज आला कुठूनतरी.
"इरा. कार्यालयाने पाठवलं आहे. समाजसेविका."
आतले आवाज एकदम बंद झाले. कुणीच बाहेर आलं नाही तसं तिने आत पाऊल टाकलं.
मोकळी खोली, भितींवर पडलेले कसले ना कसले डाग आणि दाटीवाटीने बसलेली सात आठ लहान मुलं, वातावरणात उदासीनता भरून राहिली होती.  एकमेकांना घट्ट बिलगून सगळीजणं तिच्याकडे भेदरलेल्या नजरेने पहात होती. इरा अस्वस्थ झाली.
"मोठं कुणी आहे का घरात?" कुणीच काही बोललं नाही. आतून रडण्याचा आवाज आला तशी ती घाईघाईने तिकडे वळली. समोर पडलेल्या कुसक्या, नासक्या भाज्यातून एक मुलगी कसले तरी चावत होती.
"अगं, काय खाते आहेस हे?"
मांडी घालून बसलेल्या त्या छोट्या मुलीने केस कराकरा खाजवत तिच्याकडे पाहिलं.
"दुसरं काही नाही का खायला?"
"नाही." ती मुलगी रडू आवरत म्हणाली. इराच्या कपड्यांकडे टक लावून पाहत राहिली. स्वत:च्या नीटनेटक्या कपड्यांची इराला एकदम लाज वाटली. तिने त्या चिमुरडीच्या केसावरून हात फिरवला. सुके, कोरडे, जटा झालेले केस. शुष्क.

आपण इथे कशाला आलो हेच इरा विसरली. भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पाहत राहिली. कुसक्या नासक्या भाज्यांशिवाय काही दिसत नव्हतं. भाजी बाजाराच्या कचर्‍यांतून उचलून आणलेल्या भाज्या असाव्यात. कधी एकदा इथून बाहेर पडतो असं होवून गेलं तिला. रस्त्यावर आल्यावर  तिने मोकळा श्वास घेतला. इराला आपल्या समाजसेवेच्या पदवीचा अमेरिकेसारख्या संपन्न देशात कधी उपयोग होईल अशी शंकाही आली नव्हती.  सहज म्हणून सरकारी कार्यालयात केलेला अर्ज आणि ताबडतोब मिळालेलं काम याने ती सुखावली. आज तिची ही पहिली भेट होती. या घरातला अल्पवयीन मुलगा फुटकळ चोरीच्या आरोपाखाली सुधारगृहात होता. तो परत घरी जायच्या आधी त्या कुटुंबात राहणीमानाच्या किमान सोयी आहेत की नाही हे पाहणं, मुलांना व्यवस्थित वागणूक मिळते आहे ना ते तपासणं हे काम होतं तिचं. पहिल्याच दिवशी निराशा आणि हतबलतेने घेरलं इराला.

नोकरीच्या सुरुवातीलाच इराने भविष्यकाळाचं रंगरूप ओळखलं. अशा प्रसंगांना सामोरं जायला, त्यातून मार्ग काढायला ती लवकरच शिकली. वर्षानुवर्ष, भलेबुरे अनुभव गाठीशी बांधत तिने सेवानिवृत्त झाल्यावरही आपलं काम चालूच ठेवलं. आजही घराजवळच्या संस्थेत तिला जायचं होतं. अनिकेतच्या खाण्याची तयारी करत तिच्या मनात तेच विचार घोळत होते.
"इरा, हजार डॉलर्सचा चेक लिहिशील आज वेळ मिळाला की?" अनिकेतने विचारलं.
"कुणाच्या नावे? आणि एकदम इतके?" इराने नवलाने विचारलं.
"भारतातल्या समाजसेवी संस्थेला पाठवायचे आहेत."
"एकदम  हजार डॉलर्स, भारतातल्या संस्थेसाठी?" इराच्या स्वराने अनिकेत आश्चर्याने इराकडे पाहत राहिला. त्याचा आवाज चढलाच.
"काय बोलते आहेस तू? आपल्या देशासाठी आपण नाही तर कुणी करायचं? आणि आपल्याला काय कमी आहे? मुलं आपल्या पायावर उभी आहेत. माझी वकिली चांगली चालू आहे, तू पण इतकी वर्ष नोकरी करत होतीस. मग आपल्या जन्मभूमीसाठी जे सहजासहजी शक्य आहे ते करायला नको?"
"हवं ना. इतका का चिडतोस? पण एकदम हजार डॉलर्स. हल्ली हल्ली फार वाटायला लागलं आहे की जेवढा जीव आपला भारतासाठी व्याकूळ होतो तितकाच अमेरिकेसाठी व्हायला हवा. आपल्याला इथे येऊन झाली तीसहून अधिक वर्ष. अमेरिका म्हणजे स्वप्नाची भूमी, स्वप्न साकार करायला येतात इथे सारे. पण त्याची दुसरी बाजू पाहते आहे ना मी गेली कित्येक वर्ष. गरिबी सगळीकडे सारखीच असते. त्याला तोंड देण्याचे मार्गही इथून तिथून तेच. घाणीत लोळत पडलेली मुलं, पाइपमध्ये राहणारी कुटुंब हे इथे पण आहेच ना, आता भारतातल्यासारखं रस्त्यावर, रेल्वेत भीक मागताना नाही दिसत कुणी तरी आहेच हे सगळं इथेही."
"हो, मग होईल तशी मदत इथेही करतोच की आपण. तू तर झोकून दिलं आहेस स्वत:ला." अनिकेतला इराच्या बोलण्याचा रोख अजूनही समजत नव्हता.
"कधी हजार डॉलर्सचा चेक फाडला आहेस इथल्या संस्थेसाठी?" इराने अनिकेतकडे रोखून पाहिलं. तोही तिच्याकडे पहात राहिला. बराचवेळ.
"हं...खरं आहे तू म्हणतेस ते. विचार सुद्धा आला नाही मनात कधी."
"हल्ली हल्ली तर हे फार जाणवतं रे मला.  भारत आपली जन्मभूमी म्हणून सतत आपण देणग्या देतो, गावच्या गाव दत्तक घेतो, मुलांच्या शाळेचे गणवेश देतो, तिथे जाऊनही काम करतो दरवर्षी. कर्मभूमीसाठी काय करतो आहोत? माझं म्हणशील तर नोकरीचाच भाग होता म्हणून करत होते. आता त्यानंतर आपल्यापरीने खारीचा वाटा उचलते आहे म्हणा. पण सर्वांनी एकत्र यायला हवं. इथल्या सेवाभावी संस्थांना पैशाची, काम करणार्‍या हातांची आवश्यकता आहे.  इतकी वर्ष हा विचारही डोकावला नाही मनात याचंच आश्चर्य आणि खेद वाटतो मला. मातृभूमी इतकंच ऋण कर्मभूमीचंही आहे ना. म्हणून तुझा  हजार डॉलर्सचा चेक खटकला मला. इथे देणगी आपण १०० डॉलर्सच्या वर दिल्याचं मला नाही आठवत.
अनिकेत विचारात बुडून गेला. इराचं म्हणणं पटत होतं. पण एकत्र येऊन मदत कशी करणार त्याबद्दल त्याला काही सुचत नव्हतं. तो काहीच बोलला नाही.
"बघ, विचार कर ना याबद्दल." त्याने मान डोलवली आणि तो विषय तिथेच थांबला. दिवसभर इराच्या मनात तेच घोळत राहिलं. तिच्या मैत्रिणी अशा उपक्रमात सहभागी झाल्या असत्या तिने सुचवलं असतं तर याची तिला खात्री होती, पण मोठ्या प्रमाणावर व्हायला हवं हे. संध्याकाळी अनिकेत आला की पुन्हा विषय काढायचा असं ठरवून ती कामाला लागली.

"तुझी इच्छा पुरी करता येईल तुलाच." इराने प्रश्नांकित चेहर्‍याने त्याच्याकडे पाहिलं.
"अगं, आपल्या सकाळच्या बोलण्यासंदर्भात म्हणतो आहे." जेवायला बसल्या बसल्या अनिकेतने विषय काढला.
"वा, मला तर वाटलं होतं घराबाहेर पाऊल टाकल्या टाकल्या तू विसरूनही गेला असशील." इरा हसली.
"नाही गं, विसरेन कसा. हे बघ, तुम्ही बायका भेटता ना महिन्यातून एकदा मग महिन्यातला आणखी एखादा दिवस राखून ठेवा ना अशा कामासाठी घर बांधण्यासाठी मदत, आधारगृहात सणांच्या दिवशी जेवण वाढण्यासाठी, सँडविचेस तयार करणं असं काही ना काही करता येईल. महाराष्ट्र मंडळाचा सहभाग असेल तर खूप काही साध्य होईल. मंडळातर्फे लोकांना मदतीसाठी आवाहन करता येईल. म्हणजे सणासुदीसाठी भेटतो वर्षातून चार वेळा, कार्यक्रम करतो उत्साहाने, तोच उत्साह इथे दाखवू,  या कामासाठी एकत्र येऊ अधूनमधून. मंडळाच्या कार्यकारिणीशी बोल तू. तुझ्या अनुभवांवर एखादा कार्यक्रमच ठेवायला सांग मंडळात. ते ऐकलं की खूप लोक सहभागी होतील."
"खरं आहे, बघू पाहते काही करता येईल का तू म्हणतोस ते."
"पाहू नकोस. पुढाकार घे. माझा सहभागही गृहीत धर."
"मस्तच की रे. तुझा सहभाग आहे म्हणतोस तर मी आजच हालचाल सुरू करते." इराच्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून अनिकेतच्या चेहर्‍यावरही मंद स्मित पसरलं.