Sunday, February 2, 2014

बोनसाय

"इथे मला काही संधी नाही. किती दिवस घरात बसू." स्वातीच्या आवाजातलं चिडचिडेपण, वैताग केदारला
समजत होता. पण त्यावर उपाय सुचत नव्हता.
"असं नको म्हणूस. काही ना काही मार्ग निघेल."
"कधी? गेले तीन चार वर्ष प्रयत्न करते आहे. काही झालं का? नोकरी नाही तर नाही, अनुभवासाठी नुसतेच कामासाठी तास द्यायचीही तयारी दाखवली. काय उपयोग झाला?"
"कितीतरीजणी क्षेत्र बदलतात आणि स्थिरावतात. तू हुशार आहेस. सहज जमेल तुला."
"मला नाही जमणार. आवडीचं काम सोडून नवीन कुठे काही शिकू आता. माझ्या कामाला भारतातच संधी आहे. सगळं सोडून कशाला आले तेच समजेनासं झालं आहे..."
केदार न बोलता तिथून उठला. स्वाती पुढे काय बोलणार हे ठाऊक होतं त्याला. त्याच्यासाठी ती तिची नोकरी सोडून आली होती. परदेशात जायची संधी मिळते आहे तर जाऊ काही वर्ष इतकाच विचार होता तेव्हा. पण केदारला आता परत जाण्यात रस उरला नव्हता. नोकरीसाठी केलेल्या स्वातीच्या आटोकाट प्रयत्नांना यश लाभत नव्हतं. आता इथल्या प्रवाहातलं शिक्षण घ्यायचं, नंतर नोकरीला लागायचं म्हणजे अजून चार पाच वर्ष. आयुष्यातली उमेदीची वर्ष फुकट घालवण्याची स्वातीची तयारी नव्हती आणि नवीन शिकण्याचा उत्साह संपला होता.

संध्याकाळी घरी आलं की घरात हसतं खेळतं वातावरण कसं ठेवायचं तेच केदारला समजत नव्हतं. मंदारशी खेळण्यात तो मन रमवायचा प्रयत्न करायचा, पण आल्याआल्या स्वातीची चिडचिड, नाखूष चेहरा, मंदारवरचा आरडाओरडा. घरी परतूच नये असं होऊन जायचं. मंदारच्या समोर आवाज चढू नये याची काळजी घेतली की विचित्र शांतता निर्माण व्हायची, बोलायला गेलं की संवादाचा सूर विसंवादावरच जाऊन थबकायचा. आपल्यापरीने दोघंही मंदारला आपण यात ओढत नाही या समाधानात असले तरी  सात वर्षाच्या मंदारवर आई, बाबांच्या मन:स्थितीचा प्रतिकूल परिणाम होत होताच, शब्दात ते मांडण्याइतका तो मोठा नसला तरी त्याच्या वागण्यात त्याचं प्रतिबिंब हळूहळू पडायला लागलं होतं.

वर्षभरातल्या वादविवादाचा अखेर स्वातीने केला.
"मी परत जाते भारतात. नाही जमलं तर येईन पुन्हा."
"तिथे जाऊन काय करणार? मंदारचं काय?"
"त्याचं काय? तो येईल माझ्याबरोबर."
"अगं पण..."
"मी नोकरी करत होते तिथेच पुन्हा करणार आहे. बोलले आहे मी त्या लोकांशी. मंदारचं इथलं शाळेचं वर्ष संपलं की हजर होईन.  दोन वर्षात अंदाज येईल ना आपल्याला. तोपर्यंत पक्कं ठरवू."
"काय ठरवायचं पक्कं?"
"तुला तिकडे नोकरी मिळते का, मंदार रमतो का भारतात ते पाहू आणि मग ठरवू मी परत यायचं की तू तिकडे यायचं."
केदार क्षणभर काहीच बोलला नाही.
"घराचं कर्ज आहे डोक्यावर ते लक्षात आहे ना? डॉलर्सच्या भरवशावर घेतलं आहे तिकडचं घर."
"तिकडे गेलं की आपण दोघंही कमावत असू. पगारही चांगले असतात आता."
"रहाणीमान बदललं आहे  ना पण. पगार तितकाच खर्च असं झालं आहे."
"एवढा मोठा निर्णय घेताना माझ्याशी चर्चा करुन घ्यावा असं वाटलं नाही तुला?"
"सारखा हाच विषय आणि वेगवेगळे पर्याय ठेवत असते मी सतत तुझ्यासमोर. पण तुलाही माहित आहे शेवट कसा होतो ते. हल्ली तर तू एका कानाने ऐकतोस आणि दुसर्‍या कानाने सोडून देतोस."
"खरं आहे. तेच तेच दळण दळतोय आपण. ठीक आहे होवू दे तुझ्या मनासारखं. कुणा एकाच्या तरी मनासारखं होतं आहे यात समाधान मानतो मी."
"काहीही बोलतो आहेस. तुझ्या मनासारखं व्हावं म्हणून मला असा निर्णय घ्यावा लागतो आहे."
"मी सुखासुखी इथे रहायचं ठरवलेलं नाही स्वाती."
"पुन्हा तेच. जावू दे. एखाद्याने आंधळ्याचं सोंग घ्यायचंच ठरवल्यावर मी तरी काय बोलणार?"
"स्वाती, आता राहू दे ना. खूप झालं.  मी आई, बाबांना कळवतो तू यायचा बेत करते आहेस म्हणून. त्यांच्याबरोबर राहिलीस की आधार असेल." केदारने  प्रयत्नपूर्वक बोलण्याचा सूर शांत ठेवला.
"त्यांना कशाला त्रास द्यायचा? मी स्वतंत्र रहाते."
"ऐकणार नाहीत आई, बाबा."
"बरं, चालेल मग. मंदारलाही आजी आजोबांचा सहवास मिळेल." स्वातीने फार ताणून धरलं नाही.

एका घराचे दोन ठिकाणी संसार मांडले गेले. केदारच्या आई बाबांनी सून, नातवंडावर मायेची पखरण केली. स्वाती पुन्हा पटकन नोकरीत रुळली. नवे बेत आखणं सुरू झालं. मनासारखं केल्याचं समाधान आता होतं पण मानसिक, भौतिक समाधान मिळालं तरी मंदारचं वागणं बदलत चाललं होतं. त्याच्या मनातली वडिलांच्या सहवासाची भूक वागण्यातून सतत डोकावत राही.
"बाबा कधी येणार? झाली ना दोन वर्ष? कधी होणार दोन वर्ष?" घरातला प्रत्येक संवाद त्याने त्याच्या काळजावर अप्रत्यक्षरीत्या  कोरला आहे हे त्याच्या प्रश्नावरून स्वातीला तीव्रतेने जाणवलं.
"खूप दिवस आहेत बेटा दोन वर्ष व्हायला. आता तर आलो आहोत आपण इथे. आता एका मुलाची मज्जाज मजा. नवीन मित्र मैत्रिणी मिळतील. आजी, आजोबांचा लाडोबा होशील." स्वातीचा खुललेला चेहरा पाहिला की तेवढ्यापुरता मंदार गप्प होई. पण शाळेत तो रमत नव्हता, शेजारच्या मुलांशी धड खेळत नव्हता.  घुमा, एकलकोंडा होत चालला होता. लहर आली की ’पण मला बाबाच पाहिजे’ असा त्याचा धोशा सुरू व्हायचा. त्याने असा हट्ट धरला की सगळं घर त्याच्या आजूबाजूला घोटाळत राही. चॉकलेट दे, पिझ्झा मागव, त्याच्या आवडीचे पदार्थ कर, फिरायला घेऊन जा, जेवायला बाहेर.  सुचेल त्या गोष्टी त्याच्यासाठी केल्या जात. कुठूनतरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न सुरू असे. मंदारला काही हवं असलं की ते सहजासहजी मिळवण्याचं ’मला बाबा पाहिजे, आताच्या आता’ हे शस्त्रच झालं. बाबाची ओढ आणि हट्टीपणा दोन्ही वाढलं. थोड्यादिवसांनी त्याच्या नेहमीच्या प्रश्नांमध्ये भर पडली.
"बाबा एकटा कसा राहतो? त्याला आपली आठवण नाही येत? तो काही नाही येत इकडे? आपण कधी जायचं त्याच्याकडे?" समजुतीने काही सांगितलं की स्काइप करू, फोनवर बोलू म्हणून मागे लागायचं. वेळेतल्या फरकाचं त्या चिमुकल्याला देणंघेणं नव्हतं. नाही म्हटलं की  भोकांड पसरायचं हे ठरलेलं.

त्या दिवशीही हे सगळं नेहमीच्या क्रमाने झालं आणि आतापर्यंत सगळं कमालीच्या शांतपणे घेणार्‍या स्वातीचा कडेलोट झाला. मंदारला ती  मारत सुटली.
"तुला जायचं आहे ना बाबाकडे. जा तू. जा... निघ आताच्या आता."
केदारचे बाबा मध्ये पडले, मंदारला जवळ घेत त्यांनी त्याची समजूत काढली. शेजारी खेळायला  पाठवून दिलं. स्वाती खाली मान घालून सोफ्यावर बसून राहिली. केदारच्या आईने येऊन डोक्यावर थोपटलं तसं मनात दाबून  ठेवलेली तिची अस्वस्थता बाहेर पडली. डोळे भरून आले.
"काही केलं तरी चुकतंच आहे माझं. वाटलं, माझ्या क्षेत्रात पाय रोवेन, अर्धवट सोडलेलं काम चालू राहील. पण ते करताना केदार तिकडे एकटाच राहतो याला जबाबदार मीच असं वाटत रहातं.  मंदार एकटा पडतो आहे. आई, बाबा दोघांच्याही सहवासाची त्याची आस मी आणि केदार मारून टाकतो आहोत ह्या जाणिवेने अपराधी वाटतं आहे. मी काय करायला हवं आहे तेच कळेनासं झालं आहे. आणि तरी वाटत रहातं की मी काही अशी एकटीच नाही. भारतात आल्यापासून पहाते आहे. सगळीजणं महत्वाकांक्षेने झपाटलेली आहेत.  चांगली संधी मिळाली की नोकरी बदलतात, बढती मिळावी म्हणून अहोरात्र कामात गुरफटलेली असतात. आणि बहुतेकांच्या घरातलं एक कुणी तरी कामानिमित्त सतत बाहेर असतंच. मग माझ्याच वाट्याला हे का?"
"हो, काळ बदलला आहे पण मुलांची आई, वडील दोघंही सतत आजूबाजूला असावेत ही आस, मानसिकता तशीच राहिली आहे नं? आणि सलग दोन वर्ष आई किंवा बाबा घरी नसणं असं फार क्वचित घडतं. पण तू काय, केदार काय दोघाचं आपापल्यापरीने योग्यंच आहे. मधल्यामध्ये मंदारची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. पण आता घेतला आहेस ना निर्णय तर निभवायला हवं. वर्ष तर आलं संपत. अजून एखादं वर्ष गेलं की ठरवा तू आणि केदार काय ते." केदारचे बाबा मृदू स्वरात म्हणाले.
केदारच्या आई शांतपणे म्हणाल्या.
"तुमचा पेच, मन:स्थिती पाहिली की वाटतं खूप गोष्टी आपण गृहीत धरतो. वेळ आली की पाहू म्हणून टाळतो.  त्याऐवजी स्वत:चे बेत, निर्णय लग्नाअगोदर बोलून पुढची वाट ठरवणं योग्यं. आधीच एकमेकांची ध्येय, महत्त्वाकांक्षा ठाऊक असेल तर असे पेच निर्माण होणार नाहीत, मुलांची फरफट टळेल. मला विचारशील तर ठरल्याप्रमाणे पार पाड सर्व. मंदारला त्रास होईल, पण सवयही होईल हळूहळू. संपर्कात राहण्याची आधुनिक साधनं आहेत त्याचा वापर करा वर्षभर. पण त्यानंतर जो काही निर्णय घ्याल त्यात तुम्ही तिघं एकत्र रहाल असं पाहा. दोघं दोन दिशांना कुणाच्याच दृष्टीने योग्यं नाही." स्वातीला आपलं मन जाणणारे सासू सासरे खूप जवळचे वाटले. तेवढ्यापुरतं मन शांत झालं.

पण तरीही स्वाती, केदारचं आयुष्य  दोलायमानच राहिलं. केदारला कर्ज फिटेपर्यंत भारतात परतण्याचा विचारही करणं मानवत नव्हतं, भारतात नोकरी मिळवताना तरुण मुलांशी स्पर्धेत उतरावं लागेल याची काळजी वाटत होती. कामाच्या पद्धतीतला फरक मानवेल की नाही ही शंका होती. स्वातीच्या दृष्टीने ही वरवरची कारणं होती.  तिच्या दृष्टिने केदारला भारतात परतण्यात रस उरला नव्हता हेच खरं.  नाहीतर केला निश्चय तर जमू शकतं सगळं यावर तिचा ठाम विश्वास होता. स्वातीला पाहिजे ते ती अमेरिकेत करू शकते, चिकाटी आणि वाट पाहायची तयारी तिने ठेवावी असं केदारला वाटत होतं. मंदारच्या वागण्याचा विचार करता परिस्थितीत बदल व्हायला पाहिजे हे दोघांनाही  कळत होतं पण वळत नव्हतं. दोघांच्या तिढ्यात वाढत्या वयाचा मंदार  भरडून निघत होता. त्याच्या निकोप वाढीचा मार्ग खुंटला होता. निखळ बालपण हरवलं होतं. हट्टीपणा, स्वार्थीपणा वाढत चालला होता, परिस्थितीचा फायदा  घ्यायला  तो चांगलाच शिकला होता.

मंदारचे आजी आजोबा, मुलगा आणि सुनेच्या ध्येयापायी, महत्त्वाकांक्षेपायी एका कोवळ्या जीवाचं निष्पाप भावविश्व  ढवळून निघालेलं पहात होते. मुलाचं भविष्य घडवलं आता नातवाचं काळवंडून तर जाणार नाही ना या चिंतेने त्यांची झोप उडाली. स्वाती, केदार आपापले दोर घट्ट पकडून मंदारसाठी त्याग कोणी करायच्या याच वादात अडकले होते. काही वर्ष इकडे, काही वर्ष तिकडे असं शिक्षण घेतलेल्या मुलांची कशी फरफट होते अशा निर्णयांनी, त्याची ऐकलेली अनेक उदाहरणं दोघं एकमेकांना सांगत होते, निदान मंदारसाठी एक काहीतरी ठाम ठरवायला हवं, निर्णय घ्यायला हवा हे बजावत होते.  त्याचवेळी वाढत्या वयाच्या  मंदारच्या हट्टी, हेकेखोर स्वभावाला आपण कारणीभूत आहोत या अपराधी भावनेने त्याला शांत करण्यासाठी भौतिक सुखांनी  न्हाऊ घालत होते.

आणि आई, बाबा, आजी, आजोबा इतकाच मंदारच्या मनाचा ताप वाढत होता, दरवेळी कोणती ’मागणी’ करायची आई, बाबांकडे या चितेंने त्याचीही झोप उडाली होती.

पूर्वप्रसिद्धी - बी. एम. एम. - बृहनमहाराष्ट्र वृत्त :
http://www.bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Feb2014.pdf