Monday, June 16, 2014

मला अजून जगायचं आहे...

पत्र....पत्रपेटीत चक्क भारतातून आलेलं पत्र! स्मिताला आश्चर्यच वाटलं. किती काळ उलटून गेला अशी पत्र

येऊन.  इ मेल, फोनचा काळ सुरु झाल्यापासून  जाहिराती, सवलती अशाच गोष्टीसाठी त्या पेटीचा उपयोग. घाईघाईने तिने पत्र कुणाकडून आलं आहे ते पाहिलं. मंजिरी सावंत. कोण ही मंजिरी? काही केल्या तिला नाव आणि चेहर्‍याची सांगड घालता येईना. स्मिताने घाईघाईने तिथेच पत्र उघडलं आणि उभ्या उभ्या वाचत राहिली.

प्रिय स्मिता,
प्रिय लिहितानाच हसायला आलं मला. किती खोटे, वरवरचे मायने वापरतो आपण. सवयीने लिहिलं जातं. जाऊ दे, हा विषय नाही माझ्या पत्रलेखनाचा. नवल वाटलं ना माझं पत्र पाहून? तुला मी आठवतदेखील नसेन. मलाही मी तुला पत्र लिहावं याचं खरंच आश्चर्य वाटतं आहे. आणि तेही इतक्या वर्षांचा कालावधी गेल्यावर. जेव्हा इथे होतीस तेव्हा तुझ्याशी फार बोललेले आठवतही नाही मला. माझ्या दादाची तू मैत्रीण. तास न तास वाद विवाद, चर्चा असलं काहीतरी चालू असायचं तुमचं. भाषणांची तयारी. सतत कोणत्या ना कोणत्या तरी स्पर्धेसाठी जायचा तुम्ही. त्यावेळी तुझे रोखठोक विचार तरीही संवेदनशील असलेलं मन मला तुझं बोलणं ऐकवत खिळवून ठेवायचं. मी नेहमीच श्रोत्याची भूमिका निभावली त्यामुळे अंधुकशी जरी तुला आठवले तरी खूप झालं आणि नाही आठवले तरी तसा आता काय फरक पडतो? दादालाही तू कुठे असतेस हे ठाऊक नाही. पण शोधून काढणार आहे तो तुला माझं पत्र पोचतं करण्यासाठी.

पण  मी तुला  हे पत्र का लिहिते आहे? कारण मी असेपर्यंत हे पत्र तुला मिळणार नाही. नंतरचं पहायला मी या जगात नसेनच.  मनातलं, अगदी आतलं कुणाशी तरी बोलावंस वाटतंय हल्ली. सगळे जीवलग आहेत आजूबाजूला पण तूच आलीस मनात. कदाचित तू आमच्या घराला माझ्या लहानपणापासून ओळखते आहेस पण तरीही आमच्याशी तसा तुझा काहीच संबंध नाही हे कारण असेल का? कुणास ठाऊक.

नमनालाच घडाभर तेल घालून आता विचारते, कशी आहेस? पत्रात औपचारिकपणे विचारतात तसंच होतं आहे हे. पण आता मला कोण कसं आहे याच्याशी काहीही देणंघेणं नाही. किती दिवस उरले आहेत माझे हे माहीत नाही. कदाचित काही दिवस, महिने...नक्की वेळ नाही ना सांगू शकत धन्वतंरीसुद्धा. त्यांनी आता माझं भवितव्यं परमेश्वराच्या हाती सोपवलं आहे.  आत्ताआत्तापर्यंत चालती फिरती होते. आता चाकाच्या खुर्चीत. हाडांच्या कॅन्सरने मला पोखरलं आहे,  शरीराने आणि मनाने. चाळीशी देखील ओलांडणार नाही गं मी जगाचा निरोप घेताना. आयुष्य किती सुंदर असतं हे आत्ता पटतं आहे. आला क्षण उपभोगा म्हणतानाच आपण किती पडझड करुन टाकतो त्या क्षणांची. आनंदाचे क्षण अळवाच्या पानावरच्या थेंबासारखे अलगद निसटून जाऊ देतो आणि वेदनेचे व्रण आपल्या बरोबर कायमचे वास्तव्याला आपणच आणतो.

मीच का? हा प्रश्न निरर्थक आहे हे कळलं तरी पडतोच गं आणि कुणाकडून तरी जीवन हुसकावून घेता येत असेल तर घ्यावं असंही वाटतं.  मरणाच्या दारात उभं राहिल्यावर ज्या कुणाला असं वाटत नाही ना ते स्वत:ची फसवणूक करत असावेत असं मला ठामपणे वाटतं.  मला नं आता सगळी भेटायला येतात. प्रत्येकाच्या डोळ्यात खोल खोल पहाण्याचा छंद जडला आहे सध्या. बिच्चारी, मुलगी किती लहान आहे, आई वडिलाचं काय होत असेल हेच वाचते मी प्रत्येकाच्या चेहर्‍यावर. काही ठरवून माझ्या आजाराबद्दल बोलत नाहीत पण त्यांना त्याचा किती त्रास होतो  ते दिसत रहातं मला. आणि काही काही जण कॅन्सरने मेलेल्या माणसांची यादीच ऐकवतात. ती ऐकवता ऐकवता काहीतरी चमत्कार होऊन मी जगेन असा दिलासा मला देतात. मी सगळं आता थोडेच दिवस तर सहन करायचं आहे, या वेदना आणि अशी माणसं असं स्वत:ला बजावत आली ’माणसं’ साजरी करते.

 मला माझ्या आजूबाजूला प्रसन्न वातावरण हवं आहे. फुलांचा सुवास हवा आहे, त्या सुंगधाप्रमाणे मन ताजंतवानं करणारं निखळ हसू हवं आहे.  खरं काय वाटतं आहे ते लपवून कुणीतरी मला हसवावं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन मीही खूप हसावं, खिदळावं अशी उत्कट इच्छा आहे.  गेली पाच वर्ष मी झगडते आहे या आजाराशी. दादा, आई, बाबा, नवरा सगळ्यांचा युद्ध पातळीवर शारीरिक, आर्थिक, मानसिक झगडा चालू आहे आणि सार्‍या वेदना सोसत आनंदीपणाचा मुखवटा पांघरण्याचा माझा. दिना तर म्हणतोच, बिनधास्त आहे माझी बहीण. मरणालाही घाबरत नाही. बघ, खर्‍या आयुष्यात माणसांना रोजच कसा अभिनय करावा लागतो. फसला ना दिना माझ्या अभिनयकौशल्याने, का तोही माझ्यासारखाच अभिनयसम्राट? माझं आक्रंदित मन कळूनही माझ्या अभिनयाला दाद देण्याच्या प्रयत्नात? नवर्‍याला माझ्या उपचारांचा खर्च परवडणारा नाहीच, पण भावांना, माझं गेल्या जन्मीचं देणं असल्यासारखं ओलीस धरलं आहे या कॅन्सरने. कुणी बोलून दाखवलं नाही तरी... फार ओशाळं व्हायला होतं गं.

आणि माझं पिल्लू, तिचा काय गं गुन्हा? का दैवाने आईचं छत्र काढून घेण्याचं तिच्या माथी रेखलं असावं? कधीतरी वाटतं, रोज कणाकणाने मरण्यापेक्षा पटकन मोकळं व्हावं आणि सोडवावं सगळ्यांनाच अंत माहिती असलेल्या धडपडीतून. पण जीव अडकतोय तो पिलासाठी.  सकाळी डोळे उघडते  ते माझ्या या पिलाला पाहण्यासाठी. अजून तीन चार वर्ष हवी होती गं, फक्त काही वर्षे. तितक्यात सोळा वर्षाचं होईल लेकरु.  पंखात बळ आलेलं असेल तिच्या. आता येऊन कुशीत झोपते ना तेव्हा झेपत नाही माझ्या ठिसूळ हाडांना तिच्या शरीराचा भार.  पण तिला अलगद लपेटून घ्यावं अंगाशी, हृदयात जपून ठेवावं कायमचं असं वाटत रहातं.  ह्या कॅन्सरने मलाच पोखरलं असतं तर माफ केलं असतं मी या आजाराला, पण त्याने माझ्या लेकीचा अल्लडपणा माझ्या देखत हिरावून घेतला आहे. डोळ्यातले अश्रू लपवीत आईला घट्ट धरुन ठेवायची माझ्या लेकीची केविलवाणी धडपड माझं काळीज चिरुन टाकते, रक्तबंबाळ होतं मन.  मग वेदना सोसायची ताकद माझी मीच नव्या दमाने जोखायला लागते. तिचं अकाली मोठं होणं, माझी आई बनणं, नाही गं पेलवत मला. कोणत्या पापाची शिक्षा भोगते आहे मी ही?

या रस्त्यावर मी एकटी आहे. तसं प्रत्येकालाच एकटं जायचं असतं. जीवन म्हणजे  अज्ञाताच्या दिशेने चालताना वाटेत लागणारा थांबा. त्या थांब्यावर काहीजणं खूप वेळ थांबतात, काही ना फार घाई असते पुढे निघून जायची. विसावा संपून माझा प्रवास कदाचित पूर्णत्वाच्या दिशेने असेल. त्यालाच मृत्यू म्हणायचं का? पण मग मी जाणार कुठे? काय होणार मृत्युनंतर? पुनर्जन्म? जन्माला आल्याआल्या आईचं बोटं धरलं होतं. आता ते सुटलं तर मी हरवेन अशी भिती वाटते आहे गं मला. आईचा हात घट्ट धरुन ठेवते तेव्हा ही भिती तिच्यापाशी व्यक्त करावीशी वाटते. पण मी काहीच बोलत नाही. नुसतं साठवून घेते तिला माझ्या नजरेत. माझ्या शेजारी उसनं अवसान आणून ती बसते तेव्हा तिला थोपटून धीर द्यावासा वाटतो, जशी माझी लेक माझी आई झाली आहे तसं मला तिची आई व्हावंसं वाटतं. पण तेवढं त्राणच नाही उरलं आता अंगात. निदान असे व्यथित करणारे प्रश्न तरी तिच्या पुढ्यात  मांडण्याचा करंटेपणा मला टाळायलाच हवा.

माझं हे आक्रोश करणारं मन जपून ठेव तुझ्याकडे. मला जगायचं आहे गं, खरंच नाही मरायचं मला इतक्या लवकर. मी काय करु? कुणाला सांगू हे? तू रडू नकोस गं. मला माहीत आहे तू रडते आहेस. खरंच रडू नकोस. तुझ्या हातात नाही गं काहीही. पण प्लीज, सांग ना गं त्या यमादूताला परत जायला. मला अजून जगायचं आहे, खरंच मला अजून जगायचं आहे...
                                                                                                                                   मंजिरी

अश्रूंच्या पडद्यामागे मंजिरी उभी होती. ठळकपणे. पण आता कधीच ती हाताशी लागणार नव्हती. स्मिताच्या डोळ्यातून ओघळणार्‍या अश्रूंना तिने मुक्तपणे वाहू दिलं. पत्राची घडी घालून जड पावलांनी ती घराच्या दिशेने वळली.7 comments:

 1. Liked it would be wrong word as no one should go through this but you have expressed it very well. Tears in my eyes.

  ReplyDelete
 2. Once again you made me speechless Mohana.

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Anagha for reading and commenting. Breast cancer took my best friend away and quite a while I was thinking about her, her emotions. Tyatun aali hi goshta cum lekh.

   Delete
  2. hya touch mulech hya vedana itakya kholvar pohachalya.

   Delete
 3. आक्रोश करणारं मन, रक्तबंबाळ झालेलं मन, किती किती प्रकारचे पापुद्रे उलगडले आहेत! मला कथा आवडली. वाचून केव्हा संपली हे कळलंच नाही.
  -रमेश झवर

  ReplyDelete
  Replies
  1. Tumchi pratikriya nehamich molachi aahe mazasathi. Thank you!

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.