Thursday, February 26, 2015

सावली

इरा आणि मीरा नावाच्या दोन बहिणी होत्या. कॅनडातल्या छोट्याशा गावात त्याचं घर होतं.  शाळेतून घरी आल्या की सारख्या व्ही. डी. ओ गेम्स खेळत असायच्या. वेळ उरला की बडबड करायच्या नाही तर मग भांडायच्या. आजही तसंच झालं. आई कंटाळून गेली. बाबाला म्हणाली,
"जरा ओरड की रे त्यांना." बाबाने आवाज चढवला,
"सारख्या नुसत्या बटणं दाबत असता. दोरीच्या उड्या मारा, पकडापकडी, लपाछपी असलं काही तरी खेळा."
"आणि किती बोलता गं दोघी. तोंड कसं दुखत नाही?" आईचा राग अजून तसाच होता.
"च्याव, च्याव, च्याव. च्यावऽऽ, च्यावऽऽ, च्यावऽऽ..." अमित दादा होताच तिथे.  इरा त्याला मारायलाच धावायची. मीरा तिच्या मागून. पुन्हा गोंधळ. हे अगदी रोजचंच झालं. रविवारी घर जरा शांत राहावं म्हणून आईने त्यांना मराठी शाळेत पाठवायचं ठरवलं,
"आम्हाला नाही जायचं मराठी शाळेत. अभ्यास करावा लागेल. " इथे मात्र दोघी एका सुरात म्हणाल्या.
"अगं एक दिवस जाऊन तर बघा. आवडली शाळा तर जा. पण आता नकार घंटा बंद करा. "
"बरं" दोघी पाय आपटत म्हणाल्या. बाबाने डोळे वटारले. दोघी तिथून धूम पळाल्या.

एक रविवार गेला, दुसरा रविवार गेला. हळूहळू दोघींना मराठी शाळा आवडायला लागली.  इराला फक्त आवडत नव्हतं ते मीराचं वागणं.
"काय झालं? काय करते मीरा? " आईने विचारलं.
"ताईगिरी करते. शाळेत जाताना तिचं बोट धरायला लावते. वर्गात पण माझ्या बाजूला बसते. मावशीने काही विचारलं की, उत्तर दे, उत्तर दे करुन मागे लागते. " इराने बोलता बोलता मीराच्या हातातलं पुस्तक ओढलं. मीराने इराचे हात ओढून पुस्तक काढून घेतलं. आई रागावलीच.
"गप्प बसा दोघी. किती आरडाओरडा चाललाय तुमचा. " आईच्या आवाजाला दोघी घाबरल्या. चेहरा रडवेला करुन तिच्याकडे पाहायला लागल्या. आईने समजावून सांगितलं.
"इरा, अगं मीरा सावलीसारखी असते तुझ्याबरोबर. "
"म्हणजे? "
"तुझी सावली कधी तुला सोडून जाते का? "
"नाही. "
"मग तसंच आहे. मीरा तुला सावलीसारखी सोबत करते. "
"पण नको असली तरी ही सावली का येते बरोबर?  मला नकोच ती सावली. " चिडून इरा खोलीत जाऊन झोपली. रात्रभर सावली नको म्हणून ती देवापाशी प्रार्थना करत राहिली.

"आज मी एकटीच जाणार आहे शाळेत.  मीरा नको बरोबर माझ्या. "
"अगं मीराला आज खूप अभ्यास आहे. ती नव्हतीच येणार आज मराठी शाळेत. " इराने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. कालचा राग अजून गेला नव्हता. आईने परवानगी दिली तशी टम्म फुगलेले गाल अजून फुगवत इरा मराठी शाळेत जायला निघाली, एकटीच. घरातून ती बाहेर पडली. रस्त्यावर आली. आणि आश्चर्याने थांबलीच. आज तिची सावली रस्त्यावर नव्हतीच.  इराला  खूप आनंद झाला. उंच उडीच मारली तिने रस्त्यावर. तिने रस्त्यावरच्या मुलांकडे पाहिलं.  बाकीच्या मुलांची सावली त्यांच्याबरोबरच होती. म्हणजे देवाने तिची प्रार्थना ऐकली होती तर. ती खूश झाली. आनंदाने इराचा चेहरा खुललाच. तीन चार पावलं ती चालली आणि  सावली कधीच परत आली नाही तर? असा विचार इराच्या मनात आला. तिला एकदम रडायलाच यायला लागलं. डोळ्यातलं पाणी बाहेर यायच्या आधीच  शाळा आली. इरा गुपचुप वर्गात जाऊन बसली. मावशीने काहीतरी विचारलं तसं सवयीने इराने बाजूला पाहिलं. मावशी हसली, म्हणाली,
"अगं, विसरलीस? मीरा आज आलेली नाही. "  मीराला आता मात्र रडू आवरेचना. तिला आताच्या आता इरा पाहिजे होती. इरा लागली जोरजोरात रडायला आणि ओरडायला,
"देवा, माझी सावली मला परत दे. मीरा माझी सावली आहे असं आई म्हणते. मला माझी  सावली पाहिजे. आताच्या आता. रस्त्यावरची आणि घरातली. दे ना रे बाप्पा माझी सावली परत. "

"इरा, ऊठ ऊठ. काय झालं? मीरा इराला हलवून हलवून जागं करत होती. इरा गडबडून उठली. डोळे चोळत ती सगळ्यांकडे पाहायला लागली. आई, बाबा, दादा सगळेच तिच्या आजूबाजूला उभे होते. इराने पुन्हा डोळे चोळले आणि ती सगळ्यांकडे बघायला लागली.
"आई, मला माझी सावली पाहिजे. आता मी कधीच म्हणणार नाही मला सावली नको म्हणून. मला पाहिजे माझी सावली. " डोळे पुसत इराने आईला मिठी मारली. इराने स्वप्नात काय पाहिलं ते कुणालाच माहीत नव्हतं. पण ते उद्या विचारता आलं असतं.  सगळे इराच्या बाजूला बसले. इराची आई  तिला थोपटीत राहिली. आणि  इरा पुन्हा शांत झोपून गेली.


’बालकथा’ - या अंतर्गत मी लहान मुलांसाठी लिहिलेल्या या कथा असतील. परदेशात (कदाचित आता भारतातही) मुलांना  गोष्टी  सांगायच्या म्हटल्या तरी खूपशा त्यांनी इंग्रजीतून वाचलेल्या/पाहिलेल्या (पंचतंत्र, रामायण...) असतात त्यामुळे त्यांना त्या मराठीतून ऐकण्यात रस नसतो. आणि पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवताना त्यातले शब्द, वाक्य, वातावरण हे सारंच त्यांना फार नवीन असतं. 
मुलांची कल्पनाशक्ती, नावीन्यांचा ध्यास आणि त्यांच्या हाती येणारी इतर साधनं पाहता त्यांना मराठी गोष्टी ऐकण्यात गुंग करणं ही परीक्षा असते. त्यामुळे आपण नेहमी वापरतो ते शब्द, छोटी वाक्य यांचा वापर करुन सध्या  छोट्या छोट्या  कथा लिहिते आहे.  तुमच्या सूचनांचं स्वागत आहे.

1 comment:

  1. सावली हरवली. किती छान कल्पना. मस्त जमली आहे कथा.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.