Thursday, June 30, 2011

उमेद हरवलेली मुलं.....

साहिलच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या आईला गलबलून आलं. पुन्हा तेच. काय केलं की हे थांबेल हेच समजत नव्हतं.   गेला महिनाभर सातवीतला साहिल शाळेतून  आला की त्याचा अस्वस्थणा, चिडचिड, आदळआपट यातून त्याला बाहेर कसं काढायचं ते  पालकांना उमजत नव्हतं. आजूबाजूला घडणाऱ्या, वर्तमानपत्र, दूरदर्शनावर पाहिल्या जाणाऱ्या आणि भारतीयांच्या बाबतीत असं काही घडत नाही असा समज असणाऱ्या या गोष्टी आता त्यांच्याही घरात  शिरल्या होत्या.   मुल चिडवतात, गे, फॅगेट, स्टुपिड इंडियन, गो बॅक टू इराक,   गळा आवळू आम्ही तुझा, लांब राहा आमच्यापासून, विचित्रच आहेस असं एक कुणीतरी म्हणतं आणि बाकीचे त्याला साथ देतात. हळूहळू तो एक समुदाय बनतो आणि साहिल एकटा पडत जातो.  
साहिलला शाळेत जावंसच वाटेना. सकाळ झाली की पोट दुखणं, उलटीची भावना काही ना काही कारणं काढून शाळा नको हेच टुमणं.   सुरुवातीला दुर्लक्ष कर, त्यांच्या भानगडीत पडू असंच म्हटलं पालकांनी.   पण ह्या प्रकाराने कळस गाठल्यावर त्याच्या आईने  शिक्षकांना पत्र लिहिलं, ते त्यांनी मुख्याध्यापकांना दाखवलं.   चिडवणाऱ्या  मुलांना मुख्याध्यापकांनी बोलावून समज दिली असावी कारण  हळूहळू हा प्रकार कमी झाला.   त्यातल्या एका मुलाने तू चुगली का केलीस असं  दरडावून विचारलं साहिलला, त्यावरून त्या मुलांना शाळेकडून समज मिळाली असावी असा पालकांचा अंदाज. साहिलचे पालक सुटकेचा श्चास सोडतायत तोच एका मुलाने मी तुला मारून टाकेन असं फेसबुकवर लिहिलं, साहिलनेही त्याला उत्तर म्हणून तसंच काहीतरी लिहिलं. प्रकरण दोघा मुलांच्या पालकांपर्यंत पोचलं. साहिलच्या पालकांनी त्याला फेसबुकवर जायलाच बंदी घातली.   आता सारं मार्गाला लागलं आहे असं साहिलच्या पालकांना वाटतं.
अशीच आणखी एक घटना. इथेच जन्म झालेली सानिका. तिचं पाचवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि पालकांनी भारतात परतायचा निर्णय घेतला. काही कारणाने तीन वर्षांनी ते परत आले तेव्हा सानिकासाठी सारंच बदललं. मुख्य म्हणजे बोलण्याची पद्धत (अॅक्सेंट). तिच्या उच्चारांची टिंगल होई.   आधीच्या मैत्रिणीचं वर्तुळ बदललेलं,   वर्गातल्या मुलींचे गप्पाचे विषय तिला बाजूला पाडत.   नववीतली सानिका एकटेपणाला तोंड देत प्राप्त परिस्थितीशी जुळतं घ्यायला शिकते आहे.   तिच्या भावाला शाळेच्या बसमध्ये मेक्सिकन मुलं त्रास देत जसं साहिलला चिडवलं जाई  तसाच काहीसा  प्रकार. त्याबद्दल त्यांनाही शाळेकडे तक्रार करावी लागली.
सुदैवाने यातून या दोन्ही मुलांसाठी मार्ग काढता आले. पण कुठल्या तरी कमकुवत क्षणाला ज्या मुलांना आयुष्यं अर्ध्यावर संपवणं हाच मार्ग सुचला अशा घटना कितीतरी.   वेदनेला संपवून टाकण्याचा अखेरचा मार्ग. गेलेला जीव सुटतो, मागे राहिलेल्यांसाठी उरते ती अश्वत्थाम्याची वेदना आणि अनुत्तरित प्रश्नाची सोबत. अशाही परिस्थितीत काहीवेळेला आत्महत्या केलेल्या मुलांचे पालक विलक्षण,   अनाकलनीय वाटणारी पाऊल उचलतात, स्वत:ला सावरत पोटच्या मुलांच्या आत्महत्येला कारणीभूत झालेल्या मुलांनाही क्षमा करतात.   त्यातल्याच ह्या काही जीवनकथा....
धाय मोकलून तिने रायनच्या बाबांना मिठी मारली. पण तिला जवळ घ्यायला त्यांचे हात पुढे होईनात. चीड, दु:ख, पराभव अशा भावनांचा कल्लोळ मनात उडालेला. सातवीतल्या त्या मुलीचा शोक खोटा नाही हे पटत होतं पण समजून घेणं जड जात होतं. त्यांच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या त्या मुलीच्या थाडथाड थोबाडीत द्याव्यात ही आंतरिक ऊर्मी त्यांनी कशीबशी आवरली. आपल्या भावनांवर काबू मिळवत त्यांनी तिला हळुवारपणे थोपटलं. तिला भेटण्याचा निर्णय चुकीचा नव्हता या समाधानाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. मनातून त्यांना खात्री होती की असा काही परिणाम होईल याची तिला कल्पना असती तर तिने हे केलंच नसतं. ते तिला समजावं म्हणूनच ही भेट होती.   तिने हेतुपुरस्सर हे केलं नाही याची त्यांना खात्री आहे, हे त्यांनी त्या मुलीला समजावून सांगितलं. हुंदक्यांनी गदगदणाऱ्या मिठीतून तिचं दु:ख आणि पश्चात्ताप त्यांना कळत होता. कळत नव्हतं ते हेच की या एवढय़ाशा लहान जिवांमध्ये कुठून येत असावा हा क्रूरपणा? आणि का? का वागतात ही मुलं अशी? आज त्यांना दोन गड सर करायचे होते. आणखी एका मुलाला भेटायचं होतं. रायनच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दुसऱ्या मुलाला. अपेक्षेप्रमाणे त्या मुलाचे ओठ घट्ट मिटलेलेच राहिले सुरुवातीला. अगदी निगरगट्टपणाचा कळस वाटावा इतका तो मुलगा गप्प आणि शांत. पण शेवटी रायनचं दु:ख, वेदना त्या मुलापर्यंत पोहोचवणं त्यांना जमलं. त्याने रायनच्या बाबांची क्षमा मागितली ती मनापासून.
रायनच्या आत्महत्येची घटना प्रत्येक पालकाच्या उरात धडकी भरविणारी आहे. पाचवीतला रायन एक दिवस शाळेतून घरी आला तो रडतच. शाळेत चिडवतात म्हणून तो रडतोय हे समजल्यावर कोणतेही पालक करतील तेच रायनच्या आई-बाबांनी केलं. त्याला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. बाबांनी समजावून सांगताना म्हटलं, ‘नुसते शब्दच तर आहेत. मनावर नाही घ्यायच्या अशा गोष्टी. ’ रायनने तेच केलं पण चिडवण्याचे हे प्रकार चालूच राहिले. पूर्वीसारखी तीव्रता त्यात राहिली नसावी असं काही कालावधीने घरी वाटायला लागलं; कारण रायन या बाबत घरी फारसा बोलेनासा झाला. तो सातवीत गेल्यावर तर आश्चर्याची गोष्ट घडली. त्या चिडवणाऱ्या मुलांपैकीच एकाशी चांगली मैत्री झाल्याचं रायनने आनंदाने सांगितलं.   हे समाधान फार काळ टिकलं नाही. त्या मित्राने रायन ‘गे’ आहे अशा अफवा ऑनलाइन पसरवल्या. थट्टेच्या जीवघेण्या या प्रकारात खूप मुलं सामील झाली. रायनला कितीतरी अश्लील ई मेल यायला लागली. पण आता रायनने हे घरी सांगणंही थांबवलं होतं. दरम्यान ऑनलाइन चॅटमध्ये त्याची शाळेतल्याच एका मुलीशीही दोस्ती झाली. अस्वस्थ रायनला तिच्याशी ऑनलाइन गप्पा मारणं हाच एक विरंगुळा वाटायला लागला. चिडवणं, अश्लील पत्र यांचा विसर पाडणाऱ्या गप्पा. पण रायनचं हे समाधानही फसवं निघालं.   त्या मुलीने रायनची केलेली फजिती अंगावर शहारा आणते.
त्या दिवशी अतिशय उत्साहाने रायन शाळेत गेला. त्या मुलीशी ऑनलाइन गप्पा झाल्या की त्याला खूप मोकळं झाल्यासारखं वाटायचं. दु:खावर हळुवार मलमपट्टी केल्यासारखे तिचे ते शब्द. हसऱ्या चेहऱ्याने तो तिला भेटायला गेला. मैत्रिणीच्या घोळक्यात उभ्या असलेल्या तिने मात्र त्याला तोंडघशी पाडलं.   तिला त्याच्याशी मैत्री करण्यात काडीचाही रस नाही हे सांगून ती थांबली नाही, त्याच्याबरोबर ऑनलाईन केलेल्या गप्पा म्हणजे ठरवून केलेली  मजा होती हे सांगून  ती खो खो हसायला लागली. तिच्या मैत्रिणी तिला साथ द्यायला विसरल्या नाहीत. त्या हसण्याने, त्यांच्या खिदळण्याने रायन शरमेने चूर झाला. घरी आल्यानंतर ऑनलाइन चॅटमध्ये त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या.
‘या मुलीमुळेच आत्महत्येचे विचार माझ्या मनात डोकावायला सुरुवात झाली आहे. ’ त्याच दिवशी त्याने गळफास लावून आपलं जीवन संपविलं. रायनच्या आत्महत्येनंतर त्याच्या आई-वडिलांना त्याची निराशा, वैफल्य या गोष्टी किती टोकाला गेल्या होत्या ते त्याच्या ऑनलाइन अकाउंटमुळे समजल्या. ही घटना आहे २००३ सालातील. आता तर सायबरबुलींगने कळस गाठला आहे. रायनचे बाबा मन मोठं करून सांगतात, ‘शेवटी आपण हे विसरून चालणार नाही की या मुलांची वयं कोवळी आहेत. त्यांच्या कृतीने काय होईल याची त्यांना पूर्वकल्पना असेल तर ही मुलं नक्की असं काही करणार नाहीत. मी माझ्या मुलाच्या मृत्यूला यातल्या कुठल्याही मुलाला जबाबदार धरत नाही. वैफल्यग्रस्तता हेच कारण मी मानतो. चिडवण्यातून आलेलं वैफल्य. खेद याचाच वाटतो की, ते समजून घ्यायला पालक म्हणून आम्ही असमर्थ ठरलो.   पण अशी कितीतरी मुलं आहेत की त्यांना समजून घ्यायला हवं. ’
 चेझला आत्महत्या हा पर्याय पटत नाही. तेरा वर्षांचा हा मुलगाही भेदरलेला, चेहरा बावचळल्यासारखा. पटकन कुणी बावळट असा शिक्का मारून मोकळं होईल असा. प्रसारमाध्यमांसमोर त्याला कसं चिडवतात हे सांगणं म्हणजे त्याने केलेलं मोठं धाडसच. चिडवण्याचा प्रकार तोच ‘गे’, ‘बावळट (लुझर)’ अशा हाका मारणं. आठवडय़ातून एकदा तरी असा प्रकार टोकाला पोचतो आणि त्याच्या आईला शाळेत जावं लागतं. यापुढे मी हे सहन करू शकत नाही हे त्याचं बोलणं त्याच्या आईच्या मनात अनामिक भीती निर्माण करतं. चेझ मात्र म्हणतो की आत्महत्येचा विचार मनात आला तरी त्यातून निष्पन्न काय होणार हा ही विचार डोकावतो. मी माझा जीव गमावून बसेनच पण माझे आई वडील, शाळा आणि मला चिडवणारी ती मुलं सर्वांनाच त्याचा त्रास होईल याची जाणीव होते आणि मी स्वत:ला थांबवतो, अशा कार्यक्रमातून आपलं दु:ख व्यक्त करण्याचं स्पष्टीकरण चेझ देतो.
‘माझी अपेक्षा एवढीच आहे की, मला चिडवणाऱ्या मुलांनी हा कार्यक्रम बघितला तर कदाचित माझ्यावर होणारे परिणाम त्यांना जाणवतील. त्यांचं चिडवणं बंद होईल. माझ्यासारख्या अनेक मुलांची वेदना सर्वांना समजावी म्हणूनच मी हे सगळं जाहीरपणे सांगतोय. ’
पण खरंच समजेल हे त्या मुलांना? मानसोपचारतज्ज्ञांच्या मते जी मुलं चिडवतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं कठीण आहे. कारण त्यांची मानसिकताच हे समजून घ्यायची नसते. कदाचित चेझचा त्रास आणखी वाढेल. चेझच्या हातात आहे ते दुर्लक्ष न करता ठामपणे त्या मुलांच्या चिडवण्याला प्रतिकार करणं, त्यांना थांबवणं. ते तो शिकतोय.
चेझला आत्महत्या हा पर्याय नाही, असं वाटलं तरी जहीमने नेमकं तेच केलं. अकरा वर्षाच्या जहीमला नवीन गावात आल्यावर मुलांनी सामावून तर घेतलं नाहीच. पण तू किळसवाणा आहेस, गे आहेस याचाच भडिमार केला. सुरुवातीला जहीम अतीव दु:खाने त्याला होणारा त्रास घरी सांगत असे. पण हळूहळू हे रोजचंच झालं आणि तो काही सांगेनासा झाला, त्या विषयावर विशेष बोलेनासाच झाला त्यामुळे आता तो रमला असावा असंच घरातल्यांना वाटलं. त्या दिवशीही तो घरी आला ते प्रगतिपुस्तक नाचवीत. त्याच्या आईने त्याचे गुण बघून कौतुकाने शाबासकी दिली. तोही खूश झाला. तेवढय़ात त्याच शाळेत जाणाऱ्या त्याच्या लहान बहिणीने काही मुलं त्याला ‘गे’ म्हणून चिडवीत होती त्याचा उल्लेख केला आणि जहीम अस्वस्थ झाला. आईने त्याला समजूत घालून खोलीत पाठवून दिलं. थोडा वेळ तो खोलीत खेळला की सर्व सुरळीत होत असे. काही वेळाने त्याच्याशी बोलण्यासाठी ती खोलीत गेली. समोरच्या दृश्याने तिला काय करावं तेही सुचेनासं झालं. पुढच्या गोष्टी तिने कशा पार पाडल्या त्या तिलाही आठवत नाहीत.
"दार उघडलं तर समोर होतं गळफास लावून घेतलेलं माझं बाळ. " तिचं बाळ म्हणणं, त्याच्याबद्दल बोलताना तो अजूनही या जगात आहे, अशा पद्धतीनेच त्याचा उल्लेख करणं अंगावर काटा आणतं. भूतकाळात डोकावताना जहीमच्या आईला त्याची वैफल्यग्रस्त अवस्था लक्षात येते. शाळेत जायचं नाही, केस विंचरायचे नाहीत किंवा दातच घासायचे नाहीत, असं तो अचानक कधी कधी करायचा. जहीम असा विचित्र वागला की, त्याला बरं वाटत नसावं, असंच तिला वाटायचं. त्याला चिडवायचे ते घरात तो सांगायचाच. नंतर तो त्यावर बोलायचा नाही पण त्यामुळेच तसं काही आता घडत नसावं किंवा तो दुर्लक्ष करायला शिकला असावा, असंच तिला वाटत आलं. कदाचित यामुळेच तो ही पायरी गाठेल हे समजलं नसावं.
तज्ज्ञांच्या मते फार लहान वयात मुलांना जाहिराती, टीव्ही, चित्रपट अशा माध्यमांतून सेक्स, गे, लेसबियन असे निरनिराळे शब्द समजतात. बऱ्याचदा अर्थ न समजताही त्याचा वापर केला जातो. बहुतेक वेळा ‘पॉप्युलर’  मुलं चिडवण्यात आघाडीवर असतात आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या गटात घ्यावं म्हणून बाकीची मुलं त्यांना साथ देतात, अशा मुलांनी एखाद्याला चिडवायला सुरुवात केला की, बाकीची मुलं त्यात सामील होतात आणि जे मूल या क्रूर थट्टेला बळी पडतं ते अधिकच एकाकी बनतं.
१० वर्षाचं कोवळं वय. अभ्यास, खेळ, मित्र-मैत्रिणी यात रमणारं. पण हसतमुख कार्लला हा आनंद उपभोगता आला नाही. शाळेत गेलं की मुलं चिडवत. ‘गे’ या शब्दाचा धड अर्थही ना त्या चेष्टा करणाऱ्या मुलांना समजत होता, ना कार्लला. पण कुणी तरी असं म्हणालं की, बाकी सारे हसायला लागायचे. कार्लला त्यांच्या त्या हसण्याने रडायलाच यायचं. हे रोजचंच झालं. तसं त्याच्या आईने त्याला वर्गशिक्षिकेशी बोलायला भाग पाडलं. थोडे दिवस बरे गेले पण हळूहळू कार्ल कॅफेटेरियात जेवणाचा डबा खायलाही जायला धजावेना. शेवटचा उपाय म्हणून त्याची आई अधुनमधुन त्याच्याबरोबर शाळेत जायला लागली. त्याच्याबरोबर गप्पा मारत डबा खायला तिलाही आवडत होतं. त्याच्या मनावरचं मळभ तेवढय़ापुरतं दूर झालेलं बघणं यातच ती समाधान मानून घेत होती.
त्या दिवशी कार्ल घरी आला तो अस्वस्थ, घाबरलेला, थोडासा चिडूनदेखील. त्याचं दप्तर चुकून शाळेतल्या टीव्ही स्टँडवर आपटलं. हललेल्या स्टँडचा धक्का एका मुलीला बसला. त्या मुलीने कार्लला जीवे मारण्याची धमकी दिली. आधीच इतर मुलं चिडवत होती. त्यात ही भर. कार्ल घरी आला तो दोन दिवस शाळेत न येण्याची शिक्षा (सस्पेंड) होईल या भीतीनेच. त्याच्या आईने त्याची समजूत घातली तसा तो खोलीत निघून गेला. कार्लच्या बाबतीत पुढे काय करता येईल या विचारात त्याची आई कामाला लागली. तासाभराने ती कार्लला जेवायला बोलावायला गेली. उद्या तीदेखील त्याच्याबरोबर शाळेत येईल हेही सांगायचं होतंच. कार्लसाठीच ती पालक-शिक्षक संघटनेची सभासद झाली होती. ती त्याला तिच्याबरोबर त्यांच्या मीटिंगला नेणार होती. त्यानंतर मुख्याध्यापकांशी बोलायचंही तिने ठरवलं होतं. त्याच्या खोलीचं लोटलेलं दार तिने अलगद उघडलं आणि तिचं उभं अंग थरथरायला लागलं. समोर होता वायरने गळफास लावलेला लोंबकळणाऱ्या स्थितीतला कार्ल. तिच्या जीवघेण्या किंचाळीने तिची पुतणी, मुलगी धावत आल्या. पुतणीने ९११ नंबर (तातडीच्या मदतीसाठी) फिरवला. मुलीने कात्रीने वायर कापली, पण तोपर्यंत सगळंच संपलं होतं.
"जे जे मला सुचलं ते ते मी कार्लसाठी करत होते. याव्यतिरिक्त आणखी मी काय करायला हवं होतं? हा प्रश्न मला अद्याप सोडविता आलेला नाही. " आतल्या आत ती हुंदका जिरवते. त्याने आत्महत्या ठरवून केली असावी असं तिला वाटत नाही, पण ‘गे’, ‘बायल्या’ असं सातत्याने चिडवणारी मुलं हेच त्याच्या आत्महत्येचं कारण आहे यावर तिचा ठाम विश्वास आहे. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याचं अतिशय आवडतं खेळणं त्याने बहिणीला घ्यायला सांगितलं आहे. त्याने आपल्या लहान भावाला सांगितलं आहे की, माझ्यासारखा त्रास तुला होऊ नये म्हणून मी तुला शाळेत जपायचा प्रयत्न करत होतो. गळफास लावून घेत असल्याबद्दल क्षमेची याचनाही त्याने केली.
कुठून सुचतं हे या भाबडय़ा लहान जिवांना? आणि कसं समजतं इतक्या लहान वयात स्वत:चा जीव कसा घ्यायचा ते? या आत्महत्या आणि त्याची कारणं ऐकताना जीव भरून येतो. त्यांच्या आई- वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकतो. आत्महत्येचं टोक गाठणाऱ्या मुलांची वयं आणि ज्यांच्यामुळे ही मुलं हे टोक गाठतात त्या मुलांचा निष्ठुर क्रूरपणा पाहून हताश व्हायला होतं. या पिढीचीच काळजी वाटायला लागते. आपण या काळात जन्माला आलो नाही याचा आनंद मानायचा की आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करायची हे कोडं सोडविता येणं मुश्कील होऊन जातं.
हॅमिल्टन हायस्कूल! चार विद्यार्थ्यांनी एकामागोमाग एक चार महिन्यांच्या कालावधीत गळफास लावून आत्महत्या केलेली शाळा. माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘नो चाइल्ड लेफ्ट बिहाईंड’ कायद्यावर सही केली त्याच शाळेत घडलेल्या या प्रकाराबद्दल मुख्याध्यापकांना या मुलांच्या आत्महत्येला शाळा जबाबदार आहे असं वाटत नाही कारण  शाळा शैक्षणिक प्रगती आणि मुलांची हजेरी यावर भर देतात. मुलांच्या भावनिक समस्या समजल्या नाहीत तर दूर कशा करणार? त्याची लक्षणं दाखविणारी काही तरी यंत्रणा हवी. बहुतांशी पालक नोकऱ्या करणारे असतात. संध्याकाळी दमून भागून परत आलेले पालक मनात असलं तरी मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, त्याचं मन जाणू शकत नाहीत हे कटू सत्य आहे. मुलाचं मन समजून घेणं ठरवलं तर शिक्षकांनाच सहज शक्य आहे असं सांगणाऱ्या मुख्याध्यापकाने, चार तरुण गमावलेल्या या शाळेने मुलांच्या मनाचा तळ गाठायचा हे ध्येय ठेवलं आणि त्या दिशेने पावलं उचलली, एक नवीन प्रवास सुरू झाला. त्यातलं पहिलं पाऊल होतं मुलांच्या भावना जाणून घेणं. एक दिवस शाळेने सर्व विषयांच्या वर्गांना सुट्टी दिली ती मुलं भावनिकदृष्टय़ा किती सबळ आहेत याची शहानिशा करायलाच. शाळेत बरेच खेळ खेळले गेले. मुलांनी एकमेकांशी जमवून घ्यावं, समजून घ्यावं एवढीच अपेक्षा.
 त्यातलाच एक खेळ- ‘तुम्हाला माझी खरी ओळख असेल तर.. ’
"... तर तुम्हाला कळेल की मी फार लहान असतानाच आईपासून माझी फारकत झाली आहे. "
"... तर तुम्हाला कळेल की माझे वडील रोज दारू पिऊन घरी येतात. वडील म्हणजे काय हे मला कधी समजलंच नाही. "
"... तर तुम्हाला कळेल की माझे आई-बाबा त्यांच्या करिअरमध्ये गुंतलेले आहेत की, त्यांना आम्हा भावंडांसाठी वेळच नाही. मला फार एकटं वाटतं. कुणाशी तरी हे सगळं बोलावंसं वाटतं.. "
मुलं फार सहज मोकळी होत जातात. हातात हात, गळ्यात गळे घालून पटकन एकमेकांना समजून घेतात. हॅमिल्टन शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या खोलीच्या बाहेर निळ्या रंगाने हाताचे पंजे उमटविले आहेत. हेल्पिंग हँड! मुलांना गरज असेल तर ‘आम्ही आहोत’ हे सांगणारे पंजे. शाळेने एक प्रश्नावलीही मुलांसाठी केली आहे. सुरुवातीलाच त्याच्यावर लिहिलं आहे. स्वत:साठी किंवा तुम्हाला माहित असलेल्या इतर विद्यार्थ्यांसाठीही ही प्रश्नावली भरू शकता. तेही निनावी.
ही सुरुवात आहे ती या देशात आत्महत्येला प्रवृत्त होणाऱ्या तरुण मुलांना परावृत्त करण्याची. इथे गेल्या साठ वर्षांत तरुण मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण तिप्पट झालं आहे. दर आठवडय़ाला जवळजवळ २८ तरुण मुलं स्वत:चं जीवन संपवितात. निराशा, वैफल्यग्रस्तता हेच याचं मुख्य कारण आहे. मूळ शोधण्याचा प्रयत्न झाला नव्हता, पण आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरवर्षी सात ऑक्टोबरला ‘नॅशनल डिप्रेशन स्क्रीनिंग डे’ बऱ्याच शाळांमधून राबवितात. अशा वेळेस शाळांमधून मुलांना निराश, असाहाय्य वाटतं का, आत्महत्येचे विचार मनात घोळतात का याचा अंदाज घेतला जातो. मुलांना दिलेल्या प्रश्नावलीच्या सुरुवातीलाच मदतीची गरज असेल तर फोन नंबर आणि संपर्कासाठी व्यक्तींची नावं दिलेली असतात. काही शाळांनी तर बदलत्या काळाची पावलं ओळखत बेवसाईट सुरू केली आहे. पालकांसाठी स्वतंत्र आणि मुलांसाठी वेगळी. इथे मुलं, पालक त्यांच्या समस्या, भावना व्यक्त करू शकतात. निनावी, हेतू एकच की शाळांना अशा मुलांना मदत करायची इच्छा असली तरी गवतातून सुई शोधण्याचाच तो प्रकार असतो. वेबसाइटमुळे सर्वच मुलांना मन मोकळं करायला एक जागा मिळते. अशा वेबसाइटवर तरुणांसाठी बऱ्याच विषयांची माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन चॅटने सल्लागारांपाशी गप्पा मारता येतात. स्टेपस्ला मिळालेल्या (STEPS Screening, Treatment and Education to Promote Strength)  प्रतिसादातून नक्की याबाबत काय करता येईल याचा अंदाज येऊ लागला आहे. मुलांना आपल्याशा वाटणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर हे स्टेपस्चं यश आहे. सध्या फक्त न्यूयॉर्कच्या शाळांतून याचा वापर होत आहे, पण हळूहळू बाकी शाळाही अनुकरण करतील असा विश्वास स्टेपस्च्या निर्मात्यांना वाटतो.   नुकताच काही राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात अॅंटी बुलिईंगचा (यासाठी मराठी शब्द? ) समावेश केला आहे. लव्ह अवर चिल्ड्रेन सारख्या संघटना यासंर्दभात कार्यरत आहेत.

तसंच दुवा क्र. १ मध्ये जाऊन आपल्या मुलांची नाव घातल्यास ई मेलने त्या नावांबाबत दैनंदिन माहिती म्हणजे मुलांनी काय केलं आहे किंवा त्याच्यांबाबतीत इतर कोणी काही पोस्ट केले आहे अशाप्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते.

मार्ग कुठलेही असले तरी अकाली स्वत:च्या भविष्याचाच अंत करणाऱ्या, संबंधित व्यक्तींच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या कोवळ्या जिवांना फुलायची संधी मिळते आहे याचंच तुमच्या आमच्या सारख्यांनी समाधान मानायचं. नाही का?