Saturday, November 12, 2011

प्रवास.....

गेल्या आठवड्यात मायदेशातून परत आले माझ्या देशात.  दरवेळेला बसतो तसा सांस्कृतिक धक्का नाही बसला यावेळेस. कदाचित वर्षाच्या आत फेरी झाली म्हणून जाणवलं नसावं. प्रकर्षाने जाणवलं ते इतकंच की प्रवासात  सहप्रवासी संवाद साधायला अजिबात उत्सुक नाहीत. एअरपोर्ट ते पुणे के. के. ट्रॅव्हल्सने गेले. तीन तासाच्या प्रवासात अगदीच हु का चु न करता कसं बसणार म्हणून मी काही ना काही बोलायचा प्रयत्न करत होते पण बरोबरच्या प्रवाशांना काहीच रस नव्हता. बाजूला बसलेल्या बाई तर मराठी बोलेचनात. मला वाटलं खूप वर्ष परदेशात राहिलं की होतं ते झालं असावं याचं. पण त्या फक्त ८ दिवसांसाठी गेल्या होत्या दुसर्‍या देशात. शेवटी ड्रायव्हर आणि मी, आम्ही  मात्र जिव्हाळ्याच्या चार शब्दांची अदलाबदल केली. बाकी सारा प्रश्नोत्तरांचा खेळ. म्हणजे मला कुणीच काही  विचारलं नाही. मी विचारलेल्या प्रश्नांना फक्त उत्तरं दिली. तेवढ्याही त्या प्रवासात ड्रायव्हर महाशयांनी त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाला विचारलं,
"तुम्ही शूज काढलेत का आत्ता?"
ते गोंधळलेच.
"हो, का?"
"वास मारतोय" असं म्हणत ड्रायव्हरनी खिडकी उघडली.
प्रतिक्षिप्त क्रिया होऊन मी पुढे पसरलेले पाय मागे घेतले :-).
प्रत्येकाला आपल्या पायाचा तर....ही शंका असणारच मनात. पण बाकी सारे स्थितप्रद्न्यासारखे बसण्यात यशस्वी झालेले दिसले. घर आलं आणि श्वास घेतला मोकळा. संपला एकदाचा प्रवास.
रत्नागिरीहून पुण्याला येताना तोच अनुभव. बाजूला बसलेली सहप्रवासी अगदी थंड स्वरात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. बाकी फोनवर बोलणं, नाहीतर इ मेल तपासणं हेच अव्याहत.

परत येताना विमानातल्या १६ तासात मला आठवत राहिलं वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या प्रवासाचं स्वरुप.  प्रवासात झालेल्या ओळखी, काही टिकलेल्या, बर्‍याच प्रवास संपल्या संपल्या विरुन गेलेल्या. पुसट होत गेलेले चेहरे, प्रसंग.....ते देखील एकाशी दुसर्‍याचा काही संबंध नसलेले.

बाहेरगावाहून रत्नागिरीला परत आलं की हमखास कुणीतरी आडगावात जाणारं असायचं गाडीत. स्टॅडवर वेळ काढायचा असायचा पाच सहा तास. अशा प्रवाशांचे ते पाच सहा तास गाडीत झालेल्या ओळखीवर  आमच्या घरी जायचे.

८३-८४ च्या आसपासची गोष्ट. परळ ते रत्नागिरी. काका (मावशीचा नवरा) आले होते पोचवायला बस स्थानकावर. नाव पाहून गाडीत बसणार तर ही गाडी नाहीच असं म्हणाले कंडक्टर. आम्ही आपले सारखे चौकशी करत. शेवटी कळलं तीच गाडी होती रत्नागिरीला जाणारी. गेली निघून. मग काकांनी चौकशीच्या तिथे धारण केलेला रुद्रावतार. शेवटी एस. टी. ने पैसे परत करण्याचं केलं मान्य. पण आता दुसरी समस्या. आरक्षण कुणा दुसर्‍याच्या नावाने केलेलं. पैसे त्याच्याच नावाने मिळणार. त्यानंतर बोरिवलीच्या ते रहात तिथल्या परिसरात प्रत्येकाला ठाऊक होतं की पाखर्‍यांच्या नावाने मनिअऑर्डर आली तर देसायांकडे पाठवायचं.

त्याही आधी म्हणजे गुजरात जवळच्या पालघरला आम्ही रहायचो तो काळ ७७-७८ सालचा. बहीण कोकणात गेली होती आजी आजोबांकडे. तेव्हा  फोन घराघरात नव्हता. परत येताना ओळखींच्या बरोबर ती मुंबईला येणार होती. माझे काका तिला पालघरला आणून सोडणार होते.
अख्खा दिवस पुतणीची वाट पहात काका  स्टॅडवर उभे. आत्ता आली गाडी तर.....या भितीने जेवणासाठीही त्यांना तिथून निघता येईना. कंटाळून संध्याकाळी शेवटी ते परत गेले. माझे वडिल संध्याकाळपर्यंत मुलगी आली नाही म्हणून रात्री त्यांच्या घरी पोचले. काका आणि वडिलांची वरात ओळखींच्यांच्या घरी. पाहातात तर तिथे सगळी जेवत बसलेली. गाडी कोकणातून सहा तास उशीरा सुटली होती. पण एकमेकांशी संपर्क साधायला मार्गच नव्हता काही.

त्यावेळचा प्रवास, त्यातून घडलेले किस्से त्या त्या वेळेस फारसे महत्वाचे वाटले नव्हते नक्कीच. पण आता मात्र त्या क्षणांची मजा औरच वाटते; विशेषत: हल्ली होणार्‍या प्रवासात तसं काही घडतच नाही तेव्हा.......

Tuesday, September 27, 2011

एकांकिका

खूप दिवसात ब्लॉगवर यायलाच जमलं नाही.  एकांकिकेच्या गडबडीत वेळच झाला नाही. गेले चार महिने दोन एकांकिका बसवत होतो आम्ही. म्हणजे मी आणि  माझा नवरा. 'खेळ' आणि 'सांगायचं राहिलंच'
कलाकार आणि मित्रमंडळी होतीच मदतीला. पण नाट्यगृह आरक्षित करणं, तिकीटं विकणं, जाहिरात करणं,  एकांकिकेची जाहिरात करताना संकेतस्थळासाठी वर्णन, रेडिओसाठी वेगळं, माहितीपत्रकाकरता निराळं.....खूप कामं. आणि सराव, सराव, सराव....त्यात एका एकांकिकेत  भूमिका आणि दोन्हीचं दिग्दर्शन. पण छान पार पडलं सारं. २५० च्या आसपास लोक होती. प्रेक्षकांना आवडल्या दोन्ही एकांकिका. या दुव्यावर माहिती आहे.   एकांकिकाच्या क्लिप्स आहेत त्या पहा. कळवा मला कशा वाटल्या.  वाचकांपैकी अमेरिकतलं कोणी असेल तर तुमच्या इथे (मंडळात) अभिव्यक्तीच्या एकांकिका करायला मिळतील का किंवा कुणाशी त्यासाठी संपर्क साधता येईल ते कळवलंत तर आनंद होईल.
http://marathiekankika.wordpress.com/