Friday, January 27, 2012

क्षितीज - भाग ४

शुक्रवारची संध्याकाळ. येणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घेऊन येत होता. शुभमच्या बरोबरीने कधी ती उत्साहाने सळसळत होती, तर कधी त्याच्या इतकीच निराश होत होती, चिडचिड करत होती. आज  मात्र भराभर कामं आटपून एखादा चित्रपट बघायचा मनात होतं. त्याच्याआधी जेवणाचा घोळ आटपला  की मग निवांतपणा मिळाला असता. जेवताजेवता शुभमचं काहीतरी निघालंच.
"तुम्ही विसरलात का?"
दोघांनी प्रश्नार्थक नजरेने  पाहिलं.
"पुढच्या आठवड्यात नेहाच्या घरी जायचं आहे. दोघं मिळून एका स्पर्धेसाठी पोस्टर करणार आहोत." आई, बाबांनी एकमेकांकडे पाहिलं तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की नेहाला भेटायला मिळेलच असं नाही.
"हे बघ ! फोन, ऑन लाइन चॅट इथपर्यंत ठीक. प्रत्यक्षात भेटणं म्हणजे जरा अतीच होतंय." बाबाचं होतंय तोच आईने विचारलं.
"नेहाच्या आईची संमती आहे?"
शुभमने नुसतीच मान हलवली.
"अडनिडं वय आहे तुमचं. असे भेटायला लागलात आणि काही विपरीत घडलं तर सगळं महागात पडेल."
"थांब मी सांगतो स्पष्ट."  बाबाने एकदम मुद्द्यालाच हात घातला.
" नो टचिंग, नो सेक्स. ते इंग्रजी चित्रपटात दाखवतात तसे बेसबॉल सारखे फर्स्ट-सेकंड-थर्ड बेस असलं काही व्हायला नको."
"गॉट इट डॅड!" शुभम चांगलाच संकोचला.
"नाही ऐक. तुझ्यामुळे ती मुलगी प्रेग्नंट राहिली तर...  एवढाच विचार कर. दोघांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होईल. शिक्षण, करिअर यावर लक्ष केंद्रित करायचं वय आहे हे. तुम्हाला दोघांनाही पुढे काय करणार आहात ते माहीत नाही."
"मी आर्किटेक्चर साठी प्रयत्न करणार आहे. तिलाही तेच करायचं आहे."
"तसं नाही रे. हे सगळं होईलच की नाही हे कुठे ठाऊक आहे तुम्हाला? तुमची मैत्री किती दिवस टिकणार हे ही माहीत नाही. कॉलेजसाठी कदाचित दोघं वेगवेगळ्या गावात असाल. भविष्यात एकमेकांबद्दल आकर्षण राहीलच असंही नाही. मैत्रीपर्यंतच संबंध राहू दे, हे सांगायचं आहे आम्हाला."
"ठाऊक आहे हे सगळं. पोस्टर करायचं म्हणून भेटणार आहोत आम्ही." शुभमला दोघांचाही राग यायला लागला.
"ते ठीक आहे. पण कधी ना कधी हे बोलायचंच होतं ते या निमित्ताने सांगतोय."  जास्त न ताणता दोघांनी आटोपतं घेतलं. खोलीत येऊन तो तसाच बसून राहिला. किती स्पष्टपणे बोलले ते त्याच्या आणि नेहाच्या मैत्रीबद्दल. संभाषण आठवूनही त्याचे कान लाल  झाले. अवघडच जातं आई वडिलांकडून हे  असलं  ऐकायला. त्यापेक्षा आईला सांगायला हवं, पत्रच लिहीत जा. त्यातून तिच्या  लहानपणीच्या गमतीजमती समजतात, भारत कसा आहे, होता तेही समजतं. आईच्या पत्रातलं जग अद्भुत असतं हे त्याने स्वत:शीच कबूल केलं.

शुभम तिथून गेला तरी तिच्या मनात काही ना काही घोटाळत होतच. आधीच्या पत्राबद्दल शुभमच्या प्रतिक्रिया तिला कळल्या  नव्हत्या. पण कुठे नाराजीचा सूरही दिसला नव्हता वागण्याबोलण्यातून, हेच खूप होतं. किती लेखातून, टी.व्ही. वरच्या कार्यक्रमातून वाढत्या वयातल्या मुलांशी कसं वागावं हे ती ऐकत होती, वाचत होती. पालकांनी पालकच राहावं, उगाचच मित्र होण्याचा प्रयत्न करु नये, हे कुठेतरी वाचलेलं तिला फार आवडलं होतं. ती ते अमलात आणायचा प्रयत्नही करीत होती. तो  स्पष्ट काही सांगत नाही तोपर्यंत ती लिहीत राहणार होती. आणि काही नाही तर बालपणातल्या, शाळा, महाविद्यालयातल्या आठवणी लिहिताना पुन्हा एकदा तिला तरुण झाल्यासारखं नव्हतं का वाटत? शुभमला मराठी वाचण्याचा सराव होईल. पत्रलेखनातून खूप काही साध्य होईल याचा भरवसा वाटत होतं तिला. हात धुऊन ती उठलीच. ऑफिसरुममध्ये जाऊन तिने कागद पुढे ओढला.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभ्या,
 कशी वाटतात माझी पत्रं तुला? आलं का नीट मराठी वाचता? तसं आज सेक्सबद्दल स्पष्ट  बोललोच आम्ही तुझ्याशी. तरी मुद्दाम लिहितेय. आम्ही वयात येताना असं काही कुणी सांगणारं नव्हतं. आईने थोडंफार सांगितलं होतं पण पुढच्या स्वाभाविक येणार्‍या गोष्टी मनमोकळेपणे नव्हतो बोललो. प्रश्न होते ते मनातच राहिले. आता खूप माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना समजते. आम्ही तुझ्याएवढे असताना नुकतंच दूरदर्शन सुरु झालं होतं. पण त्या वेळेस टी.व्ही. वर नसती प्रलोभनं नव्हती. चित्रपटांमध्येही उत्तान, सवंग दृश्यं नसायची. त्यातून आम्ही अमेरिकेत  कुठे वाढत होतो? अरे, पण आजकाल सगळी म्हणतात की मुलं भारतात वाढवण्यापेक्षा इथेच नीट वाढतात. खरं असेल का हे?  मी हे तुला लिहितेय कारण तुम्हा मुलांना हे धडे देताना कुठेतरी सारखं मनात असतं की त्यापेक्षा भारतात असतो तर बरं झालं असतं की काय? भारतात सुट्टीत गेलं की आपल्याला बदलत चाललेल्या त्या त्या भागाचं तसं वरवरचंच चित्र दिसतं. आम्ही सोडून आलो तेव्हाचा भारत आम्ही तुमच्या डोळ्यासमोर उभा करतो. प्रत्यक्षात  बदललेला भारत आम्हाला तरी कुठे कळतो? तुम्ही देखील आमच्याकडून ऐकलेला भारत शोधत राहता. असे बदल  होतच राहणार. जगात कुठेही गेलं तरी प्रलोभनांपासून दूर राहणं सोपं नाही. ते तुला जमावं एवढीच इच्छा -   तुझी आई .                                                                                                                                                                  


                                                                                              तुझी आई
* * * * * * * * * * * * * * * * * * * *



क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका

Thursday, January 19, 2012

क्षितीज - भाग 3

सकाळी जाग आली तेव्हा खिडकीतून ऊन आत डोकावत होतं. आज शुभमला आवडत्या गोष्टी करायला खूप वेळ होता. लॅपटॉप चालू करुन त्याने शेअरचे भाव बघितले. गेल्या महिन्यात शेअरची घसरण झाल्यावर शुभमच्या मनात पैसे गुंतवायचं आलं होतं. आईकडून फक्त दोनशे डॉलर्स मिळाले होते मुश्किलीने. पण  बाबांच्या मध्यस्थीने अखेर पाचशे डॉलर्स गुंतवायला मिळाले. त्याला एकदा ते तंत्र जमलं की बाबा आणखी पैसे द्यायलाही तयार होते. शाळेत शिकलेला इ-ट्रेडिंगचा धडा प्रत्यक्षात अनुभवता येणार म्हणून शुभम खुष होता. बाबांच्या मदतीने खातं उघडलं आणि त्याला शेअरच्या वर खाली होणार्‍या भावांनी वेडच लावलं. आत्ताही त्याने  शेअरचे भाव चढलेले बघितले तसा उत्साहाने तो खाली धावला.
"मी कंपनी उघडतोय."
आईने लक्ष दिलं नाही, तसं पुन्हा त्याने तेच म्हटलं. प्रश्नार्थक चेहर्‍याने तिने नुसतंच त्याच्याकडे पाहिलं.
"बघ आत्ता शेअर विकायचे असतील तर प्रत्येक व्यवहाराला पंधरा डॉलर्स देतो आपण. मी आणि माझे दोन मित्र सल्लागार म्हणून  काम सुरु करु. प्रत्येक व्यवहारासाठी सात डॉलर्स. म्हणजे निम्म्या पैशात."
"अरे आत्ता कुठे शेअर्सची खरेदी, विक्री शिकतो आहेस. आणि एकदम कंपनी? अभ्यासाचं काय मग?"
"ते करुनच. आणि कंपनी सुरु करणं एकदम सोपं असतं. दोनशे डॉलर्स लागतात. जाहिरातदारांकडून पैसे मिळवायचे. शाळेतल्या डेका क्लबमध्ये आम्हाला बिझनेस प्लॅन शिकवतात. तो काल्पनिक असतो  आणि हा  प्रत्यक्ष असेल एवढंच."
"पण जाहिराती मिळवणं इतकं सोपं नसतं राजा!"
"आम्ही सगळा आराखडा दाखवू ना त्यांना. आणि नाहीच तर मग आत्ता स्वतःचेच थोडे थोडे पैसे घालावे लागतील."
"पण पैसे गुंतवायला तुमचा सल्ला कोण घेईल? किती लहान आहात तुम्ही वयाने."
"वय कशाला सांगावं लागेल. आमची वेबसाईट असेल."
सोळा वर्षाच्या मुलाकडे ती मती गुंग झाल्यासारखी बघत राहिली.
"हे बघ आई, आमचा ह्या बाबतीत खूप विचार झालाय. सुरुवातीला दोन सल्ले फुकट द्यायचे. आमच्या सल्ल्याप्रमाणे पैसे गुंतवले आणि एका वर्षात त्यांना फायदा झाला नाही तर पैसे परत द्यायचे. आणि करारामध्ये तळटीप असेलच की, तुमच्या फायद्या तोट्याला आम्ही जबाबदार नाही म्हणून."
"तू बाबांशी बोल बाबा."
"नाही. मी सगळा बिझनेस प्लॅन बनवणार आहे आणि मगच बाबांना दाखवीन. तू सुद्धा काही सांगू नकोस."
तिने नुसतीच मान हलवली.
"टि. व्ही. वर दाखवतात ना टीनएजर मिल्यिनेयर. तसं व्हायचं आहे मला."
आईच्या आ वासलेल्या चेहर्‍याकडे दुर्लक्ष करत  तो तिथून पसारही झाला. काही सुचेनासं झालं तशी ती उगाचच त्याच्या खोलीत डोकावली. लॅपटॉप चालूच होता. त्याची ई मेल वाचावीत? आलेली, त्याने पाठवलेली.... फेसबुक मध्ये कुणी काय त्याच्याबद्दल लिहिलंय तेही कळेल. तिला नक्की ठरवता येईना. विचारलं कधी की तो स्वतःच दाखवतो मग असं वाचलेलं कळलं तर चिडून बसेल. मनात उलटसुलट विचारांचं आवर्तन चालू होतं. बराचवेळ ती तशीच बसून राहिली. तितक्यात शुभम आलाच.
"तू माझी पत्र वाचतेयस?"
आपण काहीच न केल्याबद्दल मनातल्या मनात तिने स्वतःचीच पाठ थोपटली.
"मी कशाला वाचू?"
"मग माझ्या खोलीत का आलीस?"
तिला एकदम त्याचा राग आला. 'माझी खोली', 'माझी पत्रं'... ही आजकालची मुलं मी, माझं हेच करत राहतात. आवंढा गिळत तिने वादाला तोंड फुटणारे शब्द गिळून टाकले.
"तुला तुझ्या कंपनीबद्दल विचारायचं होतं. पण तू पळच काढलास. सुचेनासं झालं काही म्हणून बसले इथे येऊन. खास कारण काहीच नाही."
"मी धावायला जातोय आता. आल्यावर विचार मला तू काय विचारायचं आहे ते." तिने नुसतीच मान हलवली.
"तुला बघायचं आहे माझं फेसबुक?"
"काय?" आज धक्क्यावर धक्के द्यायचं ठरवलं असावं शुभमने असंच तिला वाटायला लागलं.
"बघ ना. आणि ई मेल वाचलीस तरी चालतील. दाखवू तुला कसं बघायचं ते?"
"मला माहीत आहे. माझं ट्‌वीट्‌रचं अकाउंट आहे."
"का‍ऽ‍य?" शुभम अवाकच झाला.
"बरोबर ऐकलंयस तू. फेसबुक आता जुनं झालं. लोकं हे नवीन वापरायला लागले आहेत. दाखवू का तुलाच?"
"ग्रेटच आहेस. पण नको. मला फेसबुकच आवडतं." तो धावायला निघून गेला. तिने मग त्याने परवानगी दिलीच आहे म्हणून  थोडीशी पत्र वरवर चाळली. विशेष काही नव्हतं. बाजूच्याच ड्रॉवरमधला कागद तिने ओढला आणि भरभर विचार कागदावर उमटायला लागले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभु,
कमालच केलीस तू. एकदम खुले आम खजिना उघडून ठेवलास माझ्यासमोर. मित्र मैत्रिणींना लिहिलेली पत्र आई-वडिलांनी वाचलेली कुणालाच आवडत नाहीत आणि तू एकदम मेहरबानच झालास. माझं पत्र वाचून हा फरक का?  ए, हे पत्राचं तुझ्या-माझ्यातलं गुपित आहे बरं का. बाबांनाही मी अजून बोललेले नाही. तू  कंपनी सुरु करायची म्हणतोयस. बाबाला सांगायचं नाही असंही म्हणतोस. पण तुझा तो बिझनेस प्लॅन तयार झाला की तो दाखवून नीट सांगायला हवं  बाबाला. अरे, आम्ही घरातलीच माणसं तुला मागे कशाला खेचू? प्रत्येक गोष्टीतले खाचखळगे पालक म्हणून सांगायला हवेत ना? हे असं लिहायला लागलं की धडधडतं उगाचच. वाटतं सुरु केला की काय उपदेश. पण खूप प्रश्न आहेत तरीही मला तर मीच कंपनी चालू करतेय असं वाटतंय. काय भन्नाट कल्पना सुचतात तुम्हा मुलांना.
आमचं आयुष्य किती वेगळं होतं तुझ्या वयाचे होतो तेव्हा. हायस्कुलला गेल्यावर अभ्यास आणि घोकंपट्टी यातच वेळ जायचा की काय असं वाटायला लागलं आहे. आमचीही डोकी चालायची म्हणा तुमच्यासारखी, नाही असं नाही. पण आमच्या उड्या अर्थात मिल्यिनेयर, बिल्यिनेयर होण्याच्या नव्हत्या. पण तरीही धम्माल असायची. आमचा आनंदही निखळ होता. पण, तुझ्या मनात  नुसता पैसा तर नाही ना? तसं नसावं अशी मनापासून इच्छा आहे.  कारण त्यात यश नाही आलं, तर खचून जायला होईल. त्यासाठी प्रयत्न करताना आलेली मजा विसरुन जाशील. आमचं तसं झालं  नाही कारण इतक्या लहान वयात इतके पैसे मिळवायचे असं ध्येय नव्हतं. आजूबाजूचं वातावरणही तसं  नव्हतं. पण 'आगे बढो' असंच म्हणेन मी. या तरी पत्राला उत्तर पाठव. निदान वाचलंस की नाही हे सांगितलंस तरी पुर. -  तुझी आई                                                                                                                                                                      

ता.क.  मी काही तुझी पत्र वाचली नाहीत. फेसबुकही चाळलं नाही. ट्विटरसाठी मदत हवी आहे का? मी दाखवेन तुला. तूच  तेवढा 'कॉम्प्युटर सॅवी' आहेस असं नाही. तुझी आई पण तुझ्या सवाई आहे. मजा करतेय रे. तुझ्या भाषेत सांगायचं तर ’जस्ट  किडींग’.


क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका