Friday, September 7, 2012

काही गोड तर काही कडू...

"आय   एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि  विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,
"तसा काही हेतू नव्हता त्याचा किंवा आमचा कुणाचाच..." हळूहळू ती शांत झाली. विनसी आमची एजंट. घर विकत घ्यायचं ठरल्यावर तिच्याबरोबर फिरत होतो. परदेशात राहत असलो तरी आईशी बोलायचं ते मराठीतच हे ब्रीद वाक्य मुलांच्या मनावर पक्कं ठसलेलं आहे त्यामुळे पोरं मराठीत आणि तिला एकटं पडल्यासारखं वाटू नये म्हणून माझी उत्तरं इंग्लिशमध्ये अशी कसरत गाडीत झाली होतीच. पण अगदी थोडावेळ. म्हणजे सुरुवात व्हायची मराठीतून पण माझं इंग्लिश ऐकल्यावर उरलेलं सारं मुलं इंग्लिशमध्ये बोलायची. पण जे काही बोलणं मराठीत झालं त्याचं पर्यवसान असं होईल याची शंकाही आली नाही. विनसी माझ्यावर उखडलेली मुलाने पाहिलं. आता तो संतापला मनातून. पण आजीच्या वयाच्या माणसाला काही बोलायचं नाही एवढं तारतम्य त्याच्याकडे होतं. मुलीला काय झालं ते कळण्याएवढी ती मोठी नाही. ती तितक्यात काहीतरी मला सांगत आली, मराठीत. काय करावं ते सुचेना, मराठीतूनच तू इंग्लिश बोल हे त्या वेळेला कसं सांगणार? मी घाईघाईत तिला म्हटलं.
"शी डज नॉट लाइक इफ यू स्पीक इन इंग्लिश." मुलीने समजल्यासारखी भाषा बदलली. पुढे तिने दाखवलेली घरं यात्रिकपणेच पाहिली. घर शोधण्याचा उत्साह एकदम बारगळला.
नंतर तिचं क्षमा मागणारं इ मेल आलं. पण त्याला काय अर्थ?

एकीकडे मुलांनी आपली भाषा विसरू नये म्हणून प्रयत्न करायचा, आणि त्याचवेळेस ’फक्त घरी बोला हं मराठी आमच्याशी, बाहेर असलो की आमच्याशी इंग्लिशच बोलायचं’ असं सांगायचं म्हणजे इफ एल्स करून कार्यालयातली प्रोग्रॅमिंगची भाषा वापरल्यासारखंच की. मुलांचा संगणक केल्यासारखं. पुन्हा त्यातून त्यांना इंग्लिशमध्येच बोला म्हटलं की लगेच ती पण अस्त्र घेऊन तयार असतात,
"तूच तर सांगतेस आमच्याशी मराठीतच बोलायचं."
"अरे पण..." स्पष्टीकरण देतानाच वाटत राहतं  कळ दाबली की मराठी किंवा इंग्लिश अशी खेळण्यासारखी अवस्था तर करून टाकत नाही ना आपण त्यांची?.
मुलगा तर अशा वयात,
"हॅ, आता तर मुद्दामच मराठी बोलू आपण तिच्यासमोर. आणि तुम्ही पण ऐकून काय घेता?  ’फायर’ करा ना तिला." इथे अमेरिकन बाणा असतो त्याचा.
"स्पॅनिश बोलणार्‍या लोकांबरोबर काय केलं असतं तिने?  सांगितलं असतं का असं त्यांना?."
"घरं विकायची तर फ्रेंडलीपणा असायला नको का?"
"तिच्या जागी तुम्ही असतात तर तिने नसतं का तुम्हाला ’फायर’ केलं?’

एक ना अनेक मतं. आम्हाला वाटत राहतं, तिला जे सांगायचं ते  सौम्य शब्दात सगीतला असतं तर? तुम्ही घराबद्दल बोलत असाल तर इंग्लिशमध्येच बोला, म्हणजे मलाही समजेल काय मतं आहेत तुमची... असं काहीतरी. तिच्या वयाकडे, मेहनतीकडे पाहून आमचा काही जीव धजावत नाही तिला काही बोलण्याचा किंवा ’फायर’ करण्याचा.  मनातल्या मनात निषेध करत माझं तिच्याबरोबर घर बघणं चालूच राहतं.... आणि अचानक एक दिवस तिचं ईमेल येतं.
"मी सेवानिवृत्त होणार आहे लवकरच. त्याआधी तुम्हाला माझ्या बदली दुसरी एजंट देते. आणि एक लक्षात ठेवा. तुम्ही कस्टमर आहात. आवडली नाही एजंट तर यू कॅन फायर हर.... विनसी"

गेले तीन आठवडे माझा सतरा वर्षाचा मुलगा भारतात आहे. खूप फिरतोय, अंजिठा, वेरूळ, रायगड, बंगळूर, कितीतरी ठिकाणं आणि प्रत्येक ठीकाणच्या नातेवाईकांना भेटतोय. त्याचं कौतुक  होतंय तसंच त्याच्या मराठी बोलण्याचंही. विनसीची समस्या सोडवता आली नाही खरी, पण जेव्हा मराठीच्या कौतुकाची पावती मिळते तेव्हा बरं वाटतं, असं मनात म्हणत मी आपलं नुकतंच माझ्या मावसभावाचं इंग्लिशमधून आलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचत राहते.
You should be proud of your boy. Even I am unable to speak Marathi without using english words, however he spoke purely in marathi.Great, hats off to you.

याचसाठी केला होता अट्टाहास, त्याची काही गोड फळे तर काही कडू, एकाच नाण्याच्या दोन बाजू....