Friday, January 4, 2013

सीमारेषा

महाविद्यालयीन जीवनाबद्दल गोष्टी चालल्या होत्या लेकाशी. त्याचं हे पहिलं वर्ष आमच्यापासून दूर रहाण्याचं.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे?" दोन तीन महिने मनात असलेला प्रश्न चाचपडल्यासारखा बाहेर आला. तो हसला अवघडल्यासारखा. पुढच्या प्रश्नाची कल्पना त्याला आधीच आली असावी.
"हो."
"सर्रास?"
"ते मला नाही माहित."
"हं"
" मी पण असतो का त्यात असं विचारायचं आहे ना तुला? मग विचार ना तेच."
मी हसून म्हटलं,
"एकदम तुझा पारा चढायला नको ना म्हणून साधारण चित्र काय आहे ते विचारावं असं वाटलं."
"क्वचित. म्हणजे एक दोनदा थोडीशी घेऊन बघितली आहे."
माझा चेहरा पाहण्यासारखा झाला.
"सिगरेट?" न रहावून विचारलंच
"अजिबात नाही."
माझी चुळबुळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे सांगतोय. सगळीच मुलं करतात हे पण आई वडिलांना खरं सांगत नाहीत."
"अच्छा" म्हणून मी ते संभाषण संपवलं.

एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. हे चांगलं नाही वगैरे उपदेश कसा करायचा किंवा करायचा की नाही या विचारात.
"मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, लग्नाशिवाय शारिरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते सांगत नाही."
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरिरावर होणारे परिणाम. किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारिरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परिक्षा असते."
मी फक्त ऐकत होते. महाविद्यालयांची जागरुकता आवडली याबाबतची.
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"तू म्हणतोस ते खरं आहे. पण तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहित असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

मी काही बोलले नाही. मुलांशी बोलताना मित्रमैत्रीण व्हावं पण त्याचवेळी पालक म्हणून त्यांनी आपल्याला आदर दाखवावा ही जी आपली अपेक्षा असते त्यातली सीमारेषा इतकी धुसर आहे की ती केव्हाही भंग पावेल असं वाटतं खूपवेळा.

Thursday, January 3, 2013

बदल

महाविद्यालयीन काळात  तावातावाने मारलेल्या गप्पा, मांडलेले विचार आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता. कविता 'पाडण्याचा' छंद होता त्या काळातली. आज कित्येक वर्ष उलटली तरी सगळं जैसे थे च आहे असं वाटायला लावणारी.

तुम्हाला खोटं वाटेल
पण हल्ली सारं जगच बदललंय
सगळं कसं छान, छान होत चाललंय
माणूस माणसाप्रमाणे वागतोय
देश उन्नतीकडे झेपावतोय!
माणुसकीचाही पूर आलाय
सार्‍या देशाचा नूरच बदललाय
आदर्शवाद अस्तित्वात आलाय
बलात्कार, खून, भ्रष्टाचार हे शब्दच
मुळी नष्ट झाले आहेत
मी म्हटलं ना,
तुम्हाला हे खोटं वाटेल
तसंच झालंय,
समोरचा  माणूस 
विचित्र नजरेने पाहतोय,
कुणापाशी तरी कुजबुतोय
ही वेडी अशीच फिरत असते
अक्रीतासारखं बडबडत राहते!