Tuesday, January 22, 2013

मुलांना घरातील कामाचे पैसे...?

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात  घरात."
पहिला विचार मनात तरळला तो सुट्टे पैसे खूप ठेवायला लागत असतील मग :-) हा. नंतर हेवा वाटला तो स्वत:ची खोली आवरल्याबद्दल पैसे मिळतात  पठ्ठ्यांना याचा आणि  शेवटी प्रश्न पडला की त्या पैशाचं तिसरी चौथीतली ही मुलं करणार काय? एकदा का पैसे हातात आले की त्यांना काय पाहिजे ते घेणासाठी ती हट्ट करणारंच. त्यावर ती म्हणाली.
"हो ना, दुकानात गेलो की  गोळ्या, नाहीतर बबलगम घेतात मुलं त्या पैशातून."
"कष्ट करुन मिळवलेल्या पैशांनी हे घ्यायचं म्हणजे तू चुकीची सवय लावतेयस असं नाही वाटत?"
"नाही. गोळ्या, बबलगम रोज खाणं बरोबर नाही हे तर माहितच आहे त्यांना. हळूहळू पैसे अशा गोष्टींवर खर्च करु नयेत हे ही कळेल."
"मग ती पण तुला पैसे देतात?"
"कसले?"
"तू जेवण करतेस रोज त्याच्यांसाठी, शाळेसाठी डबा देतेस, गाडीने इकडे तिकडे नेतेस.... खूप मोठी यादी होईल."

 मैत्रीणीचं म्हणणं आपली कामं होत असतील तर या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. पैसे देऊन आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो, ते कसे वापरायला हवेत याचं शिक्षण देतो.

माझं म्हणणं, ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?