Friday, August 1, 2014

सीमारेषा

"साकेत तू काय घेणार? व्हिस्की, वाइन, बिअर..." परेशकाकाच्या प्रश्नावर साकेतने आईकडे पाहिलं. साकेतने
इथे सगळ्यांमध्ये नाही घेतली तर बरं असं वाटत असतानाच  आजूबाजूला हास्याचे फवारे उडाले. झालं, साकेतने हो म्हटलं तर नंतर त्याबद्दलच  चर्चा रंगणार, श्रावणीच्या मनात विचार तरळला. तितक्यात गिरीशच म्हणाला,
"घे रे बाबा तुला काय पाहिजे ते. माझ्याकडून हिरवा दिवा." साकेतने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तसं स्पष्टीकरण देत गिरीश म्हणाला,
"म्हणजे ग्रीन सिग्नल रे." साकेत हसला.
"नको."
"आईला घाबरतोयस का?" परेशने श्रावणीकडे पहात विचारलं.
"मला कशाला घाबरेल तो? त्याच्या बाबानेच परवानगी दिली आहे ना." श्रावणी हसून म्हणाली आणि  वाइनचा ग्लास तिने तोंडाला लावला.
साकेतनेही अवघडत परेशकाकाने दिलेला ग्लास हातात घेतला.
"कॉलेजमध्ये पण घेतोस का?" रागिणी मावशीच्या प्रश्नाला साकेतने उत्तर देण्याआधीच ती म्हणाली,
"आम्ही दोन्ही मुलांना सांगितलं आहे. घ्यायची तर आमच्या समोर. कॉलेजमध्ये अजिबात नाही. जे काही कराल ते आम्हाला कळलं म्हणजे झालं." श्रावणीने साकेतकडे  कटाक्ष टाकला. पुसटसं हसू त्याच्या चेहर्‍यावर पसरल्यासारखं वाटलं तिला.  तिने रागिणीच्या बोलण्यावर मान डोलवली.

रागिणीचे शब्द श्रावणीच्या मनात घोळत होते. खरचं तिची मुलं फक्त त्यांच्या उपस्थितीतच घेत असतील? कॉलेजसाठी या मुलांना बाहेर रहावं लागतं. तिथे इतर मित्र मैत्रीणी बरोबर असताना मोह टाळता येत असतील? साकेत काय करत असेल? लगेच हा विषय नको म्हणून दोन तीन दिवस ती या विषयावर काही बोलली नाही. पण त्या दिवशी कॉलेजचाच विषय सुरु झाल्यावर तिने  संधी साधली.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे? नाही म्हणजे आम्ही काही इथे शिकलेलो नाही. त्यामुळे वातावरणाची कल्पना नाही ना म्हणून विचारते आहे." साकेत  हसला.
"रागिणी मावशी जे बोलली त्यामुळे विचारते आहेस ना?"
"अगदी तसंच काही नाही."
"तसंच आहे आई. आणि तुला सांगतो आम्ही सगळी ’देसी’ मुलं पालकांना जे ऐकायला आवडेल तेच सांगत असतो."
"म्हणजे?"
"तुला खरंच वाटतं रागिणी मावशीच्या मुली कॉलेजमध्ये दारुला हातही लावत नसतील?"
"मला नाही माहित."
"एक तर मुलींनी दारु पिण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे कॉलेजमध्ये. आणि आपण हात सुद्धा लावत नाही असं त्या सांगत असतील मावशीला तर ते साफ खोटं असणार. सगळी मुलं घेतातच गं कधी न कधी."
"तू?"
"हो घेतो. आणि हे लगेच कबूल करतो आहे कारण ते रेल्वे रुळ ओलांडायचं झाल्यापासून मी तुम्हाला जे खरं आहे तेच सांगतो हे विसरु नकोस तू." श्रावणीचं लक्ष  त्याच्या बोलण्यावरुन उडालं.  साकेतने तिचं मन एकदम भूतकाळात ढकललं. साकेत खेळायला जायचा मित्रांबरोबर. दुसरीत असेल. सात वाजता घरी परत यायचं आणि रेल्वे रुळ ओलांडून पलिकडच्या मैदानात जायचं नाही असं बजावलेलं होतं त्याला. एकदा सात वाजता तो आला नाही म्हणून ती बघायला गेली तर सगळी मुलं पलीकडच्या मैदानावर खेळायला गेलेली. श्रावणीला बघून तो बावचळला. राग आलेला असूनही तिने तो गिळला. गिरीश आला की मगच दोघं मिळून बोलू साकेतशी असं ठरवून ती  साकेतला घेऊन मुकाट्याने  घरी आली.  मुलांना आपणहून परवानगी दिली नाही तर ती लपूनछपून त्यांना पाहिजे ते करतातच, त्यासाठी खोटं बोलतात हे ह्या प्रसंगाने त्यांना दाखवून दिलं. दोघांनी झाल्या गोष्टीचा शांतपणे विचार करुन  दुसर्‍या दिवसापासून रुळ ओलांडून मैदानावर खेळायला जायची परवानगीही दिली. खोटं बोलायचं नाही. खरं सांग. चुकीचं वागला असलास तरी आम्ही तू असं का केलंस ते समजून घ्यायचा प्रयत्न करु याची त्याला खात्री दिली. तेव्हापासून साकेत मोकळेपणाने त्यांच्याशी सगळं बोलत होता.
"आई, लक्ष कुठे आहे तुझं." ती एकदम भानावर आली.
"बागेचा प्रसंग आठवत होते. जाऊ दे ते. पण रोज घेतोस का रे तू?"
"नाही गं. फक्त शुक्रवारी. ते सुद्धा एखाद्याच."
"सिगरेट?" न रहावून तिने विचारलं.
"अजिबात नाही."
श्रावणीची चुळबूळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे खरं तेच सांगतोय गं."
"अच्छा" म्हणून साकेतचं बोलणं ऐकत राहिली.

श्रावणीचे एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. आपले कॉलेजचे दिवस वेगळे होते. साकेतच्या बाबतीत  काळ आणि देश दोन्ही बदललेलं आहे त्यामुळे नसती भिती, अंदाज बांधण्यात काय अर्थ? आणि आता जिथे आपणही मित्र मैत्रिणींबरोबर  ड्रिंकची चव चाखतो तिथे मुलांना काही शिकवायला जाणं म्हणजे... पण कॉलेजमध्ये वय, संगत यामुळे कुठे थांबायचं हे कळलं नाही या मुलांना तर याचीच भिती वाटते आणि ती बोलून दाखवायलाच हवी असं तिला वाटत होतं. शेवटी तिने तो विषय काढलाच.
"आई,  आता इतकं बोलतोच आहोत आपण तर एक विचारु?"
"विचार ना, परवानगी कशाला हवी?"
"तुम्ही सगळे पालक ना असं करु नका, तसं करु नका चा सूर लावता नेहमी. मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, लग्नाशिवाय शारीरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते का सांगत नाही?"
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरीरावर होणारे परिणाम, किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारीरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं, त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परीक्षा असते. पण पालकांनी पण बोलायला नको का हे आमच्याशी?"
श्रावणी ऐकत राहिली.  काय करायला नको ची यादी तयारच होती तिच्याकडे पण नाहीच आवरला मोह तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते सांगावं की नाही याबद्दल मन:स्थिती द्विधा होती, आणि किती म्हटलं तरी काही गोष्टी नाही येत इतक्या स्पष्ट बोलता, पोटची मुलं असली तरी. बोलणारा आणि ऐकणारा दोघंही संकोचतातच. त्यामुळेच मनातलं शब्दांवाटे बाहेर येत नव्हतं हेच खरं. ती काहीच बोलली नाही तसं साकेतच म्हणाला,
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"आणि कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जातो आपण हे लक्षात ठेवलं की झालं." तिच्या बोलण्यावर साकेत हसला.
"आई तुम्ही कधी कॉलेजमध्ये मजा केलीच नाहीत का?"
"केली ना. पण मजेच्या व्याख्या बदलत जातात स्थळकाळानुसार. पालकांची मानसिकताही बदलते. आणि तू म्हणालास त्याबद्दल विचार करत होते.  तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका, कुणाशी शारीरिक संबंध ठेवू नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहीत असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

श्रावणी स्वत:चं  तरुणपण तपासत राहिली. मुलांबरोबर पालकत्वही काळानुसार बदलत चाललं आहे. आपल्या आई वडिलांनी शिस्त, संस्कार दिले. मनातलं त्याच्यांशी बोलू शकतो हा विश्वासही दिला तरी काही गोष्टी सांगायची, विचारायची लाजच वाटायची. ते जे मधलं अवघडलेपण आपण अनुभवलं ते आपल्या मुलांनी नको अनुभवायला असं श्रावणीला वाटत होतं, नाही म्हटलं तरी ते होणारच हे कळत असलं तरी. पण साकेतच्या बाबतीत त्याने स्वत:हून नाही सांगितलं तरी त्याबद्दल विचारलं की तो खरं तेच सांगेल ह्याची तिला खात्री होती. पण तरीही साकेतच्या आजच्या बोलण्यावरुन वाटत होतं की मुलांशी मित्रत्वाचं नातं राखणं आणि त्याचबरोबर पालक म्हणून त्यांनी आपला मान ठेवावा, आदर दाखवावा  असं वाटणं यातली सीमारेषा इतकी धूसर आहे की ती केव्हाही भंग पावेल. पण खरंच ही  सीमारेषा धूसर आहे की तिची व्याख्या  बदलणं, ती समाजमान्य होणं आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यानं अनुभव घेतच सोडवायचं हेच अंतिम सत्य  असलं तरी श्रावणीचं मन त्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिलंच...


Monday, July 14, 2014

गवतकाप्याची गोष्ट

रॉजर  गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला.  इस्टोरी भन्नाट होती त्याची. घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"तो आला होता घरी."
"आता तुझी कैद्यांशी मैत्री? आई, तू लिहितेस हे मान्य पण विषय मिळावेत म्हणून हे असं...."
"पुरे रे. आधी ऐक तर."  मी त्याला माळीबुवांची गोष्ट सांगायला सुरुवात केली.  त्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगते. काय आहे, सध्या आम्ही वर्षाच्या कराराने कुणी आमचं अंगण हिरवंगार राखेल का याच्या शोधात आहोत. त्यामुळे येऊन जाऊन घरी भावी माळी टपकत  असतात.

"वर्षाचा करार केलात तर १२०० डॉलर्समध्ये गवत कापेन."
"नाहीतर?"  कुणी ’तर’ म्हटलं की लगेच  ’नाहीतर’ आठवतोच. त्यामुळे पटकन आलंच ते तोंडून.
"१७०० डॉलर्स "  आमचे कदाचित होऊ पाहणारे भावी माळीबुवा म्हणाले. १२००  डॉलर्स म्हटल्यावरच माझ्या डोळ्यासमोर चित्र विचित्र गवत फिरायला लागलं होतं. १७०० म्हटल्यावर विचारक्रियाच गोठली.  गवत कापायचं, वाढवायचं, पुन्हा कापायचं आणि यासाठी १२०० डॉलर्स? पुन्हा कापण्याआधी ते वाढवायला कितीतरी पिंप पाण्याचे फवारे मारायचे ते वेगळेच. डोळे गरागरा फिरवू की नुसतंच ’या राईट’ म्हणून खोडसाळ हसू चेहर्‍यावर आणू या विचारात मी तशीच उभी राहिले. तेवढ्यात नवरोजींनी पायावर कुर्‍हाड मारली.
"खत पाणी, जंतूनाशक फवारे, बी बियाणं, फुल झांड..." डोक्याला फेटा गुंडाळून, बैलगाडीत बसायला तयार असलेला एखादा शेतकरीच उभा आहे बाजूला की काय असं वाटलं. पुन्हा पुन्हा बघून खात्री करुन घेतली. मग खेकसले,
"अरे थांब ना. तूच कशाला त्याला  सगळी कल्पना देतोस?"  मराठीतून ओरडले पण इंग्लिश माळ्याला हावभाव आणि स्वराची भाषा समजलीच. चेहर्‍यावर निरागस हसू आणत तो म्हणाला,
"ये समदं करावं लागतं ताई...आनी बी हाये."
"आता काय?" त्या आनी बी बरोबर पैसे पण आलेच.  ते आकडे १२०० डॉलर्स मध्ये की १७०० डॉलर्स मध्ये  वाढवू? आमच्याकडे  नवर्‍याला खर्चात पडायची घाई असते. उकरुन उकरुन व्यावसायिकाला याचा दर, त्याचा दर विचारायचा, त्याचा वेळ घ्यायचा, आपला खर्च करायचा. ते झालं की मौनव्रत धारण करायचं. किती चाट खिशाला असा चेहरा करुन बसायचं. तो एकदा बसला की उठत नाही आणि ऐकलेलं सारं विसरुन गेल्यावर पुढे कृती होत नाही हे सवयीने कळल्यामुळे मीच घोडं पुढे दामटवते.
"इतके पैसे जाणार असतील तर आपणच का नाही करत ही कामं?" एकदम त्याचा चेहरा खुलतो.
"तसं काही ते कठीण नसतं. करु मग आपणच."
यातला ’आपण’ म्हणजे ’फक्त तू’ असतो.  बायकोसाठी क्वचित प्रसंगी दाखविला जाणारा हा आदर कशासाठी असतो हे कळायला मला खूप वर्ष लागली. मी आपली मग काय तर सगळे नुसते लुबाडायला बसले आहेत. करु आपणच असं म्हणत मान डोलावते, आणि मग ती सगळी कामं करता करता, मान काय अख्खं शरीर डुगडुगायला लागतं.

आणि आपणच करायचं हे तर  वेगवेगळे माळीबुवा सगळ्या कामाचा खर्च सांगा मग ठरवतो कुणाला काम द्यायचं ते असं करुन कशाला बोलावून ठेवलेले? त्यात कोण, कशाला, कधी यात गोंधळ. आता एकच काम वेगवेगळे माळी किती डॉलर्समध्ये करतील हे विचारायचं असताना, याची कामाची यादी चढत्या फोडणीसारखी प्रत्येकासाठी वेगळीच. ती काय बायको आहे हे पण करुन टाक म्हणून सांगायला? पैसे वाढणारच ना? मग तुलना कशी करायची? त्यात दरवेळेला आधीच जाहीर करायचं आम्हाला स्वस्तातल्या स्वस्तात करायचं आहे काम. हे एकदा का त्या माळीबुवांना समजलं की ते दुप्पट दर सांगणार आणि मग स्वस्त करणार इतकं साधं समीकरण, पण लक्षात कोण घेतो?

तर एकेक किल्ला ढासळत  असतानाच रॅंडी माळीबुवावर मात्र आम्ही खुश झालो.
"काय ते ज्ञान." नवरा म्हणाला,
"काय तो उत्साह." मी टाकलं आपलं असंच; पटकन माळी  ठरावा म्हणून.
"खरं आहे पण आपल्या चेहर्‍यावरचे भाव बघून हे लोक आकडे टाकतात, मागे घेतात, फिरवतात." जुगार खेळत असल्यासारखा नवरा बोलला. पण आता मला रॅंडी हातातून जाऊ द्यायचा नव्हता.
"हो पण हा नाही तसा वाटला. एकूणच खूप कमी पैशात करायला तयार झाला आहे. चांगला दिसतोय." मला अगदी काम झालंच सारखा उमाळा आला. तेवढ्यात दार वाजलं.  दारात आंडदांड माणूस उभा. अजून एक माळी? मी तसं विचारणार तेवढ्यात तोच म्हणाला,
"आत्ता तुमच्या घरासमोर लाल रंगाची गाडी उभी होती."
"हो, पण..." (बरं मग? तुला काय करायचं आहे?)
"कोण होता तो?"
"पण तुम्ही कोण?"
"त्या माणसाचं नाव काय?"
"कुठल्या?"
"लाल गाडीतल्या." रॅंडी रॅंडी जप चालला होता आमचा. पण या माणसाचा आविर्भाव पाहून ते नाव काही केल्या आठवेना.
"रॉय"
"नक्की?"
"नाही म्हणजे..."
" रॅडींच गं." र, रा ने सुरु होणारी सगळी नावं नवर्‍याला एकदम प्रिय. रॅंडी, रॉडनी....मराठीतल्या शिव्या दिल्यासारखं वाटतं त्याला ही नावं घेताना.
"रँडीऽऽऽ" पुन्हा आपला उगाचच नारा ठोकला त्याने आतून.
"तुम्ही फसले जावू नये म्हणून सावध करायला आलो आहे." आता मात्र नवरोजी उठले. आयुष्यात बायको आल्यानंतर एक फसवणुक झाली होतीच, आता आणखी नको रे बाबा या आवेगात बाहेअर आले.  रॅंडी महाशय सुरुवातीला थोडं काम करतात, मग सामानासाठी पैसे घेऊन जातात ते पुन्हा येतच नाहीत, अधूनमधून तुरुंगांच्या फेर्‍या करुन आले आहेत. अशी रॅंडीची कर्मगाथा रॉजरने सांगितली. पण तुम्ही कोण? तुम्हाला कसं कळलं रॅंडी आमच्याकडे आला आहे हे प्रश्न मनात येण्याआधी लक्षात आलं,
च्यक, च्यक. कसली संधी फुकट घालवली. तुरुंगातून सुटून आलेल्या माणसाबरोबर आपण बोललो, बागेत फिरलो आणि एक, एक फोटो नाही घेतला फेसबुकवर टाकायला? रे कर्मा माझ्या.  हे बोलले असते नवर्‍याजवळ तर माझ्या ’फेस’ चं काय झालं असतं कुणास ठाऊक.

रॉजर गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला.  घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"हो घरी कंटाळा आला की जाते तिकडे."
"हा हा हा. काय विनोद मारलास. पण सांग पुढे. " मग मी त्याला माळीबुवांची  पूर्ण गोष्ट सांगितली.
"यात खूप लुप होल्स आहेत."
"मराठी, मराठी." एक जरी इंग्लिश शब्द वापरला की आमच्या घरातलं हे घोषवाक्य आहे. ते मी घाईघाईने पूर्ण केलं.
"अगं, तो जो हितकर्ता आला होता तो तरी खरा कशावरुन?"
 रहस्यकथेची सुरुवात... मी मनात म्हटलं आणि चिरंजीव काय म्हणतात ते ऐकत राहिले. बोलणं थांबलं तेव्हा न रहावून शंका विचारली,
"तू अर्थतज्ञ होणार आहेस की वकील?" माझ्या या कुजकट प्रश्नाचा वास त्याला आलाच.
"विषय काय आहे आई? माझं उज्वल भवितव्य की कैदी?" चिरंजीवांनी तावातावाने वाद घालायला सुरुवात केली.
तो थोपवता थोपवता नाकीनऊ येतायत  तेवढ्यात त्याला अचानक त्या कैद्याचा पुळका आला.
"त्याची नीट माहिती काढा, तुरुंगातून सुटून त्याला खूप वर्ष झाली असतील, नंतर काही गुन्हा केला नसेल तर त्याची चुक त्याला कळली  आहे. त्याला संधी मिळालीच पाहिजे. आपणच असं वागून पुन्हा त्यांना गुन्हेगारीकडे वळवतो. समाज सुधारणार कसा मग?"
तू आहेस ना, तू सुधार. सारखी सारखी सगळी कामं तुम्ही बापलेक माझ्यावर काय सोपवता हे मनातल्या मनात पुटपुटत मी म्हटलं,
"अरे पण मला फक्त माळी हवा आहे रे. फक्त एक माळीऽऽऽऽऽऽऽ " माझ्या आवाजात घायकुती, रडकुंडी सारं काही होतं.
"मिळेल, मिळेल गं आई. तू नीट चौकशी कर आणि कैद्याचा माळी बनव."
कैद्याचा माळी? तो कसा बनवायचा? पण त्याचं तोंड बंद करायला मी  म्हटलं.
"बनवते."
फोन ठेवला तर नवरा बसला होताच.
"काय झालं?"
"कैद्याचा माळी बनवायचा आहे."
मुलाशी बोलून झाल्यावर ही नेहमी असं का बोलते असा चेहरा केला त्याने.
"आपल्याला नक्की कोण हवं आहे? माळी? कैदी? कैद्याचा माळी बनवायचा की माळ्याला कैदी करायचं? का हे दोन स्वतंत्रच ठेवायचे? पण मग कशासाठी? नाहीतर आपली आपणच करायची का ही कामं?" माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीवर नवर्‍याने  नेहमीचं शस्त्र उगारलं. मौन व्रत धारण केलं.

आणि तितक्यात दार वाजलं तसं अजून एका नव्याने आलेल्या माळ्याचं स्वागत करायला मी धावले...