Thursday, October 2, 2014

दोन ध्रुवांवर

"तू कधी नोकरी केली नाहीस ना या देशात?" दिप्तीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण पुन्हा तोच प्रश्न रमाने
विचारला. तिने नुसती नकारार्थी मान हलवली. पण मन अस्वस्थ झालं ते झालंच. कोण कुठे नोकरी करतं, कुणाला घरी बसणं किती अशक्य वाटतं तर कुणाची तरी कायम आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याची टिमकी हे नेहमीचं गु्र्‍हाळ सुरु होणार.  ती पुढच्या संभाषणातले सगळे विषय निर्विकारपणे ऐकत राहिली. भडका उडाला तो गाडीत बसल्यावर,
"काय समजतात या बायका  स्वत:ला? इतकं कमी लेखतात ना घरी रहाणार्‍यांना. तू कधी नोकरी केली नाहीस का म्हणे. नाही केली तर हिच्या *** काय जातं? गेला सुट्टीचा दिवस वाया. कशाला आणतोस रे अशा लोकांकडे?"
"मी कुठे आणतो? सगळा गोतावळा तुझाच आहे दिप्ती." शांतपणे निलेश गाडी चालवत राहिला. घरी पोचेपर्यंत दिप्ती अखंड बडबड करत तिचा वैताग व्यक्त करत राहिली. रात्री डोळा लागेपर्यंत चाललेल्या विचारांनी  दुसर्‍या दिवशीही पाठपुरावा सोडला नाही. रविवारची सकाळ असूनही ती लवकर उठली. निलेश खाली येईपर्यंत तिचं सगळं आवरुन झालं होतं. टी. व्ही. चालू करुन ती बसली.

धावायला बाहेर पडणार्‍या निलेशने दिप्तीकडे कटाक्ष टाकला.
"काय झालं?"  न कळून दिप्तीने विचारलं.
"काही नाही."
"मग असा काय बघतोस?"
"तू आता काय करणार आहेस?"
"का?"
"मराठी मालिका चालू रहाणार असेल जेवायला बसेपर्यंत."
"हो." दिप्तीच्या आवाजात तुटकपणा आला.
"हं..." निलेशची पावलं दाराकडे वळली पण  दिप्ती भडकलीच.
"काय झालं हं करायला? कधीची उठलेय. सगळं आटपून झालंय. कामं बाजूला टाकून नाही टी.व्ही. समोर बसत."
"मला नाही आवडत सकाळी सकाळी हे सुरु झालेलं."
"नाही आवडत तर नाही. बाहेर गेलं की नोकरी करत नाही म्हणून ऐकायचं, घरी तुमच्या कुणाच्या मनासारखं वागत नाही म्हणून ऐकायचं. आयुष्य असं ऐकून घेतच संपणार."
"तू  काल रमा बोलली ते अजून घेऊन बसली आहेस? कमाल आहे. यामुळेच तू सुखी नसतेस कधी. सोडून द्यायला शिक. आयुष्य कसं जगायचं ते आपलं आपणच ठरवायचं."
"हो ना, मग माझ्या मालिका बघण्यावर का घसरलास? बघू दे की सुखासुखी."
"ते वेगळं."
"वा, म्हणजे  सोयीप्रमाणे सगळं. पुरे झाले तुझे धडे."
"ठीक आहे.  कर तुला काय पाहिजे ते." निलेश तडकला.
"का? आता का? आधी काहीतरी बोलायचं आणि मग कर तुला काय पाहिजे ते म्हणून मोकळं व्हायचं. वाऽऽ हे चांगलं आहे तुझं..." दिप्ती तारस्वरात ओरडली पण उत्तर द्यायला निलेश थांबला नाही. दिप्तीच्या कानावर दार धाडकन बंद झाल्याचा आवाज आदळत राहिला.

धावता धावता दिप्तीबद्दलच निलेशचे विचार चालू होते. कुठे कुणाकडे जाऊन आलं की हमखास असं काहीतरी घडायचं. इतकं जर मनाला खुपतं कुणी नोकरीबद्दल विचारलं की तर ती नोकरीसाठी का प्रयत्न करत नाही हे न उलगडलेलं कोडं त्याने पुन्हा एकदा सोडवायला घेतलं. या देशात येऊन झाला की पंधरा वर्षाहून अधिक काळ. पण दिप्तीच्या मनातली अमेरिकेत कायमचं वास्तव्य करायचं या निर्णयाची अढी गेलेलीच नाही.  सतत धुसफुस घरात. सुरुवातीला घडी बसेपर्यंत नाही म्हटलं तरी सहा सात वर्ष गेलीच. मुलं लहान, कामाच्या स्वरुपामुळे फिरती मागे लागलेली. यात ती भरडली गेली पण एका ठिकाणी स्थिर झाल्यावर स्वत:चा जम बसवायला काहीच हरकत नव्हती. पण तिने तसा प्रयत्न केलाच नाही. मुलांमध्ये रमली म्हणावं तर तो संध्याकाळी घरी आला की मुलांवर खेकसणारी दिप्तीच समोर येई. त्यावरुन काही बोललं की त्याच्यावर तोफ. काय केलं म्हणजे दिप्तीला सुख मिळेल हेच त्याला कळत नव्हतं. एकदा शांतपणे दिप्तीशी बोलून मार्ग काढायला हवा हे ठरवून मुलं नसताना त्याने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला. धावण्याच्या वेगाबरोबर तो प्रसंगही उड्या मारत त्याच्या मनात फिरायला लागला.
"तुझ्याशी बोलायचं आहे."
"बोल ना. परवानगी कशाला हवी?" हातातलं काम बजूला ठेऊन ती म्हणाली. तिच्या गोड स्वराने काय बोलायचं आहे तेच विसरला तो. हे असंच नेहमी. किती पटकन चिडते, वैतागते तितकीच पटकन शांतही होते. सगळ्या भावना तीव्रपणे व्यक्त करणं हाच स्वभाव आहे का हिचा?
"दिपू, कधी होणार गं तू मोठी?"
"म्हणजे?"
"लहान मुलांसारखी वागत असतेस, क्षणात चिडचिड, वसवस, आदळआपट तर क्षणात ते विसरुन लाघवी वागतेस."
"हे बोलायचं होतं तुला?" खळखळून हसत तिने विचारलं.
"नाही, वेगळंच बोलायचं होतं." आता त्याला विषयाला वेगळं वळण नको होतं. "आता तू नोकरीचा विचार करावास असं वाटतं. मला ठाऊक आहे.  इथे येऊन स्थिरावण्यात वेळ गेला. पण आता करु शकतेस तू तुला काय पाहिजे ते. म्हणजे नोकरीच असं नाही. छंद जोपास, शिक पुढे. जे तुला वाटत असेल ते. पेंटींग शिकवायला सुरुवात कर, नाहीतर गायनाचे वर्ग. खूप संधी आहेत तुझ्यासाठी "
"दहा वर्ष गेली आहेत मधे. कोण देईल मला नोकरी. आणि मलाच करायची नाही आता."
"ठीक आहे. मग पेंटींग, गायन शिकवणं?"
"नको."
"का?"
"नको म्हटलं ना."
"अगं पण काही कारण? आणि नसेल काही करायचं तर नको करु पण दिवसभर त्या मालिका बघत रहायचं आणि नंतर इथून तिथून इथे रहातोय, भारतात परत जात नाही म्हणून कसं तुझं नुकसान होतंय ते ऐकवणं तरी सोडून दे.  सुखी रहा एवढंच म्हणायचं आहे मला. आता मुलं मोठी झाली आहेत. ती पण वैतागतात तुझ्या अशा वागण्याने."
"ते मुलं सांगतील. तू नको. आत्तापर्यंत नुसती म्हणत राहिले पण आता उठते आणि जातेच मी भारतात."
"जा." निलेशच्या तोंडून इतक्या पटकन निघालं की दिप्तीला त्याच्या एकदम ’जा’ म्हणण्यावर काय बोलावं ते सुचेना.  डोळे डबडबलेच तिचे. काही न बोलता ती तिथून उठून गेली. निलेश तसाच बसून राहिला. काय बोलायचं ठरवलं आणि कुठून कुठे गेलं संभाषण. आताही त्याला तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. रागाच्या भरात तो बोलला खरा पण इतकी वर्ष झाली तरी दिप्ती ते विसरायला तयारच नाही. विचारांच्या नादात त्याचा धावण्याचा  वेग वाढला.

दार बंद झाल्याचा आवाज दिप्तीच्या कानात घुमत राहिला. तिचं मन मालिका पहाण्यावरुन उडालं. कुठून कुठे पोचला दोघांचा संसार. भारतातून येताना किती सहज सगळं सोडून आली होती ती निलेश सोबत. पुन्हा परतायचंच आहे लवकर याच भावनेने. पण नंतर इतर अनेकांप्रमाणे  चक्रव्युहात अडकून गेली. मनातली खदखद मग या ना त्या मार्गे बाहेर पडत राहिली. तिरकं बोलायचं, नाराजी दर्शवायची हा कधीतरी याच काळात स्वभाव बनून गेला. मला कधी इथे रहायचंच नव्हतं म्हणत ती  इथेच राहिली.  आपण काही करत नाही ही बोच उराशी बाळगून. त्यात कुठेतरी असे काही प्रसंग घडायचे की मन अस्वस्थ होऊन जायचं. नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या असे गटच झाले होते इथल्या छोट्याशा डबक्यात. सुरुवातीला  पेंटींग, गायन, वाचन अशा विषयांवर ती काही ना काही  बोलायची. पण अशा कलांना तुम्ही नोकरी करुन करत असाल तरच किंमत, नाहीतर हे छंद म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग असा भाव जाणवायचा तिला इतरांच्या बोलण्यात. मग सगळं हळूहळू मागे पडत गेलं. रसच उडाला. पूर्वी हाताशी असलेल्या वेळाचं  करायचं काय हा प्रश्न असे पण इंटरनेटनच्या आगमनाने तो प्रश्न सोडवला.  लॅपटॉप नाहीतर टी. व्ही. वर मराठी, हिंदी मालिका नाहीतर चित्रपट. हळूहळू तेच तिचं जग झालं. भारतात पोचल्यासारखं वाटायचं या मालिका पाहताना.  तिच्या टी. व्ही. पहाण्यावरुन मुलं, निलेश काहीतरी बोलायचेच. त्यामुळे त्या मालिका लावल्या की ती स्वत:वरच चिडायची.  पण ते पहाणं सोडवायचंही नाही. तिला निलेश बरोबरचा कितीतरी वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आठवला. त्यावेळेस पहिल्यांदा वैतागून तो म्हणाला होता. जायचं तर जा तू भारतात. मग चढत्या क्रमाने याच स्वरुपाचे प्रसंग घडत राहिले. पण नाही झालं खरं धाडस. म्हणजे एकटंच कसं जायचं? तिकडे जाऊन काय करायचं? आपण गेल्यावर निलेश येईल परत? मुलांचं काय? माहेरची काय म्हणतील? नातेवाईकांमध्ये किती चर्चा होईल या विचारातच ती गुरफटून राहिली. वर्षानुवर्ष. मुलं मोठी झाली. पंखात बळ आल्यावर उडून गेली. निलेश तर म्हणायचा, तिच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनी अगदी लांब नोकर्‍या शोधल्या आहेत. खरं काय, खोटं काय कोण जाणे. पण ती मात्र इथेच होती नक्की काय करायचं होतं हे कधीच न समजल्यासारखी. द्विधा!

निलेश घाम पुसत घराबाहेर उभा होता. आता तरी निवळली असेल की आत गेलं की पुन्हा मागच्या पानावरुन तेच सुरु? काही झालं की  सारखं आपलं ’भारतात परत गेले असते तर...’ या पोकळ धमक्यांपेक्षा खरंच का जात नाही दिप्ती भारतात कायमची? सर्वांनाच शांतपणा मिळेल असं त्याला दरवेळेला वाटायचं. पण ते वाटणंही तेवढ्यापुरतंच. बोललोय की तिला हे. आणि खरा राग येतो तो तिच्या टी. व्ही. पहाण्यापेक्षा तिच्या कलागुणांचा ती उपयोग करत नाही याचा.  विचार करुन डोकं भणभणून गेलं निलेशचं. दार उघडून तो आत आला.  दिप्तीने  चहाचा कप पुढे केला. तिची बदललेली मनस्थिती पाहून त्याला आश्चर्य वाटलं पण आनंदही झाला.  आधीचं सारं विसरुन तो हसला.
"तू नाही घेत?" खुर्चीवर बसत त्याने विचारलं.
"घेते ना. आणि आज सुट्टीच आहे तर नाटकाला जाऊ या का कुठल्यातरी?"
तो काहीच बोलला नाही.
"ऐकलंस ना?" तिने जोरात विचारलं. तिच्या आनंदावर विरजण घालणं जीवावर आलं त्याच्या.
"इच्छा आहे गं. पण काम करावं लागणार आहे. म्हणजे काल पूर्ण नाही झालं ऑफिसमध्ये, ते संपवायचं आहे."
"बरं. ठीक आहे." दिप्तीची नाराजी शब्दात डोकावलीच.
"अगं समजून घे ना."
"मी कुठे काय म्हटलं? तू दिवसरात्र काम करत रहा. मी रिकामटेकडी. काय करायचं तेच समजेनासं झालंय. वेळ घालवायला शोधलेले मार्गही चालत नाहीत. चालू दे. मी काही बोलत नाही..." दिप्तीचा पारा चढला. निलेशने चहा अर्धवटच टाकला आणि टेबलावर ठेवलेला लॅपटॉप उचलून काही न बोलता तो कामाच्या खोलीत गेला.  धाडकन दार बंद झालं. बंद दाराकडे दिप्ती पहात राहिली. एकाच घरातली इन मिन दोन माणसं दोन ध्रुवांवर उभी होती. कायमची!


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Oct2014.pdf