Wednesday, January 27, 2016

लॉटरी!

अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून सरकारी लॉटरीच्या आकड्यात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली आहे तशीच ती विकत घेणार्‍यांच्या संख्येतही. १.५ बिलियन डॉलर्स!  लागली लॉटरी तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणार्‍या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटातून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० बिलियन लोक लॉटरी तिकिट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. बातम्या पाहताना आम्हीदेखील घरात लॉटरी लागली तर काय करु याचे बेत करुन टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट घरात यायचं. रोज लॉटरीच्या बातम्या पाहून आज आपणही तिकीट आणूया असा बेत करुन टाकला. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की  शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, पॉवर बॉल आणि मेगा मिलियन ही  लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरु झालेला पॉवरबॉल कमीत कमी ४० मिलियनचा तर १९९६ सालापासून सुरु असलेली मेगा लॉटरीची  कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स  असते. पॉवर बॉलचं १ तिकिट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्या व्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलि नअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी मिळणारी लॉटरीची रक्कम जास्त आहे. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची.  अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकिट विक्री होते. प्रत्येक ठीकाणाहूनची सर्व तिकिटं घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही  कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात सर्वांना मिळून २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकटं विकत घेता आली. पण लॉटरीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या गेल्याच.  अशीच एक घडली २००५ साली. पॉवरबॉलच्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि  जवळजवळ २० मिलियन डॉलर्सही या ११० जणांना मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकार्‍यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्क मधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर ह्या ११० लोकांना बिलिनिअर होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

मात्र आत्तापर्यंत जितक्या लोकांना लॉटरी लागली त्यातील फार कमी जणांनी ती खर्‍या अर्थी उपभोगली. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण - तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खर्‍या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणार्‍या रोग्यांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणार्‍या कंपन्यां असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र - मैत्रीणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.

२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईसने आपली स्वप्न पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी नवीन गाडी आली. लुईसच्या नवर्‍याने, किथने बेकरीतली नोकरी सोडली आणि दिवस अंगावर यायला लागला. मन रमविण्यासाठी तो दारुकडे वळला. व्यसनाधीन झाला. दारुच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेर तर पडला पण जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने  नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्यात धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारुकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नीही कंटाळून वेगळी झाली. बेकरीतील कामगाराचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारुने केलेल्या शारीरिक हानीमुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचं २०१० साली निधन झालं.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. कपडे, सुंदरतेचा हव्यास बाळगत त्या पायी केलेल्या अतोनात उधळपट्टीतून  हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला  ते केलीला समजलंही नाही. मित्र - मैत्रिणींना आनंद मिळावा ही तिची इच्छा असली तरी लवकरच प्रत्येकजण तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली लॉटरीपायी आलेले अनुभव विसरुन आनंदी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करते.

५५ वर्षाच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकिट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र - मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारुच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थांच्या आहारी गेल्या.  त्यातच दोघींनी आपला जीव गमावला.  सुखासीन आयुष्य जगणार्‍या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीच्या पैशांनी धुळीला मिळालं.

३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ वर्ष  सुखसमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणार्‍या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करुन जवळजवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं कबूल केलं. शिकागो येथील उरुज खानही  लॉटरी लागल्यानंतर महिन्याभरात मॄतावस्थेत सापडले. भारतातून आलेल्या खान कुटुंबाचं जीवन सुखी म्हणावं असंच. उरुजना असलेला लॉटरीचा नाद सोडल्यास. लॉटरी लागल्यावर मिळालेल्या पैशाचं काय करायचं याबद्दल त्यांच्या कुटुंबात वाद - विवाद होते आणि त्यातूनच त्यांना विष घालून मारण्यात आलं असावं अशी शंका असली तरी त्यांच्या मारेकर्‍याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बिलींच्या आयुष्यानेही लॉटरीमुळे वेगळ्या मार्गावर वाटचाल सुरु केली. मोठ्या घरात राह्यला जायचं घरातल्या सर्वांचंच स्वप्न पूर्ण झालं. बायको, मुलांना नवीन गाड्या घेऊन देता आल्या. इतकंच नाही नातेवाइकांनाही त्यांनी खूश ठेवलं. कुणालाही मदतीची गरज असली की रोख पैसे देण्याची त्यांची तयारी असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकालाच त्यांची गरज आहे आणि इतक्या सर्वांना एकट्याने पुरं पडणं निव्वळ अशक्य. पण ते जमेल तशी मदत करत राहिले. पत्नीबरोबर सतत दुसर्‍यांना अशी पैशाची मदत करण्याबद्दल त्यांचे वाद व्हायला लागले आणि अखेर लॉटरी जिंकल्यावर केवळ दीड वर्षात निर्माण झालेल्या ताण तणावांनी आपलं जीवन संपवून त्यांनी सगळ्याला पूर्ण विराम दिला.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्युक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनल्ड मध्ये काम करता करता प्रेमात पडले पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा निश्चय काही काळापुरता टिकला. पण मुलाबरोबर वेळ घालवण्याला दोघांनी प्राधान्य दिलं, त्याचबरोबर नोकरीचा राजीनामा. पण काही दिवसातच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजंही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिनसनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षानंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बर्‍याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला.  बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं.  थोडक्यात काही जण आधीही आनंदी होतेच. श्रीमंतही झाले. मनाने होतेच आता आर्थिक दृष्ट्याही.

खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही ह्याचाच पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना शोध लागतो.

आणि तरीही आपण लॉटरी लागली तर... हे स्वप्न पाहणं विसरत नाही!

पूर्वप्रसिद्ध - लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - http://www.loksatta.com/lekh-news/lottery-1192070/

Saturday, January 16, 2016

ग्लोबल कोकणी - अमेरिकन मंचावर...

(लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल कोकणी विशेषांकातील माझा लेख.)

"आय हॅव टू पिक अप द रोल." वाटेत घोकून घोकून पाठ केलेलं वाक्य म्हटलं आणि विक्रेतीच्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव बघून मी बावचळले.
"रोल?" तिने चमत्कारिक उच्चारात विचारलं.
"यस." मी तोंड वेडंवाकडं करत उच्चार केला. गोर्‍यांशी बोलताना तोंड थोडं वाकडं केलं की आपल्या फ्लाइंग राणीच्या वेगाला जरा खीळ बसते आणि आपण काय बोलतोय ते त्यांना समजतं असा एक फंडा कुठूनतरी माझ्या डोक्यात शिरला होता. तो वापरायची ही पहिली संधी. माझं तोंड बराचवेळ वाकडंच राहिलं पण तिला काही रोल म्हणजे काय ते समजेना. कुठून ही दुर्बुद्धी सुचली कोण जाणे.  या देशात पाऊल टाकलं आणि आठवड्याच्या आत रोल आणायला बाहेर. काय करणार? विमानतळापासून फोटो काढायला सुरुवात केली होती. विमानातल्या  संडासाचंही अप्रूप होतं २० वर्षापूर्वी. रोल पटकन संपलाच त्यामुळे. आता फोटो भारतात पाठवून देण्याची घाई. तरी नवरा म्हणत होता,
"जरा टी. व्ही. बघ थोडेदिवस. त्या टी. व्ही. तली माणसं जशी बोलतात ना तशीच बोलतात ही सगळी. त्यांचं कळायला लागलं तरी आपलं बोलणं त्यांना कळणं हे पण लढाईवर जाण्यासारखंच असतं. तेव्हा सबुर!" पण नवर्‍याचं न ऐकणं हा पत्निधर्म निभावत मी आखाड्यात उतरले. आता रोल, रोल करता करता नवराच काय, माझी  शाळाही आठवली. कणकवलीच्या एस. एम. ज्युनिअर महाविद्यालयात शुक्ल सर इंग्रजी बोला, इंग्रजी बोला म्हणून कानीकपाळी ओरडायचे तो सल्ला ऐकला नाही याचा पश्चाताप व्हायला लागला. अखेर माझ्या आणि विक्रेतीच्या मध्ये असलेल्या अभेद्य भितींतून म्हणजे काचेच्या लांबलचक टेबलावरुन बोट दाखवत, खाणाखुणा करत तिच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या कपाटातल्या वरतून चौथ्या रांगेतल्या कप्प्यात असलेला कॅमेरा तिला दाखविण्यात मी यशस्वी झाले. मग तो कॅमेरा हातात धरुन, फोटो काढण्याची कृती करत, रोलची जागा दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. अखेर तिला मला काय हवंय ते समजलं आणि ती आनंदातियाशाने किंचाळली,
"यु मीन फिल्म?" आता मी गोंधळले. ही लोकं रोलला फिल्म म्हणतात? पण तोंड वाकडं करत बोलण्याची माझी खुमखुमी थंडावली होती. आता ती जे काही देईल ते रोल म्हणून वापरायला मी तयार होते. रोल घेऊन घरी आले आणि नवर्‍याला म्हटलं,
"शाळेत शिक्षकांचं ऐकायला हवं होतं रे."
"आम्ही ऐकायचो." त्याचा शांतपणा ढळला नाही.
"मी माझ्याबद्दल बोलतेय."
"बरं, बरं पण इतकं का भाग्यं उजळलं शिक्षकांचं?"
"हे बघ, तुला माहितीच आहे. माझं काही तुझ्यासारखं शिकण्याचं माध्यम इंग्रजी नव्हतं. मराठी माध्यमातून शिकलेली, कोकणात जन्मलेली, वाढलेली मी."
"तू पालघरला होतीस ना? ते कुठे कोकणात?"
"तू म्हणजे ना. काही वर्ष होतो रे पालघरला. पण जन्म कणकवलीचा, प्राथमिक शिक्षण देवरुखच्या भोंदे शाळेत, उच्चमाध्यमिक कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमधून आणि त्यानंतर कणकवली महाविद्यालयात.  महाविद्यालयीन आणि उच्चमहाविद्यालयीन रत्नागिरीला गोगटे जोगळेकर महाविद्यालयात. फक्त माध्यमिक शिक्षण पालघरच्या आर्यन एज्युकेशन मध्ये. म्हणजे अमेरिकेत यायच्या आधीचं आयुष्य जवळजवळ कोकणातच गेलं ना?"
"पण हे तू मला का ऐकवते आहेस?"
"कधी वाटलंच नव्हतं ना  परदेशात येईन म्हणून. इंग्रजी हीच बोलण्याची भाषा होऊन जाईल याची कल्पनाही केली नव्हती. तुझ्याबरोबर म्हणून या देशात पाऊल टाकलं पण तिकडे जशी माझी स्वत:ची ओळख होती आकाशवाणी, लेखन, अभिनय या माध्यमातून  तशीच इथेही ती व्हायला हवी असं वाटतं. पण सुरुवात उच्चारांपासून आणि इंग्रजी बोलण्याच्या आत्मविश्वासाच्या अभावापासून होतेय ना म्हणून वाटतंय ऐकायला हवं होतं शिक्षकांचं. आम्हाला इंग्रजीचे शिक्षक नेहमी म्हणायचे अभ्यासापुरतं इंग्रजी शिकू नका. ते वापरा, बोला. कुठेही तग धरता येईल त्यामुळे. आज ते पटलं."
"तुझ्या शिक्षकांना कळवून टाक हे. बरं वाटेल त्यांना. आणि इतकं काही कठीण नाही इंग्रजीची सवय करणं. जमेल तुला." त्याने विषय संपवला. माझ्या मनात मात्र बराचवेळ अमेरिकेला येईपर्यतचा काळ फेर धरत राहिला.

वेगवान आयुष्य मागे पडून अचानक शांतपणाने प्रवेश केला होता. नव्या देशाची, नवीन जगाची अपूर्वाई होती तशीच इथे कसं रुळणार याची धास्तीही. H4 वर आल्याने नोकरी करता येणार नव्हती, काही शिकायचं म्हटलं तर त्या त्या राज्यात किमान १ वर्ष राहिल्यानंतरच शिक्षणाचा खर्च कमी होऊ शकत होता. २ च वर्ष भारतीय कंपनीने पाठवलं होतं तर फारशी कशाची चिंता न करता हे नवं जग अनुभवावं असंही वाटत होतं. शेवटी सुरुवातीला तेच केलं. हातात लेखणी होती. रत्नागिरी आकाशवाणीसाठीचं लेखन, रत्नभूमीसाठी महाविद्यालयीन जीवनात चालवलेलं ’तरुणाई’ सदर, आमचं दिनांक साठी केलेलं लेखन आणि अधूनमधून सकाळ, रत्नागिरी टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता तसंच विविध मासिकांमधून लिहिलेले लेख, कविता, कथा या बळावर अमेरिकेतले अनुभव वेगवेगळ्या स्वरुपात कागदावर उतरायला लागले. १९९५ च्या काळात लेखन पोस्टाने किंवा तत्कालिक घडामोडींवरील लेख वर्तमानपत्रांना फॅक्सने पाठवणे हे दोनच मार्ग होते. लिहिण्यासारखं खूप होतं. त्यात दिवस पुरेनासे झाले. दरम्यान नवर्‍याच्या नोकरीमुळे भटकंतीही चालू होती. अमेरिकेतल्या राज्याराज्यामधलं जीवन म्हटलं तर एकसारखंच पण तरीही किती वेगळे पैलू असलेलं आहे ते जाणवायला लागलं. अमेरिकन मित्र, मैत्रीणींबरोबरच इतर देशातल्या लोकांशीही  मैत्री व्हायला लागली. भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. लेखनातून व्यक्त होत राहिलं. त्याचाच परिपाक म्हणजे,  उन्मेष प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला ’मेल्टिंग पॉट’ हा कथासंग्रह, ज्याला कोमसापचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार प्राप्त झाला. पाहता पाहता २ वर्षांची आणखी काही वर्ष झाली आणि अजून काही वर्ष इथेच राहायचं ठरल्यावर नोकरीचे आणि इथल्या प्रवाहात सामील होण्यासाठी  लागणार्‍या शिक्षणाचे वेध लागले. संगणकीय शिक्षणाला तेव्हाही तेवढंच महत्व होतं पण ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे आधी छोटे छोटे कोर्स करुन अंदाज घ्यायचं ठरवलं. वयाच्या ३० शी नंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं आणि तेही पूर्णपणे परक्या देशात या विचारानेच अस्वस्थपणा आला होता. अस्वस्थ मनाने वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई - वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर जास्त भर असतो, पाठांतरापेक्षा विषय समजण्याला महत्त्व आणि शिस्तीपेक्षा मित्रत्वाचा मार्ग स्वीकारला जातो. एकमेकांच्या अडचणी ओळखून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासंदर्भात अजूनही एक आठवण मनात ताजी आहे.
मुलाला सांभाळणारी मुलगी त्या दिवशी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी मिस्टर स्मिथना घाबरत घाबरत विचारलं. तात्काळ त्यांनी होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि मिस्टर स्मिथनी माझ्याकडे हसून पाहिलं. तिथेच थांबायला लावलं.
"आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे." पूर्ण वर्गाला मिस्टर स्मिथनी माझ्या मुलाची ओळख करुन दिली. ६ वर्षाच्या माझ्या मुलाने लाजत लाजत ’हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष ३० पासून ७५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र आली.   मी शिकता शिकता बदली शिक्षकांची तात्पुरती नोकरी करायचं ठरवलं. त्या वेळेला शिक्षकांची आवश्यकता आहे असं सतत टी. व्ही. वर आवाहन असायचं. म्हटलं, जमलं तर करुन पाहू.   मुलगा म्हणाला,
"आई, तू  शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण शिकवायला सुरुवात केल्यावर इथली शिक्षणपद्धती, शिकवण्यातील पद्धतशीरपणा, प्रयोग, वेगळेपणा याचा सुखद अनुभव घेतानाच काही गमतीदार प्रसंगही घडले.

शाळेचा पहिलाच दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."
त्याच्या नाही पण दुसर्‍या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्‍या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग.  मराठीतही संगीताचा गंध नसताना एकदम इंग्रजीत संगीत कसं शिकवायचं?
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
उडालेच, बदली शिक्षकाचं माझं हे काम वेळ मारून नेणं होतं?  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुणाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची... आलीया भोगासी!
त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी कारण दुसर्‍या दिवशी आणखी कुणाला तरी न आणता वेळ मारुन न्यायला त्यांनी मलाच तिथे ठेवलं. शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले आणि आगळेवेगळे अनुभव घेत  ३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत राहिले.

दरम्यान हातात पदवी आली होती. जिथे शिकत होते तिथेच आधी इंटर्नशिप करुन वेब प्रोग्रॅमर म्हणून स्थिर झाले. महाविद्यालयात असलेले जवळजवळ १८० वेगवेगळे विभाग आणि त्यांची संकेतस्थळं तयार करणं, अद्ययावत ठेवणं हे आमच्या गटाचं काम. कार्यालयात सर्वांना नावानेच संबोधण्याच्या प्रथेमुळे आपसूकच जवळीक निर्माण होते.  एकमेकांना सांभाळून, अडीअडीचणी ओळखून मार्ग काढणं महत्वाचं मानलं जातं. कोणत्याही कामाचं व्यवस्थित नियोजन,  कागदावर सारा आराखडा करणं हे सुरुवातीला फार कंटाळवाणं वाटायचं पण त्याचमुळे ठरल्याप्रमाणे काम  पार पाडलं जातं आणि त्याचा दर्जाही उत्तम राखता येतो हे लक्षात आलं आणि तेच अंगवळणीही पडलं.

एकीकडे नोकरी बरोबरच लेखनही चालू असतानाच अभिनयाची मूळ आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून आधी शालेय गटातून, नंतर बागेश्री संस्थेतून काम करुन मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या अनेक स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ’अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. दरवर्षी व्यावसायिक रंगमंच भाड्याने घेऊन दोन एकांकिकाचं सादरीकरण सुरु झालं. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, काहीवेळा एकांकिका लेखन, जाहीरात, तिकीट विक्री अशा सगळ्या बाजू नवर्‍याच्या आणि माझ्या मुलांच्या मदतीने  तसंच येथील स्थानिक कलाकारांच्या मदतीने सांभाळत गेली ८ वर्ष दरवर्षी इथे एकांकिका सादर करतोय. त्याला मराठी प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.

मागे वळून पाहताना जाणवतं ते हेच की परक्या देशात १९९५ च्या आसपास मुळं रुजवणं सोपं नक्कीच नव्हतं. आतासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की ३ आठवडे आतुरतेने उत्तराची वाट पाहण्यात जायची. पण हा परका देश ’आपला’ कधी होऊन गेला तेच समजला नाही. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की तळमळीने आम्ही खर्‍या परिस्थितीची जाणीव करुन देतो आणि इकडे आमच्या सहकार्‍यांनी, अमेरिकेन मित्र, मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीने गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!