Monday, January 9, 2017

सिद्ध

"तुला स्वत:ला सिद्ध करायला कधी मिळालंच नाही. आता हा प्रसंग म्हणजे संधी समज." तिची अगदी जवळची नातलग म्हणाली. दचकून तिने मुलांकडे पाहिलं. मुलांचं लक्ष नव्हतं की त्यांनी तसं दर्शविलं कुणास ठाऊक. ती मान खाली घालून अश्रू पुसत राहिली. "नवर्‍याने अचानक जगाचा निरोप घेणं ही आपल्यासाठी संधी?" तिला त्या नातलग बाईचा रागच आला. वेळ काळाचं भान ठेवत नाही माणसं. कुठे, काय बोलावं याचा काहीतरी पोच? पण त्या विधानाने तिच्या मनात घर केलंच. हळूहळू तिला तिचा नवरा खलनायक वाटायला लागला. तो तसा होता की नाही हा प्रश्न वेगळा पण तिचीच नातेवाईक त्याचं जाणं एक संधी म्हणून बघ म्हणतेय म्हणजे... आजूबाजूला सांत्वनाला आलेले काय बोलतायत याकडे तिचं लक्ष लागेना. आयुष्याचा पंचनामा मनातल्या मनात तिने सुरु केला. नवर्‍याने कधीही कोणत्याच बाबतीत अडवलं नव्हतं हेच तिला प्रकर्षाने जाणवलं. पण मग त्या नातलग बाईने असं का म्हणावं? आपल्याला स्वतंत्र ओळख नाही हे सुचविण्यासाठी? तिच्या मनाने कारण शोधण्याचा चंगच बांधला. त्याला दोष द्यायचाच तर तिला एक कारण मिळालंही. नवर्‍याने जसं कशाला कधी अडवलं नव्हतं तसं तिच्यातले गुण हेरुन प्रोत्साहनही दिलं नव्हतं. ते करायला हवं होतं त्यानं. तिचं विश्वच मुळी, त्यांना आवडतं, त्यांनी म्हटलं म्हणून, त्यांना नाही चालणार या भोवती होतं हे त्या बाईच्या वक्तव्यामुळे तिला ठळकपणे जाणवलं. तिने त्या बाईकडे पाहिलं. बाई उत्साहाने आजूबाजूच्या लोकांना नवरा गेल्यानंतर अवकाश सापडलेल्या स्त्रियांची उदाहरणं देत होती. काहीजणं ’अचानक’ गेलेल्या माणसांची यादी काढण्यात मग्न होती. तर काहीजणं हे असं ’अकाली’ जाणं कसा टाळता आलं असतं याचा उहापोह करण्यात. कानावर सगळं पडत होतं पण मनापर्यंत संधी या शब्दाव्यतिरिक्त काही झिरपत नव्हतं. स्वत:ला सिद्ध करुन पाहावं असं खरंच तिला वाटायला लागलं. पण काहीक्षणच. तिच्या त्या एका कृतीने तिचा नवरा खर्‍या अर्थी ’खलनायक’ झाला असता. नवरा गेल्यावर अवकाश सापडलेली स्त्री म्हणून तिची नवी ओळख निर्माण झाली असती. पण नवर्‍याच्या हयातीत तिने जसं सारं काही त्याच्यासाठी केलं तसंच पुन्हा एकदा करावंसं वाटायला लागलं तिला. नाहक नवर्‍यावर खलनायकाचा शिक्का बसू नये म्हणून गेलेल्या नवर्‍यासाठी स्वत:ला सिद्ध करायची संधी न साधण्याचं तिने निश्चित केलं. ------मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Thursday, January 5, 2017

माणूस

परवा जुन्या मैत्रिणीला भेटलो न्यूयॉर्क मध्ये. आता तिला मैत्रीण म्हणायचं की नाही हे ही समजत नव्हतं. महाविद्यालयातील मैत्री. सुरुवातीला निखळ. नंतर एकमेकांचा सहवास आवडतोय हे समजणं, प्रेमात गुरफटणं...मी घरी सांगून मोकळा झालो. तिने नाही सांगितलं घरी. का ते मी नाही कधी विचारलं. प्रेमात पडलेलो असलो तरी फार वेळ मिळायचाच नाही भेटायला. पण जो काही एकत्र वेळ मिळायचा त्या काळात हळूहळू काही गोष्टी लक्षात येत गेल्या. मला आयुष्य अनुभवायचं आहे. जग फिरायचं आहे. जगातल्या कितीतरी गोष्टी बदलायच्या हे माझं प्रामाणिक स्वप्न आहे. नोकरी एके नोकरी न करता माझ्या शिक्षणाचा उपयोग गरीब वस्तीतल्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी करायचा आहे. आणि मी ते करायला सुरुवातही केली आहे. कामावरुन आलो की २ तास मी या मुलांना मार्गदर्शन करायला जातो. माझी आई म्हणते तसं चांगलं माणूस व्हायचं हे ध्येय आहे माझं. माझ्या प्रेयसीला तिच्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करुन पैसा कमवायचा होता. भरपूर काम आणि भरपूर पैसा हे तिचं ध्येय. दोघांची आयुष्याकडे पहाण्याची दृष्टी वेगळी आहे हे समजत गेलं आणि वेळीच वेगवेगळ्या वाटेवरुन जायचं आम्ही ठरवून टाकलं. त्रास झालाच. दोघांनाही. कितीतरी दिवस. मैत्री ठेवायची असं ठरवलं आम्ही. पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. आपोआपच संपर्क तुटला.

काल जवळजवळ २ वर्षांनी आम्ही पुन्हा भेटलो. म्हटलं तर सहज, म्हटलं तर ठरवून. न्यूयॉर्कला अनायसे जाणारच होतो. वेळ होता. भेटू म्हटलं. ती देखील उत्साहाने तयार झाली. या २ वर्षात खरंच आम्हाला जे मनापासून करायचं ते आम्ही करत होतो. पण भेटलो तेव्हा दोघांच्याही मनातही तेच प्रश्न होते. खूप उत्सुकता आणि अस्वस्थता होती. आपापले निर्णय योग्य होते का हे अजमावण्याची. नातं तोडून जे पाहिजे होतं ते खरंच साध्य झालं आहे का? हाच प्रश्न होता एकमेकांच्या नजरेत. कॉफीचे घुटके घेत एकमेकांकडे पहात होतो.
"मला कंटाळा आलाय." ती एकदम म्हणाली. माझा चेहरा खुलला.
"तुला आधीच सांगितलं होतं." मी उत्साहाने म्हणालो. माझा निर्णय बरोबर होता याचा आनंद व्हायला लागला होता मला.
"पैसा मिळतोय. पण जवळजवळ १५ तास काम करते. थकून जाते. दिवस कधी उजाडतो, मावळतो हे ही कळत नाही. हे कसलं रे आयुष्य? सारं बदलावं असं वाटतंय." माझी नजर विजयाची होती.
"तुझं कसं चाललंय?" तिने उत्सुकतेने विचारलं.
"छान. जसं ठरवलं होतं तसंच चालू आहे." आवाजात विजयोन्माद भरलेला. त्यानंतर फिरुन फिरुन आम्ही तेच बोलत होतो. मला राहून राहून तिचं काही फार बरं चाललेलं नाही याचाच आनंद होत होता.

तिथून निघालो आनंदाने आणि काही क्षणात बेचैनीने घेरलं मला. अचानक ती खूश नाही या विचाराने फार वाईट वाटायला लागलं. घरी फोन लावला. सगळं सांगितलं. आई म्हणाली,
"याचा अर्थ तू अजूनही तिच्यात गुंतलेला आहेस."
"छे. याचा अर्थ मी मला वाटायला लागलं होतं तितका वाईट माणूस नाही."
"म्हणजे?"
"माझ्याच नजरेतून मी उतरायच्या आधी सावरलं स्वत:ला."
"चांगलं माणूस बनण्याच्या प्रवासातलं एक छोटं पाऊल टाकलंस. हो ना?"
आईने मला जे व्यक्त करायचं होतं ते एका वाक्यात केलं आणि समाधानाचा श्वास सोडत मी फोन ठेवला! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर