Tuesday, March 14, 2017

मराठी नाटक मंतरलेली चैत्रवेल झलक



एक झंझावत. झोडपलं गेलेलं घर आणि त्या पडझडीत स्वत:चं रहस्य जपत वावरणारी माणसं. आपापल्या रहस्याला कवटाळून बसलेली. या माणसाच्यासहवासात बाहेरच्या व्यक्तींचा प्रवेश होतो आणि ती देखील या रहस्याचा एक भाग बनून जातात. प्रत्येकाचं आयुष्य बदलून जातं. गुंतागुंत वाढत जाते. कसा सोडवतात हा गुंता ही सारीजणं? काय होतं अखेर?


फोटो आणि इतर एकांकिका या दुव्यावर - https://marathiekankika.wordpress.com/

Monday, February 27, 2017

मराठी

"ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा  प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,
"युवर मॉम इज हॅपी दॅट आय ॲम हिअर फॉर यू.  ॲड शी इज नॉट वरीड अबाऊट यू नाऊ. इज दॅट राईट?" माझी आई जे काही बोलली त्याचं भाषांतर करायची आवश्यकताच भासली नाही. ४० शी पार केलेल्या मुलीची काळजी घ्यायला सांगणार्‍या आईकडे आणि ती घेण्याची हमी देणार्‍या मेरीकडे मी डोळ्यातले अश्रू आवरत पाहत राहिले. आईच्या आत्मविश्चासाचंही अमाप कौतुक वाटलं. तिला हिंदी, इंग्रजी समजत असलं, येत असलं तरी बोलायची सवय नव्हती पण त्यामुळे तिचं पार साता समुद्राकडे येऊनही अडलं नाही. या आधीही तसं ते कधीच कुठे अडलं नाही हे आधी कधी जाणवलं नव्हतं इतक्या प्रकर्षाने त्या क्षणी जाणवलं. तिला काय म्हणायचं ते ती व्यवस्थित मराठीतच बोलून समोरच्यापर्यंत पोचवायची आणि महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल कुठलाही न्यूनगंड न बाळगता.

आम्हा भावंडाचं लहानपण मात्र आम्हाला इंग्रजी माध्यमात घाला म्हणून  आई - वडिलांच्या मागे लागण्यात गेलं. वडिलांची नोकरी बदलीची. जिथे जाऊ तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतीलच असं नाही त्यामुळे ते शक्यच नव्हतं आणि असतं तरी त्यांनी घातलं असतं की नाही कुणास ठाऊक.  इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं नाही याची खंत बाळगत आता चाळीशीच्या आसपास असणारी एक अख्खी पिढी मोठी झाली.  आपल्याला नाही जमलं ते पोटच्या गोळ्यांना करायला लावावं या अलिखित नियमाचं पालन करत मुलांना आवर्जून आम्ही इंग्रजी माध्यमात शिकवलं. घरी बोलतातच की मराठी निदान शाळेत तरी शिकू देत इंग्रजी,  स्पर्धेच्या जगात मागे पडायला नको, उत्कर्ष कसा होईल, मुलांना ’व्यवहाराची’ भाषा आलीच पाहिजे हाच ध्यास आमच्या पिढीने जोपासला. मराठीची कास मुलांच्या हाती लागू दिलीच नाही.  आमच्या सारखे पालक बरेच आहेत  हे कळलं तेव्हा वेळ टळून गेली होती.  इंग्रजी माध्यमात न शिकल्याने काही फरक पडत नाही हे कळायलाही खूप काळ गेला.  पण हे लक्षात येईपर्यंत तसं खूप नुकसान आमचं आम्ही केलंच भरीला आमच्या मुलांचंही.  आम्ही शिकलो, नोकर्‍यांना लागलो, मराठी तर येतच होतं पण इंग्रजीही उत्तम जमायला लागलं.  इतकंच नाही तर मराठी आणि इंग्रजी, दोन्ही साहित्याचा उत्तम आस्वादही आमची पिढी घेऊ शकते ह्या गोष्टीचं महत्त्व आता समजतंय.  इंग्रजी माध्यमांच्या मुलांची ओढ इंग्रजी साहित्याकडे झुकलेली दिसते. मराठी साहित्य वाचण्याकडे त्यांचा कल कमी आढळतो. पण आमच्यासारखे पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालून खूश होते. आता मुलांची उत्तम प्रगती होईल, आत्मविश्वासामुळे यशाचं शिखर गाठतील, आमच्यासारखी खंत बाळगावी लागणार नाही याच आनंदात आम्ही मशगूल होतो. ज्यांच्या पालकांना इंग्रजी येत नव्हतं  ते तर आपल्या मुलांचं इंग्रजी ऐकताना हुरळून जात होते. पण नुसती इंग्रजी  भाषा येऊन यशाचं शिखर गाठता येत नाही किंवा आयुष्य सार्थकी लागत नाही हे कळलंच नाही कुणाला. मुलांना इंग्रजीतूनच शिकवायचं ह्या विचारसरणीची चूक आधी घराघरांना भोवली मग समाजाला. घरी बोलतातच की मराठी असं म्हणताना, घरातही मराठी बोलताना इंग्रजी शब्दांमध्ये अधूनमधून चवीला काजू, बेदाणे असल्यासारखे मराठी शब्द यायला लागले.  घरोघरच्या ह्या चुकीची  फळं समाजाला भोगायला लागली. वास्तवाचं भान येईपर्यंत मराठी शाळा हळूहळू बंदही पडायला लागल्या. ज्या चालू आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत मुलांना मराठी शाळांमध्ये घालायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती झाली. त्यामुळे शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच झालं.  मराठी बोलायचं तर इंग्रजीतून विचार करुन त्याचं भाषांतर व्हायला लागलं.  कुणाला जपून राहा असं सांगण्याऐवजी काळजी घे असं टेक केअरचं शब्दश: भाषांतर सर्रास वापरात आलं. मराठीचं स्वरुपच बदललं. राडा होईल घरी अशी वाक्य मालिकांमधून सर्रास ऐकायला लागली, जीव तळमळण्याऐवजी तडफडायला लागला. प्रसारमाध्यमांनी इंग्रजी मिश्रित मराठी आणि चुकीचं मराठी रुढ केलं. तेच दैनंदिन जीवनात वापरलंही जाऊ लागलं. भावना पोचल्याशी कारण, भाषेच्या शुद्धतेचं काय इतकं ही विचारसरणी बळावली. अखेर मराठीचा, मराठीचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरणार्‍यांनी शरणागती पत्करली.  काळाबरोबर बदललेल्या मराठीशी जुळवून घ्यायला हवं असं म्हणत चुकीचं, इंग्रजी मिश्रित मराठी मनातल्या मनात सुधारुन घ्यायला ही माणसं शिकली.

आणि एक वेळ अशी आली की मराठी नष्टच होणार की काय अशी भिती मनात निर्माण व्हायला लागली, वाढली. इतकी वाढली की  ती मराठी ’दिन’ झाली.  दिवस साजर्‍या करण्याच्या आपण सुरु केलेल्या नवीन प्रथेत  एक दिवस ’मराठी’ ला मिळाला. राज्यसरकारही यासाठी पुढे सरसावलं आणि तो दिवस ठरला २७ फेब्रुवारी!  जागतिक मराठी भाषा दिन. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी  २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यायला लागला. कोण हे कुसुमाग्रज आणि जयंती म्हणजे? असा  इंग्रजी माध्यमातल्या मुलांना प्रश्न पडला. तो सोडविण्याची जबाबदारी तर आता आपण उचलायलाच हवी. नाही का? इथे अमेरिकेत आमच्यासारखी अनेकजण आपली मातृभाषा मुलांना यावी, ती त्यांनी टिकवावी, वापरावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे मराठी शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी दिनाबद्दल सांगितलं तेव्हा असा दिवसही असतो याचंच नवल वाटलं मुलांना. कुसुमाग्रज ठाऊक नव्हते पण त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता मात्र होती. त्या उत्सुकतेमुळे माझ्या  आशा पल्लवित झाल्या आहेत.  मराठी भाषा दिन म्हणजे आपली भाषा समजणं, बोलता येणं इतका मर्यादित अर्थ नाहीच. नसावा. मुलांना कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख करुन द्यायची, त्यांचं साहित्य वाचून दाखवायचं असं ठरवून टाकलं. कदाचित यातून मराठी साहित्याबद्दल त्यांची उत्सुकता वाढेलही. आवड निर्माण होईल. व्यक्त होण्यासाठी मराठी लेखन प्रपंचही मांडतील कदाचित कुणी एखादं त्यातलं. होईल खरंच असं? की भ्रामक आशावाद?  आपल्याच हातून दुसरीकडे वळलेली ही वासरं  येतील पुन्हा कळपात? आमच्या पिढीने मुलांना जसं इंग्रजीकडे वळवलं तसंच पुन्हा मराठीकडे आणण्याचं कामंही आम्हीच करु शकतो हे नक्की. आपापल्या पिलांना मराठीच्या मार्गावर आणायचं घेईल कुणी मनावर? जमेल? नक्कीच. मनात आणलं तर होऊ शकतं हे आणि शेवटी कितीतरी गोष्टी आपल्याच हातात असतात. नाही का? -  मोहना प्रभुदेसाई जोगळेकर