Friday, July 15, 2011

अबब अमेरिका

(लहानपणी मावसभावाकडे सोवियत रशियाचा कुठलातरी अंक यायचा त्यावरुन आम्ही अमेरिका कशी आहे ते ठरवायचो :-). त्या अमेरिकेत पंधरा वर्षापूर्वी पाऊल ठेवलं तेव्हा असलेल्या आमच्या अज्ञानाचा हा मजेशीर आलेख. आताच्या सारखं अद्यायावत माहितीच्या आधारे 'आलो की झालो इथलेच' पेक्षा फार वेगळा काळ होता तो हे लक्षात घेऊन वाचावे.)

"प्लीज कॉम्प्रमाईज विथ देम"
"सॉरी, नो कॉम्प्रमाईज. इफ यू वॉट यू कॅन कॉल द अ‍ॅथॉरिटी"  मोटेल व्यवस्थापक आणि टॅक्सी ड्रायव्हरचा वाद चालू होता. मी, माझा नवरा आणि त्याचा मित्र  ’दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ’ या उक्तीच्या प्रत्ययाची वाट बघत उभे होतो.  सॅनफ्रनस्किस्को ते सॅटारोझा असं टॅक्सीचं भाडं दोनशे डॉलर्स झालं होतं. ड्रायव्हर दिडपड मागत होता तर मोटेलचा मॅनेजर मीटरप्रमाणे घ्यायला सांगत होते.  दोनशे म्हटल्यावर माझ्या पोटात खड्डा पडला, त्याचे  दिडपट... मनातल्या मनात हिशोब चालू झाला.  भांडण ऐकायचं की हिशोब करायचा या कात्रीत सापडायला झालेलं. पण मला त्या दोघांच्या  उच्चाराची प्रचंड गंमंत वाटत होती. भारतात आम्ही  बिल क्लिंटनचं भाषण लागलं की अपूर्वाईने  ऐकायला  बसायचो  (ऐकायचो म्हणण्यापेक्षा पाहायचो) तेवढाच माझा अमेरिकन इंग्लिशशी संबंध त्यामुळे  कसे इंग्लिशमध्ये भांडतायत बघ अशा  नजरेने मी नवर्‍याकडे पाहात होते. तो आपला परत परत पाकिटात दिडशे डॉलर्स आहेत का ते तपासत होता. नाहीतर येणारा पोलिस अनायसे गिर्‍हाईक मिळालं म्हणून आम्हालाच घेऊन जायचा बरोबर. पण रात्री अडिचच्या सुमाराला  हा प्रसंग आपल्या भारतीय मनाला न मानवेल इतक्या शांततेत पार पडला. पाचच मिनिटात पोलिसांची गाडी हजर झाली. आता त्याच्या त्या ऐटदार पोषाखाकडे पाहत मी निस्तब्ध. हे सगळं असंच चालू राहावं असं वाटायला लागलं.  पण मी कुरकुर न करता उभी आहे हे पाहून नवर्‍याला काहीतरी गोंधळ आहे याची जाणीव झाली.  मी नक्की कशावर भाळले आहे  या  कोड्याने त्याच्या कपाळावर एक आठी उभी राहिली. आठ्या एकाच्या दोन  आणि दोनाच्या काहीपट व्हायच्या आत सगळं आटोपलं आणि  काहीही करायला लागलेलं नसतानाही  वेगवेगळ्या अर्थांने आम्ही तिघांनी  निश्वास सोडले.

अमेरिकन  भूमीवरच्या या पहिल्या प्रसंगाची उजळणी करत मोटेलच्या मऊ मऊ गाद्यांवर अंग टाकलं. सकाळी जाग आल्या आल्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक कार्ट पडलेली होती. (तेव्हा तर कार्ट म्हणजे काय हे ही माहित नव्हतं.) अमेरिकेत गाड्या जुन्या झाल्या की रस्त्यावर टाकून देतात हे  लहानपणी ऐकलं होतं तेव्हापासून आपण त्यातली एखादी उचलून आणावी असं वाटायचं. मी नवर्‍याला गदगदा हलवलं.
"अरे काहीतरी हातगाडी सारखं पडलंय बघ. आपण आणू या?"
"अं...काऽऽऽय?" असं काहीसं पुटपुटत त्याने कुस वळवली.
" अरे इकडे लोकं गाड्या टाकून देतात ना, तशी ती गाडी असावी असं वाटतय. जरा वेगळीच आहे पण आणते मी. फुकट मिळेल."  त्याच्या घोरण्याचा आवाज म्हणजे मुक संमती समजून मी  बाहेर डोकावले.  घाईघाईत मधलं अंगण ओलांडलं, थोड्याशा उंच भागावर झाडालगत ती कार्ट होती. कुणी बघत नाही हे पाहून आले घेऊन. अमेरिकेतली माझी पहिली चकटफू गाडी दाखविण्यासाठी विलक्षण आतूर झाले होते मी.
"अगं ही सामानाची गाडी आहे. तुला कसं बसता येईल यात? आणि ते फुकट बिकट सोडा आता." माझ्या उपदव्यापाने तो चांगलाच चिडलेला.
"बरं मग सामान आणू यातून."  आलेला राग गिळत मी  तहाच्या गोष्टी कराव्यात तसं माझं म्हणणं शांततेत मांडलं. तो काही बोलला नाही. त्याला स्वत:ला नक्की काय करावं ते कळत नसलं की तो मुक धोरण स्विकारतो (असं माझं मत)  कार्ट घेऊन आमची वरात थोड्याच वेळात बाजारात चालत जायला निघाली.

रस्त्यात माणसं फार नव्हतीच पण गाडीतली  एकजात सगळी लोकं कुतहलाने आमच्याकडे पाहात होती.
"भारतीय फार नसावेत इथे. सगळे पाहातायत आपल्याकडे." मला एकदम माधुरी दिक्षित झाल्यासारखं वाटत होतं. नवर्‍याला असं कधी कोणासारखं झाल्यासारखं वाटत नाही. तो कायम तोच असतो.
"आहेत थोडेफार असं ऐकलय. आणि तू काय भुरळल्यासारखी करते आहेस. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो परदेशात येऊन हे विसरु नकोस."
"म्हणजे मी नक्की काय करायचं, तू पुरेसा आहेस भारताचं प्रतिनिधित्व करायला आणि चालते आहे की नीट."
"हवेत गेल्यासारखी चालते आहेस."
"मी नेहमी तशीच चालते, शाळेत उड्या मारत चालते म्हणायचे मला."
"इथे नका मारु तशा उड्या."
"आधी माहित होतं ना कशी चालते ते मग कशाला केलंस......" विषय वेगळ्या दिशेने वाहू लागला तो पर्यंत  लोकांच्या नजरांना झेलत दुकानापाशी आलो म्हणून थांबावं लागलं आणि त्याचवेळेला त्या नजरांमधला छुपा अर्थ कळला. इतर लोकं कार्टमधून सामान आणून गाड्यात भरत होते. जिथे तिथे कार्ट आवाराच्या बाहेर नेऊ नका असं लिहलेलं. मग ती कार्ट आमच्या मोटेलपर्यंत कशी पोचली. कुणीतरी माझ्यासारखंच.....?

मी महतप्रयासाने मिळवलेली गाडी तिथेच सोडून देताना फार जड झालं मन.  हातात सामान घेऊन आम्ही परत निघालो तेव्हा लक्षात आलं की रस्त्यात अधूनमधून दिसणारी माणसं तोंडभरुन हसतात आणि हाय हॅलो करतात.  इकडे तिकडे बघत आपलं लक्षच नाही असं भासवत ओळखीच्या लोकांनाही टाळण्याची कला इथे उपयोगी पडणार नाही हे पटकन समजलं. आधी अवघडल्यासारखं, मग जिवणी ताणून चेहर्‍यावर भलं थोरलं स्मितहास्य ठेवत मोटेलमध्ये पोचलो. पण तोपर्यंत तोंड इतकं दुखायला लागलं की हुप्प करुन गप्प राहावसं वाटायला लागलं.  नवरा तर इतका खुष झाला या लोकांवर की सारखं आपलं रस्त्यावर रस्त्यावर चल सुरु झालं त्याचं.

दुसर्‍यादिवशी नवर्‍याचा एक मित्र आला तोही नवीनच होता  अमेरिकेत पण जुना झाल्यासारखा वागत होता. एक दिवसाचा जास्त अनुभव होता ना त्याच्या गाठीशी. त्याने मग आम्हाला रस्ता कसा ओलांडायचमा असे मुलभूत धडे दिले.  आम्ही निघालो त्याच्या मागून. त्याने असे आणखी दोन तीन नवखे पकडून आणले होते तेही निघाले बरोबर.  आता प्रात्यक्षिक. रस्ता ओलांडण्याच्या जागी आलो आणि त्या मित्राने पुढार्‍यासारखा हात वर केला 'थांबा' या अर्थी.  सगळे पावलांना ब्रेक दाबल्यासारखे जागच्या जागी खिळले.
एकदम पावलं जड झाली. भरधाव वेगाने धावणार्‍या मोटारी, रस्त्यावर कर्फ्यू असल्यासारखा माणसांचा शुकशुकाट आणि लाल, पिवळा, हिरवा असे झटपट बदलणारे सिग्नल ’रस्ता फक्त वाहनांसाठीच’ चा सूर लावून दटावतायत असंच वाटत होतं. यातून पलिकडे जायचं कसं.  पण तिथे एक बटण होतं ते दाबलं की चालायची खूण येते. मित्राने बटण दाबलं. तो आता टेचात निघाची खूण करणार तितक्यात 
"अरे वा"
 असं म्हणत मी लांब उडीच्या शर्यंतीत भाग घेतल्यासारखं साईडवॉकवरुन रस्त्यावर  उडी टाकली. माझ्या मागून बाकिच्यानी पण चार पावलं टाकली आणि भयाने अक्षरश: थरकाप उडाला. आमच्यासमोर  त्या सिग्नलचा रंग बदलला आणि आता तो लाल हात डोळे मिचकावल्यासारखा थांबण्याची खूण करत होता. नजर टाकू तिथे  चारी बाजूने खदाखदा हसत कारची चालू इंजिन्स आमच्याकडे पाहात उभी.  आतले डोळेही आमच्यावर रोखलेले. या लोकांना इतकी कमी लोकं रस्त्यावर पाहायला मिळतात ना, की बघत राहातात सर्कशीतला प्राणी रस्त्यावर आल्यासारखं. आता काय करायचं? मागे जायचं की पळत पुढे? आमच्यातले निम्मे आले तसे मागे गेले, उरलेले धावत पुढे. मी थोडं मागे पुढे केलं आणि  नवर्‍याच्या मागून पुढे धावले. पलिकडे जाऊन मागे गेलेले परत येतील याची वाट पाहात उभे राहिलो, तितक्यात  पाहिलं  की आमच्याबरोबर रस्त्यावर उतरलेली काही अमेरिकन माणसं हलत डुलत मजेत येत होती.  त्यांना आमची त्रेधातिरपीट म्हणजे गंमंतच असावी. पण मग हे का नाही धावले  हे रहस्यच होतं. आता ते उलगडल्याशिवाय चैन पडणार नव्हतं.

त्यांच्या त्या हलत डुलत चालीचं रहस्य कळायला मात्र बरेच दिवस लागले. तोपर्यंत ’वॉकिग सिग्नल’ दिसला  की ’अरे, चलो, चलो’ म्हणत आमची सगळी गॅग धावण्याच्या शर्यंतीत भाग घेतल्यासारखी पळत सुटायची. आता मागे पुढे न करता पुढेच पळायचं असं त्या मित्राने बजावलं होतं.  कधीतरी  वाहन चालनाचा परवाना वाचताना  कळलं की तो लाल हात डोळे मिचकावयला लागतो ते रस्त्यावर पाऊल न टाकलेल्यासाठी. एकदा तुम्ही रस्त्यावर आलात की जा अगदी आरामात. हे कळल्यावर मग आम्हीही कुणाच्या बापाचं काय जातं थाटात......चालायला लागलो.

मोटेलचे दिवस संपले आणि अपार्टमेंटमध्ये राहायला आलो.  आल्या आल्या आवारात कचर्‍याच्या पेटीत मायक्रोव्हेव टाकलेला पाहिला. कार्टसारखं करावं का असं वाटून गेलं पण.... खूप गोष्टीचं अप्रूप होतं, पण आवारातला पेपर रॅक  मला अतिशय आवडला. एकदा पैसे टाकले की कितीही प्रती घ्या. माझ्या दृष्टीने हा रॅक मल्टीपर्पज होता.
"भारतात असतो तर  शेजार्‍यापाजार्‍यांसाठी पण घेता आली असती नाही वर्तमानपत्र?" नवर्‍याने थंड नजरेने पाहिलं. (नशीब मायक्रोव्हेव बद्दल काय वाटतं ते बोलले नव्हते.) त्या थंड नजरेचा अर्थ मुर्ख, बावळट, जास्त शहाणी असा असतो. बोलण्याचं धाऽऽऽडस नाही ते असं नजरेतून डोकावतं. (ह्या माझ्या वक्तव्याचा त्याच्याकडून निषेध) तरीही मी खुंटा बळकट केल्यासारखं म्हटलं.
"आणि केवढी रद्दी जमवता आली असती. ती विकून...."   त्या रॅकचं दार आत्ताच ही सगळी वर्तमानपत्र काढून घेते की काय या भितीने त्याने धाडकन लाऊन टाकलं.

हे घराच्या बाहेरचं. आत गेल्यावर ते भलं मोठं घर आधी फिरुन पाहिलं.  ठिक होतं सगळं पण मोठा प्रश्न पडला, कपडे वाळत कुठे घालायचे? ही माणसं काय करतात कोण जाणे. सारखी मेली स्विमिंग पूलमध्ये धपाधप उड्या मारत असतात. यांच्या ओल्या कपड्याचं काय? बाल्कनीतून स्विमिंग पूलजवळ्च्या अर्धवस्त्र नार्‍यांकडे बघत मी विचारात गुरफटले. तितक्यात ’ हे ’आलेच
"स्विमिंग पूल बघायचाय?" माझा खोचक प्रश्न.  पण तो माझ्या बाजूला उभा राहून  निसर्ग सौदर्य पाहाण्यात इतका मग्न झाला की माझा प्रश्न त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. ती संधी साधून म्हटलं,
"कपडे धुवायचे आहेत."
"अरे देना मग, मी धुऊन आणतो"
"तू?" मी नुसतीच त्याच्याकडे अवाक होऊन पाहात राहिले. स्विमिंग पूल याला दारुसारखा चढला की काय?
"अगं पूलच्या बाजूलाच असतं मशीन, तिथे येतात धुता"
"तरीच" मी माझ्या नजरेत ’तरीच’  मधला भाव आणला.
"अरे पण पैसे, आय मीन डॉलर्स?"
"पंच्याहत्तर सेंट मध्ये कितीही कपडे धुता येतात."
"बाप रे, मग रांगच असेल मोठी"
"मशिन नाही गं बाई मशिन्स असतात"
"बरं बरं कळलं." असं म्हणत मी भारतातून आणलेल्या सगळया बॅग्ज रिकाम्या केल्या.
"एवढे कपडे?" तो दचकलाच ढिग पाहून.
"७५ सेंट मध्ये कितीही धुता येतात ना?" तो कपडे घेऊन घाटावर  आय मीन मशिनवर गेला.

मी जेवणाच्या तयारीसाठी आत वळले.  पोळीसाठी कुणीतरी ऑल परपज फ्लॉवर मिळतं ते वापरायचं म्हणून सांगिंतलं होतं. आम्हीही बिनदिक्कत एक मोठं पोतंच आणलं त्याचं. मी खा किती खायच्या त्या पोळ्या या थाटात आणि नवरा घे गं बाई तुझी एकदाची कणीक या आनंदात.  त्याच उत्साहात मी ते पोतं उघडलं.
’अगं बाई इकडची कणीक पांढरीशुभ्र असते की काय?’ अमेरिकेचं सगळंच बाई न्यारं या कौतुकात मी पिठाकडे पाहात राहिले, विचारायला कुणी नव्हतं म्हणून पिठालाच विचारल्यासारखं. पाणी घातलं तर त्या पीठाचं पिठलं झालं. पोळ्याऐवजी आंबोळ्या मिळाल्या आणि आम्ही आपलं, नाहीतरी आंबोळ्या होतच नाहीत फारशा तर खाऊया आता म्हणून दोन महिने ते पीठ संपेपर्यंत समाधान करुन घेतलं.

ऑलपरपजसारख्या (मैदा) कितीतरी शब्दांनी आम्हाला फसवलं पण आम्हीही पुरुन उरलो, आमच्या अज्ञानात कुणी ना कुणी भर घालत राहिलं. त्यानंतर ही साखळी गेली पंधरा वर्ष चालूच  आहे. एका अज्ञानातून ज्ञानाच्या कक्षेत प्रवेश केला की नवीन काहीतरी येतंच......

Thursday, July 7, 2011

हाताची घडी तोंडावर बोट!

(बदली शिक्षक म्हणून आमच्या राज्यात शाळांमध्ये काम करता येतं. त्यासाठी  शिक्षणक्षेत्रातील पदवी नसली तरी चालते, पण प्रशिक्षण घ्यावं लागतं.  मी  तीन चार वर्ष हे काम केलं, तेव्हा आलेल्या अनुभवांपैकी ह्या गमतीदार आठवणी. स्पेशल प्रोग्रॅमधली मुलं मात्र  झोप उडवतात  त्यांच्या वागण्याने आणि ती ज्या परिस्थितीत वाढत असतात ते पाहून. त्यावर नंतर केव्हातरी.)

महाविद्यालयात असताना घराजवळच्या पोलिस लाईनीतल्या मुलांच्या घेतलेल्या शिकवण्या एवढ्या पुण्याईवर मी अमेरिकेतल्या शाळेत शिकवायला जायचा बेत जाहीर केला आणि खिजवल्यासारखा हसला नवरा. तिकडे केलं  दुर्लक्ष पण मुलगा म्हणाला,
"आई, तू गणित शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? (नोटावर असतात हे ठाऊक आहे, पण तेच मनात भिनलेलं आहे) नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण पहिले धडे नाण्याचे घ्यावे लागणार हे लक्षात आलं. शाळेत जायच्या आदल्या दिवशी नवर्‍याला म्हटलं,
"काही आलं नाही तर तुला फोन केला तर चालेल ना?"
"तुझं अडणार म्हणजे गणित. एखादाच तास असेल तर चालेल."
त्याच्या आँफिसातला फोन मी शाळेत असताना सारखाच घणघणायला लागला.
"मला वर्क फ्राँम होम पोझिशन मिळते का पाहतो आता. म्हणजे दोन दोन नोकर्‍या घरातूनच करता येतील."
मी न ऐकल्यासारखं करत तयारी करत होते.
नाणी पुठ्ठ्यावर चिकटवून खाली नावं लिहिली. मुलांसमोर फजिती नको.

पहिला दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."

त्याच्या नाही पण दुसर्‍या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्‍या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग माझ्या माथ्यावर मारलेला.  सारेगमप ही मला कधी सुरात म्हणता आलं नाही तिथे मी काय संगीत शिकवणार आणि तेही इंग्लिशमध्ये.
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
धक्काच बसला, माझं काम वेळ मारून नेणं होतं.  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुण्णाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची.
रागारागातच वर्गात  सूर लावला. दिवसभर भारंभार मुलं येत होती संगीत शिकायला.  आऽऽऽऽ लावता लावता थकून जायला झालं.  कुणी काही विचारलं की थातूर मातूर उत्तरं देऊन भागत नाही पोरांसमोर. उलट सुलट विचारत राहतात. एकदा बिंगं फुटतंय असं वाटलं तसं एका मुलाला वर्गाच्या बाहेर काढलं. तो हटून बसला.
"मिस, मी का जायचं वर्गाच्या बाहेर?"
"मला तोंड वर करून विचारतो आहेस. जा म्हणतेय तर व्हायचं बाहेर."  आमच्यावेळेस होतं का असं धाडस शिक्षकांना विचारण्याचं. त्यावेळेस मिळालेल्या काही काही शिक्षांचं कोडं मला अजून उलगडलेलं  नाही :-) पण हे त्या मुलाला काय कळणार, कप्पाळ. कारण सांगितलं तसा तो बसला बाहेर जाऊन. थोड्यावेळाने एक उंच शिडशिडीत माणूस दारावर टकटक करत.
’हा शिक्षक की पालक?’ विचार मनात येतोय तोच तो म्हणाला,
"बरं दिसत नाही मूल बाहेर, आत घे त्याला."
'बरं दिसायला काय ती झाडाची कुंडी आहे?'  हे मनातल्या मनात
मी घरात नाही पण बाहेर जरा टरकूनच वागते. तू कोण सांगणारा वगैरे न विचारता मुकाट्याने त्याला आत घेतलं. नंतर कळलं की शाळेचा प्रिन्सिपाँल होता तो किडकिड्या.

त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी, कारण इतकं सगळं होऊनही त्या शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली होती. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले.

सगळी गोरी मुलं मला तरी सारखीच दिसतात.  त्यामुळे एखाद्या भारतीय मुलाला मी माझं लक्ष्य बनवायची वर्गाच्या बाहेर पडणार असू तर.  तिथेही थोडाफार गोंधळ होतोच. सगळी दाक्षिणात्य मुलंही मला एकसारखीच वाटतात.  त्या दिवशी मुलांना खेळायला घेऊन गेले मैदानावर. कसं कोण जाणे पण बाहेर जाताना नेलेली मुलं आत येताना बदलली. ती सुद्धा मुकाट्याने चला म्हटल्यावर रांग करून उभी राहिली आणि आली आपली माझ्याबरोबर. वर्गापाशी पोचल्यावर कुणाचं तरी धाडस झालं,
"मिस...."
"मिस एम" माझ्या नावाची आठवण करून दिली मी.  नुसतं मिस काय...., आदर  म्हणून नाही कार्ट्यांना.
"आम्ही तुमच्या वर्गातली मुलं नाही."
"ऑ?" मला पुढे काय बोलावं ते कळेना. दातखिळी बसल्यागत विचारलं,
"मग माझा वर्ग कुठे आहे? आणि तुमच्या शिक्षिकेला कळलं नाही तुम्ही माझ्याबरोबर निघालात ते?"
"ती सुद्धा तुमच्यासारखीच आहे."
"बापरे म्हणजे काय म्हणायचं आहे हिला?" माझ्या काळजातली धडधड लपवीत विचारलं,
"म्हणजे सबस्टीट्युट का?"
"हो" हुऽऽऽऽश
मग आम्ही दोघी बदली शिक्षिकांनी परत मुलांची अदलाबदल केली.

हे तसे जरा बरे प्रसंग माझ्या आयुष्यातले. स्पेशल म्हणजे काय त्याचा अनुभव यायच्या आधीचे. स्पेशल वर्गात उभी राहिले आणि कल्लू आडदांड मुलं बघून घाम फुटला. मला वाटलं होतं वर्गात फक्त बारा मुलं आणि काहीतरी स्पेशल करायला मिळणार. पण दृश्यं वेगळं होतं.
"व्हॉट्स युवर नेम?"
घाबरत मी म्हटलं.
"आय डोंट रिमेंबर"
"व्हॉट?"
"यू कॅन कॉल मी मिस जे." जेहत्ते ठायी काय असतं ते डोळ्यासमोर नाचलं.
तेवढ्यात;
"स्टुपिड"
"बास्टर्ड"
असं जोरजोरात किंचाळत दोन मुली मैदानात उतरल्या. चिंतातुर चेहर्‍याने मी नुसतीच पाहत राहिले. त्याचं भांडण कसं संपवायचं ते कळेना. तितक्यात देवदूतासारखी एक शिक्षिका अवतरली. बटणं दाबल्यासारखी तिने "स्टॉप, स्टॉप" म्हणत दोघींच्या वेण्या ओढल्या. मला खरं तर आता रणांगण सोडून पळायचं होतं. यापेक्षा लेखन बरं.
"धिस इज जस्ट अ स्टार्ट." तिने  धमकी दिल्यासारखं म्हटलं. मी घाबरून मान डोलवली. दुर्दैवाने चारी बाजूने घेरणं म्हणजे काय हे मला थोड्याच वेळात कळायचं होतं. पोरांना मैदानावर नेलं की आवाज, मारामारी, गोंधळ कुणाला समजणार नाही. मला हे सुचलं म्हणून मी माझ्यावरच खूश झाले. पण कसलं काय जेवणानंतर बाहेर धो, धो पाऊस. शाळेच्या जीममध्ये नेलं मग त्या कार्ट्यांना.
"नीट खेळा, मी बसले आहे इथे बाकावर." एका दिशेने माना हालल्या.
मी ही निवांत वेळेची स्वप्न पाहत बाकाच्या दिशेने मोहरा वळवला. कुठलं काय, माझी पाठ वळल्या वळल्या झोडपलं त्यांनी एकमेकांना बास्केटबॉलने.  मलाही ओरडत ओरडत माझ्या दिशेने येणारा बॉल चुकवण्याच्या प्रयत्नात व्यायाम व्हायला लागला. हळूहळू एकेक जण लागलं, लागलं करत बर्फ लावायला शाळेच्या कार्यालयात. जेनीफर तर बेशुद्ध होवून खाली पडली. माझं मस्तक आता फिरलं. पोरांनी फार पिडलं. माझी असती तर....
"ऊठ मेले, तुला काही झालं तर आई, वडील कोर्टात खेचतील मला. दिवाळंच निघेल माझं."
दोन्ही खांदे धरुन तिला उभं केलं. गदगदा हलवलं.
"आय कॅन्ट ब्रीद...आय कॅन्ट ब्रीद" डोळे गरगरा फिरवत ती तेवढं मात्र म्हणू शकत होती.
"मी टू...." मी पुटपुटले. पण एकदम झाशीची राणी संचारली अंगात.
"जेने, तुझ्या शिक्षिकेने नोट लिहिली आहे या तुझ्या वागण्याची. नाटक करू नकोस."
डोळे गरगरा फिरवले तिने. वाटलं हिच थोबाडीत देतेय की काय माझ्या नाटकी म्हटलं म्हणून. पण जादू झाल्यासारखी जेनीफर तरतरीत झाली. त्यानंतर पुन्हा सगळं त्याच क्रमाने पार पडत राहिलं. शेवटी मीही  कार्यालयातून बर्फाचा भलामोठा तुकडा आणला आणि डोक्यावर ठेवला माझ्या.


रडत खडत मी बदली शिक्षिकेचं कार्य पार पाडत होते ते एका समरप्रसंगाला तोंड देईपर्यंत.
शाळेत पोचले तर बार्बरा जवळीक दाखवित पुढे आली.
"तुझ्यावर कठीण काम टाकणार आहे आज."
चेहरा पडलाच माझा. पण उगाचच हसले. चेहरा कुठे पडला ते समजत नाही त्यामुळे असं आपलं मला वाटतं.
"नवीन शिक्षक आहे आज तुझ्या मदतीला."
"नो प्रॉब्लेम." एवढं काय करायचं अगदी एखाद्याला अनुभव नसेल तर.
"आय नो हनी." याचं हनी, बनी म्हणजे पुढच्या संकटाची नांदी असते. मी कान टवकारले.
"द अदर टिचर इज डेफ..." ती घाव घालून मोकळी झाली. तो झेलायचा कसा हा माझा प्रश्न. माझ्या आत्मविश्वासाचा बंगला कोसळलाच. इथे सगळे अवयव धड असणार्‍यांशी माझ्या मराठी इंग्लिश बोलण्याची कोण कसरत. त्यात हा बहिरा. म्हणजे मग मुका पण असेल का?
जेफचं आगमन झालं आणि नकळत ओठ, तोंड, हात आणि अंग, एकेका शब्दाबरोबर सगळे अवयव हालायला लागले. फार अस्वस्थ झाले मी की बघतच नाही दुसरा ऐकतो आहे की नाही. बोलतच सुटते. त्याच्या ओठांच्या हालचालींशी ताळमेळ घालणं पाचव्या मिनिटाला माझ्या आवाक्याबाहेर गेलं. प्रत्येक मुलाला  हातवारे करत आधी माझी आणि नंतर त्याची ओळख हा कार्यक्रम बराच वेळ चालला. त्याच्या ओठांच्या हालचाली समजेना झाल्या तसा मी कागद सरकवला.
"यू आर स्लो लर्नर...."
"व्हॉट?" मी एकदम डोळे वटारले.
"अदर्स अंडरस्टॅड्स माय लिपमुव्हमेंट क्विवली."
"मी अदर नाहीये पण."
दिवसभर आम्ही प्रेमपत्र लिहीत असल्यासारखे चिठ्ठ्या फाडत होतो. मध्येच तो भारत पाक संबंधावरही घसरला, मग तर काय तागेच्या तागे फाडल्यागत मी लिहीत राहिले. नंतर नंतर मी तो बहिरा हे विसरून जोरजोरात भाषणही दिलं त्याला या विषयावर. पोरं बिचारी कशीनुशी होऊन, न कळणारं सारं मुकाट ऐकत होती.

घरी आले की नवरा आणि मुलगा जादूच्या गोष्टी ऐकायला तयार असल्यासारखी सज्ज असायची. नवरोजी चहाचा आयता कप हातात देत श्रवण भक्तीला तयार. रोज एका चहाच्या कपावर इतकी करमणूक?  त्यांना त्याची फार सवय व्हायला लागली तसा त्यांचा तो आनंद माझ्या पचनी पडेना त्यामुळे एक दिवस हे शिकवण्याचं महान कार्य सुरू केलं तसंच ते बंदही.  माझ्या त्या निर्णयाने बर्‍याच मुलाचं कल्याण झालं असावं  असं  मी सोडून सर्वांचं ठाम मत आहे. असू द्यावे ते तसे बापडे :-)

(ही पोस्ट मी आधी लिहिली होती पण नंतर काही काही प्रसंग आठवत राहिले तेव्हा नव्यानेच लिहावं असं वाटलं.)