Wednesday, February 27, 2013

मॉन्स्यु (?) लझार (Monsieur Lazhar)

 चित्रपटाची सुरुवात होते ती माध्यमिक शाळेतला विद्यार्थी सायमन मधल्या सुट्टीनंतर इतर मुलांच्या आधी वर्गाच्या दिशेने जात आहे या दृश्याने. वर्गाचं दार उघडण्यापूर्वी त्याचं लक्ष दाराच्या आयताकृती काचेतून आत जातं आणि धक्कादायक दृश्यांने तो क्षणभर जागीच खिळतो.  गळफास लावून आत्महत्या केलेली वर्गशिक्षिका. सायमन सुन्न मनाने भिंतीला पाठ टेकून उभा राहतो, घंटा वाजायला लागते तेव्हा  सैरभैरपणे धावत सुटतो. कॅमेरा स्थिर असतो, आपण फक्त सायमनच्या पावलांचे आवाज ऐकत रहातो. त्यानंतर दिसतात ती मैदानातून परत आलेली मुलं, त्यांच्या शिक्षिका त्यांना वर्गात न जाण्याच्या देत असलेल्या सूचना आणि पुन्हा बाहेर जाणारी मुलं. ॲलिस मात्र या गोंधळातूनच हळूच दाराच्या फटीतून आत डोकावते.  पुन्हा एकदा गळफास लावून घेतलेली शिक्षिका आपल्याला दिसते. लांबून. तिचा चेहरा पूर्ण चित्रपटात कधीही दाखवलेला नाही.

शाळा या दु:खद घटनेतून  बाहेर येण्यासाठी मार्ग शोधत रहाते. भिंतीना नवा रंग दिला जातो.  मुलांनी मोकळेपणे बोलावं म्हणून शाळेतर्फे  मानसोपचारतज्ञाची नेमणूक होते.  दरम्यान, आत्महत्या केलेल्या मार्टिनच्या जागी कुणाला नेमावं या पेचात असतानाच बशिर लझार वर्तमानपत्रात बातमी वाचून बदली शिक्षकाच्या जागेसाठी  शाळेत येतात.  शाळेत घडलेल्या आत्महत्येच्या प्रसंगानंतर काम करायला यायलाही कुणी धजावत नसतं त्यामुळे त्वरित, फारसा विचार न करता लझारची नेमणूक होते.

शिक्षक म्हणून शांत, प्रामाणिक असलेले लझार  आणि ’त्या’ वर्गातल्या मुलांचे सूर मात्र  जुळत नाहीत. फ्रेंच उच्चारातील फरकामुळे अडचणी येत रहातात. त्यातच शिक्षक, पालक सारेच झालेल्या घटनेबद्दल मौन बाळगून आहेत. वर्गातही याबाबत बोलू नये अशा लझारना सूचना आहेत. मुलाने केलेल्या खोडीबद्दल लझारनी मारलेल्या हलक्याश्या टपलीबद्दल त्यांना कोणत्याही कारणासाठी मुलांना स्पर्श न करण्याची ताकिद प्राचार्याकडून मिळते.

मार्टिनच्या आत्महत्येचा परिणाम  प्रत्येकावर झालेला आहे. लझारना मुलांनी मन मोकळं करावं असं वाटतं.  शेवटी या विषयाबद्दल ’ब्र’ ही न काढण्याची सूचना धुडकावून मुलांना बोलायला उद्युक्त करण्याचे प्रयत्न जारी राखतात, मात्र सहशिक्षिकेने सुचवूनही स्वत:च्या जीवनाबद्दल मौन बाळगतात.

 वर्गातली सगळीच मुलं अस्वस्थ आहेत.  सक्त ताकिद असूनही लझार मुलांना ’बोलतं’ करतात. मुलं म्हणतात,
 "प्रत्येकाला वाटतं मार्टिनच्या आत्महत्येने आमच्या मनावर परिणाम झाला आहे पण खरं तर मोठ्यांच्या मनावरच तो तसा झाला आहे."
ॲलिसच्या भावना आपल्यालाही गलबलून टाकतात. हिंसा या विषयाबद्दल बोलताना अचानक  ती म्हणते,
"ही तीच शाळा आहे की जिथे मिस मार्टिनने स्वत:ला गळफास लावून घेतला. कधी कधी वाटतं, मिस मार्टिननी त्यांच्या कृतीने चुकीचा संदेश  का दिला आम्हाला? आम्ही चुक केली की शिक्षा मिळते तशी मला मिस मार्टिनला शिक्षा द्यावीशी वाटते चुकीची गोष्ट केल्याबद्दल. पण आता ती कशी देणार?" ती बोलत असताना सायमन अस्वस्थ होत जातो.
लझारना ॲलिसचे मनोगत पूर्ण शाळेत प्रसिद्ध करावंसं वाटतं, पण प्राचार्यांना मात्र ॲलिसच्या मनोगतात उद्धटपणाची झाक दिसते. मार्टिनचा अनादर वाटतो. लझार म्हणतात,
"कोणालाही जीवन संपवाव असं वाटतं यासारखी दु:खद घटना नाही आणि  शिक्षकी पेशा असलेली व्यक्ती त्यासाठी शाळा निवडते ह्याबद्दल मनात विषाद दाटून येतो. शाळेत गळफास लावून मुलांच्या बाबतीत मिस मार्टिनने जे केलं तो अनादर आहे. मुलांच्या भावविश्वाचा केलेला अनादर."

 सायमनचं वागणंही विचित्र होत चाललेलं आहे. त्याला शिक्षा करावी की नाही यावर शिक्षक, प्राचार्य कुणामध्येही एकमत नाही. लझार, मिस मार्टिनच्या कृतीमुळे सायमन अस्वस्थ आहे, त्याच्या मनावर या घटनेचा विपरीत  परिणाम झाला आहे हे कळकळीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात पण याबाबत कुणीही त्यांच्याशी सहमत नाही. काही काळाने सायमनच्या  वागण्यातल्या विसंगतीचा उलगडा होतो तेव्हा मुलं किती पटकन स्वत:ला परिस्थितीबद्दल दोष देतात, जबाबदार धरतात ते पाहून हेलावून जायला होतं.

 लझारना शेवटी ती शाळा सोडून जाण्यासाठी भाग पाडलं जातं. अगदी ताबडतोब. का...? मुलांचा निरोप घेण्याची त्यांची विनंती प्राचार्य नाईलाजाने मान्य करतात. काय होतं या शेवटच्या प्रसंगात? का आग्रह असतो  लझार यांचा विद्यार्थ्यांचा निरोप घेण्याचा ...?

फिलीप फलारड्यू लिखित आणि दिग्दर्शित फ्रेंच भाषेतील हा चित्रपट आहे. युरोपमधील विनोदी कलाकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेलाग या नटाने लझारची भूमिका केली आहे. तर सोफी नेलसी आणि एमलिन निरॉन या दोन मुलांनी ॲलिस आणि सायमनच्या भूमिका सुंदररित्या साकारल्या आहेत.

परकिय भाषेतील भाषांतरीत संवाद वाचताना चित्रपटातील दृश्य पुढे सरकून जातं म्हणून चित्रपट पहाण्याची उत्सुकता वाढावी इतपत ही  कथेची ओळख.


(हा चित्रपट नेटफ्लिक्स वर आहे)

Tuesday, February 19, 2013

आकाशवाणी

काही वर्षापूर्वी, रत्नागिरीला गेले तेव्हा आवर्जून आकाशवाणीत गेले. सगळ्यांची भेट होईल, जिथे काम केलं ती जागा  पुन्हा पहावी, ’ऑन एअर’ चा लाल दिवा डोळ्यात साठवावा, गप्पा झाडायचो त्या भोजनालयात जाऊन पुन्हा हसावं खिदळावं असं काही बाही मनात होतं. पण अवकळा पसरलेलं ते केंद्र विषादाचा चरा उमटवून गेलं मनावर. मी काम करत असतानाची सगळी जणं कामाच्या वेळा वेगळ्या असल्याने ठरवूनही तिथे एकत्र भेटणं कठीणच होतं.  जिथे हक्काने ’आवाज’ फुटायचा तिथे मनातल्या भावना शब्दाने व्यक्त कराव्याशा वाटल्याच नाहीत.  सरकारी आकाशवाणी केंद्रांची अवस्था आता कशी आहे याची कल्पना नाही, पण सात आठ वर्षापूर्वी फार बिकट होती.
परतीच्या मार्गावर ’आकाशवाणी’ मनात पिंगा घालत राहिलं. पार शाळेच्या उंबरठ्यापाशी घेऊन गेलं.

रात्री साडेनऊला लागणारं कॉफीहाऊस, प्रपंच मालिका, सकाळी सात, दुपारी दिड, संध्याकाळी सात आणि रात्री आठ वाजता लागणार्‍या प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्या.
कॉफी हाऊसमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आणि भाग्यश्री जोशी. हसत खेळत युवावर्गांच्या गप्पागोष्टी असायच्या ह्या. प्रपंच मध्ये प्रभाकर पंत, मीना वहिनी आणि टेकाडे भावजी. त्यातल्या मीना वहिनी म्हणजे नीलम प्रभु (करुणा देव), आवाज आणि उच्चारांचा त्यांच्या इतका प्रभावी वापर केलेलं कुणी पाहिलं नाही मी अद्यापपर्यंत.  त्यांनी केलेल्या  एका श्रुतिकेतील मुलगी, मध्यमवयीन आणि वृद्ध स्त्रीचे आवाज ऐकून मला कितीतरी दिवस दुसरी नीलम प्रभु व्हायचं होतं :-).

जुन्या आठवणींबरोबर आकाशवाणीत काम करत असतानाचेही दिवस पिंगा घालत राहिले. ज्या जगाचं आकर्षण होतं त्या जगात डोकावयला मिळालं. काम करायला मिळालं. सुरुवातीला आकर्षण होतं ते आकाशवाणीची गाडी पहाटेच्या कामाच्या वेळेला न्यायला घरी येते त्याचं. कुण्णीतरी अगदी मोठ्ठं झाल्यासारखं वाटायचं गाडीत बसताना. आकाशवाणीत पोचलं की कार्यक्रम काय काय आहेत ते पहायचे, पटापट निवेदन लिहायचं आणि कार्येक्रमाचं सारं सामान घेऊन स्टुडिओत. खाक खुक करुन आवाज नीट आहे ना हे पाहिलं की पहिल्या कार्यक्रमाची तबकडी घालून ठेवायची. आणि मग ’ऑन एअर’ चा लाल दिवा कधी लागतोय त्याकडे नजर ठेवून बसायचं. एकदा का तो दिवा लागला की आपले आपण, म्हणजे  काही गोंधळ होईपर्यंत. तसा तो व्हायचाही अनेकदा. आवाजात चढ उतार आणत सगळं काही बोलून झालं की अचानक गडबडीने तंत्रज्ञ आत घुसायचे. बटनं चुकीची दाबल्यामुळे किंवा न दाबताच बोलल्याने श्रोत्यांनी काहीही ऐकलेलं नसायचं. मग, माफ कराही अशा झोकात यायचं की काही तरी फार मोठं श्रोत्यांना सांगतोय असा आव यायचा त्यात.

निवेदकांमध्ये आपापसात स्पर्धा असायची ती सूर मनी रंगती आणि आपली निवड हा संगीताचा कार्यक्रम सादर करताना. अस्सं काही निवेदन असायचं ना प्रत्येकाचं. एकतर श्रोत्यांकडून वाहवा मिळावी हा हेतू आणि कार्येक्रम अधिकार्‍यांकडून मिळणारी श्रेणीही महत्तवाची.
एक आठवण कायमची मनात रुतली आहे. गाणं होतं, ती गेली तेव्हा.... दोन ओळी ऐकून पूर्ण गाणं काय आहे याचा अंदाज घ्यायचा आणि निवेदन लिहायचं. ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता.... या गाण्याला माझं निवेदन होतं ते प्रेयसी प्रियकराला भेटून निघाली आहे अशा अर्थीचं. वयाच्या २१, २२ वीशीचा हा परिणाम. निवेदन संपलं, गाणं सुरु झालं. आणि हातापायातलं त्राणंच गेलं. ती आई होती म्हणूनी.... ऐकलं आणि काय गोंधळ केला आहे ते लक्षात आलं. कहर म्हणजे, एकाच गाण्याकडे निवेदक किती वेगळ्या दृष्टीने बघू शकतो याचं श्रोत्यांना कौतुक वाटलं होतं.

आकाशवाणी रत्नागिरीहून मुंबईला गेले. कामावर हजर होण्यापूर्वी साहेबांची भेट घ्यावी म्हणून त्यांच्या खोलीत गेले. टेबलाची रचना विचित्र होती की माझा गोंधळ उडाला होता कुणास ठाऊक. खोलीत कुणीच नव्हतं. मी एका खुर्चीवर बसले. थोड्यावेळाने साहेब आले. मी उठून उभी राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. पुन्हा बसले. ते आपले उभेच. काहीतरी चुकतय असं वाटत होतं पण काय ते कळत नव्हतं. काही वेळ असं बोलणं झालं आणि मी म्हटलं,
"सर, तुम्ही बसा ना." ते म्हणाले,
"तुम्ही माझ्या खुर्चीवर बसला आहात."
"ऑ?" विजेचा धक्का बसल्यासारखी उठले. मुंबई आकाशवाणीची सलामीची भेट झडली ती अशी.

एकदा कोणतातरी कार्येक्रम ध्वनिमुद्रित केला होता. चुकून त्यावर आणखी एक कार्यक्रम टेप केला. मग पुन्हा त्या कलाकारांना बोलवून ध्वनिमुद्रण, मुंबईसारख्या ठीकाणी पुन्हा सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेली शाब्दीक कसरत अजूनही आठवते.

एक ना अनेक प्रसंग काही हसवणारे, महान कलाकारांची भेट झाल्याचा आनंद मिळवून देणारे, काही हातपाय गाळणारे तरीही सगळे मंतरलेले...


(इंद्रधनु - तुझ्या पोस्टमुळे या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.)

Thursday, February 14, 2013

वयाची ऐशीतैशी...

मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकत्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोळत राहिलं.

घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."
"इऽऽऽऽऽऽऽऽ, पिल्लू काय गं, मी काय आता लहान आहे का?"  पिल्लूला पंख कधी फुटतील याची घाई.
"अगं केस पांढरे झाले आहेत का काय ते पाहते आहे."
" ग्रेसफुली एजिंग आई, ग्रेसफुली एजिंग. पांढरे केस चांगले दिसतात, कशाला ते रंग बिंग लावायचे?."
"ए, ते  ग्रेसफुली एजिंग नट्यानांच शोभतं हं. म्हणजे सगळे उपाय करायचे, उपाशी तपाशी राहून शरीर थकवायचं पण तरी वय वाढणं काही थांबवता येत नाही की असं म्हणायचं.  वा  रे वा (इथे मी मुलीला ओरडते तशी त्या अदृश्य अनामिक नटीला ओरडले). आणि केस पांढरे होण्याचा आणि वयाचा काही संबंध नसतो." आपल्या दु:खावर आपणच  मलमपट्टी केलेली बरी.

"बरं, तुला इमेल आलं आहे बघ. ’पंखा’ आहे तुझा. लिहलय, मला ’अहो, जाहो’ नका म्हणू, मी तुमच्यापेक्षा लहान आहे." दु:खावर मीठ चोळणार्‍या त्या वाक्याने मी मुलीला, माझं इ मेल तू कशाला वाचतेस हे ही विचारायला विसरले.
"ह्यांना कसं काय कळतं कोण जाणे, मी मोठी आणि त्या लहानच असणार ते." लेक ढिम्म उभी बघून मला चेव चढला. " आमचं मेलं सगळं जगासमोर मांडलेलं. तरी बरं, संकेतस्थळांवर फोटो पाळण्यात असतानाचे टाकले आहेत. उभं राहून फोटो काढायचा तर एक पाय पुढे धरुन तो काहीसा वाकवून, मग पोट आत घेऊनच उभी राहते. या कसरती कमी म्हणून की काय चीजऽऽऽ म्हणताना नुकत्याच दि्सायला सुरुवात झालेल्या डोळ्याच्या बाजूच्या  एक दोन (?) सुरकुत्या दिसणार नाहीत असं हसायचं. इतकं करुन्ही  कशा या बायका माझं वय काढतात, स्वत:ला लहान समजतात?"  एखादी शोकांतिका समोर घडत असल्यासारखा चेहरा झाला असावा माझा.
"अगं आई तू लिहतेस ना, त्यातून कळतं तुझं वय. म्हणजे मुलांच्या वयाचे उल्लेख असतात ना त्यावरुन."
मोट्ठा शोध लागला असं वाटलं, चला यापुढे लेखनातून मुलं वगैरे बाद एकदम. खूप आनंद झाला समस्या शोधून उपाय केल्याचा म्हणजे  ’सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही......’  संपल्यासारखं वाटलं. पण काही क्षणच. प्रश्न पडला, मग मी लिहू तरी काय? माझी ही इतकी ’गुणी’ मुलंच तर सातत्याने विषय पुरवत असतात भलतंसलतं वागून माझ्या लेखनाला. माझ्या विनोदाचं मर्मस्थानच नष्ट केल्यासारखं होईल अशाने. तितक्यात लहान मुलाची समजूत घातल्यासारखी मुलगी म्हणाली.
"पण खरं तर तू आहेस त्यापेक्षा पाच वर्षानी लहान दिसतेस ते त्यांना कसं माहित असणार ना? ते वाचक आहेत प्रेक्षक नव्हेत."
"खरंच? म्हणजे काय वय वाटत असेल गं माझं?" उत्तर काय येतं याची धाकधूक होती परिक्षेला बसल्यासारखी.  पण त्यातून तरुन निघाल्याचा आनंद वाढवतील ती आपली मुलं कसली.  गणिताची बोंब असल्यासारखा लेकीचा हिशोब चुकला. माझ्या वयातली पाच वर्ष कमी होण्याऐवजी दहा वाढली. माझ्या एकाचवेळी पडलेल्या, लटकलेल्या, रागावून लाल झालेल्या चेहर्‍याकडे पाहून धोक्याचा इशारा तिने अलगद झेलला. विषयाचं तोंड दुसरीकडे फिरवण्याचा चतुरपणा ती वडिलांकडून शिकली आहेच.

"आई, तुझं बाई काही समजत नाही.  इकडे सर्वांनी तुला अगं तुगं करावं असं वाटतं, पण आपण मागच्यावेळी पुण्यात दुकानात गेलो होतो....."
ती काय विचारणार ते लगेच कळलं. पोरगासा दुकानदार.

"इकडे ये." हातातली थप्पी दाखवत तो म्हणाला. नुकत्याच मिसरुड फुटलेल्या मुलाकडून,  ए......ऐकल्यावर  मस्तक फिरलंच.
"मी काही शाळकरी पोरगी नाही. तुम्ही अगं तुगं का करताय?" फुत्कारत प्रश्न टाकला. तो हसला.
"नाही, जीन्समध्ये असलं कुणी की अहो, जाहो नाही करायचं असं बाबांनी बजावलं आहे." कुठे गेला तो तुझा बाबा हा प्रश्न  मी न विचारताही त्याने  जोखला.
"बाबा संध्याकाळी येतात दुकानात."
भरपूर कपडे पाहायचे पण घ्यायचं काहीच नाही. मी मनोमन बदला घ्यायचा ठरवलं आणि तस्संच केलंदेखील.
दोन पौंड वजन कमी केल्यासारखा आनंद झाला बदला घेतल्यावर. त्या आनंदात तरळत नवथर उत्साहात दुकानाच्या पायर्‍या उतरले. आत्ताही चेहर्‍यावर तसे भाव आले असावेत.
"आई...." मुलीने लक्ष वेधलं.
"अगं ते वेगळं. म्हणजे बघ कंडक्टर, रोजच्या कामवाल्या आजी, भाजीवाली सगळे कितीही मोठे असले तरी त्यांनी आपल्याला अगं तुगं करुन कसं चालेल?"
"असंही असतं? आमच्या इंग्लिशमध्ये सगळ्यांसाठी सारखाच नियम असतो."
"हं... ते वेगळं." उत्तर न सुचून पुन्हा ते वेगळं चा सूर पकडला मी.

सध्या माझी मोहीम सगळ्या ब्लॉग ना भेटी द्यायच्या, खालच्या कॉमेंट्स वाचायच्या आणि खुषीने उड्या मारायच्या अशी आहे. म्हणजे प्रत्येकजण या अनुभवातून कधीना कधी जातोच तर हे समाधान त्या खुषीच्या उड्यांमागे.
काही ब्लॉगर्सची आधीच विनंती असते ’अगं/ अरे’ म्हणायची, नाहीतर काही ठीकाणी
मला कृपया ’अहो’ म्हणू नका,  ’सर काहीतरीच वाटतं बुवा’ अशी आर्जवे,
त्याला छोट्यांनी
’नाही तुम्ही मोठे आहात/मोठ्या आहात, मी लहान आहे’  ची जोडलेली पुष्टी. मग ब्लॉगर्सचा प्रश्न
’तुला कसं कळल’
’पोस्ट वाचून.....’ वाचकाचं उत्तर.

रोज भेटणारी कितीतरी माणसं, त्यांनी आपल्याला ’अगं तुगं, अरे’ केलेलं चालत नाही आपल्याला, पण ब्लॉगवरच्या कधीही न पाहिलेल्या मंडळीना मात्र आपला आग्रह किंवा अधूनमधून भेटणार्‍या मैत्रीणींच्या मैत्रीणींनी ही आपल्याला अगं तुगं करावं ही अपेक्षा.... एकूणच लहानांना मोठं व्हायचा ध्यास, मोठ्यांना लहान म्हणवून घ्यायचा सोस आणि लहानांना आपण कित्ती ’ज्युनिअर’ हे ’सिनियर्स’ ना ठणकावून सांगायची घाई..........कीती ही गुंतागुत?

Tuesday, February 12, 2013

माझंही मत...

मुलाबरोबर दिल्लीच्या ’त्या’ घटनेबद्दल बोलत होते. तो एक वर्षाचा असल्यापासून आम्ही भारताबाहेर आहोत त्यामुळे म्हटलं तर तो अभारतीयच पण मुळ भारतीय असल्याचा अभिमान बाळगत तो भारत कसा बदलायला हवा या गुंगीत खूपवेळा असतो. जी वेडी स्वप्न १७ वर्षाचे असताना आम्ही पाहिली तेच आता त्याचं वय, त्यामुळे तोही तेच करतो आहे हे कळतं तरी थोडी वादावादी, तू भारतात रहात नाहीस, तुला तिथली परिस्थिती माहित नाही वगैरे आल्यावर तो म्हणाला,
"तो तुझा देश आहे तसा माझाही."
"अरे पण आम्ही जन्मलो, वाढलो तिथेच. पंचवीशीनंतर पडलो बाहेर."
"पण मी भारताबद्दल बराच अभ्यास केला आहे. तिथल्या चालू घडामोडी माहित असतात मला."
या चर्चेतून तो म्हणाला,
"ठीक आहे. मला काय वाटतं ते मी माझ्या ब्लॉगवरच लिहतो."
"बरं" म्हणून तो विषय संपला.

त्यानंतर कधीतरी त्याच्या मनातले विचार इथे उमटले. त्याने लिहलेली ही पोस्ट, इंग्लिशमध्ये. वाचून आपली मतं त्याच्याच ब्लॉगवर नोदवलीत तर आनंद होईल.

हा त्याच्या ब्लॉगचा दुवा - http://www.chicagoindy.com/2013/01/thoughts-on-2012-delhi-gang-rape.html

तसंच कुणाला ठाऊक आहे का इंग्लिश ब्लॉग कुठे जोडता येतात जसे आपण मराठी जोडले आहेत तसे?