Monday, September 18, 2023

बातमी गोळीबाराची


बातमी गोळीबाराची
चुकचुकून नित्यक्रमाला लागण्याची
खात्री असते हे आपल्यापासून दूर असण्याची!
पण कधीतरी वेळ येतेच
सरावलेल्या मनाचा तोल ढवळून निघण्याची!

घडत होतं सारं लेकिच्या विद्यालयात
उज्ज्वल भविष्याच्या प्रांगणात!
डोळ्यासमोर जीव उभे
भितीच्या छायेत हादरुन गेलेले!
प्रांगणात पडलेले, घायाळ झालेले
मनाच्या, शरिराच्या चिंध्या उडालेले!
मिटून घेतले डोळे, खुपसलं डोकं तळव्यात
पोटच्या गोळ्याला जणू धरुन बसले हातात!

बातमी आली,
सगळ्या मुलांना खोलीत सुरक्षित बंदिस्त केल्याची
लेकरांचा जीव खोलीत कोंडून ठेवलेला, भितीने गुदमरलेला
पालकांचा  श्वास अडकलेला, लेकरांच्या जीवात गुंतलेला!

कितीतरी घरात ही अशी परिस्थिती
बाहेर विद्यालयाच्या गर्दी पत्रकारांची, पोलिसांची!
चर्चा सगळीकडे ’ब्रेकिंग न्यूजची’!
अक्राळविक्राळ होतो पोटातला गोळा
जेव्हा बळी पडतो प्राध्यापक लेकिला माहित असलेला! 

एक शिरशिरी उभ्या अंगातून
लेकीच्या भावविश्वाचा तडा घ्यावा कसा सांधून!
सुकून जातो गळ्यातला आवंढा
तरी वाटतं रडावं ढसाढसा
सगळं काही आलबेल, कळायला लागतात दोन तास
एकच गेला जीव या विचाराचा होतो अतोनात त्रास!
आपण काळजीने त्रस्त
लेक ओठ मिटून घट्ट!
वाट पाहायची तिने मोकळं व्हायची
मनातल्या भावना व्यक्त करायची! 

आणि...

पुन्हा एकदा त्याच जात्यातून तसंच धान्य दळलं जातं
पुन्हा मुलं कोंडली जातात, श्वास अडकतात!
फक्त होत नाही जिवितहानी
तेच समाधान बाळगायचं मनी!
यावेळी मात्र लेक बोलते
म्हणते, रोज मरे त्याला कोण रडे!
पण भिती आम्हाला खरंच वाटते
सावध राहायचा क्षीण येतो
कशाला गं माणूस असं करतो!

तीन तासांच्या अंतरावर असलेल्या
लेकराला मारावी वाटते घट्ट मिठी!
कुशीत ठेवावं अलगद जपून
द्यावं आश्वासन सुरक्षिततेचं भविष्याचे पंख छाटून!

कळत नाही कशी करावी ही वृत्ती नष्ट

अन पसरतील पंख मुलं निर्धास्त - मुक्त!


(पर्णिकाच्या महाविद्यालयात २८ ऑगस्टला आणि नंतर १२ सप्टेंबरला गोळीबाराच्या घटना घडल्या. मुलं अशा घटनांना तोंड देताना सावरल्यासारखी वाटत असली तरी त्यांच्या मनावरचं भितीचं सावट पटकन नाहीसं होत नाही आणि भावनिकदृष्ट्या त्यांना जाणवलं नाही तरी परिणाम होत असतातच. पर्णिका आणि तिथे शिकणार्‍या सर्वच मुलांचा विचार मनात येऊन उमटलेले शब्द)