Monday, October 28, 2019

आंतरजालीय दिवाळी अंक - माझी कथा - संकोच

मराठी माणसाचा नादिष्टपणा काय करायला लावेल ते सांगता येत नाही. मामबोकरांच्या (माझा मराठीचा बोल)डोक्यात अंकाचं ’खूळ’ तीन वर्षापूर्वी आलं. पहिले दोन अंक ’आपले आपण’ सदरात मोडणारे होते. यावर्षी  ’आंतरजालीय अंक’ काढायचं ठरलं. 
अंक वाचनीय आहे. भारत आणि अमेरिकेतल्या लिहित्या हातांचं दर्जेदार साहित्य या अंकात आहे. तुम्हाला तिथली अक्षरं वेगळ्या दुनियेत घेऊन जातील याची खात्री वाटते. वाचा आणि प्रतिक्रिया नोंदवून आमचा उत्साह वाढवा. - https://www.mambodiwali.com

या अंकासाठी मदत करत असताना नकळत आठवण झाली ’अस्मिता’ त्रैमासिकाची. केरीमध्ये राहत असताना ’अस्मिता’ नावाचं त्रैमासिक आम्ही काढायचो. या उत्साहाच्या परिणीती म्हणजे, आज तिथल्या नगरवाचनायात शेकड्यांनी मराठी पुस्तक उपलब्ध आहेत. 
या अंकातील माझ्या कथेत लहान मुलीचं विश्व आहे. तिच्या नजरेतून तिला दिसणारे तिचे सावत्र वडील आहेत. दोघांच्या नात्यातला भावनिक गुंता हलक्याफुलक्या स्वरुपात सोडवला आहे. हा प्रवास सुखद वळणापाशी कसा पोचतो त्याची ही कथा... वाचताय ना? वाचून तिथे प्रतिसाद नोंदवायला विसरु नका:

Tuesday, October 22, 2019

झाशीची राणी आणि शाबासकी

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. गुरु सांगतील ती पूर्वदिशा त्यामुळे टाळ्या का वाजवतोय ते कळलं नाही तरी आम्ही टाळ्या वाजवत राहिलो. सरांनी खूण करून मला बोलावलं. अतीव आनंदाने मी उभी राहिले. बाकड्यामधून बाहेर आले. बाकड्यांच्या मधल्या अरुंद गल्लीतून वाट काढत किल्ला लढवल्याच्याच आवेशात सरांजवळ पोचले. मागचा फळा म्हणजे किल्ला असल्याचा भास मला होत होता. त्यापुढे उभं राहून ’मेरी झॉंसी नही दूंगी’ अशी घोषणा केली की आठवत नाही कारण पुढच्या क्षणाला झाशीची राणी ढळाढळा अश्रुपात करत, बाकड्यांमधून सैरावैरा धावत, खालीमान घालून लाकडी आसनात शिरली. जाधवसरांनी गुरुजीपणाचा किल्ला असा काही लढवला की झाशीच्या राणीचं पानिपत झालं. सरांनी आपला वाक्बाण सोडला.
"या आपल्या झाशीच्या राणी. चाचणी परीक्षेला ४ ते ७ धड्यांचा अभ्यास करायचा होता पण यांना ९ व्या धड्यातली झाशीची राणी आवडली आठवली आणि ती उत्तरपत्रिकेत आली. शाबास! त्यांच्या या अतुलनीय पराक्रमासाठी मी भोपळा देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे." मुलांनी पुन्हा जोरदार टाळ्या वाजवल्या. या वेळेस प्रत्येकाला आपण टाळी का वाजवतोय ते ठाऊक होतं. आणि प्रत्येकजण तो आनंद लुटत होतं. मी सोडून. अचानक हाती आलेल्या भोपळ्याचं आणि झाशीची राणी या पदवीचं काय करावं ते कळेना.

पूर्वीपासून माझं एक होतं. उत्तर चुकीचं लिहिलं तरी चालेल, जागा मोकळी सोडायची नाही. शिकवणच तशी होती. काही म्हणता काही फुकट घालवायचं नाही. जन्मापासून हेच ऐकत आल्यावर काय बिशाद काही फुकट घालवण्याची, त्यामुळे उत्तराची जागा फुकट घालवणं अशक्यप्राय. प्रश्नपत्रिकेतपण असायचंच ना, ’मोकळ्या जागा भरा.’ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. नुकतीच ओळख झालेली झाशीची राणी अंगात भिनलेली. ती मला इतकी भावली होती हे सरांना समजावं इतक्या निरपेक्ष हेतूने मी तिच्याबद्दल लिहून ’मोकळी जागा’ भरली. विद्यार्थी परीक्षेला नसलेले धडेही आधीच वाचतात, नुसते वाचून थांबत नाहीत, काय वाचलंय ते लक्षात ठेवतात, मोकळ्या जागा त्याने भरून टाकतात या सगळ्याचं खरंतर सरांनी कौतुक करायला हवं होतं की नाही?

त्यादिवसापासून मी अख्ख्या शाळेची ’झाशीची राणी’ झाले. कुणीही, कधीही मला त्या नावाने हाक मारायचं. झाशीच्या राणीसारखाच पराक्रम खर्‍याअर्थी गाजवणं आता भाग होतं. कार्यक्षेत्र वेगळी असली म्हणून काय झालं.
"जाधवसरांना इतिहासात १०० पैकी १०० गुण मिळवून दाखवले तरच नावाची झाशीची राणी." अशी घोषणा आधी मी मनातल्यामनात केली. गुण मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो हा मोठा अडथळा त्यात होता. पण आता गत्यंतर नव्हतं. येताजाता कुणी ’झाशीची राणी’ म्हणून चिडवलं की झेंडा हातात धरल्यासारखं उभं राहून घोषणा द्यायला लागले. शाळेतली ती घोषणा लहानश्या गावात लवकरच पसरली, घरीही पोचली. आईने एकदा आठवण करून दिली.
"झाशीच्या राणी अभ्यासाला बसून इतिहास कधी घडवणार?" मी परीक्षा लढवायला घेतली. परीक्षा लढवायचीच तर अंतिम ध्येय वार्षिक परीक्षा हे नक्की केलं. येता - जाता इतिहास उगाळला आणि अखेर परीक्षा ’सर’ केली. इतिहास या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले.

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी पुन्हा एकदा जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. या वेळेस प्रत्येकाला टाळ्या वाजवण्याचं कारण ठाऊक होतं.  सरांच्या जवळ जाऊन उभी राहिले. सरांनी कौतुकाने पाठीवर शाबासकीची थाप मारली. ही थाप आज इतक्या वर्षानंतरही मला जशीच्यातशी आठवते आणि त्याची आठवण करून द्यायला कुणी ना कुणी असतंच. म्हणजे होतं असं, दर काहीवर्षांनी मला कुणीतरी भेटतं ते हमखास विचारतं,
"तू जाधवसरांची विद्यार्थिनी होतीस ना?" माझी त्या व्यक्तीशी ओळखही नसते पण मला ताबडतोब कळतं.
"हो. मी त्यांची झाशीची राणी." मी हसून सांगते.
"तुझ्या जिद्दीचं फार कौतुक करतात सर." बोलणार्‍याच्या स्वरातूनच मला कळतं की सरांना माझं किती कौतुक होतं. फक्त जाधवसरांनाच नाही सगळ्याच सरांना. या प्रसंगानंतर दोन वर्षांनी माझ्या दुसर्‍या शिक्षकांनी वर्गात शिरायच्या आधीच खिंडीत गाठल्यासारखं दारात अडवलं होतं.
"तुझ्याबद्दल मी पैज मारली आहे."
"ओ?" एवढाच उद्गगार निघाला माझ्या तोंडून.
"हे बघ, ११ वीत तास चुकवायचे, बंडखोरपणा करायचा, शिक्षकांविरुद्ध भाषणं ठोकायची हे सगळं समजू शकतो मी. शिक्षकांना तू हुशार आहेस हे ठाऊक आहे पण अभ्यासात लक्ष घातलं तर. १२ वीत काय दिवे लावणार असा प्रश्न पडलाय त्यांना. तू काही घोषणा करायच्याआधी मीच करून टाकली आहे. तेव्हा लागा अभ्यासाला आणि मिळवा गुण चांगले. तुझ्यामुळे मी पैज हरलो तर फार वाईट वाटेल मला." सरांनी दरवाजा अडवल्यामुळे मी त्यांच्या बाजूने अंग वाकडंतिकडं करत वर्गात जाऊन बसले. सगळ्या शिक्षकांनी ’कट’ केला आहे हे दिसतच होतं. पुन्हा एकदा परीक्षा ’सर’ करणं आलं हे दिसतंच होतं. वैतागत सरांनी पैज हरायला नको म्हणून पुन्हा अभ्यासाला लागले.

दुसरी शाबासकी मिळवायची होती पण पहिल्या शाबासकीने ’इतिहास’ घडवला.

Wednesday, October 16, 2019

कसब

पन्नाशीच्या पुढची लोकं सतत, ’मागे वळून बघताना...’ असं म्हणत असतात. नुकतीच पन्नाशी पार केली असल्याने मलाही मागे वळून बघावंसं वाटायला लागलं. चष्मा न घालताही बरंच काही दिसायला लागलं... नुसतं दिसून काय उपयोग, मागे वळून पाहिलेल्याचं पुढे काय झालं हे ही महत्वाचं,

माझी आई अप्रतिम गायची आणि मला माझ्या आईसारखं व्हायचं होतं म्हणून मी गाणं शिकायला सुरुवात केली. आमच्या गुरुंनी थेट ओंकार प्रधाननेच सुरुवात केली. मला ते गाणं इतकं आवडलं की नकळत मी ते वेगवेगळ्या पद्धतीने गाऊन पाहायला सुरुवात केली. गुरु म्हणाले,
"तुझा आवाज छान आहे पण जी चाल शिकवलेली असते त्याच चालीत गायला पाहिजे." मी प्रयत्न करत राहिले, नविन चालींची भर पडत राहिली. माझ्या गुरुंनी माझ्यासमोर हात टेकल्यासारखा गळा टेकला. गाण्याचा वर्गच बंद करून टाकला. तेव्हापासून माझं ’गाणं’ राहिलं आहे.

गाता गळा बंद व्हायच्या आधी थै, थै थक करत पाय थिरकत होते. सगळ्या मैत्रिणी कथ्थक शिकायला जायच्या. आमची एक मैत्रीण तिच्या घरी गेलं की कथ्थकचा सराव आम्हाला बघायलाच लावायची. मी बदले की आग घेऊन कथ्थक शिकायला जाणं सुरू केलं. आल्या मैत्रिणी की कर कथ्थक असं करायचा माझा डाव होता. पण माझ्या दाणदाण पदरवाला गुरु इतक्या वैतागल्या की त्यांनीही तो वर्ग लवकरच बंद केला आणि मी फक्त मैत्रिणीचं कथ्थक बघत राहिले.

ट्रेकिंग करायचं होतं पण, ’गप्पा मारत राहिलीस की चढायचं विसरतेस’ असं म्हणत माझ्यामुळे मित्रमैत्रिणींनी स्वत:चं ट्रेकिंग बंद केलं. त्यांची कुठलीशी संस्था होती ती बंद पडली. घ्या, पाद्र्यांना पावट्याचं निमित्त.

याला काही दशकं झाली आणि ’बकेट लिस्ट’ आली. मलाही वाटायला लागलं त्यात काहीतरी टाकावं. बॉलीवूड नाच शिकायला घातलं स्वत:लाच. पहिल्या तासाची जाहिरात घरात, पूर्वी रिक्षातून फिरत ओरडून करायचे तशी आठवडाभर केली. घरातले तीन जीव मुठीत धरून माझा नाच पाहायला सज्ज झाले. नंतर वेळेवर नाहीसे व्हायला लागले, लपायला लागले.

लपायच्या, नाहीसं व्हायच्या जागा संपल्यावर ’पण माझी गुरु शिकवते तेव्हा मी मस्त नाचते. घरी आल्यावर जमत नाही.’ ही नृत्याच्या अगोदरची धून कानावर आदळली की मुलं आणि नवरा नेत्रकटाक्ष टाकायला लागले. आता मला नाचायला यायला लागलं होतं त्यामुळे कुठे का टाकेनात कटाक्ष म्हणून नित्यनेमाने देवदर्शनाला गेल्यासारखं मी नाचायला जात होते. निदान या गुरुला तरी माझ्या तालासुराचं ज्ञान जाणवलं या आनंदात होते. एक दिवस दुकानाला टाळा. नवरा म्हणाला,

"तू कितीजणांचे व्यवसाय धोक्यात आणतेस. भारतात तेच इथेही तुझा हाच उद्योग?" मला अगदी गदगदून आलं त्यामुळे आता काही करायचं राहिलं आहे का? असं कुणी विचारलं की माझं उत्तर असतं,

’लोकांचे छोटे छोटे उद्योग मी त्यात शिरले तरी चालू ठेवण्याचं कसब शिकायचं राहिलं आहे ते एकदा जमलं की झालं.’