Thursday, December 8, 2011

मार्ग

"जयला आणून सोड तू आज. मी परस्पर पोचतो."
"अरे, वाटेत तर घर आहे माझं. जाता जाता थांब ना."
"नाही."  फिलीपच्या तुसडेपणाला लारा वैतागलीच पण जय उत्साहात होता. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून तिने तोंडातून बाहेर पडू पाहणारे शब्द गिळले.
"ठीक आहे. तू दोन वाजता दरवाज्यापाशी उभा राहा. जयला खूप आनंद झालाय तुझ्याबरोबर सामना पाहायला मिळणार म्हणून. मजा करा."
"नक्कीच."
"आणि परत आणून तू सोडशील ना?"
"छे, असलं काही नाही जमणार. मी बसने जाणार. उलटसुलट होईल."
अधुनमधुन भेटणा‍र्‍या मुलासाठी एवढीही तोशीस घ्यायला नको या माणसाला. आई ती तशी, बाप हा असा. तिने फोन बंद केला. नेहमीप्रमाणे ती आपली कामं मुकाटपणे उरकत राहिली. खूप बडबड करावी. फिलीप, लिलीच्या नावाचा, त्यांच्या वागण्याचा उद्धार करावा असं वाटत होतं. पण तिने स्वत:वर ताबा ठेवला. जयच्या  मनात त्याच्या आई वडिलांबद्दल नकारात्मक भावना रुजेल असं तिला काही करायचं नव्हतं. फार अवघड होतं ते. जयला कळत नसेल का हे? नक्कीच कळत असेल. लहान नाही तो आता.  आजचा दिवस तर फार महत्त्वाचा होता. बेसबॉलला बाप बेटा एकत्र जाणार होते. त्यासाठीच नाही का तिने पैसे साठवून साठवून हे महागडं तिकीट काढलं.  कोवळ्या जीवाला बापाचा सहवास, प्रेम लाभावं ह्याच इच्छेने.

 स्टेडियमच्या दाराशी त्या दोघांची वाट पाहत लारा उभी होती. आपण खूप काहीतरी केल्याचं समाधान, जयची खुशी, फिलीपलाही मुलाबरोबर घालवता आलेला वेळ खूप काही मनात घोळत होतं. फिलीप आणि जय येताना दिसले तशी तीच पुढे झाली.
"मजा आली?"
"हो" जयच्या आवाजातल्या थंडपणाने ती अस्वस्थ झाली.
"कंटाळा आला यार. एकट्याचं तिकीट काढलं असतस तर बिअर ढोसत सामना पाहिला असता."
"जयला तुझ्याबरोबर यायला मिळावं म्हणून ठरवलं होतं हे. तुझ्यासाठी नाही." मोठ्या कष्टाने तिने शांतपणाचा मुखवटा घातला.
"चल जाऊ या आपण." फिलीपकडे न बघताच जयने लाराचा हात धरला. जवळजवळ ओढतच त्याने तिला तिथून बाहेर  नेलं.

"मावशी, बास झाले हे तुझे प्रयत्न. मला त्या माणसाचं तोंडही पाहायचा नाही."
"अरे पण...."
"मला कळत नाही असं वाटतंय का तुला? संताप येतो परिस्थितीचा, आई, बाबांचा आणि हल्ली हल्ली तुझाही."
"माझा? मी काय केलं. तुला सुख मिळावं म्हणूनच माझी धडपड आहे ना?"
"कशाला? तू कोण आहेस माझी?"
गचकन ब्रेक दाबत तिने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. एकदम दाबलेल्या ब्रेकने तिची जुनीपुराणी गाडी खाडखाड आवाज करत कशीबशी थांबली.
"काय म्हणालास तू? काय म्हणालास? पुन्हा म्हण."
तिचा रागावलेला चेहरा, थरथरणारे हात पाहून जय घाबरला. गप्प बसून राहिला.
"पुन्हा म्हण म्हणते ना." ती तारस्वरात किंचाळली. त्याला एकदम रडावंस वाटायला लागलं. पण त्याने अश्रू आवरले. लहान का होता तो आता.
"सॉरी, चुकलं माझं. मला असं म्हणून तुला दुखवायचं नव्हतं गं. पण ती माझी सख्खी माणसं तरी त्यांना काही फिकीर नाही. तुझे माझे रक्ताचे संबंध नाहीत तरी तू...."
ती त्याच्याकडे पाहत राहिली. डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी पुसण्याचंही भान राहिलं नाही तिला.
"काही नाती रक्तापेक्षा मोठी असतात जय. माझ्या आयुष्यात जेमतेम वर्षा दीड वर्षाचा असशील तू तेव्हा आलास. मी अठरा  एकोणीस वर्षाची होते. माझा मुलगा म्हणून वाढवलंय मी तुला."
"मुलगा म्हणून वाढवलं आहेस. पण मुलगा आहे का मी तुझा?" इतके दिवस विचारावासा वाटणारा प्रश्न त्याने बळ एकवटून विचारला. लाराला पेचात पडून तो मुकाट राहिला. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत. उत्तर नकोच होतं त्याला. त्याने फक्त लाराला वास्तवतेची जाणीव करून दिली होती त्याच्याही नकळत. इतक्या वर्षाचा हिशोब मांडल्यासारखंच झालं की हे. मेळ जमत नव्हता. काहीतरी चुकलं होतं. हेच हेच ऐकण्यासाठी केलं का मी या मुलाला मोठं? तिला तो सारा प्रवास  घटकेत झाल्यासारखा वाटला. प्रचंड थकवा आला. तीनशे पासष्ट दिवस वर्षातले. कितीने गुणायचं म्हणजे किती आणि कसे दिवस घालवले या मुलासाठी ते कळेल ह्याला.  रक्ताच्या नात्याच्या गोष्टी करणार्‍या या मुलाला समजेल मग किती रक्त आटवलं त्याच्यासाठी ते. स्टिअरीगव्हिलवर डोकं टेकत ती तशीच बसून राहिली.


"जशी असशील तशी ये लारा" नीलच्या कुजबुजत्या आवाजाने ती गोंधळली, घाबरली.
"अरे पण काय झालंय? तू ठीक आहेस ना?"
"मी ठीक आहे, पण लिली जयला सोडून निघून गेली आहे."
"अं?" तिला धक्काच बसला.
"लिली जयला सोडून निघून गेली आहे." तो परत म्हणाला.
"जय जेमतेम वर्षाचा आहे. अशी कशी गेली ती सोडून.  तिच्या नवर्‍याने अडवलं नाही का तिला?"
"तू येतेस का? जय एवढंसं तोंड करून बसलाय. तुझ्याकडे रमतो तो छान म्हणून तुला विचारतोय."
"हो, पोचते मी दहा मिनिटात." लाराने फोन ठेवला आणि ती निघालीच. काय झालं असेल? अशी कशी ही खुशाल सोडून गेली जयला, तेही नीलकडे. म्हटलं तर ति‍र्‍हाईताकडे. काय संबंध हिचा नीलशी? संबंध काही नाही पण त्यातला त्यात तोच एक हक्काचा तिचा. बाकी कोण विचारतंय? सगळ्यांनी संबंध तोडलेले. उलटसुलट विचारांच्या नादात ती गुरफटली. नीलकडूनच लिलीबद्दल काही ना काही समजायचं तेवढंच तिच्या खात्यात जमा होतं.  ती त्याची मैत्रीण, लहानपणापासून हातात हात घालून दोघं वाढलेले. लिली आणि फिलीप एकत्र राहायला लागले तेव्हा नीलने जोरदार विरोध केला होता. फिलीप आणि लिली दोघंही उतावळे, चंचल. त्याचं जमायचं नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं. आणि झालंही तसंच. वर्षाच्या आत लिलीला जय झाला. तो झाला त्यानंतर किंवा कधीतरी आधीच फिलीप अमली पदार्थांच्या आहारी गेला. थोडयादिवसांनी लिलीदेखील. हे बरं आहे या लोकाचं, जबाबदारी पेलता आली नाही की सुटकेचे मार्ग शोधायचे, तेही असे. आणि आता तर टोकच गाठलेलं दिसतंय. ती मनोमन वैतागली पण जयची काळजी वाटलीच आणि नीलसाठी तरी तिथे पोचायला हवं होतं लगेच.

नीलच्या घरी ती पोचली तेव्हा दारात उभाच होता तो जयला घेऊन. तिला बघताच जय तिच्याकडे झेपावला. त्याला उराशी कवटाळत लाराने प्रश्नार्थक नजरेने नीलकडे पाहिलं.
"गेला आठवडा माझ्याकडेच राहायला होती. फिलीप गेले आठ दिवस घरी आलेलाच नाही. पैसे मागत होती उसने."
"दिलेस?"
"छे, तिला म्हटलं इथे राहायचं तेवढे दिवस राहा. पैसे दिले की ती राहणार नशेत. परवा दूध आणायला म्हणून गेली ती फिरकलेलीच नाही परत"
"मग लगेच करायचास ना फोन."
"कुठल्या नात्याने तुला पेचात पाडू?"
लारा नुसतीच त्याच्याकडे पाहतं राहिली. नकाराचं दु:ख काळवेळाचं भानही नाही ठेवू शकत?
"हं, तेही खरंच. पण जाऊ दे शेवटी झाली ना माझी आठवण."
"तू बस याच्याजवळ. मी एकदा जाऊन फिलीप  तरी घरी आलाय का पाहतो." तिने मान डोलवली. नीलने जयचा गालगुच्चा घेतला आणि तो बाहेर पडला.

बर्‍याच दिवसांनी लारा आज नीलच्या घरी निवांत बसली होती. जयला मांडीवर थोपटत. ती उगाचच त्याचं घर निरखित राहिली. नीलचं मैत्रमैत्रींणींनी गजबजलेलं घर आज भकास होतं, उदासपणा चिकटला होता जिथे तिथे. भितींवरच्या रंगाचे कोपचे निघाले होते. इकडे तिकडे पडलेले कपडे, कागद, खेळणी...पसाराच पसारा. कितीतरी दिवस न आवरल्यासारखं खोलीचं रुप होतं. पंख्यावरच्या धुळीचे थर ती निरखीत राहिली. नीलबरोबर एकत्र राहायचं नाकारलं नसतं तर हे घर तिचं झालं असतं. त्या दोघाचं. कदाचित तिने कायापालट करून टाकला असता, तिला हवं तसं रुप दिलं असतं. पण एखाद्या माणसाचा कायापालट करणं घराचा कायापालट करण्यासारखं थोडंच असतं? ते जमणार नाही हे माहीत असलं की पर्याय शोधावे लागतात. तिनेही तेच केलं होतं.  वर्ष झालं होतं या गोष्टीला. तिच्या निर्णयाने तो खूप निराश झाला, अजूनही खपली धरलेली नाही हे त्याच्या वागण्यातून जाणवायचंच वारंवार. लारा त्याच्या विचाराने अंतर्बाह्य ढवळून निघाली, पण तिला त्या दोघांच्या एकत्रित आयुष्याचं चित्र भयावह वाटत होतं. दिशाहीन, तडजोड, निराशा हेच रंग त्यात मिसळतील हे कळत होतं. तो सतत कुठल्यातरी वाद्यात गुंतलेला, कविता लिहून चाली लावण्यात मग्न असलेला.  ती मनाने हळवी असली तरी व्यवहारी होती. स्वप्नाच्या दुनियेत रमणारी नव्हती.  जगाचं भान नीलला कधी येईल असं तिला वाटलंच नाही. सुरवातीला मनाच्या त्याच हळवेपणातून त्याच्या  नादिष्टपणात तीही वाहवत गेली. पण हायस्कूलनंतर शाळा सोडायचं त्याने ठरवलं तेव्हा तिचे पाय जमिनीवर आले. नाकारायचं ठरवलं तरी नील उतरला तिच्या मनातून.
"हे काय काहीतरीच."
"काँलेजचा खर्च झेपणार नाही मला. आणि खरं सांगायचं तर त्या शिक्षणात काही अर्थही नाही."
"पण मग तू करणार काय?"
"कविता लिहिणार, गाणी म्हणणार, त्यात सातत्य दाखवलं तर अल्बम निघतील, नाव होईल, पैसा मिळेल."
ती बघत राहिली. कोणत्या दुनियेत वावरतो हा?
"तिथे अथक प्रयत्न आणि यशाची खात्री नाही हे समीकरण असतं. ज्याचं भलं होतं ते सुखाच्या राशीत लोळतात, पण ज्यांच्या जम बसत नाही ते होरपळून निघतात. विषाची परीक्षा घेण्यासारखं आहे हे"
"यशाची खात्री कुठे असते लारा? पण म्हणून ते करायचंच नाही का? आणि कदाचित त्या सुखाच्या राशीत लोळण्याइतकं माझं असेल नशीब असा का नाही विचार करत? अपयश येईल या शंकेने तिकडे फिरकायचंच नाही का?"
"आधी शीक ना तू. मग नंतर कर काय करायचं ते."
"खूप वर्ष जातील त्यात. आणि माझ्या शिक्षणासाठी मलाच कमवावा लागेल पैसा."
"पण अल्बमसाठी काय करणार आहेस?"
"नँशव्हिल गाठेन लवकरच. गायक म्हणून जम बसवायचा तर जावंच लागेल. तिथे जाण्यासाठी पैसा लागेल. तो एकदोन ठिकाणी कार्यक्रम करून मिळवेन. माझ्या चार पाच मित्रांनाही यातच रस आहे. पण माझं जाऊ दे. तू काय करणार आहेस?"
"काँलेज. आई, बाबा खर्च करायला तयार आहेत. शिष्यवृत्ती मिळेल आणि मी नोकरी करेन जमेल तितके तास."
त्या संभाषणानंतर  नीलपासून ती हळूहळू लांब होत गेली. नीलच्या लक्षात ते यायला वेळ लागला नाही.
त्याच्या कवितांमध्ये रस दाखविणारी, तास न तास त्याच्याबरोबर, त्याच्या मित्रमैत्रिणीबरोबर रमणारी लारा हल्ली त्याच्या आसपास फिरकत नाही हे त्याला जाणवलं तेव्हा तो तोंडावर आलेल्या कार्यक्रमात गुंतला होता. गाणी निवडणं, जाहीरात, सराव काही ना काही चालू होतं.  लाराच्या मनातलं जाणून घ्यायला निवांत वेळ मिळत नव्हता.  जवळजवळ महिनाभर तो भेटलाच नव्हता तिला. तीही फिरकली  नव्हती इतक्या दिवसात. आज शाळेचाच कार्यक्रम म्हटल्यावर ती आलेली असेल या आशेवर होता तो. कार्यक्रम संपल्यावर तिच्याशी बोलायचं, विचारायचं त्याने निश्चित केलं होतं.

पडदा वर गेला. पहिल्या रांगेत बसलेल्या लाराला पाहिल्यावर त्याला विलक्षण आनंद झाला. सरत्या संध्याकाळी अलगद कार्यक्रमात रंग भरत गेला.
"फार छान आवाज आहे तुझा." त्याच्या आसपास जमलेल्या गर्दीतून वाट काढत ती त्याच्यापर्यंत पोचली. तो नुसताच हसला. तिचा हात हातात धरून बाकीच्यांशी बोलत राहिला. लारा रोमांचित झाली. नकळत त्याच्या आणखी जवळ सरकली. कसं व्हायचं याच्यापासून बाजूला? केवळ त्याला शिकायचं नाही म्हणून ह्या नात्याला कोंब फुटू द्यायचे नाहीत की जे होईल ते होईल म्हणून साथ द्यायची? त्याचा हातात धरलेला हात तिने आणखी घट्ट धरला, आधार चाचपडतात तसा.  गर्दीच्या कोड्यांळ्यातून बाहेर पडता पडता त्याने धाडस केलं.
"तुला कधीपासून विचारायचं होतं."
"विचार ना, त्यासाठी वाट कशाला पाहायची? आणि परवानगीची काय आवश्यकता?"
"अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळेल की नाही याची खात्री नसली की होतं गं तसं."
"मग अशावेळेस विचारूच नये." त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. पण तिने ते सहज म्हटलं असावं. निदान तिच्या चेहर्‍याकडे पाहून तरी त्याला तसं वाटलं.
"एकत्र राहूया आपण?"
"नील?" ती चमकली. त्याने विचारलंच तर तो लग्न करू या का आपण असं विचारेल असा अंदाज होता तिचा. तिने त्याचं उत्तर आधीच ठरवलं होतं. शिक्षण संपल्याशिवाय कसं शक्य आहे असं विचारून ती त्यालाच पेचात पाडणार होती. पण असं काय विचारतोय हा.?
"मला वाटलं होतं तू लग्नाचं विचारशील. एकत्र राहूया काय? आपला भाग मोठ्या शहरांसारखा झालेला नाही अजून. एकत्र राहूया म्हणे."
"लग्नाचं विचारलं तर तू शिक्षणाचं कारण पुढे केलं असतंस."
"म्हणून काय एकत्र राहू या का विचारायचं?"
"आपण अमेरिकेतल्या दक्षिण भागातले लोक असेच. पटकन नवं काही स्वीकारत नाही. एवढा काय बाऊ करतेस लारा. एकत्र राहिलं, पटलं, जमतंय असं वाटलं तर करूच ना कधीतरी लग्न."
"नाही तर?"
"व्हायचं मग बाजूला. कुणी कुणाचा अडथळा बनून नाही राहायचं."
तिला हसायलाच आलं. इतकं साधं सोपं समीकरण असेल तर  आयुष्यात इतकी गुंतागुंत का होते?
"नील, अशा राहण्याला काही अर्थ नाही. माझ्या किंवा तुझ्या मनात लग्न करायचं असेल तर मग ते व्हायला पाहिजे म्हणून दुसर्‍याच्या कलेने घ्यायचं. सतत त्या विचाराच्या दडपणाखाली वावरायचं, वर्षानुवर्ष. त्यातच मुलंही होवू द्यायची आणि कुणीतरी एकाने कधीतरी जमायचं नाही या निष्कर्षाप्रत यायचं, हे कधीतरी होवू शकतं हे माहीत असलं  तरीही या एका निर्णयाने पुढे सारी फरफटच. ती होते आहे हे कळण्याएवढीही उसंत मिळत नाही रोजचा दिवस रेटताना. पाहत नाहीस का आजूबाजूला, शेजार्‍यापाजार्‍यांच्या घरात काय चालू आहे ते?. तुझ्या घरीही तेच. तुला नाही का हे बदलावंस वाटत?. असं नातं नको आहे मला. काहीतरी शाश्वत हवं आहे. आणि तसंही तू लग्नाचं विचारलं असतंसं तर मी ’नाही’ म्हणणार होते." घट्ट धरलेला तिचा हात त्याच्या हातातून निसटल्यासारखा वाटला त्याला.
"का, मी हायस्कूलनंतर शिकायचं नाही ठरवलं म्हणून?"
तिने नुसतीच मान डोलावली.
"तू काय करणार आहेस शिकून?"
"अजून ठरवलं नाही."
"मी पुढे शिकायचं नाही ठरवलं तरी मला काय करायचं आहे ते निश्चित आहे. तुला शिक्षण झाल्यावर काय करायचं ते नाही ठरवता आलेलं अजून पण तरी शिकायचं आहे. त्यातूनही  माझ्याबरोबर लग्न नाही करायचं हे माहीत आहे तुला. समजतच नाहीत मला तुझ्या मनाचे खेळ."
"खेळ कसं म्हणतोस तू याला आणि दोन वेगवेगळ्या गोष्टी तू एकत्र करतो आहेस नील."
"मग तू करून दाखव त्या स्वतंत्र."
"मी काय करणार आहे ते माहीत नसलं तरी तुला साथ देणं कठीण आहे नील. कदाचित तू खूप प्रसिद्ध होशील किंवा नाहीही, आत्ताच नाही सांगता येणार. पण तू कलावंत आहेस. स्थैर्य नसतं अशा व्यवसायात. तू मित्रमैत्रिणीत रमणारा, मलाही आवडतं, पण त्यालाच काही मी सर्वस्व समजत नाही. तू आहेस तसा मला आवडतोस. तू बदलावं असं मी म्हणत नाही, तशी माझी अपेक्षाही नाही. असं कुणी कुणामुळे बदलत नसतं. आहे ते स्वीकारायचं की नाही ते ठरवणं महत्त्वाचं." ती गप्प झाली. तोही विचारात पडल्यासारखा पावलं टाकत राहिला. चालता चालता दोघांची पावलं दोन दिशेला वळली. दोघं आपापल्या मार्गाला लागले.

जयने चुळबूळ केली. मांडीला रग लागल्याचं तिला एकदम जाणवलं. त्याला आता उठवायला हवं होतं. ती त्याला अलगद हालवीत राहिली. तो जागा झाला पण  रडणं थांबेना. लिलीला शोधत असेल? नक्कीच. वर्षाचा आहे. आईचा स्पर्श समजत असेलच त्याला. त्याला उचलून घेऊन ती बाहेर उभी राहिली. नील येताना दिसला तसा तिचा जीव भांड्यांत पडला.
"काय झालं?"
"फिलीपला शोधत फिरत होतो."
"सापडला?"
"हो" तिने आशेने नीलकडे पाहिलं.
"जय ही लिलीची जबाबदारी आहे म्हणतो."
"हं, पण आत्ता न्यायला नाही आला?"
"वेळ नाही म्हणतो."
"मग?"
"मला आत तरी येऊ दे. मी माझं आवरतो आणि आपण बाहेर जाऊन खाऊन येऊ"
"अरे, मला घरी जायला हवं. काही न सांगता बाहेर पडलेय. वाट बघत राहतील घरी. उद्या काँलेजही आहे."
"लारा प्लीज..."
"बरं चल, खाऊन तर येऊ, मग बघू."
जयला सांभाळत खाता खाता दोघांचीही त्रेधातिरपीट उडत होती. जय नुकताच चालायला लागला होता. त्याला एका  जागी बसायचं नव्हतं.
"मला परवा कार्यक्रम आहे." पुढच्या कल्पनेने लाराला घाम फुटला.
"कुठे?"
"बाहेरगावी."
"अरे, मग तू काय करणार जयचं?"
"तेच समजत नाही मला. लिली माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. अशी निघून जाईल अशी कल्पनाही नव्हती केली."
"अमली पदार्थांच्या आहारी गेलेली माणसं कल्पनेपलीकडची असतात. बेभरवशी. आपण असं करू या. इथून फिलीपकडेच जाऊ सरळ. जयला सोडू आणि मग मी  जाईन घरी."
"लारा, जयला नाही सोडता येणार घरी."
"का?"
"फिलिप तुरुंगात आहे."
"तुरुंगात?" तिला धक्काच बसला. काय बोलावं हेच सुचेना.
" तू तुरुंगात गेला होतास त्याला भेटायला?." तिने आश्चर्याने विचारलं.
"मग काय करणार? पण भेटीची ठरलेली वेळ नव्हती त्यामुळे भेटूच देत नव्हते. जयचं सांगायचं नव्हतं मला तिथे नाहीतर समाजसेवी संस्था येऊन ताबा घेईल त्याचा."
"मग केलंस काय तू?"
"फिलिपची आई आजारी आहे म्हटल्यावर बोलायला दिलं त्यांनी त्याच्याशी."
"मग आता?"
"तू थांबतेस?. थांब ना." नील एकदम काकुळतीला आला. ती काहीच बोलली नाही.
"लारा..."
"अरे, अशी कशी राहू तुझ्या घरी?"
"पण मी नसेनच. मला उद्या सकाळी निघावं लागेल. दोन दिवसाचा प्रश्न आहे, नाही म्हणू नको."
"इथे येऊन नाही राहता येणार. जयला घेऊन जाते मी पाहिजे तर आमच्या घरी."
"पण तो राहणार नाही. त्यातल्या त्यात माझी सवय आहे त्याला."
"पण तू नसणारच ना? आणि दोन दिवसासाठीच म्हणतोयस ना. तू माझ्याबरोबर घरी ये मात्र. मी असं एकदम  नाही घेऊन जाणार जयला माझ्याबरोबर." तो हसला.
"अग एक वर्षाचा आहे तो. तुझा मुलगा आहे का असं नाही कुणी विचारणार." तीही हसली.
ती दोघं खरंच जयला घेऊन लाराच्या घरी पोचली.  लाराने जयबद्दल घरी सांगितलं होतं, पण ती अशी त्याला घेऊन घरी येईल याचा अंदाज कुणालाच नव्हता.  छोट्या जयकडे पाहून कुणी फारशी खळखळ केली नाही. तिच्या घरात आई वडील आणि पाच भावंडं. ठरवल्यासारखं सगळ्यांनी त्याला दोन दिवस थोडा थोडा वेळ सांभाळलं. फार दिवसांनी त्या घरात लहान मूल आलं होतं. सगळीच रमली त्याच्याबरोबर. जय थोडासा बावरला सुरवातीला. भिरभिरत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत राहिला. पण मग रडणं विसरला. लाराला तर त्याला परत पाठवूच नये असं वाटत राहिलं. नील त्याला न्यायला आला तेव्हा तिचा जीव थोडा थोडा झाला.
"आपणच ठेवू या का जयला?" अपेक्षेने ती आईकडे पाहत राहिली.
"अगं त्याची आई येईल गं परत. आणि ती नाही आली तर वडील आहेतच ताबा घ्यायला."
"मला नाही वाटत कुणी येईल." चिवटपणे लारा म्हणाली.
"लारा, अगं जेमतेम एकोणीस वर्षाची आहेस तू. जयला ठेवून कसं करशील? काँलेज, नोकरी, लग्न...."
"ते पुढचं झालं. आत्ता त्याला आपली गरज आहे." लारा आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती. शेवटी नील मध्ये पडला.
"लारा, मी पुढच्या आठवड्यात इथेच आहे. जय राहील माझ्याबरोबर. लिली किंवा फिलीप आला तर जयला घेऊन जातीलच ते. जास्त गुंतून चालणार नाही."
निरुपयाने लाराने त्याचं ऐकलं. काँलेजमधून आल्यावर नीलकडे चक्कर मारायला ती विसरत नव्हती. तिची भावंडं पण एकदोनदा जयसाठी चक्कर मारून गेली.

लारा घाईघाईत पोचली तर  लिली परतलेली. चार दिवसांनी. विस्कटलेले केस, तारवटलेले डोळे, सतरा ठिकाणी फाटलेली जीन्स. कशाचंच भान नसल्यासारखं वागणं. फ्रीजमधलं हाताला लागेल ते घेऊन तिने बकाबका घशात कोंबलं. विस्कटलेल्या केसावरून हात फिरवत लिलीने सारखे केल्यासारखे केले आणि सोडयाची बाटली तोंडाला लावून डुलत्या खुर्चीत बसून राहिली.  लारा तिच्याकडे ’आ’ वासून पाहत राहिली. जय आत झोपला होता, पण साधी त्याची चौकशी करण्याच्या परिस्थितीतही नसावं या बाईनं?. तिचा जीव जयसाठी तुटला. या क्षणी त्याला घेऊन पळत सुटावं. लांब कुठेतरी निघून जावं इतक्या लांब की तो पुन्हा लिलीच्या दृष्टीलाही पडता कामा नये. पण त्यातलं काहीही न करता लारा नुसती लिलीकडे पाहत राहिली. तिच्या एकटक नजरेने शरमून गेल्यावर किंवा काहीतरी बोलायला हवं म्हणून लिलीने तोंड उघडलं.
"कसा आहे जय?"
"ठीक"
"नील?"
"तोही ठीक." मग बोलणं खुंटलं ते नील येईपर्यंत. लिलीला पाहिलं आणि नील भडकलाच.
"नीघ इथून तू. आणि जयलापण घेऊन जा."
लिली टक लावून त्याच्याकडे पाहत राहिली. खुर्चीत डुलत राहिली. तो पुढे झाला. त्याने त्या डुलत्या खुर्चीला धक्का मारला.
"मी काय सांगतोय ते ऐकू येत नाही का?"
लिली हमसून हमसून रडायला लागली तसा तो  वरमला.
"अगं, दूध आणायला म्हणून पडलीस ना बाहेर? पोरगं रडून रडून थकून झोपलं तुझं. लाराच्या घरच्यांनी सांभाळलं म्हणून. मला कसं जमणार गं जयला जपायला? किती लहान आहे तो. लाराही अभ्यास, काँलेज विसरून करत होती सारं. पण बास झालं आता. हा असला प्रकार पहिल्यांदा आणि शेवटचा. यापुढे नाही जमायचं मला. माझे दौरे असतात. अर्धा जीव इकडे आणि अर्धा तिकडे. आणि लाराने का करावं जयचं? केवळ मी विनंती केली म्हणून? आणि माझी तरी ती कोण आहे की मी तिला हक्काने सांगावं?" लाराने चमकून पाहिलं. लिली मात्र बधिर झाल्यासारखी नीलकडे पाहत होती. शेवटी काही न सुचून म्हणाली.
"बरं, घेऊन जाते मी जयला उद्या. आज राहू ना इथे मी? चालेल?."
"राहा गं, पण तू तुझ्या घरी का नाही जात?"
"तिथे जाऊन काय करू?" पुढे लिली काही बोललीच नाही. फिलीप त्रास देत असेल हिला? की दोघं मिळून अमली पदार्थांच्या गुंगीत जयला विसरून जातात म्हणून ही येत असेल इथे? पण आत्ता तर तो तुरुंगात आहे. काय कारण असेल? लारा शक्यता चाचपडत राहिली, लिलीकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं.
"फिलीपचं घर मोकळंच आहे की. तो तुरुंगात आहे हे माहीत आहे ना?" नील तिला विचारत होता.
"हे बघ नील, मी इथे राहिले तर चालेल की नाही सांग. नाहीतर निघते मी आत्ताच." नील चिडून काहीतरी बोलणार तितक्यात लाराने विषय बदलला. लिली तशीच खुर्चीत झोपली, पाय दुमडून. अवघडल्यासारखी. नीलही काही न बोलता आत निघून गेला. लारा तिथेच बसून राहिली. लिलीवर पहारा दिल्यासारखी. मगाशी नील म्हणाला कोण लागते लारा माझी हक्काने सांगायला? अजून आशेवर असेल का हा इतक्या स्पष्टपणे सांगितल्यावरही? त्याला ’नाही’ म्हटल्यावरही त्यांची मैत्री टिकली होती. निदान तिला  तसं वाटत होतं. ती त्याच्या मित्रमैत्रिणीत रमत होती. तो आता तिच्याबरोबर काँलेजला नव्हता. त्याचे गाण्याचे दौरे जोरात सुरू आहेत. कुठल्यातरी कंपनीशी अल्बमच्या संदर्भात त्याचं बोलणंही चालू होतं. पुढे मागे तो नँशव्हिललाच गेला असता हे नक्की. तिनेही शिक्षिका व्हायचं ठरवलं होतं एव्हाना. लाराने नीलला खोट्या आशेवर झुलत ठेवलं नव्हतं. तरी तो असं का बोलला? तोडून टाकायचं तर पूर्ण संपवूनच टाकायला हवं होतं का? दोघं चांगले मित्र होते म्हणून तर गुंतले होते नं एकमेकात? ते नाही जमत तर मैत्रीच मुळापासून उखडून टाकायची? एकदा नीलशी तिने या संदर्भात बोलायचं ठरवलं.

त्यानंतर हे असंच चालू राहिलं. कधी लिली एक दोन दिवसात परतायची तर कधी महिना उलटून गेला तरी तोंड दाखवायची नाही. जय आता दोन वर्षांचा झाला होता. त्यालाही समज येत चालली होती. कळायला लागलं होतं. नीलने नँशव्हिलला जायचं पक्कं केलं तेव्हा लाराचं काँलेजचं शेवटचं वर्ष होतं. जयचा प्रश्न होता. पण नीलला त्याच्याकडे चालून येणार्‍या संधी भुरळ पाडत होत्या. त्याला आता जयमध्ये गुंतून पडायचं नव्हतं. त्याने त्याच्या परीने प्रयत्न केले. फिलीपला जाऊन भेटला. तो तुरुंगातून बाहेर आला होता, पण नुसता बसून राहायचा. मनात आलं की जयला भेटायला यायचा. लिलीला घरी येऊन राहायचा आग्रह करायचा. ती बरी असली तर जायचीही. पण सगळं तात्पुरतं. दोघांच्याही बाबतीत तेच. लहर फिरली की पुन्हा पाढे गिरवल्यासारखं सुरू. एक दिवस लिली आली की  नीलने  नँशव्हिलला निघून जायचं पक्कं केलं. तो तिथे नाहीच म्हटल्यावर कुणाच्या भरवशावर ती सोडून जाणार जयला. ठरवल्याप्रमाणे तो खरंच निघून गेला तेव्हा लाराला हातातून काहीतरी निसटल्याची हुरहुर लागून राहिली पण आता तरी लिली मार्गाला लागेल, जयमुळे तिचं आयुष्य बदलेल याचीही आशा वाटली ती लिली जयला तिच्याकडे सोडून जाईपर्यंत.
"नाही म्हणू नकोस लारा.  मी आता तुझ्याच भरवशावर आहे."
"अगं माझा जीव तुटतो गं या मुलासाठी. पण मला नको का माझं पाहायला. आत्तापर्यंत घरातल्यांचा पाठिंबा होता म्हणून जयचा खर्च त्यांच्या मदतीने भागवत होते. म्हणून स्वतंत्र न राहता त्यांच्याबरोबरच राहत होते. मला आता स्वतंत्र राहायचं आहे.  माझा काँलेजचा खर्च, कपडेलत्ते.  तू कधीतरी पुढे केलेले किरकोळ पैसे नाही पुरत जयसाठी. माझ्या घरातल्यांनीही पत्कर नाही घेतलेला जयचा. तुझ्या नातेवाईकांकडे का नाही सोडत तू. नाहीतर आता तरी शहाणी हो, तुझा मार्ग बदल." लाराच्या जीव तोडून बोलण्यावर  लिली हसली.
"माझे नातेवाईक? कुणी मला दारात पण उभं नाही करत."
"फिलीपचे?"
"त्याचेही. त्याचं तरी कुठे धड चालू आहे?"
"पण मग तुझं तू ठरव बाई आता. मी शिक्षिका म्हणून काम सुरू करतेय पुढच्या महिन्यापासून. दिवसभर जयला बाहेर ठेवायचं तर इतका पैसा कुठून आणू?."
"रात्री ठेवते तुझ्याकडे. मी दिवस कुठेतरी काढेन. जयला रात्री तुझ्याकडे राहू दे. माझा भार नाही टाकणार तुझ्यावर."
"एक विचारु लिली तुला?" कितीतरी दिवस मनात घोळत होता तो प्रश्न आता विचारावा असं वाटून गेलं लाराला. लिलीने नुसती तिच्याकडे बघत राहिली.
"तू दत्तक का नाही देत जयला?"
"कुणाला देऊ? आणि मग मी अधूनधून त्याला भेटते तेही बंद होईल."
"हो पण त्याच्या दृष्टीने तेच भलं असेल तर करायला हवं."
ती काहीच बोलली नाही.
"हे बघ लिली, अजून पर्यंत आम्ही काय किंवा इतर कुणीच जयला तुम्ही दोघं असे सोडून जाता त्याबद्दल तक्रार नोंदवलेली नाही. पण पुढे मागे कुणी तसं केलं तर जय हातातून जाईल तुझ्या. मुलाकडे दुर्लक्ष या कारणाने तुला आणि फिलीपलाही खडी फोडायला जावं लागेल आत. जयचं आणि तुझं नातं अळवाच्या पानावरच्या थेंबासारखं होईल गं. धरून ठेवण्याच्या प्रयत्नात निसटून जाईल तो हातातून. अशीच वागलीस तर तो हाती कधी लागणारच नाही तुझ्या. अशी मुलं फक्त या घरातून त्या घरात टोलवली जातात, क्वचित त्यांना खरं घर, प्रेम, जिव्हाळा लाभतो, भवितव्य बदलून जातं. पण फार क्वचित. त्यांचे तात्पुरते आई, वडील तात्पुरतेच राहतात, कधी सरकारकडून मिळणार्‍या पैशात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो, तर कधी घरकामाचं माणूस एवढाच हेतू असतो. खायचे प्यायचे हालच होतात. काहीवेळेला दान त्या मुलांच्या बाजूने पडलं तरी या मुलांमधल्या असुरक्षित भावनेला मानलेल्या आईवडीलाचं प्रेम पुरं पडत नाही, ही मुलं अठरा वर्षाची होईपर्यंत सरकार मर्जीनुसार त्यांच्यावर प्रयोग करत राहतं आणि मग जाणतेपणाचा शिक्का मारून रस्त्यावर सोडून मोकळं होतं. असं झालं की त्यांच्या मनावरचे ओरखडे कधीच बुजले जात नाहीत. हे सगळं टाळायचं असेल तर दत्तक द्यायचा विचार कर लिली तू. तिथे निवडीचा अधिकार तुला असेल, नाहीतर या तुझ्या व्यसनातून बाहेर पडायचा मार्ग शोध. पण जयची झाली तेवढी परवड पुरे झाली."
"मला काही कळत नाही लारा, तूच ठरव काय ते." एवढा मोठा डोस पचवणं लिलीच्या आवाक्यांपलीकडचं होतं.
"कळत नाही म्हटलं की संपली का जबाबदारी? समजावून घ्यायचा प्रयत्न कर."
"तूच का नाही घेत दत्तक जयला?" लिलीच्या अनपेक्षित प्रश्नाने लाराच्या काळजाचा ठोका चुकला.
"शहाणीच आहेस तू. हे म्हणजे मऊ लागलं की उकरता येईल तितकं उकरणं झालं लिली." काहीतरी उत्तर द्यावं तसं लाराच्या तोंडून निघून गेलं.
लिली  ओशाळली.
"तो नाहीतरी तुझ्याकडेच असतो म्हणून म्हटलं मी. तुझाच झाला तर मला काळजी नाही. भेटताही येईल कधीही. तुटणार नाही गं तो माझ्यापासून."
"हा विचारही नव्हता डोकावला माझ्या मनात.  लगेच नाही सांगता येणार मला. मला आत्ता कुठे नोकरी मिळतेय. नीलनंतर मला कुणी भेटलं नाही पण लग्न करायचं आहे. जयची जबाबदारी स्वीकारली की सगळं अवघड होत जाईल. आई, बाबांशी आणि भावंडांशी बोलू दे मला. पण लवकरच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तेच हिताचं होईल जयसाठी." लारा जयला दत्तक घ्यायचा निदान विचार तरी करेल या आश्वासनाने लिलीची पाकळी खुलली.

लारा तिच्या नोकरीमध्ये रुळली. लिलीही थोडीफार मार्गावर आल्यासारखी वाटत होती. ती नीलच्याच घरी राहत होती.  नीलच तिला लागतील तसे पैसे पाठवत असावा. जयला अचानक सोडून जात नव्हती आताशा. अधून मधून लहान सहान कामं मिळवत थोडाफार पैसा तिच्याही हातात खेळत होता. त्या एका वर्षात फिलीप पण सुधारल्यासारखा वाटत होता. जयला लिली आणि फिलीप बरोबर पाहिल्यावर लारालाच भरुन येत होतं.  नीलच्या आणि लाराच्या भेटीही फार क्वचित होत होत्या. तो कधी गावाकडे फिरकला तरच. नीलही एकटाच होता पण लाराचा नकार त्याने उशीरा का होईना पचवला होता. त्या वाटेला पाऊल टाकायचं नाही असं काहीतरी मनाशी ठरवल्यासारखं त्याचं वागणं होतं. ती त्याला टी. व्ही. वर पाहत होती. त्याच्या कार्यक्रमांच्या बातम्या वाचत होती. पण आता तो तिचा नव्हता. कुणाचाच नव्हता. यशाने त्याला फार वरच्या पायरीवर नेवून उभं केलं होतं. दृष्टिक्षेपात न येणार्‍या पायरीवर. लाराला जोडीदाराची उणीव भासत होती पण नीलची उणीव भरून काढणारं कुणी पुन्हा आयुष्यात येईल असं तिला वाटत नव्हतं. सगळं सुरळीत पार पडतंय म्हणेपर्यंत फिलीपने पुन्हा एकदा तुरुंगाची वारी केली. लिली जयला घेऊन लाराकडेच राहायला आली. आता तशीही लाराची स्वतंत्र जागा होती. लहान पण शाळेजवळ. जयही पूर्ण दिवस शाळेत जायला लागला होता. लाराकडे आल्यावर तोही आनंदात होता. तिने त्याची शाळा बदलली. ती होती त्याच शाळेत तोही जायला लागला. लिली मात्र पुन्हा दिवसचा दिवस घरात बसून घालवायला लागली. तिला पुन्हा मार्गावर आणण्याचे लाराचे प्रयत्न तोकडे पडत होते. कंटाळून लाराने लिलीच्या बाबतीत जे होईल ते होईल म्हणून दैवावर भरवसा टाकला. नाहीतरी कधीतरी ती पुन्हा जाणारच. आता काळजी करायची ती फक्त जयच्या मनाची, भावविश्वाची.

जयने अभ्यास करण्यासाठी पुस्तक उघडलं पण त्याचं त्यात लक्ष लागेना. काल रात्रभर त्याने लाराबरोबर आईची वाट पाहिली होती. संध्याकाळी ती फिरुन येते म्हणून बाहेर पडली ती परत आलीच नव्हती. लाराने अकरापर्यंत वाट पाहून त्याला झोपायला लावलं.
"हे नवीन नाही आपल्याला. ती येणार नाही आज हे कळत नाही का तुला?." खरंच होतं ते. तो काही न बोलता निमूट झोपायला गेला. दुसर्‍या दिवशी शाळेतही गेला. अभ्यासात मन रमवायचा प्रयत्न केला त्याने. पण घरी आला तो अधीर मनाने. आल्या आल्या कदाचित सोफ्यावर बसलेली आई दिसेल अशी भाबडी आशा मनात ठेवूनच त्याने दार उघडलं. समोर कुणीच नव्हतं. घाईघाईत जाऊन त्याने कुणाचा फोनवर निरोप आहे का पाहिलं. लाल रंगाचा दिवा चमकत नव्हता. निराश मनाने त्याने फ्रीज उघडला. हाताला लागेल ते त्याने तोंडात कोंबलं. खूप राग आला होता त्याला आईचा. गेले सहा महिने ती घरीच होती. असून नसल्यासारखी असली तरीही तिचं अस्तित्व हाच त्याचा आधार होता. लारा आणि आई हीच दोन माणसं त्याचं जग होतं. लाराच्या वाटेकडे तो डोळे लावून बसला. ती आल्यावर मात्र त्याने चिडचिडच केली.
"किती वेळ लावलास. मला कंटाळा आला."
"अरे, शाळेतून असं येता येतं का? अभ्यास करून टाकावा अशावेळेस."
"केला पूर्ण शाळेतच."
"मग खेळायला जायचं बाहेर."
"हं." त्याच्या हं... मधल्या रागाने तिला हसू फुटलं.  तिच्या हसण्याने त्याचा आणखी पापड मोडायला नको म्हणून तिने घाईघाईत म्हटलं.
"चल, काहीतरी खायचं बघू या."
मला नको आहे काही खायला.  तो तिला येऊन बिलगला.
"अरे, काय झालं तुला एकदम?" त्याला कुशीत घेत तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, तसं त्याला एकदम रडू फुटलं.
"रडू नकोस रे असा. काय झालं ते सांग ना." तिने त्याला आपल्या बाजूला बसवलं आणि त्याची हनुवटी आपल्याकडे वळवली.
"तू आई, बाबासारखं सोडून नाही ना जाणार मला?" त्याला एकदम घट्ट कुशीत घेतलं तिने. तोही तिला बिलगला.
"मी तुला सोडून कुठेही जाणार नाही."
"प्राँमिस?"
"प्राँमिस." तिने त्याच्या हातात हात दिला.
"पळ आता इथून. मला कपडे तरी बदलू दे. आले ती इथेच बसले. जय खुशीत तिथून गेला तसं तिला बरं वाटलं. अधून मधून जयचा अस्वस्थपणा त्याच्या वागण्यातून डोकावत राही. कधी खूप चिडचिड, आदळआपट करे तो. काहीवेळेस दिवसच्या दिवस काही न बोलता राही. त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला की घुम्यासारखा कुठेतरी एकटाच जाऊन बसे.  मध्येच केव्हातरी लारा त्याला सोडून निघून जाणार नाही ना याची त्याला खात्री करून हवी असे. लाराला या परिस्थितीतून तोडगा म्हणून लिलीने  सुचवलं त्याप्रमाणे त्याला दत्तक घ्यावं असं वाटायला लागलं होतं. पण धीर होत नव्हता.
आत्ताही हातात चहाचा कप घेऊन ती डुलत्या खुर्चीत बसली. काचेच्या खिडकीतून बाहेर खेळणारा जय तिला दिसत होता. एकेक घोटाबरोबर तिला दत्तक घेण्याच्या मार्गातले, त्याला वाढविताना येणारे अडथळे दिसत होते. निर्णयाकडे झुकणारं मन हेलकावे खात होतं. स्वत:च्या भविष्याचे पंखच तर कापून टाकत नाही ना आपण या निर्णयाने, या शंकेने तिचा हात थरथरला. हिंदकळलेल्या कपातून पडलेला गरम चहाचा डाग कपड्यावर उठून दिसत होता. असंच असेल का आयुष्य? अविवाहित मुलीने दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे डाग? ती दचकली.  विचारातल्या संकुचितपणाने शरमली. घाईघाईने तिने तो डाग पाणी लावून चोळला, पुसट केला. मनातल्या वादळाला शांत केल्यासारखी  ती खुर्चीवर रेलली. बराचवेळ.


त्यावेळी मनात डोकावलेला विचार आज जयच्या बोलण्याने पुन्हा वर काढला. घ्यावं जयला दत्तक? तिने गाडीतच सुन्न बसून राहिलेल्या जयकडे पाहिलं. तो शांतपणे रस्त्यावर नजर लावून बसला होता. मनातलं वादळ लपवण्याच्या प्रयत्नात.
"तुला दत्तक घेऊ मी?"
तिच्या अचानक प्रश्नाने तो दचकला.
"काय?"
"तुला दत्तक घेऊ मी? तू आत्ताच म्हणालास ना की तुझं माझं रक्ताचं नातं नाही.  खरंच आहे ते. पण तुला दत्तक घेतलं की माझा होऊन जाशील."
"खरंच? खरंच विचारते आहेस की गंमत?" तो चांगलाच गोंधळला.
"अशी कशी गंमत करेन जय, पण वाटतं तितकं सोपं नाही हे लक्षात ठेव. तुझी आई खूश होईल पण फिलीप त्याला जेवढे अडथळे आणता येतील तितके आणणार हे नक्की. मला मनस्ताप होईल, तुला त्रास, प्रचंड त्रास. यातून निभावशील तू? तुझं वय अडनिडं आहे. आपल्याला एखाद्या समाजसेवी संस्थेची मदत घ्यावी लागेल. त्यांच्या मदतीने कोर्टात तुझी, माझी बाजू मांडता येईल. पण तिथे तुला उलटसुलट प्रश्नाच्या कचाट्यात अडकावं लागेल. आहे तुझी तयारी?" तो काही कळत नसल्यासारखा बराचवेळ तिच्याकडे पाहत राहिला.
"अरे असा बावचळू नकोस. तू नाही म्हटलंस तरी माझ्याकडेच राहशील. फक्त विचार कर मी काय म्हणते आहे त्याचा."
जयने अलगद तिच्या खाद्यांवर डोकं टेकलं. डाव्या हाताने तिने त्याच्या खांद्यावर थोपटलं.  त्याच्या केसातून हळुवारपणे हात फिरवला. काळोखाने घेरलेल्या त्या गाडीत लांब अंतरावरचे रस्त्यावरचे दिवे तिला प्रकाशाच्याच दिशेने मार्ग दाखवत होते.  गाडी सुरू करून आता तिला त्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं होतं.


(लॉरा निकोलसन या माझ्या मैत्रीणीच्या आयुष्याची ही सत्यकथा)

Saturday, November 26, 2011

तिने काय करावं?

कोणे एके काळी ती त्याला गाडीत भेटली. तो त्याच्या गावी गेला होता. ती मैत्रिणीबरोबर परत येत होती. तिच्या हातात डायरी. दोघी कविता वाचनात मग्न. तो अधुनमधुन डोकावत असला  डायरीत, तरी तिला त्याची कल्पना नव्हती. त्या दोघींचं जगच निराळं होतं. एकदम त्याने डायरीच मागितली वाचायला. नाही कसं म्हणणार?
"डायरी आहे."
"हो, तीच मागतोय." त्याने धीटपणे म्हटलं.
"कविता आहेत. बाकी विशेष काही नाही."
"त्याच वाचायच्या आहेत."
"आवडतात?" असं म्हणत तिने त्याच्या हातात डायरी सुपूर्द केली. तो वाचत राहिला. त्या गप्पांमध्ये रंगून गेल्या.
मुक्कामाला डायरी परत घेत तिने निरोप घेतला. तो वळून वळून पाहत राहिला. दोघी हात हलवत निघूनही गेल्या.

आणि एकदम त्याने तिला पत्रच पाठवलं. एक नाही दोन. म्हणजे त्याला माहीत नव्हतं की त्याचं पत्र तिला मिळालं आहे की नाही म्हणून हे दुसरं पाठवलेलं.

’आपली ओळख अगदी निसटती. स्पर्धेच्या गोंधळातली, बक्षीस विजेत्यांच्या गर्दीतली. तुझ्या कविता खूप भावल्या. कवितेनं किती जवळ आणलं आपल्याला. तुझ्या चेहर्‍यावर बक्षिसाचा आनंद ओसंडून वहात होता. मी तुझ्या हास्याच्या सरीत न्हाऊन निघत होतो. तुला त्याची जाणीवही नव्हती. मग गाडीतही भेटलो. म्हणजे मुद्दाम वाकडी वाट करून मी त्या गाडीत शिरलो. किती सहजतेने निरोप घेतलास. मला मात्र, खूप वेळ काहीतरी हरवल्याची जाणीव होत राहिली. घरी आल्यावर अगदी आठवणीने पत्र धाडलं. डायरीत होता तुझा पत्ता. पोचलंच नाही का ते तुला? की एवढं धाडस आगाऊपणाचं वाटलं? पत्रासोबत काव्यंमालेचा अंकही जोडला होता नमुना म्हणून. खूप दिवस उत्तराची वाट पाहिली. मग वाटलं, काहीतरी सापडल्यासारखं वाटत होतं पण चिमटीत येतायेताच निसटून गेलं. जाऊ दे, नशिबातच नाही म्हणायचं, दिवसामागून दिवस लोटले. कधीमधी तुझी आठवण सतावत राहिली. पण पुन्हा लिहायचं धाडस कसं होणार? काल खूप बेचैन होऊन समुद्रावर भटकत राहिलो. कंटाळून परत आलो तर ’काव्यमाला’ दाराच्या फटीतून आत आलेली. जरा वैतागानेच अंक उघडला. तू ’सोबत’ घेऊन आली होतीस. मन चिंब चिंब झालं. पुन्हा एकदा तीच सहजता. तीच निरागसता बरसून गेली. आठवणीतली वीज चमकून गेली.  अशीच सरीमागून सरीसारखी धावत ये. चिंब चिंब भिजवत राहा. तुला आवडणार नाही कदाचित, पण मनात अंकुरलं, खूप लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं.’

खरं तर पहिलं पत्र मिळालं होतं. नशीब, घरात कुणी न फोडता ते तिच्या ताब्यात आलं होतं. नमुन्याच्या अंकातला पत्ता पाहून तिने आपली कविता लगेच पाठवूनही दिली होती. समजलं असेल का ते त्याला? पत्राला मात्र उत्तर पाठवलं नव्हतं. चेहराही आठवत नाही त्या मुलाला कशाला लिहायचं पत्र?
तिला आवडलं ते पत्र पण तो कोण हे काही केल्या लक्षात येईना. कविता, काव्यंस्पर्धा हा तर तिचा जीव की प्राण. बक्षिसं, मित्रमैत्रिणींचा सततचा घोळका, स्पर्धांमधल्या ओळखी. कोण असेल हा? काही दिवस ती त्या प्रश्नात रमली आणि नंतर विसरलीही. त्याच्या धाडसाला अनुत्तरित प्रतिक्रियेने पूर्णविराम मिळाला.

वर्ष लोटली.  ती सुखासमाधानात न्हाऊन निघालेली. कवितेच्या दुनियेतून संसारात, नोकरीच्या व्यापात रमलेली. फेसबुकचा जमाना आला आणि जुन्या ओळखी शोधण्याचं वेड  लागलं. काही नावं आठवली काही कुठून कुठून शोधून काढली. त्यातलाच एक तो. त्याचं अडगळीत पडलेलं पत्र सापडलं आणि तिला वाटलं तेव्हा नाही पण आता तरी त्याचा चेहरा पाहावा. शोधलंच मग तिने त्याला. त्याच्या नावासारखी तीन चार नावं होती. काय लिहिणार प्रत्येकाला? कधीतरी कुठेतरी झालेली आपली ओळख (एकतर्फी) असं तूच म्हणाला होतास, पत्र पाठवली होतीस दोन तो तूच का? त्याने लिहिलेल्या पत्रातल्या काही ओळी पण लिहाव्यात म्हणजे कदाचित आठवेल ते त्यालाही. तिने तसं केलं आणि त्याचं उत्तर आलं. तो तोच होता. त्याला अद्याप आठवत होतं सारं काही. तिच्याकडे आठवण्यासारखं काही नव्हतंच. पण त्याचा चेहरा पाहायची उत्सुकता होती. फोटोच नव्हते पण फेसबुकवर. असं कसं म्हणणार नं की टाक बुवा तुझे फोटो. कोण होता तो माझ्या प्रेमात पडलेला ते पहायचं आहे. ती मग गप्प राहिली. तू कुठे, मी कुठे झालं आणि तो म्हणाला, मी येतो तुझ्या गावात कधीतरी. बापरे, मग आता त्याला काय घरी ये म्हणायचं? नवर्‍याला काय सांगायचं?  तिने बरेच दिवस उत्तरच पाठवलं नाही त्याला.

आणि एक दिवस त्याचा फोन आला. ’कुठून शोधला याने नंबर?’ भेटायला येतो म्हणाला.  तिने नवर्‍याला थोडंफार सांगितलं, म्हणजे गाडीत ओळख, त्याने कवितेचा पाठवलेला अंक असं वरवरचं. नवरा म्हणाला मग जेवायलाच बोलाव. अनोळखी माणसाला एकदम जेवायला बोलवायचं? काय बोलायचं? पण उत्सुकतेपोटी तिने ते केलं. मनात कुठेतरी प्रश्न होता. तेव्हा उत्तर पाठवलं असतं तर आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं का? स्वत:च्या संसाराची बेरीज वजाबाकी मनातल्या मनात करून झाली. सगळं आलबेल होतं. पण  तो काय करतो? त्याचा संसार? तिला स्वत:चीच लाज वाटली. आता इतक्या वर्षांनी असा विचार मनात तरळून जावा. जाऊ दे. त्याला एकदा येऊन तर जाऊ दे, मग नाही संपर्क ठेवायचा.

तो आला आणि तिला तो मुळ्ळीच आवडला नाही. म्हणजे पहिला प्रभाव वगैरे म्हणतात ना तो काही पडला नाही तिच्यावर. त्यावेळेस उत्तर पाठवलं नाही ते किती बरं झालं. येताना कवितांचं बाडच घेऊन आला होता. कवितांवर कविता वाचत राहिला. नवरा कामाचं निमित्त काढून उठलाच तिथून. जाता जाता तिच्याकडे मिश्किलपणे हसून पाहायला तो विसरला नाही. ती ऐकत राहिली. ओढून ताणून छान, मस्त म्हणत राहिली. तीन चार तासांनी तो गेला. पुढच्यावेळेस आणखी कविता आणतो म्हणाला.

गेल्यानंतर त्याचा फोन आला, फेसबुकवरून तो पत्र पाठवत राहिला. तिने आता काय करावं? म्हणजे पत्रांना उत्तर नाही पाठवत ती पण तो तिच्या गावात येतो. पुढच्या वेळेस कवितांचं बाड घेऊन आला आणि घरी येतो म्हणाला तर...? काय करायला हवं तिने? सुचवाल एखादा मार्ग?

Wednesday, November 23, 2011

माझा स्पेलिंग बी स्पर्धेतील सहभाग

"आई, मी स्पेलिंग बी मध्ये भाग घेतेय."  मुलीने जाहीर केलं आणि माझा चेहरा खाडकन उतरला.
"अगं त्यासाठी स्पेलिंग यावी लागतात." माझ्या स्वरातली अजिजी तिच्या पर्यंत पोचली नाही.
"मग?"
"मला येत नाहीत."
"पण भाग मी घेणार आहे. खी खी खी...."
"हो, पण तुझी तयारी मला करून घ्यावी लागेल नं." माझं केविलवाणं स्मित.
"ईऽऽऽ त्यात काय आहे. तू मला शब्द विचार, मी स्पेलिंग सांगेन."
"अगं पण ते शब्द विचारता यायला हवेत ना मला?"
मुलगा फजिती बघायला उभा होताच. फजितीची फटफजिती झाली तर पाहावी म्हणून तोही मध्ये पडला.
"बाबा तर म्हणत होता तुझ्याकडे इथली पण पदवी आहे."
"शिक्षणाचा काही उपयोग नसतो काहीवेळेस"
"हं..........खरंच की." एकदम साक्षात्कार झाल्यासारखं तो म्हणाला.  घाबरायलाच झालं. पठ्ठ्या एकदम शाळा सोडून द्यायचा, शिक्षणाचा उपयोग नसतो  त्याचं उदाहरण समोरच आहे म्हणून.

तो पर्यंत मुलीने शाळेतून आलेला शब्दांचा कागद पुढे केला. पाहिलं आणि धडधडलं. किती हे शब्द. हे सगळे विचारायचे?
"विचार ना." मुलगी वाट बघत, मुलगा आव्हान दिल्यासारखा.
एकदा कागदावर नजर रोखत, एकदा तिच्याकडे कटाक्ष टाकत पटकन किती शब्द विचारता येतील याचा मी अंदाज घेतला.  मला उच्चार करता आले आणि तिला स्पेलिंग्ज सांगता आली. दोघी खूश.
"उरलेले शब्द नंतर. आता कंटाळा आलाय."
"दे मग तो कागद."
"नको राहू दे माझ्याकडे."
"कशाला?" ती तशी सरळ आहे त्यामुळे तिचे प्रश्न पण सरळच असतात. उगाच वाकडा विचार, कुसकट प्रश्न असं मिश्रण नसतं. पण सुपुत्र कडमडलेच मध्ये.
"राहिलेल्या शब्दांचा अर्थ गूगल करणार असेल आई. उरलेले शब्द नंतर विचारते म्हणाली ना."
"शाबास! कसं बरोबर ओळखलंस. फुटा आता."
"म्हणजे?"
"निघा इथून असा आहे त्याचा अर्थ."

माझी खरी कसोटी होती उच्चारांची. गूगल करून उच्चार थोडेच सापडतात? माझ्याच वाट्याला असे शब्द का येतात कुणास ठाऊक. पुन्हा आपण उच्चार चुकीचा करतोय हे कळत असतं तर तो चुकीचा कसा करू? ते नेमकं दुसर्‍यालाच समजतं. चुकीचं हे नेहमी असं असतं. आपल्याला आपली चूक वाटतच नाही. परवा एका मैत्रिणीकडे गेले होते. अपार्टमेंटचा नंबर सांगणारा बाण होता. त्या बाणाच्या दिशेने तीन वेळा गाडी नेली पण इमारत काही दिसेना. म्हटलं. अपार्टमेंटवाले बाणाची दिशा दाखवायला चुकले बहुतेक. तसं असतं हे. आपण चुकलो असं वाटतच नाही त्यामुळे सगळ्या समस्या.

माझा वाढदिवस नोव्हेंबर मध्ये. ऑफिसमध्ये कुणी विचारलं की दुसराच महिना सांगावा असं वाटतं. नोव्हेंबर म्हटलं की लगेच
"ओ यू मीन नोवेंबर?" आलंच. पुन्हा आमच्या मराठीत असंच म्हणतात असं कसं सांगणार, तरी कधीतरी पुराव्यानिशी सिद्ध करता यावं म्हणून भिंतीवर लटकवलेल्या कालनिर्णयवर  पाहून खात्री केली नोव्हेंबरची. हापिसात सर्वांना तेवढं मराठी यायला लागलं की दाखवेन. नाहीतरी उठसूठ ’नमस्ते’ करत राहतात त्याऐवजी असं काहीतरी शिका म्हणावं.

हल्ली तर कुणाचं लक्ष नाही किंवा नीट ऐकलं नाही म्हणून  कुणी ’से इट अगेन’ म्हटलं की मला वाटतं, चुकला उच्चार. मग बरोबर केलेल्या उच्चाराचीही वाट..... सगळी अक्षरं एकत्र करून शब्द म्हणण्यापेक्षा सुट्टी अक्षरं खपवावीत त्यापेक्षा, नाहीतर सगळा व्यवहार इ मेलने. बोलायचं म्हणून नाही. या सगळ्या युक्त्या मुलीसमोर चालणा‍र्‍या नव्हत्या. घरात पितळ फार लवकर उघडं पडतं/ पितळी फार लवकर उघडी पडतात.

दुसर्‍या दिवशी ज्या शब्दांचे अर्थ माहीत नव्हते त्यांचे गूगल करून शोधले. उच्चारांची बोंब होतीच पण आता निदान अर्थ तरी माहीत होते. तरीही संकट 'आ' वासून उभं होतंच. ते कधी पडत नाही, उभंच राहतं.  उच्च्चार नीट झाला नाही तर मुलगी स्पेलिंग कशी सांगणार? चुकली की स्पेलिंग सांग म्हणणार. स्पेलिंग सांगितलं की चुकीचा उच्चार केला म्हणून डोळे गोल बिल फिरवून नाराजी व्यक्त करणार. इतकी वर्ष अशा प्रसंगातून सुटण्याचा माझ्याकडे उत्तम मार्ग होता,
"माझ्या मागे काय लागता. मी किती करू, नोकरी पण करायची, घरकाम पण करायचं, अभ्यास पण घ्यायचा...."  अर्धा तास तेच तेच ऐकायला नको त्यामुळे पोरांनी आधीच पोबारा केलेला असायचा. पण आता तेही फारसं मनावर घेत नाही कुणी. बाकिची कामं करून टाकतात तेवढ्या वेळात.

Liz - मराठी इंग्लिशमध्ये 'लिझ' म्हटलं की इंग्लिश इंग्लिश मध्ये त्याचं Lease होतं.  Rich आणि Reach, be आणि bee माझा उच्चार दोन्हीसाठी एकच असतो.  थोडे दिवस मग मी असे आणखी कुणी उच्चार करतं का यावर पाळत ठेवली.  बर्‍याच मैत्रिणी निघाल्या तशा. पण हा पुरावा फारसा मौल्यवान नव्हता मुलांसाठी.
आमच्या  स्पॅनिश बंधू भगिनी माझ्या 'स्टाइल'चेच उच्चार करतात हे कळल्यावर आधी पोरांना सुनावलं.
"बघा, हा काही आमच्या इंग्रजी शिक्षकांचा दोष नाही. त्यांनी बिचार्‍यांनी आम्हाला नीटच शिकवलं होतं. हे इंग्लिशच विचित्र आहे." दोघा भावंडांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं.

"जाऊ दे ना मी वेगवेगळ्या उच्चारांचा सराव करते. परीक्षक स्पॅनिश, चायनीज असले तर"  मुलीने शरणागती पत्करली. एरवी प्राण गेला तरी लढा, वगैरे धडे देते मी, ते आवरले यावेळेस. गेल्या तीन आठवड्यात वेगवेगळ्या उच्चारात शब्दांची तयारी झाली आहे. लवकरच किल्ला सर करायचा आहे."  बघू काय होतं ते.

ता. क. -  या वर्षी मी देखील तिच्या शाळेत स्पेलिंग बी च्या प्राथमिक फेरीसाठी  परीक्षक आहे :-) फक्त तिच्या गटाला नाही. सुटली....


Saturday, November 12, 2011

प्रवास.....

गेल्या आठवड्यात मायदेशातून परत आले माझ्या देशात.  दरवेळेला बसतो तसा सांस्कृतिक धक्का नाही बसला यावेळेस. कदाचित वर्षाच्या आत फेरी झाली म्हणून जाणवलं नसावं. प्रकर्षाने जाणवलं ते इतकंच की प्रवासात  सहप्रवासी संवाद साधायला अजिबात उत्सुक नाहीत. एअरपोर्ट ते पुणे के. के. ट्रॅव्हल्सने गेले. तीन तासाच्या प्रवासात अगदीच हु का चु न करता कसं बसणार म्हणून मी काही ना काही बोलायचा प्रयत्न करत होते पण बरोबरच्या प्रवाशांना काहीच रस नव्हता. बाजूला बसलेल्या बाई तर मराठी बोलेचनात. मला वाटलं खूप वर्ष परदेशात राहिलं की होतं ते झालं असावं याचं. पण त्या फक्त ८ दिवसांसाठी गेल्या होत्या दुसर्‍या देशात. शेवटी ड्रायव्हर आणि मी, आम्ही  मात्र जिव्हाळ्याच्या चार शब्दांची अदलाबदल केली. बाकी सारा प्रश्नोत्तरांचा खेळ. म्हणजे मला कुणीच काही  विचारलं नाही. मी विचारलेल्या प्रश्नांना फक्त उत्तरं दिली. तेवढ्याही त्या प्रवासात ड्रायव्हर महाशयांनी त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाला विचारलं,
"तुम्ही शूज काढलेत का आत्ता?"
ते गोंधळलेच.
"हो, का?"
"वास मारतोय" असं म्हणत ड्रायव्हरनी खिडकी उघडली.
प्रतिक्षिप्त क्रिया होऊन मी पुढे पसरलेले पाय मागे घेतले :-).
प्रत्येकाला आपल्या पायाचा तर....ही शंका असणारच मनात. पण बाकी सारे स्थितप्रद्न्यासारखे बसण्यात यशस्वी झालेले दिसले. घर आलं आणि श्वास घेतला मोकळा. संपला एकदाचा प्रवास.
रत्नागिरीहून पुण्याला येताना तोच अनुभव. बाजूला बसलेली सहप्रवासी अगदी थंड स्वरात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. बाकी फोनवर बोलणं, नाहीतर इ मेल तपासणं हेच अव्याहत.

परत येताना विमानातल्या १६ तासात मला आठवत राहिलं वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या प्रवासाचं स्वरुप.  प्रवासात झालेल्या ओळखी, काही टिकलेल्या, बर्‍याच प्रवास संपल्या संपल्या विरुन गेलेल्या. पुसट होत गेलेले चेहरे, प्रसंग.....ते देखील एकाशी दुसर्‍याचा काही संबंध नसलेले.

बाहेरगावाहून रत्नागिरीला परत आलं की हमखास कुणीतरी आडगावात जाणारं असायचं गाडीत. स्टॅडवर वेळ काढायचा असायचा पाच सहा तास. अशा प्रवाशांचे ते पाच सहा तास गाडीत झालेल्या ओळखीवर  आमच्या घरी जायचे.

८३-८४ च्या आसपासची गोष्ट. परळ ते रत्नागिरी. काका (मावशीचा नवरा) आले होते पोचवायला बस स्थानकावर. नाव पाहून गाडीत बसणार तर ही गाडी नाहीच असं म्हणाले कंडक्टर. आम्ही आपले सारखे चौकशी करत. शेवटी कळलं तीच गाडी होती रत्नागिरीला जाणारी. गेली निघून. मग काकांनी चौकशीच्या तिथे धारण केलेला रुद्रावतार. शेवटी एस. टी. ने पैसे परत करण्याचं केलं मान्य. पण आता दुसरी समस्या. आरक्षण कुणा दुसर्‍याच्या नावाने केलेलं. पैसे त्याच्याच नावाने मिळणार. त्यानंतर बोरिवलीच्या ते रहात तिथल्या परिसरात प्रत्येकाला ठाऊक होतं की पाखर्‍यांच्या नावाने मनिअऑर्डर आली तर देसायांकडे पाठवायचं.

त्याही आधी म्हणजे गुजरात जवळच्या पालघरला आम्ही रहायचो तो काळ ७७-७८ सालचा. बहीण कोकणात गेली होती आजी आजोबांकडे. तेव्हा  फोन घराघरात नव्हता. परत येताना ओळखींच्या बरोबर ती मुंबईला येणार होती. माझे काका तिला पालघरला आणून सोडणार होते.
अख्खा दिवस पुतणीची वाट पहात काका  स्टॅडवर उभे. आत्ता आली गाडी तर.....या भितीने जेवणासाठीही त्यांना तिथून निघता येईना. कंटाळून संध्याकाळी शेवटी ते परत गेले. माझे वडिल संध्याकाळपर्यंत मुलगी आली नाही म्हणून रात्री त्यांच्या घरी पोचले. काका आणि वडिलांची वरात ओळखींच्यांच्या घरी. पाहातात तर तिथे सगळी जेवत बसलेली. गाडी कोकणातून सहा तास उशीरा सुटली होती. पण एकमेकांशी संपर्क साधायला मार्गच नव्हता काही.

त्यावेळचा प्रवास, त्यातून घडलेले किस्से त्या त्या वेळेस फारसे महत्वाचे वाटले नव्हते नक्कीच. पण आता मात्र त्या क्षणांची मजा औरच वाटते; विशेषत: हल्ली होणार्‍या प्रवासात तसं काही घडतच नाही तेव्हा.......

Tuesday, September 27, 2011

एकांकिका

खूप दिवसात ब्लॉगवर यायलाच जमलं नाही.  एकांकिकेच्या गडबडीत वेळच झाला नाही. गेले चार महिने दोन एकांकिका बसवत होतो आम्ही. म्हणजे मी आणि  माझा नवरा. 'खेळ' आणि 'सांगायचं राहिलंच'
कलाकार आणि मित्रमंडळी होतीच मदतीला. पण नाट्यगृह आरक्षित करणं, तिकीटं विकणं, जाहिरात करणं,  एकांकिकेची जाहिरात करताना संकेतस्थळासाठी वर्णन, रेडिओसाठी वेगळं, माहितीपत्रकाकरता निराळं.....खूप कामं. आणि सराव, सराव, सराव....त्यात एका एकांकिकेत  भूमिका आणि दोन्हीचं दिग्दर्शन. पण छान पार पडलं सारं. २५० च्या आसपास लोक होती. प्रेक्षकांना आवडल्या दोन्ही एकांकिका. या दुव्यावर माहिती आहे.   एकांकिकाच्या क्लिप्स आहेत त्या पहा. कळवा मला कशा वाटल्या.  वाचकांपैकी अमेरिकतलं कोणी असेल तर तुमच्या इथे (मंडळात) अभिव्यक्तीच्या एकांकिका करायला मिळतील का किंवा कुणाशी त्यासाठी संपर्क साधता येईल ते कळवलंत तर आनंद होईल.
http://marathiekankika.wordpress.com/

Friday, July 15, 2011

अबब अमेरिका

(लहानपणी मावसभावाकडे सोवियत रशियाचा कुठलातरी अंक यायचा त्यावरुन आम्ही अमेरिका कशी आहे ते ठरवायचो :-). त्या अमेरिकेत पंधरा वर्षापूर्वी पाऊल ठेवलं तेव्हा असलेल्या आमच्या अज्ञानाचा हा मजेशीर आलेख. आताच्या सारखं अद्यायावत माहितीच्या आधारे 'आलो की झालो इथलेच' पेक्षा फार वेगळा काळ होता तो हे लक्षात घेऊन वाचावे.)

"प्लीज कॉम्प्रमाईज विथ देम"
"सॉरी, नो कॉम्प्रमाईज. इफ यू वॉट यू कॅन कॉल द अ‍ॅथॉरिटी"  मोटेल व्यवस्थापक आणि टॅक्सी ड्रायव्हरचा वाद चालू होता. मी, माझा नवरा आणि त्याचा मित्र  ’दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ’ या उक्तीच्या प्रत्ययाची वाट बघत उभे होतो.  सॅनफ्रनस्किस्को ते सॅटारोझा असं टॅक्सीचं भाडं दोनशे डॉलर्स झालं होतं. ड्रायव्हर दिडपड मागत होता तर मोटेलचा मॅनेजर मीटरप्रमाणे घ्यायला सांगत होते.  दोनशे म्हटल्यावर माझ्या पोटात खड्डा पडला, त्याचे  दिडपट... मनातल्या मनात हिशोब चालू झाला.  भांडण ऐकायचं की हिशोब करायचा या कात्रीत सापडायला झालेलं. पण मला त्या दोघांच्या  उच्चाराची प्रचंड गंमंत वाटत होती. भारतात आम्ही  बिल क्लिंटनचं भाषण लागलं की अपूर्वाईने  ऐकायला  बसायचो  (ऐकायचो म्हणण्यापेक्षा पाहायचो) तेवढाच माझा अमेरिकन इंग्लिशशी संबंध त्यामुळे  कसे इंग्लिशमध्ये भांडतायत बघ अशा  नजरेने मी नवर्‍याकडे पाहात होते. तो आपला परत परत पाकिटात दिडशे डॉलर्स आहेत का ते तपासत होता. नाहीतर येणारा पोलिस अनायसे गिर्‍हाईक मिळालं म्हणून आम्हालाच घेऊन जायचा बरोबर. पण रात्री अडिचच्या सुमाराला  हा प्रसंग आपल्या भारतीय मनाला न मानवेल इतक्या शांततेत पार पडला. पाचच मिनिटात पोलिसांची गाडी हजर झाली. आता त्याच्या त्या ऐटदार पोषाखाकडे पाहत मी निस्तब्ध. हे सगळं असंच चालू राहावं असं वाटायला लागलं.  पण मी कुरकुर न करता उभी आहे हे पाहून नवर्‍याला काहीतरी गोंधळ आहे याची जाणीव झाली.  मी नक्की कशावर भाळले आहे  या  कोड्याने त्याच्या कपाळावर एक आठी उभी राहिली. आठ्या एकाच्या दोन  आणि दोनाच्या काहीपट व्हायच्या आत सगळं आटोपलं आणि  काहीही करायला लागलेलं नसतानाही  वेगवेगळ्या अर्थांने आम्ही तिघांनी  निश्वास सोडले.

अमेरिकन  भूमीवरच्या या पहिल्या प्रसंगाची उजळणी करत मोटेलच्या मऊ मऊ गाद्यांवर अंग टाकलं. सकाळी जाग आल्या आल्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक कार्ट पडलेली होती. (तेव्हा तर कार्ट म्हणजे काय हे ही माहित नव्हतं.) अमेरिकेत गाड्या जुन्या झाल्या की रस्त्यावर टाकून देतात हे  लहानपणी ऐकलं होतं तेव्हापासून आपण त्यातली एखादी उचलून आणावी असं वाटायचं. मी नवर्‍याला गदगदा हलवलं.
"अरे काहीतरी हातगाडी सारखं पडलंय बघ. आपण आणू या?"
"अं...काऽऽऽय?" असं काहीसं पुटपुटत त्याने कुस वळवली.
" अरे इकडे लोकं गाड्या टाकून देतात ना, तशी ती गाडी असावी असं वाटतय. जरा वेगळीच आहे पण आणते मी. फुकट मिळेल."  त्याच्या घोरण्याचा आवाज म्हणजे मुक संमती समजून मी  बाहेर डोकावले.  घाईघाईत मधलं अंगण ओलांडलं, थोड्याशा उंच भागावर झाडालगत ती कार्ट होती. कुणी बघत नाही हे पाहून आले घेऊन. अमेरिकेतली माझी पहिली चकटफू गाडी दाखविण्यासाठी विलक्षण आतूर झाले होते मी.
"अगं ही सामानाची गाडी आहे. तुला कसं बसता येईल यात? आणि ते फुकट बिकट सोडा आता." माझ्या उपदव्यापाने तो चांगलाच चिडलेला.
"बरं मग सामान आणू यातून."  आलेला राग गिळत मी  तहाच्या गोष्टी कराव्यात तसं माझं म्हणणं शांततेत मांडलं. तो काही बोलला नाही. त्याला स्वत:ला नक्की काय करावं ते कळत नसलं की तो मुक धोरण स्विकारतो (असं माझं मत)  कार्ट घेऊन आमची वरात थोड्याच वेळात बाजारात चालत जायला निघाली.

रस्त्यात माणसं फार नव्हतीच पण गाडीतली  एकजात सगळी लोकं कुतहलाने आमच्याकडे पाहात होती.
"भारतीय फार नसावेत इथे. सगळे पाहातायत आपल्याकडे." मला एकदम माधुरी दिक्षित झाल्यासारखं वाटत होतं. नवर्‍याला असं कधी कोणासारखं झाल्यासारखं वाटत नाही. तो कायम तोच असतो.
"आहेत थोडेफार असं ऐकलय. आणि तू काय भुरळल्यासारखी करते आहेस. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो परदेशात येऊन हे विसरु नकोस."
"म्हणजे मी नक्की काय करायचं, तू पुरेसा आहेस भारताचं प्रतिनिधित्व करायला आणि चालते आहे की नीट."
"हवेत गेल्यासारखी चालते आहेस."
"मी नेहमी तशीच चालते, शाळेत उड्या मारत चालते म्हणायचे मला."
"इथे नका मारु तशा उड्या."
"आधी माहित होतं ना कशी चालते ते मग कशाला केलंस......" विषय वेगळ्या दिशेने वाहू लागला तो पर्यंत  लोकांच्या नजरांना झेलत दुकानापाशी आलो म्हणून थांबावं लागलं आणि त्याचवेळेला त्या नजरांमधला छुपा अर्थ कळला. इतर लोकं कार्टमधून सामान आणून गाड्यात भरत होते. जिथे तिथे कार्ट आवाराच्या बाहेर नेऊ नका असं लिहलेलं. मग ती कार्ट आमच्या मोटेलपर्यंत कशी पोचली. कुणीतरी माझ्यासारखंच.....?

मी महतप्रयासाने मिळवलेली गाडी तिथेच सोडून देताना फार जड झालं मन.  हातात सामान घेऊन आम्ही परत निघालो तेव्हा लक्षात आलं की रस्त्यात अधूनमधून दिसणारी माणसं तोंडभरुन हसतात आणि हाय हॅलो करतात.  इकडे तिकडे बघत आपलं लक्षच नाही असं भासवत ओळखीच्या लोकांनाही टाळण्याची कला इथे उपयोगी पडणार नाही हे पटकन समजलं. आधी अवघडल्यासारखं, मग जिवणी ताणून चेहर्‍यावर भलं थोरलं स्मितहास्य ठेवत मोटेलमध्ये पोचलो. पण तोपर्यंत तोंड इतकं दुखायला लागलं की हुप्प करुन गप्प राहावसं वाटायला लागलं.  नवरा तर इतका खुष झाला या लोकांवर की सारखं आपलं रस्त्यावर रस्त्यावर चल सुरु झालं त्याचं.

दुसर्‍यादिवशी नवर्‍याचा एक मित्र आला तोही नवीनच होता  अमेरिकेत पण जुना झाल्यासारखा वागत होता. एक दिवसाचा जास्त अनुभव होता ना त्याच्या गाठीशी. त्याने मग आम्हाला रस्ता कसा ओलांडायचमा असे मुलभूत धडे दिले.  आम्ही निघालो त्याच्या मागून. त्याने असे आणखी दोन तीन नवखे पकडून आणले होते तेही निघाले बरोबर.  आता प्रात्यक्षिक. रस्ता ओलांडण्याच्या जागी आलो आणि त्या मित्राने पुढार्‍यासारखा हात वर केला 'थांबा' या अर्थी.  सगळे पावलांना ब्रेक दाबल्यासारखे जागच्या जागी खिळले.
एकदम पावलं जड झाली. भरधाव वेगाने धावणार्‍या मोटारी, रस्त्यावर कर्फ्यू असल्यासारखा माणसांचा शुकशुकाट आणि लाल, पिवळा, हिरवा असे झटपट बदलणारे सिग्नल ’रस्ता फक्त वाहनांसाठीच’ चा सूर लावून दटावतायत असंच वाटत होतं. यातून पलिकडे जायचं कसं.  पण तिथे एक बटण होतं ते दाबलं की चालायची खूण येते. मित्राने बटण दाबलं. तो आता टेचात निघाची खूण करणार तितक्यात 
"अरे वा"
 असं म्हणत मी लांब उडीच्या शर्यंतीत भाग घेतल्यासारखं साईडवॉकवरुन रस्त्यावर  उडी टाकली. माझ्या मागून बाकिच्यानी पण चार पावलं टाकली आणि भयाने अक्षरश: थरकाप उडाला. आमच्यासमोर  त्या सिग्नलचा रंग बदलला आणि आता तो लाल हात डोळे मिचकावल्यासारखा थांबण्याची खूण करत होता. नजर टाकू तिथे  चारी बाजूने खदाखदा हसत कारची चालू इंजिन्स आमच्याकडे पाहात उभी.  आतले डोळेही आमच्यावर रोखलेले. या लोकांना इतकी कमी लोकं रस्त्यावर पाहायला मिळतात ना, की बघत राहातात सर्कशीतला प्राणी रस्त्यावर आल्यासारखं. आता काय करायचं? मागे जायचं की पळत पुढे? आमच्यातले निम्मे आले तसे मागे गेले, उरलेले धावत पुढे. मी थोडं मागे पुढे केलं आणि  नवर्‍याच्या मागून पुढे धावले. पलिकडे जाऊन मागे गेलेले परत येतील याची वाट पाहात उभे राहिलो, तितक्यात  पाहिलं  की आमच्याबरोबर रस्त्यावर उतरलेली काही अमेरिकन माणसं हलत डुलत मजेत येत होती.  त्यांना आमची त्रेधातिरपीट म्हणजे गंमंतच असावी. पण मग हे का नाही धावले  हे रहस्यच होतं. आता ते उलगडल्याशिवाय चैन पडणार नव्हतं.

त्यांच्या त्या हलत डुलत चालीचं रहस्य कळायला मात्र बरेच दिवस लागले. तोपर्यंत ’वॉकिग सिग्नल’ दिसला  की ’अरे, चलो, चलो’ म्हणत आमची सगळी गॅग धावण्याच्या शर्यंतीत भाग घेतल्यासारखी पळत सुटायची. आता मागे पुढे न करता पुढेच पळायचं असं त्या मित्राने बजावलं होतं.  कधीतरी  वाहन चालनाचा परवाना वाचताना  कळलं की तो लाल हात डोळे मिचकावयला लागतो ते रस्त्यावर पाऊल न टाकलेल्यासाठी. एकदा तुम्ही रस्त्यावर आलात की जा अगदी आरामात. हे कळल्यावर मग आम्हीही कुणाच्या बापाचं काय जातं थाटात......चालायला लागलो.

मोटेलचे दिवस संपले आणि अपार्टमेंटमध्ये राहायला आलो.  आल्या आल्या आवारात कचर्‍याच्या पेटीत मायक्रोव्हेव टाकलेला पाहिला. कार्टसारखं करावं का असं वाटून गेलं पण.... खूप गोष्टीचं अप्रूप होतं, पण आवारातला पेपर रॅक  मला अतिशय आवडला. एकदा पैसे टाकले की कितीही प्रती घ्या. माझ्या दृष्टीने हा रॅक मल्टीपर्पज होता.
"भारतात असतो तर  शेजार्‍यापाजार्‍यांसाठी पण घेता आली असती नाही वर्तमानपत्र?" नवर्‍याने थंड नजरेने पाहिलं. (नशीब मायक्रोव्हेव बद्दल काय वाटतं ते बोलले नव्हते.) त्या थंड नजरेचा अर्थ मुर्ख, बावळट, जास्त शहाणी असा असतो. बोलण्याचं धाऽऽऽडस नाही ते असं नजरेतून डोकावतं. (ह्या माझ्या वक्तव्याचा त्याच्याकडून निषेध) तरीही मी खुंटा बळकट केल्यासारखं म्हटलं.
"आणि केवढी रद्दी जमवता आली असती. ती विकून...."   त्या रॅकचं दार आत्ताच ही सगळी वर्तमानपत्र काढून घेते की काय या भितीने त्याने धाडकन लाऊन टाकलं.

हे घराच्या बाहेरचं. आत गेल्यावर ते भलं मोठं घर आधी फिरुन पाहिलं.  ठिक होतं सगळं पण मोठा प्रश्न पडला, कपडे वाळत कुठे घालायचे? ही माणसं काय करतात कोण जाणे. सारखी मेली स्विमिंग पूलमध्ये धपाधप उड्या मारत असतात. यांच्या ओल्या कपड्याचं काय? बाल्कनीतून स्विमिंग पूलजवळ्च्या अर्धवस्त्र नार्‍यांकडे बघत मी विचारात गुरफटले. तितक्यात ’ हे ’आलेच
"स्विमिंग पूल बघायचाय?" माझा खोचक प्रश्न.  पण तो माझ्या बाजूला उभा राहून  निसर्ग सौदर्य पाहाण्यात इतका मग्न झाला की माझा प्रश्न त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. ती संधी साधून म्हटलं,
"कपडे धुवायचे आहेत."
"अरे देना मग, मी धुऊन आणतो"
"तू?" मी नुसतीच त्याच्याकडे अवाक होऊन पाहात राहिले. स्विमिंग पूल याला दारुसारखा चढला की काय?
"अगं पूलच्या बाजूलाच असतं मशीन, तिथे येतात धुता"
"तरीच" मी माझ्या नजरेत ’तरीच’  मधला भाव आणला.
"अरे पण पैसे, आय मीन डॉलर्स?"
"पंच्याहत्तर सेंट मध्ये कितीही कपडे धुता येतात."
"बाप रे, मग रांगच असेल मोठी"
"मशिन नाही गं बाई मशिन्स असतात"
"बरं बरं कळलं." असं म्हणत मी भारतातून आणलेल्या सगळया बॅग्ज रिकाम्या केल्या.
"एवढे कपडे?" तो दचकलाच ढिग पाहून.
"७५ सेंट मध्ये कितीही धुता येतात ना?" तो कपडे घेऊन घाटावर  आय मीन मशिनवर गेला.

मी जेवणाच्या तयारीसाठी आत वळले.  पोळीसाठी कुणीतरी ऑल परपज फ्लॉवर मिळतं ते वापरायचं म्हणून सांगिंतलं होतं. आम्हीही बिनदिक्कत एक मोठं पोतंच आणलं त्याचं. मी खा किती खायच्या त्या पोळ्या या थाटात आणि नवरा घे गं बाई तुझी एकदाची कणीक या आनंदात.  त्याच उत्साहात मी ते पोतं उघडलं.
’अगं बाई इकडची कणीक पांढरीशुभ्र असते की काय?’ अमेरिकेचं सगळंच बाई न्यारं या कौतुकात मी पिठाकडे पाहात राहिले, विचारायला कुणी नव्हतं म्हणून पिठालाच विचारल्यासारखं. पाणी घातलं तर त्या पीठाचं पिठलं झालं. पोळ्याऐवजी आंबोळ्या मिळाल्या आणि आम्ही आपलं, नाहीतरी आंबोळ्या होतच नाहीत फारशा तर खाऊया आता म्हणून दोन महिने ते पीठ संपेपर्यंत समाधान करुन घेतलं.

ऑलपरपजसारख्या (मैदा) कितीतरी शब्दांनी आम्हाला फसवलं पण आम्हीही पुरुन उरलो, आमच्या अज्ञानात कुणी ना कुणी भर घालत राहिलं. त्यानंतर ही साखळी गेली पंधरा वर्ष चालूच  आहे. एका अज्ञानातून ज्ञानाच्या कक्षेत प्रवेश केला की नवीन काहीतरी येतंच......

Thursday, July 7, 2011

हाताची घडी तोंडावर बोट!

(बदली शिक्षक म्हणून आमच्या राज्यात शाळांमध्ये काम करता येतं. त्यासाठी  शिक्षणक्षेत्रातील पदवी नसली तरी चालते, पण प्रशिक्षण घ्यावं लागतं.  मी  तीन चार वर्ष हे काम केलं, तेव्हा आलेल्या अनुभवांपैकी ह्या गमतीदार आठवणी. स्पेशल प्रोग्रॅमधली मुलं मात्र  झोप उडवतात  त्यांच्या वागण्याने आणि ती ज्या परिस्थितीत वाढत असतात ते पाहून. त्यावर नंतर केव्हातरी.)

महाविद्यालयात असताना घराजवळच्या पोलिस लाईनीतल्या मुलांच्या घेतलेल्या शिकवण्या एवढ्या पुण्याईवर मी अमेरिकेतल्या शाळेत शिकवायला जायचा बेत जाहीर केला आणि खिजवल्यासारखा हसला नवरा. तिकडे केलं  दुर्लक्ष पण मुलगा म्हणाला,
"आई, तू गणित शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? (नोटावर असतात हे ठाऊक आहे, पण तेच मनात भिनलेलं आहे) नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण पहिले धडे नाण्याचे घ्यावे लागणार हे लक्षात आलं. शाळेत जायच्या आदल्या दिवशी नवर्‍याला म्हटलं,
"काही आलं नाही तर तुला फोन केला तर चालेल ना?"
"तुझं अडणार म्हणजे गणित. एखादाच तास असेल तर चालेल."
त्याच्या आँफिसातला फोन मी शाळेत असताना सारखाच घणघणायला लागला.
"मला वर्क फ्राँम होम पोझिशन मिळते का पाहतो आता. म्हणजे दोन दोन नोकर्‍या घरातूनच करता येतील."
मी न ऐकल्यासारखं करत तयारी करत होते.
नाणी पुठ्ठ्यावर चिकटवून खाली नावं लिहिली. मुलांसमोर फजिती नको.

पहिला दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."

त्याच्या नाही पण दुसर्‍या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्‍या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग माझ्या माथ्यावर मारलेला.  सारेगमप ही मला कधी सुरात म्हणता आलं नाही तिथे मी काय संगीत शिकवणार आणि तेही इंग्लिशमध्ये.
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
धक्काच बसला, माझं काम वेळ मारून नेणं होतं.  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुण्णाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची.
रागारागातच वर्गात  सूर लावला. दिवसभर भारंभार मुलं येत होती संगीत शिकायला.  आऽऽऽऽ लावता लावता थकून जायला झालं.  कुणी काही विचारलं की थातूर मातूर उत्तरं देऊन भागत नाही पोरांसमोर. उलट सुलट विचारत राहतात. एकदा बिंगं फुटतंय असं वाटलं तसं एका मुलाला वर्गाच्या बाहेर काढलं. तो हटून बसला.
"मिस, मी का जायचं वर्गाच्या बाहेर?"
"मला तोंड वर करून विचारतो आहेस. जा म्हणतेय तर व्हायचं बाहेर."  आमच्यावेळेस होतं का असं धाडस शिक्षकांना विचारण्याचं. त्यावेळेस मिळालेल्या काही काही शिक्षांचं कोडं मला अजून उलगडलेलं  नाही :-) पण हे त्या मुलाला काय कळणार, कप्पाळ. कारण सांगितलं तसा तो बसला बाहेर जाऊन. थोड्यावेळाने एक उंच शिडशिडीत माणूस दारावर टकटक करत.
’हा शिक्षक की पालक?’ विचार मनात येतोय तोच तो म्हणाला,
"बरं दिसत नाही मूल बाहेर, आत घे त्याला."
'बरं दिसायला काय ती झाडाची कुंडी आहे?'  हे मनातल्या मनात
मी घरात नाही पण बाहेर जरा टरकूनच वागते. तू कोण सांगणारा वगैरे न विचारता मुकाट्याने त्याला आत घेतलं. नंतर कळलं की शाळेचा प्रिन्सिपाँल होता तो किडकिड्या.

त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी, कारण इतकं सगळं होऊनही त्या शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली होती. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले.

सगळी गोरी मुलं मला तरी सारखीच दिसतात.  त्यामुळे एखाद्या भारतीय मुलाला मी माझं लक्ष्य बनवायची वर्गाच्या बाहेर पडणार असू तर.  तिथेही थोडाफार गोंधळ होतोच. सगळी दाक्षिणात्य मुलंही मला एकसारखीच वाटतात.  त्या दिवशी मुलांना खेळायला घेऊन गेले मैदानावर. कसं कोण जाणे पण बाहेर जाताना नेलेली मुलं आत येताना बदलली. ती सुद्धा मुकाट्याने चला म्हटल्यावर रांग करून उभी राहिली आणि आली आपली माझ्याबरोबर. वर्गापाशी पोचल्यावर कुणाचं तरी धाडस झालं,
"मिस...."
"मिस एम" माझ्या नावाची आठवण करून दिली मी.  नुसतं मिस काय...., आदर  म्हणून नाही कार्ट्यांना.
"आम्ही तुमच्या वर्गातली मुलं नाही."
"ऑ?" मला पुढे काय बोलावं ते कळेना. दातखिळी बसल्यागत विचारलं,
"मग माझा वर्ग कुठे आहे? आणि तुमच्या शिक्षिकेला कळलं नाही तुम्ही माझ्याबरोबर निघालात ते?"
"ती सुद्धा तुमच्यासारखीच आहे."
"बापरे म्हणजे काय म्हणायचं आहे हिला?" माझ्या काळजातली धडधड लपवीत विचारलं,
"म्हणजे सबस्टीट्युट का?"
"हो" हुऽऽऽऽश
मग आम्ही दोघी बदली शिक्षिकांनी परत मुलांची अदलाबदल केली.

हे तसे जरा बरे प्रसंग माझ्या आयुष्यातले. स्पेशल म्हणजे काय त्याचा अनुभव यायच्या आधीचे. स्पेशल वर्गात उभी राहिले आणि कल्लू आडदांड मुलं बघून घाम फुटला. मला वाटलं होतं वर्गात फक्त बारा मुलं आणि काहीतरी स्पेशल करायला मिळणार. पण दृश्यं वेगळं होतं.
"व्हॉट्स युवर नेम?"
घाबरत मी म्हटलं.
"आय डोंट रिमेंबर"
"व्हॉट?"
"यू कॅन कॉल मी मिस जे." जेहत्ते ठायी काय असतं ते डोळ्यासमोर नाचलं.
तेवढ्यात;
"स्टुपिड"
"बास्टर्ड"
असं जोरजोरात किंचाळत दोन मुली मैदानात उतरल्या. चिंतातुर चेहर्‍याने मी नुसतीच पाहत राहिले. त्याचं भांडण कसं संपवायचं ते कळेना. तितक्यात देवदूतासारखी एक शिक्षिका अवतरली. बटणं दाबल्यासारखी तिने "स्टॉप, स्टॉप" म्हणत दोघींच्या वेण्या ओढल्या. मला खरं तर आता रणांगण सोडून पळायचं होतं. यापेक्षा लेखन बरं.
"धिस इज जस्ट अ स्टार्ट." तिने  धमकी दिल्यासारखं म्हटलं. मी घाबरून मान डोलवली. दुर्दैवाने चारी बाजूने घेरणं म्हणजे काय हे मला थोड्याच वेळात कळायचं होतं. पोरांना मैदानावर नेलं की आवाज, मारामारी, गोंधळ कुणाला समजणार नाही. मला हे सुचलं म्हणून मी माझ्यावरच खूश झाले. पण कसलं काय जेवणानंतर बाहेर धो, धो पाऊस. शाळेच्या जीममध्ये नेलं मग त्या कार्ट्यांना.
"नीट खेळा, मी बसले आहे इथे बाकावर." एका दिशेने माना हालल्या.
मी ही निवांत वेळेची स्वप्न पाहत बाकाच्या दिशेने मोहरा वळवला. कुठलं काय, माझी पाठ वळल्या वळल्या झोडपलं त्यांनी एकमेकांना बास्केटबॉलने.  मलाही ओरडत ओरडत माझ्या दिशेने येणारा बॉल चुकवण्याच्या प्रयत्नात व्यायाम व्हायला लागला. हळूहळू एकेक जण लागलं, लागलं करत बर्फ लावायला शाळेच्या कार्यालयात. जेनीफर तर बेशुद्ध होवून खाली पडली. माझं मस्तक आता फिरलं. पोरांनी फार पिडलं. माझी असती तर....
"ऊठ मेले, तुला काही झालं तर आई, वडील कोर्टात खेचतील मला. दिवाळंच निघेल माझं."
दोन्ही खांदे धरुन तिला उभं केलं. गदगदा हलवलं.
"आय कॅन्ट ब्रीद...आय कॅन्ट ब्रीद" डोळे गरगरा फिरवत ती तेवढं मात्र म्हणू शकत होती.
"मी टू...." मी पुटपुटले. पण एकदम झाशीची राणी संचारली अंगात.
"जेने, तुझ्या शिक्षिकेने नोट लिहिली आहे या तुझ्या वागण्याची. नाटक करू नकोस."
डोळे गरगरा फिरवले तिने. वाटलं हिच थोबाडीत देतेय की काय माझ्या नाटकी म्हटलं म्हणून. पण जादू झाल्यासारखी जेनीफर तरतरीत झाली. त्यानंतर पुन्हा सगळं त्याच क्रमाने पार पडत राहिलं. शेवटी मीही  कार्यालयातून बर्फाचा भलामोठा तुकडा आणला आणि डोक्यावर ठेवला माझ्या.


रडत खडत मी बदली शिक्षिकेचं कार्य पार पाडत होते ते एका समरप्रसंगाला तोंड देईपर्यंत.
शाळेत पोचले तर बार्बरा जवळीक दाखवित पुढे आली.
"तुझ्यावर कठीण काम टाकणार आहे आज."
चेहरा पडलाच माझा. पण उगाचच हसले. चेहरा कुठे पडला ते समजत नाही त्यामुळे असं आपलं मला वाटतं.
"नवीन शिक्षक आहे आज तुझ्या मदतीला."
"नो प्रॉब्लेम." एवढं काय करायचं अगदी एखाद्याला अनुभव नसेल तर.
"आय नो हनी." याचं हनी, बनी म्हणजे पुढच्या संकटाची नांदी असते. मी कान टवकारले.
"द अदर टिचर इज डेफ..." ती घाव घालून मोकळी झाली. तो झेलायचा कसा हा माझा प्रश्न. माझ्या आत्मविश्वासाचा बंगला कोसळलाच. इथे सगळे अवयव धड असणार्‍यांशी माझ्या मराठी इंग्लिश बोलण्याची कोण कसरत. त्यात हा बहिरा. म्हणजे मग मुका पण असेल का?
जेफचं आगमन झालं आणि नकळत ओठ, तोंड, हात आणि अंग, एकेका शब्दाबरोबर सगळे अवयव हालायला लागले. फार अस्वस्थ झाले मी की बघतच नाही दुसरा ऐकतो आहे की नाही. बोलतच सुटते. त्याच्या ओठांच्या हालचालींशी ताळमेळ घालणं पाचव्या मिनिटाला माझ्या आवाक्याबाहेर गेलं. प्रत्येक मुलाला  हातवारे करत आधी माझी आणि नंतर त्याची ओळख हा कार्यक्रम बराच वेळ चालला. त्याच्या ओठांच्या हालचाली समजेना झाल्या तसा मी कागद सरकवला.
"यू आर स्लो लर्नर...."
"व्हॉट?" मी एकदम डोळे वटारले.
"अदर्स अंडरस्टॅड्स माय लिपमुव्हमेंट क्विवली."
"मी अदर नाहीये पण."
दिवसभर आम्ही प्रेमपत्र लिहीत असल्यासारखे चिठ्ठ्या फाडत होतो. मध्येच तो भारत पाक संबंधावरही घसरला, मग तर काय तागेच्या तागे फाडल्यागत मी लिहीत राहिले. नंतर नंतर मी तो बहिरा हे विसरून जोरजोरात भाषणही दिलं त्याला या विषयावर. पोरं बिचारी कशीनुशी होऊन, न कळणारं सारं मुकाट ऐकत होती.

घरी आले की नवरा आणि मुलगा जादूच्या गोष्टी ऐकायला तयार असल्यासारखी सज्ज असायची. नवरोजी चहाचा आयता कप हातात देत श्रवण भक्तीला तयार. रोज एका चहाच्या कपावर इतकी करमणूक?  त्यांना त्याची फार सवय व्हायला लागली तसा त्यांचा तो आनंद माझ्या पचनी पडेना त्यामुळे एक दिवस हे शिकवण्याचं महान कार्य सुरू केलं तसंच ते बंदही.  माझ्या त्या निर्णयाने बर्‍याच मुलाचं कल्याण झालं असावं  असं  मी सोडून सर्वांचं ठाम मत आहे. असू द्यावे ते तसे बापडे :-)

(ही पोस्ट मी आधी लिहिली होती पण नंतर काही काही प्रसंग आठवत राहिले तेव्हा नव्यानेच लिहावं असं वाटलं.)

Thursday, June 30, 2011

उमेद हरवलेली मुलं.....

साहिलच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या आईला गलबलून आलं. पुन्हा तेच. काय केलं की हे थांबेल हेच समजत नव्हतं.   गेला महिनाभर सातवीतला साहिल शाळेतून  आला की त्याचा अस्वस्थणा, चिडचिड, आदळआपट यातून त्याला बाहेर कसं काढायचं ते  पालकांना उमजत नव्हतं. आजूबाजूला घडणाऱ्या, वर्तमानपत्र, दूरदर्शनावर पाहिल्या जाणाऱ्या आणि भारतीयांच्या बाबतीत असं काही घडत नाही असा समज असणाऱ्या या गोष्टी आता त्यांच्याही घरात  शिरल्या होत्या.   मुल चिडवतात, गे, फॅगेट, स्टुपिड इंडियन, गो बॅक टू इराक,   गळा आवळू आम्ही तुझा, लांब राहा आमच्यापासून, विचित्रच आहेस असं एक कुणीतरी म्हणतं आणि बाकीचे त्याला साथ देतात. हळूहळू तो एक समुदाय बनतो आणि साहिल एकटा पडत जातो.  
साहिलला शाळेत जावंसच वाटेना. सकाळ झाली की पोट दुखणं, उलटीची भावना काही ना काही कारणं काढून शाळा नको हेच टुमणं.   सुरुवातीला दुर्लक्ष कर, त्यांच्या भानगडीत पडू असंच म्हटलं पालकांनी.   पण ह्या प्रकाराने कळस गाठल्यावर त्याच्या आईने  शिक्षकांना पत्र लिहिलं, ते त्यांनी मुख्याध्यापकांना दाखवलं.   चिडवणाऱ्या  मुलांना मुख्याध्यापकांनी बोलावून समज दिली असावी कारण  हळूहळू हा प्रकार कमी झाला.   त्यातल्या एका मुलाने तू चुगली का केलीस असं  दरडावून विचारलं साहिलला, त्यावरून त्या मुलांना शाळेकडून समज मिळाली असावी असा पालकांचा अंदाज. साहिलचे पालक सुटकेचा श्चास सोडतायत तोच एका मुलाने मी तुला मारून टाकेन असं फेसबुकवर लिहिलं, साहिलनेही त्याला उत्तर म्हणून तसंच काहीतरी लिहिलं. प्रकरण दोघा मुलांच्या पालकांपर्यंत पोचलं. साहिलच्या पालकांनी त्याला फेसबुकवर जायलाच बंदी घातली.   आता सारं मार्गाला लागलं आहे असं साहिलच्या पालकांना वाटतं.
अशीच आणखी एक घटना. इथेच जन्म झालेली सानिका. तिचं पाचवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि पालकांनी भारतात परतायचा निर्णय घेतला. काही कारणाने तीन वर्षांनी ते परत आले तेव्हा सानिकासाठी सारंच बदललं. मुख्य म्हणजे बोलण्याची पद्धत (अॅक्सेंट). तिच्या उच्चारांची टिंगल होई.   आधीच्या मैत्रिणीचं वर्तुळ बदललेलं,   वर्गातल्या मुलींचे गप्पाचे विषय तिला बाजूला पाडत.   नववीतली सानिका एकटेपणाला तोंड देत प्राप्त परिस्थितीशी जुळतं घ्यायला शिकते आहे.   तिच्या भावाला शाळेच्या बसमध्ये मेक्सिकन मुलं त्रास देत जसं साहिलला चिडवलं जाई  तसाच काहीसा  प्रकार. त्याबद्दल त्यांनाही शाळेकडे तक्रार करावी लागली.
सुदैवाने यातून या दोन्ही मुलांसाठी मार्ग काढता आले. पण कुठल्या तरी कमकुवत क्षणाला ज्या मुलांना आयुष्यं अर्ध्यावर संपवणं हाच मार्ग सुचला अशा घटना कितीतरी.   वेदनेला संपवून टाकण्याचा अखेरचा मार्ग. गेलेला जीव सुटतो, मागे राहिलेल्यांसाठी उरते ती अश्वत्थाम्याची वेदना आणि अनुत्तरित प्रश्नाची सोबत. अशाही परिस्थितीत काहीवेळेला आत्महत्या केलेल्या मुलांचे पालक विलक्षण,   अनाकलनीय वाटणारी पाऊल उचलतात, स्वत:ला सावरत पोटच्या मुलांच्या आत्महत्येला कारणीभूत झालेल्या मुलांनाही क्षमा करतात.   त्यातल्याच ह्या काही जीवनकथा....
धाय मोकलून तिने रायनच्या बाबांना मिठी मारली. पण तिला जवळ घ्यायला त्यांचे हात पुढे होईनात. चीड, दु:ख, पराभव अशा भावनांचा कल्लोळ मनात उडालेला. सातवीतल्या त्या मुलीचा शोक खोटा नाही हे पटत होतं पण समजून घेणं जड जात होतं. त्यांच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या त्या मुलीच्या थाडथाड थोबाडीत द्याव्यात ही आंतरिक ऊर्मी त्यांनी कशीबशी आवरली. आपल्या भावनांवर काबू मिळवत त्यांनी तिला हळुवारपणे थोपटलं. तिला भेटण्याचा निर्णय चुकीचा नव्हता या समाधानाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. मनातून त्यांना खात्री होती की असा काही परिणाम होईल याची तिला कल्पना असती तर तिने हे केलंच नसतं. ते तिला समजावं म्हणूनच ही भेट होती.   तिने हेतुपुरस्सर हे केलं नाही याची त्यांना खात्री आहे, हे त्यांनी त्या मुलीला समजावून सांगितलं. हुंदक्यांनी गदगदणाऱ्या मिठीतून तिचं दु:ख आणि पश्चात्ताप त्यांना कळत होता. कळत नव्हतं ते हेच की या एवढय़ाशा लहान जिवांमध्ये कुठून येत असावा हा क्रूरपणा? आणि का? का वागतात ही मुलं अशी? आज त्यांना दोन गड सर करायचे होते. आणखी एका मुलाला भेटायचं होतं. रायनच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दुसऱ्या मुलाला. अपेक्षेप्रमाणे त्या मुलाचे ओठ घट्ट मिटलेलेच राहिले सुरुवातीला. अगदी निगरगट्टपणाचा कळस वाटावा इतका तो मुलगा गप्प आणि शांत. पण शेवटी रायनचं दु:ख, वेदना त्या मुलापर्यंत पोहोचवणं त्यांना जमलं. त्याने रायनच्या बाबांची क्षमा मागितली ती मनापासून.
रायनच्या आत्महत्येची घटना प्रत्येक पालकाच्या उरात धडकी भरविणारी आहे. पाचवीतला रायन एक दिवस शाळेतून घरी आला तो रडतच. शाळेत चिडवतात म्हणून तो रडतोय हे समजल्यावर कोणतेही पालक करतील तेच रायनच्या आई-बाबांनी केलं. त्याला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. बाबांनी समजावून सांगताना म्हटलं, ‘नुसते शब्दच तर आहेत. मनावर नाही घ्यायच्या अशा गोष्टी. ’ रायनने तेच केलं पण चिडवण्याचे हे प्रकार चालूच राहिले. पूर्वीसारखी तीव्रता त्यात राहिली नसावी असं काही कालावधीने घरी वाटायला लागलं; कारण रायन या बाबत घरी फारसा बोलेनासा झाला. तो सातवीत गेल्यावर तर आश्चर्याची गोष्ट घडली. त्या चिडवणाऱ्या मुलांपैकीच एकाशी चांगली मैत्री झाल्याचं रायनने आनंदाने सांगितलं.   हे समाधान फार काळ टिकलं नाही. त्या मित्राने रायन ‘गे’ आहे अशा अफवा ऑनलाइन पसरवल्या. थट्टेच्या जीवघेण्या या प्रकारात खूप मुलं सामील झाली. रायनला कितीतरी अश्लील ई मेल यायला लागली. पण आता रायनने हे घरी सांगणंही थांबवलं होतं. दरम्यान ऑनलाइन चॅटमध्ये त्याची शाळेतल्याच एका मुलीशीही दोस्ती झाली. अस्वस्थ रायनला तिच्याशी ऑनलाइन गप्पा मारणं हाच एक विरंगुळा वाटायला लागला. चिडवणं, अश्लील पत्र यांचा विसर पाडणाऱ्या गप्पा. पण रायनचं हे समाधानही फसवं निघालं.   त्या मुलीने रायनची केलेली फजिती अंगावर शहारा आणते.
त्या दिवशी अतिशय उत्साहाने रायन शाळेत गेला. त्या मुलीशी ऑनलाइन गप्पा झाल्या की त्याला खूप मोकळं झाल्यासारखं वाटायचं. दु:खावर हळुवार मलमपट्टी केल्यासारखे तिचे ते शब्द. हसऱ्या चेहऱ्याने तो तिला भेटायला गेला. मैत्रिणीच्या घोळक्यात उभ्या असलेल्या तिने मात्र त्याला तोंडघशी पाडलं.   तिला त्याच्याशी मैत्री करण्यात काडीचाही रस नाही हे सांगून ती थांबली नाही, त्याच्याबरोबर ऑनलाईन केलेल्या गप्पा म्हणजे ठरवून केलेली  मजा होती हे सांगून  ती खो खो हसायला लागली. तिच्या मैत्रिणी तिला साथ द्यायला विसरल्या नाहीत. त्या हसण्याने, त्यांच्या खिदळण्याने रायन शरमेने चूर झाला. घरी आल्यानंतर ऑनलाइन चॅटमध्ये त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या.
‘या मुलीमुळेच आत्महत्येचे विचार माझ्या मनात डोकावायला सुरुवात झाली आहे. ’ त्याच दिवशी त्याने गळफास लावून आपलं जीवन संपविलं. रायनच्या आत्महत्येनंतर त्याच्या आई-वडिलांना त्याची निराशा, वैफल्य या गोष्टी किती टोकाला गेल्या होत्या ते त्याच्या ऑनलाइन अकाउंटमुळे समजल्या. ही घटना आहे २००३ सालातील. आता तर सायबरबुलींगने कळस गाठला आहे. रायनचे बाबा मन मोठं करून सांगतात, ‘शेवटी आपण हे विसरून चालणार नाही की या मुलांची वयं कोवळी आहेत. त्यांच्या कृतीने काय होईल याची त्यांना पूर्वकल्पना असेल तर ही मुलं नक्की असं काही करणार नाहीत. मी माझ्या मुलाच्या मृत्यूला यातल्या कुठल्याही मुलाला जबाबदार धरत नाही. वैफल्यग्रस्तता हेच कारण मी मानतो. चिडवण्यातून आलेलं वैफल्य. खेद याचाच वाटतो की, ते समजून घ्यायला पालक म्हणून आम्ही असमर्थ ठरलो.   पण अशी कितीतरी मुलं आहेत की त्यांना समजून घ्यायला हवं. ’
 चेझला आत्महत्या हा पर्याय पटत नाही. तेरा वर्षांचा हा मुलगाही भेदरलेला, चेहरा बावचळल्यासारखा. पटकन कुणी बावळट असा शिक्का मारून मोकळं होईल असा. प्रसारमाध्यमांसमोर त्याला कसं चिडवतात हे सांगणं म्हणजे त्याने केलेलं मोठं धाडसच. चिडवण्याचा प्रकार तोच ‘गे’, ‘बावळट (लुझर)’ अशा हाका मारणं. आठवडय़ातून एकदा तरी असा प्रकार टोकाला पोचतो आणि त्याच्या आईला शाळेत जावं लागतं. यापुढे मी हे सहन करू शकत नाही हे त्याचं बोलणं त्याच्या आईच्या मनात अनामिक भीती निर्माण करतं. चेझ मात्र म्हणतो की आत्महत्येचा विचार मनात आला तरी त्यातून निष्पन्न काय होणार हा ही विचार डोकावतो. मी माझा जीव गमावून बसेनच पण माझे आई वडील, शाळा आणि मला चिडवणारी ती मुलं सर्वांनाच त्याचा त्रास होईल याची जाणीव होते आणि मी स्वत:ला थांबवतो, अशा कार्यक्रमातून आपलं दु:ख व्यक्त करण्याचं स्पष्टीकरण चेझ देतो.
‘माझी अपेक्षा एवढीच आहे की, मला चिडवणाऱ्या मुलांनी हा कार्यक्रम बघितला तर कदाचित माझ्यावर होणारे परिणाम त्यांना जाणवतील. त्यांचं चिडवणं बंद होईल. माझ्यासारख्या अनेक मुलांची वेदना सर्वांना समजावी म्हणूनच मी हे सगळं जाहीरपणे सांगतोय. ’
पण खरंच समजेल हे त्या मुलांना? मानसोपचारतज्ज्ञांच्या मते जी मुलं चिडवतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं कठीण आहे. कारण त्यांची मानसिकताच हे समजून घ्यायची नसते. कदाचित चेझचा त्रास आणखी वाढेल. चेझच्या हातात आहे ते दुर्लक्ष न करता ठामपणे त्या मुलांच्या चिडवण्याला प्रतिकार करणं, त्यांना थांबवणं. ते तो शिकतोय.
चेझला आत्महत्या हा पर्याय नाही, असं वाटलं तरी जहीमने नेमकं तेच केलं. अकरा वर्षाच्या जहीमला नवीन गावात आल्यावर मुलांनी सामावून तर घेतलं नाहीच. पण तू किळसवाणा आहेस, गे आहेस याचाच भडिमार केला. सुरुवातीला जहीम अतीव दु:खाने त्याला होणारा त्रास घरी सांगत असे. पण हळूहळू हे रोजचंच झालं आणि तो काही सांगेनासा झाला, त्या विषयावर विशेष बोलेनासाच झाला त्यामुळे आता तो रमला असावा असंच घरातल्यांना वाटलं. त्या दिवशीही तो घरी आला ते प्रगतिपुस्तक नाचवीत. त्याच्या आईने त्याचे गुण बघून कौतुकाने शाबासकी दिली. तोही खूश झाला. तेवढय़ात त्याच शाळेत जाणाऱ्या त्याच्या लहान बहिणीने काही मुलं त्याला ‘गे’ म्हणून चिडवीत होती त्याचा उल्लेख केला आणि जहीम अस्वस्थ झाला. आईने त्याला समजूत घालून खोलीत पाठवून दिलं. थोडा वेळ तो खोलीत खेळला की सर्व सुरळीत होत असे. काही वेळाने त्याच्याशी बोलण्यासाठी ती खोलीत गेली. समोरच्या दृश्याने तिला काय करावं तेही सुचेनासं झालं. पुढच्या गोष्टी तिने कशा पार पाडल्या त्या तिलाही आठवत नाहीत.
"दार उघडलं तर समोर होतं गळफास लावून घेतलेलं माझं बाळ. " तिचं बाळ म्हणणं, त्याच्याबद्दल बोलताना तो अजूनही या जगात आहे, अशा पद्धतीनेच त्याचा उल्लेख करणं अंगावर काटा आणतं. भूतकाळात डोकावताना जहीमच्या आईला त्याची वैफल्यग्रस्त अवस्था लक्षात येते. शाळेत जायचं नाही, केस विंचरायचे नाहीत किंवा दातच घासायचे नाहीत, असं तो अचानक कधी कधी करायचा. जहीम असा विचित्र वागला की, त्याला बरं वाटत नसावं, असंच तिला वाटायचं. त्याला चिडवायचे ते घरात तो सांगायचाच. नंतर तो त्यावर बोलायचा नाही पण त्यामुळेच तसं काही आता घडत नसावं किंवा तो दुर्लक्ष करायला शिकला असावा, असंच तिला वाटत आलं. कदाचित यामुळेच तो ही पायरी गाठेल हे समजलं नसावं.
तज्ज्ञांच्या मते फार लहान वयात मुलांना जाहिराती, टीव्ही, चित्रपट अशा माध्यमांतून सेक्स, गे, लेसबियन असे निरनिराळे शब्द समजतात. बऱ्याचदा अर्थ न समजताही त्याचा वापर केला जातो. बहुतेक वेळा ‘पॉप्युलर’  मुलं चिडवण्यात आघाडीवर असतात आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या गटात घ्यावं म्हणून बाकीची मुलं त्यांना साथ देतात, अशा मुलांनी एखाद्याला चिडवायला सुरुवात केला की, बाकीची मुलं त्यात सामील होतात आणि जे मूल या क्रूर थट्टेला बळी पडतं ते अधिकच एकाकी बनतं.
१० वर्षाचं कोवळं वय. अभ्यास, खेळ, मित्र-मैत्रिणी यात रमणारं. पण हसतमुख कार्लला हा आनंद उपभोगता आला नाही. शाळेत गेलं की मुलं चिडवत. ‘गे’ या शब्दाचा धड अर्थही ना त्या चेष्टा करणाऱ्या मुलांना समजत होता, ना कार्लला. पण कुणी तरी असं म्हणालं की, बाकी सारे हसायला लागायचे. कार्लला त्यांच्या त्या हसण्याने रडायलाच यायचं. हे रोजचंच झालं. तसं त्याच्या आईने त्याला वर्गशिक्षिकेशी बोलायला भाग पाडलं. थोडे दिवस बरे गेले पण हळूहळू कार्ल कॅफेटेरियात जेवणाचा डबा खायलाही जायला धजावेना. शेवटचा उपाय म्हणून त्याची आई अधुनमधुन त्याच्याबरोबर शाळेत जायला लागली. त्याच्याबरोबर गप्पा मारत डबा खायला तिलाही आवडत होतं. त्याच्या मनावरचं मळभ तेवढय़ापुरतं दूर झालेलं बघणं यातच ती समाधान मानून घेत होती.
त्या दिवशी कार्ल घरी आला तो अस्वस्थ, घाबरलेला, थोडासा चिडूनदेखील. त्याचं दप्तर चुकून शाळेतल्या टीव्ही स्टँडवर आपटलं. हललेल्या स्टँडचा धक्का एका मुलीला बसला. त्या मुलीने कार्लला जीवे मारण्याची धमकी दिली. आधीच इतर मुलं चिडवत होती. त्यात ही भर. कार्ल घरी आला तो दोन दिवस शाळेत न येण्याची शिक्षा (सस्पेंड) होईल या भीतीनेच. त्याच्या आईने त्याची समजूत घातली तसा तो खोलीत निघून गेला. कार्लच्या बाबतीत पुढे काय करता येईल या विचारात त्याची आई कामाला लागली. तासाभराने ती कार्लला जेवायला बोलावायला गेली. उद्या तीदेखील त्याच्याबरोबर शाळेत येईल हेही सांगायचं होतंच. कार्लसाठीच ती पालक-शिक्षक संघटनेची सभासद झाली होती. ती त्याला तिच्याबरोबर त्यांच्या मीटिंगला नेणार होती. त्यानंतर मुख्याध्यापकांशी बोलायचंही तिने ठरवलं होतं. त्याच्या खोलीचं लोटलेलं दार तिने अलगद उघडलं आणि तिचं उभं अंग थरथरायला लागलं. समोर होता वायरने गळफास लावलेला लोंबकळणाऱ्या स्थितीतला कार्ल. तिच्या जीवघेण्या किंचाळीने तिची पुतणी, मुलगी धावत आल्या. पुतणीने ९११ नंबर (तातडीच्या मदतीसाठी) फिरवला. मुलीने कात्रीने वायर कापली, पण तोपर्यंत सगळंच संपलं होतं.
"जे जे मला सुचलं ते ते मी कार्लसाठी करत होते. याव्यतिरिक्त आणखी मी काय करायला हवं होतं? हा प्रश्न मला अद्याप सोडविता आलेला नाही. " आतल्या आत ती हुंदका जिरवते. त्याने आत्महत्या ठरवून केली असावी असं तिला वाटत नाही, पण ‘गे’, ‘बायल्या’ असं सातत्याने चिडवणारी मुलं हेच त्याच्या आत्महत्येचं कारण आहे यावर तिचा ठाम विश्वास आहे. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याचं अतिशय आवडतं खेळणं त्याने बहिणीला घ्यायला सांगितलं आहे. त्याने आपल्या लहान भावाला सांगितलं आहे की, माझ्यासारखा त्रास तुला होऊ नये म्हणून मी तुला शाळेत जपायचा प्रयत्न करत होतो. गळफास लावून घेत असल्याबद्दल क्षमेची याचनाही त्याने केली.
कुठून सुचतं हे या भाबडय़ा लहान जिवांना? आणि कसं समजतं इतक्या लहान वयात स्वत:चा जीव कसा घ्यायचा ते? या आत्महत्या आणि त्याची कारणं ऐकताना जीव भरून येतो. त्यांच्या आई- वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकतो. आत्महत्येचं टोक गाठणाऱ्या मुलांची वयं आणि ज्यांच्यामुळे ही मुलं हे टोक गाठतात त्या मुलांचा निष्ठुर क्रूरपणा पाहून हताश व्हायला होतं. या पिढीचीच काळजी वाटायला लागते. आपण या काळात जन्माला आलो नाही याचा आनंद मानायचा की आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करायची हे कोडं सोडविता येणं मुश्कील होऊन जातं.
हॅमिल्टन हायस्कूल! चार विद्यार्थ्यांनी एकामागोमाग एक चार महिन्यांच्या कालावधीत गळफास लावून आत्महत्या केलेली शाळा. माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘नो चाइल्ड लेफ्ट बिहाईंड’ कायद्यावर सही केली त्याच शाळेत घडलेल्या या प्रकाराबद्दल मुख्याध्यापकांना या मुलांच्या आत्महत्येला शाळा जबाबदार आहे असं वाटत नाही कारण  शाळा शैक्षणिक प्रगती आणि मुलांची हजेरी यावर भर देतात. मुलांच्या भावनिक समस्या समजल्या नाहीत तर दूर कशा करणार? त्याची लक्षणं दाखविणारी काही तरी यंत्रणा हवी. बहुतांशी पालक नोकऱ्या करणारे असतात. संध्याकाळी दमून भागून परत आलेले पालक मनात असलं तरी मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, त्याचं मन जाणू शकत नाहीत हे कटू सत्य आहे. मुलाचं मन समजून घेणं ठरवलं तर शिक्षकांनाच सहज शक्य आहे असं सांगणाऱ्या मुख्याध्यापकाने, चार तरुण गमावलेल्या या शाळेने मुलांच्या मनाचा तळ गाठायचा हे ध्येय ठेवलं आणि त्या दिशेने पावलं उचलली, एक नवीन प्रवास सुरू झाला. त्यातलं पहिलं पाऊल होतं मुलांच्या भावना जाणून घेणं. एक दिवस शाळेने सर्व विषयांच्या वर्गांना सुट्टी दिली ती मुलं भावनिकदृष्टय़ा किती सबळ आहेत याची शहानिशा करायलाच. शाळेत बरेच खेळ खेळले गेले. मुलांनी एकमेकांशी जमवून घ्यावं, समजून घ्यावं एवढीच अपेक्षा.
 त्यातलाच एक खेळ- ‘तुम्हाला माझी खरी ओळख असेल तर.. ’
"... तर तुम्हाला कळेल की मी फार लहान असतानाच आईपासून माझी फारकत झाली आहे. "
"... तर तुम्हाला कळेल की माझे वडील रोज दारू पिऊन घरी येतात. वडील म्हणजे काय हे मला कधी समजलंच नाही. "
"... तर तुम्हाला कळेल की माझे आई-बाबा त्यांच्या करिअरमध्ये गुंतलेले आहेत की, त्यांना आम्हा भावंडांसाठी वेळच नाही. मला फार एकटं वाटतं. कुणाशी तरी हे सगळं बोलावंसं वाटतं.. "
मुलं फार सहज मोकळी होत जातात. हातात हात, गळ्यात गळे घालून पटकन एकमेकांना समजून घेतात. हॅमिल्टन शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या खोलीच्या बाहेर निळ्या रंगाने हाताचे पंजे उमटविले आहेत. हेल्पिंग हँड! मुलांना गरज असेल तर ‘आम्ही आहोत’ हे सांगणारे पंजे. शाळेने एक प्रश्नावलीही मुलांसाठी केली आहे. सुरुवातीलाच त्याच्यावर लिहिलं आहे. स्वत:साठी किंवा तुम्हाला माहित असलेल्या इतर विद्यार्थ्यांसाठीही ही प्रश्नावली भरू शकता. तेही निनावी.
ही सुरुवात आहे ती या देशात आत्महत्येला प्रवृत्त होणाऱ्या तरुण मुलांना परावृत्त करण्याची. इथे गेल्या साठ वर्षांत तरुण मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण तिप्पट झालं आहे. दर आठवडय़ाला जवळजवळ २८ तरुण मुलं स्वत:चं जीवन संपवितात. निराशा, वैफल्यग्रस्तता हेच याचं मुख्य कारण आहे. मूळ शोधण्याचा प्रयत्न झाला नव्हता, पण आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरवर्षी सात ऑक्टोबरला ‘नॅशनल डिप्रेशन स्क्रीनिंग डे’ बऱ्याच शाळांमधून राबवितात. अशा वेळेस शाळांमधून मुलांना निराश, असाहाय्य वाटतं का, आत्महत्येचे विचार मनात घोळतात का याचा अंदाज घेतला जातो. मुलांना दिलेल्या प्रश्नावलीच्या सुरुवातीलाच मदतीची गरज असेल तर फोन नंबर आणि संपर्कासाठी व्यक्तींची नावं दिलेली असतात. काही शाळांनी तर बदलत्या काळाची पावलं ओळखत बेवसाईट सुरू केली आहे. पालकांसाठी स्वतंत्र आणि मुलांसाठी वेगळी. इथे मुलं, पालक त्यांच्या समस्या, भावना व्यक्त करू शकतात. निनावी, हेतू एकच की शाळांना अशा मुलांना मदत करायची इच्छा असली तरी गवतातून सुई शोधण्याचाच तो प्रकार असतो. वेबसाइटमुळे सर्वच मुलांना मन मोकळं करायला एक जागा मिळते. अशा वेबसाइटवर तरुणांसाठी बऱ्याच विषयांची माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन चॅटने सल्लागारांपाशी गप्पा मारता येतात. स्टेपस्ला मिळालेल्या (STEPS Screening, Treatment and Education to Promote Strength)  प्रतिसादातून नक्की याबाबत काय करता येईल याचा अंदाज येऊ लागला आहे. मुलांना आपल्याशा वाटणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर हे स्टेपस्चं यश आहे. सध्या फक्त न्यूयॉर्कच्या शाळांतून याचा वापर होत आहे, पण हळूहळू बाकी शाळाही अनुकरण करतील असा विश्वास स्टेपस्च्या निर्मात्यांना वाटतो.   नुकताच काही राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात अॅंटी बुलिईंगचा (यासाठी मराठी शब्द? ) समावेश केला आहे. लव्ह अवर चिल्ड्रेन सारख्या संघटना यासंर्दभात कार्यरत आहेत.

तसंच दुवा क्र. १ मध्ये जाऊन आपल्या मुलांची नाव घातल्यास ई मेलने त्या नावांबाबत दैनंदिन माहिती म्हणजे मुलांनी काय केलं आहे किंवा त्याच्यांबाबतीत इतर कोणी काही पोस्ट केले आहे अशाप्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते.

मार्ग कुठलेही असले तरी अकाली स्वत:च्या भविष्याचाच अंत करणाऱ्या, संबंधित व्यक्तींच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या कोवळ्या जिवांना फुलायची संधी मिळते आहे याचंच तुमच्या आमच्या सारख्यांनी समाधान मानायचं. नाही का?

Thursday, June 16, 2011

आपण ह्यांना पाहिलंत का?

रेडिओवरचं  सुमधुर संगीत एकदम थांबलं आणि तातडीचा संदेश त्यावर सुरु झाला. नकळतपणे मी गाडीचा वेग कमी केला. चक्रीवादळं, हिमवर्षाव अशा आकस्मिक संकटासाठी तातडीचा संदेश देणा‍र्‍या यंत्रणेचा वापर अमेरिकेत करतात (इर्मजन्सी अलर्ट सिस्टीम). दूरदर्शन, रेडिओ आणि आता सेल फोन  द्ववारे हा संदेश लोकांपर्यंत पोचतो.

याच यंत्रणेचा वापर २००३ पासून अमेरिकेने एक विशेष कारणासाठी सुरु केला. लहान मुलांचं अपहरण झाल्याची सूचना देण्यासाठी प्रथमच ही यंत्रणा राबवली गेली. आत्ताही बेपत्ता असलेल्या पाच वर्षाच्या मुलीसंदर्भात निवेदन होतं. मुलीचं वर्णन, संशयिताच्या गाडीचा नंबर ऐकत असतानाच रस्त्यावरच्या बिलबोर्डवरही (जाहीरातीचा बोर्ड) हीच माहिती झळकू लागली. ’अ‍ॅम्बर अलर्ट’! आत्तापर्यंत किती पटकन  असा  संदेश सर्वत्र प्रसारीत होतो याबद्दल दूरदर्शनवर ऐकलं होतं पण रस्त्यात, एकाचवेळी रेडिओवर ऐकायला आणि बिलबोर्डवर पहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ. 

दुधाच्या खोक्यांवर, पोष्टाद्ववारे, स्थानिक जाहिरात पुस्तिका अशा विविध मार्गानी ही मुलं आपल्यासमोर येत राहातात. सर्व ठीकाणी हरवल्या दिवशीचा फोटो आणि वर्तमानकाळात ते मुल कसं दिसत असेल त्याचं रेखाचित्र असतं. आज बिलबोर्डवर अशी जाहिरात पाहिली आणि लहानपणी दूरदर्शनवर संध्याकाळी ’आपण ह्यांना पाहिलंत का?’ यातून हरवलेल्या व्यक्तिची माहिती दिली जात असे ती डोळ्यासमोर नाचली.

आपल्याकडेही आता अत्याधुनिक तंत्राचा वापर होत असेलच. पण सर्वसामान्यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या अ‍ॅम्बर  अलर्ट ( AMBER = America's Missing: Broadcast Emergency Response) ची कहाणी ऐकून मन भारावून जातं. एका शोकांतिकेतून अद्यायावत तंत्रज्ञ्ज्ञानाचा वापर करुन सुरु झालेली ही स्तुत्य योजना.

पोलिसखात्याने सुरु केलेल्या या प्रयत्नाला प्रसारमाध्यमं, वहातुक यंत्रणा आणि वायरलेस कंपन्या साहाय्यं करतात. सामाजिक सेवा म्हणून वरिल यंत्रणा ही मदत पुरवितात. उद्देश अर्थातच हरवलेली मुलं ताबडतोब सुखरुप हाती लागावीत हा. अ‍ॅम्बर अलर्ट मुळे आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त मुलांना वाचविण्यात यश आलं आहे. काही वेळेला तर अ‍ॅम्बर अलर्ट ऐकून अपहरणकर्त्यानी मुलांना सोडून दिल्याची उदाहरणं आहेत. ज्या अ‍ॅम्बरमुळे ही यंत्रणा सुरु झाली ती शोकांतिका चौदा वर्षापूर्वीची.
टेक्सास राज्यात आर्लिग्टन गावी नऊ वर्षाची शाळकरी अ‍ॅम्बर आणि तिचा भाऊ आजी आजोबांच्या अंगणात सायकल चालवित होते. अ‍ॅम्बरचा भाऊ घरात आल्यावर आजीने त्याला अ‍ॅम्बरला बोलावून आण म्हणून परत पिटाळलं. तो आत  आला ते ती सापडत नाही असं सांगतच. आजी, आजोबा दोघंही हाका मारत अंगणात आले. तोपर्यंत पोलिसही तिथे पोचले होते. अ‍ॅम्बरच्या आजी आजोबांना पोलिसांना पाहून आश्चर्य वाटलं.

दरम्यान घडलं होतं ते असं. त्यांच्या शेजारी राहणार्‍या गृहस्थानी अ‍ॅम्बरची किंचाळी ऐकली आणि ते बाहेर आले. एका अनोळखी इसमाने अ‍ॅम्बरला सायकलवरुन ओढून ट्र्कच्या पुढच्या सीटवर ढकललेलं त्यांनी पाहिलं, पण डोळ्याचं पातं लवतय न लवतय तोच भरधाव वेगाने तो ट्रक निघूनही गेला. त्या गृहस्थांनी आधी पोलीसांना  फोन केला, त्या इसमाची, गाडीची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले. विलक्षण वेगाने सारं काही घडलं होतं.

योगायोगाने त्याचवेळेस स्थानिक दूरदर्शन वाहिनी हलाखीचे दिवस आलेल्या कुंटुंबावर कार्यक्रम करीत होती. नेमका अ‍ॅम्बर आणि तिच्या आईचा त्यात समावेश होता. अ‍ॅम्बरचं बालपण, भावांबरोबरचं खेळणं हे सगळं दूरदर्शनवर पाहाताना लोकांसाठी अ‍ॅम्बर एक फोटो न राहाता स्वत:च्या घरातली चिमुरडी बनली होती. दूरदर्शन, नभोवाणी माध्यमांनी अ‍ॅम्बरला पळवल्याची बातमी दिल्यावर चार दिवस पोलिसांच्याबरोबरीने सारं गाव तिच्या शोध मोहिमेत सामील झालं. दूरदर्शन वाहिनीनेही त्यांच्याकडील सर्व माहिती, चित्रफीत पोलिसांकडे सुपुर्त केली.  या शोध मोहिमेचा शेवट मात्र दु:खद झाला. चौथ्या दिवशी अ‍ॅम्बरचं प्रेत घरापासून चार मैलांवर गटाराच्या पाईपमध्ये सापडलं. अद्यापही तिचा हत्येकरी सापडलेला नाही.

या तपासकार्यात आघाडीवर असलेले अधिकारी याबद्दल आठवण सांगताना म्हणतात की संध्याकाळी घरी आलं की त्यांना त्यांच्या मुलीच्या 'सापडली का अ‍ॅम्बर?' या प्रश्नाला सामोरं जावं लागे.
अ‍ॅम्बरच्या जाण्याने पोलिसखातं कुठे कमी पडलं, केलेल्या प्रयत्नापेक्षा  आणखी काही करता आलं असतं का याबद्दल झालेल्या उहापोहातून लक्षात आलं की ज्या वेगाने अपहरणाची बातमी प्रसारमाध्यमांमुळे पसरली त्याचाच वापर करुन अनेक मुलाचं आयुष्य वाचवता येईल. याचाच परिपाक म्हणजे अ‍ॅम्बर अलर्ट!

अ‍ॅम्बरच्या नावाने पोस्टाने काढलेल्या स्टॅम्प समारंभासाठी तिची आई नोरिस उपस्थित राहिली. त्यावेळेस केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या,
"अ‍ॅम्बर अलर्टमुळे जेव्हा जेव्हा मुल घरी सुखरुप पोचतं तेव्हा तेव्हा ती माझी अ‍ॅम्बर असती तर या विचाराने ऊर दडपून जातो, कासावीस होतो; पण अ‍ॅम्बरमुळे अश्य़ा कितीतर अ‍ॅम्बर त्यांच्या आई वडिलांना सुखरुप परत मिळतात या जाणीवेने माझं दु:ख दडपून टाकायला मी शिकले आहे."
दहा वर्ष झाली, वीस वर्ष झाली तरी आता ही वेदना कायमची सोबत राहाणार असं म्हणणार्‍या या आईच्या दु:खाने आपलंही मन हेलावतं.

"अ‍ॅम्बर मोठी होताना पाहण्याचं भाग्य माझ्या भाग्यात लिहलेलं नव्हतं पण खेळताना ती बर्‍यांचदा शिक्षिका होई, बाहुल्यांची आई बने त्यांची काळजी घेई तेच नाही का ती आताही करत?" पाणावलेल्या डोळ्यांनी तिची आई विचारते. अ‍ॅम्बर अलर्टमुळे परत आलेली मुलं म्हणजे अ‍ॅम्बरच्या बाहुल्याचं असं त्यांना वाटतं.

अ‍ॅम्बर अलर्टच्या यशामुळे बर्‍याच राज्यात अमेरिकेत वेगवेगळ्या नावांनी ही योजना राबविली जाते. प्रत्येक ठीकाणी या योजनेला दिलेलं नाव म्हणजे त्या त्या मुलाच्या दु:खद शेवटाचं स्मरणच. मॉरगन अलर्ट, लुई अलर्ट, मायली अलर्ट ही त्यातील काही नावं. फक्त अमेरिकाच नाही तर कॅनडा, जर्मनी, ग्रीस, नेदरलॅड या देशांनीही ही योजना स्वीकारली आहे.


आधुनिक तंत्रन्यानाचा फायदा या सेवेला चांगलाच होत आहे. अलिकडे सेल फोन कुठून केला याची माहिती देणं कंपन्याना सक्तीचं आहे त्यामुळे मॅसेच्युसेट्स राज्यातील एका मुलीचा शोध तत्काळ लावण्यात पोलिसांना यश आलं. अ‍ॅम्बर अलर्ट करुन पोलिस त्या मुलीला सतत फोन करत होते. जितक्या वेळा फोन त्या मुलीकडून उचलला गेला तितक्या वेळेस कंपनी साधारण कोणत्या ठिकाणाहून तो कार्यरत होता त्याचा मागोवा घेऊ शकली. पोलिसांनी गुगल सर्चचा वापर करुनही ठावठिकाण्याचा अंदाज घेतला आणि ताबडतोब त्या जागेला वेढा घातला. फार थोड्या वेळात मुलीला ताब्यात घेण्यात यश मिळालं. 

अशीच एक घटना ग्रीस मधल्या लहानश्या गावातील.
शेतात काम करता करता वडिलाचं लक्ष उडालं आणि आजूबाजूला खेळणारा मुलगा कधी नजरेआड झाला तेच कळलं नाही. बरीच शोधाशोध करुन शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्या देशात ते नुकतेच आलेले. मुलाला ग्रीक भाषेचा गंधही नव्हता, त्यामुळे परिस्थिती अधिक अवघड होती. अपघात किंवा अपहरण याच दोन शक्यता वाटत होत्या. जंग जंग पछाडूनही मुलगा सापडला नाही तेव्हा पोलिसांनी अ‍ॅम्बर अलर्टचा आधार घेतला. वाट चुकून तो मुलगा जवळच्याच समुद्रावर पोचला होता आणि परत यायचा मार्ग न सापडल्याने बावरलेल्या स्थितीत फिरत होता. तो मुलगा अ‍ॅम्बर अलर्टमुळे लोकांच्या लक्षात आला आणि घरी सुखरुप परतला.

अठरा वर्षाच्या आतील मुलांसाठी असलेली ही योजना म्हणजे अशा मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी अ‍ॅम्बरने स्वत:चं आयुष्य गमावून एक प्रकारे दिलेलं संजीवनच नाही का?     

 

Thursday, June 9, 2011

कालचक्र

अतिप्रगत देशात सुधारणाचं वारंही जवळपास पोहोचू  न देणारी जवळजवळ पाव मिलियन लोकवस्ती आहे हे अविश्वसनीय सत्य आहे. अमेरिकेतल्या पेनसेल्व्हिनिया आणि ओहायो या भागात आमिश नावाची ही जमात आहे. आपल्याकडच्या शेतकी जीवनाशी अगदी किंचित साधर्म्य साधणार्‍या या जमातीच्या चालीरिती फार वेगळ्या आहेत. यामुळेच सर्वसामान्य अमेरिकन आणि पर्यटकांच्या दृष्टिनेही हा समाज म्हणजे एक आकर्षण आहे. अतिशय वेगळ्या पार्श्वभूमीवर घडत जाणारी  कालबाह्य संस्कृती जोपासणार्‍या समाजात घडलेली ही नाट्यंमय कथा.


मराठी रेडिओवर नुकतीच प्रसारित झाली. त्याचा हा दुवा -
http://www.marathiradio.com/kaalchakra060511.mp3

त्याचबरोबर मराठी रेडिओचाही -
http://marathiradio.com


Tuesday, June 7, 2011

फेसबुक आणि खोटा चेहरा... कदाचित तुमचाही!

"त्या मुलांनी हे का केलं ते मला कदाचित कधीच कळणार नाही. अश्लिल, हादरवून सोडणारं आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वास समुळ नष्ट करणारं. माझ्या वाट्याला आलं ते, फसवं फेसबुक खातं बंद करता येत नाही यातून आलेली निराशा, दु:ख, राग,  वैताग आणि क्षणा क्षणाला नष्ट होत जाणारा आत्मविश्वास."  ही कहाणी, शब्द सुझनचे. पण हे फेसबुक किंवा कोणत्याही आंतरजालावर (सोशल नेटवर्किंग) असणार्‍या कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा सावधान. सुझनची गोष्ट ही माझी किंवा अगदी तुमचीही होवू शकते.

 रहस्यकथा आणि नाट्यलेखन करणार्‍या सुझन स्वत:ला प्रथितयश मानत नाहीत.  त्यांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल असंही त्यांना वाटत नाही.  आणि तरीही परदेशातल्या कुणालातरी त्यांच्या नावे फेसबुक खातं तयार करता आलं ही वस्तुस्थिती आहे. सुझनमात्र फेसबुकमध्ये योग्य ठीकाणी खुणा करुन  खाजगीपणा जपल्याच्या समाधानात होत्या. कुणीतरी त्यांच्या नावाचं खातं आधीच तयार केलं आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती.  नग्न देहावरती सुझनचा चेहरा वापरण्याचा किळसवाणेपणा आणि त्या सोबत येणार्‍या असंख्य गोष्टी... यावरुनच हे आंतरजाल जग किती धोकादायक आहे हे लक्षात येतं, तरीही आपण मात्र आपल्याबाबतीत हे होणार नाही असं समजून आपले, आपल्या कुटुंबाचे फोटो वेगवेगळ्या संकेतस्थळांवर/खात्यांवर  प्रदर्शित करतो. आपल्या मित्रमैत्रीणींनी, नातेवाईकांनी ते पहावेत या इच्छेने. केव्हा केव्हा काळजीपूर्वक खाजगीपणा जपण्याची सर्व खबरदारी घेऊन तर कधीतरी नकळत कोण जाणार आहे उगाचच माझ्या वाट्याला असं वाटून तेवढीही तसदी घेतली जात नाही.

सुझनना तर फेसबुकचं काडीमात्रही आकर्षण नव्हतं. त्यांच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनच्या दरम्यान जनसंपर्क अधिकारी वायली यांनी चाहत्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी फेसबुक उत्तम आहे ह्याची कल्पना दिली तेव्हा प्रथम त्यांची तयारीच नव्हती. वेळ फुकट घालवायचं एक ठिकाण असंच त्यांचं फेसबुकबद्दल मत होतं पण आधुनिकतेला बाजूला सारताना साहित्य जगतात एकटं पडण्याच्या भितीने त्यांनी फेसबुकवर जायचं मान्यं केलं.

सुरुवातीचा आठवडा जुन्या परिचिताशी  संपर्क साधण्यात कसा गेला ते  कळलंही नाही. आणि अचानक एक दिवस वायलीचं ई मेल आलं, विषय अधोरेखित होता   - फेसबुक. सुझनना वाटलं आधुनिक जगात प्रवेश झाल्याबद्दल स्वागत करणारं पत्र असेल. पण तसं नव्हतं. ते पत्र होतं त्यांच्या दुसर्‍या खात्याबद्दल. लिहलं होतं.
"गुगल केल्यावर तुमचं जे खातं येतं ते पाहून  बेचैन व्हायला झालं. तुम्हाला हे कळवणंही त्रासाचं वाटलं तरी तुमच्या कानावर जावं म्हणून  कळवित आहे."
ते खातं पाहून सुझनना धक्काच बसला. स्वत:च्या चेहर्‍यावरचे अश्लिल, संभोगासाठी उद्युक्त करणारे भाव पाहून शरमेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. काही काळ सुन्नावस्थेत गेला.  हा चेहरा त्यांचा कधीतरी वर्तमानपत्रात आलेला, कुठल्यातरी संकेत स्थळावर असलेला होता. सुझनना काय करावं या प्रश्नाने घेरुन टाकलं.  मुळात संगणक प्रकाराशी फार सख्यं  नाही. आणि आता हे काय वाढून ठेवलं होतं? कुणाशी संपर्क साधला की  ते फोटो, खातंच नाहीसं होईल?  समोर ’फेसबुक फॉर डमीज’  पडलेलं. त्यातले दूरध्वनीक्रमांक त्यांनी तातडीने फिरवले, पण उपयोग झाला नाही.  त्यांना एकदम  नेहमीच्या रस्त्यावर येता जाता फेसबुकचं  पाहिलेलं कार्यालय आठवलं. दूरध्वनिकार्यालयात फोन करुन त्या कार्यालयाची माहिती मिळते का ते पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला.  हे खातं त्यांनी फेसबुकवर यायच्या आधीचं होतं. याचाच अर्थ कुणी त्यांचं नाव ’गुगल’ केलं की हे असे फोटो, प्रतिक्रिया प्रथम पहायला मिळणार. सगळय़ा असफल प्रयत्नांनंतर एकच करता येण्यासारखं होतं. फसव्या फेसबुक खात्यावर जायचं, तिथे तुम्ही असल्याचं खात्री करणारं जे चित्र असतं त्यावर टिचकी मारुन आपल्या खर्‍या फेसबुकचा दुवा द्यायचा.  सुझननी त्यांच्या मित्रमैत्रीणींना, नातेवाईकांना सार्‍यांनाच ही विनंती केली.

"रोज सकाळी उठल्याउठल्या धडधडत्या अंतकरणाने मी संगणक उघडे. फेसबुकच्या संचालकांकडून काही प्रतिसाद नव्हताच आणि माझं नकली खातं नष्ट होण्याची लक्षणं नव्हती. पोलिसांशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडे तक्रार काय नोंदवणार? नुकसान काय झालं म्हणून सांगणार? माझं हे रुप पाहून लोकांनी पुस्तक विकत घेणं बंद केलं म्हणायचं? याला पुरावा कुठून आणायचा? पोलिस काही करु शकले नाहीत. फेसबुक प्रशासनालाही अगणित ईमेल केली. प्रत्येकवेळी तोच पुस्तकी प्रतिसाद. तुमची तक्रार पोचली. हो पण पुढे काय?" अतिशय विषण्ण अवस्थेतला हा त्यांचा प्रश्न.

पुढे काय? या प्रश्नाने  सुझनची झोप उडाली. संभाषणात लक्ष लागेना. लेखन तर बंदच पडलं. मुलं कशी वाढत होती, काय खात पित होती याचं भान नष्ट झालं.  त्याचं निराशेने ग्रासलेले मन उभारी घेईना.   सगळ्याचा कडेलोट मैत्रीणीबरोबर फिरायला बाहेर पडल्यावर झाला.
"तुझं नाव गुगल केलं मी आज" मैत्रीणीच्या बोलण्याने सुझनचा चेहरा कसानुसा झाला.
"तुला क्षणभरही वाटलं......" पुढचं बोलणं मैत्रीणीकडून यावं, तिने ती शक्यताही नाकारावी असं वाटत असतानाच मैत्रीणीने नुसतेच खांदे उडवले, शरमलेल्या चेहर्‍याने ती म्हणाली,
"तूच असशील असं नाही वाटलं पण....."
२० वर्ष ओळखत होत्या त्या दोघी एकमेकींना, पण तरीही मैत्रीणीच्या मनाला ही शंका चाटून जावी यात सुझनना फार मोठा पराभव वाटला.  एक चांगली व्यक्ती, लेखिका म्हणून लोकांनी ओळखावं यासाठी वेचलेले क्षण धुळीला मिळाले. रॅगिंगमुळे मुलं आत्महत्येपर्यंत का पोचतात हे कळलं तेव्हा असं त्यांना वाटतं.  अस्वस्थ मनस्थितीत सुझननी याबाबत पाऊल उचलायचं निश्चित केलं. त्यांनी आपल्या वकिल पुतण्याला याबाबत लक्ष घालावं म्हणून  विनंती केली. एका आठवड्यात फेसबुककडून काही कळलं नाही तर काय करायचं ते बेनने, त्यांच्या पुतण्याने निश्चित केलं पण त्याआधी सुझनना त्यांनी जे सांगितलं ते सुझनच्या कल्पनेपलिकडचं होतं. स्वत:च्या फसव्या खात्यावरिल शव्द न शब्द वाचायचा,  तिथे असणार्‍या सर्वांचे चेहरे / फोटो नीट पहायचे आणि कुणा परिचिताचं हे काम नाही ना याची खात्री करायची.
"हे वाचण्याचं काम म्हणजे कुणीतरी बर्फाच्या लादीवर फेकून दिल्यासारखं होतं. गुदरमवून टाकणारी भितीची एक थंडगार लाट शरिरातून गेल्यासारखं. तिथे काय नव्हतं माझ्याबद्दल. संभोग वर्णनं, अश्लिल चित्र आणि माझ्या नावाने लिहलेले प्रतिसाद..., किळसवाणे, शरीर सुखासाठी आमंत्रित करणारे, त्याबद्दल सल्ला विचारणारे. यातल्या काही मित्र, मैत्रीणींची संख्या हजारांवर होती. याचाच अर्थ माझे हे फोटो खूप लोकांनी पाहिले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती." एकेक शब्द उच्चारतानाही त्यांचे कान, गाल शरमेने लाल होतात.

न समजणारं संगीत, भाषा, दूरदर्शनवरील कार्यक्रम असं करत  हा प्रकार कोणत्या देशातून चालू असावा एवढा  शोध लागला, नंतर शहर आणि शेवटी शाळा. मान्यवर शाळा. पण सुझन त्या शाळेचं नाव सांगत नाहीत.  शाळेच्या संकेतस्थळावर त्या मुलांचे चेहरे पाहिले तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, बदला घ्यावासा वाटायला लागला,  त्या मुलांचे गळे दाबावेत ही भावना दृढ झाली. पण काही क्षणच. भान आलं तेव्हा त्यांना आपण असा विचार करु शकतो, ही पातळी गाठू शकतो याचीच शरम  वाटली.  विषण्ण मनस्थितीत त्यांनी चर्चच्या पाद्रींचा सल्ला घेतला. त्यांच्या उत्तराने त्या अचंबित झाल्या. त्यांना त्रास देणार्‍या मुलांना क्षमा करण्याचा विचारही करु नये असं त्यांनी सांगिंतलं. त्यांच्या पुढे दोन पर्याय होते. त्या मुलांना असा काही धडा शिकवायचा की ती आयुष्यातून उठतील. त्यांच्या देशाचे कायदे खूपच कडक होते आणि या गुन्ह्यासाठी तुरुंगवास हा एकच पर्याय होता. अमेरिकेत पैशाचं नुकसान भरुन काढण्यासाठी त्या मुलांवर त्या खटला करु शकल्या असत्या पण ते खर्चिक  होतच आणि पुरावा? या मुलांनी त्यांच्या अंतरात्म्याचा एक तुकडा तोडला, आत्मविश्वास धुळीला मिळवला याकरता अजूनतरी खटला नाही दाखल करता येत याची सुझनना कल्पना होती.  सुझनपुढे खटला हा एक पर्याय होता नाहीतर पूर्णत: दुसरा मार्ग. शेवटी तोच त्यांनी स्वीकारला. त्यांनी त्या मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ई मेल पाठवलं, विस्ताराने लिहलं. खूप विस्ताराने आणि त्यात फेसबुक खातं बंद व्हावं ही मागणी केली.

दुसर्‍याच दिवशी मुख्याध्यापकांचं पत्र आलं. त्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्याबद्दल सुझनचे आभार मानले होते आणि फेसबुकचं खातं बंद होईल याची खात्री. आणि तसं ते झालं. त्यांच्या ’मीच का?’ या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता आलं नाही. त्या मुलांनाही. मुख्याध्यापकांनीही मुलांना हाच प्रश्न वारंवार विचारल्याचं सुझनना लिहलं होतं. अनुत्तरित प्रश्न. त्या मुलांच्या दृष्टीने सुझन म्हणजे एक खेळणं होतं,  मुखवटा! नाव, चेहरा याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं. चेंडू हवेत उडवला, काही काळ त्याच्याशी खेळलं आणि त्यांचा त्यातला रस संपला. सुझन म्हणतात,
"आणि हेच फार भितीदायक वाटतं मला. इंटरनेटमुळे इतक्या सहसहजी माणसाचं खेळणं बनून जातं. बदनामीही अशी होवू शकते की माणूस आयुष्यातून उठेल."

अगदी खरं, आज हे सुझनच्याबाबतीत झालं. कदाचित तेच उद्या आपल्या बाबतीत होवू शकतं, आपल्या मुलांच्या बाबतीत. सुझन म्हणतात,
"तुमचं नाव, चेहरा... आणि त्याचं हे असं होतं. खरच असं झालं की ही लहानसहान बाब उरत नाही हे मी अनुभवाने सांगते.  आणि त्यामुळेच मी मुख्याध्यापकांना एक विनंती केली. अशी विनंती की त्याचे परिणाम, शेवट मला कधीच कळणार नाहीत."
काय केलं त्यांनी?  मुलांना शिक्षा देण्याची मुख्याध्यापकांना विनंती केली पण अगदी वेगळ्या तर्‍हेची. त्यांच्या या कृतीमुळे सुझनवर काय परिणाम झाले हे त्या मुलांनाच नाही तर पालकांनाही कळावं ही अट घातली त्यांनी. आपल्या  हुशार, मान्यवर शाळेत जाणार्‍या मुलांचं कर्तुत्व आणि त्याचे सुझनवर झालेले परिणाम दोन्ही त्यांना कळावेत याकरता ते खातं मुलांच्या सोबत बसूनच पालकांनी पहावं ही अट घातली.

खरच  शिकली  ती मुलं धडा? झाला बदल त्यांच्या वृत्तीत? पाहिलं ते अश्लिल वर्णनांनी, चित्रांनी भरलेलं खातं त्यांच्या पालकांनी? सुझनना त्याची कल्प्नना नाही. त्या म्हणतात.
"माझं चारित्र्यहनन केलं त्यांनी. फार कठीण होतं ते परत मिळवणं. पण मिळवलं मी झगडून. हतबलता, हात पाय गळणे याचा खरा अर्थ कळला मला. सुडाने पेटून उठणं म्हणजे काय हे कळलं तसंच क्षमा करण्यातून काय समाधान मिळतं हेही कळलं. आणि हेच कारण आहे त्या मुलांची नावं न सांगण्याचं किंवा त्यांच्या देशाचं नाव न घेण्याचं. त्यांच्या हातून कळत नकळत झालेल्या चुकीमुळे त्याचं भवितव्यच नष्ट व्हावं असं नाही मला वाटत. त्यांची नावं सांगितली तर झोप उडेल माझी. क्षमेला काही अर्थ उरणार नाही. आता मी शांत चित्ताने झोपू शकते, आणि लिहिते. लिहिती राहू शकते."

Wednesday, May 25, 2011

ती गेली तेव्हा.....

पेटन,
"मी तुझी आई. खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी. बर्‍याच गोष्टी, बरेच विषय, क्रमवार कोणत्या कोणत्या विषयांबद्दल बोलायचं आहे ते लिहून ठेवलंय मी. फार वेळ नाही उरलेला. उद्या शस्त्रक्रिया. त्यानंतर किती वर्ष, किती दिवस....तीन तास नुसती बसून आहे मी. कल्लोळ उडालाय मनात विचारांचा. नाही सोडून जाता येणार मला हे जग असं. तू इतकी छोटी असताना तर नाहीच नाही. माझं प्रेम मी शब्दांनी नाही व्यक्त केलं आज तर कदाचित तुला ते कधीच समजणार नाही. काही गोष्टी ज्या बाबा तुला नाही शिकवू शकत, बोलू शकत नाहीत तुझ्याशी त्याबद्दल सांगायचं आहे. मी इथे असले तर तुला जवळ बसवून सांगेन पण नसले तरी.....  आहेच मी तुझ्याबरोबर, तुझ्या लग्नाच्या दिवशी, तुला मुलं होतील तेव्हा. माझं तुझ्याजवळ असणं जाणवेल तुला. सतत." छत्तीस वर्षाच्या एरनने स्तनाचा कर्करोग झाल्यावर तिच्या चिमुकलीसाठी ध्वनिमुद्रित केलेला हा एक संदेश... आणि असे कितीतरी, जवळजवळ १०० व्हिडिओ टेप्स.
"भावनाविवश असताना केस नको कापूस कधी.  मेकअप असा कर की तो केलाय असं वाटायला नको."
"तुला मोठं होवून जे काही बनायचं ते तू ठरव, मला वाटतं म्हणून किंवा बाबाला वाटतं म्हणून तुझं क्षेत्र निवडू नकोस."
"शाळेत कुणाच्या दबावाला बळी पडू नकोस."


कर्करोगाला तोंड देताना हातात राहिलेल्या चार पाच वर्षात एरनच्या मनात फक्त पेटन होती. पेटनसाठी तिने काय नाही केलं? वेदनेला तोंड देत, औषधांच्या मा‍र्‍याला, त्यांच्या परिणामांना प्रतिकार करत एरनने पेटनसाठी भेटवस्तू खरेदी करण्याचा चंग बांधला.  पेटन १६ वर्षाची होईपर्यंतच्या वाढदिवसांसाठी, प्रत्येक ख्रिसमससाठी, इतकंच नाही तर पेटनच्या लग्नप्रसंगी तिला द्यायची भेटही तयार आहे.

 डग आणी एरन दोघंही उच्चशिक्षित. आपापल्या कार्यक्षेत्रात स्थिरावलेली. सात वर्षाच्या संसारात पेटनचा प्रवेश झाला आणि दोन वर्षानी तिशी पार केलेल्या एरनच्या सुखी संसाराचं चित्र स्तनातल्या एका गाठीने, निदानाने बदललं. त्या क्षणाने तीही आमूलाग्र बदलली. मृत्यूच्या हाकेने तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. रोजच्या जीवनातले छोटे क्षण किती अमूल्य असतात ते कळण्याची ती हाक. नाकारणं हातात नसलेली, तरीही ती लढली. उणीपुरी पाच वर्ष कर्करोगाशी सामना करता करता आपण इथे नाही हे गृहीत धरून पोटतिडकीने आपलं म्हणणं ध्वनिमुद्रित करणं सोपं नाहीच गेलं एरनला. आता दोन वर्षाची असलेली पेटन ध्वनिमुद्रण ऐकेल तेव्हा किती वर्षाची असेल, हातात किती वर्ष आहेत...सगळंच अंधातरी. फार थोड्या काळात एरनला तिच्या चिमुकलीचं १६ वर्षापर्यंतचं आयुष्य कल्पनेनं मनात साकारायचं होतं. त्या त्या वेळेस उद्भवणारे प्रश्न, शारीरिक बदल, मित्र मैत्रिणी, छंद, अभ्यास.....असे कितीतरी मुद्दे.  भावनावेग अनिवार होऊन तीन चार वेळा थांबून थांबून केलेलं पहिलं ध्वनिमुद्रण. पण नंतर सरावाने एरनने मुलीशी असा संवाद साधण्याचं  तंत्र अवगत केलं. स्वत:च्या वेदनेला विसरून पेटनच्या भवितव्यावर तिला लक्ष केंद्रित करायचं होतं. आता फक्त पेटन हेच लक्ष्य होतं तिचं आणि तिच्यावर आत्यंतिक प्रेम करणार्‍या डगचं.

मुलीसाठी सल्ला, मायेची पाखरण घालणार्‍या या संदेशातून एरनचं व्यक्तिमत्त्वंही उलगडत जातं, आपल्याला गुंतवून टाकतं. कर्करोगाचं निदान झालं आणि आयुष्य ढवळून निघालेल्या या दिवसांमध्ये कधीतरी डग आणि एरनने पुस्तक लिहायचाही निर्णय घेतला. ’लिव्हींग विथ द एंड इन माईंड’ हे त्या पुस्तकाचं नाव. मरणाआधी करायच्या गोष्टींची यादी कशी तयार हवी हेच सूत्र आहे या मागे.  क्षणभंगुर जीवनात मरणाचं नियोजन आपण विसरू नये ही त्यामागची धडपड. या निमित्ताने एरन प्रसारमाध्यमांपुढे आली आणि तिच्या आगळ्यावेगळ्या निश्चयाने  अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.

१९९८ मध्ये एरन गेली, पण आपल्या मुलीसाठी कायमची इथेच राहिली ती असंख्य संदेश आणि आवाजाच्या रूपात.  ओप्राच्या स्मरणात राहिलेले पाहुणे या कार्यक्रमात गेल्या आठवड्यात एरनवर कार्यक्रम झाला आणि पुन्हा एकदा एरनच्या स्मृतींना उजाळा मिळाला. यावेळेला एरनची महाविद्यालयात शिकत असलेली पेटन प्रेक्षकांसमोर होती. एरनच्या निधनानंतर साडेचार वर्षांनी पुनर्विवाह केलेले तिचे बाबा आणि नवी आईदेखील.

या कार्यक्रमात आईच्या स्मृतींना उजाळा देताना पेटन सांगते,
"लहान असताना खूप वेळा आईचं ध्वनिमुद्रण ऐकायचे मी. पण जसजसं कळायला लागलं तसं आता भावनिकदृष्ट्या खूप कठीण जातं पाहणं." आता महिन्यातून एकदाच ती ध्वनिमुद्रण पाहते. एरनला आईच्या स्पर्शाची  उणीव भासतेच, तिच्याबरोबर वेळ घालवू शकत नाही याचं दु:ख होतंच. पण ती इथे नाही हे सत्य नाकारता येत नसलं तरी तिला तिचा आवाज ऐकता येतो. कधी काही प्रश्न पडला की उत्तर आईच्या आवाजातून मिळेल याची तिला खात्री आहे. आपल्याला वाटतात तसेच एखाद्या विषयावर आईचेही विचार असतील का ते अजमावायला आवडतं पेटनला.

बाबांनी पुन्हा लग्न करावं, माझ्या आयुष्यात आई असावी, स्त्री असावी हा देखील तिचाच आग्रह हे पेटन आवर्जून सांगते. पेटनला हे मान्य होणं, स्वीकार करणं जड जाईल ह्याची अर्थातच  एरनला कल्पना होती. एरनने केलेल्या ध्वनिमुद्रणात तिने म्हटलं आहे,
"बाबांनी लग्न करायला हवं पुन्हा, पेटन. मला माहित आहे अशी वेळ आली तर तुझ्या मनात अनेक  प्रश्न डोकावणार, बाबांच्या नवीन जोडीदाराला आई म्हणणं तुला जड जाणार, स्वीकारता येणार नाही आणि मुख्य म्हणजे मला काय वाटेल ह्या विचाराने तुझा जीव कासावीस होणार. पण तू हे स्वीकारायला हवंसं. तू तिला आई म्हटलस तरी चालेल गं. शेवटी तुझी खरी आई मीच नाही का? "

आतापर्यंत ऐकलेल्या असंख्य संदेशातून आणि उर्वरित संदेशात पेटनला दिसतो तो एकच संदेश, आईचं प्रेम.

एरनचा  शेवटचा म्हणजे तिच्या मृत्यूअगोदरचा संदेश पेटनने हल्लीच ऐकला.
"फार सुंदर प्रवास होता हा. प्रेम, स्वत:चा शोध,  कशाच्याच बदल्यात हे नाही बदलू शकत. हा प्रवास अनमोल होता. एकच विनंती आहे माझी आठवण ठेवा. मला जशी मानसिक शांतता लाभली तशी सर्वांना मिळावी. स्वर्गात मी तुमची वाट पाहीन. त्या वाटेवरचा माझा प्रवास जसा तुम्ही सुलभ केलात तसंच मीही तुमच्यासाठी आशेचा किरण होईन.  तुम्ही सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रेम आणि जिव्हाळ्याबद्दल मी पेटन आणि डग ऋणी आहोत."

एरन आणि पेटनची कहाणी लिहिताना मला आठवतात, डोळ्यासमोर येतात माझ्या दोन मैत्रिणी.  नुकत्याच कर्करोगाशी लढता लढता हरलेल्या. एक भारतात, एक इथे अमेरिकेत. माझ्याच गावात. आपापल्या परीने, पद्धतीने तोंड देत होत्या दोघीही. मीच का, माझ्याच वाट्याला हे का ह्या अनुत्तरित प्रश्नाने त्यांना वेढलं असणारच. माझं नशीबच वाईट म्हणणारी माझी  भारतातली मैत्रीण, एकाच महाविद्यालयात शिकलेलो आम्ही, काही करता येत नाही या निराश भावनेने सोबतीला आली ती असाहाय्य हतबलता.  वाटत राहतं त्याही एरनसारख्याच भोवर्‍यात अडकलेल्या मनस्थितीतून गेल्या असणारच, त्यांची मुलं, आई वडील, नवरा प्रत्येकाचं दु:ख, वेदना कल्पनातीत. कुणास ठाऊक त्या दोघींना माहित होती का एरन आणि पेटनची गोष्ट? कदाचित भरल्या संसाराचा अवेळी निरोप घेताना मुलांसाठी कायमचा जवळ राहण्याचा एक अभिनव मार्ग म्हणून त्यांनीही उचललं असेल असं पाऊल, किंवा  सुचलीही असेल त्या दोघींना काहीतरी अगदी निराळी कल्पना.