Showing posts with label यु ट्युब. Show all posts
Showing posts with label यु ट्युब. Show all posts

Sunday, February 18, 2024

महाभारताचं उत्तररामायण


मोठ्या उत्साहाने महाभारताच्या तयारीला लागलेल्या दिग्दर्शिकेला पांडव, कौरव, कृष्ण, द्रौपदी हे सगळे कलाकार मिळ्णं आणि तेही हातीपायी धड वाटतं तितकं सोपं रहात नाही. हाती आलेल्या कलाकारांना घडविताना, त्यांच्याकडून अभिनय करुन घेताना तालमीमध्येच या महाभारताचं उत्तररामायण घडतं  एकांकिका - महाभारताचं उत्तररामायण.


 कलाकार : संदिप केसरकर, पूर्वा केसरकर, श्रीकुमार डोंगरे, हर्षद साखळकर, अपर्णा साखळकर, संजय भस्मे, ऋत्विक जोगळेकर, गौरी गंधे, श्रीनिवास जोशी, विद्याधर कुलकर्णी, विजय दरेकर. 

 निवेदन: प्रशांत पै, सुधांशु गंगातीरकर, मोहना आणि ऋत्विक जोगळेकर.

Thursday, February 15, 2024

पोस्ट

पोस्टाचा कारभार आता कदाचित बदलला असेल पण काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या पोस्टात आलेला हा अनुभव हलक्याफुलक्या शब्दांत.


Thursday, February 8, 2024

शोध

 



सुयश आजोळी येतो ते  कोकणातल्या अंगावर काटा आणणार्‍या गोष्टींचा अनुभव घ्यायचाच हे ठरवून. आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या कथांची सत्यता त्याला पडताळायची असते. होते का त्याची इच्छा पूर्ण? जाणवतं का त्याला अस्तित्त्व अदुश्य शक्तीचं? 


Suyyash goes to his hometown to experience the chilling stories his grandfather told him.  Was he able to sense the spirits he heard? The story of searching.


लघुकथा - शोध

लेखन - वाचन - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

मुखपृष्ठ - अवनी किरकिरे (१३ वर्ष)

Sunday, December 24, 2023

कोणी गोपाळ घ्या - अमेरिकन शेजारी

 

खूप वर्षांनी जुनी चित्रिकरणं बघत होते आणि अचानक हे सापडलं. पर्णिकाच्या बारश्याला भारतातून कोणी visa अडचणींमुळे येवू शकलं नाही तेव्हा अमेरिकत आमचे  आई - वडिल म्हणून कायम पाठीशी असलेले मेरी आणि डेव्हिड आणि आमचे मित्र जेरी आणि टॅमी हार्वी चौघांनी कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या पाठ करुन, करुन म्हटलं. आत्ता पाहिल्यावर गंमत तर वाटतेच पण एक - एक वाक्याचा या चौघांनी दिवस - दिवस केलेला सराव आठवून आमचे इथले सगेसोयरे होण्याची त्यांची आपुलकी मन हेलावून टाकते.

Tuesday, December 19, 2023

हृदयरोगतज्ञ(Cardiologist)

 व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तसंच जाणिवांबद्दल. जाणिवांचे आयामही देशानुरुप वेगवेगळे असतात. याबद्दल बोलत आहेत शार्लटचे हृदयरोगतज्ञ समीर चौधरी!  भारतीय आणि पाश्चात्यांचा आरोग्याबाबतचा दृष्टिकोन, आरोग्यशिबिरात येणारे अनुभव तसंच शरीर आणि आजारांना रोजच्या व्यवहारातली उदाहरणं‌ देत त्यांनी आपल्याशी साधलेला संवाद. नक्की पाहा/ऐका.


Monday, June 12, 2023

किरण

 किरण! मूळ दक्षिण आशियातील देशांतील पण सध्या नॉर्थ कॅरोलायना राज्यात वास्तव्य असलेल्या आणि घरगुतीहिंसाचाराला बळी पडलेल्या व्यक्तींना मदत करणारी ही संस्था. या संस्थेत शार्लटची जान्हवी कुलकर्णी ही तरुण मुलगी काम करते. तिच्याकडून ऐकू तिला हे काम करताना आलेले अनुभव आणि संस्थेबद्दल माहिती.


किरण संपर्क:

फोन:  ९१९८३१४२०३
इमेल: kiran@kiraninc.org
संकेतस्थळ: https://www.kiraninc.org/

Kiran means 'ray of light'. Kiran  aim to illuminate, guide and instill hope in the lives of South Asian domestic violence victims all across North Carolina.

Kiran Contact:
Phone:  (919) 831-4203
Email: kiran@kiraninc.org
Website: https://www.kiraninc.org/


Friday, February 18, 2022

सायकल चित्रपट कलाकार आणि मुलं

आत्तापर्यंत मराठी शाळेच्या मोठ्या मुलांनी नामवंताना प्रश्न विचारले होते. यावेळेस शाळेतील काही छोट्या मुलांचा यात सहभाग आहे. नुकताच मुलांनी सायकल चित्रपट पाहिला आणि सायकलचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे, कलाकार ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांना प्रश्न विचारले, त्यांच्याशी स्वत:च्या छंदांबद्दल गप्पा मारल्या. त्याची ही झलक.  पूर्ण गप्पा -  https://youtu.be/gsAATYahh5U





Monday, January 24, 2022

सुबोध भावे मुलांशी बालगंधर्व चित्रपटाबद्दल संवाद साधताना

 गेल्यावर्षी हरिश्चद्राची फॅक्टरीचा अभिनेता नंदू माधव तसंच कवी दासू वैद्य यांनी माझ्या मराठी शाळेच्या मुलांशी गप्पा मारल्या होत्या. यावर्षीची सुरुवात सुबोध भावेंपासून!

बालगंधर्व चित्रपट पाहून मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना सुबोध भावेंनी दिलेली मनमोकळी उत्तरं, मुलांबद्दलची त्यांची उत्सुकता, त्यांनी मुलांना विचारलेले प्रश्न आणि मुलांशी केलेलं हितगुज. संपूर्ण कार्यक्रम आवर्जून पाहण्या/ऐकण्यासारखा आहे. शेवटी या चित्रपटातील साडी, दागिने याबद्दल ते काय बोलले आणि त्यावरुन त्यांनी मुलांना काय सांगितलं तेही.
सहभाग - आरोह बिद्रे, प्रथम इंगळे, पर्णिका जोगळेकर, समीर दलाल, इशानी भांगे, स्तव्य निलावर.



माझ्या वाहिनीचे सभासद व्हा (Please Subscribe)


Friday, August 20, 2021

दृश्यकथन - प्रारंभ!

अमेरिका: २१ ऑगस्ट २०२१ - सकाळी ११:३० वाजता (EST)

भारत: २१ ऑगस्ट २०२१ - रात्री ०९:०० वाजता

आमच्या youtube वाहिनीचे सभासद (Subscribe) नक्की व्हा

सत्य घटनेवर आधारित! कथा तरुण मुलाच्या फाजील उत्सुकतेची, अकल्पित वळणाची, समाज माध्यमांच्या उथळपणाची, उठलेल्या वादळाची आणि निर्माण झालेल्या मूलभूत प्रश्नांची! गुंतवून टाकणारं दृश्यकथन - प्रारंभ!
सत्य घटनेवर आधारित! कथा तरुण मुलाच्या फाजील उत्सुकतेची, अकल्पित वळणाची, समाज माध्यमांच्या उथळपणाची, उठलेल्या वादळाची आणि निर्माण झालेल्या मूलभूत प्रश्नांची! गुंतवून टाकणारं दृश्यकथन - प्रारंभ! 

या नाट्याचा प्रारंभ आम्ही गेल्यावर्षी अगदी जोरात केला. जोरात म्हणजे पार अगदी zoom गिरी रत्नागिरीलाच पोचली. रत्नागिरीत मी असतानाचे कलाकार आणि काही नव्या दमाचे कलाकार सज्ज झाले. सराव सुरु झाला. आनंदीआनंद पसरला आणि मग आला पाऊस, मग आला पाऊस, मग आला पाऊस. काहीवेळा कलाकार पावसाने गारठले तर काहीवेळा zoom!

प्रारंभचा शेवट होण्याची काही लक्षणं दिसेनात पण सुरू केलं आहे तर शेवट हा झालाच पाहिजे. इथेही रत्नागिरीशिवाय काही पान हलेना. रत्नागिरीच्या अनुप बापटचा मी ’आऽऽऽ’ ऐकला होता गाण्यातला. त्याला म्हटलं आता गद्यातला ’आ’ जमव. तो ’आ’ करुन बसला. पंकज शेट्ये, मिलिंद डबली, महेश जोशी सगळे एकापेक्षा एक. आम्ही एकत्र कामं केलेली पण आता वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावलो. उत्साहाने सगळे प्रारंभचा शेवट करण्यासाठी सज्ज झाले. निलेश माझा लेखक मित्र. तो सामील झाला आणि जोरदार प्रारंभ पाहून त्याने त्याच्या भूमिकेचा शेवट करुन टाकायचं ठरवलं. त्याचे दोर तोडून टाकल्यावर राहिला बिचारा शेवटपर्यंत. विक्रांत आणि अभिजय या दोघांनीही ढाणढाण संगीत द्यायला आणि कात्री मारायला सुरुवात केली. आम्ही आपले आमचे संवाद म्हणून मोकळे झालो पण त्यांच्या मनाला येईपर्यंत त्यांनी प्रारंभचा शेवट होऊ दिला नाही. एकेक भन्नाट कल्पना लढवत ते धावत होते. इतके की कधी थांबतायत तेच कळेना. थांबले तेव्हा उत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि संकलनाची अनोखी भेट आम्हा कलाकारांना त्यांच्याकडून मिळाली. प्रारंभचा शेवट होणे नाही असं वाटायला लागलं असतानाच जी काही अफलातून कामगिरी सर्वांनी केली आहे ती पाहायला या हे आमचं सगळ्याचं आग्रहाचं निमंत्रण.


Tuesday, March 31, 2020

इटुकल्या पिटुकल्या गोष्टी

माझ्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी  सांगितलेल्या माझ्या गोष्टी -  FB - Live




आजोबा
 'चष्मा आण, पाणी दे. चहा कर.आजोबा दिसेल त्याला पकडतात. कामांची रेल्वेगाडी सोडतात. आई म्हणते, नाचवतात सगळ्यांना.
मी त्यांना  काम सांगितलं की मात्र ओरडतात,
 'हातपाय आहेत ना? स्वत:ची कामं स्वत: करायची' असं म्हणतात आणि आरामखुर्चीत डुलत बसतात.
मी आज खोलीत लपून बसलो. कामांची रेल्वेगाडी आजीने हाकली.  आजोबा गेले. मी हळूच विचारलं.
"गेले का जमदग्नी?"
"कोण जमदग्नी? बाहेर ये." आजोबा खेकसले. मी घाबरलो.  आजोबा होते की इथेच. मी पळणार होतो पण आजोबांनी मला धरून आणायला आजीला पाठवलं असतं.
"बाहेर ये." आजोबा परत जोरात ओरडले. मी बाहेर आलो.
"कोण जमदग्नी?" आजोबांनी डोळे वटारुन विचारलं.
"आजी तुम्हाला जमदग्नी  म्हणते.  जमदग्नी म्हणजे काय?" आजोबानी मला उत्तर दिलं नाही. ते  आजीवर वसकन ओरडले.  आजी आहे कुठे? आजी तिथे नव्हतीच.  नेहमी मी पळतो. आज आजी पळाली.
पण मला कुणीतरी सांगा ना,  जमदग्नी म्हणजे काय?
                                      -----------------------------------------
 भगदाड

"उठ गं" आईचा आवाज चढला.
"झोपले की उठवतेस. उठले की झोपवतेस." मी कुरकुरले.
"लाडात येऊ नकोस." ती चिडली. निघून गेली.  मी उगाच भिंतीवर पाय मारला. इकडच्या भिंती पोकळ. भगदाडच पडलं. मी घाबरले.
"काय झालं?" आईने खालून जोरात विचारलं
"पुस्तक पडलं."  मी भगदाड झाकलं. त्यावर उशी ठेवली. धावत खाली गेले.
"खरं सांगितलं की तू ओरडत नाहीस ना?"
"काय केलंस?" आई चिडली. मी गप्प.
"सांग. नाही ओरडणार." नाईलाजाने आई म्हणाली.
तिला मी खोलीत नेलं. भगदाड दाखवलं.
"?" आईचं तोंड उघडंच राहिलं. ती मटकन बसलीच.  चिडली, बडबडायला लागली.
"तू ओरडणार नव्हतीस." मी रडायला लागले.
"मी ओरडत नाहीये." ती ओरडत म्हणाली.
मोठी माणसं! बोलतात एक, वागतात वेगळं. मोठी माणसं! 
-----------------------------------------
मजा
 एकदा मजा झाली. आईने न सांगता मी सगळं केलं. दात घासले, आंघोळ केली. नाश्ता कटकट न करता खाल्ला, गृहपाठ केला. एकदम शहाण्यासारखी वागले. आईला धक्काच बसला. बाबाला वाटलं मला अक्कल आली.
दादा म्हणाला,
"काहीतरी गडबड आहे." तो  गडबड शोधायला खोलीत गेला.  माझ्या, त्याच्या. परत आला.
"काय रे? काय उद्योग केले आहेत कार्टीने?" आईने विचारलं.
"काही नाही." तो पुटपुटला. मी दादाची फजिती झाली म्हणून टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात बाबा दादाचं चित्र घेऊन आला. मी घाबरले. आईच्या मागे लपले.
"पिकरुने काढलंय?" आईने विचारलं.
"नाही. दादाचं नाव पुसलं..." बाबा म्हणाले.
"म्हणजे?" आईला काही कळलं नाही.
"चित्र कुणी काढलं?" बाबानी विचारलं.
"मी काढलं." दादा म्हणाला.
"नाव कुणाचं दिसतंय?" बाबानी विचारलं. दादाने नीट पाहिलं.
"माझं नाव पुसून हिने तिचं घातलं."  दादा किंचाळला.
"म्हणून शहाण्यासारखी वागत होती." आई पुटपुटली. दादाने मला ढकललं,  केस ओढले.  मी पुन्हा बेअक्कल झाले.  भोकाड पसरलं.

-----------------------------------------
थोबाडीत
 आमच्याकडे मायाताई काम करते. उशीरा येते. कधीकधी येतच नाही. आजही तिचा पत्ता नव्हता.
"एक लगावणार आहे तिच्या." आई म्हणाली. दार वाजलं.  मायाताई आली.
"आई, तुझ्या एक लगावणार आहे." मी तिला सांगितलं. मायाताई थांबलीच नाही. पळाली.
आईने माझ्या एक लगावली. मी कोपर्‍यात रडत बसलो.
"नको तेव्हा नको ते बोलतेस. तुझ्या बाबांसारखं."
"मग त्यांना लगाव." बाबा आला आणि कोपर्‍यात बसला.
"त्याला लगाव ना." मी पुन्हा म्हटलं. आई हसली आणि तीही कोपर्‍यात येऊन बसली.
या मोठ्या माणसांचं काही समजत नाही. आई - बाबांनी  मला जवळ घेतलं.
"मायाताईची भांडी बाबा घासणार आहे." आई म्हणाली
"म्हणजे?" मला काहीच कळत नव्हतं.
"अरे, तू बाबांना लगाव म्हणालास ना?"
"हो."
"मग बाबांनी भांडी घासली की झालं."
आई ना. नेहमी कोड्यात बोलते.
तुम्हाला कळलं का? कळवाल का याचा अर्थ?







Thursday, April 19, 2018

नाटक आणि नेपथ्य

"डंख" नाटक ही आमची दहाव्या वर्षाची निर्मिती असेल. गेले ३ महिने नेपथ्यावर अविरत काम चालू आहे ते
पाहताना नकळत मन पहिल्या निर्मितीकडे जातं. २००८ सालाकडे. त्यावर्षी २ एकांकिका केल्या. भिंत एकांकिकेला नेपथ्य काहीच नव्हतं. ३ कलाकार आणि मागे काळा पडदा तर महाभारतासाठी निव्वळ खुर्च्या. शाळेत असल्यापासून एकांकिका स्पर्धा हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखंच होतं. कथेतील नाट्य प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी नेपथ्याची गरज असते असं कधी वाटलंच नव्हतं ते स्पर्धेतील कलाकारांच्या देहबोलीमुळे. भिंत दाखविण्यासाठी भिंत कधी उभारावी लागली नाही तेच दारं, खिडक्या किंवा इतर गोष्टींबद्दल. सर्वच कलाकार ते आपल्या अभिनयातून साकारायचे. तेच आम्ही पहिला प्रयोग करताना केलं. मिळालेला प्रतिसाद उत्तम होता पण तितकाच बुचकळ्यात टाकणाराही. कितीतरीजणांना एकांकिका म्हणजे सुरुवातीला एकपात्री असेल असं वाटलं होतं आणि नेपथ्य (सेट) नाही ही कल्पना पचवणंही जडच गेलं. लक्षात आलं की नाटक लोकांना परिचयाचं आहे पण एकांकिका या स्पर्धेपुरत्या मर्यादित असल्याने त्याबद्दल माहिती नसावी. मग आम्हीपण म्हटलं, त्यात काय  बांधू थोडी दारं, भिंती, खिडक्या...

पण इतकं सोपं  नव्हतं  हे प्रकरण. मुख्य प्रश्न त्या बांधायच्या कशा, कुणी आणि कधी? एकांकिकेचा सरावच आठवड्यातून एकदा मग नेपथ्याचं काम कधी करायचं? पुढचा अडथळा होता खर्च. एकांकिका/ नाटक करताना फायदा नाही झाला तरी चालेल पण तोटाही नको यावर मी ठाम तर विरेनचा तुला दारं, खिडक्या हव्या आहेत ना घे पाहिजे तितक्या....असा खाक्या.  कलाकार स्वत:चा वेळ देऊन उत्साहाने सहभागी होतात त्यामुळे  कलाकारांना  आणि त्यांच्या जोडीदाराला तिकिटाचा खर्च करायला लावायचा नाही, कार्यक्रम झाल्यावर बाहेर जेवण किंवा DVD द्यायला हवीच असं वाटायचं, कलाकारांच्या मेहनतीची जमेल तेवढी कदर करावी म्हणून. त्याचवेळेस नाट्यगृहही दोन दिवस ताब्यात हवं. एकाच दिवशी कलाकारांवर ताण पडू नये, प्रयोगाला सर्व ताजेतवाने रहावेत या इच्छेपायी. आदल्या दिवशी नेपथ्य उभारणी, ध्वनी - प्रकाशयोजना या तांत्रिक बाजू तपासण्यासाठी तर दुसरा दिवस प्रत्यक्ष प्रयोगाचा. पण नाट्यगृहाचा खर्चही दुप्पट. तिकिटाचे दरही सर्वांसाठी सारखेच ठेवायचे यावरही आम्ही ठाम होतो. त्यामुळे  ना नफा ना तोटा याचा ताळमेळ घालत नेपथ्यही आणायचं म्हणजे मोठी परिक्षाच. पण आमची मित्रमंडळी मदतीला धावून आली नेपथ्याची सुरुवात झाली ती अक्षरश: अर्ध्या भिंतीपासून.

PVC पाईप वापरण्याची कल्पना विजय दरेकरची तर भिंतीची मापं गाडीत बसतील अशी ठेवायचं सुचवलं चैतन्य पुराणिकने.  विरेनच्या मनातली कल्पना कागदावर उतरली आणि आमची मित्रमंडळी कामाला लागली. हळूहळू भिंती, दारं, खिडक्या, जाळीचा चित्रांकित पडदा, मोरी, तयार केलेली झाडं, हरिण, वेगळ्या पद्धतीचं प्रवेशद्ववार.... काय काय रंगमंचावर दिसायला लागलं. त्यामागे कल्पकता आणि अथक मेहनत आहे सुतारकामाची पार्श्वभूमी नसलेल्या सर्वांची, पूर्वी कधीही भिंती न रंगवलेल्यांची. हे करताना अर्थात चुकीच्या भिंती रंगल्या, पाईप तुटले, भिंती हलल्या, वाकड्या झाल्या, कलाकारांना काहीवेळेला जीव मुठीत धरुन रंगमंचावर वावरावं लागलं. पण प्रेक्षकांना सुंदर घरं दिसली. सारा अट्टाहास त्यासाठीच तो फळाला आला प्रत्येकवेळी. आता तर ही मंडळी खरंखुरं घरही बांधतील अशा तयारीत आहेत. यावेळच्या नाटकात आणखी ३ वेगळ्या गोष्टींची भर पडली आहे. काय भर आहे ती प्रत्यक्षातच पाहायला या.

’अभिव्यक्ती’ च्या नेपथ्याचं सारं श्रेय *केरीच्या विजय दरेकर, चैतन्य पुराणिक, अंजली आणि संजय भस्मे, वर्षा आणी नवदीप माळकर, रागिणी आणि विवेक वैद्य तर शार्लटच्या गौरव लोहार, बोस सुब्रमणी, चिराग दुआ, केदार हिंगे, अमोल आणि मेघना कुलकर्णी, अनिता आणि तन्वी जोगळेकर, संजीवनी कुलकर्णी, वेदिका आणि राजीव तोंडे यांना.*

या सर्वांमुळेच ’अभिव्यक्ती’ चं एकांकिका/नाटक म्हणजे उत्तम नेपथ्य ही ओळख आपण निर्माण करु शकलो. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आभार मानणं औपचारिकपणाचं होईल तेव्हा या सर्वांची साथ अशीच कायम राहू दे एवढीच इच्छा.


आमच्या नाटक/ एकांकिकांची झलक पाहण्यासाठी अभिव्यक्ती

संकेतस्थळ  https://marathiekankika.wordpress.com/







Tuesday, June 7, 2016

मराठी शाळा

शारलट, नॉर्थ कॅरोलायना येथे  माझ्या मराठी शाळेचं हे दुसरं वर्ष. दर रविवारी किलबिलाट असतो घरी. हसतखेळत शिक्षणाचा हा प्रयत्न आणि त्याची झलक. विनोदी प्रवेश, पालकांची परिक्षा, नाट्यप्रवेश, गाणं सर्व काही. तुमच्या अभिप्रायाचं, सुचनांचं स्वागत.


Monday, February 15, 2016

यु ट्युब

आतापर्यंत आम्ही केलेल्या एकांकिकापैंकी काहींची छोटीशी झलक -  खेळ, महाभारताचे उत्तर - रामायण, भिंत, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर.














आणि इथे एकांकिकांची माहिती