Tuesday, March 3, 2015

गोंधळ

लहानपणापासून मला मासांहारी व्हायचं होतं. कुणी करु नको, खाऊ नको असं सांगितल्यावर ते करावंसं वाटतं ना तसाच तो प्रकार होता. मांसाहार करायचा नाही म्हणजे काय? करणारच. असं मी आईला ठणकावून सांगितलं.
"घाला काय तो गोंधळ. पण बाहेर." असा आईनेही निर्वाणीचा इशारा दिला. पण तो काळ बाहेर गोंधळ घालण्यासारखा नव्हता आणि बाहेर गोंधळ घालायचा म्हणजे काय आणि कुठे तेही  धड समजलंच नाही त्यामुळे मी प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन  मला मांसाहार करायचाय असं जाहीर केलं. कुण्णाला म्हणून पाझर फुटला नाही. सगळ्या आया तुझी आई नाय म्हणते ना मग नको गं बाय भरीला घालू... असं काहीतरी पुटपुटत मागे हटायच्या. अखेर एकदा मधल्या सुट्टीत एका मैत्रिणीने हळूच लपवून आणलेलं अंडं पुढे केलं. मी ते तिच्या हेतूबद्दल शंका असूनही मोती मिळाल्यासारखं ते हातात धरलं.
"खाऊ?" अंड्यात आई जगदंबेचा चेहरा दिसायला लागला होता पण अखेर मैदानात अंडं आलं होतं त्यावर तुटून पडण्याची इच्छा तीव्र होती.
"खरंच खाऊ ना?" धीर मिळवायला मी मैत्रिणीकडे पाहिलं.
"खा ना. तुझ्यासाठी पळवून आणलंय घरातून आणी आता खाऊ का काय विचारतेस? भेदरट." मैत्रिणीने मर्मावर बोट ठेवण्याचा धर्म पार पाडला. मी तिचा राग अंड्यावर काढला. कचकन चावा घेतला. आणि आजूबाजूच्या जमलेल्या कोड्याळ्यांतून चित्कार उमटले,
"ईऽऽऽ, बावळटच आहेस, अगं असं नाही खायचं..." थू थू करत मी गडबडीने टरफलं तोंडातून हवेत उडवली. माझी मांसाहार करण्याची पद्धत बघून कोंडाळं नाहीसंच झालं.  मग लक्षात आलं आधी हे सोलायचं असतं, फळांसारखंच की. अंडं आवडलं. पण दुसर्‍यादिवशी शाळेत स्वागत होतं ते प्रत्येकाच्या फिदीफिदी, फिदीफिदी....ने.  सगळी माझ्याकडे पाहून का हसत होती ते रहस्य उलगडलं माझ्या गुप्तहेरांनी. अंजू, आशा ने सांगितलं की संपूर्ण शाळेत कुणीतरी दवंडी पिटलेली आहे की ते अंडं कोंबडीचं नव्हतंच बदकाचं होतं.  मला तसा काही फार फरक पडला नाही. कोंबडी काय, बदक काय अंडं मिळालं ना? पण आता कोंबडीच्या अंड्यामागे मी लागले.

कुणीच हाती लागत नव्हतं. कोंबडी नाही, बदक नाही.  आई उदार झाली आणि बाहेर गोंधळ घाला म्हणाली तरी तो घालता येणार नाही याची व्यवस्था तिने व्यवस्थित केली होती. त्यामुळे  बदकाचं एक अंडं खाऊन, मला मी मासांहारी आहे अशा बढाया बरीच वर्ष माराव्या लागल्या. अखेर माझ्या आईने म्हटलेला गोंधळ बाहेर काय, अचानक घरातच पोचला. लग्न ठरलं आणि तिचा भावी जावई निघाला पक्का मासांहारी. आता मात्र मी कोंबडी, मासे, मटण अशीच स्वप्न पाहायला लागले. म्हटलं, घाल रे करुन खायला मला तू. नाहीतर आई म्हणते तसा आपण दोघं बाहेर घालू गोंधळ . पण कसलं काय, राजेंचं फर्मान आलं, ’शिकून घे’. आणि मी तणतणत घरोघरी मासे खाणार्‍या गावात कुठे मासांहारी पदार्थ करायचं शिक्षण मिळतं का याचा शोध घ्यायला लागले. कोकाट्यांच्या क्लासात कसं फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवत तसं झटपट मासे, मटण... पण नुकतंच लग्न झालेल्या मैत्रिणीने मोलाचा सल्ला दिला,
"तो म्हणाला नी निघालीस काय लगेच मूर्खासारखी शिकायला. डोक्यावर बसेल." या विधानाची खात्री अनुभवी बायकांनी दिली आणि "अस्सा क्लास बिस नाही बाई आमच्या गावात आणि घरात तर अंडं सुद्धा चालत नाही आमच्या." असं ठणकावून सांगून टाकलं. नवर्‍याला तेवढ्यावर लग्न मोडायचं असतं की नाही ठाऊक नव्हतं त्यामुळे लग्न बंधनात अडकलो.

सुखाने नांदू लागलो, बाहेर गोंधळ घालू लागलो. घरी गोंधळ घालायचा तर आधी  तयारी मलाच करावी लागेल म्हणून ’गोंधळ बाहेर घाला’ म्हणायला मलाही माझ्या आईसारखंच भारी म्हणजे भारीच आवडायला लागलं. आणि अचानक एके दिवशी मी जसं माझ्या आईला विचारलं होतं तसा प्रश्न लेकीने विचारला.
"बीफ का खायचं नाही?"
"कारण आपण शाकाहारी आहोत."
"म्हणजे?" तिचे एकशब्दी प्रश्न रोखठोक, मुद्द्याला हात घालणारे असतात. आमची उत्तरं, काय उत्तर दिलं तर खपेल याचा अंदाज घेत घेत दिलेली. त्यामुळे प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाला की भारीच गडबड उडते घरात. त्यात नवरोजी बर्‍यांचदा गोत्यात आणणारीच स्पष्टीकरणं देत असतात. आताही तेच झालं.
"म्हणजे आपण फक्त चिकन, मासे खातो. तेही बाहेर. घरी नाही."
"का?"
"का म्हणजे काय?" त्याला पटकन उत्तर सुचेना.
"थांब मी सांगतो. खरं तर चिकन पण बंद करायला हवं. बीफ तर नाहीच नाही."  मुलगा बाह्या सरसावत गोंधळात सामील होणार आणि  त्याने पाहिलेल्या माहितीपटांचे पुरावे देत सगळ्या अन्नांची चिरफाड करणार हे लक्षात आलं. त्यामुळे विषयात वेगळाच रंग भरण्याचं कार्य नवर्‍याने केलं.
"कारण गायीच्या पोटात ३२ कोटी देव असतात."  लेकीचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मुलाला मध्येमध्ये बोललेलं अजिबात चाललं नाही.  त्याने खिजवल्यासारखं त्याच्या बाबाला विचारलं.
"इतके देव गायीच्या पोटात का राहतात आणि मावतात कसे? त्यांना पण जागेचा प्रश्न भेडसावतो की काय?" चर्चेला भलतंच वळण लागलं होतं. घरातल्या दोन जबाबदार व्यक्तींना उत्तरं सुचेनाशी झाली. तो मोका साधत मुलगी म्हणाली,
"आणि इतके देव  गायीच्या पोटात असतात मग त्यातला एकही देव आपल्या घरात कसा नाही?" नवर्‍याने तरी मी सांगत होतो, जरा तरी देवाचं बघ, नमस्कारापुरता तरी ठेव एखादा देव घरात, ’लुक’ दिलं. मी  पती हाच परमेश्वर असा भाव चेहर्‍यावर आणून त्याला पाघळवायचा प्रयत्न केला.
"कारण देव मनात असला की झालं." घाईघाईत लेकीलाही उत्तर देऊन टाकलं.
"पण मग तो गायीच्या पोटात कशाला गेला?"
"अगं बाई, गाय म्हणजे गो धन, शेतकरी..." माझं जे काही सुरु झालं ते थांबलं तेव्हा कळलं की तिने ऐकणं कधीच सोडून दिलं होतं. पण एकदम शांतता निर्माण झाल्यामुळे तिलाही भाषण संपलं असावं याचा अंदाज आला,
"तर मुद्दा काय, आपण बीफ खायचं नाही..."
"बरोबर."

मग लहानपणी मी जे केलं होतं तेच तिनेही केलं. माझ्या आईच्या भूमिकेत आता मी शिरले आणि म्हटलं,
"ठीक आहे. ठणकावून सांगणं, वाद घालणं आणि पाय आपटणं झालं असेल तर आता माझं ऐक." उपकार कर्त्याची भूमिका घेऊन तिने माझ्याकडे पाहिलं.
"बोल."
"जो काही गोंधळ घालायचा तो बाहेर. समजलं?" काही न कळल्यासारखं ती माझ्याकडे पाहत राहिली. मग तिला एकदम साक्षात्कार झाला.
"ठीक आहे. चालेल." आनंदाचा चित्कार काढून मुलगी गोंधळ घालायला बाहेर पडली.