Friday, December 26, 2014

तिर्‍हाईत

"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे. जायचं का एकत्र?"
"कोण बोलतंय?" उल्हासने चढ्या आवाजात विचारलं.
"अरे, सीमा बोलतेय. मला वाटलं फोन कुणाचा ते पाहिलं असशील."
"नाही पाहिलं. बोल."
"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे त्याला जायचं का एकत्र?"
"कधी?" तिरसटल्यागत त्याने विचारलं.
"आहेत अजून दोन महीने. आणि तुझं काही बिनसलं आहे का? किती मग्रुरी आवाजात. बोलायचं  नसेल मनात तर तसं सांग ना. ही कसली नाटकं."
"ए, आता तू नको सुरु करु बाई. तो  सावंत एक डोकं खाऊन गेला. तो बाहेरचा. तुम्ही घरचे."
"काय झालं? भांडलास?"
"सोड गं ते. कधी आहे तुझं ते संमेलन? तारीख सांग."
"तेवीस डिंसेबर. आणि ते फक्त माझं नाही. सगळ्याचं आहे. कमालच करतोस तू. कसा बोलतोस." सीमाही आता वैतागली.
"मला माझ्या वर्गात कोण होतं तेही आठवत नाही."
"हेच उत्तर द्यायचं होतं तर तारीख कशाला विचारलीस. आणि वाट्टेल ते नको सांगू. केवढीशी शाळा होती. सगळीजण ओळखायची एकमेकांना. तुला तुझ्या वर्गातला महेश आठवत नाही? तो तर तुझा खास मित्र होता."
"असेल. पण ही असली संमेलनं म्हणजे फालतूपणा असतो. कर्तुत्व गाजवलेली पोरं येतात आवर्जून. आमच्यासारखी सामान्य माणसं नाही फिरकत. आणि कुणाला आठवायचा आहे तो काळ मुद्दामहून. आपल्या जखमेवर मीठ सालं आपलं आपणच कशाला चोळायचं?  वाईट  काळ होता तो माझा. फुकटचं दुखणं सालं. तू जा. एऽऽऽ, सीमा, अगं ऐकते आहेस ना? हॅलो हॅलो...."

उल्हासच्या बोलण्याने सीमाला धक्काच बसला. काय बोलतो आहे हा? हे असं काहीबाही मनात साठवून ठेवलं होतं याने इतकी वर्ष? आधी कसा बोलला नाही केव्हाच? का आज आधीच काही बिनसलं होतं त्यामुळे सगळं मनातलं बाहेर आलं. उल्हासचं हॅलो, हॅलो कानावर येत असूनही ती गप्प राहिली.  सामान्य माणसं येत नाहीत म्हणे अशा संमेलनांना? इतका स्वत:ला कमी लेखतो हा? आणि वाईट काळ? आत्तापर्यंत कधीच ऐकलं नव्हतं असं काही उल्हासच्या तोंडून. आज अचानक काय झालं?
’वाईट काळ?’ आपल्या घरी उल्हास राहिला तो त्याच्या दृष्टीने वाईट काळ होता? मान्य की ते काही त्याचं घर नव्हतं. आनंदाने नव्हता आला तो रहायला पण इतके कटु शब्द? वाईट काळ म्हणायचं... आई, बाबांनी एवढं केलं त्यावर पाणीच पाडलं की उल्हासने असं बोलून. तसंही सीमा, अरुणाच्या मते उल्हास स्वार्थीच निघाला होता. मामा, मामीमुळे आजचा दिवस दिसतो आहे असं  तो म्हणत असला तरी ते  त्याच्या कृतीतून, वागण्यातून कुठे दिसत नव्हतं. ना मामा, मामीला आठवणीने कधी फोन केला की आग्रहाने त्या दोघांना आपल्याकडे  नेलं. कधीतरी वर्षसहा महिन्यांनी त्या भागात आला तर  भेटून जाणार. सीमा, अरुणाला वाटायचं, आपल्या आईला त्याने कौतुकाने एखादी साडी घ्यावी, बाबांना त्यांच्या आवडीचं काहीतरी द्यावं. पण हातून पैसा सुटेल कुणासाठी तर शपथ.  किती वेगवेगळ्या तर्‍हेने त्यांनी ते बोलूनही दाखवलं होतं. पण अशावेळेस काही बोलायचंच नाही ही लहानपणीची ढाल तो मोठेपणीही वापरत होता. अगदीच काही नाही तर कधीतरी रहायला, विश्रांतीसाठी तरी न्यावं आपल्याकडे.  आई, बाबांसमोर दोघी हे बोलूनही दाखवत.  दोघंही गप्पच रहात अशावेळेस. बाबा कधीतरी म्हणत त्यांनी त्याचं कर्तव्य केलं. आपण कुणासाठी काही केलं तर अशी परतफेडीची अपेक्षा ठेवणं बरोबर नाही.  त्याला जाणीव आहे ना हेच खूप झालं.  पण कितीही पटलं तरी दोघींचं मन ते मानत नव्हतं. आणि आज इतक्या वर्षांनी उल्हासने असं बोलावं? सीमाला हृदयात कळ उठल्यासारखं वाटलं.  तो घोलवडला आला त्याला पस्तीस वर्षाहून अधिक काळ लोटला होता. उल्हास घरी आला तो अचानकच. तो येणार हे माहीत नव्हतं किंवा कदाचित तसं होऊ शकतं याची पुसटशीही कल्पना कुणी दिली नव्हती. सगळं अचानक घडलं होतं. त्याच्या आगमनाने सीमा आणि अरुणा दोघीचं विश्व ढवळून निघालं. घरातलं वातावरण बदललं. सगळ्याच गोष्टींमध्ये एक वाटेकरी अवचित वाढला.  आत्ता आत्तापर्यंत सतत आई, बाबांच्या आसपास घुटमळणार्‍या त्या दोघी थोड्याशा बाजूलाच पडल्यासारख्या झाल्या.  उल्हास आई, बाबाचं केंद्रस्थान बनून गेला आणि तरीही त्याच्या दृष्टीने हा त्याचा वाईट काळ होता? आई, बाबांच्या कानावर हे पडायला नको. कोसळतील दोघं. सीमाला एकदम हसू आलं. उल्हासच्या दृष्टीने तो वाईट काळ होता? मग आमचं काय? अगदी याच शब्दात त्या दोघींनी त्यांना त्या काळाबद्दल काय वाटतं हे मांडलं नसतं तरी उल्हासचं आगमन ही सीमा, अरुणाच्या दृष्टीनेही  वाईट काळ सुरु झाल्याचीच तर चाहूल होती.

"सीमा, उल्हास तुझ्याबरोबर येईल शाळेत आज. पहिलाच दिवस आहे त्याचा." बाबांनी सांगितलं तेव्हा झुरळ झटकल्यासारखं ती किंचाळली होती.
"इऽऽऽऽऽऽ तो मुलगा आहे. माझ्याबरोबर नको. माझ्या मैत्रिणी चिडवतील त्याला. मुलीत मुलगा लाडोंबा म्हणून."
"अरुणा?"
"माझ्याबरोबर पण नको." अरुणानेही हात झटकले. उल्हास हातात दप्तराचं धोपटं सांभाळत, या पायावरुन त्या पायावर करत, सारं संभाषण ऐकत नुसताच उभा होता. नवीन दप्तराचं, चपलांचं नाही म्हटलं तरी त्याला अप्रूप वाटत होतं. वर्षाच्या सुरुवातीला मिळणार्‍या या गोष्टी त्याला दुसर्‍यांदा मिळत होत्या एकाच वर्षात. आणि घरी आल्या आल्या त्याची बाबांबरोबर झालेली ही खरेदी सीमा, अरुणाला अस्वस्थ करुन टाकत होती. त्याच्या नवीन दप्तराकडे, चपलांकडे असूयेने नजर टाकून दोघींनी त्याला शाळेत घेऊन जायचं नाकारलंच.
"काय गं तुम्ही मुली? जरा विचार करुन बोलावं. उल्हास मध्येच आला आहे इथे. कुणी ओळखीचं नाही त्याच्या. शिक्षक, मुलं सगळंच नवीन अशा वेळेस तुम्ही नाही तर कोण मदत करणार त्याला?" आईने समजावून सांगायचा प्रयत्न केला पण दोघी बधल्या नाहीत.  दोघींना वाटलं होतं आपण नाही म्हटल्यावर पाठवतील त्याला एकटाच शाळेत. पण बाबाच बरोबर निघालेले पाहिल्यावर त्यांना माघार घ्यावीशी वाटत होती. प्रत्यक्षात मात्र काही न बोलता लाल रिबिनींनी करकचून बांधलेल्या वेण्या रागारागाने उडवत दोघी आपली दप्तरं उचलून तिथून चालत्या झाल्या.

त्यांच्या शाळेत नव्यानं आलेल्या प्रत्येक मुलाची चर्चा होत असे तशी ती यावेळीही झाली. सीमा, अरुणाच्या दृष्टीने अभिमानाने तो आपला भाऊ आहे हे सांगावं असं उल्हासकडे  विशेष काही नव्हतं. त्यात घरात त्याला त्यांच्यापेक्षा जास्त लक्ष मिळत होतं त्यामुळे रागच यायला लागला होता त्यांना त्याचा. शाळेत मान खाली घालून, गंभीर चेहरा करुन उल्हास वावरायचा. त्याच्या एकमेव मित्राबरोबर, महेश बरोबर दिसायचा तो सतत. कुणी अगदी मुद्दाम  त्याच्याशी असलेल्या नात्याबद्दल विचारलं तर त्या मान डोलवायच्या. उल्हासही त्यांच्या आल्यागेल्यात नव्हता. शाळेत एकमेकांना ओळख दाखवायची नाही असा अलिखित नियमच झाला होता तिघांचा. त्या दिवशी मात्र उल्हासच्या वर्गातून कुणीतरी बोलवायला आलं तसं सीमाच्या काळजात धडधडलं. तिने घाईघाईत त्याचा वर्ग गाठला. भिरभिरत्या नजरेने वर्गातल्या बाकांवरुन  नजर टाकली. मधल्या कुठल्या तरी बाकावर मान खाली घालून वहीत काहीतरी खरडत बसला होता उल्हास. शिकवणं थांबल्यामुळे दारात उभ्या असलेल्या सीमाकडे वर्गातली सगळी मुलं बघत होती. अभ्यासातून मोकळीक मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहर्‍यावर होता. सीमाला ओळखणार्‍या मुली  हात हलवून तिचं लक्ष वेधून घेत होत्या.
"उल्हास तुझा आतेभाऊ ना?" तिने मान डोलवली.
"ही चिठ्ठी दे तुझ्या बाबांकडे." बाईंनी हाताने आत येण्याची खूण केल्यावर उल्हासकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकत तिने चिठ्ठी घेतली.
"आणि बाबांच्याच हातात द्यायची. उघडून पहायची नाही." गावडे बाईंच्या घोगरट आवाजाला घाबरुन तिने नुसतीच मान डोलवली. स्कर्टच्या खिशात चिठ्ठी जपून ठेवली.

"काय आहे त्या चिठ्ठीत?" शाळेच्या आवारातून बाहेर पडून रस्त्याला लागलेल्या सीमा आणि अरुणाला उल्हासने गाठलं.
"आम्हाला काय माहीत. उघडायची नाही म्हणून सांगितलं आहे तुझ्या बाईंनी." सीमाने चिठ्ठी मुद्दामच त्याच्यासमोर उलटसुलट केली.
"तू काय केलंस? ती गावडीण खडूस आहे एकदम. एकदा तिच्या हातात सापडलास की संपलं." अरुणाने सीमाच्या हातातून चिठ्ठी घेत विचारलं.
"पण मी काहीसुद्धा केलेलं नाही. बघू ना काय लिहलं आहे ते."
"ह्यॅ... आणि तू काही केलं नाहीस तर मग चिठ्ठी का दिली? ती सुद्धा ताईला बोलवून. तुझ्याकडे का नाही दिली? काय केलंस सांग ना? बघ हं आत्या आली की तिला सांगू. मग तुझी रवानगी बाबा तिच्याबरोबर करुन टाकतील. सांग ना काय केलस ते?" अरुणाच्या एकामागून एक प्रश्नांना उत्तर न देता उल्हासने तिच्या हातातून ती चिठ्ठी हिसकावली आणि तो पळत सुटला. सीमा, अरुणाही त्याचा पाठलाग करत घरी पोचल्या.  बाबा आले की बघतील काय ते म्हणत आईने चिठ्ठी स्वत:कडे ठेवून दिली.  संध्याकाळी बाबा आल्या आल्या आईला चिठ्ठी द्यायला अरुणाने भाग पाडलं. तिघंही आज्ञाधारकासारखे त्यांच्यासमोर उभे राहिले. शांतपणे बाबांनी चिठ्ठी काढून वाचली, आईच्या हातात दिली. दोघं काही बोलले नाहीत तसं कुणालाच काही सुचेना. सीमा, अरुणा नाईलाजाने खेळायला बाहेर निघून गेल्या. एक दोन वेळा पाळीपाळीने घरात डोकावून गेल्या. पण आत गेलं रे गेलं की आई पाठवायची तिथून बाहेर. दोन्ही वेळेला उल्हासला डोळे पुसताना पाहिल्यावर मात्र दोघींना आनंद झाला.
"ओरडले वाटतं बाबा एकदाचे." अरुणा बाहेर येऊन सीमाच्या कानात कुजबुजली.
"रडत होता ना? बरं झालं बाईनीच चिठ्ठी पाठवली. काय प्रताप गाजवले कोण जाणे. बाबा ओरडले बहुधा त्याला. तो इथे आल्यापासून पहिल्यांदा." दोघींनी खुशीत एकमेकींना टाळी दिली. बाबा उल्हासला ओरडल्याच्या आनंदात त्या खेळत राहिल्या ते  उल्हासला बाबांबरोबर खुललेल्या चेहर्‍याने बाहेर पडलेलं बघेपर्यंत.  सीमा, अरुणा त्यांच्यामागे धावल्याच.
"आम्ही पण येतो ना. कुठे जाताय? उल्हासच का  फक्त बरोबर येतोय तुमच्या?" बाबांची  मान नकारार्थी हलली आणि जीभ बाहेर काढून उल्हासने वेडावलं तशा पाय आपटत त्या लगोरीच्या खेळाकडे परत वळल्या. पण उल्हास, चिठ्ठी हा विषय काही दोघींच्या मनातून निघता निघत नव्हता.  उल्हासही विचारलं तर दाद देत नव्हता. दोघींनी बरंच डोकं चालवलं आणि  तीन चार दिवसांनी बाबांसमोर उभं रहावं लागलंच. दबकतच त्या दोघी समोर गेल्या.
"काय खोडी काढलीत?" सीमाने बाबांच्या प्रश्नावर साळसूद चेहरा केला.
"छे. मी नाही कुणाची खोडी काढली."
"अरुणा"
"मी पण नाही काही केलेलं."
"खोटारड्या. माझी कंपासपेटी लपवून ठेवली आहे दोघींनी."
"खोटारड्या काय म्हणतोस? आम्ही नाही कधी खोटं बोलत. आणि कंपासपेटी कुठली? आम्ही कशाला लपवू. आम्हाला तर माहीतही नाही तुझ्याकडे कंपासपेटी आहे."
"मामाने घेऊन दिली होती. नवीन." उल्हास बोलून गेला आणि काय बोलून गेलो त्याची कल्पना आल्यासारखी त्याने जीभ चावली. मामा बरोबर बाहेर जाऊन काय आणलं ते त्याला दोघींना मुळ्ळीच सांगायचं नव्हतं.
"अय्या होऽऽऽ? बाबानी दिली. नवीन. कधी? दाखव ना आम्हाला." अरुणाने भलामोठा होऽऽऽऽ लावत आश्चर्य व्यक्त केलं.
"जास्त शहाणपणा करु नकोस. तुम्हीच लपविली आहे. मामा सांग ना परत द्यायला."
"सीमा, अरुणा कंपासपेटी लपवलीत ना तुम्हीच? द्या मग ती माझ्यासमोर त्याच्या हातात. आणि लपवली नसली हे खरं असलं  तरी मदत करा त्याला शोधायला. सापडली नाही तर शिक्षा तिघांनाही होईल एवढं लक्षात ठेवा." दोघींनी मान डोलवली.  चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते कळल्यावरच उल्हासची कंपासपेटी त्याच्या हातात पडली.

हा प्रसंग कारणीभूत झाला असेल उल्हासच्या दृष्टीने वाईट काळ सुरु झाला त्याला? की अशा आणखी घडलेल्या  गोष्टी? सीमा विचारात बुडून गेली.

आपल्या बोलण्यावर सीमा एकदम गप्पच झाली हे  लक्षात आलं  आणि क्षणभर आपण काय बोलून गेलो या कल्पनेने उल्हास दचकला. च्यायला, त्या सावंत काकांनी येऊन डोकं भडकवलं त्यामुळे झालं असं. फुकट कामं करुन मागतात ती मागतात वर आमच्यासारख्यांच्या मदतीवरच मोठा झालास हे ऐकवायचं. झोळी घेऊनच फिरत होतो ना मी दारोदार.  सगळ्यांनी साले उपकारच केले. करा परतफेड एकेकाची कामं फुकट करुन.  पण मामा, मामी काय किंवा सीमा, अरुणा काय कुणी असं त्याबद्दल बोलून  दाखवलं नव्हतं त्यामुळे आत्तापर्यंत त्याच्या घोलवडच्या दिवसांबद्दलच्या भावनांबद्दल तो कधीच  बोलला नव्हता.   अरुणा, सीमा  भावुकतेने  तिथल्या दिवसांबद्दल बोलायला लागल्या की तो विषय टाळता येत नाही म्हणून हसून मान डोलवायचा. त्यावेळच्या भांडणाबद्दलही त्यांना काय अपूर्वाई होती कुणास ठाऊक. पण पूर्व आयुष्य पुसून काढता आलं असतं तर उल्हासने घासून पुसून ते स्वच्छ केलं असतं कधीच. उपकार केलेल्या माणसांना तर भेटावंसंही वाटत नव्हतं त्याला.  पण आज काय बोलून गेला तो. इतरांच्या बाबतीत ठीक आहे पण मामा, मामीच्या कानावर गेलं तर? आणि  सीमा, अरुणालाही काहीही कल्पना नसणार याबद्दल.  पण कटु असलं तरी तेच सत्य नव्हतं का?

परिस्थितीने त्याला घोलवडला पोचवलं.  बाबा गेले, म्हटलं तर दीर्घ आजारपणाने.  ते बरे होतील असा आई विश्वास देत होती. अगदी शेवटपर्यंत. ती म्हणते आहे म्हणजे बाबा बरे होणार यावर केवढा विश्वास ठेवला त्याने. पण तसं झालं नाही. गेलेच ते.  बाबांना पोटाच्या दुखण्याचा काहीतरी त्रास होता एवढंच ठाऊक होतं. आधी घरगुती उपचार होत राहिले. मग अधूनमधून तालुक्याच्या गावी, कणकवलीला जाणं सुरु झालं. वैभववाडी ते कणकवलीच्या फेर्‍या वाढायला लागल्या. बाबांना कणकवलीला जायला लागलं की बांद्याचे आजी, आजोबा वैभववाडीला  उल्हासच्या सोबतीसाठी रहात.  मुंबईचे, घोलवडचे मामा पैसे पाठवत. अधूनमधून मामा, मामी येऊन भेटून जात. म्हटलं तर सुरळीत चालू होतं सर्व. उल्हासला पैशाची चणचण असेल याची कल्पना येण्याइतका तो मोठा नव्हता आणि कुणी कधी तसं त्याला जाणवूही दिलं नाही. जवळजवळ वर्षभर हे असंच चालू राहिलं.

दिवाळीच्या सुट्टीत सगळे बांद्याला जमले आणि त्याचवेळेला बाबा गेले. फराळावर ताव मारुन दुपारी सगळी भावडं ओसरीवर सतरंज्या टाकून पडली होती. गप्पा गोष्टी, खिदळणं चालू होतं. बेडं उघडल्याचा आवाज झाला म्हणून सगळ्यांनी अंगणाच्या दिशेने पाहिलं. खाली मान घालून कणकवलीला गेलेला मुंबईचा मामा पायर्‍या उतरत होता. मुलांबरोबर तिथेच टेकलेली आजी गुडघ्यांवर जोर देत उठली. गूळ दाणे आणि पाणी आणायला उल्हास आणि अरुणाला तिने आत पिटाळलं. स्वयंपाकघरातल्या फडताळांमधून खुडबूड करत अरुणाने गूळ दाणे शोधून काढले. पितळेच्या  तांब्यात पाणी आणि वाटीत गूळ, दाणे घेऊन ती दोघं बाहेर आली तेव्हा सगळं चिडीचूप होतं. आजोबांनी त्याला जवळ घेतलं. मुंबईचा मामा  खाली मान घालून बसून होता.
"आजोबा, सोडा नं मला. मामाला पाणी देऊ दे." बावचळलेल्या उल्हासने स्वत:ला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. मामाने पुढे होऊन त्याच्या हातातला तांब्या घेतला. त्याला स्वत:च्या जवळ बसवलं.
"उल्हास, तुला ठाऊक आहे ना, तुझे बाबा खूप आजारी होते?"
"हो." घशात शब्द अडकल्यासारखं तो म्हणाला.
"तुझे बाबा वारले राजा." तो तसाच बसून राहिला. बाबा वारले? मग आता काय करायचं? त्या क्षणी त्याला आई हवी होती. आजी पुढे झाली तसं उल्हासने  तिच्या पातळात डोकं खुपसलं. त्याला एकदम  गदगदून रडायला आलं.  तो मुसमुसून रडत राहिला. बराचवेळ. अरुणा, सीमा, त्याची इतर मावस, मामेभावंडं सगळी मूक होऊन त्यालाच न्याहाळत बसली होती. प्रसंगाचं गांभीर्य प्रत्येकालाच कळलं होतं पण आपण आता काय करायचं ते कुणालाच कळत नव्हतं. भेदरलेल्या सशासारखी प्रत्येकाची गत झाली होती. आजीच्या पातळात खुपसलेला चेहरा बाहेर काढून तो तसाच बसून राहिला. भावंडांच्या नजरेची जाणीव झाल्यावर गंजीफ्रॉक पुढे ओढत आपली मान त्याने त्यात खुपसली. गंजीफ्रॉकने बराचवेळ तो डोळे कोरडे करत राहिला. मान वर करुन त्याने मुंबईच्या मामाकडे पाहिलं तेव्हा तो त्याच्याकडेच पहात होता.
"तू मला आईकडे घेऊन चल ना. आत्ता लगेच. ने ना रे मला आईकडे. आत्ताच्या आता. ने ना. चल जाऊ आपण कणकवलीला." हाताला धरुन उल्हासने मामाला ओढायला सुरुवात केली तसं आवेगाने मामाने त्याला कुशीत ओढलं. स्वत:चे अश्रु पुसत तो उल्हासला थोपटत राहिला.
"घोलवडचा मामा आणि तुझी आई  बाबाना घेऊन येतील संध्याकाळपर्यंत. आता नाही जाता येणार आपल्याला तिकडे. आणि आई आली की रडू नकोस रे बाळा. आता तूच तिला सावरायला हवं. आहे कोण दुसरं तिला."
उल्हास नुसताच मामाकडे पहात राहिला. आई आली की रडायचं नाही? का? आणि बाबा कुठे जातील आता? सदानंदचे, त्याच्या मित्राचे बाबा वारले होते गेल्या वर्षी अपघात होऊन त्यानंतर  किती चर्चा केली होती मित्रांनी एकत्र.  मृत्यू, स्वर्ग, नरक, भूत....तो ते सगळं आठवत राहिला.  आता बाबांचं काय होईल या विचारानेच त्याला थकवा आला. मामाच्या थोपटण्यानेही त्याला पेंग आल्यासारखं झालं. रडून, थकून झोपलाच तो.

जाग आली ती दारात थांबलेल्या गाडीच्या आवाजाने. वार्‍याच्या वेगाने ओसरीच्या पायर्‍या उतरुन, अंगणातलं बेडं ओलांडून तो गाडीपाशी पोचला. दार उघडून खाली उतरलेल्या आईला त्याने घट्ट मिठी मारली. घोलवडचा मामा आणि गाडीचा चालक उतरला. गाडीचं मागचं दार त्यांनी उघडलं. धडधडत्या हृदयाने  बाबांच्या अचेतन देहाकडे उल्हासने पाहिलं न पाहिल्यासारखं करत नजर वळवली. काय करावं ते न सुचून मान खाली घालून तो तिथेच उभा राहिला. डोळ्यातलं पाणी आतल्या आत परतवण्याचा प्रयत्न करीत.
"त्यांना खाली घेतलं की नमस्कार कर रे उल्हास." घोलवडचा मामा भरल्या गळ्याने म्हणाला तसा त्याला हुंदका फुटला. घरातली सगळीच बाहेर आली. आजोबांच्या गळ्यात पडून आईने तोंडात कोंबलेला पदर पाहिला तसं उल्हासने तिला मिठी मारली. आजीने पुढे होत तिच्या लेकीला जवळ घेतलं. आजोबांनी उल्हासला बाजूला घेत, त्याचा हात धरुन त्याला  पायरीवर बसवलं. काठी टेकत तेही त्याच्या बाजूला बसले. शेजारी शेजारी बसलेल्या आजोबा आणि नातवांच्या मनातल्या विचाराचं वादळ  समांतर दिशेने घोंघावत होतं. लेकीच्या भवितव्याच्या कल्पनेने तिचे बाबा व्याकुळ झाले होते तर बाबांच्या आठवणीने उल्हास उन्मळून पडला होता.

त्यानंतरच्या घडामोडी इतक्या पटापट झाल्या की आयुष्याचं बदललेलं ते वळण म्हणजे परावलंबनाचा प्रारंभ होता हे उल्हासला कळायला मध्ये कितीतरी वर्ष जावी लागली. त्यावेळेला मात्र पुढच्या तेरा दिवसात तो आईचा पदर धरुन मागे पुढे फिरत होता. बाबांच्या आठवणीने आलेलं रडू आईला दिसू नये म्हणून धडपडत होता. आईला जपायचं होतं त्याला. त्याच्याशिवाय होतंच कोण दुसरं तिला. सगळी भावंडं अजाणता गरीब बिच्चारा म्हणून त्याला वागवत होते ते टाळण्यासाठी गावातल्या देवळात जाऊन तास न तास बसत होता. दहावा, तेरावा अशा दिवसांच्या गडबडीत मध्येच कुणाला तरी उल्हासची आठवण झाली की घरातलं कुणीतरी थेट देवळाकडे येई. काही न बोलता मुकाट तो घराच्या दिशेने वळे. तेराव्यानंतर नातेवाईक हळुहळू पांगले आणि आईने जवळ बसवलं.
"उल्हास, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी." आईच्या आवाजातल्या दु:खाने, निराशेने त्याचा जीव एवढा एवढा होऊन गेला.
"बाबा गेले. आता घोलवडचा मामा तुला घेऊन जाईल त्याच्या घरी."
"तू पण येशील ना माझ्याबरोबर?"
"नाही."
"मग सुट्टी संपली की मामा वैभववाडीला आणून सोडेल परत मला?"
आई काही न बोलता बसून राहिली.  तोच प्रश्न त्याने पुन्हा विचारला.
"नाही. तू आता मामाकडेच राहशील."
"काऽऽऽय?" तो किंचाळलाच.
"हो आणि मी इथे बांद्याला."
"पण मग माझी शाळा? वैभववाडीचं घर?"
"मामा घालेल तुला शाळेत. वैभववाडीच्या घरातलं सामान आणावं लागेल. पण ते पुढचं पुढे. बघू त्याचं काय आणि कसं करायचं ते."
"तू चल ना मामाकडे."
"नको, तू जा. सुट्टीत येशील तेव्हा भेटू. नाहीतर मी कधीतरी येईन भेटायला. पत्र मात्र टाकत जा दर आठवड्याला."  वैभववाडी सोडायचं दु:ख विसरुन कितीतरी वेळ  आईने घोलवडला यावं म्हणून त्याने हट्ट धरला. मामाच्या आग्रहाला सुद्धा ती बळी पडली नाही. आता आज इतका कालावधी गेल्यावर त्याला कळत होतं तिला मामावर दोघाचं ओझं लादायचं नव्हतं. त्यासाठी तिचा अट्टाहास होता तो. तेव्हा मात्र तो तिच्यावर रागावून बसला होता.

मामा, मामी, अरुणा आणि सीमाबरोबर तो घोलवडला आला. हातात एक कापडी पिशवी. बांद्याहून तो थेट इथे आला होता. बांदा ते मुंबई एस टी ने, नंतर रेल्वे. पुस्तकं, वह्या सगळं वैभववाडीलाच राहिलं होतं. प्रवासभर त्याचे मित्र आता कसे भेटणार, त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा याच चिंतेने त्याला घेरलं होतं. आईने दर आठवड्याला पत्र पाठवायचं कबूल करुन घेतलं होतं. तसं मित्रांना पाठवायचं? पण पत्ता? खूप विचार करुन आईच्या पत्रात मित्रांना पत्र लिहायचं त्याने मनात पक्क केलं. आई जाईल वैभववाडीला तेव्हा देईल त्यांना हे ठरवलं आणि त्याचं मन उल्हासित झालं.  घोलवडला पुस्तकं, वह्या, दप्तर, कपडे...मामा सगळं घेऊन देणार होता. आईने बजावलं होतं, मामा, मामीला धरुन रहा. त्याचं ऐक. सीमा, अरुणाशी गोडीने वाग.  मनातल्या मनात त्याची उजळणी  करत बर्‍याचवेळाने त्या रात्री कधीतरी तो झोपला.
पुढचा आठवडा चांगला गेला. मामाने शाळेची तयारी करुन दिली. मामी त्याला विचारुन विचारुन त्याच्या आवडीच्या गोष्टी करत होती. अरुणा, सीमाने त्याच्या शेजारपाजारच्या मुलांशी ओळखी करुन दिल्या. सुट्टी असल्याने दिवसभर बाहेर उंडारण्यात जायचा. सकाळ झाली की तिघं सुटायचेच. सायकल दामटव, लगोरी, विटी दांडू असले खेळ नाहीतर गप्पांचा अड्डा. दुपारी जेवणापुरतं घरात. हातावर पाणी पडलं की पुन्हा बाहेर. संध्याकाळी घरात आलं की हात पाय धुऊन परवचा म्हणायची आणि जेवायला बसायचं. दिवस कसा संपे तेही कळत नव्हतं. पण रात्री फरशीवर पसरलेल्या गादीवर पडलं की  आई, बाबांच्या आठवणीने जीव कासावीस व्हायचा. मध्यरात्री कधीतरी जाग आली की डोळ्याच्या कडांनी ओघळलेल्या पाण्याने त्याचं त्यालाच तो झोपेत रडत असल्याचं जाणवायचं. उल्हास उठून बसायचा. बाजूलाच झोपलेल्या सगळ्यांकडे नजर टाकून कुणाला कळलं तर नाही ना याची खात्री करुन घ्यायचा. दिवाळीची सुटी संपली आणि शाळेत जायच्या आदल्या रात्री  त्याच्या पोटात गोळा आला.  शाळेच्या पहिल्या दिवशी वैभववाडीला दरवर्षी आई, बाबा बरोबर यायचे. इथे मामा येईल शाळेत बरोबर? निदान सीमा, अरुणा?

धडधडत्या अंतःकरणाने लवकर उठून तयार होऊन शाळेत जाण्यासाठी तो सीमा, अरुणाच्या बाजूला उभा राहिला. नवीन दप्तर, चप्पल. खूश होता तो अगदी. मामा, मामी येतील बरोबर शाळेत असं वाटत होतं तेवढ्यात मामाने  दोघींना उल्हासला शाळेत सोबत करा, वर्ग दाखवा त्याचा  म्हणून सांगितलं.  दोघींनी अनपेक्षितपणे ठाम नकार दिला. दात ओठ खात तो दोघींकडे पहात राहिला.  आल्यापासून इतके दिवस तर चांगल्या वागत होत्या. आता का हा आडमुठेपणा? दोघींशी बोलायचं नाही असं मनाशी ठरवून टाकलं त्याने. मामाचा हात घट्ट धरुन तो शाळेसाठी बाहेर पडला.  घरी खेळतात नीट पण शाळेत एकत्र जायचं नाही.  ठीक आहे. रागारागाने सीमा, अरुणाशी शाळेत ओळख दाखवणंसुद्धा त्याने बंद करुन टाकलं ते  एक दिवस गावडेबाईंनी मामाला बोलवू का विचारेपर्यंत.  त्या दिवशी बाई  काय शिकवत होत्या तेच कळत नव्हतं. काही केल्या लक्षच लागत नव्हतं. बाबांची आठवण येत होती. आईशी बोलावंसं वाटत होतं. बाकड्यावर मान टेकवून तो अश्रू दडवत होता. गावडेबाईंचा आवाज कानावर पडत होता पण शब्द मनापर्यंत पोचत नव्हते.
"उल्हास काय झालं?" त्याच्या पाठीवर थोपटत गावडेबाईंनी विचारलं तेव्हा गडबडून त्याने मान वर केली.
"अं? काही नाही."
"काही नाही कसं.  रडतो आहेस त्याला काहीतरी कारण असणार ना?" तो काहीच न बोलता डोळे पुसत राहिला. शेवटी गावडेबाईंनी सीमाला बोलवून घेतलं. तिच्या हातात चिठ्ठी दिली. काय लिहिलं असेल बाईंनी याचाच विचार उल्हास शाळा सुटेपर्यंत करत राहिला.

तीच सुरुवात असेल उल्हासची बाबांच्या मागे मागे करण्याच्या सुरुवातीची?  त्याला शाळेत घेऊन जायला नकार दिला तेव्हापासून तर तो शाळेत ओळखही दाखवायचा नाही. नंतर ते चिठ्ठीचं. कंपासपेटी लपवून ठेवल्यानंतरच गावडे बाईंनी चिठ्ठी का दिली ते कळलं होतं.  तिथून झालं असेल हे सुरु?  सीमा मनातल्या मनात माझा वाईट काळ होता तो... या उल्हासच्या वाक्याचा प्रत्येक प्रसंगाशी संबंध लावून ताडून पहात होती. कदाचित शाळेत जमलं नसेल त्याचं, सहामाही परीक्षेनंतर आला होता तो घोलवडला त्यामुळे  वर्गातही  पटकन रुळणं जमलं नसावं, नाहीतर घरी  त्याच्या मनालाच जपण्याचा प्रयत्न चालू होता आई, बाबांचा. तिच्या डोळ्यासमोरुन एक प्रसंग सरकून गेला. छान गप्पा रंगल्या होत्या. सगळे चहाचे घोट रिचवत इकडचं तिकडचं बोलत होते.  अरुणाने खुर्ची आत सरकवली आणि आपला चहाचा कप उचलला. सीमानेही तेच केलं. इतक्यात उल्हासला शेजारच्या घरातून कुणीतरी हाक मारली तशी तो पटकन उठून गेलाच.
"उल्हास" सीमाच्या आवाजाने तो थबकला.
"तुझा कप उचल ना आणि धुऊन पण ठेव. तू तसाच का ठेवतोस?" उल्हास काही न बोलता मागे वळला. आपली कपबशी उचलून धुऊन ठेवून तो बाहेर गेला.
"अगं, धुतला असतास त्याचाही कप तर काय झालं असतं?" आईने तिच्याकडे पहात म्हटलं.
"का? मी का धुवायचा? रोज तसाच टाकून उठतो तो. आम्हाला देता का असं करु?"
"नवीन आहे तो या घरात." बाबांनी तिला समजावयाचा प्रयत्न केला तेवढ्यात अरुणा तणतणली.
"किती दिवस राहणार तो नवीन? आता आपल्याकडेच राहणार आहे तर त्याला पण सांगा आपली कामं आपणच करायची म्हणून." अरुणाच्या बोलण्यावर बाबांनी नुसतीच मान डोलवली. पण ठिणगी पडली होती. उल्हास इथे आल्यापासून सगळं घरदार त्याच्याच मागे असं वाटायला लागलं होतं दोघींना. त्याला हे घर परकं वाटू नये याचा आटोकाट प्रयत्न करत होते आई, बाबा आणि तो मात्र तिर्‍हाईतासारखा वावरणार सतत. आपलं झालं की झालं असं वागणार. त्याच्या वागण्याचा त्यांच्यापरीने निषेध करायचे मार्ग त्या दोघी शोधत होत्या. सुरुवातीला व्यवस्थित वागणार्‍या दोघींचं वागणं अचानक बदललंच. उल्हासला शाळेत घेऊन जायला नकार दिल्यानंतर तर सतत काही ना काही चालूच झालं. कोणत्या ना कोणत्या कारणाने तिघांमध्ये सतत धुसफुस चालू असे. एकमेकांना त्रास देण्याची एकही संधी कुणीच वाया घालवत नव्हतं. आई, बाबा पोरखेळ म्हणून दुर्लक्ष करत होते.  पण त्याचा इतका गंभीर परिणाम झाला उल्हासवर? वाईट काळ वाटावं असा? मामा, मामीने कौतुकाने, प्रेमाने केलं तेही नगण्य ठरावं इतका? म्हटलं तर हे प्रसंग साधे, कुणाच्याही घरी सख्ख्या भावंडांमध्येही घडू शकणारे. मग काय चुकलं? कुणाचं?

हातात फोन तसाच धरुन उल्हासही तसाच उभा होता. त्याच्या डोळ्यासमोरुनही तेच प्रसंग चलतचित्रासारखे सरकत होते. मामा शाळेत आले तरी सीमा, अरुणाने त्याला त्यांच्या बरोबर येऊ दिलं नाही त्यामुळे संतापलाच होता तो त्यादिवशी. वाटोळ्ळं केलं होतं त्या दिवशीच्या त्याच्या आनंदाचं त्यांनी. सूड म्हणून बोलणंच बंद केलं त्याने दोघींशी.  काही दिवसांनी त्याचा राग निवळला पण  त्या सांगतील त्या विरुद्ध करायचं, भांडण उकरून काढायचं ह्याची त्याला गंमत वाटायला लागली. वेळही छान जायचा. विचार करायला सवडच रहायची नाही. सहा महिने असंच चालू होतं.  मे महिन्याच्या सुट्टीत आई आली आणि सगळं बदललं. काय करु नी काय नको असं होऊन गेलं होतं त्याला. मामा, मामी, आई सगळ्यांकडून कौतुकच चालू होतं त्यामुळे सीमा, अरुणाचा त्रासही त्याला तितकासा जाणवत नव्हता. किती भराभर दिवस संपले ते. एक महिना राहिली ती. परत जायच्या आदल्या दिवशी मागच्या अंगणात उभी होती झाडापाशी. एकटीच, विचारात हरवलेली.
"इथे का उभी आहेस?" तोही तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"विचार करते आहे."
"कसला?"
"असाच रे. आपलं भविष्य काय याचा."
"म्हणजे?"
"अरे, आता काही तू इतकाही लहान नाहीस की परिस्थितीची जाणीवच नसावी."
"स्पष्ट सांग ना. मला कळलं नाही तू काय म्हणते आहेस ते." उल्हास गोंधळला.
"अरे, कसा वागतोस सीमा, अरुणाशी. दोघी तुझ्या वयाच्या आहेत. पण आपल्या आणि त्यांच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचं अंतर पडलं आहे आता. पड खाऊन वागायला कधी जमणार तुला? मुलांची भांडणं म्हणून मामा, मामी दुर्लक्ष करतात. पण अती झालं तर पाठवून देतील तुला बांद्याला."
"त्या दोघी भांडकुदळ आहेत. मला काहीही मिळालेलं चालत नाही त्यांना. पेन्सिली मोडून टाकतात, माझी पुस्तकं लपवून ठेवतात."
"आणि तू नाही त्यांना त्रास देत? मुद्दाम जोरजोरात कर्कश्य स्वरात गाणी म्हणायची. खेळताना ढकलून द्यायचं. त्यांनी काही विचारलं की उत्तरच द्यायचं नाही. पहाते आहे मी महिनाभर काय चालू आहे ते."
"आई, मी येतो बांद्याला तुझ्याबरोबर. मला नाही रहायचं इथे."
"अरे एकदम काय हे?"
"तुझी आणि बाबांची खूप आठवण येते गं. मी येतो ना तुझ्याबरोबर."
"म्हणून असा वागतोस दोघींशी? किती बदलला आहेस रे तू. पूर्वीचा खेळकर उल्हास मला शोधूनही सापडत नाहीये तुझ्यात. बाबा गेले त्यामुळे इतका बदललास की घर सोडून रहावं लागतं आहे म्हणून?"
"मला नाही ठाऊक. पण मला आता इथे रहायचंच नाही. मी तुझ्याबरोबर येतो ना बांद्याला."
"काय रे हे तुझं? तिकडून येताना तू घोलवडला चल म्हणून मागे लागला होतास. आता मी बांद्याला येतो म्हणून. सारखा काहीतरी हट्ट चालूच. लहान का आहेस तू असं हटून बसायला."
"तेच तेच नको गं सांगू. मी येऊ का तुझ्याबरोबर ते सांग आधी."
"थोडं बस्तान बसू दे रे बाबा माझं आधी. सुखासुखी नाही ठेवलेलं मी तुला इतकं दूर माझ्यापासून. आजी, आजोबांनी निवांत दिवस घालवायचे तर माझी जबाबदारी आली आहे त्यांच्यावर. आता इथे मुलात मूल म्हणून होऊन जातं आहे तुझं. कळ काढ काही दिवस. मामा, मामी प्रेमाने करता आहेत तर त्रास नको देऊ त्यांना. सीमा, अरुणाशी पडतं घे बाबा. शेवटी दुसर्‍याकडे रहातो आहेस हे विसरुन नाही चालणार. बांदा छोटं गाव आहे पण आजोबा मला कुठे  काम मिळेल का ते बघतायत. तसं झालं तर लगेच घेऊन जाईन मी तुला."

आईच्या त्या एका भेटीने उल्हास अकाली प्रौढ झाला. त्याचं वागणं बदललं. तो अधिकाअधिक घुमा होत गेला. प्रत्येकाशीच फटकून वागायला लागला. चांगलं वागायचं या विचाराचं मनावर सतत दडपण यायला लागलं तसा सीमा, अरुणाच्या वार्‍यालाही  फिरकेनासा झाला. दर आठवड्याला आईला लिहिलेल्या पत्रात तिच्या नोकरीबद्दल तिला विचारत राहिला. त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. कसाबसा शाळेचा अभ्यास उरकायचा आणि निरुद्देश भटकत रहायचं. निष्काळजी, बेफिकीर होत गेला.  आपलं झालं की झालं ही वृत्ती बळावली.  येऊन जाऊन  सारखी आईला पत्र लिहायची. नोकरी शोध म्हणून मागे लागायचं. पत्रातलं अक्षर न अक्षर त्याला आठवलं आणि क्षणभर स्वत:ची शरम वाटली. जेमतेम दहावी पास झालेल्या आईला कुठे नोकरी मिळणार होती? आईच्या मनावरचा ताण वाढवायलाच कारणीभूत झाला होता तो. आईची सातत्याने एकाच प्रकारचा मजकूर असलेली पत्रही त्याला पाठ झाली होती.
प्रिय उल्हास,
माझा दिनक्रम व्यवस्थित चालू आहे. तू स्वत:ची काळजी घे. मामा, मामींना त्रास देऊ नकोस. सीमा, अरुणाशी भांडू नकोस. आता तीच सगळी तुझा आधार आहेत. आणि मामा, मामी किती प्रेमाने करतात ते पाहिलं आहे मी. अरुणा, सीमाशी भांडून तू त्यांचा त्रास वाढवू नकोस. तू प्रत्येक पत्रात माझ्या नोकरीची आठवण करुन देतोस, तुला बांद्याला यायचं आहे असं लिहितोस. मला कळत का नाही? तुझ्यापासून लांब रहाणं मलाही नको वाटतं पण दैवाने आपल्यावर परिस्थितीच अशी लादली आहे की यातून मार्ग कसा काढायचा या विचाराने रात्र रात्र झोप लागत नाही. अरे, माझं शिक्षण ते किती. कोण देणार बाबा मला नोकरी? पण तुझे आजोबा बोलले आहेत एक दोघांशी. हिशोबाचं काम मिळेल असं वाटतं आहे. ते जमलं तर ये तू इकडे. काय चार घास खायचे ते खाऊ  एकत्र. तुझं सगळं मार्गी लागलं की झालं - तुझी आई."

अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आणि शिक्षणासाठीच तर मामानं ठेवलं होतं. मग परत जायचं बांद्याला की अभ्यास करुन हुशारी दाखवायची? स्वत:ला सिद्ध करायचं? पण अभ्यासात लक्ष घालून करायचं काय? कुणी डॉक्टर, इंजिनिअर करणार नव्हतं. कुणाला परवडणार तो खर्च? मग फुकटचा डोक्याला ताप कशाला  अभ्यासाचा? उल्हासचं वागणं  बेतालपणाकडे झुकायला लागलं.  मामी बहुधा मामाच्या कानावर घालत असावी त्याचं वागणं, बोलणं, तास न तास घराबाहेर रहाणं. अधूनमधून मामा उपदेशपर बोलायचा. एका कानातून ऐकायचं आणि दुसर्‍या कानांनी सोडून द्यायचं हे तंत्र त्याने वापरलं ते आईचं पत्र येईपर्यंत.

उल्हास,
आनंदाची बातमी कळवायला पत्र लिहिते आहे. मला छोटीशी नोकरी मिळाली आहे. आपण आजी आजोबांकडे राहू त्यामुळे तो खर्च नाही. बाकी तुझी पुस्तकं, गणवेश सारं काही माझ्या पगारात भागेल. मदतीला तुझे दोन्ही मामा आहेतच. आता मुद्दयाचं लिहिते.  काय चालू आहे तुझं? का असं वागतो आहेस? बाबा गेले हे दु:ख आता कायमचंच पण म्हणून तुझं उभं आयुष्य असं झाकोळून गेलेलं बाबांनी पाहिलं तर त्यांना तरी आवडेल का हा विचार कर. तू काही परक्याच्या घरी नाहीस किंवा तुला कुणी त्रास देतं आहे असंही नाही. कुठून कुठे पोचलास तू. हरहुन्नरी, खेळांमध्ये अट्टल, अभ्यासात प्रवीण म्हणून वैभववाडीला ओळखायचे सारे तुला. मामा कंटाळतो रे तुझ्या वागण्याला. फार झालं तेव्हा पत्र पाठवलं आहे त्याने. अभ्यास करत नाहीस. जेमतेम पास होतोस. दिवसच्या दिवस बाहेर उंडारत असतोस. भविष्यकाळाच्या भयाण चित्राने छाती दडपते  माझी. तू लवकरात लवकर पोटापाण्याला लागावंस हेच आहे डोक्यात पण त्यासाठी शिक्षण नको का? लहान वयात तुझ्यावर जबाबदारीचं ओझं पडणार आहे. पण आयुष्य असंच असतं. घरातला कर्ता पुरुष गेला ना अकाली की मुलांवर भार पडतो मोठं होण्याचा. इलाज नाही. त्यातून कसं सावरायचं ते पहायला हवं ना? पण तुझं बघावं तर  काही तरी तिसरंच. वार्षिक परीक्षा झाली की मामा तुला बांद्याला सोडतो आहे. रागावून नाही. काळजीने. त्याला वाटतं आहे मी जवळ असले तर तू जबाबदारीने वागशील. समजुतीने घे. - तुझी आई.
मामाचा राग आला तरी बांद्याला आईजवळ रहाता येणार या कल्पनेने सुखावला उल्हास. उरलेले दिवस, महिने फार काही न घडता पार पडले आणि उल्हास  बांद्याला आला. घोलवडचं दीड वर्ष पहाता पहाता मागे पडलं. चूक कुणाची होती? परिस्थितीची? अजाणत्या वयाची? सीमा, अरुणाची?  मामा, मामीची? आईची की परिस्थितीमुळे बदलत गेलेल्या, काहीवेळा फुकट गेला म्हणण्याइतपत पातळी गाठलेल्या, आक्रमक झालेल्या स्वत:चीच? उल्हास विचार करत राहिला. पण काही झालं तरी सीमाला अशा शब्दात नको होतं जाणवून द्यायला घोलवडच्या दिवसांबद्दल. त्याचं त्यालाच हे जाणवलं आणि त्याने सीमाचा नंबर फिरवला.

तसा दिड वर्षच होता उल्हास घोलवडला. पण त्या दिड वर्षात उल्हासच्या वागण्याच्या किती वेगवेगळ्या तर्‍हा अनुभवल्या. सीमा अजूनही वर्षावर्षांचे हिशोब मांडत होती. कुणाचं आणि काय चुकलं हे कोडं सोडविण्याचा चंगच बांधला होता तिच्या मनाने. उल्हास आल्या आल्या त्याच्याबद्दल वाटणार्‍या कुतूहलाचं रुपांतर द्वेषात व्हायला त्याला मिळणार्‍या सोयी सवलतींमुळे फार वेळ लागला नाही.  सुरुवातीला एकमेकांशी जमवून घेणारी, मैत्रीच्या दिशेने  आपसूकच वळलेली पावलं कधी तिरकी पडायला लागली हे समजलंच नाही. एकमेकांना त्रास देणं हे एकच ध्येय होऊन गेलं मग तिघांचं काही काळ.  कितीतरी वेळा आई, बाबा भांडणं सोडवून कंटाळायचे. तिघांनाही उपदेशाचे डोस पाजायचे. आत्या येऊन गेल्यावर  मात्र उल्हासचं वागणं एकदम बदललंच. पण तो बदलही सुखावह नव्हताच. घरातलाच असूनही तो तिर्‍हाईत झाला.  विचित्र दुरावा आला त्याच्या वागण्याबोलण्यात. उल्हासच्या वागण्याने आई, बाबा किती कंटाळले होते तरी समजुतीने घ्यायचा प्रयत्न करत होते ते सीमा, अरुणाला दिसत होतं, उल्हासशी बोलून ते त्याला दाखवून द्यावं  असं दोघींना वाटत होतं. पण तो  दोघींच्या आसपास फिरकतच नव्हता फारसा. त्याच्याशी निवांतपणे बोलण्याची संधी मिळेपर्यत उल्हास जसा टोळधाडीसारखा  अचानक त्यांच्या आयुष्यात आला तसा गेलाही.  पार बांद्याला पोचला. मग अधूनमधून होणार्‍या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या भेटी. तेव्हा सगळीच भावंडं असायची. धम्माल करायची. दोघी घोलवडच्या त्याच्याबरोबरच्या दिवसांबद्दल आठवणी काढायच्या, भांडणाबद्दल बोलायच्या. ते वयंच तसं होतं. सगळेच अजाण होतो असं म्हणत तो दोघींच्या सुरात सूर मिसळायचा.

पहाता पहाता वर्ष लोटली. उल्हासने शिक्षण सोडलंच बारावीनंतर.  अल्प मुदतीचे तांत्रिक अभ्यासक्रम करत तो मोठा झाला. कुणाकुणाकडे छोटी मोठी कामं करत राहिला. जीवनाच्या शाळेत घडत गेला. एकेक अनुभव घेत पैसे आणि अनुभवाची पुंजी गाठीशी बांधून बांद्यामध्येच त्याने यंत्र दुरुस्तीचं दुकान काढलं. कोणतंही यंत्र दुरुस्त करण्यात त्याचा हात धरणारं अख्ख्या पंचक्रोशीत कुणी नाही असं आत्या कौतुकाने सांगायला लागली. आई, बाबांना उल्हास मार्गी लागल्याचा किती आनंद झाला होता.  बांद्याला अजूनही जात होतेच सगळे सुटीत. बांद्यातच उल्हासनेही स्वतंत्र घर घेतलं होतं. मामा, मामी बांद्याला आले की येऊन भेटून जायचा. पण माझ्या घरी या असं काही तोंडून निघायचं नाही. आत्याला फार वाईट वाटायचं. ती सुद्धा सुरुवातीला उल्हास बरोबर रहात होती. त्याचं लग्न झाल्यावर अपुरी जागा, आजी, आजोबांबरोबर कुणी हवं म्हणून पुन्हा ती आजोबांकडेच रहायला आली. खरं कारण काय होतं ते तिचं तिच जाणे. आल्या गेल्याचं कौतुकाने करण्याच्या बाबतीत तिचा हात कुणी धरु शकत नव्हतं. आणि तिचाच मुलगा असलेल्या उल्हासला मामा, मामी बांद्याला आल्यावर साधं घरी बोलावणंही जड जात होतं. उल्हास भेटायला आला की आईच स्वयंपाकघरात शिरुन त्याच्या आवडीचे पदार्थ करणार. उल्हास तिच्या मागे जाऊन मामी, मामी म्हणत स्वयंपाकघरात गप्पा मारणार याचं आई, बाबांना कोण कौतुक.  सीमा, अरुणाला मात्र याची प्रचंड चीड येई.  वय झालेल्या मामा, मामीसाठी आता त्याने काही करायचं की त्याचेच लाड अजूनही आई बाबांनी पुरवायचे?

आणि आज त्याने म्हणावं, घोलवडचे दिवस हा माझा वाईट काळ होता.... बोलायला हवं मोकळेपणाने त्याच्याशी. विचारायला हवं, सांगायला हवं आपल्याला काय वाटत होतं, वाटतं. काय चुकत गेलं दोघींचं. काही गोष्टीत तो चुकला होता, चुकतो आहेच अजूनही. तो काळच असा होता की आडनिडी वयं आणि अवघड परिस्थिती सांगड घालून एकत्र उभ्या होत्या. प्रत्येक गोष्टीचा परिणाम जसा त्याच्यावर होत होता तसं त्याच्या परिस्थितीशी जुळवून  घेणं आमच्यावरही होतंच की.  जवळ असूनही अंतर वाढत गेलं मनातलं.  सुरुवातीला हक्काने घोलवडला स्वत:चं घर समजणार्‍या उल्हासने नंतर त्याचा तिर्‍हाईतपणा कायमचाच जपला पण का ते कधीच कळलं नव्हतं. आणि आज अचानक ते असं पोचलं होतं. त्याच्या मनातलं बाहेर आलं. समज, गैरसमज बोललं तरच दूर होतील. खरंच त्याच्या अशा बोलण्यावर रागावून उत्तर नाही सापडणार. शांतपणे बोलायचा प्रयत्न करायला हवा, नाही जमलं ते तर कधीतरी सोक्षमोक्ष लावायलाच हवा. या कारणाने एक घाव दोन तुकडे झाले तरी चालतील पण बोलून मोकळं व्हायला हवं.  सीमाने फोन उचलला पण हातात तसाच धरुन ठेवून ती बसून राहिली.  विचारात हरवली. तितक्यात फोन वाजला. कंटाळल्यासारखा तिने कुणाचा आहे ते पाहिलं आणि चेहर्‍यावर स्मितहास्य उमटलं सीमाच्या.
"उल्हास! अरे, बोल.  मी तुला फोन करायच्याच विचारात होते....."  आता कुठे त्या दोघांमध्ये खरा संवाद  सुरु होत होता. समज गैरसमजाचे पडदे  विरळ व्हावेत,  मनं स्वच्छ व्हावीत आणि उल्हासचं वेगळं रुप आत्या, आई, बाबांना या बोलण्यानंतर दिसावं अशी मनोमन प्रार्थना करतच ती उल्हासशी बोलायला लागली.

Thursday, December 11, 2014

प्रश्न

एकदा एका आईला वाटलं
आपण जे अनुभवलं नाही ते 
मुलांना मिळावं
मोकळेपणाने त्यांनी आयुष्य उपभोगावं!

मुलाचा चेहरा उजळला
देहभर ट्यॅट्यु ची नक्षी तो ल्याला
दारुचे ग्लास  रिचवत राहिला
नाईट लाइफच्या धुंदी चा कैफ
शरीरात मुरला 
स्वातंत्र्याचा स्वैराचार हवेत उधळला!

एके दिवशी मुलगा घेऊन आला एका मुलीला
म्हणाला,
कळत नाही लिव्ह इन रिलेशनशिप की लग्न
पण ठरवायला हवं हिच्या गर्भातल्या जीवाचं भवितव्य
माता वदली,
तुला जे वाटेल तेच योग्यं
मी काही बोलणं म्हणजे माझ्याच नियमाचा भंग!

बहिणीने भावाचा कित्ता गिरवला
बाळाच्या आगमनाचा सुगावा लागला
माता वदली,
चल, तुझ्या बॉयफ्रेंडच्या घरी जाऊ
बॉयफ्रेंड आला दारात, बाजूला त्याची आई!
तुझ्या घरच्यासारखं वातावरण आमच्याकडे नाही
लग्नाच्या आधी पोरंबाळं आम्ही होऊ देत नाही.
मुलगी भडकली, आईला म्हणाली,
कुमारी माता होऊ की गर्भपात करु?
माता थबकली, चिंतेत बुडाली
नियमाचा भंग करु  की तुला वाटेल तेच योग्यं म्हणू...?

Wednesday, December 3, 2014

मंडळोमंडळी

राधाने पलंगाच्या बाजूला ठेवलेली डायरी उघडली.
... दिवाळीच्या कार्यक्रमात मी छान गाणं म्हटलं.  ते गाणं आईने आल्याआल्या टी.व्ही. वर लावलंही. आम्ही सगळेच उत्साहाने पहायला, ऐकायला लागलो. पण माझं गाणं ऐकूच येत नव्हतं. आजूबाजूच्या गोंधळाचा, इतरांचा आवाज माझ्या आवाजाहून मोठा होता. माझं गाणं कुणी ऐकलंच नाही म्हणायचं तर. आई चिडली. म्हणाली, फक्त स्वत:च्या  मुलांचे कार्यक्रम पहातात लोकं. ते झालं की झालं गप्पाष्टक सुरू. पण इतरांचे कार्यक्रम चालू असतात तेव्हा ती पण गप्पा मारत असतेच की बाजूला बसलेल्या मावशीशी. मी तिला तसं म्हटलं तर आणखी चिडली. ते वेगळं असं काहीतरी पुटपटली. पण मग मी कशाला म्हटलं तिथे जाऊन गाणं? मला तर बाकीची मुलं पूर्ण वेळ  दंगा करत होती त्यांच्याबरोबर खेळायला आवडलं असतं. बाबा आणि आईच गाणं ऐकणार असतील तर त्या साठी देवळाच्या रंगमंचावर कशाला जायला हवं? घरी रोज  जवळ जवळ १ महिना गाणं म्हणण्याचा सराव आई करून घेतंच होती की.

दिवाळीच्या कार्यक्रमाबद्दल  काय वाटलं ते राधाने चार वाक्यात तिच्या वहीत बंदिस्त केलं आणि क्षणात ती झोपलीही.

*************************
नरेनने घरी आल्या आल्या भारतात फोन केला. तिथल्या नाटकवेड्या मित्रमंडळीपैंकी कुणाशीतरी कार्यक्रमानंतर बोलणं हा त्याचा आवडता छंद. शाळेपासून एकत्र अभिनय केलेली त्याची मित्रमंडळी त्याच क्षेत्रात कार्यरत होती. त्याच्यांशी बोललं की मन शांत व्हायचं नरेनचं. आत्ताही मनातली मळमळ बाहेर पडली. "अरे, चाळीस मिनिटांचा कार्यक्रम केला आज दिवाळीच्या कार्यक्रमात. मजा नाही रे येत तिकडच्यासारखी. इथले कार्यक्रम म्हणजे सगळा हौसेचा मामला. आमच्याच कार्यक्रमाचं ऐक, आवाज, आवाज असं लोकांनी म्हटलं की आम्ही कलाकारांनी आवाज चढवायचे. थोडावेळ सगळं सुरळीत, मग पुन्हा तेच. कार्यक्रम चालू असतानाच वैताग यायला लागला होता. सगळ्यांनी सरावासाठी काढलेला वेळच डोळ्यासमोर येत होता. कार्यक्रम धड ऐकूच जाणार नसेल तर कशाला करायचा? तरी रेटत नेला शेवटपर्यंत आम्ही सर्वांनी. पण त्यातली मजा गेली ती गेलीच. मुळात कार्यक्रमात खरा रस असणारी मंडळी मूठभर. ती बसतात पुढच्या काही रागांमध्ये. उरलेल्यांचा कल स्नेहसंमेलनाला आल्यासारखा. रंगमंचार काय चालू आहे यात रस नसतोच त्यांना. आमच्या कलाकारांनी नंतर मंडळाच्या कार्यकारिणीला घेरलंच. आगपाखड केली. वर्षानुवर्ष हेच चालू आहे. माहीत आहे ना नीट ऐकू येण्याचा प्रश्न येतो दरवेळेस. मग दुसरीकडे का नाही करत? मंडळ आणि देऊळ हेच समीकरण का? नाहीतर आधीच जाहीर करा ना फक्त ध्वनिमुद्रित कार्यक्रमच करा म्हणून. करा फक्त नाच गाण्यांचा कार्यक्रम. आणि तसाही कुणाला काय फरक पडतोय? पहातं कोण नी ऐकतं कोण अशी परिस्थिती. उगाच वेळ फुकट गेला. डोक्याला ताप नुसता. आता पुन्हा पुन्हा तेच सांगू नका,  बाहेर कार्यक्रम करा म्हटलं तर पैशाचा प्रश्न येतो म्हणे. अरे, सभासदांकडून घेता ना तो पैसा वापरा की. करायचा कार्यक्रम तर दर्जेदार करायला नको का? नाहीतर मग जेवण आणि गप्पा असंच ठेवा ना कार्यक्रमाचं स्वरूप. हे आणि अशा प्रकारचं सगळं एकेक करून प्रत्येकजण बोलत होता.  कार्यकारिणीतली माणसं मुकाट ऐकत होती. मला तर वाटलं, कार्यक्रमाला आलेल्या लोकांना अख्ख्या दिवाळीच्या कार्यक्रमात हाच कार्यक्रम अधिक आवडला असेल. सगळी जमली होती ऐकायला." नरेनच्या डोळ्यासमोर फोन ठेवल्यावरही दिवाळीची फटफजिती आणि मंडळाच्या कार्यकारिणीबरोबरची बोलाचाली चांगलीच नाचत होती.
**************************
तबला करून टाकतात लोकं मंडळाच्या कार्यकारिणीवर असलं की. वर्षानुवर्ष आवाज पोचत नाही ही अडचण आहेच. ती सोडवायचा प्रयत्नही करतोय आम्ही. आमच्यापरीने मार्ग काढतो पण येऊन जाऊन पब्लिक झापणार आम्हालाच. कौतुकाचे शब्द नाहीतच. तो साला नरेन पारगावकर आणि त्याचे ते सगळे कलाकार वचावचा ओरडत होते. असं रंगमंचावर ओरडला असतात ना तर तुमचा कार्यक्रम छान ऐकू गेला असता असं सांगायला हवं होतं. पण जाऊ दे. तुम्ही कामं करताय ना मग ऐकाही मुकाट तुम्हीच.  आणि बाहेर करा म्हणे कार्यक्रम. देऊळच कशाला हवं दरवेळेस? एकामागून एक प्रश्न नुसते. प्रश्न सरळ असले तरी उत्तरं अवघड आहेत.  थांब पुढच्या वेळेला तुलाच भाग पाडतो कार्यकारिणीवर यायला मग करा पाहिजे ते. तेव्हा कळेल कशा लोकांच्या मागण्या, दबाब असतो ते. राजकारणच असतं इथेही हे काय माहीत नाही का लेको तुम्हाला? कार्यकारिणीवर नसणार्‍या लोकांच्या मतांचा कसा प्रभाव असतो ते समजायला चालवाच तुम्ही मंडळ पुढच्यावेळेला.  आपलेच दात आपलेच ओठ याची प्रचिती आली की बसाल गप्प. आणि सगळं उच्च दर्जाचं पाहिजे ना, मग मंडळाला पैसे देताना कुरकूर का करता? वर्षाचे पैसे वाढवले  तरी बोंबलणार तुम्ही लोकं.  तोंडाची वाफ झाली दवडून सगळ्यांसमोर. अख्ख्या मंडळाला एक चर्चेचा विषय दिलात बरं पारगावकर तुम्ही. आता पुढचे दोन तीन महिने हा विषय सगळ्यांकडच्या मेजवान्यांना तोंडी लावणं म्हणून पुरणार.... चांगलं केलंत हो, दिवाळी सार्थकी लावलीत.... मनातले विचार कृतीत उतरवल्यागत शेवटची खुर्ची दाणकन भितींशी आपटून केशव देवळाच्या बाहेर पडला.
**************************
नाना सरवटे, मंडळाचे नाना आजोबा संथपणे बाहेर पडले. मनात पाहिलेल्या कार्यक्रमाची उजळणी नाही म्हटलं तरी चालू होतीच. नेमेची येतो....सारखा यावेळचाही दिवाळीचा कार्यक्रम.   मुलांचा किलबिलाट, मोठ्यांचं हसणं, खिदळणं, गप्पा. पण मजा राहिली नाही आता. म्हणजे कार्यक्रमापासूनच सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे सुरुवात व्हायलाच उशीर. लोकांची वाट पहात वेळेवर आलेल्यांवर अन्याय करतात हे कसं समजत नाही?  एकदा कार्यक्रम दिलेल्या वेळेवर सुरु होतो हे कळलं की पाळतील वेळा पुढच्या वेळेस. पण लक्षात कोण घेतो? आणि मराठी लोकांचा कार्यक्रम म्हटल्यावर सारा कार्यक्रम मराठीतून असेल असं वाटलं होतं. इथे तर मुलांच्या कार्यक्रमांची सुरुवातच हिंदी गाण्याच्या नाचावर झाली. एवढी एवढीशी मुलं कंबरा हलवून नाचतात. विनोदीच वाटत होतं. एकातरी शेंबड्याला त्यातला एखादा तरी शब्द समजत असेल तर शप्पथ. ते होतंय तितक्यात घरच्या देवासमोर म्हणायचं अथर्वशीर्ष रंगमंचावर  येऊन एखादं कार्ट म्हणून दाखवणार. आई, वडिलांची हौस. दुसरं काय? कीर्तन, तमाशा सारं एकाच जागी असं वाटून गेलं क्षणभर. गेली तीस वर्ष गावातच रहाणारे नाना आजोबा गाडीपाशी पोचले. विचारातच त्यांनी  गाडीचं दार ओढलं. आता सवयीने येऊन बसायचं कार्यक्रमांना हेच खरं. ओळखीची जुनी माणसं तर फार फिरकतच नाहीत. तरी कुणी आलं असलं तर म्हणून बसल्या बसल्या ओळखीचा चेहरा धुंडाळायचा. तशी ही नवीन पिढी बरी आहे. मान देतात, विचारपूस करतात. पण ते तितकंच. नवीन ओळखी अशा कुणाशी होत नाहीत. मग बसायचं खुर्चीवर ठिय्या देऊन. पूर्वी कसं, मोजकी कुटुंब, छोटासा कार्यक्रम आणि चहा फराळ झाला की संपली दिवाळी. घरगुतीपणा होता त्यात आणि तोच भावायचा जास्त. आता सगळेजण स्पर्धा असल्यासारखे कार्यक्रम सादर करतात,  तास न तास. जेवणाचा घोळ घालतात. आणि माणसं तर इतकी वाढली आहेत की जत्रा भरल्यासारखी वाटते. नवीन येणार्‍या माणसाचं काही खरं नाही. म्हणजे जत्रेत ओळखी होणार तरी कशा? बसलेली असतात बिचारी हरवललेल्या मुलांसारखी.  पुढच्या वर्षी  फिरकतच नाहीत पुन्हा.  मग आम्ही तयारच मंडळात लोक येत नाही म्हणायला.  आम्ही आपले येतो ते घरी बसून करायचं काय म्हणून. पण घरीच बसावं असं वाटायला लागलं आहे. म्हणजे झालंय काय की  हे संस्कृतीचं वेड अजीर्ण होत चाललं आहे. लादतात नुसते कार्यक्रम एकामागून एक. आणि ही असली अर्धवट संस्कृती किती दिवस उराशी बाळगायची? नीट धरा नाहीतर पूर्णपणे सोडून तरी द्या.... नाना आजोबांनी दिव्यांच्या माळा लावून सजवलेल्या देवळाकडे दृष्टी टाकत गाडी चालू केली. देवळापासून संथ गतीने गाडी दूर दूर जायला लागली पण विचारांचा घोळ कमी न होता नाना आजोबांच्या मनात  सोसाट्याच्या वार्‍यासारखा घोंघावतच राहिला...


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Dec2014.pdf

Tuesday, December 2, 2014

लेकाच्या... ची कथा

फोन घणघणायला लागला. लेकाच्या फोनसाठी आम्ही विशिष्ट आवाज निवडला होता. खरं तर लगेच फोन उचलू म्हणून तसं केलं होतं. पण घरचाच तर आहे, करेल परत असं म्हणून कुणीच आजकाल ढिम्म हलत नव्हतं. आज मात्र मी तातडीने उचलला. घरातली बाकीची Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानत झोपा काढत होती. मला करण्यासारखं काही नसल्याने आलेला फोन तरी वेळेवर उचलावा म्हटलं.
"आई, अग तो मेला, तो मेला, म्हणजे मी मारलं त्याला ठार." चिरंजीव फोनवर आनंदातिशायाने किंचाळत होते. मेला या शब्दाने थिजल्यासारखं होऊन शब्दच फुटेना माझ्या तोंडून.
"आई..."
"अरे, काय केलंस तू? आणि खिदळतोस काय असा?" मी त्याच्यापेक्षा जोरात किंचाळले. तो आनंदाने, मी घाबरुन.
"आधी शांत हो आई, एकदम शांत. आता सांग. मी कोणत्या मोहिमेवर होतो सध्या?" क्षणभर काही आठवेना. म्हणजे, एखादा तास कसा बुडवायचा, सलग १५ तास झोपायचं, आई, बाबांना, शिक्षकांना शेंडी कशी लावायची, फुकट कुठे काय मिळतं त्याचा मागोवा घ्यायचा अशा महाविद्यालयीन मुलांच्या ज्या मोहिमा असतात त्यातलीच एखादी असणार हे नक्की. पण सध्याची कुठली? चुकीचं सांगितलं की एक व्याख्यान. भूमिका बदलल्या होत्या. पूर्वी मुकाटपणे तो आमचं ऐकायचा, आता आम्ही त्याचं.
"अगं उंदीराला पळता भुई थोडी करुन टाकणार नव्हतो का मी?" माझ्या डोक्यात एकदम उंदीर शिरला आणि त्याची Thanks Giving सुट्टीची मोहिम आठवली.

सुट्टीचा पहिला दिवस:
"आई, आज उंदीर दिसला. ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ."
"उंदराला कसला घाबरतोस?" त्याने सोयीस्करपणे विषय बदलला.
"टायलरमुळे झालंय. त्याचीच खोली घाण असते. कुठेही बसून खातो शहाणा. अन्न शोधत येतो मग उंदीर"
"चिरंजीव..." काहीही न बोलता त्याला मला काय म्हणायचं ते कळलं.
"तुझ्या हाताखाली १६ वर्ष राहिलो. काय बिशाद आहे माझी स्वच्छता न ठेवण्याची?" पुढे त्याचं हॅहॅहॅ करुन हसणं.
"चिरंजीव..." पुढचं कळल्यासारखं त्याने पुन्हा विषय थोपवला.
"बरं, बरं ते वेगळं. पण काल स्वयंपाकघराच्या मोरीत सगळं पाणी तुंबलं होतं. मी ते तसंच ठेवलं आणि टायलरला टेक्स्ट केलं. तर तो म्हणायला लागला. तू पालापाचोळा खातोस. पालकचं पान दिसतंय."
"मग?"
"मग काय? मी फक्त पालकचं पान काढलं तिथून. बाकी उरलेलं त्याने स्वच्छ करावं."
"पण तो बाजूच्याच खोलीत होता ना? मग बोलायचं त्याच्याशी."
"हॅ, काहीतरीच काय?"
"नाहीतर बाई किंवा बुवाच का नाही तुम्ही स्वच्छतेसाठी लावत?"
"अगं असं काय म्हणतेयस तू आई॓?" त्याला चांगलाच धक्का बसला.
"रोज एकमेकांना छळण्यापेक्षा ते बरं ना?"
"१६ वर्षात तू काय हे शिकवलं आहेस? आपली कामं आपण करावी असं सांगायचीस तू. आपण कधी बाई लावून घर स्वच्छ नाही केलं. तो घाण करणार आणि बाई मी लावू? काहीहीऽऽऽ."
"अरे..."
"मी नंतर बोलतो."

दिवस दुसरा:
"भारतात असतात का उंदीर?" सध्या उंदीर आमचे दिवस चांगलेच कुरतडत होता.
"असतात की."
"आजोबांकडे होते?"
"हो, दोन चार पाळले होते. मांजरासारखे बसलेले असायचे की."
"आई, तू पण ना. पण आई, आज फक्त मी, उंदीर आणि घर! कल्पनाच चित्तथरारक वाटतेय."
"टायलर?"
"तो गेलाय सुट्टीसाठी. मी शोधून काढलंय तो उंदीर कुठून येत असेल ते.  तो आत येवू नये म्हणून बेकींग सोडा, व्हिनेगरचं मिश्रण एकत्र करुन कापडाचा बोळा भिजवला आणि त्याच्या प्रवेशद्वाराशी खुपसलाय."
"अरे, वासाने मेला तर? कुबट वास येईल."
"नाही तो पळून जाईल. आणि मेला तर कॉलेजला कळवेन. ते करतात व्यवस्था पुढची."

दिवस तिसरा:
"तो मेला, मेला, मी मारला..." इथून पुढे वर लिहिलेलं सारं काही झालं. आता प्रत्यक्ष रणभूमीवर.
"अगं, घरी आलो तर वाट बघत असल्यासारखा दारात होता. याचा अर्थ ते भोक बुजवलं तेव्हा तो आतच होता. त्याला बाहेर पडताच आलं नाही."
"तुझी वाट बघत होता. नमस्कार, चमत्कार झाले की नाही?"
"झाले. मी जोरात किंचाळलो, तो घाबरुन लपून बसला. आम्ही एकमेकांशी असेच बोलतो."
"आला की नाही बाहेर?"
"टायलरच्या टॉवेलखाली लपला. तो पण हुशार. बाहेर आलं की आत्मबलिदान हे ठाऊक होतंच त्याला. १५ मिनिटं आम्ही तसेच एकमेकांच्या समोर. अगदी, मारेन किंवा मरेन असंच ठरवलं होतं मी पण."
"बापरे, पण उंदरानेच तुला मारलं असतं तर?" माझ्या विनोदाकडे, सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो त्याप्रमाणे करत तो म्हणाला.
"आईऽऽ ऐक पुढे. मी हातमोजे चढवले, बुरखा घातला. हातात झाडू होतीच."
"हे सगळं कशासाठी?"
"त्याला मारताना तो अंगावर चाल करुन आला तर? मला त्याचा स्पर्श नको व्हायला ना." उंदराबरोबरच्या लढाईची तयारी जय्यत होती.
"तो टायलरच्या टॉवेलच्या वासानेच अर्धमेला झाला बहुतेक. पडला एकदाचा बाहेर. हाणलं त्याला. पळाला. पुन्हा हाणलं. आणि मेला, मेला एकदाचा. अखेर मारलं मी त्याला." उंदराबरोबरची लढाई चिरंजीव जिंकले होते.
"तो धारातीर्थी पडलेला उंदीर कुठे आहे आता?"
"का? फोटो काढून पाठवू? मग तू फेसबुकवर टाकणार असशील."
"हॅ, काहीतरीच काय?" मी म्हणायचं म्हणून म्हटलं पण कल्पना काही वाईट नव्हती.
"त्याचे अंत्यसंस्कार करणार आहे मी."
"म्हणजे नक्की काय?"
"त्याला टायलरच्या टॉवेलमध्ये गुंडाळणार. पांढरं कापड मिळालंच ना अनायसे. नंतर बाहेर नेऊन कचर्‍याच्या पेटीत त्याला विसावा देणार. त्याचं अंतिम विसाव्याचं स्थान."
"शाब्बास चिरंजीव. असेच पराक्रम गाजवत रहा."
"चल, ३ दिवस झोपलो नव्हतो उंदराच्या भितीने. आता Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि २ दिवसांनी उठतो." चिरंजीवानी फोन ठेवला. सुट्टीतल्या करमणुकीबद्दल मीही चिरंजीवाचे आभार मानले आणि दिनक्रमाला सुरुवात केली.

Tuesday, November 11, 2014

पाश


(मी जवळून अनुभवलेल्या सत्यघटनेवर आधारित कथा . ही कथा मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.)

"पैकं भरून टाका सायबांचं."

दरडावलेला आवाज ऐकून शरद सावध झाला.
"कोण बोलतंय? आणि हळू बोला. ओरडू नका."

"आमदार निवासात वस्तीला व्हता नवं तुजा भाव. त्यो पैका भरून टाक पटकिनी आसं म्हनतोय मी."

"एकेरीवर येऊ नका आणि आधी कोण बोलताय ते सांगा. माझा भाऊ आमदार निवासात राहत नाही."

"राहात व्हऽऽऽता. तुज्याकडं जो आकडा येईल त्यवडा पैका भरून टाकायचा. 'माजा काई संबंद न्हाई' आसं म्हनायचं नाय. कललं? कललं का नाय तुला मी काय बोलून राह्यलो त्ये?"

"हे बघा, मी पोलिसांकडे तक्रार नोंदवतो तुमची. बसा मग खडी फोडत, म्हणजे समजेल."

"तू माला धमकी द्याया लागला व्हय? आँ? मला धमकी देतो काय? गपगुमान सांगितलं त्ये कर. आन् हा, तुज्या पोराबालांना जपून रहाया सांग. नाय म्हंजी कदी कुनाला अपघात व्हायाचा येकादा. आता येल काय सांगून येतीया व्हय?"

शरदनं फोन आपटला आणि संतापानं तो तिथल्या तिथे येरझारा घालत राहिला. काही सुचेना तसं बाजूला पडलेलं वर्तमानपत्र त्यानं पुढ्यात ओढलं. डोळे अक्षरांवरून फिरत होते पण मनात धमकीचे शब्द घुमत होते, दादाबद्दल विचार येत होते. दादानं लावला असेल का कुणाला तरी हा फोन करायला? दादाची इतकी दुर्दशा खरंच कशी झाली आणि कधी? घरातल्याच माणसांना छळून, त्रास देऊन हा काय साध्य करतो आहे?

त्याच्याचमुळं अकाली प्रौढत्व आलं माथी. कायमचं. मोठ्या मुलाच्या ज्या काही जबाबदार्‍या दादानं निभावायच्या त्या येऊन पडल्या अंगावर. काही आपसूक, काही स्वत:हून ओढवून घेतलेल्या. आणि आतातर अगदी दादाचीसुद्धा. नातं नाकारलं तरी ते बंध तोडता येत नव्हते. त्याची कर्मं निस्तरतानाही काचलेला दोर पूर्ण तुटू नये असंच वाटत राहिलं कायम. उसवलेले धागे जोडणं चालूच राहिलं. पाश नाकारताच आले नाहीत. पण आज दादानं टोक गाठलं. नाही जमणार आता. दादाच्या वागण्याचे रागलोभ वाटण्यापलीकडे त्याचं वागणं जात चाललं आहे. याच मुलाचं घराण्याचा कुलदीपक म्हणून काय कौतुक व्हायचं. त्यात तो परदेशी गेलेला पहिलाच मुलगा तळेकरांच्या घरातला. त्या काळी, जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी.

धोपेश्वरची घाटी चढून येणार्‍या दादाकडे अंगणात उभं राहून घरातली सगळी मुलं उत्सुकतेनं पाहत होती. घाटी चढून आलं की जेमतेम आठ-दहा घरांची वाडी. शेजारीपाजारी सगळे तळेकरच. असं ना तसं काहीतरी प्रत्येकाशी नातं एकमेकांचं. सगळ्यांच्याच घरांमधून उत्सुक नजरा बाहेर खिळल्या होत्या. पांढरंशुभ्र धोतर नेसून आप्पा व्हरांड्यात लाकडी दांड्याला धरून उभे होते. सुनेची आणि लेकाची वाट पाहणार्‍या आप्पांच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू होतं. माई हातात मीठमोहर्‍या घेऊन उभी होती. वैजू नवीन फ्रॉक घालून मिरवीत होती. दादा आणि वहिनीची पुसटशी आकृती लांबवरून दिसली. मुलं पायर्‍या उतरून अंगणात नाचायला लागली, दादाच्या नावानं त्यांनी आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. "अरे, दम धरा रे पोरांनो", असं दटावणीच्या स्वरात पुटपुटत आप्पा पुढे झाले. कपाळावर आडवा हात धरून डोळ्यावर येणारं ऊन लपवीत घाटीच्या दिशेने पाहत राहिले. दादावहिनी गड्याच्या मागून धापा टाकत चढ चढत होते. गड्याच्या डोक्यावर दोन-तीन बॅगा एकावर एक चढवलेल्या आणि दोन हातात दोन पिशव्या अडकवलेल्या. सामानाकडे पाहायचं की दादा आणि वहिनीकडे तेच मुलांना समजेनासं झालं होतं. बरीच वर्षं परदेशात राहिलं की रंग गोरा होतो असं सगळ्यांनी ऐकलं होतं. सहा वर्षांनी दोघं भारतात येत होते. दादावहिनीला भेटायला, पहायला सगळेच उतावळे झाले होते.

दोघं अगदी दाराशी येईपर्यंत उत्सुक डोळे त्यांच्यावर रोखले होते. वैजू उगाचच लाजत वहिनीच्या बाजूला जाऊन उभी राहिली. रमाकांत मोठाले डोळे करून दादाकडे पाहत होता. माईने मीठमोहर्‍या ओवाळून टाकल्यावर दोघं आत आली. हातपाय धुऊन त्यांचा चहा होईपर्यंत दोघांच्या हालचालींचा वेध घेत सगळी कसंबसं इकडेतिकडे करत राहिली. चहाचे कप खाली ठेवल्या ठेवल्या दोघांभोवती घर जमा झालं.

वहिनी बॅगा उघडून आणलेल्या भेटवस्तू ज्याच्या त्याच्या हाती सोपवत होती. वैजू तिच्यासाठी आणलेले सुंदर फ्रॉक पाहून हरखली. रमाकांत, शरदसाठी शर्ट आणि घरासाठी रेडिओ. माई, आप्पा रेडिओ लावून बसले. नवीन कपडे घालून सगळी मुलंही त्याभोवती कोंडाळं करून बसली. थोड्याच दिवसांत नव्याची नवलाई संपली पण रेडिओची मात्र सर्वांना इतकी सवय झाली की सकाळच्या बातम्या, संध्याकाळचे कार्यक्रम, रात्रीच्या श्रुतिका, भाषणं - काही ना काही ऐकायला सगळेजण रेडिओभोवती रोज कोंडाळं करून बसायला लागले. दादा आणि वहिनी धोपेश्वरला असेपर्यंत कॅनडाबद्दल किती आणि काय ऐकू असं होऊन गेलं होतं सार्‍यांना. तिकडच्या हिमवृष्टीबद्दल तर कोण कुतूहल होतं सगळ्यांच्याच मनात. दादावहिनींनी कॅमेर्‍यात बंदिस्त केलेले क्षण पाहताना सगळे रंगून गेले. कॅनडाचं चित्र प्रत्येकानं दादावहिनीकडून ऐकलेल्या वर्णनांनी आपापल्या मन:पटलावर रेखाटलं, कायमचं बंदिस्त केलं.

दादा परत आला होता तो कायमचा. पुन्हा कॅनडात न जाण्याचं ठरवून. आता तो कोल्हापूरला स्थायिक होणार होता. आल्या आल्या त्यानं रमाकांत, वैजू, शरद यांच्याबद्दलचे बेत ठरवायला सुरुवात केली. शरद शिक्षणासाठी रत्नागिरीला होताच. वैजूचं लग्न आणि रमाकांतचा महाविद्यालयीन खर्च दादा करणार होता. माईआप्पांनी धोपेश्वर सोडावं, कोल्हापूरला यावं असा आग्रहच त्यानं धरला, तो मात्र आप्पांनी पूर्ण केला नाही. ते दोघं धोपेश्वरलाच राहिले.

दोन-तीन वर्ष भर्रकन गेली. शरद शिक्षण संपवून कमवायला लागला. चिपळूणला स्थायिक झाला. वैजूचं लग्न झालं, रमाकांतचं शिक्षण पूर्ण होऊन तोही नोकरीला लागला. माईआप्पा खूश होते. अधूनमधून दादाकडे, शरदकडे जाऊन रहात होते. या सगळ्याला खीळ बसली ती वैजूच्या आलेल्या पत्रानं.

आप्पांचा त्या पत्रावर काही केल्या विश्वास बसेना. येऊन जाऊन तर होते सारेजण दादाकडे. मग कधी शंका कशी आली नाही? आणि आता आतातर दादा आला होता कॅनडाहून. तो इथे स्थिर झाला, भावंडांनाही त्यानंच मार्गी लावलं, आता प्रपंचातून मुक्त व्हायचं असे मनसुबे रचत असताना हे काय अचानक? परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ते सुचेना तसं माई, आप्पा पत्र घेऊन चिपळूणला आले. आजही ते पत्र शरदला जसंच्या तसं आठवत होतं.


ती. आप्पा आणि माई,
शि. सा. न. वि. वि.
माझं पत्र पाहून आश्चर्य वाटेल. कितीतरी दिवस येऊन जायचा विचार करते आहे पण जमलं नाही. या वेळेला पत्र लिहिणं अवघड वाटतं आहे. तुमच्या मनाला त्रास होईल असं काही लिहू नये असं वाटतंय पण इलाज नाही. दादाबद्दल लिहायचं आहे. कशी सुरुवात करू आणि काय लिहू तेच समजत नाही. वहिनीनं मला चांगलंच तोंडघशी पाडलंय.

मध्यंतरी दुकान अगदीच चालेनासं झालं होतं. पुढे काय ह्या चिंतेत असतानाच हे कोल्हापूरला कामाकरता गेले होते, तेव्हा दादाची भेट झाली. बोलण्याबोलण्यातून आमच्या परिस्थितीचा अंदाज आला दादाला. दादानं मदतीचं आश्वासन दिलं. मध्ये एकदा तो ओणीला येऊन गेला. वहिनीदेखील आली होती. सकाळी येऊन संध्याकाळी परत गेले दोघं. वहिनी निघताना म्हणाली की मी जर माझे सोन्याचे दागिने दिले तर ती तीन महिन्यात दुप्पट करून देईल. मला आश्चर्यच वाटलं पण तिनं मला अगदी सविस्तर पटवून दिलं. ती हे कसं करणार आहे त्याबद्दल सांगून उदाहरणं दिली. विचार करून मी आधी एक सुंकलं होतं ना माझं शाळेत असल्यापासूनचं, ते दिलं. म्हटल्याप्रमाणे दुप्पट सोनं मला तिनं अगदी महिन्याभरातच दिलं. तीच आली होती घेऊन. मी तिलाच ते सोनं विकून पैसे घेतले. खूप आनंद झाला. दुकानाला मदत झाली ना! जाताना मी तिला माझे लग्नातले दागिने दिले. जवळजवळ सात तोळे सोनं. चौदा तोळे सोनं मिळेल ते आधीसारखंच वहिनीलाच विकायचं, त्या पैशामुळे दुकान फार पटकन उभं राहील पुन्हा, असा विचार केला.

आज या गोष्टीला सहा महिने होऊन गेले. मी तिला पत्रं पाठवून थकले. प्रत्येक पत्राचं उत्तर येतं लगेच. त्यात असतात भरघोस आश्वासनं, माझ्याबद्दलची चिंता, वहिनी मला कशी मदत करतेय त्याबद्दलची खात्री. माझ्या मनात भीतीनं घर केलं आहे. ह्यांना मी हे अजून सांगितलेलं नाही. आप्पा, हे लिहितानाच माझ्या डोळ्यांसमोर तुमचा चेहरा येतोय. मी ह्यांना का नाही सांगितलं हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? वहिनीनं चार-चार वेळा बजावून सांगितलं होतं की तिने हा व्यवसाय नव्यानेच सुरू केला आहे, नवखी आहे ती यामध्ये, त्यामुळे लगेच कुठे बोलू नये मी. 'काम झाल्याशिवाय कुणाकडेही, अगदी ह्याच्यांकडे देखील बोलू नकोस' असं पुन्हा पुन्हा तिने सांगितलं त्यामुळे मी गप्प राहिले. आता मी काय करू? सगळे मार्ग संपल्यासारखे वाटतायत. वहिनीला मी हेदेखील लिहिलं होतं की दुपटीचं वगैरे जाऊ देत. तू मला फक्त माझे दागिने परत कर. आता जानेवारी जवळ आला आहे. संक्रांतीला अंगावर दागिने दिसले नाहीत तर ह्यांच्या लक्षात येणारच. काय उत्तर देऊ मी? दादालासुद्धा लिहिलं मी पत्र. तो म्हणतो तुझी वहिनी शब्द पाळेल. एवढंच दरवेळेस. मला सांगा नं काय करू मी?

तुमची,
सौ. वैजू.

पत्र वाचून शरदलाही आश्चर्य वाटलं, धक्का बसला. आप्पांशी बोलून त्यानं लगेच हालचाली करायला सुरुवात केली. रमाकांतला पत्र पाठवून कोल्हापूरला यायला सांगितलं. शरद आणि रमाकांत एकदमच कोल्हापूरला जाऊन पोचले. वैजूही ओणीहून कोल्हापूरला आली. सर्वांना अचानक पाहून दादावहिनीला आश्चर्य वाटलं पण खूप आनंदही झाला. काय करू नं काय नको असं होऊन गेलं. त्यांच्या आनंदात तिघांना सहभागी होणं जमत नव्हतं आणि दागिन्यांचा विषय काढणं अवघड वाटत होतं.

शेवटी दोन-तीन दिवस गेल्यावर दुपारची जेवणं झाली आणि रमाकांतनं विषय काढला.

"दादा, आम्ही खरंतर एका कामासाठी आलो आहोत तुझ्याकडे."
"अरे, मग इतका वेळ वाट कशाला पाहिली? आल्या आल्या सांगायचं ना."
"वहिनीनं वैजूला तिचे दागिने दुप्पट करायचं वचन दिलं होतं."
"बरोबर. ती करणारच आहे ते. काय गं?"
"हो, म्हणजे आज करतेच मी ते काम." वहिनीनं हसून उत्तर दिलं.
"नक्की काय करणार आहेस तू वहिनी? असे दागिने दुप्पट वगैरे नाही करता येत."
"येतात. कॅनडात होतो आम्ही तेव्हापासून एका माणसाला ओळखत होतो. तोही इथे आला आहे कायमचा. मी माझेही दागिने घेतले आहेत ना दुप्पट करून त्याच्याकडून."
"आम्ही दोघं येतो बरोबर. त्या माणसाची भेट घडवून दे." रमाकांत म्हणाला.
"मी जाऊन येते आज आणि कधी भेटायला येऊ ते विचारते. वेळ ठरवून गेलेलं बरं."
"फोन कर ना. दोन-दोन खेपा कशाला? नाहीतर एकत्रच जाऊ आपण." शरदला वहिनीचा उत्साह पाहून चीड येत होती.
"नाही, मला त्या बाजूला मैत्रिणीकडे जायचं आहे. आधी विचारून ठेवते तो माणूस घरी कधी असेल ते आणि मग जाऊ एकदम."
सगळे गप्प राहिले. वैजूनं मात्र वहिनीबरोबर जायचा हेका धरला पण नाना कारणं देत तिलाही थोपवलं वहिनीनं.

वहिनी आणि दादा एकदमच बाहेर पडले. वैजू, रमाकांत, शरद दिवसभर त्यांची वाट पाहत घरात बसून. कंटाळलेल्या, वैतागलेल्या शरदनं वैजूवर आगपाखड केली.
"तू काय अक्कल गहाण टाकली होतीस का दागिने देताना? असे दुप्पट होऊन मिळाले खरंच तर सगळ्या जगानं हेच नसतं का केलं?"
"चुकलं माझं. पण गरज आहे रे पैशांची आम्हाला. वहिनी, दादा मला फसवतील अशी पुसटशी शंकादेखील आली नाही."
"मुळात या दोघाचं हे काय चालू आहे? दागिने दुप्पट करून वहिनीला काय मिळत असेल? पैसे? किती? आणि करायचा काय असा मिळवलेला पैसा? इतकी वर्ष कॅनडात होते तर आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असणारच ना?" रमाकांतला दादा आणि वहिनी असं का करत आहेत तेच कळत नव्हतं.

"त्यांनाच विचारायला हवं. दोघांनींही काढता पाय घेतलेला दिसतोय. संध्याकाळ व्हायची वेळ आली. आपण बसू भजन करत." शरदला दादाची भयंकर चीड येत होती.

दार वाजलं तसं वैजू उठली. दोघं आले असावेत परत असंच वाटलं तिघांना.
"तळेकर पाहिजे होते." दारात अपरिचित गृहस्थ उभे होते. बरोबर एक स्त्री. बायको असावी.

"ते नाहीत घरी. काही काम होतं?" शरद पुढे झाला.
"तुम्ही कोण?"
"मी भाऊ त्यांचा. कोण आलं होतं म्हणून सांगू दादाला?"
"आम्ही आत आलो तर चालेल का? तुमच्याशी बोललं तर..."
"या ना." शरद बाजूला झाला तसं ते जोडपं आत आलं. अस्वस्थ हालचाली करत उभं राहिलं. रमाकांतने दोघांना बसायचा आग्रह केला.
"सांग आता त्यांना, काय झालं ते. म्हणजे आम्ही काही तुमच्या भावाची तक्रार करत आहोत असं नाही पण..." ते गृहस्थ खुर्चीवर बसत म्हणाले.
"माझा स्वेटर, जॅकेट, पर्स बनविण्याचा व्यवसाय आहे. तळेकर वहिनी म्हणाल्या, तिकडे कॅनडात याला खूप भाव मिळेल. २०,००० रुपयांचा माल तयार करून मागितला. १०,००० रुपये दिले. उरलेले पंधरा दिवसांत देते असं सांगून सगळा माल घेऊन गेल्या. पैसे अजून आलेच नाहीत. चांगल्या ओळखीच्या म्हणून मी असा माल दिला. नाहीतर चुकूनसुद्धा पैसे मिळाल्याशिवाय मी काही हातात ठेवत नाही. फसवलं हो चांगलंच."
"इतक्या चकरा मारल्या हिने. दारच उघडत नाहीत. रोज रडत घरी येते. सुरुवातीलाच मला विचारलं असतं तर ओळख पाळख बाजूला ठेव म्हटलं असतं. कंटाळून शेवटी मी आलो आज. तुम्ही नसता तर सरळ पोलिसचौकीत जाणार होतो."
शरदनं त्यांचं नाव, फोन नंबर लिहून घेतला. दादाला निरोप देण्याचं आश्वासन दिलं तसं ते दोघं निघून गेले.

"चला, वैजू तू एकटीच नाहीस अडकलेली यात समाधान मान आता. आहेत तुझ्यासारखी मूर्ख माणसं." रमाकांत म्हणाला तशी वैजू चिडली.
"रम्या, तू जास्त शहाणपणा करू नकोस. मी चुकले हे मान्य केलंय ना. आता काही मदत करता येते ते पाहणार आहेस की मला मूर्ख ठरवण्यात आनंद मानणार आहेस तू?"
"हे दोघं कॅनडाला जाऊन हेच कौशल्य शिकून आले की काय?" शरदच्या प्रश्नावर रमाकांत हसला.
"स्मगलिंग तर नसतील ना करत? त्यात कुठेतरी फसले असतील. आता सगळं निस्तरायला पैसे पाहिजेत. मग घाला टोप्या अशा ज्याला त्याला."
"काय असेल ते असेल. पण सख्ख्या बहिणीला असं लुबाडायचं? वहिनीतर इतकी प्रेमळ. दादापेक्षा ती जवळची वाटायची. कधी शंका पण आली नाही ती फसवेल अशी." वैजूला आता रडायलाच यायला लागलं होतं.
"बोलून पाहू दादा आणि वहिनीशी दोघं एकत्र असताना. त्यांना पैशाची मदत हवी असेल तर ती करू. पण थांबवा म्हणावं हे आता. आज ते जोडपं आलं. अजून कुणाला फसवलं असेल तर? तळेकरांच्या नावाला चांगलंच काळं फासणार हा दादा." शरदचा संताप संताप होत होता.

संध्याकाळी काळोख पडता पडता दोघं घरी आले. शरद वाटच पाहत होता.
"दादा, अरे काय हे. सकाळी बाहेर पडलेला तू. आत्ता परत येताय दोघं. काय दागिने घडवून आणलेत की काय?"
"हे बघ शरद, चिडू नकोस तू. उद्यापर्यंत वैजूचे दागिने देतो परत. मग तर झालं?"
"अरे, आज आणणार होतास ना? आता उद्यावर गेलं. कोणाकोणाच्या तोंडाला अशी पानं पुसली आहेस रे?"
"कुणाच्याही नाही. असे भलते सलते आरोप करू नकोस."
"एक जोडपं येऊन गेलं मगाशी. त्यांनी जे सांगितलं त्यावरून तरी तसंच वाटलं."
"कोण आलं होतं?" वहिनीच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं.
"वैजूसारखं आणखी कुणीतरी. फसलेलं तुझ्या गोड बोलण्याला."
"शरद, आम्ही कुणालाही फसवलेलं नाही. देणार आहोत वैजूचे दागिने." वहिनीनं शरदच्या कडवट स्वराकडे दुर्लक्ष करत म्हटलं.
"कधी? किती दिवसांनी? वैजूला पैशाची नड आहे हे माहीत असूनही दागिने घेतलेत. आणि दादा, तू पण वहिनीला सामील आहेस का?"
"सामील? आम्ही काही कुणाला फसवण्याचा घाट घातलेला नाही. उद्या वैजूचे दागिने करू परत." दादानं शांतपणे सांगितलं.
"आणि त्या जोडप्याचे पैसे?"
"त्यांची काळजी तुला कशाला? बोलेन मी त्याच्यांशी आणि देईन त्यांचे पैसे त्यांना. खरंच दुप्पट दागिने दिसले की स्वत:चे घेऊन येऊ नका म्हणजे झालं."
"काय वेड लागलेलं नाही आम्हाला. वैजूचे दागिने परत मिळेपर्यंत आम्ही रहातो इथेच." रमाकांत ठामपणे म्हणाला. वहिनी एकदम रडायलाच लागली.
"तू कशाला रडतेस वहिनी? आम्ही राहू नये इथे असं वाटतंय का?" रमाकांतला वहिनीच्या अचानक हुंदके देऊन रडण्याचं कारणच समजेना.
"रहा रे. घरचीच तर आहात सगळी. पण आपलीच माणसं आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत याचं वाईट वाटलं. घरातलेच असं वागतात मग बाहेरच्यांनी टोकलं तर काय नवल. एक हे तेवढे माझ्या बाजूनं ठाम उभे आहेत." डोळ्याला पदर लावत वहिनी पुन्हा रडायला लागली तसा शरदचा तोल ढळला.

"दादा तुझ्या बाजूनं उभा आहे की तुला सामील ते कळायचं आहे वहिनी. आणि स्वत:च्या नणंदेला लुबाडलंस तेव्हा विसर पडला का तुला आपल्या माणसांचा? कमाल आहे, गेली सहा वर्ष घरात, नातेवाइकांमध्ये कोण कौतुक चालायचं तुमच्या परदेशी असण्याचं. आमच्या दृष्टीनं तुम्ही दोघं हीरो होता आणि परत आल्यापासून काय चालवलंय हे तुम्ही? तळेकरांच्या नावाला काळिमा नाही फासलात म्हणजे मिळवली."

"शरऽऽऽद!" दादा जोरात ओरडला तसा शरद एकदम गप्प झाला.
"काळिमा फासला म्हणे! काळिमा फासायला तळेकरांच्या घरातल्यांनी काय अटकेपार झेंडे फडकवले आहेत?"
"नाही, अटकेपार झेंडे नाही लावलेले पण अब्रूचे धिंडवडे निघतील असंही कुणी वागलेलं नाही आत्तापर्यंत. ते तू करणार असं दिसत आहेच. नाहीतर वहिनी."
"गप्प बस रे. मोठी वहिनी आहे ती तुमची! आणि काय सारखं तिला बोलताय दोघं? वैजूचे दागिने आहेत ना, मग त्या दोघी बघतील काय ते. मोठा भाऊ, वहिनी म्हणून आदर दाखवायचा सोडून बोलताय आपलं तोंडाला येईल ते." दादा तडतड करत तिथून उठला.

चार दिवस राहूनही दागिने परत मिळाले नाहीत. शरद, रमाकांतचा वहिनी आणि दादाच्या साळसूदपणामुळे अंगाचा तिळपापड होत होता, वैजूच्या मुळूमुळू रडण्याचा वैताग यायला लागला होता. शेवटी तिघं आपापल्या मुक्कामी रवाना झाले. शरद मात्र चिपळूणला न जाता धोपेश्वरला गेला. जे काही कोल्हापूरला घडलं ते त्यानं माईआप्पांच्या कानावर घातलं. कितीतरी वेळ शरद काय सांगतो आहे त्यावर आप्पांचा विश्वास बसेना. ते निराश झाले. हताश होत रेडिओवर चालू असलेलं मंद संगीत बटण पिरगाळीत त्यांनी खाडकन बंद केलं.

"मसणात घाला ह्या दादाने आणलेल्या गोष्टी. फॉरेनात जाऊन हेच शिकून येतात की काय? माझ्या हयातीत आपल्या घरातलं आजपर्यंत कुणीही असं वागलेलं नाही. शरद, आता सगळा भरवसा तुझ्यावर. तूच सांग काय करायचं? नाहीतर असं करू. जमिनीचा एक तुकडा विकून टाकतो. वैजूकडे जाऊन परिस्थितीबद्दल स्पष्ट बोलतो. जावईबापूंची मी वैजूच्या वतीनं माफी मागतो. तिच्या स्त्रीधनाचे पैसे देऊ आपण जावईबापूंना. उपयोगही होईल दुकानासाठी. बाकी उरतील ते दादाकडे देऊ."

बोलता बोलता आप्पा थांबले. क्षणभर विचार करून म्हणाले, "नको, त्याच्या हातात नको द्यायला पैसा. त्याच्याबरोबर जाऊ प्रत्येकाच्या घरी. झाल्या प्रकाराची माफी मागू आणि देणं देऊन टाकू. पण लोकांचे शिव्याशाप नको रे आपल्याला. इतकी वर्ष सचोटीने काढली. दादानं धुळीला नको मिळवायला आपलं नाव."

"अहो, आपण दोघं जाऊ या का कोल्हापूरला? काहीतरी अडचणीत सापडले असणार दोघं. तुम्ही धीर द्या. आधार देऊ याची खात्री द्या. मग बोलतील पोरं, मोकळी होतील."

माईच्या बोलण्यावर शरदनं मान डोलावली.
"पहा प्रयत्न करून. आम्ही हरलो. काही नाकारतही नाही आणि परतही देत नाही. तुमच्याशी बोलतील कदाचित मोकळेपणानं." कोल्हापूरला कधी जायचं ते ठरवून शरद चिपळूणला गेला.

ठरल्याप्रमाणे चार दिवसांनी माईआप्पांना घेऊन तो कोल्हापूरला पोचला. दादा हरखलाच दोघांना पाहून. बरोबर शरदला पाहिल्यावर मात्र त्याला कल्पना आली. पण तसं जाणवू न देता त्यानं तिघांचं स्वागत केलं. माईआप्पा अवघडून बसले.

"माई, तुमच्याच घरी आला आहात. आता एक-दोन महिने मस्त आराम करा. आप्पा, तुमच्यासाठी ढीगभर पुस्तकं आहेत वाचायला. वेळ कसा जाईल ते समजणार नाही. रंकाळा आपल्या घराच्या अगदी जवळ आहे. आजच घेऊन जाईन म्हणजे रोजच्या रोज चक्कर मारायला जाता येईल तुमचं तुम्हाला." दादानं हक्कानं सांगितलं. पुन्हा तेच. दोघं इतकी लाघवीपणाने बोलत होती की विषय कसा काढावा तेच माईआप्पांना कळेना.

चहाचा घोट घेत शेवटी आप्पा म्हणाले, "बाबा रे, आम्ही विश्रांतीसाठी नाही आलेलो. तुमचं दोघांचं जे काही चाललं आहे ते ऐकून राहावलं नाही म्हणून आलो. काय ऐकतोय मी दादा तुम्हा दोघांबद्दल? हे बघ, कशात काही अडकला असशील तर सांग लगेच. मी येण्यापूर्वी जमीन विकण्यासाठी गिर्‍हाइक पाहून आलेलो आहे. किती पैसे देणं आहेस?"

"शरदनं चांगलं काम केलेलं दिसतंय. काय रे, इथून गेलास ते धोपेश्वर गाठलंस ना? कशातही अडकलेलो नाही आम्ही. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही काळजी करू नका. वैजूला तिचे दागिने लवकरच देऊ कबूल केल्याप्रमाणे." पुन्हा पुन्हा वहिनी आणि दादानं आश्वासन दिलं. शेवटी माईआप्पांनी विश्वास टाकला आणि काही दिवस कोल्हापूरला विश्रांतीसाठी रहाण्याचंही ठरवलं. शरद चिपळूणला परत आला.

ती माईआप्पांची शेवटची खेप बहुधा कोल्हापूरची. त्यानंतर दादा आणि वहिनीनं कोल्हापूरच सोडलं. माईला दादाचा ठावठिकाणा शोधून काढायचा ध्यास लागलेला. आल्यागेल्याला ती दादाबद्दल विचारत राही. धोपेश्वरला आलेल्या देणेकर्‍यांच्या तगाद्यांनी आप्पा खचले, अचानक दहा वर्षांनी म्हातारे दिसायला लागले, एकेकाची देणी फेडत राहिले. शरद आणि रमाकांत आपल्या परीने त्यांना कधी विरोध करत राहिले, तर कधी न रहावून मदत.

त्या दिवशी गणपतीच्या निमित्तानं सारे जमले होते. पाच दिवस म्हटलं तर कसे गेले हेही समजलं नाही. आरास रचण्याची गडबड, बेंबीच्या देठापासून ओरडून आरत्या म्हणण्याचा खटाटोप, संध्याकाळी चहा पिऊन झाल्यावर रवळनाथाच्या दर्शनाला जाणं, पडवीत पत्त्यांचा अड्डा जमवणं असं सगळं चालू असलं तरी प्रत्येकाच्या मनात विचारांची खळबळ होती. विसर्जन झालं, जेवणं आटोपली आणि सुपारी कातरत आप्पा अंगणातल्या बाजेवर पायाची घडी घालून बसले. एकेक करून सगळीच आजूबाजूला येऊन बसली. माईंनी दुधाचा कप आप्पांच्या समोर धरला.

"घर अगदी भरून गेल्यासारखं झालं हो आज. छान वाटलं. दादा आला असता तर जिवाला शांतता लाभती." बाजूच्या पायरीवर टेकत माई म्हणाल्या.

"आम्ही सर्व आहोत त्यात आनंद मान ना माई." वैजू म्हणाली तसं आप्पांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.

"नाहीतर काय? त्या दादाला नाही कुणाची फिकीर आणि हिचा आपला सतत दादाच्या नावाचा जप. आप्पा, अनायसे माईनेच विषय काढला आहे दादाचा तर माझ्या मनातलं बोलतेच आता." वैजूचा स्वर, आवेश पाहून ती आता आणखी काय सांगणार या शंकेनं आप्पांचा जीव धास्तावला. सगळेचजण शांत झाले.
"आप्पा, दादा तुमचा मुलगा आहे, त्यासाठी तुमचा जीव तुटणार हे ओघानं आलंच पण जमिनीचा एक तुकडा विकू म्हणता म्हणता फक्त एक तुकडाच तुमच्यासाठी शिल्लक राहिला असं होऊन जाईल. मी माझ्या दागिन्यांवर कधीच पाणी सोडलंय. माझ्या घरच्यांचीही तुम्ही काळजी करू नका. घेतले का ह्यांनी पैसे तुम्ही घेऊन आलात तेव्हा? पण आता हे अपराधीपण सोडा. त्या दोघांच्या वागण्याला स्वत:ला जबाबदार धरू नका. दादावहिनीने काहीही संबंध ठेवलेला नाही आपल्याशी तर का तुम्ही त्यांची देणी फेडताय? आधी वाईट वाटायचं पण तुम्ही असे परिस्थितीला शरण जाताय ते बघून राग येतो आता मला. काढून टाका ना आपल्या आयुष्यातून दादाला आता. खूप झालं. भोगला एवढा त्रास पुरे झाला." वैजू काकुळतीने विनवीत होती. गणपतीच्या निमित्तानं सारी भावंडं जमली होती ती ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवूनच.

"आपलेच दात आपलेच ओठ, पोरी. तुझ्या घरचे मोठ्या मनाचे. पण बाकीच्यांचे तळतळाट आपल्या घराण्याला नकोत म्हणून करतोय हे सारं."
"कशाला पण? सगळीकडे तुमचं किंवा आमचं नाव-पत्ता देणार हा दादा पण त्याचा ठावठिकाणा कळू देतोय का? आणि आपल्या परीनं आपण केले प्रयत्न. आता बास." शरद न रहावून बोलला.
"मध्ये दोघं माझ्याकडे रहायला आली होती." रमाकांतच्या बोलण्यावर सगळ्यांनीच चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"हो, खरं सांगतोय. मलाही दया आली. रहायला जागा नाही. रेल्वेस्टेशनवर झोपतो रात्री असं वहिनी डोळ्यात पाणी आणून सांगत होती. रहावलं नाही मला."
"अरे, मग आहेत कुठे आता? घेऊन यायचंस ना दोघांना." माईच्या स्वरातला ओलावा जाणवला तसा वैजूचा राग उफाळून आला.
"हेच. आपलं हळवेपण घात करतं आहे आपला आणि त्यांचाही. आता इतकं बोलले मी, एवढं ऐकते आहेस आणि तरी निघालीस लगेच धोपेश्वरला बोलवायला. तू सुद्धा कमाल केलीस रमाकांत. कशाला ठेवून घेतलंस?"
"अगं, सख्खा भाऊ आहे तो आपला. वहिनीनं खूप लाड केले आहेत आपले आपण लहान असताना. ते सगळं आठवलं म्हणून एक-दोन दिवस रहा म्हटलं पण त्याआधी शरदशी बोललो."
"हो. मी पण म्हटलं राहू दे. पण तिथेही पुन्हा रंग दाखवलेच त्यांनी आपले."
"काय केलं?" आप्पांच्या आवाजाला कंप सुटला.
"रमाकांतच्याच घरातलं सामान चोरीला जायला लागलं."
"हद्द झाली दादापुढे. हे आपलंच रक्त आहे ना हो?" आप्पांच्या आवाजातली असहायता शरदचं काळीज चिरून गेली.
"रमाकांतनं मग त्यांना तिथून जायला भाग पाडलं." शरदनं पटकन म्हटलं.
"आता कुठे आहेत?" माईने विचारलं आणि रमाकांत चिडला.
"कमाल आहे माई तुझी. तोंडाला काळं फासलं आपल्या. आपण सारेच निस्तरतो आहोत त्यांचे उद्योग. आप्पांवर तर कफल्लक व्हायची वेळ आणली आहे त्यानं आणि तरी माई, तुला ते कुठे आहेत ह्याची चिंता पडली आहे?"

"ओरडू नकोस रे असा. आत्ता वैजूनं फटकारलं. आता तू. चुकलंच माझं. पोटचा गोळा आहे रे बाबांनो शेवटी. येते माया आड. विचार करत रहाते, बाबा काय चुकलं आमचं? पाठवायला नको होतं की काय परदेशात? आणि काही चुकलं असेल तर मग तुम्ही सगळी कशी व्यवस्थित आहात? कितीतरी वेळा वाटतं, की तो गुंतला ह्यात त्याच्या बायकोमुळे. पण मग हा गप्प का रहातो ते समजत नाही. कुठल्या जन्माचं पाप भोगतो आहोत आम्ही कोण जाणे. अब्रूनं राहिलो आतापर्यंत आणि आता काय वेळ आणली आहे या मुलानं. पण नाळ नाही रे तुटत. काळजी वाटते, प्रश्न पडतात. पुन्हा हे विचारायची भीती. चिडता ना तुम्ही सगळेच. तुम्हाला आमच्या पोटातलं ओठावर आणलं त्याचा इतका त्रास होत असेल तर आता नाही हो नाव काढायची दादाचं." माईनं एकदम पड खाल्ल्यावर कुणाला काय बोलावं ते सुचेना. पण रमाकांतनंच सूत्रं हातात घेतली.

"खरंच आता सोडा त्याचं नाव. तुम्हालाच त्रास होतो. मानसिक, आर्थिक दोन्ही बाजूंनी. आणि वहिनीला एकटीला का दोष देता? आपला तो बाब्या असं नका करू. यामध्ये दोघांचाही तितकाच हात आहे. जे काही चाललं आहे त्यावरून आपलंच नाणं खणखणीत असल्याचा दावा करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला माहीत होता तो हा दादा नाही. किती खेपा मारल्या, दोघांना बोलतं करायचा प्रयत्न केला. वहिनीच्या माहेरच्यांनी पण काय कमी प्रयत्न केले का? पण दोघंही दाद देत नाहीत. एखाद्याला चिखलात रुतायचंच असेल तर नाही गं बाहेर काढता येत माई. आपलाच पाय त्यांच्याबरोबर खोलात जातो, चिखल अंगावर उडायला लागतो..."

रमाकांतचं बोलणं तोडत आप्पा म्हणाले, "मी बोलत नाही म्हणून चिडता. ती बोलते म्हणूनही तिच्यावर चिडता. काय असं वागता रे आमच्याशी? आता एकदा आमची दोघांची बाजू सांगूनच टाकतो. दादाबद्दल सांगता, तक्रारी करता तेव्हा अपराधी वाटतं, त्रास होतो. वाटतं, आपल्या ह्या दिवट्यामुळं बाकीच्या मुलांना का हा त्रास, व्याप? भाऊ झाला म्हणून तुम्ही किती आपलं नुकसान करून घ्यायचं? आता खरंच कंटाळा आला आहे या परिस्थितीचा. रात्ररात्र डोळा लागत नाही. विचार पाठ सोडत नाहीत. रक्तातूनच आलं आहे की काय हे असं वागणं या शंकेनं आपल्या घरात कुणी असं पूर्वी वागलं होतं का याची मन सतत चाचपणी करत रहातं. बाहेर तोंड दाखवायची तर सोयच राहिलेली नाही. कुठेही गेलं की दादाची चौकशी असतेच नातेवाइकांच्या घोळक्यात. आपल्या अगदी जवळच्या नातेवाइकांना तो कुठल्याशा देवळापाशी भेटायला बोलावतो आणि ते जातात. बरं त्यांना दोष काय देणार? त्यांना काही ह्या गोष्टींची झळ लागलेली नाही. त्यानं बोलावलं, भेटावंसं वाटलं म्हणून गेलो भेटायला म्हणतील. खाजवून खरूज काढल्यासारखं करतात रे. फाजील उत्सुकता दिसते बोलण्यातून, डोकावते डोळ्यांतून. आव मात्र असतो काळजीचा. थकलो आता. तुम्हीच सांगा काय करायचं ते." आप्पा बोलायचं थांबले. शरद आणि रमाकांतनं एकमेकांकडे नजर टाकली.

"मी आणि रमाकांतनं खूप विचार केलाय याबाबतीत. असं वाटतंय की वर्तमानपत्रात देऊन टाकायचं, आमचा ह्या व्यक्तीशी काही संबंध नाही म्हणून."
"अरे, काहीतरीच काय. नको रे इतकं टोक गाठायला." वैजूलाच रहावलं नाही.
"मग रहा तसेच. ज्यालात्याला त्या नालायकाचा पुळका. अरे, बघायला या. माझं घर अक्षरश: धुऊन काढलं आहे दोघांनी. आता माझा जम बसला आहे तर लग्न कर म्हणून मागे लागली होतीस ना माई? तुमच्या मोठ्या चिरंजीवांनी सगळं घर खाली केलं आहे. आता पुन्हा जमवाजमव करेपर्यंत कुठला करतो आहे लग्नाचा विचार. एक दिवस जरा बाहेर गेलो तर ट्रक आणून सगळं सामान न्यावं ह्या दोघांनी? सख्ख्या भावाला लुबाडतात, तुझं वाटोळं केलं, आप्पांवर या वयात कफल्लक व्हायची वेळ आली, नातेवाइकांमध्ये, ओळखीपाळखीच्या लोकांमध्ये मान खाली घालावी लागते विषय निघाला की. कुणी नवीन माणूस समोर आलं की भीती वाटते, दादा याचं काही देणं तर लागत नाही ना अशी शंका येते. आणि तू म्हणते आहेस टोक गाठायला नको. ठरवा मग तुम्ही काय करायचं ते नाहीतर बसा देणी फेडत, नशिबाला बोल लावत." रमाकांतचा स्वर टिपेला पोचला.

वाद, चर्चा, चिडचीड होऊन शेवटी रमाकांतनं दादाशी तळेकरांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा काही संबंध नाही, असं निवेदन वर्तमानपत्रात दिलं. त्यादिवशी धोपेश्वरच्या तळेकरांच्या घरात सुतक असल्यासारखं वातावरण होतं. शरदला याची कल्पना असल्यामुळे तो मुद्दाम दोन-तीन दिवस रहायला आला होता. ते वर्तमानपत्र हातात घेऊन रडणार्‍या माईची समजूत घालणं कठीण झालं त्याला.

"माई, आपण सर्वांनी एकत्र मिळून घेतलेला हा निर्णय आहे."
"हो, मला मेलीला मत आहे कुठं! तुम्ही बोलायचं, मी मान डोलवायची. पण असं निवेदन देऊन संबंध संपत नाही पोरांनो. खरं सांगा, संपतो असा संबंध?"
आप्पांनी बायकोकडे नजर टाकली.
"कायदेशीरदृष्ट्या संपतो. त्याच्या कुठल्याही वागण्याला, फसवणुकीला आपण जबाबदार नाही. जमिनीच्या व्यवहाराला त्याच्या स्वाक्षरीची गरज नाही, आपलं जे काही आहे त्यातला वाटा त्याला मिळणार नाही."
"जीव गुंतला आहे त्याचा संबंध कसा संपवायचा?" डोळ्यात येणारे अश्रू लपवीत माईंनी विचारलं.
"आपला जीव गेला की." कठोर स्वरात आप्पा उत्तरले.
"अहो, असं काय बोलता?"

"खरं तेच सांगतो आहे माई. थोडीथोडकी नाही, जवळजवळ पंधरा वर्ष तरी झाली असतील दादाशी संबंध तुटून. जो येतो तो त्याची देणी फेडण्यापुरता. आता एक लक्षात ठेवा. त्याचं नांवही काढू नका. एकदातरी आला का आपल्याला भेटायला तो? दुखलंखुपलं विचारायला? कुणीतरी सांगतं आपल्याला, दादरला दिसला होता, पुण्यात आला होता. इकडे जाऊन भेटून आलो त्याला. आता इतक्या ठिकाणी हा जातो मग आपल्याला भेटावं असं वाटू नये त्याला एकदाही? आता तर घरात फोनही आलाय. फोन करावासा नाही वाटला. आता आपण पिकली पानं याची जाणीव असेलच ना त्यालाही. तोच पोचला आता पन्नाशीला."

"घाबरत असेल हो शरदला, रमाकांतला. वैजूला तोंड दाखवायची लाज वाटत असेल."
"वैजूला फसवलं तेव्हा घाबरला नाही तो? आणि आपल्याला भेटायला आला तर काय आपण लगेच सर्वांना बोलावून घेणार आहोत? म्हणावं तर पोलीसही त्याच्या मागावर नाहीत. संबंध संपले हेच अंतिम सत्य आहे. दोघं कुठेतरी आहेत, आपले आपण जगतायत यावर आता समाधान माना. आणि एक करा. येताजाता मुलांसमोर दादाची चौकशी करू नका. रागावतात मुलं. त्यांना वाटतं, ती इतकं करतात आपल्यासाठी, दादाच्या गुन्ह्यांवरही सतत पांघरूण घालतात आणि आपण मात्र त्याचीच आठवण काढत रहातो."

धमकीचा फोन आल्यापासून हातात धरलेल्या वर्तमानपत्रातली अक्षरं पुसट होत हे सारे प्रसंग ठळकपणे चित्रित होत होते शरदच्या मनात. आप्पांनी दादाचं नाव आता या घरात पुन्हा काढायचं नाही असं माईला बजावून सांगितलं त्यानंतर काही दिवसांनी दोघंही त्याच्याकडे चिपळूणला कायमचे वास्तव्याला आले. आणि खरंच निश्चय केल्यासारखं दोघांनी पुन्हा दादाच्या नावाचा उल्लेखही केला नाही. या ना त्या मार्गानं रमाकांतनं पोचवलेल्या निरोपामुळे एकदा अखेर आप्पांशी बोलायला म्हणून दादाचा फोन आला. आप्पा, माईंशी निदान एकदा तरी त्यानं बोलावं म्हणून चालवलेली धडपड होती ती भावंडांची. पण आप्पांनी त्याच्याशी बोलायलाच नकार दिला. माईची इच्छा असावी पण आप्पांना घाबरुन तिनं नाही म्हटलं असावं असंच वाटलं होतं तेव्हा सर्वांना. आप्पा गेल्यानंतर किती वेळा सगळ्यांनी तिला दादाला शोधायचा प्रयत्न करायचा का विचारलं होतं. पण त्यालाही तिनं ठाम नकार दिला. माईच्या शेवटच्या क्षणी घरातल्या प्रत्येकाला वाटत होतं ती दादाची चौकशी करेल, म्हणजे तशी तिनं ती करावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा होती. पण तिनं मौनव्रत धारण केलं. का केलं असेल तिनं असं? जात्या जिवाला एक तपाहून अधिक काळ नजरेलाही न पडलेल्या मुलाची चिंता असणारच. बाकी मुलांचं जीवन फुललं, बहरलं आणि एकाचं अकाली भरकटलं त्याचाच विचार तिच्या मनी अखंड राहिला हे नक्की. मग का नाही तिनं ते व्यक्त केलं? केवळ इतर मुलांचा धाक? त्यांना दुखवू नये ही इच्छा? की आयुष्याच्या अशा पायरीवर ती उभी होती जिथे आता फक्त मृत्यू समीप होता, पैलतीर डोळ्यांना खुणावत होता? त्यापुढे इतरांचं अस्तित्व पुसट होत गेलं असावं? हा प्रश्न आता अनुत्तरीतच रहाणार हे नक्की असलं तरी शरदचं हृदय अधूनमधून कासावीस करून टाकी.

आणि आज हे नव्यानं सुरु झालेलं धमकीचं सत्र. कधी नव्हे तो एक हताशपणा शरदला वेढून गेला. आप्पा म्हणाले होते, दादाशी काही संबंध राहिला नाही निवेदन दिल्यानंतर आपल्या बाजूनं. पण हे झालं आपलं. त्याच्या बाजूनं काय? त्याच्या दृष्टीनं आपण सर्व भावंडंच आहोत अजून. त्याच्या स्वार्थासाठी का होईना तो अप्रत्यक्षरीत्या आपल्याला घट्ट धरुन आहेच. पन्नाशी पार केली तरी याचे उद्योग निस्तरायचं नशीबातून सुटत नाही. आता आणखी किती दिवस, वर्षं हे असंच चालू रहाणार या विचारानं शरदच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या.

पुन्हा फोन वाजला तसा तिरमिरीत शरद उठला. पलीकडच्या माणसाला बोलायची संधीही न देता ओरडला.
"बंद करा धमक्यांचे फोन करणं. किती पैसे दिले आहेत तुम्हाला त्या तळेकरांनी आमची झोप उडवण्यासाठी?"
"अरे शरद, मी रमाकांत बोलतोय."
"तू आहेस होय. मला वाटलं..."
त्याचं वाक्य तोडत रमाकांत म्हणाला, "धमकीचा फोन. हो ना?"
"तुला कसं कळलं? का तुला पण आला होता?"
"म्हणूनच तुला केला लगेच. कुणीतरी गावठी भाषेत बोलत होतं. आमदार निवासाचे पैसे भरा, भावाला सांगा मुलाबाळांची काळजी घ्या. रस्त्यात एखादा अपघात... असं काही बाही बोलत होता तो माणूस."
"कळलं. मी बोलतो तुझ्याशी नंतर. ही कधीची उभी आहे. माझा चढलेला आवाज ऐकून घाबरली असेल."
"बरं ठेवतो मी. पण मुलांशी बोलून घे. समजावून सांग त्यांना." रमाकांतने फोन ठेवला.

"रमाकांत होता. त्या आधी धमकीचे फोन. दादानं आता मात्र टोक गाठलं आहे. मुलांना अपघात होऊ शकतो अशी गर्भित धमकी देतोय. स्वत:चं धाडस नाही. भाडोत्री गुंडांचा पर्याय वापरतोय मूर्ख." शैलाकडे बघत शरदनं काय घडतंय ते सांगून टाकलं. शैला घाबरुन बसलीच बाजूच्या दिवाणावर.

"तुम्ही पैसे भरून टाका. उगाच नसती डोकेदुखी नको."

"किती वेळा भरू पैसे? आणि हे काय शेवटचं आहे का? तो किंवा मी गेलो की मगच संपणार हे सगळं असं दिसतंय. या ना त्या मार्गानं दादाचे उद्योग निस्तारतो आहोत आपण सगळेच. कितीतरी वर्षं. त्याच्या काळजीनं खंगून आप्पामाई गेले, आम्ही भावंडही असेच भरडत रहाणार त्याची किंवा आमची अखेर होईपर्यंत. थकत चालले आहेत आता देह आणि मनही. पण ही दादाची थेरं काही बंद होत नाहीत."

"अपघाताची धमकी, मुलांना काही होईल हे पहिल्यांदाच आहे. ती दोघं कोणत्या थराला जाऊ शकतील याची निशाणीच म्हणायला हवी ना ही?"
"अशा धमक्यांना आपण भीक घातली तर हे दुष्टचक्र कधी संपणारच नाही. काहीतरी करायला हवं आता निर्वाणीचं."
"अहो, तरुण मुलं आहेत आपली. दादाला धडा शिकवायला जाल आणि एक म्हणता एक होऊन जायचं. आणि हे बघा, मी सांगून ठेवते तुम्हाला एकदाच आणि शेवटचं. या तुमच्या भानगडीतून माझ्या मुलांना काही झालं तर कुणालाच माफ करणार नाही मी. कळलं ना?" शैला एकदम रडकुंडीला आली.
"अगं, मला तरी आवडेल का आपल्या मुलांना काही झालं तर? पोकळ धमक्या आहेत एवढंच म्हणायचं होतं मला."
"आणि त्या तशा नसतील तर?" शरद एकदम गप्प झाला. असा विचारच डोकावला नव्हता मनात. शैलाच्या शब्दांनी शरदच्या अंगावर काटा आला.
"परत फोन येऊ दे. विचारतोच त्याला कोण पैसे देतं आहे फोन करून धमक्या देण्यासाठी. आणि हा दादा... समोर तर येऊ दे कधी. नाहीसाच करून टाकेन." शरदचे डोळे संतापानं रक्त साकळल्यासारखे लाल झाले. दोघं एकमेकांकडे बघत विचारात गुंतून गेले. बराचवेळ. आणि अचानक शरदनं दचकून फोनकडे पाहिलं. फोन पुन्हा एकदा वाजत होता…

Friday, October 24, 2014

शोध

(’मायबोली’ च्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली कथा )

बस सोल्ल्याच्या फाट्यावर थांबली. घाईघाईत सुयशने रहस्यकथेचं पुस्तक सॅकमध्ये ठेवलं. निखिल, त्याचा मामेभाऊ त्याला घ्यायला आला होता.
"आयला तू अगदी हीरोच दिसतोस."
"म्हणजे कसा?" सुयशने केसाची झुलपं उडवित विचारलं.
"ए, लगेच भाव खाऊ नकोस. चल आता."
"कसं जायचं?" सॅक पाठीवर अडकवून सुयश तयार होता.
"चालत. अर्ध्या तासात पोचू."
"ठीक आहे. चल ना मग." दोघं लांब लांब ढांगा टाकत चालायला लागले.
"मागच्यावेळेस आलो होतो तेव्हा चौथीत होतो. वेगळंच वाटतं आहे गाव आता."
"अरे गाव काय बदलणार. आता तू मोठा झालास त्यामुळे वाटत असेल तसं." निखिल हसत म्हणाला.
"तू कबूल केलं आहेस फोनवर. लक्षात आहे ना?" सुयशने खात्री करण्यासाठी विचारलं.
"आहे की. आता आहेस ना आठ दहा दिवस मग दाखवतोच."
"दाखव. उगाचच काहीही थापा मारत असतोस."
"पैज लावू या? मग चड्डी पिवळी करू नकोस." सुयश जोरात हसला.
"तू अगदी मामासारखा बोलतोस. घाणेरडा आहेस. पण खरंच  असलं काही नसतं यार." सुयशला निखिलचं म्हणणं पटतच नव्हतं.
"तुला पुरावाच पाहिजे ना? आज रात्री जागायची तयारी ठेव."
"चालेल. दाखवच तू मला." थोडावेळ दोघं न बोलता रस्ता तुडवत राहिले. तांबड्या मातीच्या त्या रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला खळाळणारी तारी नदी.
"तुला ते सावे काका आठवतात का?"
"सावे काका? कोण हे?"
"आहेत. विसरलास तू. त्यांनी या रस्त्यावर मला ते, तसं दाखवलं होतं."
"ते, तसं?"
"भूत रे."
"रस्त्यावर भूत?"
"हो. म्हणाले पहायचं आहे ना. दाखवतोच. मग घाबरायचं नाही. घाबरलो होतो पण म्हटलं बघू तर."
"मग?"
"मग काय? अरे, दिवसा उजेडी एकदम अंधार झाला. डोळे ताणून ताणूनही काही दिसत नव्हतं. त्यातच कुणाच्या तरी किंकाळ्या, आरडाओरडा, कुणीतरी जोराजोराने हाका मारत होतं पण कुणाला ते काही केल्या कळत नव्हतं.  मागे पुढे नुसती माणसंच माणसं आहेत, घेराव घातलाय सगळ्यांनी असं वाटायला लागलं."
"खरंच? घाबरलास तू?"
"हो. सावेकाकापण दिसेनासे झाले. मग ओरडायला लागलो. बेंबीच्या देठापासून ओरडलो. तर एकदम प्रकाश. बाजूला काका. नुसतेच हसत होते. एकदम शांत."
"हीप्नोटाइज केलं असेल त्यांनी तुला."
"नाही. भूतच होती ती."
"अरे कसं शक्य आहे. कुणीही बनवतं तुला यार."
दोघांचा वाद रंगला तो घराजवळचा वहाळ  येईपर्यंत. पाण्याने पार तळ गाठला होता. दगडांवरून उड्या मारता मारता सुयशने जोरात विचारलं.
"आज रात्रीचं पक्कं ना?"
"एकदम. सगळीकडे निजानीज झाली तरी आपण बसून रहायचं पडवीत. रात्री बारानंतर बघच तू..."
"ठरलं तर." बोलता बोलता ते घरी पोचलेच.  दिवसभर मामा, मामीने सुयशचा ताबा घेतला. मामा सर्वांची ख्यालीखुशाली विचारत राहिला. मागच्या वेळेस तो आला तेव्हाच्या आठवणी रंगात आल्या. गोठ्यात बांधलेल्या गायी, परसातला भाजीपाला, मागचं भाताचं शेत इकडून तिकडे तो नुसता हुंदडत राहिला ते रात्रीचं जेवण होईपर्यंत.


"ए, बोअर झालो यार. किती वेळ बसायचं असं?" सुयशला कंटाळा यायला लागला, थोडीशी भितीही वाटायला लागली होती. आजूबाजूला गुडुप अंधार. कुठेतरी लांबवर एखादा मिणमिणता दिवा, मध्येच कुत्र्याचं केकाटणं,  अंगणात अचानक अवतरलेला सैरावरा धावणारा उंदीर, घरासमोर अक्राळविक्राळ फांद्या विस्तारुन उभी राहिलेली झाडं, रातकिड्यांची किरकिर...... त्या भयाण वातावरणात काही बोललं तरी आवाज उगाचच घोगरा व्हायला लागला.
"झोपा रे आता. किती वेळ बसणार आहात?" काळोखात माजघरात झोपलेल्या मामाचा आवाज एकदम घुमला. दोघंही दचकलेच. निखिलने बसल्या बसल्या मागे वळून पाहिलं.
"तुम्ही झोपा बाबा. आम्ही बसलोय इथे."
"दार घे ओढून पूर्ण."
निखिलने दार पूर्ण ओढलं. आता  दोघांनाही भिती वाटायला लागली.
"चल रे. आपण झोपू या." सुयश कुजबुजला.
"नको रे. आता दिसतीलच बघ दिवे." निखिल उठायला तयार नव्हता.  दोघांची नजर सारखी  दृष्टी पडेल तिथे दिसणार्‍या उंच, अक्राळ विक्राळ वाढलेल्या झाडांकडे जात होती, त्यातून  चेहर्‍यांचे चित्र विचित्र आकार, माणसांच्या आकृत्या असं काही बाही प्रकट व्हायला लागलं होतं.
"तो बघ, तो बघ. एक दिवा गेला." निखिल कुजबुजला. सुयशने मान उंच करून पहायचा प्रयत्न केला.
"काजवा असेल."
"अजून एक. आता आणखी दोन. बघ, बघ." निखिलने केलेल्या बोटाच्या दिशेने सुयश पहात राहिला. डोळे ताणून दूरवर दिसणार्‍या त्या ज्वाळांकडे पहाताना पलित्यांखाली माणूस दिसतंय का ते पहाण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. आपसूक तो निखिलच्या जवळ सरकला.
"काय रे? फाटली का?"
"छ्या, पण कुणी पलिते धरले आहेत ते का दिसत नाही?"
"कारण ते अंधातरी आहेत."
"कायतरी पचकू नकोस. कुणीतरी धरलेले आहेत."
"दिसतंय का कुणी?"
"काळोख आहे म्हणून दिसत नाही."
"रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. इतक्या रात्री माणसं काय करणार तिकडे?"
"तिकडेच रहात असतील."
"बावळट आहेस. कुणी रहात नाही तिकडे. उद्या दिवसा जाऊ आपण. तूच बघ."
"ते पलिते असे नाच केल्यासारखे का फिरतायत?"
"कारण भुतं नाचतायत. च्यायला, सांगत होतो ना  तुला की बरोब्बर बारा वाजले की हे असं सुरु होतं. आता दोन मिनिटात नाहीसं होईल."
"चल, जाऊन बघू या?" सुयशला एकदम चेव चढला.
"पोचायला अर्धा तास लागेल. त्याआधी ते बंद होईल. गावातल्या लोकांनी पण जाऊन बघितलं आहे. तिथे जाऊन बसलं तर काय पण होत नाही. लांबूनच पहायला मिळतं. पण तुला ती जागाच बघायची तर उद्या चक्कर मारु." निखिल म्हणाला.
"नाही. उद्या रात्रीच जाऊ. बारा वाजता." सुयश उठलाच तिथून. कसलं भूत आणि कसलं काय. फालतूपणा. त्याचा या पलित्यांवर अजिबात विश्वास बसला नव्हता.

"अरे, दोघं नका जाऊ बाबा तिकडे रात्रीचे."
"मामा, तू पण ना. भूत बीत असलं काही नसतं. मला काय वाटतं माहितीये का?" सगळ्यांच्या माना नकारार्थी माना हलल्या.
"यू. एफ. ओ. असेल."
"युएफो?" मामा गोंधळला.
"उडत्या तबकड्या म्हणतोय तो." निखिलने स्पष्टीकरण दिलं.
"उडत्या तबकड्या? सोल्ल्यात?" मामाला हसू आवरेना.
"मामा हसणं थांबव ना. आज कळेलच रात्री मग बघ."
"बरं बरं, मी पण येईन तुमच्याबरोबर सोबतीला. पण आधीच सांगतो आपण तिथे गेलो की काहीही दिसत नाही." मामाने विषय संपवलाच.

"आयला, अख्खं कोकण भुताखेतांनीच भरलेलं आहे असं वाटायला लागलं आहे."  सुयश शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन आला. परत आल्याआल्या निखिलला काय सांगू आणि काय नको असं होऊन गेलं त्याला.
"काय झालं?"
"देवळाकडे जाताना वाटेत तो उभा देव लागतो बघ. तिथून पुढे गेलं की देऊळ..."
"लेका, उभा जन्म इथे गेलाय माझा आणि तो उभा देव कुठे, देऊळ कुठे सांगायला लागला आहेस." निखिलला सुयशच्या बोलण्याचा रोख समजेना.
"ऐक ना. देवळात जाता जाता उभ्या देवाशी थांबलो. तिथे वरच्या बाजूला दगडावर एक पोरगा बसला होता. त्याने लै भारी गोष्ट सांगितली. म्हणजे देवळाच्या पलीकडे नदी आहे. नदीच्या बाजूने रस्ता जातो.  आडवाट आहे आणि तसा शुकशुकाटच असतो कायम त्या वाटेवर.  तिथून गेलं तर एक बाई आणि मुलगी  हटकून थांबवतेच कुणालाही. पत्ता विचारते खालच्या वाडीतल्या देशमुखांचा. तो पोरगा भेटला ना त्याचा मुंबईचा पाहुणा गेला होता, खरं आहे का त्याची खात्री करायला.  आणि दिसली की ती बाई आणि मुलगी त्यालाही. त्याने पत्ता सांगितला. गप्पा पण मारल्या.  ती  भूतं  नव्हती, माणसंच होती याची खात्री पटली त्याला.  सायकलवर बसला आणि निघाला गडी. मागे वळून बघायचं नाही असं सांगितलेलं ना म्हणून मुद्दाम मागे वळून पाहिलं. रस्ता ओसाड. बाई नाही, मुलगी नाही. नजर पोचेल तिथपर्यंत चिटपाखरुही नव्हतं. घाबरला. तर्हाट मारली सायकल. घरी आला आणि चार दिवस ताप."
"सगळ्या वाडीला ठाऊक आहे ही गोष्ट." निखिल थंडपणे म्हणाला.
"चल ना आपण जाऊ."
"तिन्हीसांजेलाच जावं लागतं. पाठवणार नाही कुणी आपल्याला घरातून."
"आता ते पलिते तरी कुठे दिसले. काहीही नसतं बाबा असलं."
"तुला आधीच सांगितलं होतं तिथे गेलं तर काही दिसत नाही म्हणून."
"बरं ठीक आहे. तू त्या रस्त्यावर येणार की नाही ते सांग."
"बाबांना विचारावं लागेल."
"सगळीकडे मामा कशाला? तो पोरगा म्हणालाय मी येईन पाहिजे तर."
"अरे त्याचं नाव सांग आधी."
"विसरलो रे. आज तू पण चल ना देवळात. असला तिथे तर भेटेल."
"बरं बघू. पण तुला ते तसलं तर घरातही बघता येईल."
"म्हणजे?"
"महापुरुषाची चक्कर असते घरातून."
"महापुरुष?"
"घराण्याचा मूळ पुरुष असतो तो."
"अच्छा."
"अमावास्येच्या दिवशी येऊन जातो."
"दिसतो?"
"नाही. पण रात्री लावलेली दाराची कडी उघडलेली असते. आणि वरच्या माळ्यावर झोपलास ना तर रात्री कुणी तरी उठवतं गदगदा हलवून."
"काय खतरनाक गोष्टी सांगता राव तुम्ही." सुयशला गंमत वाटायला लागली होती.
"अजून सांगतो ना पुढे." निखिलला चेव चढला.
"नको." सुयशने उडवून लावलं.

नंतरचे दोन दिवस सुयशबरोबर जाणं निखिलला जमलंच नाही. नारळ सोलायचे होते, शेजारच्या वाडीत पोचवायचे होते. फणस झाडावरून उतरवायचे होते.  सुयशने त्याच्याबरोबर थोडावेळ राहिला पण शंकराच्या मंदिराने त्याला वेड लावलं होतं. जाता जाता तो पोरगा भेटायचाच. त्याच्याशी गप्पा मारायच्या. देवळात पोचलं की मस्त पुस्तक वाचत बसायचं.  तिथल्या नीरव शांततेत रहस्यकथेच्या पुस्तकातलं वातावरण जिवंत झाल्यासारखं वाटायचं. त्याचा मग तो नित्यक्रमच होऊन गेला. म्हणता म्हणता सुट्टी संपलीही.  घरातल्या सगळ्यांचा निरोप घेऊन तो निघाला. निखिल त्याच्याबरोबर राजापूरपर्यंत येणार होता. सुयशला गाडीत बसवून, राजापूरची कामं आटपून निखिल सोल्ल्याला परतणार होता. सुयश गाडीत चढला. खिडकीच्या गजांना धरुन  निखिल त्याच्याशी बोलत राहिला.
"आता पुढच्या मे महिन्यात ना?"
"बघू, पण तुम्ही मुंबईला दिवाळीत याल ना?"
"येऊ की."
"आणि पुढच्या वेळेस भुतं दाखवली नाहीस तर मान्य करावं लागणार आहे तुला असलं काही नसतं म्हणून कळलं ना?" सुयशने एक वर्ष  वाढवून दिलं होतं निखिलला. दरम्यान त्यालाही जरा या विषयावर संशोधन करायला अवधी मिळणार होता.
"नक्की यार. बघ पुढच्या वेळेस तुझा नक्की विश्वास बसणार."
"ते शंकराचं देऊळ मात्र भारी आहे एकदम. जाम आवडलंय मला. आणि तो पोरगा. कायम वाटेवर कुठेतरी भेटायचाच. आयला, अरे त्याचा निरोप घ्यायचा राहिलाच. तू सांग त्याला भेटला की."
"तू नाव कुठे सांगितलं आहेस त्याचं."
"अरे हो, सांगितलंच नाही ना मी नाव त्याचं. अव्या."
"अव्या? अरे पूर्ण नाव सांग ना."
"अविनाश रे. अविनाश  चव्हाण."
"अविनाश चव्हाण?" डोळे फाडून  निखिल सुयशकडे पहात राहिला.
"अरे असा काय पहातोस? काय झालं?" सुयशला निखिल त्याच्याकडे असा का बघतोय ते समजेना.
"तू काय म्हणालास? त्या मुलाचं नाव काय सांगितलस?"
"काय पहिल्यांदा हे नाव ऐकतोयस का? अविनाऽऽश." खिडकीच्या दांड्यावर धरलेला निखिलचा हात एकदम बाजूला झाला.  हातापायातलं त्राणच गेलं त्याच्या.
"अरे, काय झालं? तू असा भूत बघितल्यासारखा काय करतोयस? तेच नाव सांगितलं त्याने." निखिलचा चेहरा पांढराफटक का पडलाय तेच सुयशला कळत नव्हतं.
"निखिल अरे, काय झालं तुला? पटकन बोल रे. गाडी चालू होतेय. बोल ना. अरे, बोल पटकन..." सुयशचं बोलणं संपेपर्यत गाडी चालू झालीच. निखिल जीवाच्या आकांताने गाडीच्या मागून धावला. सुयश खिडकीतून वळून वळून मागे पहात होता.  चिरक्या आवाजात निखिल ओरडला,
"सुयश, अरे अविनाश चव्हाण गेल्या वर्षी साप चावून वारला. तू भूत पाहिलंस सुयश. तू भूत पाहिलंस........"