Saturday, November 26, 2011

तिने काय करावं?

कोणे एके काळी ती त्याला गाडीत भेटली. तो त्याच्या गावी गेला होता. ती मैत्रिणीबरोबर परत येत होती. तिच्या हातात डायरी. दोघी कविता वाचनात मग्न. तो अधुनमधुन डोकावत असला  डायरीत, तरी तिला त्याची कल्पना नव्हती. त्या दोघींचं जगच निराळं होतं. एकदम त्याने डायरीच मागितली वाचायला. नाही कसं म्हणणार?
"डायरी आहे."
"हो, तीच मागतोय." त्याने धीटपणे म्हटलं.
"कविता आहेत. बाकी विशेष काही नाही."
"त्याच वाचायच्या आहेत."
"आवडतात?" असं म्हणत तिने त्याच्या हातात डायरी सुपूर्द केली. तो वाचत राहिला. त्या गप्पांमध्ये रंगून गेल्या.
मुक्कामाला डायरी परत घेत तिने निरोप घेतला. तो वळून वळून पाहत राहिला. दोघी हात हलवत निघूनही गेल्या.

आणि एकदम त्याने तिला पत्रच पाठवलं. एक नाही दोन. म्हणजे त्याला माहीत नव्हतं की त्याचं पत्र तिला मिळालं आहे की नाही म्हणून हे दुसरं पाठवलेलं.

’आपली ओळख अगदी निसटती. स्पर्धेच्या गोंधळातली, बक्षीस विजेत्यांच्या गर्दीतली. तुझ्या कविता खूप भावल्या. कवितेनं किती जवळ आणलं आपल्याला. तुझ्या चेहर्‍यावर बक्षिसाचा आनंद ओसंडून वहात होता. मी तुझ्या हास्याच्या सरीत न्हाऊन निघत होतो. तुला त्याची जाणीवही नव्हती. मग गाडीतही भेटलो. म्हणजे मुद्दाम वाकडी वाट करून मी त्या गाडीत शिरलो. किती सहजतेने निरोप घेतलास. मला मात्र, खूप वेळ काहीतरी हरवल्याची जाणीव होत राहिली. घरी आल्यावर अगदी आठवणीने पत्र धाडलं. डायरीत होता तुझा पत्ता. पोचलंच नाही का ते तुला? की एवढं धाडस आगाऊपणाचं वाटलं? पत्रासोबत काव्यंमालेचा अंकही जोडला होता नमुना म्हणून. खूप दिवस उत्तराची वाट पाहिली. मग वाटलं, काहीतरी सापडल्यासारखं वाटत होतं पण चिमटीत येतायेताच निसटून गेलं. जाऊ दे, नशिबातच नाही म्हणायचं, दिवसामागून दिवस लोटले. कधीमधी तुझी आठवण सतावत राहिली. पण पुन्हा लिहायचं धाडस कसं होणार? काल खूप बेचैन होऊन समुद्रावर भटकत राहिलो. कंटाळून परत आलो तर ’काव्यमाला’ दाराच्या फटीतून आत आलेली. जरा वैतागानेच अंक उघडला. तू ’सोबत’ घेऊन आली होतीस. मन चिंब चिंब झालं. पुन्हा एकदा तीच सहजता. तीच निरागसता बरसून गेली. आठवणीतली वीज चमकून गेली.  अशीच सरीमागून सरीसारखी धावत ये. चिंब चिंब भिजवत राहा. तुला आवडणार नाही कदाचित, पण मनात अंकुरलं, खूप लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं.’

खरं तर पहिलं पत्र मिळालं होतं. नशीब, घरात कुणी न फोडता ते तिच्या ताब्यात आलं होतं. नमुन्याच्या अंकातला पत्ता पाहून तिने आपली कविता लगेच पाठवूनही दिली होती. समजलं असेल का ते त्याला? पत्राला मात्र उत्तर पाठवलं नव्हतं. चेहराही आठवत नाही त्या मुलाला कशाला लिहायचं पत्र?
तिला आवडलं ते पत्र पण तो कोण हे काही केल्या लक्षात येईना. कविता, काव्यंस्पर्धा हा तर तिचा जीव की प्राण. बक्षिसं, मित्रमैत्रिणींचा सततचा घोळका, स्पर्धांमधल्या ओळखी. कोण असेल हा? काही दिवस ती त्या प्रश्नात रमली आणि नंतर विसरलीही. त्याच्या धाडसाला अनुत्तरित प्रतिक्रियेने पूर्णविराम मिळाला.

वर्ष लोटली.  ती सुखासमाधानात न्हाऊन निघालेली. कवितेच्या दुनियेतून संसारात, नोकरीच्या व्यापात रमलेली. फेसबुकचा जमाना आला आणि जुन्या ओळखी शोधण्याचं वेड  लागलं. काही नावं आठवली काही कुठून कुठून शोधून काढली. त्यातलाच एक तो. त्याचं अडगळीत पडलेलं पत्र सापडलं आणि तिला वाटलं तेव्हा नाही पण आता तरी त्याचा चेहरा पाहावा. शोधलंच मग तिने त्याला. त्याच्या नावासारखी तीन चार नावं होती. काय लिहिणार प्रत्येकाला? कधीतरी कुठेतरी झालेली आपली ओळख (एकतर्फी) असं तूच म्हणाला होतास, पत्र पाठवली होतीस दोन तो तूच का? त्याने लिहिलेल्या पत्रातल्या काही ओळी पण लिहाव्यात म्हणजे कदाचित आठवेल ते त्यालाही. तिने तसं केलं आणि त्याचं उत्तर आलं. तो तोच होता. त्याला अद्याप आठवत होतं सारं काही. तिच्याकडे आठवण्यासारखं काही नव्हतंच. पण त्याचा चेहरा पाहायची उत्सुकता होती. फोटोच नव्हते पण फेसबुकवर. असं कसं म्हणणार नं की टाक बुवा तुझे फोटो. कोण होता तो माझ्या प्रेमात पडलेला ते पहायचं आहे. ती मग गप्प राहिली. तू कुठे, मी कुठे झालं आणि तो म्हणाला, मी येतो तुझ्या गावात कधीतरी. बापरे, मग आता त्याला काय घरी ये म्हणायचं? नवर्‍याला काय सांगायचं?  तिने बरेच दिवस उत्तरच पाठवलं नाही त्याला.

आणि एक दिवस त्याचा फोन आला. ’कुठून शोधला याने नंबर?’ भेटायला येतो म्हणाला.  तिने नवर्‍याला थोडंफार सांगितलं, म्हणजे गाडीत ओळख, त्याने कवितेचा पाठवलेला अंक असं वरवरचं. नवरा म्हणाला मग जेवायलाच बोलाव. अनोळखी माणसाला एकदम जेवायला बोलवायचं? काय बोलायचं? पण उत्सुकतेपोटी तिने ते केलं. मनात कुठेतरी प्रश्न होता. तेव्हा उत्तर पाठवलं असतं तर आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं का? स्वत:च्या संसाराची बेरीज वजाबाकी मनातल्या मनात करून झाली. सगळं आलबेल होतं. पण  तो काय करतो? त्याचा संसार? तिला स्वत:चीच लाज वाटली. आता इतक्या वर्षांनी असा विचार मनात तरळून जावा. जाऊ दे. त्याला एकदा येऊन तर जाऊ दे, मग नाही संपर्क ठेवायचा.

तो आला आणि तिला तो मुळ्ळीच आवडला नाही. म्हणजे पहिला प्रभाव वगैरे म्हणतात ना तो काही पडला नाही तिच्यावर. त्यावेळेस उत्तर पाठवलं नाही ते किती बरं झालं. येताना कवितांचं बाडच घेऊन आला होता. कवितांवर कविता वाचत राहिला. नवरा कामाचं निमित्त काढून उठलाच तिथून. जाता जाता तिच्याकडे मिश्किलपणे हसून पाहायला तो विसरला नाही. ती ऐकत राहिली. ओढून ताणून छान, मस्त म्हणत राहिली. तीन चार तासांनी तो गेला. पुढच्यावेळेस आणखी कविता आणतो म्हणाला.

गेल्यानंतर त्याचा फोन आला, फेसबुकवरून तो पत्र पाठवत राहिला. तिने आता काय करावं? म्हणजे पत्रांना उत्तर नाही पाठवत ती पण तो तिच्या गावात येतो. पुढच्या वेळेस कवितांचं बाड घेऊन आला आणि घरी येतो म्हणाला तर...? काय करायला हवं तिने? सुचवाल एखादा मार्ग?

Wednesday, November 23, 2011

माझा स्पेलिंग बी स्पर्धेतील सहभाग

"आई, मी स्पेलिंग बी मध्ये भाग घेतेय."  मुलीने जाहीर केलं आणि माझा चेहरा खाडकन उतरला.
"अगं त्यासाठी स्पेलिंग यावी लागतात." माझ्या स्वरातली अजिजी तिच्या पर्यंत पोचली नाही.
"मग?"
"मला येत नाहीत."
"पण भाग मी घेणार आहे. खी खी खी...."
"हो, पण तुझी तयारी मला करून घ्यावी लागेल नं." माझं केविलवाणं स्मित.
"ईऽऽऽ त्यात काय आहे. तू मला शब्द विचार, मी स्पेलिंग सांगेन."
"अगं पण ते शब्द विचारता यायला हवेत ना मला?"
मुलगा फजिती बघायला उभा होताच. फजितीची फटफजिती झाली तर पाहावी म्हणून तोही मध्ये पडला.
"बाबा तर म्हणत होता तुझ्याकडे इथली पण पदवी आहे."
"शिक्षणाचा काही उपयोग नसतो काहीवेळेस"
"हं..........खरंच की." एकदम साक्षात्कार झाल्यासारखं तो म्हणाला.  घाबरायलाच झालं. पठ्ठ्या एकदम शाळा सोडून द्यायचा, शिक्षणाचा उपयोग नसतो  त्याचं उदाहरण समोरच आहे म्हणून.

तो पर्यंत मुलीने शाळेतून आलेला शब्दांचा कागद पुढे केला. पाहिलं आणि धडधडलं. किती हे शब्द. हे सगळे विचारायचे?
"विचार ना." मुलगी वाट बघत, मुलगा आव्हान दिल्यासारखा.
एकदा कागदावर नजर रोखत, एकदा तिच्याकडे कटाक्ष टाकत पटकन किती शब्द विचारता येतील याचा मी अंदाज घेतला.  मला उच्चार करता आले आणि तिला स्पेलिंग्ज सांगता आली. दोघी खूश.
"उरलेले शब्द नंतर. आता कंटाळा आलाय."
"दे मग तो कागद."
"नको राहू दे माझ्याकडे."
"कशाला?" ती तशी सरळ आहे त्यामुळे तिचे प्रश्न पण सरळच असतात. उगाच वाकडा विचार, कुसकट प्रश्न असं मिश्रण नसतं. पण सुपुत्र कडमडलेच मध्ये.
"राहिलेल्या शब्दांचा अर्थ गूगल करणार असेल आई. उरलेले शब्द नंतर विचारते म्हणाली ना."
"शाबास! कसं बरोबर ओळखलंस. फुटा आता."
"म्हणजे?"
"निघा इथून असा आहे त्याचा अर्थ."

माझी खरी कसोटी होती उच्चारांची. गूगल करून उच्चार थोडेच सापडतात? माझ्याच वाट्याला असे शब्द का येतात कुणास ठाऊक. पुन्हा आपण उच्चार चुकीचा करतोय हे कळत असतं तर तो चुकीचा कसा करू? ते नेमकं दुसर्‍यालाच समजतं. चुकीचं हे नेहमी असं असतं. आपल्याला आपली चूक वाटतच नाही. परवा एका मैत्रिणीकडे गेले होते. अपार्टमेंटचा नंबर सांगणारा बाण होता. त्या बाणाच्या दिशेने तीन वेळा गाडी नेली पण इमारत काही दिसेना. म्हटलं. अपार्टमेंटवाले बाणाची दिशा दाखवायला चुकले बहुतेक. तसं असतं हे. आपण चुकलो असं वाटतच नाही त्यामुळे सगळ्या समस्या.

माझा वाढदिवस नोव्हेंबर मध्ये. ऑफिसमध्ये कुणी विचारलं की दुसराच महिना सांगावा असं वाटतं. नोव्हेंबर म्हटलं की लगेच
"ओ यू मीन नोवेंबर?" आलंच. पुन्हा आमच्या मराठीत असंच म्हणतात असं कसं सांगणार, तरी कधीतरी पुराव्यानिशी सिद्ध करता यावं म्हणून भिंतीवर लटकवलेल्या कालनिर्णयवर  पाहून खात्री केली नोव्हेंबरची. हापिसात सर्वांना तेवढं मराठी यायला लागलं की दाखवेन. नाहीतरी उठसूठ ’नमस्ते’ करत राहतात त्याऐवजी असं काहीतरी शिका म्हणावं.

हल्ली तर कुणाचं लक्ष नाही किंवा नीट ऐकलं नाही म्हणून  कुणी ’से इट अगेन’ म्हटलं की मला वाटतं, चुकला उच्चार. मग बरोबर केलेल्या उच्चाराचीही वाट..... सगळी अक्षरं एकत्र करून शब्द म्हणण्यापेक्षा सुट्टी अक्षरं खपवावीत त्यापेक्षा, नाहीतर सगळा व्यवहार इ मेलने. बोलायचं म्हणून नाही. या सगळ्या युक्त्या मुलीसमोर चालणा‍र्‍या नव्हत्या. घरात पितळ फार लवकर उघडं पडतं/ पितळी फार लवकर उघडी पडतात.

दुसर्‍या दिवशी ज्या शब्दांचे अर्थ माहीत नव्हते त्यांचे गूगल करून शोधले. उच्चारांची बोंब होतीच पण आता निदान अर्थ तरी माहीत होते. तरीही संकट 'आ' वासून उभं होतंच. ते कधी पडत नाही, उभंच राहतं.  उच्च्चार नीट झाला नाही तर मुलगी स्पेलिंग कशी सांगणार? चुकली की स्पेलिंग सांग म्हणणार. स्पेलिंग सांगितलं की चुकीचा उच्चार केला म्हणून डोळे गोल बिल फिरवून नाराजी व्यक्त करणार. इतकी वर्ष अशा प्रसंगातून सुटण्याचा माझ्याकडे उत्तम मार्ग होता,
"माझ्या मागे काय लागता. मी किती करू, नोकरी पण करायची, घरकाम पण करायचं, अभ्यास पण घ्यायचा...."  अर्धा तास तेच तेच ऐकायला नको त्यामुळे पोरांनी आधीच पोबारा केलेला असायचा. पण आता तेही फारसं मनावर घेत नाही कुणी. बाकिची कामं करून टाकतात तेवढ्या वेळात.

Liz - मराठी इंग्लिशमध्ये 'लिझ' म्हटलं की इंग्लिश इंग्लिश मध्ये त्याचं Lease होतं.  Rich आणि Reach, be आणि bee माझा उच्चार दोन्हीसाठी एकच असतो.  थोडे दिवस मग मी असे आणखी कुणी उच्चार करतं का यावर पाळत ठेवली.  बर्‍याच मैत्रिणी निघाल्या तशा. पण हा पुरावा फारसा मौल्यवान नव्हता मुलांसाठी.
आमच्या  स्पॅनिश बंधू भगिनी माझ्या 'स्टाइल'चेच उच्चार करतात हे कळल्यावर आधी पोरांना सुनावलं.
"बघा, हा काही आमच्या इंग्रजी शिक्षकांचा दोष नाही. त्यांनी बिचार्‍यांनी आम्हाला नीटच शिकवलं होतं. हे इंग्लिशच विचित्र आहे." दोघा भावंडांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं.

"जाऊ दे ना मी वेगवेगळ्या उच्चारांचा सराव करते. परीक्षक स्पॅनिश, चायनीज असले तर"  मुलीने शरणागती पत्करली. एरवी प्राण गेला तरी लढा, वगैरे धडे देते मी, ते आवरले यावेळेस. गेल्या तीन आठवड्यात वेगवेगळ्या उच्चारात शब्दांची तयारी झाली आहे. लवकरच किल्ला सर करायचा आहे."  बघू काय होतं ते.

ता. क. -  या वर्षी मी देखील तिच्या शाळेत स्पेलिंग बी च्या प्राथमिक फेरीसाठी  परीक्षक आहे :-) फक्त तिच्या गटाला नाही. सुटली....


Saturday, November 12, 2011

प्रवास.....

गेल्या आठवड्यात मायदेशातून परत आले माझ्या देशात.  दरवेळेला बसतो तसा सांस्कृतिक धक्का नाही बसला यावेळेस. कदाचित वर्षाच्या आत फेरी झाली म्हणून जाणवलं नसावं. प्रकर्षाने जाणवलं ते इतकंच की प्रवासात  सहप्रवासी संवाद साधायला अजिबात उत्सुक नाहीत. एअरपोर्ट ते पुणे के. के. ट्रॅव्हल्सने गेले. तीन तासाच्या प्रवासात अगदीच हु का चु न करता कसं बसणार म्हणून मी काही ना काही बोलायचा प्रयत्न करत होते पण बरोबरच्या प्रवाशांना काहीच रस नव्हता. बाजूला बसलेल्या बाई तर मराठी बोलेचनात. मला वाटलं खूप वर्ष परदेशात राहिलं की होतं ते झालं असावं याचं. पण त्या फक्त ८ दिवसांसाठी गेल्या होत्या दुसर्‍या देशात. शेवटी ड्रायव्हर आणि मी, आम्ही  मात्र जिव्हाळ्याच्या चार शब्दांची अदलाबदल केली. बाकी सारा प्रश्नोत्तरांचा खेळ. म्हणजे मला कुणीच काही  विचारलं नाही. मी विचारलेल्या प्रश्नांना फक्त उत्तरं दिली. तेवढ्याही त्या प्रवासात ड्रायव्हर महाशयांनी त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाला विचारलं,
"तुम्ही शूज काढलेत का आत्ता?"
ते गोंधळलेच.
"हो, का?"
"वास मारतोय" असं म्हणत ड्रायव्हरनी खिडकी उघडली.
प्रतिक्षिप्त क्रिया होऊन मी पुढे पसरलेले पाय मागे घेतले :-).
प्रत्येकाला आपल्या पायाचा तर....ही शंका असणारच मनात. पण बाकी सारे स्थितप्रद्न्यासारखे बसण्यात यशस्वी झालेले दिसले. घर आलं आणि श्वास घेतला मोकळा. संपला एकदाचा प्रवास.
रत्नागिरीहून पुण्याला येताना तोच अनुभव. बाजूला बसलेली सहप्रवासी अगदी थंड स्वरात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. बाकी फोनवर बोलणं, नाहीतर इ मेल तपासणं हेच अव्याहत.

परत येताना विमानातल्या १६ तासात मला आठवत राहिलं वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या प्रवासाचं स्वरुप.  प्रवासात झालेल्या ओळखी, काही टिकलेल्या, बर्‍याच प्रवास संपल्या संपल्या विरुन गेलेल्या. पुसट होत गेलेले चेहरे, प्रसंग.....ते देखील एकाशी दुसर्‍याचा काही संबंध नसलेले.

बाहेरगावाहून रत्नागिरीला परत आलं की हमखास कुणीतरी आडगावात जाणारं असायचं गाडीत. स्टॅडवर वेळ काढायचा असायचा पाच सहा तास. अशा प्रवाशांचे ते पाच सहा तास गाडीत झालेल्या ओळखीवर  आमच्या घरी जायचे.

८३-८४ च्या आसपासची गोष्ट. परळ ते रत्नागिरी. काका (मावशीचा नवरा) आले होते पोचवायला बस स्थानकावर. नाव पाहून गाडीत बसणार तर ही गाडी नाहीच असं म्हणाले कंडक्टर. आम्ही आपले सारखे चौकशी करत. शेवटी कळलं तीच गाडी होती रत्नागिरीला जाणारी. गेली निघून. मग काकांनी चौकशीच्या तिथे धारण केलेला रुद्रावतार. शेवटी एस. टी. ने पैसे परत करण्याचं केलं मान्य. पण आता दुसरी समस्या. आरक्षण कुणा दुसर्‍याच्या नावाने केलेलं. पैसे त्याच्याच नावाने मिळणार. त्यानंतर बोरिवलीच्या ते रहात तिथल्या परिसरात प्रत्येकाला ठाऊक होतं की पाखर्‍यांच्या नावाने मनिअऑर्डर आली तर देसायांकडे पाठवायचं.

त्याही आधी म्हणजे गुजरात जवळच्या पालघरला आम्ही रहायचो तो काळ ७७-७८ सालचा. बहीण कोकणात गेली होती आजी आजोबांकडे. तेव्हा  फोन घराघरात नव्हता. परत येताना ओळखींच्या बरोबर ती मुंबईला येणार होती. माझे काका तिला पालघरला आणून सोडणार होते.
अख्खा दिवस पुतणीची वाट पहात काका  स्टॅडवर उभे. आत्ता आली गाडी तर.....या भितीने जेवणासाठीही त्यांना तिथून निघता येईना. कंटाळून संध्याकाळी शेवटी ते परत गेले. माझे वडिल संध्याकाळपर्यंत मुलगी आली नाही म्हणून रात्री त्यांच्या घरी पोचले. काका आणि वडिलांची वरात ओळखींच्यांच्या घरी. पाहातात तर तिथे सगळी जेवत बसलेली. गाडी कोकणातून सहा तास उशीरा सुटली होती. पण एकमेकांशी संपर्क साधायला मार्गच नव्हता काही.

त्यावेळचा प्रवास, त्यातून घडलेले किस्से त्या त्या वेळेस फारसे महत्वाचे वाटले नव्हते नक्कीच. पण आता मात्र त्या क्षणांची मजा औरच वाटते; विशेषत: हल्ली होणार्‍या प्रवासात तसं काही घडतच नाही तेव्हा.......