Wednesday, March 29, 2017

शिव्या

बातम्या वाचायला फेसबुक उघडलं. त्या वाचून झाल्या आणि माझ्या अंगात संचारलं. मी सारखं फुल्या फुल्या फुल्या म्हणायला लागले. आता तर बरी होती अशा नजरेने मुलगी येता जाता कटाक्ष टाकत होती. नवर्‍याला त्याच्याशी लग्न झाल्यावर माझं ’वाटोळ्ळं’ झालंय हे माझ्या तोंडून ऐकून पाठ आहे त्यामुळे तो असल्या क्षुद्र गोष्टींकडे ढुंकूनसुद्धा लक्ष देत नाही. फुल्यांचा अर्थच कुणी विचारत नाही म्हटल्यावर मी फुल्यांचा जप सुरु केला. मग दोघांनी मिळून मला बसवलं. मुलीने जरा काही झालं की मराठी मालिकांमध्ये पाणी देतात तसं धावत पळत जाऊन पाणी आणलं. ते आणताना अर्ध सांडलं. मी परत एकदा फुल्या फुल्या म्हटलं. तिने ते भांडं माझ्या तोंडापाशी इतक्या जवळ धरलं की त्यानंतर एकपण फुली बाहेर आली नाही.
"हं, आता सांग तुला काय झालंय?" नवर्‍याचा स्वर इतका प्रेमळ होता की आजच लग्न झालंय की काय असं वाटलं. पण समोर मुलगी जगदंबेसारखी उभी  होती त्यामुळे लगेच जमिनीवर परत आले.
"फेसबुक चढलंय." मी दारु चढल्यासारखे अंगविक्षेप केले. खरं तर असे अंगविक्षेप मी फक्त चित्रपटातच पाहिले आहेत. मला चढली की मी हसत सुटते पण नाट्यपूर्ण परिणाम साधण्यासाठी बसल्या बसल्या तोल गेल्यासारखे हात पाय हलवले. तिकडे दुर्लक्ष करत मुलीने जाब विचारला.
"पण हे फुल्या फुल्या फुल्या काय आहे?"
"फेसबुकवर खूपजणं खूपजणांना शिव्या देत असतात. मग मला पण वाटलं आपणही द्याव्या."
"मग दे ना. नको कुणी म्हटलंय?" मुलीला समजत नव्हतं.
"अगं, अशा कश्या शिव्या देणार?"
"कशा म्हणजे? तोंडाने." ही इथे वाढलेली कार्टी... सगळं शब्दश: घेतात. तेवढ्यात ती म्हणाली,
"पण फुल्या, फुल्या, फुल्या का म्हणायचं?"
"लिहिताना पूर्वी शिव्यांच्या जागी फुल्या फुल्या फुल्या वापरायचे. मग ’सभ्य’ माणसं बोलताना शिव्यांऐवजी फुल्या वापरायला लागली."
"अच्छा... मग आता?" मुलीला शिव्याज्ञान वाढवायची इच्छा झाली असावी. इथे   फ* आणि शि* एवढ्या दोनच शिव्या ऐकते ती बाहेर. मराठीत शिव्यांचा खजिना असावा असं तिला वाटायला लागलं.
"आता सरळ शिव्या लिहितात असं दिसतंय."
"मग तू पण घरात फुल्या, फुल्या म्हणत राहण्यापेक्षा फेसबुकवरच द्यायच्यास ना शिव्या मग."
"छे, छे काहीतरीच काय? असं खुल्या मैदानात शिव्या घालणं माझ्या रक्तात नाही."
"पण तू तर मला मूर्ख, बावळट म्हणतेस."
"ते घरात. आणि मला माझी आई तसं म्हणायची म्हणून मी तुला म्हणते. परंपरा थोडीतरी चालवायला हवी ना.  ह्या शिव्या नाहीतच आता. फार भारी भारी शिव्या देतात लोकं एकमेकांना."
"का?"
"काय माहीत. दुसर्‍याचं मत पटलं नाही की द्यायच्या असतात बहुधा."
"अच्छा. बघू तरी. आपल्याला घरातच वापरता येतील." मुलीला फारच आनंद झाला.  दोघं माझ्या भिंतीवर चढले. तिथल्या शिव्या जागोजागी दिसतच होत्या. त्या बघून नवरा हबकलाच.
"आयला, ह्या अशा शिव्या?  ही ह्यांच्या घरातली परंपरा की काय?" त्याचं नवल काही केल्या ओसरत नव्हतं.

 आता ही परंपरा आहे का की बिघडत चाललेली वृत्ती, शिव्यांची नक्की व्याख्या काय की असं चालायचंच त्यात काय एवढं या विषयावर आमचं भांडण रंगलं आणि फेसबुकवरच्या शिव्या फुल्या फुल्या होत जागोजागी सांडायला सुरुवात झाली....           मोहना!

Saturday, March 18, 2017

शाळा

शाळेचं नाव घेतलं की जीवात कसं गलबलतं
सारं काही उगाचच ओळखीचं भासतं!

एकच शाळा हाच शिक्का अनमोल
हर एक मनातला ओलावा खोल!

कुणीतरी कुणाला ओळखलं
आठवणींच्या गजर्‍यात पुन्हा ओवलं!

काही चेहरे प्रेमात पडलेले
काळाच्या ओघात दुरावलेले!

काही चेहरे प्रेम व्यक्त न केलेले
पुन्हा इथे डोकावलेले!

असतो एखादा तरी दुवा
जागवतो मनातला मेवा!

रस्त्याच्या कडेचं अरबट - चरबट खाणं
हिरव्यागार मैदानावरचं सुसाट पळणं!

मैदान,  शिक्षक, मित्र - मैत्रिणी
मनाच्या फळ्यावर सार्‍याची गर्दी!

प्रत्येकाच्या आठवणींची वेगळी पाटी!
कमावलं, गमावलंची पुसट नक्षी!

तेवत ठेवू दिवा स्नेहाचा
शाळेतल्या सवंगड्यांचा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Tuesday, March 14, 2017

मराठी नाटक मंतरलेली चैत्रवेल झलक



एक झंझावत. झोडपलं गेलेलं घर आणि त्या पडझडीत स्वत:चं रहस्य जपत वावरणारी माणसं. आपापल्या रहस्याला कवटाळून बसलेली. या माणसाच्यासहवासात बाहेरच्या व्यक्तींचा प्रवेश होतो आणि ती देखील या रहस्याचा एक भाग बनून जातात. प्रत्येकाचं आयुष्य बदलून जातं. गुंतागुंत वाढत जाते. कसा सोडवतात हा गुंता ही सारीजणं? काय होतं अखेर?


फोटो आणि इतर एकांकिका या दुव्यावर - https://marathiekankika.wordpress.com/