Wednesday, April 1, 2015

धागे

नील महाविद्यालयीन शिक्षणासाठी दुसर्‍या गावात राहायला गेला. त्याची तिथली व्यवस्था लावताना इतर प्रश्नांबरोबर आता त्याचा भारतातल्या नातेवाईकांशी, विशेषत: आजी, आजोबांशी संपर्क कसा राहणार हा प्रश्न केतकीच्या मनात वारंवार यायला लागला. संपर्काची आधुनिक साधनं आजी, आजोबांना ठाऊक नव्हती आणि नील आवर्जून फोन करेल याची केतकीला खात्री नव्हती. पण आधी तो दुसर्‍या गावी रुळणं महत्वाचं होतं. मग पाहू त्याने भारतातल्या मंडळीशी कसं संपर्कात रहायचं ते हाच विचार केतकीने केला. सुरुवातीला मनात आलेल्या शंका, प्रश्न हळूहळू मागे पडत गेले ते नील उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी घरी येईपर्यंत. नील घरी आला आणि घर भरल्यासारखं झालं. तसा असायचा सारखा बाहेरच. मित्रांमध्ये, धावायला असं काही ना काही चालू असायचं. पण तरीही त्याचं गावात असणंही केतकी, सारंगला पुरेसं होतं. तो घरी आल्यापासून पहिल्यांदाच  निवांत गप्पा मारत तिघं बसले आणि एकदम नील म्हणाला.

"एकेक करुन सगळ्यांना फोन करतो भारतात. खूप दिवसात बोललोच नाही कुणाशी." केतकी पाहत राहिली. तिच्यादॄष्टीने हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. गेल्या चार महिन्यात अनेकवेळा मनात येऊनही तिने काही विचारलं नव्हतं आणि आज अचानक नीलच स्वत:हून फोन करण्याबाबत म्हणत होता.
"खरंच? कर फोन. मी बोलते तेव्हा सगळेच चौकशी करतात तुझी. तूच फोन केलास तर खूप आनंद होईल सगळ्यांनाच. पण आज एकदम कसं काय वाटलं तुला?" न रहावून तिने विचारलंच.
"अगं या वेळेला भारतात एकटाच नाही का जाऊन आलो. त्यामुळे कसं प्रत्येकाशी ’कनेक्ट’ झाल्यासारखं वाटतंय. एरवी कायम तुमच्याबरोबर शेपटासारखा असायचो मी." तिला हसायला आलं. शेपटासारखा! मुलगा योग्यं उपमा पण द्यायला शिकला होता. खरं तर त्याला एकटं भारतात पाठवायचं की नाही यावर किती चर्चा, वाद झाले होते घरात. केतकी तब्बल ३ आठवडे नीलला एकटं पाठवायला बिलकूल तयार नव्हती. पण सारंगला नीलची कल्पना एकदम पसंत पडली. नीलला जिथे जिथे फिरायचं होतं तिथे तिथे सुदैवाने नातेवाईकही होते. तो राहणार त्यांच्याकडेच होता पण त्याला फिरायचं मात्र एकट्यानेच होतं. नेमकी त्याबाबत ती सांशंक होती.
"आई, बारावीत आहे मी. मोठा झालोय. आणि काही अडचण आलीच तर आहेच ना प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी. तू मात्र सगळ्यांना बजावून सांग हे. नाहीतर कुणी सोडणार नाही एकटं मला." केतकी शेवटी तयार झाली. नील ठरल्याप्रमाणे एकटा भारतात जाऊनही आला. महाराष्ट्रातल्या किल्ल्याचं त्याला अप्रूप होतं, शाळा पाहायच्या होत्या. त्याच्या मनातलं सर्व काही करुन झालं. सगळ्या नातेवाईकांना आवर्जून भेटला आणि अनपेक्षितपणे इतक्या वर्षात जे घडलं  नव्हतं ते घडून आलं. त्याच्या मनात भारत, भारतातल्या नातेवाईकांबद्दल बंध निर्माण झाले. आपुलकी वाटायला लागली. तिला मनस्वी आनंद झाला. विरत चाललेले धागे जुळायला लागल्याचं समाधान वाटत होतं.  नाहीतर आता आतापर्यतचं चित्र फार वेगळं होतं. तिच्या मनात भूतकाळ्यातल्या एकेक प्रसंगाची दाटी व्हायला लागली.

दोन चार वर्षापूर्वीचीच तर गोष्ट.
"अरे फोन कर ना भारतात. आजी, आजोबा वाट पाहत असतील." पाच सहा वेळा केतकीने आठवण केल्यावर नीलने फोन लावला.
दोन मिनिटात संभाषण संपलं सुद्धा.
"हे काय, बोलला नाहीस? आजी नव्हती?"
"बोललो की."
"काय?"
"आई काय गं. किती प्रश्न. दोघांनी विचारलं कसा आहेस? अभ्यास कसा चाललाय? मी पण ते कसे आहेत ते विचारलं."
"आणि?"
"आणि काही नाही. मग संपलं बोलणं. बंद केला फोन." नील काहीतरी पुटपुटत निघून गेला. केतकी पाहत राहिली. म्हटलं तर गेली चार पाच वर्ष तरी हे असंच चालू होतं. सतत मागे लागलं की शेवटी तो फोन उचलायचा. त्यातही आपणच करतो फोन, तिकडून येतात का कुणाचे ही कुरकूर असायचीच.  शिंग फुटल्याची लक्षणं म्हणून ती दुर्लक्ष करायला लागली.

नीलच्या लहानपणी भारताच्या दर दोन वर्षांनी होणार्‍या खेपा म्हणजे निसटून गेलेला काळ पकडण्याची खटाटोप. नीलला घेऊन ती भारतात गेली की हे दुरावलेपण मिटवून टाकायची धडपड सुरु व्हायची. नीलच्या चुलत, मावस भावंडांची आजी आजोबांशी जितकी जवळीक असायची तितकीच ती नील बरोबरही असावी हा एकच ध्यास मनाला लागायचा. मग त्या दिशेने तिचे प्रयत्न सुरु व्हायचे. आजोबा अभ्यास घेतायत ना, जा मग नील तूही बस तिथेच, आजीबरोबर भाजी आणायला जा, सुचेल ते जमेल ते करुन दोन वर्षातलं दूरस्थपण मिटवून टाकायचा अट्टाहास असायचा. परत आलं की मग ती नीलला या ना त्या परीने जास्तीत जास्त गप्पा मारायला भाग पाडायची फोनवर.  गाणं म्हण, गोष्ट सांग कुठूनतरी त्याने सर्वांशी बोलावं, त्याचं कौतुक आपण ऐकावं असं वाटायचं तिला. नातवंडं असली तरी सहवास नसेल तर जे  अंतर राहतं ते दूर करण्याचा तिच्यापरीने  प्रयत्न करत राहिली.  दोन्ही घरी केतकीच संभाषणाचे विषय सुचवायची. अभ्यास, खेळ, पुस्तकं, प्रवास एक ना अनेक. नीलला पण दोन्ही घरातल्या आजी, आजोबांचे रोजचे कार्यक्रम सांगून ती त्याबद्दल त्याला बोलायला भाग पाडायची. पण हे सगळं वरवरचं आहे असं तिला आतून आतून जाणवायला लागलं. आठवड्यातून एकदा फोन,  दिड दोन वर्षांनी तीन चार आठवड्यांसाठी केलेली भारतवारी आणि अधूनमधून आलेले आजी आजोबा एवढ्या पुंजीवर तिला तिच्या आजी, आजोबांबरोबर असलेल्या नात्यासारखं नातं, नीलचं त्याच्या आजी आजोबांशी पण व्हायला हवं होतं.  प्रत्येक फोन संभाषणानंतर नात्याचे धागे विरळ होत चालले आहेत की काय या जाणीवेने ती व्याकूळ व्हायला लागली. अमेरिकेतच लहानाचा मोठा झालेला नील स्वत:च्या विश्वात रमायला लागला होता. अगदी जवळचे नातेवाईक सोडले तर तसा तो इतरांना ओळखत तरी कुठे होता? स्काइप, फेसटाइममुळे एकमेकांना पाहिल्याचं समाधान मिळायला लागलं पण संभाषण तितपतच.  कुठेतरी काहीतरी हरवलं होतं, जाणवत होतं पण कळत नव्हतं. मग नेहमीचीच धडपड, खटपट, कारणांचा शोध, भूतकाळात डोकावणं. आणि त्यानंतर अचानक नीलचं भारतात एकट्याने फिरुन येणं. तिला आत्ताही त्याच्याबरोबर झालेला संवाद आठवला.

"यावेळेला मी भारतात एकटाच गेलो तर?" अठरा वर्षाच्या नीलकडे ती पाहत राहिली.
"एकटाच म्हणजे?"
"नेहमी आपण सगळे एकत्र जातो. मला एकट्याला जायचं आहे. सगळीकडे स्वत: जायचं आहे."
"अरे, इतकं सोपं नाही एकट्याने फिरणं. तुला मराठी येत असलं तरी कळेल लगेच कुणालाही परदेशातून आला आहेस ते. नकोच त. कुणी फसवलं, तू हरवलास, नकोच ते."
"नाही होणार. मला फिरायचं आहे. महाराष्ट्र बघायचा आहे." केतकी सांशक होती पण सारंगने नीलची कल्पना उचलून धरली आणि खरंच म्हटल्याप्रमाणे तो एकटा गड, किल्ले करुन आला. नातेवाईकांना भेटला. सगळ्यांचं केद्रस्थान तो होता. केतकी, सारंग असले की काय कसा काय अभ्यास? बरा आहेस ना? इतकंच संभाषण व्हायचं. पण यावेळेला तो सर्वांकडे एकेक दिवस का होईना राहिला होता. त्याच्या अमेरिकेन जीवनशैलीबद्दल, कॉलेज, मित्र मैत्रींणीबद्दल, रहाणीमानाबद्दल सर्वांना प्रचंड उत्सुकता होती. तोही मोकळेपणाने माहिती देत राहिला. नकळत बंध जुळले गेले. नील परत आला तोच मुळी भारतीय असल्याचा अभिमान बाळगत.  शिवाजीमहाराजांनी घडवलेला इतिहास केतकी, सारंगने पुन्हा त्याच्याकडून ऐकला. आजोळच्या गावी काय काय सुधारणा करता येतील याचे बेत त्याने केले. गेल्या अनेक वर्षांत झालेल्या असंख्य भारत भेटीने जे साधलं नव्हतं ते त्याने एकट्याने केलेल्या भारत वारीने साध्य झालं होतं. दोघंही कौतुकाने तो म्हणेल ते ऐकत होते आणि आज तर तो सगळ्यांना फोन करायचं म्हणत होता.  प्रेमाचे धागे विरताहेत की काय असं वाटत असतानाच ते जुळून यायला लागलेले दिसले आणि केतकी समाधानाने नीलच्या म्हणण्याला मान डोलवत राहिली.

 http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_April2015.pdf