Tuesday, March 8, 2011

बोच

भारतातलं  घर भाड्याने द्यायचं होतं. घर तिकडे आम्ही परदेशात. पुतण्या आणि एजंट मार्फत भाडेकरुशी  करार झाला. नवीन भाडेकरु जुनं घर सोडून दुपारी सोसायटीत हजर झाले पण चौकीदार काही त्यांना आत सोडेना. मग फोनाफोनी. एजंट, पुतण्या लगेचच पोचले. सोसायटीच्या नवीन नियमाप्रमाणे पोलिस तपासणीचा दाखला मिळेपर्यंत भाडेकरुला इमारतीच्या आवारात प्रवेश नाही. पोलिसतपासणीचा दाखला मिळायला दोन दिवस लागणार होते. सोसायटीचा नवीन नियम माहित नसल्याने आली का पंचाईत. सामानाचा ट्रक घेवून हजर झालेल्या भाडेकरुचं दोन दिवस काय करायचं ?

पुतण्याने चौकीदाराला ३०० रुपये देवून मामला संपवला. पोलिसतपासणीचे होते फक्त २०० रुपये. कळलं तेव्हा थोडीशी लाज वाटली. तिकडच्या तरुण मुलांमध्ये इतक्या लहान वयात अशीही हुशारी यावे लागते याचा खेद आणि आपणही या यंत्रणेतलाच भाग कसा होवून जातो त्याची शरम. पण हे सगळं क्षणिक.  हल्ली हल्ली या अशा भावनांचाही चावून चोथा झाल्यासारखं वाटतं. उगाच आपलं म्हणायला सारं काही. शेवटी आपलं काम होणं महत्त्वाचं, नाही का?

 त्यावरुन खूप वर्षापूर्वीची एक आठवण उफाळून आली. पासपोर्टसाठी अर्ज केला होता. नवरा  परदेशात गेलेला. आम्ही भाड्याच्या घरात मुंबईत रहात होतो. एकटीच होते गाशा गुडांळून कधीही नवर्‍याच्या सोबतीला जाण्याच्या तयारीत. ते घर कधीही सोडलं तर म्हणून नव‍र्‍याच्या काकांचा पत्ताच सगळीकडे दिला होता. पोलिस आम्ही तिथलेच रहिवासी आहोत का ते पहायला गेले तर नेमके काका घरी नाहीत. शेजार्‍यांनी आम्ही तिथे रहात नाही म्हणून सांगितलं आणि मग चौकशीचा ससेमिरा मागे लागला. कुणीतरी म्हणालं, पोलिस स्टेशनमध्ये जाऊन चिरीमिरी द्या की होईल काम. तोपर्यंत आयुष्यात स्वत:हून कुणाला चिरीमिरी द्यायचा प्रसंग आला नव्हता. सगळं नुसतं ऐकीव. किती द्यायचे? कसं विचारायचं? टेबलाखालून सरकवायचे म्हणजे नक्की काय? लाच द्यायची नाही असा निर्धार करणं सर्वात सोपं असं वाटलं तेव्हा, इतकं या प्रश्नांनी भंडावून सोडलं होतं.

 एकदाची गेले पोलिसस्टेशनमध्ये. सव्वीस वर्षात पहिल्यांदा. एरवी तुरुंग फक्त सिनेमात पाहिलेला. एक दोन कैदी दिसल्यावर तिथे पोचल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. नाव पुकारल्यावर आत गेले. आता वाटतं पैसे द्यायचेच असं ठरवून गेले होते बहुधा. त्या अधिकार्‍‍यांनीही चटकन घेतले. मोठा गुन्हा करतोय असं वाटत होतं पण तिथे ते नेहमीचंच असावं. सारं काही चटकन आटोपलं. काम झालं म्हणून सुस्कारा टाकला पण समोरचा कागद पाहिला आणि तोडचं पाणी पळालं.  माझं लग्न होवून जेमतेम वर्ष झालेलं. पोलिसमहाशयांनी मी त्या पत्त्यावर गेली पाच वर्ष रहाते आहे असा शेरा मारलेला. चिरीमिरीची करामत फारच महागात पडली. ते काही पाच वर्षावरुन हटेनात.
"असू दे हो."
"अहो, पण माझं लग्नंही नव्हतं झालं."
"काय वांदा नाय."
"वांदा नाय कसं? पुढे कुणी विचारलं लग्नं न होता कसं काय रहात होता." (पंधरा वर्षापूर्वी लग्न केलं तरच एकत्र रहात).
"ठरलं होतं म्हणा नं."
"म्हणून काय झालं?"
"असं काय? दादल्याला भेटायला येत होते म्हणायचं."
पुढे बोलण्यात काही अर्थ नव्हता. पाचशे रुपये दिल्यावर पाच वर्ष. चारशे रुपये परत मागितले तर एक वर्ष लिहतील का असं विचारावं वाटलं पण धाडस झालं नाही. आता नवरा अक्कल काढणार ही धाकधुक होतीच पण ते व्हायच्या आधीच थेट गुन्हा अन्वेषण विभागातून आमंत्रण आलं. इतर मराठी माणसं खोटं बोलण्यात कशी आणि किती तयार होतात ते माहीत नाही, की खोटं बोलतच नाहीत?.  माझं गुन्हा...या शब्दानेच ततपप झालेलं. गुन्हा...अन्वेषण...विभाग....बापरे. सगळी खरी माहिती सांगतानाही काहीतरी दडवल्यासारखं, नुकतेच एक दोन खुन करुन आल्यासारखा चेहरा. त्यात हे पाचशे रुपये देवून विकत घेतलेलं पाच वर्षांचं दुखणं.
"मँडम, तुम्ही मराठीच बोला."साक्षात देवदूत समोर आहे असं वाटलं. एकदम जोर चढला. वाटलं सगळं खरं खरं सांगून टाकावं. तितक्यात ते म्हणाले.
"पुढच्या वेळेस नीट तयारी करुन या. खोटं बोलणं इतकं सोपं नसतं." मी कशीनुशी हसले. पाठ करुन गेले होते तेही सागणं जमलं नव्हतं. बहुधा हिंदीमुळे असावं.
"मी खोटं नव्हते बोलत. मराठीत सांगू का म्हणजे नीट समजेल तुम्हाला."
"नको, मराठी आहात आणि खोटं बोलत नाही हे समजतय म्हणून देतो आहे तुम्हाला पोलिस तपासणी पूर्ण झाली आहे याचा दाखला. पुढच्यावेळेस लक्षात ठेवा, हिंदी बोलू नका आणि जे काही असेल ते खरं सांगून टाका."

त्यांच्या हातातला कागद घेवून बाहेर पडले आणि तो प्रसंग मनाच्या अडगळीत टाकून दिला त्यामुळे लाच देवून आपण कसा भ्रष्टाचार वाढवायला मदत करतो हे तावातावाने बोलायला पुन्हा सज्ज होणं सोपं. त्यावेळेस आपण चुकीचं करतोय ही बोच मनात होती. आज त्याच वयाच्या माझ्या पुतण्याच्या मनातही चौकीदाराला पैसे देताना अशीच  बोच असेल की चलता है ही भावना?

Saturday, March 5, 2011

स्वप्न

रोज एकेक स्वप्न
विसावतय मनाच्या कोप‍र्‍यात
म्हटलं,
सवडीनं हाताळेन एकेक
पण तसं कधी घडलंच नाही
वाटतं,
देवून टाकावीत सारी स्वप्न
जश्शीच्या तशी दुसर्‍याला
पण नकोच,
मी हल्ली एकेक स्वप्न निळ्याशार आभाळात सोडते
जसं,
खूप आवडीने धरलेल्या फुलपाखराला
मुक्त श्वास घेण्यासाठी सोडतो
तसं.

मला आवडलेलं....

निराशेच्या क्षणी तुमची लेखणी तुमच्या मदतीला येत नाही. दु:ख कमी झाल्यावरच शब्द आठवतात. कवितेची बीजं मात्र त्या क्षणीच रोवली जातात. माझ्या बहुतेक कविता रात्रीच्या अंधारातच जन्माला आल्या आहेत.


निराशेच्या झटक्यात मी माझ्या कविता फाडून टाकल्या. काही काळानंतर माणसाला आपलीच रचना केवढी परकी वाटायला लागते. आणि तरीही प्रत्येकाला त्या त्या वेळी आपण म्हणजेच मोठे प्रतिभावंत वाटत असतो.

तुमच्यातली कला तुम्हाला जोपासावी लागते. एखाद्या जवळच्या मित्राची छोटीशी प्रतिक्रियाही मोठी जखम करु शकते आणि कवितेचा जन्म होवू शकतो


आनंदात मुक रहावं
पण वेदनेत बोलकं व्हावं!
मग, प्रत्येक क्षणाचं वारं
कसं अखंड झोकत जावं!

सोबत

सृष्टीने बहुधा
पावसालाच कलाकार केलं
दारावरच्या पागोळ्यात
माझं एकटेपण विरुन गेलं
पुन्हा एकदा बालपण आलं
नकळत पावसात चिंब चिंब भिजणं झालं
विजेच्या डोळ्यात माझा आनंद उतरला
ढगाने सुद्धा ढोल बडवला
पाऊस अखंड बरसत राहिला
माझ्या साथीने गातच गेला....