Thursday, July 23, 2015

परवाना

काल प्रेमपत्र आलं सरकारचं. हल्ली कुणाची पत्रच येत नाहीत त्यामुळे सरकारचं तर सरकारचं. कुणाला तरी झाली आठवण असं म्हणत नाचवत नाचवत ते पत्र पेटीतून घरात आणलं. चष्मा लावला तरी काय लिहलंय ते दिसेना तेव्हा दार उघडलं. पत्र उन्हात धरलं आणि एकदा थोडं जवळ, एकदा लांब असं करत कुठल्या कोनातून नीट वाचता येईल याचा अंदाज घेत वाचायला सुरुवात केली. हे रामा, डोळ्यांचीच परिक्षा घेणार होते म्हणे. "लायसन्स रिन्यूअल" गाडी चालवण्याच्या परवान्याची मुदत संपत आली. द्या परिक्षा पुन्हा. खुणा ओळखा, डोळे चांगले असल्याची खात्री पटवा. सुतकी चेहर्‍याने ते प्रेमपत्र पुन्हा पुन्हा वाचलं.

परिक्षा म्हटलं की आधीच घाबरगुंडी उडालेली असते आणि द्यायच्या तरी किती या परिक्षा.  सरकारी खात्यातली लोकं आपलं ओझं त्यांच्या खांद्यावर असल्यासारखा चेहरा करुन बसलेली पाहिली की पास होणारेही धाडधाड नापास होत असतील.  या देशात पहिल्यांदा अशी परिक्षा द्यायला गेले तेव्हा कणकवली, रत्नागिरीत दिलेल्या ’परिक्षा’ लक्षात होत्या. 8 आकडा तर काढायचा, आहे काय नी नाही काय असं म्हणत गाडीत बसले. बाजूला परिक्षक दार उघडून बसला आणि मग मात्र  गोंधळ सुरु झाला. एकतर या देशात नवीन, त्याचे उच्चार मला कसे समजायचे आणि मी बोललेलं त्याला कसं समजायचं. मी पेचात पडले. तोही त्याच पेचात असावा. चेहरा हुप्प करुन बसला होता.
’स्ट्रेट’ एका शब्दात दिलेले हुकूम पाळायची मला कधीच सवय नव्हती. संदर्भासहित स्पष्टीकरण असलं तरच जमतं बाई. तो पुढे काही बोलेल याची क्षणभर वाट पाहिली आणि विचारलं.
"स्ट्रेट.. यु मीन आय हॅव टू ड्राइव्ह स्ट्रेट?"
"लेफ्ट..." तो खेकसला. विचारता विचारता पुढे नेलेली गाडी मी घाबरुन एकदम लेफ्टली.
"ब्रेक, ब्रेक." तो माझ्यापेक्षा घाबरला असावा. फाटल्यासारखा ओरडला आणि अमेरिकन माणसाला कसं घाबरवलं या आनंदात मी जोरात ब्रेक दाबला. गाडी कशी कुणास ठाऊक पुन्हा जिथून सुरुवात झाली होती तिथेच आली होती. त्याने धाडकन दार उघडलं. तो श्वास वर खाली करत थोडावेळ तसाच बसून राहिला. धाप लागल्यासारखा. मला कळेना आता उतरायचं की तसंच बसून राहायचं, पास की नापास? त्याच्या लाल झालेल्या चेहर्‍याकडे हळूच पाहत विचारलं.
"आर यू ओके?"
"आय आस्क्ड यू टेक लेफ्ट."
"यस. ॲड आय डिड टेक लेफ्ट."
"थॅक गॉड." मग कशाला भडकला हा माणूस? मी हसून पाहिलं.
"यू डिड नॉट गो टू लेफ्ट लेन." तो गुरगुरल्यागत पुटपुटला.
"फॉर व्हॉट?"
"टू टेक  अ लेफ्ट टर्न..."
"असं जायचं असतं?" चुकून मराठीत विचारलं आणि त्याने खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे पाहिलं.
"सॉरी." आता नापास होणार या कल्पनेनं मला धाप लागली. तोपर्यंत त्याची धाप नष्ट झाली होती. तो गाडीतून उतरला. मी त्याच्या मागून मागून. सावित्रीच्या मनात यमाच्या मागून जाताना काय काय विचार येत असतील ते मला आत्त्ता कळत होतं.  आता, ’या पुन्हा’ सांगणार या तयारीतच त्याने दिलेला कागद डोळ्यासमोर धरला.  आनंदाने त्यालाच मिठी मारावीशी वाटली तरी शहाणपणा करुन त्याला अधिक पेचात न पाडता विजयी चेहर्‍याने मी माझा मोर्चा नवर्‍याच्या दिशेने वळवला. आता ही काय दिवे लावणार असा चेहरा करुन तो दूर कुठेतरी कोपर्‍यात लपला होता.

त्यानंतर सरकारला अशी अधूनमधून आठवण होतंच असते. मग व्हा सज्ज पुन्हा परिक्षा द्यायला. करा गोंधळ, निस्तारा असं चालू होतं. चुकीच्या वर्गात गेलो, चुकीचा पेपर लिहिला, चुकीच्या विषयाचा अभ्यास केला, परिक्षा काल आणि आपण आज तिथे गेलो अशी स्वप्न परिक्षा होईपर्यंत पडत राहतात. पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा अनुभव आमचं हे सरकार देतं ते काय कमी आहे. चला लागा आता तयारीला....

Thursday, July 16, 2015

माझ्या मैत्रीणीची...

नुकतीच श्रीदेवीला, माझ्या मैत्रीणीला नोकरी लागली. ती नोकरीच्या शोधात बरेच महिने होती. नोकरी मिळवण्यासाठी काय काय करु शकतात लोकं याबद्दलचं माझं ज्ञान तिच्या नोकरी संशोधन काळात पीएचडी मिळवण्याइतपत वाढलं.
"आज मुलाखत द्यायला यायची आहे."
"यायची आहे? म्हणजे तुला मुलाखत द्यायला जायचं आहे का?"
"नाही फोनवर आहे ना मुलाखत. नाव माझं पण मुलाखत ती देईल. म्हणून ’यायची’ म्हटलं." हे असं चालतं ही ऐकीव माहीती उदाहरणासकट समोर आल्यावर बसलेला धक्का न दर्शविता मी ’अधिक’ माहितीसाठी बाजारात भाजी घ्यायला गेल्यासारखं विचारलं,
"सध्या काय दर आहे?"
"काम फत्ते झालं तर 500 डॉलर्स." ती ज्या कामासाठी या मुलाखती देत होती तेच मी पण करते त्यामुळे आपणही या ’बिझनेस’ मध्ये घुसून जोडधंदा सुरु करावा का असा विचार मनात चमकून गेला. तो चेहर्‍यावरही दिसला असावा.
"तू देशील का मुलाखत? मला काय तिला द्यायचे ते तुला देईन." माझं पापभीरु मन शहारलंच. असली बेकायदेशीर कामं आम्ही ’मराठी’ लोक करत नाही (?) हे ठसवायला घाईघाईत म्हटलं,
"नको नको, मला नाही अशा मार्गाने पैसे मिळवणं बरं वाटत. आणि तसंही माझ्याकडे भरपूर पैसे आहेत." म्हटलं आणि ती आता मग ते पैसे मला दे म्हणाली तर म्हणून घाबरले.
आधी तिची मुलाखत ती दुसरी देणार म्हणून घाबरले, आता माझ्याकडचे भरपूर पैसे तिने मागितले तर म्हणून पुन्हा घाबरले. माझं हे घाबराघुबरी प्रकरण संपेपर्यंत तिला नोकरी लागलीही. आणि काम करायला ती माझ्याच कार्यालयात रुजूही झाली....

एका दिवसानंतर...
कार्यालयात कसलातरी उग्र दर्प पसरला होता. बरीचजणं काम सोडून त्याची चौकशी करण्याकरता इकडे तिकडे करत होती. सहा सात जण वास सहन होत नाही म्हणून घरुन काम करायची परवानगी मिळवावी का याची चर्चा करण्यात मग्न झाले. थोड्याच वेळात त्यात ते यशस्वीही झाले. कार्यालय ओस पडलं. आम्ही आपले एकदोघं जण टकटक करत संगणक बडवत होतो. एकदम माझ्या लक्षात आलं, कालच नव्याने रुजू झालेली श्रीदेवी कुठे दिसत नाही. हिला आधीच समजलं की काय आज घरुन काम करता येईल म्हणून. आम्ही जेमतेम तिघंजणं उरलो होतो. पोनीटेलला विचारलं,
"श्रीदेवी कुठे आहे?"
"सिरी इज नॉट कमिंग बॅक."
धक्काच बसला.
"का? कालच तर तिचा पहिला दिवस होता. "
"हो, पण नो कम्युनिकेशन स्किल्स म्हणून शी गॉट फायर्ड यस्टरडे ओन्ली." मला तिच्या अशा येण्याचं आणि जाण्याचं प्रचंड दु:ख झालं. आली काय नी गेली काय. घरी गेल्या गेल्या मी तिच्याघरी धावले. खरं तर म्हणायचं होतं, बघ असले उद्योग करावेतच कशाला. नोकरी काय कधी ना कधी मिळालीच असती. केवढी नामुष्कीची गोष्ट आहे ही एकाच दिवसात हायर आणि फायर, उगाचच सार्‍या भारतीयाबद्दल पण मत.... पण नुसतीच लटकलेल्या चेहर्‍याने मी तिच्यासमोर उभी राहिले. तिने माझ्या पाठीवर थोपटलं,
"अगं इतकं काय मनाला लावून घेतेस. मिळेल मला नोकरी. एक दिवसाचा अनुभव माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. या एका वर्षाच्या अनुभवामुळे उद्याच एक मुलाखत आहे...."