मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
अमेरिकेतल्या आपल्या मुलाकडे जाण्याचं अर्धशिक्षित कांताबाई ठरवते. मुलाचा आईच्या आगमनाच्या कल्पनेने जीव धास्तावतो. ती इथे येऊन काय गोंधळ घालेल याची त्याला कल्पनाही करवत नाही. सुनेला तर भूकंप झाल्यासारखी ही बातमी वाटते.
आहे तरी कशी आपली कांताबाई? ऐका तिची करामत प्रसाद घाणेकर यांच्या आवाजात.
(पर्णिकाच्या महाविद्यालयात २८ ऑगस्टला आणि नंतर १२ सप्टेंबरला गोळीबाराच्या घटना घडल्या. मुलं अशा घटनांना तोंड देताना सावरल्यासारखी वाटत असली तरी त्यांच्या मनावरचं भितीचं सावट पटकन नाहीसं होत नाही आणि भावनिकदृष्ट्या त्यांना जाणवलं नाही तरी परिणाम होत असतातच. पर्णिका आणि तिथे शिकणार्या सर्वच मुलांचा विचार मनात येऊन उमटलेले शब्द)
आई म्हणते, बालपणीचा काळ सुखाचा कुणीतरी सांगा तो कसा शोधायचा!
शाळेची वेळ संपत नाही नंतर असते छंद वर्गांची घाई! मेजवानी शनिवारी, तिथे फोन, व्हीडीओ गेम्सची संगत भारी! झोपायला पापणी मिटत नाही दिवस कधी संपणार उमगत नाही!
विचार करायलाही फुरसत नाही तुम्ही, नाही म्हणायची संधी हाती लागूच देत नाही! तुम्हाला पाहिजे म्हणून करायचं आम्हाला काय आवडतं ते कधी कळायचं!
कसा गं असतो बालपणीचा काळ सुखाचा आई तूच सांग, कसा तो शोधायचा!
पायावर पडलं पाणी की तुला खेळायला जायची घाई! शुंभकरोतीला घरी आलं की दिवस संपून जाई! बाबाचं लहानपण भारी सारखी आपली मारामारी!
द्या ना मला तुमचं लहानपण! जपेन मी हृदयात ते क्षण मोठी झाले की मी ही म्हणेन रम्य ते माझं बालपण! - मोहना जोगळेकर
वाटलं,
मिळालं सारं,
स्त्रीने स्वत:ला शाबित केलं
स्त्रीमुक्तीचं पेव फुटलं!
"स्व" ला उधाण आलं
कुठे थांबायचं कळेना
काय कमावलं काय गमावलं समजेना
स्त्रीत्व म्हणजे नेमकं काय ह्याचा उलगडा होईना
हातात शून्य मावेना!
आई, आजी, आमची पिढी
सर्वांकडे पाहून स्वप्नातली स्त्री हसली,
म्हणाली,
अगं मीच ती
दृष्टी असून तू अंध
स्त्रीत्व म्हणजे गंध
बकुळीच्या फुलासारखा
हळुवार पसरणारा
दरवळणारा, मोहवणारा,
आणि तरीही,
स्वतंत्र अस्तित्व जपणारा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर
कधीतरी मोठं व्हायला झालं
आणि लक्षात आलं
लहानपण पळून गेलं!
थांबवलं नाही तर हातातून जाईल
अधिकच मोठं व्हायला होईल!
धावत जाऊन बोट धरलं, आणलं त्याला परत!
जरा कुरकुरलं, दमलंही, धाप लागली म्हणालं
पण वळलं अखेर हसत हसत!
शाळेच्या दिवसात मैत्री हेच सूत्र असतं
आमचा समाज, आपल्यातलेच असं काही नसतं!
आपल्यातले, आमच्या समाजातले
कुणास ठाऊक हे विष कुठून येतं
कळेपर्यत मनात भिनून जातं!
वाटतं,
आमचा समाज, आपल्यालेतच
हा जातीवाद राहिलाय माघारी!
तेव्हा कुठे ठाऊक होतं
वर्णभेद उभा ठाकलाय ठायीठायी!
’लेबलं’ आहेतच सर्वत्र
आधी जातीवरुन, आता वर्णावरुन
गोरे काळ्यांना मारतात!
काळे पेटून उठतात
’मायनॉरिटी’ सुन्न होतात!
माणूस नावाची जात हरवली आहे
माणूसकी नावाचा धर्म गाडला गेलाय!
आत्मा सापडत नाही म्हणून
त्यांचा श्वास कोंडत चाललाय!
कदाचित दिसतील दोघं तुम्हाला!
हिंसेच्या प्रागंणात गोंधळलेले, घाबरलेले
विसरु नका त्यांची समजूत घालायला
हात धरुन स्वत:च्या घरात आणायला! - मोहना
चह करायला गेलो तर
सापडेना साखर
गॅस काही पटेना
बिघडलेला लायटर
वाटे कटकट तुझी राणि
तू घरी असताना
जीवन सारे सुने वाटे
तू जवळ नसताना
मी जर असेल शिव तर
तू माझी शक्ती
सदा जवळी असावीस तू
हीच आता आसक्ती
सहचारिणी हे प्राणसखे
विनवितो मी गं तुला
जेव्हा कुठेही जाशील तू
घेऊन जा गं मला... :-)
____________________________________________________
वरच्या कवितेबद्दल सर्व गृहीणींच्या वतीने:
सख्या,
भावल्या तुझ्या भावना
असतोस तू माझ्या मनात
मी कुठेही गेले तरी!
न सांगता जेव्हा शिकशील
तू माझा भार हलका करायला
लागशील कचरा काढायला
वस्तू जागच्या जागी ठेवायला
आपल्या वस्तू आपणच घ्यायला
त्यावेळी आवडेल मला तुझं
स्वावलंबनाच्या झुल्यावर झुलणं
माझ्या खुशीत अशी भर घालणं!
हे जेव्हा करशील
तेव्हा मलाही मिळेल थोडा वेळ
माझ्यासाठी, माझ्या छंदासाठी
आनंदाच्या झुल्यावर उंच झोका घेण्यासाठी!
पुढच्यावेळी मी गेले कुठे
तर येऊ दे कविता अशी
ज्यातून मला कळेल
जमलं तुला सारं
ते सुख असेल न्यारं! - मोहना प्रभुदेसाई जोगेळेकर
तुम्ही विचारलंत,
’तुमच्याकडे’ कसं असतं?
’आपल्या’ भारतात असतं तसंच
इकडे राहून ’भारत’ आमच्या मनात
तिकडे राहून ’परदेश’ तुमच्या तनामनात!
तुम्ही तिकडे इंग्रजी जोपासता
आम्ही इकडे मराठी
सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण
भारतातल्या कलाकारांना आमंत्रण
तुम्ही आम्हाला सांगता इंग्रजी सिरीयलबद्दल
आम्ही तुम्हाला मराठी मालिकांबद्दल!
तुम्हाला ’तिकडेच’ राहतो
याचा अभिमान वाटतो!
मनात आलं म्हणून
इकडे येता येत नसतं
हे सत्य दुर्लक्षित असतं!
तुमच्या दुष्टीने आम्हाला
पैशाचा, आरामाचा, सुखसोयींचा मोह!
विनाकारण सार्याचा उहापोह!
तुम्हाला,
आमच्या ’एकाकी’ झालेल्या पालकांबद्दल सहानूभुती वाटते
आम्हाला,
तिथेच असून तुमच्या सहवासाला मुकलेल्या आई - वडिलांबद्दल!
परत नाही यावंसं वाटत?
तुम्ही विचारलंत,
तुम्हाला नाही ’इकडे’ यावंसं वाटत?
पलिकडे शांतता
बाजार हा भावनांचा
फसलेल्या इच्छा आकांक्षांचा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर
आपण सर्व कितीतरी वर्षांनी
काळाची पानं पुसतोय
उत्सुकता, अधीरता
हूरहूर दूरदूर
अस्वस्थ, स्वस्थ
लंबक हेलकावतोय
आज आपण सगळे भेटतोय!
मन आणि वय झालंय शाळकरी!
चेहरे ओळखीचे, बिनओळखीचे
हृदयात जपलेले
संख्येच्या भाऊगर्दीत
लक्षातही न आलेले
तरी भेटायच्या कल्पनेने
उरात धडधड वाढलेली!
त्या वेळेला भावलेला तो, ती कशी वाटेल?
कोण, कुठे ’पोचलं’ असेल?
मनातल्या मनात हिशोब सुरु झाले
काय कमावलं, काय गमावलं
उत्सुकतेचं दळण दळलं जातंय मनाच्या जात्यावर
भेटायची वेळ आली काही सेकदांवर!
छान झालं, भेट झाली
तसं पूलाखालून बरंच पाणी गेलंय
ओळखीचे चेहरे अनोळखी झालेयत
गळ्यात गळा घालून फिरलेली मनं
’कमावलेलं’ दाखवायच्या नादात
’गमावलेलं’ शोधायच्या प्रयत्नात!
हास्यविनोदात दिवस बुडाला
सगळे पांगले, माघारी निघाले
भेटीने घेतला प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव!
वास्तवाच्या दुनियेत प्रवेश करताना
मनात दाटून आला ओलाव्याचा भाव!
असंच भेटत जाऊ ’मैत्र’ जपत राहू
अशा ’थांब्यावर’ उभे आपण
जिथे ’दाखवणं’ ’गमावणं’ सारंच नगण्य
जे आहे ते जपू
मैत्रीची ज्योत पेटती ठेवू!
एकदा एका आईला वाटलं आपण जे अनुभवलं नाही ते मुलांना मिळावं मोकळेपणाने त्यांनी आयुष्य उपभोगावं! मुलाचा चेहरा उजळला देहभर ट्यॅट्यु ची नक्षी तो ल्याला दारुचे ग्लास रिचवत राहिला नाईट लाइफच्या धुंदी चा कैफ शरीरात मुरला स्वातंत्र्याचा स्वैराचार हवेत उधळला! एके दिवशी मुलगा घेऊन आला एका मुलीला म्हणाला, कळत नाही लिव्ह इन रिलेशनशिप की लग्न पण ठरवायला हवं हिच्या गर्भातल्या जीवाचं भवितव्य माता वदली, तुला जे वाटेल तेच योग्यं मी काही बोलणं म्हणजे माझ्याच नियमाचा भंग! बहिणीने भावाचा कित्ता गिरवला बाळाच्या आगमनाचा सुगावा लागला माता वदली, चल, तुझ्या बॉयफ्रेंडच्या घरी जाऊ बॉयफ्रेंड आला दारात, बाजूला त्याची आई! तुझ्या घरच्यासारखं वातावरण आमच्याकडे नाही लग्नाच्या आधी पोरंबाळं आम्ही होऊ देत नाही. मुलगी भडकली, आईला म्हणाली, कुमारी माता होऊ की गर्भपात करु? माता थबकली, चिंतेत बुडाली नियमाचा भंग करु की तुला वाटेल तेच योग्यं म्हणू...?
शाळा, नाटकाचा सराव, मैदानावरचे खेळ
यातून अभ्यासाला नसायचा वेळ
पण भाऊ तुम्ही होतात,
अभ्यास राहिला आहे म्हणून गलितगात्र झाल्यावर
तुम्ही पुरा केलात!
हातात ठेवायचात वही
म्हणायचात,
घ्या हे, लिहलं आहे, तुझं काम केलं आहे
आता निघा...!
कधी चिडायचात, खोटं बोललो की ओरडायचात
कामं टाळली की वैतागायचात
पण चला, बॅडमिंटन खेळू या म्हटलं की तयारीतच असायचात!
भारतात आलं की जाऊन येऊ कुठेतरी म्हणून
फिरायला जायचे दौरे काढायचात,
तुमच्या गडगडाटी हसण्याने घर भरल्यासारखं व्हायचं
आनंदाचं झाड घरातच रुजल्यासारखं वाटायचं!
तुम्ही म्हणाला असतात,
वा, वा लक्षात ठेवलंस का सगळं
आता पोरांना नको सांगूस
नाहीतर बसवतील बाबाला अभ्यासाला
मिळतील शिव्या सासर्याला! :-).
भाऊ, तुमच्या आठवणींसाठी ’फादर्स डे’ ची आवश्यकता नाहीच तरी त्या दिवसानेच मला माझ्या भावना शब्दात मांडता आल्या. सगळ्या बाबांना शुभेच्छा - आजचा दिवस मुलांसमवेत अगदी ’धम्माल’ दिवस व्हावा प्रत्येकाचा.
पाठीवरचं जड दप्तर, लाल रिबीनींनी घट्ट बांधलेल्या वेण्या
रमत गमत शाळेला पोचणं गप्पा, हसणं खिदळणं, वाद घालणं कित्ती कित्ती गोष्टी आपण एकत्र केल्या मग, कधी कधी रुसवे, फुगवे, भांडणं, हेवा, कागाळ्या मी तुझ्याशी बोलत नाही म्हणता, म्हणता कधी एकदा बोलतो अबोल्याच्या दिवसात काय झालं ते सांगतो असं होवून जाणं असे ते दिवस! पाहता पाहता भूतकाळात हरवले! विस्मृतीच्या गर्तेत अडकले फ्रेंडशीप डे ला आठवणी काढण्यापुरते उरले! पण तरीही पिंपळपानासारखे मनाच्या पानात वर्षानुवर्ष जपले!
माझ्या पिंपळपानात दडलेल्या देवरुख, कणकवली, पालघर, रत्नागिरी.....सार्या मैत्रीणींना
महाविद्यालयीन काळात तावातावाने मारलेल्या गप्पा, मांडलेले विचार आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता. कविता 'पाडण्याचा' छंद होता त्या काळातली. आज कित्येक वर्ष उलटली तरी सगळं जैसे थे च आहे असं वाटायला लावणारी.