Friday, December 14, 2012

काय चाललं आहे हे...

एका तरुण मुलाची आई त्याच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडते. तिथून तो ती ज्या शाळेत शिकवत असते त्या प्राथमिक शाळेत जातो. आईच्या वर्गातले चिमुकले जीव बंदुकीच्या गोळीने टिपतो. कोण विचारणार जाब या कृत्याचा? आणि कुणाला? जाब विचारायला तो मुलगाही या जगात नाही, त्याची आईही. आता आम्ही फक्त चर्चा करायच्या यव करायला हवं आणि त्यव करायला हवं....

असं काही झालं की आठवतं ते १९९९ मधील लिटलटन कोलोरॅडो येथील घटना. दोन विद्यार्थ्यांमुळे जीवाला मुकलेली माध्यमिक शाळेतील १२ मुलं. २००७ साली तरुण माथेफिरुच्या गोळ्यांना बळी पडलेली व्हर्जिनिया टेकमधील ३२ तरुण मुलं आणि अशाच घटना एकामागून एक, अनेक.  त्यानंतर त्याची कारणमीमांसा शोधली जाते, उपाय शोधले जातात, काही काही प्रत्यक्षात राबवले जातात आणि मग पुन्हा हे असं.....कधी थांबणार आणि कसं?

या जगाचा, जग न बघताच निरोप घेतलेल्या त्या चिमुरड्यांच्या आई वडिलांच्या दु:खाच्या कल्पनेने जीव कालवतो, डोळे आसवांनी चिंब होतात. त्यांना देव हे दु:ख झेलण्याचं सामर्थ्यं देवो हीच प्रार्थना!


http://www.washingtonpost.com/

Tuesday, December 11, 2012

लग्नाविना सहजीवन

भारताबाहेर राहणारी शनिवारी संध्याकाळी बर्‍यांचदा जेवायला एकत्र भेटतात तेव्हा हमखास कुणीना कुणी नुकतंच मायदेशातून परत आलेलं असतं. चर्चेचा ओघ, माघारी सोडून आलेला भारत आता किती बदलला आहे इकडे वळतो. तिथला चंगळवाद, वेष, मुलाचं वागणं आणि हल्ली हल्ली ’लिव इन रिलेशनशिप - लग्नाविना सहजीवन’. 

एकंदरीत आत्तापर्यंत होणार्‍या या चर्चांमधून हे जसं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे तसंच समाजमान्यही झालं आहे असं वाटत होतं, पण अगदीच कुणी कसं माहीत नाही आपल्याला असं सहजीवन असणारे असाही एक प्रश्न मनात डोकावायचा. 

काल दिवाळी २०१२ चा लोकसत्ता वाचला आणि मनात खूप शंका निर्माण झाल्या लग्नाविना राहणार्‍यांच्या मुलाखती वाचून. लेखात आधीच नमूद केलं आहे की अपरिहार्यता हे बहुतेकाचं कारण आहे लग्नाविना सहजीवनाचं. घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा त्या फंदात पडायला नको अशी माणसं ही व्यवस्था स्विकारतात किंवा मग पहिल्या लग्नापासून फारकत मिळत नसल्याने नाईलाजाने एकत्र रहाणारी. मुलाखतीतील बहुतांशी सर्वांची नावं बदलली आहेत, अशी जोडपी आपण विवाहीत आहोत असंच सांगतात असाही उल्लेख आहे. 

बहुतेक वेळा पाश्चात्यांचं अनुकरण म्हणूनही अशा रुजू पाहणार्‍या प्रथांवर खापर फोडलं जातं. पण अमेरिकेत तर लग्न करायचं की नाही हे ठरविण्यासाठी दोघं एकत्र रहात असतात आणि कधी ना कधी ती लग्न होतात, म्हणजे लग्नाशिवाय सहजीवन सुरु करायचं हा हेतू नसतोच. लग्नासाठी जोडीदार योग्यं आहे की नाही हे अजमावण्यासाठी हे सहजीवन सुरु होतं. या देशात जेव्हा घटस्फोटाचं प्रमाण वाढलं तेव्हा निर्माण झालेला हा पर्याय आहे. 

मग भारतातील लग्नाविना सहजीवनामागे अपरिहार्यता हेच कारण असेल तर तो लग्नसंस्थेला खरंच पर्याय आहे का?

Wednesday, September 26, 2012

उल्लंघन

"चलायचं?" शांत रस्त्यावर त्याचा दमदार आवाज त्यालाच घुमल्यासारखा वाटला.
"हो, तू सामान घेतलंस ठरल्याप्रमाणे?"
"कमॉन यार, फक्त एक रात्र. उद्या सकाळी परत येतोय आपण." ब्रायनने बेफिकीरपणे उत्तर देत सायकल दामटली. दोघांनीही शर्यंतीत भाग घेतल्यासारखा सायकलचा वेग वाढवला. गप्पांच्या नादात किती अंतर पार केलं ते लक्षात आलं नव्हतं, पण हळूहळू हिरव्यागार झाडीत दडलेल्या काळ्याभोर रस्त्यावरची वर्दळ कमी होत गेली. दोघांच्या सायकली  टपरी सारख्या दिसणार्‍या दुकानासमोर  थांबल्या तेव्हा पाय भरुन आले होते. वाफाळलेल्या कॉफीने ब्रायनच्या चेहर्‍यावर तरतरी आली.
"तू मरगळल्यासारखा वाटतो आहेस. झेपतोय ना प्रवास?" क्रिसला त्याने टोकरलं.
"मी ठीक आहे. आई, बाबा दोघांचा विरोध होता रात्री राहायला. त्यांना दुखावलं की काय असा विचार करत होतो."
"जाऊ दे ना. आई, बाबा करायचं वय आहे का आपलं. सब बकवास है यार. तू सरळ मजा करायला शीक ना."  ब्रायनने बोलता बोलता हाताने टपरीसमोर पडलेला मिठाईचा कण टिचकीने लांब उडवला.
"निघू या? बराच पल्ला गाठायचा आहे." क्रिसने ब्रायनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

पाच हजार फूट उंचीवरच्या माहिती विभागात पोचायला त्यांना तासभर लागला. तिथं पोचल्यावर दोघांचंही भान हरपलं. दोघंही तिथल्या रखवालदारानं टोकेपर्यंत अंधारलेपण अंगावर घेत राहिले. जंगलाची माहिती देणारी सगळी कागदपत्र हातात घेत ते एकेक पायर्‍या उतरायला लागले. खाली पोचेपर्यंत मिट्ट काळोख पसरला होता. वरती घेतलेल्या आणि माहितीपत्रकात मिळालेल्या माहितीवरून अंधारात मुकाटपणे दोन सायकली वाट काटत राहिल्या. अधूममधून सायकली थांबवून बॅटरीच्या प्रकाशझोतात ते नकाशा बघून खात्री करुन घेत होते. सायकलीवर नकाशा पसरुन ठेवताना होणारा आवाजही तिथली शांती ढवळून टाकतो आहे असं वाटत होतं. त्या भयाण शांततेत झाडांची सळसळ, मध्येच उमटणारे विचित्र आवाज दोघांच्या मनातली शंका ठळक करत होते. पण काही न बोलता अनामिक आशेवर ते पुढे सरकत होते.
"आपण रस्ता चुकलोय क्रिस." दुखणार्‍या मांड्यांवर हात ठेवत अखेर ब्रायनने अस्वस्थपणाचा शेवट केला.
"चौथ्यांदा नकाशा बघून बदललेली पायवाट आहे ही. तुला वाटत होतं जोपर्यंत रस्ता दिसतोय तोपर्यत चुकलेलो नाही. पण आपण भरकटलोय. आत्तापर्यंत डांबरी सडक होती. मातीचा रस्ता, पायवाटा तुडवायला सुरुवात करुनही बराच वेळ झालाय." ब्रायन आपलं म्हणणं पटवून देत राहिला.
"मला भिती वाटतेय." क्रिसने एकदम हातातली सायकल सोडून पायवाटेवर बसकण मारली.
"दमायलाही झालंय प्रचंड."  ब्रायनने बॅटरीचा प्रकाशझोत क्रिसच्या चेहर्‍यावर टाकला.
 "अरे तोंडावर कसला उजेड टाकतोस. बाजूला कर ना आधी." क्रिसच्या चिडचिडलेल्या स्वराची पर्वा न करता ब्रायनने आवाज चढवला.
"तुझं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करत होतो." ब्रायन उगाचच गडगडाटी हसला. क्रिस त्याच्याकडे पाहत राहिला. का हसतोय हा वरवर आणि इतकं खोटं?  प्रश्न त्याच्या ओठावर येण्याआधीच ब्रायनचं वागणं बदललं. तो अस्वस्थ झाला. दोन्ही हातात डोकं धरुन तो मटकन खालीच बसला.  म्हणजे यालाही भितीने घेरलंय तर. वरवर तर  शूरपणाचा, बेफिकीरपणाचा आव आणतो आहे... मनातले विचार व्यक्त न करता  क्रिसने सूत्र हातात घेतली.
"परत जाऊया त्या माहिती विभागात. तो रखवालदार करेल मदत आपल्याला." ब्रायनला क्रिसची कल्पना एकदम पसंत पडली. किती सोपा मार्ग होता इथून बाहेर पडण्याचा. त्याचा चेहरा उजळला. अंगात उत्साह संचारला. सायकलींची चाकं उलट्या दिशेने मार्गक्रमणा करायला लागली.
"हा रात्रीचा अंधार, रातकिड्यांची किरकिर, झाडांच्या काळ्याकभिन्न सावल्या आणि त्यातून मनात निर्माण होणारे चित्र विचित्र आकार. भीती नाही वाटत अशा वातावरणात?" काळोखाचा भेद घेत ब्रायनने विचारलं.
 उत्तर न देता क्रिसने पाण्याची बाटली तोंडाला लावली.
"भुताची गोष्ट  ऐकायची आहे तुला? सांगू?" ब्रायनने आवाजात घोगरेपणा आणत विचारलं.
खटकन ब्रेक दाबत क्रिसने सायकल थांबवली. वेगानं सायकल हाणणार्‍या ब्रायनच्या सायकलीचा कॅरियर पकडत त्याने सायकल थांबवली. ब्रायनला उतरण्याचाही अवधी न देता क्रिस त्याच्या पोटात गुद्दे हाणत राहिला.
"अरे, अरे मजा करत होतो जरा." कशीबशी स्वत:ची सुटका करत ब्रायन सायकलवरुन उतरला. त्याने क्रिसचे हात घट्ट धरले.
"मला भिती वाटते काळोखाची." ब्रायनच्या खांद्यावर डोकं टेकवत क्रिस हृदयाची धडधड संथ करत राहिला.
"मला पण. मी माझी अस्वस्थता तुझी मजा करुन घालवत होतो. तू एवढा घाबरशील असं नव्हतं वाटलं. चल, छोड दे.  सायकली दामटवूया परत."
दोघं न बोलता निघाले. क्रिसला स्वत:च्या भित्रेपणाची शरम आतल्या आत जाळत राहिली. बोलायचं नाही असं ठरवलं असलं तरी त्याला राहावलं नाही.
"तुला आठवतंय ब्रायन? आपण कम्युनिटी हॉलमध्ये बॅडमिंटन खेळायचो.  दिवे गेले तो पहिला प्रसंग माझ्या मनातून गेलेला नाही अद्याप. तेव्हाच माझ्या लक्षात आलं अंधारात जीव दडपतो माझा. छातीवर प्रचंड ओझं असल्यासारखं वाटतं. क्षणात दिवे आले नसते परत तर संपलाच असता खेळ."
ब्रायनचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मनातली भिती मनातच दाबून ठेवत स्वत:ला गप्प ठेवण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत राहिला. विचारांना वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न करत क्रिसही शांतपणे सायकल चालवत राहिला.

"थांबू या इथेच. मी पाऊलही पुढे टाकू शकत नाही." ब्रायन झाडाखाली कोसळलाच. क्रिसने मुकाटपणे पाण्याची बाटली त्याच्यासमोर धरली. पण ब्रायनच्या रागाचा उद्रेक झाला.
"भेदरट नुसता. एकत्र यायलाच नको होतं. स्वत:चा जीव घाबराघुबरा करायचा, बरोबर इतरांनाही सतावायचं."
"उगाच मला दोष देऊ नकोस. तूच घाबरला आहेस माझ्यापेक्षा." क्रिस सायकलला टेकून उभा राहिला.
"काय करायचं आता?" तिरसटलेल्यासारखा ब्रायन ओरडला.
"सेल फोन वापर." त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता क्रिसने सुचवलं.
"मठ्ठ मुला. एवढी सोपी गोष्ट मी केली नसेन का? बॅटरी संपली आहे केव्हाच."
रागाच्या भरात त्याने फोन भिरकावला.
"फेकतोस काय फोन?" क्रिस फोन उचलायला वळला. पण अचानक अंगात काहीतरी संचारल्यागत ब्रायन धावत पुढे गेला आणि त्याने पुन्हा फोन दूर फेकला. क्रिस बेचैन होत माघारी परतला. ब्रायनचं वागणं त्याला आश्चर्यचकित करत होतं, बुचकळ्यात टाकत होतं.
"तू दमला नाहीयेस ब्रायन. माझ्यापेक्षाही घाबरला आहेस आणि ते नाकारण्याचा प्रयत्न म्हणून मला दूषणं देतो आहेस. मी उगाचच तुला धाडसी समजत होतो." क्रिसला आपलं निरीक्षण नोंदवल्यावाचून राहवेना.
"मानस शास्त्रज्ञ समजतोस स्वतःला? आयला, इतकी वर्ष आपण एकमेकांना जीवलग दोस्त म्हणवतो आणि एक रात्र एकत्र काढणं जमत नाही. दोषारोप आणि अवगुणांची चिकित्सा चालली आहे नुसती. झोप आता." ब्रायनने त्याचं म्हणणं एकदम उडवूनच लावलं.
"मला वाटत होतं त्यापेक्षा फार वेगळे आहेत आपले स्वभाव." क्रिसला झोप येत नव्हतीच पण खूप बोलावं असंही वाटत होतं.
"चल काही तरीच. दहा वर्षातली ओळख एकदम कशी बदलेल?" ब्रायनने क्रिसचं म्हणणं धुडकावून लावलं.
"माणसाची खरी ओळख कठीण प्रसंगात होते." तितक्याच शांतपणे क्रिस उत्तरला.
"बकवास बंद कर आणि मुकाट्याने झोप बाबा आता तू. परत जायचा रस्ता सापडणं मुष्कील झालं आहे. माहिती विभागापर्यंत परत कसं पोचायचं ते कळेनासं झालं आहे. आता कुठे अडकलो आहोत ते माहीत नाही. इथेच झोपू आणि सकाळी उठून बघू पुढे काय करायचं ते."
ब्रायनने संभाषण संपवलंच. एकदा निर्णय झाल्यावर दोघांची थकलेली गात्रं क्षणात विसावली.

सकाळी जाग आली ती क्रिसला. घोरत पडलेल्या ब्रायनची झोपमोड न करता उजेडाची चाहूल घेण्याचा तो प्रयत्न करत राहिला. फर्लागभर इकडे तिकडे भटकूनही गर्द झाडीशिवाय काहीही दृष्टीला पडेना तसं त्याला परतावंच लागलं.
"कुठे आहोत आपण?" डोळे चोळत ब्रायन एव्हाना उठून बसला होता.
"जंगलात हरवलोय. उंच झाडांशिवाय काहीच दिसत नाही नजर टाकू तिकडे."
ब्रायनला एकदम वास्तवाची जाणीव झाली, त्याचबरोबर भूकेचीही.
"काहीतरी पोटात ढकलायला हवं. आपल्या घरातली माणसं लागली असतील का तपासाला?"
"तंबू ठोकून त्यात आहोत असाच समज झाला असेल. आज संध्याकाळपर्यत घरी पोचलो नाही तर शोधाशोध सुरु होईल." थकल्या स्वरात क्रिस म्हणाला.
ब्रायन ताडकन सावरुन बसला.
"मी आवरतो माझं आणि मग तू एक दिशा पकड, मी दुसर्‍या दिशेने जातो. कुणीतरी एक पडूच जंगलाच्या बाहेर आणि मग मदत मिळवून दुसर्‍याच्या मदतीला परत येऊ."
"नको, नको. तसं नको करायला. आत्ता आपण एकत्र आहोत. एकमेकांना धीर देऊ शकतो. एकेकटे पडलो की पुन्हा एकमेकांना शोधणंही कठीण जाईल." क्रिसने त्याचा पर्याय धुडकावून लावला.
"तू इथं राहा. मी पुढे पाहून येतो." ब्रायनने तयारी दर्शविली.
"नाही. एकत्रच राहायचं आपण." क्रिसच्या ठाम स्वराने ब्रायन वैतागला.
"कुठलाच मार्ग पटत नाही तुला. कर तुला काय करायचं ते." रागारागाने त्याने येरझार्‍या घालायला सुरुवात केली. काहीतरी तोंडात टाकण्यासाठी त्याने पिशवी उलटसुलट केली. त्यात खायला काही सापडेना तसा त्याचा पारा चढला. गोल गोल फिरवत त्याने जोरात पिशवी आपटली.
"माझ्या थर्मासमध्ये दोन घोट आहेत कॉफीचे." क्रिसला त्याचं वाक्यही पुरं करु न देता ब्रायनने थर्मासच तोंडाला लावला. सगळी कॉफी संपली तसा तो भानावर आला. क्रिसचे आभार मानण्याचं सोडाच त्याला एखादा घोट ठेवण्याचंही त्याला सुचलं नव्हतं.
"तुला विचारलंच नाही  मी. भुकेपुढे कोसळलायच होतं मला." पुढे काय बोलावं तेच त्याला सुचेना. क्रिस हसला.
"चल, ताजातवाना झाला असशील तर  मार्गक्रमणेला सुरुवात करु."

चालता चालता दोघं एकमेकांना माहीत असलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगत होते. नाही म्हटलं तरी दहा वर्ष ते शेजारीच वाढले होते. पण तरी क्रिसचा अतिव्यवस्थितपणा, व्यवहारी दृष्टिकोन याव्यतिरिक्त त्याची फारशी ओळख नव्हती असं वाटत होतं ब्रायनला. एकत्र दंगामस्ती, मित्रमैत्रिणी सगळ्या वरवरच्या विषयातूनही त्यांना आपण जवळचे मित्र आहोत असं वाटायचं. क्रिसचं प्रसंगावधान, हुशारी आज प्रथमच ब्रायनच्या लक्षात येत होती. ब्रायनच्या वागण्याचं सुप्त आकर्षण असणार्‍या क्रिसला त्याचा उतावळेपणा आणि बेजबाबदार वृत्ती इथे आल्यावरच लक्षात आली. त्याच्या या स्वभावामुळे परिस्थितीवरील ताबा सुटू शकतो या  विचाराने क्रिसला घेरलं होतं.
"तू अजून जातोस मानसोपचारतज्ज्ञाकडे?" अचानक क्रिसने विचारलं.
"सहा महिन्यातून एकदा. आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या वेळेस आठवड्यातून एकदा जात होतो. आमच्या सुखी कौटुंबिक जीवनाचं चित्र तिनं पायदळी तुडवलं त्याचा राग मनात धुमसत होता. वाटायचं, बाबासारखा नवरा, तीन मुलं सगळं सुरळीत असताना आईला काय गरज होती असा वेडेपणा करण्याची?"
"ते कोडं शेजारीपाजारी अजून सोडवतायत. सगळ्यांना वाटायचं तुझ्या बाबाचं प्रकरण असावं बाहेर, पण ते तसे नाहीत हेही जाणून  होते सारे. त्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नाचं खरं कारण कधी कुणाला कळलंच नाही. तुझी आईपण सहा महिन्यात पूर्वीसारखी हसती खेळती झाली. साराही बर्कलेला गेली ना पुढच्या शिक्षणासाठी?" क्रिसने कितीतरी वर्ष मनात असलेला प्रश्न विचारला. ब्रायन काही क्षण नुसताच क्रिसकडे पाहत राहिला.
 "तेच कारण होतं आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचं."
"म्हणजे?" क्रिसला त्याच्या बोलण्याचा अर्थ उलगडेना.
"सारावर तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी बलात्कार केला होता. पण ती स्वत:च्या कोशात राहिली. सुगावाही लागू दिला नाही तिने. तिच्या मनात गावातून बाहेर पडायचं एवढा एकच विचार घोळत होता. बर्कलेला प्रवेश मिळाला तो आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या आधी." क्रिसला संकोचल्यासारखं झालं. असं काही झालं असेल या शक्यतेचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता.
"ब्रायन, तू मला हे सगळं सांगितलं नाहीस तरी चालेल रे. मला कळतंय तुला किती त्रास होतो आहे सांगताना." घाईघाईने क्रिसने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
"कुणाला तरी कधी ना कधी तरी सांगितलंच असतं ना. मी देखील कोंडून ठेवलं आहे सगळं मनात. ज्या दिवशी बर्कलेच्या प्रवेशाचं साराने सांगितलं त्याच वेळेस बलात्काराचंही. बाबा एकदम पेटून उठले. आई दु:खाने काळवंडली आणि मी भावनेच्या भोवर्‍यात अडकलो. निराशेचे झटकेच यायला लागले. सतत मनाला अस्वस्थपणाने घेरलेलं असतं. तो लपवताना निष्काळजीपणा पांघरावा लागतो. जीव गुदमरतो. फार फार थकवा येतो, मनाने, शरिराने दुर्बळ होऊन जायला होतं अगदी. साराने आपल्या मनातलं दु:ख सांगण्याएवढं जवळचं मानलं नाही, त्यामुळे करण्यासारखं काही उरलं नाही या रागाने बाबांनी साराशी अबोला धरला. परिस्थिती इतकी ताणली गेली की आत्महत्येनंच या सगळ्याचा शेवट होईल असं आईच्या मनाने घेतलं."
"बापरे, मला कल्पनाही करवत नाही." क्रिसच्या शब्दातून हळुवारपणा ओथंबत होता.
"त्यातून आई वाचली आणि बाबांनी तिला पुन्हा हसतंखेळतं केलं. आता मीही तसा ठीक आहे." अचानक मनावरचा ताण ओसरल्यावर ब्रायनला थकवा आला. त्याने मातीत अंग टाकलं.
"तब्बल दोन तास सायकली दामटवल्या आपण." क्रिसही तिथेच टेकला.
"भूक लागली आहे जबरदस्त. तुझ्याकडे उरलय काही?"
"संपलय सगळं." क्रिसच्या स्वरात निराशा होती.
"काहीतरी कर रे बाबा. तीन दिवस झाले. पोटात अन्नाचा कण नाही गेलेला. पाण्यावर किती दिवस काढायचे? एक वहाळ शोधायला दोन तास. मला नाही जमणार हे. मारुन टाक तू मला. मारून टाक एकदाचं." अचानक क्रिसचे हात जबरदस्तीने ब्रायनने आपल्या गळ्याभोवती आवळून घेतले, गुंतवले. क्रिस भडकला.
"मुस्काट फोडून टाकेन तुझं. शांत हो बघू आधी तू. काय हा वेडेपणा. किती उतावळेपणा करतोस."
हमसाहमशी रडत ब्रायन बाजूला झाला. दोघं एकमेकांशी एक शब्द न बोलता पडून राहिले. पाचदहा मिनिटात ब्रायनचा डोळा लागला.  थोडावेळ क्रिस विचार करत राहिला. कधीतरी आपसूक तोही झोपला.

रात्री अपरात्री केव्हातरी झोपेत ब्रायन चाळवला. उठून बसला आणि रडायलाच लागला. जीवघेणी शांतता दोघांच्या मध्ये रेंगाळली.
"क्रिस मी आता एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. तूही दमला आहेस ते ठाऊक आहे मला. पण मानलं तुला. तुझ्या इतकी सहनशक्ती माझ्यात नाही."
बोलता बोलता ब्रायनचं पोट ढवळून निघालं. पोट दाबून तो तिथून बाजूला झाला. उलटीची भावना येत असूनही त्याला कोरडा खोकला येत राहिला. बराचवेळ. क्रिस न बोलता ब्रायनच्या पाठीवर थोपटत राहिला.
"तू निघ मला सोडून. नाही तर इथेच मरु आपण." खोकला थांबला तसं ब्रायन क्रिसला विनवीत राहीला.
"तू विश्रांती घे म्हणजे असे विचार डोकावणार नाहीत. तुला सोडून कसा जाईन मी? आपण असं करु, ही जागा मुक्कामाची म्हणून ठरवू. तू इथेच थांब. मी मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो. नाहीच तर परत इथेच भेटू. तू हलू नकोस." क्रिसच्या बोलण्यावर विचार करण्याचीही क्षमता ब्रायनमध्ये उरली नव्हती. तो निपचीत पडून राहिला. ब्रायनचा डोळा लागल्यावर क्रिस उठला. एकाकी, मदतीच्या आशेवर वणवण फिरत राहिला. पिशवीत कोंबलेल्या छोट्या आरशाच्या प्रतिबिंबाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत राहिला. पण प्रकाशाची तिरीपच झाडांमधून आत येत नव्हती तिथे त्या आरशाचा काय उपयोग? पाय रेटत, थकलेल्या देहाने तो मुक्कामाच्या ठिकाणी परतला. ब्रायन निपचीत पडून होता. क्रिसच्या मनातलं ब्रायनच्या बेदरकारपणाचं सुप्त आकर्षण आता त्याच्याबद्दलच्या करुणेत बदललं. तो तसाच बसून राहिला. त्या रात्री चारपाच वेळा ब्रायनला उलट्या झाल्या. त्याचं पोटही खराब झालं. अन्नपाण्यावाचून उकिरडा झालेल्या त्या जागेवरुन ब्रायनला अक्षरश: ओढत, फरफटत त्याने बाजूला नेलं.

दोघांचाही डोळा लागेना. गलितगात्र अवस्थेत रात्र कशीबशी पार पडली. डोळा लागतोय असं वाटत असतानाच क्रिस दचकून जागा झाला ते ब्रायनच्या गदगदा हलवण्याने. तेवढ्या श्रमानेही ब्रायन परत कोसळला. अडखळत त्याच्या तोंडातून कसेबसे बाहेर पडले.
"क्रिस, माझा जीव घे, मदत कर मित्रा. मारुन टाक, मारुन टाक रे मला. पाय धरतो तुझे पण असा जिवंत नाही राहू शकत मी."
"काय बोलतोस हे ब्रायन?" क्रिस हवालदिल होऊन रडायला लागला.
"तू शांतपणे विचार कर क्रिस. इथून जंगलाबाहेर आता शोधपथकाशिवाय पडूच शकत नाही आपण. तुझ्यावरही मर्यादा पडतायत माझ्यामुळे. माझी औषधंच वाचवू शकतात मला. पण ती इतक्यात मिळण्याची शक्यता नाही. असातसा मरणारच आहे तर तूच यातनांतून सुटका कर माझी. तुलाही माझ्या अडथळ्याशिवाय रस्ता शोधणं सोपं पडेल."
क्रिसने जीर्ण झालेल्या ब्रायनला घट्ट आलिंगन दिलं.
"दोस्ता तुझा उतावळेपणा बोलतोय हा. भलतंच काही तरी सांगू नकोस. आपल्या शोधाला सुरुवात झालेली असेलच. अजून दोन तीन दिवस असेच काढू शकतो आपण. नंतर रुग्णालयातच हलवतील आणि तब्येती सुधारतील."
ब्रायनच्या नजरेला नजर देत क्रिसने त्याच्या आशा वाढवण्याचा क्षीण प्रयत्न केला. तो थोडासा शांत झाल्यावर क्रिस उठलाच. काही करुन त्याला जंगलाच्या बाहेर पडायचं होतं. मदत मिळवायची होती. पायात जोर नसला तरी पावलं भरभर टाकण्याचा तो प्रयत्न करत होता.
’खरंच ब्रायनला मारावं लागलं तर?" क्रिसच्या अंगावर मनात डोकावलेल्या या विचारानेच काटा आला. दहा वर्ष संगतीत असलेल्या मित्राला आपण असा  कायमचा निरोप द्यायचा?
ब्रायनच्या अवस्थेवरुन एखादाच दिवस आणखी असं वाटत होतं. मग कशाला जीव घ्यायचा? नैसर्गिकपणे जे होईल ते होईल. पण हाच शेवट असेल तर यातनातून तरी सुटका होईल त्याची माझ्यामुळे.  कधी किडामुंगीलाही न दुखावलेल्या क्रिसच्या छातीचे ठोके कल्पनेनंच ढोलकी बडवल्यासारखे कानात आपटायला लागले. तो तसाच  माघारी पळत सुटला. घसा कोरडा पडलेल्या, घामाघूम क्रिसला आता हृदयविकाराचा झटका स्वत:लाच येईल असं वाटत होतं.
"फार लांब नाही गेलो. तुझ्याबद्दलच्या विचारांनीच शीण आला. काळजीने धावत आलो परत." क्रिसच्या जवळ जाऊन तो गुडघ्यावर बसला. ब्रायनच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या.
"तुझ्यासारखा मित्र लाभला मला. नशिबवान आहे मी. कृपा कर मित्रा. सोडव मला यातनातून. खुनाचा आरोप नाही यायचा तुझ्यावर. सांगूच नको कुणाला काय घडलं ते. दूर दूर निघून जा. ऐक माझं." इतकं बोलतानाही ब्रायनला धाप लागत होती. शब्द ओठातून बाहेर पडताना अडखळत होते.
क्रिसच्या कानावर एकेक शब्द आदळत होता. पण नजर शून्याचा वेध घेत होती. त्याचा हात कधी खिशात गेला हेही त्याला कळलं नाही. खिशातली छ्प्पनसुरी एका झटक्यात त्याने ब्रायनच्या हाताच्या शिरेत घुसवली. मनगटातून रक्ताची धार लागली. आधीच जीर्ण झालेल्या त्या कुडीने क्षणात विसावा घेतला.

तांबारलेल्या नजरेने क्रिस गोठल्यासारखा पाहत राहिला. जोरात किंचाळावंसं वाटूनही त्याच्या घशातून आवाज फुटेना. तो ब्रायनला गदगदा हलवित राहिला. दु:खाने कोसळला. ब्रायनने सांगितल्याप्रमाणे त्याला तिथून हलवेना. निष्प्राण झालेल्या मित्राची संगत त्याला सोडवेना. सडत जाणार्‍या देहाची भुकेल्या, थकलेल्या मनानं क्रिस राखण करत राहिला.

तब्बल बहात्तर तास गुडघ्यात डोकं खुपसून बसलेल्या क्रिसचा चेहरा बॅटरीच्या प्रकाशझोतात उजळून निघाला.
"ब्रायननेच करायला लावलं हे, त्याच्यामुळेच केलं मी हे कृत्य. मदत हवी होती त्याला. मदत." ब्रायनच्या आई वडिलांच्या नजरेला नजर देत क्रिस  त्याच्या आई वडिलांच्या कुशीत कोसळला.

हातातल्या पाकिटावर ब्रायनच्या घरचा पत्ता लिहीत वडिलांच्या हातात पत्र सोपवलं आणि क्रिसने केविलवाण्या चेहर्‍याने तुरुंगातल्या बाकड्यावर देह टाकला. चेहर्‍यावर आडवा हात टाकून तो तसाच पडून राहिला. पुढे काय हे प्रश्नचिन्ह होतं. कोर्टाचा निकाल त्याच्या हातात नव्हता. आई- वडिलांचे काळवंडलेले चेहरे पाहून  पोटात ढवळून निघत होतं. पण कुठं तरी आपलं मन त्यांना कळल्याच्या खुणा पाहिल्यावर क्रिसच्या मनाला थोडीफार शांतता लाभली.
आता पुढचा मार्ग असेल तसा  स्वीकारण्याची मानसिक तयारी झाली होती क्रिसची. तरीही ब्रायनच्या आई वडिलांनी आपली आणि त्यांच्या मुलाचीही बाजू समजून घ्यावी एवढीच क्रिसची इच्छा होती. ब्रायनचे आई वडील सारी हकिकत ऐकतायत, पत्रातलं अक्षर न अक्षर पुन्हा पुन्हा वाचतायत, त्यांनी क्रिसला, ब्रायनला दोघांनाही समजून घेतलं आहे.  डबडबून आलेल्या डोळ्यांसमोचं अंधुक चित्र भंगता नये इतकाच ध्यास त्याच्या मनाला लागला....

Friday, September 7, 2012

काही गोड तर काही कडू...

"आय   एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि  विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,
"तसा काही हेतू नव्हता त्याचा किंवा आमचा कुणाचाच..." हळूहळू ती शांत झाली. विनसी आमची एजंट. घर विकत घ्यायचं ठरल्यावर तिच्याबरोबर फिरत होतो. परदेशात राहत असलो तरी आईशी बोलायचं ते मराठीतच हे ब्रीद वाक्य मुलांच्या मनावर पक्कं ठसलेलं आहे त्यामुळे पोरं मराठीत आणि तिला एकटं पडल्यासारखं वाटू नये म्हणून माझी उत्तरं इंग्लिशमध्ये अशी कसरत गाडीत झाली होतीच. पण अगदी थोडावेळ. म्हणजे सुरुवात व्हायची मराठीतून पण माझं इंग्लिश ऐकल्यावर उरलेलं सारं मुलं इंग्लिशमध्ये बोलायची. पण जे काही बोलणं मराठीत झालं त्याचं पर्यवसान असं होईल याची शंकाही आली नाही. विनसी माझ्यावर उखडलेली मुलाने पाहिलं. आता तो संतापला मनातून. पण आजीच्या वयाच्या माणसाला काही बोलायचं नाही एवढं तारतम्य त्याच्याकडे होतं. मुलीला काय झालं ते कळण्याएवढी ती मोठी नाही. ती तितक्यात काहीतरी मला सांगत आली, मराठीत. काय करावं ते सुचेना, मराठीतूनच तू इंग्लिश बोल हे त्या वेळेला कसं सांगणार? मी घाईघाईत तिला म्हटलं.
"शी डज नॉट लाइक इफ यू स्पीक इन इंग्लिश." मुलीने समजल्यासारखी भाषा बदलली. पुढे तिने दाखवलेली घरं यात्रिकपणेच पाहिली. घर शोधण्याचा उत्साह एकदम बारगळला.
नंतर तिचं क्षमा मागणारं इ मेल आलं. पण त्याला काय अर्थ?

एकीकडे मुलांनी आपली भाषा विसरू नये म्हणून प्रयत्न करायचा, आणि त्याचवेळेस ’फक्त घरी बोला हं मराठी आमच्याशी, बाहेर असलो की आमच्याशी इंग्लिशच बोलायचं’ असं सांगायचं म्हणजे इफ एल्स करून कार्यालयातली प्रोग्रॅमिंगची भाषा वापरल्यासारखंच की. मुलांचा संगणक केल्यासारखं. पुन्हा त्यातून त्यांना इंग्लिशमध्येच बोला म्हटलं की लगेच ती पण अस्त्र घेऊन तयार असतात,
"तूच तर सांगतेस आमच्याशी मराठीतच बोलायचं."
"अरे पण..." स्पष्टीकरण देतानाच वाटत राहतं  कळ दाबली की मराठी किंवा इंग्लिश अशी खेळण्यासारखी अवस्था तर करून टाकत नाही ना आपण त्यांची?.
मुलगा तर अशा वयात,
"हॅ, आता तर मुद्दामच मराठी बोलू आपण तिच्यासमोर. आणि तुम्ही पण ऐकून काय घेता?  ’फायर’ करा ना तिला." इथे अमेरिकन बाणा असतो त्याचा.
"स्पॅनिश बोलणार्‍या लोकांबरोबर काय केलं असतं तिने?  सांगितलं असतं का असं त्यांना?."
"घरं विकायची तर फ्रेंडलीपणा असायला नको का?"
"तिच्या जागी तुम्ही असतात तर तिने नसतं का तुम्हाला ’फायर’ केलं?’

एक ना अनेक मतं. आम्हाला वाटत राहतं, तिला जे सांगायचं ते  सौम्य शब्दात सगीतला असतं तर? तुम्ही घराबद्दल बोलत असाल तर इंग्लिशमध्येच बोला, म्हणजे मलाही समजेल काय मतं आहेत तुमची... असं काहीतरी. तिच्या वयाकडे, मेहनतीकडे पाहून आमचा काही जीव धजावत नाही तिला काही बोलण्याचा किंवा ’फायर’ करण्याचा.  मनातल्या मनात निषेध करत माझं तिच्याबरोबर घर बघणं चालूच राहतं.... आणि अचानक एक दिवस तिचं ईमेल येतं.
"मी सेवानिवृत्त होणार आहे लवकरच. त्याआधी तुम्हाला माझ्या बदली दुसरी एजंट देते. आणि एक लक्षात ठेवा. तुम्ही कस्टमर आहात. आवडली नाही एजंट तर यू कॅन फायर हर.... विनसी"

गेले तीन आठवडे माझा सतरा वर्षाचा मुलगा भारतात आहे. खूप फिरतोय, अंजिठा, वेरूळ, रायगड, बंगळूर, कितीतरी ठिकाणं आणि प्रत्येक ठीकाणच्या नातेवाईकांना भेटतोय. त्याचं कौतुक  होतंय तसंच त्याच्या मराठी बोलण्याचंही. विनसीची समस्या सोडवता आली नाही खरी, पण जेव्हा मराठीच्या कौतुकाची पावती मिळते तेव्हा बरं वाटतं, असं मनात म्हणत मी आपलं नुकतंच माझ्या मावसभावाचं इंग्लिशमधून आलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचत राहते.
You should be proud of your boy. Even I am unable to speak Marathi without using english words, however he spoke purely in marathi.Great, hats off to you.

याचसाठी केला होता अट्टाहास, त्याची काही गोड फळे तर काही कडू, एकाच नाण्याच्या दोन बाजू....


Thursday, August 30, 2012

दैनिक ’प्रहार’ मधील माझा लेख

’जिज्ञासा थिएटर्स’ या  रत्नागिरीतील संस्थेसाठी, दैनिक ’प्रहार’ साठी लिहलेले अनुभव. इथे फक्त मी काय केलं ते सांगण्याचं प्रयोजन नाही तर अभिनय, दिग्दर्शन करताना येणारे अनुभव हा महत्वाचा उद्देश आहे. हे अनुभव तुम्हालाही आवडतील ही अपेक्षा.

"अवं असं डोसक्यात राक घालून..."  रंगीत तालमीचे संवाद सुरु होते.  उत्साह, गडबड, हास्य विनोद असं वातावरण होतं. कलाकाराचे संवाद सुरु झाले की थोडीशी शांतता, कुजबुजते आवाज. आत्ताही प्रकाशव्यवस्थेसाठी एक दोन वाक्य प्रत्येक कलाकाराला म्हणायची होती. मी प्रकाशव्यवस्था करणार्‍या माझ्या नवर्‍याला, विरेनला हातवारे करुन सूचना देत होते. तितक्यात माझी तीन वर्षाची मुलगी मला येऊन फक्त बिलगली. बस, तेवढ्याने कलाकाराची तंद्री भंग पावली.
"आय कॅन्ट डू धिस...." रागाने लाल झाले ते. आजूबाजूला कुजबुजणारे, जोरजोरात सूचना देणारे सगळे आवाज बंद पडले. असह्य शांतता वातावरणात पसरली. काय करावं ते सुचेना. प्रसंगावधान राखून विरेनने दुसर्‍या कलाकाराला संवाद म्हणायची सूचना केली. तो कलाकारही शांत झाला. दुसर्‍या दिवशी प्रयोग, आदल्या दिवशी हा प्रकार. रात्रभर एकच प्रश्न मनाला छळत होता.
"कशाला पडतो या फंदात? फायदा तर काहीच नाही. वेळ आली तर आपलाच खिसा सैल सोडायचा, महिनेच्या महिने तन, मन, धन ओतायचं. आणि असा प्रसंग आला की मूग गिळून गप्प बसायचं. कशासाठी हे सगळं?"

दुसर्‍या दिवशी एकांकिका मस्त रंगल्या. पडद्यामागचे, पुढचे कलाकार असे  पिझ्झा खायला बसलो आणि त्या क्षणाला पुढच्या वर्षीच्या एकांकिकेचे बेत सुरु झाले. झालं गेलं सारं विसरुन पुन्हा ताजेतवाने झालो ते पुढच्या एकांकिकेसाठी.  इतकी असते ही नशा? कटु आठवणी पुसट होत पुन्हा पुन्हा त्याच मार्गाला नेणारी? नकळत मन मागे गेलं. नुसता अभिनय करण्याचं समाधान होतं त्या वेळेपर्यंत पोचलं, किंबहुना अभिनय म्हणजे काय हेही कळत नव्हतं तिथे जाऊन उभं राहिलं.  पालक मुलांना वेगवेगळ्या छंद वर्गात घालून पूर्ण गुंतवून टाकत नसत. शाळेतर्फे भाग घ्यायचा, शिक्षक म्हणतील ते करायचं, त्यावेळची ही गोष्ट.

"ऊठ, ऊठ" रात्री कधीतरी स्टेजवर डुलकी काढत बसलेल्या मुलांमधून बाईंनी उठवलं. कुणीतरी कळ दिल्यासारखं धडपडत उठून मी, ’मी ही ही एकटीच नाचते...’ हे गाणं म्हणत नाच केला तो पहिलीत असताना. देवरुखच्या भोंदे शाळेच्या पडवीसमोर पुढे फळ्या वगैरे घालून  वाढवलेलं स्टेज. शाळेतली कार्यक्रम करणारी मुलं मागे रांगेत बसलेली.  सर्वच मुलं रात्र बरीच झाल्याने  डुलक्या काढत होती . नाव पुकारलं  की उठायचं, नाच, गाणं असं काहीतरी उरकायचं आणि परत मागे जाऊन बसायचं...

त्यानंतर आम्ही देवरुखहून वडिलांच्या बदलीमुळे पालघरला आलो.  एक दिवस, मोगरे बाईंनी वर्गातल्या दोघा तिघांना शाळा सुटल्यावर भेटायला सांगितलं. तो दिवस आजही जसाच्या तसा लक्षात आहे. कोणी काय केलं आणि बाई किती ओरडणार हेच विचार मनात घोळवत ’त्या’ वर्गात पोचलो.
"शाळेचा रौप्यमहोत्सव आहे. तेव्हा दहा मिनिटांचा प्रवेश बसवणार आहोत." पालघर ठाणे जिल्ह्यात  गुजरातच्या सीमेवर आहे पण, नाटकांचा प्रभाव अजिबात नाही; निदान तेव्हा तरी नव्हता. त्यामुळे बाई  प्रवेश बसवणार म्हणजे नक्की काय करणार हे ही ठाऊक नव्हतं, अभिनय वगैरे गोष्टी फार दूरच्या. बाई काहीतरी करायला सांगताहेत ते करायचं इतकंच.
आज त्या प्रवेशातले आनंदीबाईचे फोटो पाहताना शाळेच्या मोठ्या मैदानावर उभारलेला रंगमंच, नऊवारी नेसलेली, नथ घातलेली आनंदीबाई, राघोबा, पेशवे  इतकंच डोळ्यासमोर येतं आणि नंतर घरी, शाळेत झालेलं कौतुक. त्यानंतर एखाद्या वर्षाने शाळेत केलेला टिळकांवरचा प्रवेश. मला टिळक केलं होतं आणि खुर्चीवरून उठताना धोतर सुटल्याने टिळक खुर्चीवरच बसून राहिले इतकं आठवतं.

वडिलांची बदली कणकवलीला झाल्यावर चित्र पालटलं. कोकण भाग नाट्यप्रेमी.  एस. एम. हायस्कूलच्या करंबेळकर बाई, लोखंडे आणि साळुंके सरांच्या तालमीत  नाथ पै एकांकिकेसाठी शाळेतर्फे एकांकिका नेत त्यामध्ये भाग घेणं सुरु झालं; तेव्हा स्पर्धेत भाग घेणं, अभिनय करणं त्यासाठी मेहनत घेणं म्हणजे काय ते समजायला लागलं.  पालघरला असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे तर फार अप्रूप होतं या सार्‍या गोष्टींचं. बच्चू बर्वेची अफलातून दिवास्वप्ने, गजरा अशा एकांकिका त्या वेळेस स्पर्धेसाठी शाळेने केल्या. डिंसेबरच्या शेवटच्या आठवड्यात असणार्‍या या एकांकिका स्पर्धांवर स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी असीम प्रेम केलं. जेव्हा जेव्हा अभिनयासाठी  पारितोषिक  मिळालं त्या वेळेस  झालेला आनंद अवर्णनीय होताच,  पण त्याचबरोबर शाळा सुटल्यावरच्या तालमी,  शिक्षकवर्गाने केलेलं कौतुक  हे  फार मोलाचं होतं.

काही वेळेस आनंद आणि निराशेचा अनुभव एकाचवेळी पदरी येतो. अबोल झाली सतारमधील  सविताच्या भूमिकेला नाथ पै एकांकिका स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं, आनंद द्विगुणित झाला कारण स्त्री गटात दुसरं तिसरं पारितोषिक कुणालाही मिळालं नव्हतं. पण या आनंदाला गालबोट लागलं ते परिक्षकेच्या शब्दांनी.  एकांकिका, सतारवादक रमेशला झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात सविता त्याच्यावर होणार्‍या शस्त्रक्रियेची वाट पहात असताना घडते. अपघात झालेल्या रमेशची बायको इतकी नटून थटून, सुंदर साडी नेसून कशी असा प्रश्न परिक्षक बाईंना पडला आणि प्रेक्षागृहात हास्याची लकेर उमटली. दीपक परब एकांकिकेचे दिग्दर्शक. हा दिग्दर्शनाचा भाग आहे, मी वाईट वाटून घेऊ नये असं म्हणत त्यांनी  माझी समजूत घातली. बहुधा परिकक्षकांबरोबरही ते बोलले असावेत. खरी हकिकत अशी होती की सविता रमेशच्या आवडीची साडी नेसून, नटून थटून तयार झालेली असते.  तो रस्ता ओलांडून त्याच्या सतार वादनासंदर्भात आलेल्या बातमीसाठी वर्तमानपत्र आणायला जात असताना ती गॅलरीत उभी असते. रस्त्यापलीकडच्या दुकानात तो वर्तमानपत्र घेतो आणि ते फडकवत भान विसरून रस्ता ओलांडतो. अपघात होतो. आता अश्या वेळेस ती साडी न बदलता असेल तशीच रुग्णालयात पोचणार ना? याचा उल्लेख एकांकिकेत अर्थातच आहे. हा अनुभव माझ्या मनावर खोल रुतून राहिला आणि नकळत तो पुढे उपयोगी पडत राहिला.

 एकांकिकेतल्या कामाचा आनंद घेत असतानाच  अविनाश मसुरेकरांनी बसवलेल्या मंतरलेली चैत्रवेल नाटकात पन्नाशीच्या आसपासच्या स्त्रीची,  अत्यंत करारी, काहीशी क्रुरपणाकडे वळणारी लीलाबाईंची भूमिका केली ती बहुधा अकरावीत असताना. प्रौढ बाईची रंगभूषा केल्यावर वेगळंच वाटायचं. या नाटकाचे खूप ठीकाणी प्रयोग झाले. बहुतेक ठिकाणी प्रयोगाला तुफान गर्दी असायची. गर्दीची नशा उतरली ती मसूर गावात. जेमतेम पाच पंचवीस लोकं भल्या मोठ्या नाट्यगृहात पाहिल्यावर नाटक कुणासाठी करायचं ह्या  चिंतेने सार्‍यानाच घेरलं.
"भरपूर लोकं समोर आहेत असं समजून आपापली भूमिका करायची." स्वत:ची निराशा लपवीत दिग्दर्शकांनी कानपिचकी दिली आणि त्या पाच पंचवीस प्रेक्षकांसाठी प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलं. खरं तर अविनाशनी सांगितलं त्याची अंमलबजावणी केली.
अपंग मुलीला सांभाळण्याचं काम करण्यासाठी आलेल्या लिलाबाई त्या मुलीचा आत्यंतिक द्वेष करतात. लिलाबाईंच्या कोड्यात टाकणार्‍या वागण्याचं रहस्य उलगडतं ते शेवटी. त्यानंतर लिलाबाईंबद्दल कीव, सहानुभुती वाटायला लागते. पण तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनातला राग पराकोटीला पोचत असे.
नाटक संपल्यावर मला कुणी ओळखतच नसे याचं थोडंसं दु:ख होई पण तो रंगभूषेचा प्रभाव होता, रंगभूषाकाराला मिळालेली ती दादच. लिलाबाई अशी ओळख करून दिल्यावर आधी आश्चर्य आणि नंतर लिलाबाईंवर दगड टाकावेत असं वाटत होतं शेवटपर्यंत अशा भावना  प्रेक्षक व्यक्त करत. भूमिकेच्या पसंतीची ती वेगळीच पावती होती.

कणकवलीहून रत्नागिरीला आम्ही आलो त्या वर्षी जे. के. फाईल्सच्या ’वर्कर्स’ या सुहास भोळे लिखित आणि दिग्दर्शित एकांकिकेने नाथ पै स्पर्धेत बरीच बक्षिसं मिळवली होती. त्याचवेळेस मलाही अबोल झाली सतार एकांकिकेसाठी स्त्री कलाकारांमध्ये अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. यामुळेच रत्नागिरीला आल्याआल्या सुहास भोळेंशी संपर्क साधता आला आणि फक्त दोन महिन्यात त्यांच्या पालखी एकांकिकेतून पुन्हा कणकवलीला स्पर्धेसाठी जाता आलं. नंतर त्यांच्या जिज्ञासा संस्थेतर्फे भिंत, दंगल अशा एकांकिका, प्रतिबिंब नाटक या सर्वाचे स्पर्धांसाठी आणि इतर ठिकाणी असंख्य प्रयोग केले.  बक्षिसं मिळवली. मंतरलेले दिवस होते. दंगलची भूमिका तर आठ दिवसात सुहासनी बसवली होती. शिर्के हायस्कूल मध्ये केलेल्या तालमी, नाटक, एकांकिकेसाठी सर्व कलाकारांनी केलेला प्रवास. गप्पा, गोष्टी, रुसवे फुगवे....मनाच्या कोपर्‍यात दडलेल्या आठवणी उलगडताना हे सारं पुन्हा अनुभवल्यासारखं वाटतं.  वटवट सावित्री, गाठ आहे माझ्याशी, माणूस नावाचं बेट, मोरुची मावशी अशी अनेक नाटकं, अविनाश फणसेकर, श्रीकांत पाटील अशा रत्नागिरीतील नामवंत दिग्दर्शकांबरोबर करता आली.  फणसेकर सरांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या एकांकिकेला दिग्दर्शन करण्याचीही संधी दिली तो दिग्दर्शनाचा पहिला अनुभव.

तेव्हा कधी जाणवलं नव्हतं ते पार साता समुद्राकडे आल्यावर जाणवतं. इतकी वर्ष नुसतं अभिनय करण्याचं सुख पदरी पडलं असं नाही तर सर्वांशी झालेली कायमस्वरुपी मैत्री हा ठेवा मला  मोलाचा वाटतो. यातल्या काही सहकलाकारांबरोबर आज इतक्या वर्षांनीही संपर्क आहे ही जाणीव सुखद आहे.

अमेरिकेत येऊन सतरा वर्ष झाली. सुरुवातीला छोट्य़ा गावात असताना कथाकथन, लेखन यावर अभिनयाची तहान भागवावी लागली.  काही वर्षापासून आम्ही म्हणजे मी आणि माझा नवरा विरेन, ’अभिव्यक्ती’ या आमच्या संस्थेतर्फे व्यावसायिक पातळीवर एकांकिका करतो.  भिंत, महाभारताचे उत्तर रामायण, खेळ, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर या एकांकिका आत्तापर्यंत आम्ही केल्या. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, नाट्यमंदिर आरक्षण, ध्वनी, संगीत, जाहीरात, तिकीट विक्री अशा अगणित बाजू सांभाळणं पार पडलं ते इथल्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने. हे करत असताना गाठीशी जमते अनुभवाची पुंजी. माणसांचे स्वभाव उलगडत जातात, आपण केलेल्या चुका लक्षात येतात. दिग्दर्शनाची तारेवरची कसरत करताना तर वर उल्लेख केलेल्या सार्या दिग्दर्शकांची कमाल वाटत राहते.

 भारतात संस्था, कलाकार, प्रेक्षक यांची उणीव भासत नाही. परदेशात मोठी शहरं सोडल्यास साधारण १०० - १५० मराठी कुटुंब छोट्या गावांमध्ये असतात. केरीमध्येही तितकीच संख्या आहे.  इथे काम करणार्‍यांचा दृष्टिकोन हौस म्हणून अभिनय करण्याचा असतो. पण तिकिटं लावून प्रयोग करायचं ठरवलं की काय पर्याय? त्यामुळे हौशी कलाकारांकडून व्यावसायिक पातळीची अपेक्षा केली की कुरकुर होत राहते. दिग्दर्शक या नात्याने समाधान होईपर्यंत तो तो प्रसंग झोप उडवून टाकतो.

विनोदी प्रसंगात वाहवत जाऊन आमच्या एका कलाकाराने रंगमंचावर स्त्री कलाकाराशी केलेल्या लगटीने आम्हाला शहाणं केलं. नट रंगभूमीवर गेला की दिग्दर्शकाच्या हातात काही उरत नाही याची विदीर्ण करणारी जाणीव अशा प्रसंगी होते. असं काही घडतं तेव्हा मनात विचार तरळून जातो. त्या वेळेस आमच्या दिग्दर्शकांनाही वेगवेगळ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागलं असणारच. आशा निराशेचा लपंडाव, कटू गोड प्रसंग हे या खेळाचे अविभाज्य भाग. पण तरीही पुन्हा त्याच उत्साहाने पुढच्या डावाची तयारी सुरु होते. एकदा तोंडाला रंग लागला की....हेच खरं, नाही का?

एकांकिका झलक पहाण्याचा दुवा -   http://marathiekankika.wordpress.com

Wednesday, August 15, 2012

भरारी

मीनाताईंनी जेवणाचा डबा उघडला. मख्खपणे त्यांच्या हालचाली बघत बसलेल्या अनिताकडे त्यांनी एक नजर टाकली. काही क्षण त्या नुसत्याच बारा वर्षाच्या अनिताकडे पहात राहिल्या. केस कसेतरी जेमतेम बांधलेले, तिचे तिनेच विंचरलेले असावेत. कपाळावरची छोटी टिकली. काळासावळा रंग आणि निस्तेज डोळे.स्वतःतच हरवलेल्या हालचाली. ती स्वतःहून काही करणार नाही हे लक्षात आलं तसं मीनाताईंनी पोळीचे तुकडे, थोडीशी भाजी जे काही डब्यात होतं ते काढून समोर ठेवलं.
"अनिता जेवणाची वेळ झाली आहे. बघ तुझ्या डब्यात काय काय आहे, खाणार ना?"
निर्विकार चेहर्‍याने अनिताने पोळीचा तुकडा तोडांत टाकला. तिला पोळीबरोबर भाजी खायला बजावून मीनाताई दुसर्‍या मुलाकडे गेल्या. पुन्हा सगळं त्याच क्रमात झालं आणि त्या आपला डबा आणण्यासाठी वळल्या. धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांच्या काळजात धडधडलं. गर्रकन मीनाताईंनी मागे वळून पाहिलं. त्यांनी पाठ फिरवल्या फिरवल्या अनिताने डबा बाकड्यावरुन जोरात ढकलला होता. डब्यातलं अन्न खाली सांडलं. आधीच जेमतेम बांधलेले केस अस्ताव्यस्त झाले होते. पिंजारलेले केस ओढत अनिता तारस्वरात किंचाळत होती. चेहर्‍यावर अतीव आश्चर्य, दु:ख आणि वेदना. धावत मागे होवून मीनाताईंनी अनिताला घट्ट मिठीत धरलं. तिचं डोकं छातीत रुतवलं आणि त्या अनिताला बराचवेळ थोपटत राहिल्या, केसावरुन हात फिरवत राहिल्या. आपल्या स्पर्शाने, मायेने तिची वेदना नाहीशी व्हावी असं त्यांना मनापासून वाटत होतं. हळूहळू सगळं शांत झालं. मीनाताईंनी आजूबाजूला पाहिलं. त्या छोट्याशा खोलीतले दहा, बारा डोळे अनिताकडे रोखून पहात होते.  काय झालं हे आकलन होण्याइतकी जाण नव्हती कुणालाच. त्यामुळे कुणीही अनिताच्या रडण्या, ओरडण्याने घाबरलं नव्हतं की वैतागलं नव्हतं. शारिरीकदृष्टया निरोगी, अव्यंग, पण मनाने कमकुवत, सार्‍या भावनांच्या पलिकडे गेलेली ही मुलं. मीनाताईंच्या हातापायातलं त्राण गेल्यासारखं झालं. या मुलांच्या जगात आपणच वेगळे असल्याच्या भावनेने त्यांच्या हातापायांना सुक्ष्म थरथर सुटली.  एकटेपणाचा विळखा मनातून देहापर्यंत पोचला. थोडावेळ त्या तशाच बसून राहिल्या. मुलंही सारं काही समजल्यासारखी पुस्तकात डोकं खुपसून बसली. सुमाला दारात उभं राहिलेलं पाहिलं आणि त्यांना एकदम आधार वाटला. त्यांच्या चेहर्‍याकडे पहात सुमाने विचारलं.
"पुन्हा तेच?"
"तुला कसं कळलं?"
"तुमचा चेहरा सांगतोय ना."
"हं"
"तुम्ही घरी जा बाई, काही वाटलं तर मी हाक मारेन तुम्हाला."
"नको बसते थोडावेळ. या मुलांसाठी काय केलं की आत्मविश्वास वाढेल त्यांचा तेच कळत नाही. शारिरिकदूष्ट्या सक्षम आहेत हे समाधान मानायलाच हवं. पण त्यांच्या हृदयातल्या वेदनेवर फुंकर घालून आत्मविश्वास कसा जागृत करायचा? जे झालं ते मागे टाकून पुढे व्हायला कसं शिकवायचं तेच कळत नाही. कुठल्यातरी एका घटनेने स्वत्व गमावलेली ही मुलं,"
"आणि पोरकीदेखील" सुमाने असं म्हटल्यावर त्यांनी आश्चर्यानेच तिच्याकडे पाहिलं.
"पोरकी कशानं गं? आई वडिल आहेत, आपणही आहोत की." त्यांना थोडासा रागच आला सुमाचा.
"हो, पण तरी पोरकीच. आई, बाप असूनही पोरकी हे कटु सत्य आहे त्यातलं."
"असं कसं बोलवतं ग तुला?"
"मी फक्त सत्य परिस्थिती सांगतेय बाई. तुम्हाला वाटतं की हे सगळं आपण बदलू शकतो. इतकं सोपं नसतं ते."
"मला माहित का नाही ते. पण सोपं नसलं तरी बदलू शकतो. आणि आपण एकटे थोडेच आहोत. समाजसेवक,  डॉक्टर, सेवाभावी संस्था कितीतरी लोकांच्या मदतीचे हात आहेत. काहीतरी असं सुचायला मात्र पाहिजे की त्यांच्या आत्मविश्वासाची पातळी एकदम उंचावेल. तसं झालं ना की सापडेल त्यांचा त्यांना मार्ग."
सुमाने नुसतीच मान डोलावली. बाईंर्पुढे बोलण्यात काही अर्थ नव्हता. ज्या तळमळीने त्याचं काम चालू असतं, त्या अशा मुलांमध्ये गुंतून जातात त्याला कुठेतरी मर्यादा असायला हवी असं सुमाला  वाटायचं. वेळ आली तर स्वतःचा जीव देतील. फार त्रास करुन घेतात, शरीराला, मनाला. पण सांगणार कोण? स्वतःशीच पुटपुटत सुमा मुलांकडे वळली.

मीनाताई मुलांचे कागद काढून वाचत राहिल्या. प्रत्येक मुलाची म्हटलं तर परिस्थिती वेगळी आणि म्हटलं तर सारखीच.  अंतिम परिणाम एकच. त्यातूनच आपली वाट शोधायची प्रत्येकाची धडपड, कुणीतरी दाखवलेल्या मार्गाने चालायची कसरत. हातात आलेला कागद त्या पुन्हा पुन्हा पहात राहिल्या. झोपडीच्या बाहेर झोपलेल्या सुरेशचं चित्र होतं ते. त्यानेच काढलेलं. त्यांचा जीव गलबलला. त्या छोट्याशा खोलीत सहा सात भावडांसाठी जागा पुरणं अशक्यच. नेहमी कुणी ना कुणी बाहेर झोपणं प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेलं. दोन्ही पाय गुडघ्याशी घेवून झोपलेला सुरेश. दहा वर्षाचा. आईला मदत म्हणून दुकानात पोछा मारायचं काम करायचा. अनुभवाने बेरड झालेला सुरेश शाळेत तसा व्यवस्थित वागायचा. चित्र तर फार सुंदर काढत होता. पण कधी काही बिनसलं की वागण्यात विचित्रपणा यायचा. आणि ते बिनसायला फार वेळही लागायचा नाही. शिव्यांची लाखोलीच वहायला सुरुवात करायचा तो. सुरुवातीला असं झालं की मीनाताई आणि सुमाला संकोच वाटायचा. बाकिच्या मुलांवर विपरीत परिणाम होईल याची भिती वाटायची. सुमा लागलीच त्याला शाळेच्या आवारात फिरायला न्यायची, त्याच्याशी गप्पा मारायची. तेव्हाच कधीतरी सुमाला त्याच्या वागण्याचं कारण कळलं. आधी वाटलं होतं तो हे असं वागणं, शिव्या घालणं घरातच शिकत असेल. तो अंदाज चुकला होता. दुकानातला त्याचा मालक तो पोछा करायला लागला की उगाचच काहीतरी खुसपट काढून त्याला बडबडायचा, सुरेश काही बोलला की शिव्यांचा भडिमार. हळूहळू मालकाने मारहाण चालू केली. एकदोनदा सुरेशने ते काम सोडूनही दिलं, पण दुसरीकडे लगेच काम मिळालं नाही की पुन्हा नाक घासत तो तिथे जाई. बाकीच्या मुलांची या ना त्या तर्‍हेने अशीच परिस्थिती. मीनाताईंचं मन अनिता या शाळेत आली त्या दिवसाकडे वळलं ...

त्या दिवशी संध्याकाळी त्या घरी आल्या तेव्हा मुलं, नवरा वाटच पहात होते.
"कुठून शाळा सुरु केली आहे असं झालय." नवर्‍याने पुढे केलेल्या चहाचा घोट त्या म्हणाल्या. कुणीच काही बोललं नाही तसं त्याच पुढे म्हणाल्या.
"हे असं मी म्हणते,  ते काही ना काही घडतं तेव्हाच.  आपल्या हातात काही नाही ही भावना काळीज कुरतडून टाकते तेव्हा शेवटी असं वाटायला लागतं.   ही मुलं अशा प्रसंगातून जातात तेव्हा तर आपण नसतोच तिथे, पण आता तरी परिस्थिती बदलता येईल का, मुलांना हसा खेळायला शिकवू का आपण. एक ना अनेक शंका येत राहातात."
"आज काय झालं?" नवर्‍याने नेहमीच्या शांतपणे विचारलं.
"आज दाखल झालेली अनिता, तिचे वडीलच तिच्यावर.... " त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा भडकलाच.
"बलात्कार म्हणायचं आहे आई तुला?"
"हं" त्यांच्या स्वरातला संकोच त्या हं मधून डोकावत राहिला.
"रस्त्यावर आणून उभं आडवं झोडपून काढायला हवं." त्याचा तो आवेश बघून त्यांना बरं वाटलं. पण नूसतं बोलून काय होणार?
"कशी आहे अनिता? तू बोललीस तिच्याशी?" त्यांच्या सोळा वर्षाच्या मुलीने विचारलं.
"ठीक आहे, एकदम नाही असं बोलता येत. तशी चांगली वागते. पण मध्येच तिला बलात्काराचं आठवतं, मग स्वतःलाच बोचकारत सुटते, मारुन घेते, केस ओढते स्वतःचेच. तिला कसं थांबयाचं तेच कळत नाही."
"आई-वडील कुठे आहेत?"
"नाही माहीत मला. आणि मला वाटतं हा प्रकार खूप दिवस चालला असावा, ती या संस्थेकडे कशी आली ते माहित नाही. पण नेहमीप्रमाणे समाजसेवकांनी आणून सोडलं आपल्या शाळेत. आता अशा मुलांना सांभाळतील त्यांची यादी आहे ना त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तोपर्यंत त्यांच्या संस्थेने व्यवस्था केली आहे तिच्या रहाण्याची."
"तुला आमची मदत लागली तर सांग." दोन्ही मुलांनी मनापासून म्हटलं. त्यांनीही मान डोलावली. पण यातलं काही होणार नव्हतं हे त्या जाणून होत्या. मुलं चांगली होती, त्यांना मनापासून आईच्या व्यापात सहभागी व्हायचं होतं. पण आत्ता कुठे त्यांच्या आयुष्याला सुरुवात होत होती. भविष्याचे वेध, महत्वाकांक्षा यातून वेळ मिळाला तरच ती दोघं या कशाचाच पत्ता नसलेल्या, घर हरवलेल्या मुलांसाठी काहीतरी करणार नं. त्यांना तरी कसा दोष देणार? मदतीचा हात पुढे करतायत हेच खूप.  नवरा मात्र त्यांच्या बरोबरीने धडपडत होता.

मीनाताई समाजसेवेची पदवी घेतल्यानंतर वेगळं काहीतरी करण्याच्या कल्पनेने भारुन गेल्या होत्या. या शाळेची कल्पना त्याचीच. अनाथ, अत्याचार झालेल्या मुलांसाठी शाळा. अशा प्रकारच्या शाळा कार्यरत आहेत की नाही याची त्यांना कल्पना नव्हती आणि असल्या तरी एकदा काम सुरु झालं की तिथेही वेगवेगळे प्रयोग सुचतील, मार्ग सापडतील असं त्यांना वाटत होतं.  सर्वसामान्य जीवन जगण्याची संधी अशा मुलांना मिळावी या इच्छेने त्यांना झपाटलं. समाजसेवी संस्थाना भेटून नवर्‍यानेच या शाळेची माहिती, जाहिरात केली. शाळेची जागा म्हणजे घराच्या मागच्या बाजूला असलेली एक खोली. मुलं वाढली की नंतर त्या जागेबाबतचा निर्णय घेणार होत्या.   व्याप वाढतोय असं वाटेपर्यंत मानसोपचारतज्ञ सुमा मदतीला आली, मीनाताईंबद्दल कुठेल्यातरी संस्थेनेच तिला माहिती दिली. एक दोनदा शाळेत येऊन तिने त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. एक, दोन म्हणता म्हणता सहा, सात मुलं होती आता. सगळी मुलं झोपडपट्टीतली. रोजच्या रोज मार खाणारी, शिवीगाळ करणारी, सेवाभावी संस्था मागे लागल्या की अधूनमधून शाळेत जाणारी. आला दिवस काय वाट्टेल ते करुन ढकलणारी. सतरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरातून त्यांना बाहेर कसं काढणार आणि आई वडिलांना सोडून ती तरी येतील का? जिथे घरातच त्रास होतो त्या मुलांचं काय करायचं? त्यांची कायमची व्यवस्था करता येईल का?  शाळा सुरु झाल्यावर या प्रश्नांच्या अंगाने त्यांनी खूप माहिती जमविली होती. त्यातूनच परदेशातल्या एका संस्थेचं काम त्यांच्या मनात खोलवर रुतलं होतं. सरकारने अशा मुलांचा ताबा घेतला की या संस्थेचं काम सुरु होई. पहिल्या काही दिवसात ते मूल तात्पुरत्या पालकांकडे पाठविलं जाई. नंतर मीनाताईंसारखे समाजसेवक त्या मुलाशी, पालकांशी, मुलाच्या शिक्षकाशी बोलून त्या मुलाने परत त्याच्या पालकाकडे जावं, का त्याचा ताबा इतर कुणाला मिळावा ते ठरवत. मुलाची बाजू कोर्टात मांडत. अशा समाजसेवकांना विशेष समाजसेवक म्हणूनच ओळखतात. मुलाची बाजू मांडणं हेच त्या समाजसेवकाचं काम. त्यासाठी विशेष समाजसेवकाला वकिल, मुख्य समाजसेवक, न्यायाधीश यांच्याबरोबर संवाद साधावा लागे. इतकं सगळं आपल्या देशात करता येईल की नाही याचा त्यांना अंदाज येत नव्हता पण त्यातूनच अशा मुलांना काही दिवसतरी आपलं मानतील असे पालक शोधायची कल्पना मीनाताईंना सुचली. मुलांना वेगळ्या वातावरणाची सवय होईल. त्यामुळे कदाचित मुलं आपलं घर बदलण्याचा प्रयत्न करतील. मानलेले पालक. फार नाही पण थोडीफार लोकं तयारही झाली या निराळ्या प्रयोगासाठी. प्रयोग चालू असतानाच बर्‍याच गोष्टी उमजत जाणार होत्या, तसतसे बदल केले जाणार होते.

अनिता त्यांच्यापुढ्यात काहीतरी घेवून आली तशा मीनाताई तंद्रीतून बाहेर आल्या. आता कशी थोडीशी सावरल्यासारखी वाटत होती, चेहर्‍यावर हलकसं हसू. मीना ताईंना बरं वाटलं. त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटलं. ती परत अभ्यासाला लागली. सुमाने मुलांचा ताबा घेतला होता, त्यामुळे आता काही काम नव्हतं. प्रत्येक दिवस म्हणजे नवीन परीक्षा. या मुलांचं वागणं समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी दरवेळी आज अनिताचं जे झालं तस काही झालं की,  परिस्थितीत बदल झालेला कसा  पहायला मिळेल, काय करावं लागेल तो मार्ग शोधण्याचा वेध लागायचा. थोडा निवांत वेळ मिळाला तसं त्यांनी समोरचं वर्तमानपत्र पुढे ओढलं. वाचता वाचता एका बातमीने त्यांचं लक्ष वेधलं. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी एका शाळेने पारंपारिक खेळाचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा नाही तर फक्त तुमच्या कलागुणांचं कौतुक करण्याचा एक प्रयत्न असंच शीर्षक होतं. आलेल्या अर्जातून ती शाळा ५ शाळा निवडणार होती. हा कार्यक्रम पहायला मान्यवर व्यक्तिंची, प्रयोगशीलतेला महत्त्वं देणार्‍या सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती लाभणार होती. मीनाताईंनी ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली. घ्यावा का यात भाग? शाळा सुटायची वेळ झाली तरी घरी परतताना त्या प्रश्नानेच त्यांचा पुढचा दिवस खिळून ठेवला.

"घ्यायला हवा तुमच्या शाळेने भाग." मीनाताईंच्या मुलाला त्यांची कल्पना एकदम आवडली.
"अरे, पण काय करणार ही मुलं?" शाळेत एकूण मुलं सहा की सात, ती मुलं नक्की काय करु शकतील याचा अंदाज नाही, खात्री तर कशाचीच नाही.
उत्साहाने काही करायला गेलं आणि नेमकं आयत्यावेळी एखाद्याचं काही बिनसलं तर? शाळेत रहावलं नाही म्हणून मुलांना विचारलंच मी. नाच, कथाकथन, गाणं, चित्रकला, कविता एक ना दोन मुलं वेगवेगळे पर्याय सुचवित होती. सुमा विचार करते म्हणाली. पण खरंच जमेल का हे मुलांना?"
"लेझिम किंवा कवायत अशा खेळांचा का नाही विचार करत.  तो सांघिक प्रकार आहे, पुन्हा बोलावं लागणार नाही."  मीनाताईंना हा पर्याय एकदम आवडला. त्यांनी वर्तमानपत्रातून आलेला अर्ज बाहेर काढला.
"संघाचं नाव घालावं लागेल."
"भरारी" मुलगी पटकन म्हणाली. घरातल्या प्रत्येकालाच ते नाव आवडलं.
"गणवेष?" कुणीच काही बोललं नाही.
"झोपडपट्टीतल्या मुलांकडे कुठला आलाय गणवेष." मीनाताईंच्या आवाजातलं दुःख लपलं नाही.
"मुलींसाठी निळ्या रंगाचा फ्रॉक आणि मुलांसाठी पांढरा शर्ट, खाकी पॅट असं लिही." मुलाने उत्साहाने सुचवलं, त्याच्या बाबा आणि बहिणीनेही मान डोलावली.
"काहीतरीच काय? उगाच कशाला खोटं बोलायचं. आणि तेही मुलांच्या शिक्षकांनीच." मीनाताईंना ही कल्पनाच पसंत नव्हती.
"हे बघ, मुलं झोपडपट्टीतली आहेत हे लिहायची आवश्यकता नाही. खास मुलं एवढाच उल्लेख कर. सहानुभूती मिळून तिथे प्रवेश नको घ्यायला. आणि हे टाळायचं तर गणवेष लिहावाच लागेल. आपली प्रवेशपत्रिका स्विकारली जाईलच असंही नाही. स्विकारली गेली तर बघू गणवेषाचं."
काही न बोलता मीनाताईंनी ती तिघं सुचवतील तसा अर्ज भरुन टाकला. सुमाला दाखवून त्यांनी तो अर्ज पाठवायचा निश्चित केलं. त्या रात्री त्यांच्या घरातली, सुमा, शाळेतली मुलं आणि त्या..., एक भलं मोठं कुटुंब एखाद्या कार्याला सज्ज होतय असच वाटत राहिलं त्यांना.  पुढच्या चार पाच महिन्यात करावे लागणारे अथक परिश्रम, मुलाचं मनोधैर्य वाढविण्यासाठी करावी लागेल ती खटपट, लेझिम, कवायतीसाठी लागणारं साहित्य मिळवण्यासाठी घालाव्या लागतील त्या खेपा....बर्‍याच गोष्टीचं समीकरण जुळवावं लागणार होतं. पण मीनाताईंना खात्री  होती. आता मागे फिरायचं नाही हे त्यांनी मनात पक्क केलं.

घरातली सगळी, सुमा आणि मीनाताई भरुन आलेल्या डोळ्यांनी समोर चालू असलेला आपल्या मुलांचा कार्यक्रम पहात होत्या. लेझिम वाजवणार्‍या सुरेश, महेश, अमर बरोबर अनिता, सुरेखा आणि कमल कवायती करत होत्या. मुलांच्या प्रत्येक हालचालींबरोबर त्यांना शाबासकी द्यावी असं वाटत होतं मीनाताईंना. त्यांच्या खुललेल्या चेहर्‍याकडे पहाताना सार्‍या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. अर्ज स्विकारला गेल्यावर मुलांनी धावपळ करुन गणवेष मार्गी लावले. लेझिमही त्यांच्या मुलांनीच कुठूनतरी जमवले होते. टाळ्यांच्या कडकटाने त्या भानावर आल्या. एव्हांना मुलं धावत खाली आली होती.  मुलांच्या लेखी सुमा आणि मीनाताई हेच त्यांचं कुटुंब.  सुमाला आणि त्यांना, दोघांनाही मुलांनी मिठीच मारली. महेश आणि अमरचे आई-वडील आले होते. ते कौतुकाने मुलांच्या बाईंकडे पहात होते. बाकिच्या मुलांचं  कुणीही  नव्हतं. सुमाच  एकेकाला घरी नेऊन सोडणार होती. सुमा मीनाताईंकडे बघत होती.
"छान होती कल्पना यात भाग घेण्याची. तुमच्या मुलाचंही कौतुक करायला हवं" त्या हसल्या.
"हो, त्या दोघांनी मला मदत करायची म्हणून तयारी दाखविली. पण नंतर माझ्याबरोबर घरातले सगळेच गुंतले. तू तर हक्काचीच. मस्त झाला कार्यक्रम. आपले श्रम सार्थकी लागले. मुख्य म्हणजे मुलांनी छान साथ दिली. बघ, गेल्या दोन महिन्यात अनिताला एकदाही झटका आला नाही की सुरेशची शिवीगाळ ऐकू आली नाही."
"याचाच अर्थ अशाप्रकारच्या कार्यक्रमात त्यांना गुंतवायला हवं. आज तर निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली आहे. असंच पुढे झालं तर कदाचित सामान्य जीवन जगतीलही ही मुलं. नाही का?" मीनाताईंनी सुमाकडे नुसतच हसून पाहिलं. पुढचा विचार आत्तातरी करावासा वाटत नव्हता. हा क्षण त्यांना मनापासून मुठीत धरुन ठेवायचा होता. घरातल्यांनी जीव ओतून त्यांना केलेल्या मदतीचा अभिमान वाटत होता. इथून त्यांच्या घरीच सर्वांनी जायचं ठरलं होतं.

घरी आल्यावर शाळेतल्या मुलांनी ताबा घेतला. मीनाताईंना मदत करायची स्पर्धाच. त्याही कौतुकाने छोटी छोटी कामं सांगत होत्या. खाता खाता मीनाताईंच्या मुलांनी कार्यक्रमाचं केलेलं चित्रिकरण सर्वांनी एकत्रच पाहिलं. फोटो पाहिले. मीनाताई मात्र मुलांच्या चेहर्‍याकडे पहात राहिल्या. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची किल्ली त्यांच्या हाती लागली होती. अपेक्षेप्रमाणे फरक होत गेला, मुलांचा आत्मविश्वास वाढला की खास मुलांच्या शाळेतलं त्याचं शिक्षण संपलं. ही मुलं नेहमीच्या शाळेत जायला लागतील. कदाचित अधूनमधून भेटायला येतील, नाहीतर कधीच फिरकणारही नाहीत. नकोशा भूतकाळाला मनातून पूसूनच टाकतील. नाहीतर खूप वर्षांनी एखाद्या मुलाचं, त्यांची आठवण काढणारं, धन्यवाद देणारं पत्र.... ही त्यांची पहिली मुलं. त्यांना निरोप देणं सोपं नाही जाणार, या मुलांच्या सर्वसामान्य आयुष्याचेही आपण साक्षीदार असायला हवं असं त्यांना तीव्रपणे वाटत होतं. पण ते शक्यं नाही याचीही त्यांना जाणीव होती. मुलं मोठी झाल्यावर सार्‍यांच्या हृदयातलं आपलं स्थान अढळ आहे याची मात्र त्यांना खात्री होती. त्यानी प्रयत्नपूर्वक आपलं लक्ष समोर चालू असलेल्या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाकडे वळवलं. स्वतःच्या फोटोकडे टक लावून बघणार्‍या अनिताला मायेने जवळ ओढलं. बरोबरच्या प्रश्नाला निकराने त्यांनी बाजूला ढकललं,  पण मनाआड केला तरी त्यांच्या खास मुलांसारखा तोही गळ्यात पडलाच. काय दडलं असेल भविष्यकाळाच्या पोटात...?

Sunday, May 20, 2012

कालचक्र

(अमेरिकेतील आमिश समाजातील चालीरितीवर आधारित कथा)

मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात एमाने खिडकीवरचा गडद रंगाचा हिरवा पडदा थोडासा सरकवला आणि ती शहारली. रस्त्यापलीकडे घरासमोरच्या पडवीत जेकब वाचत असल्याचा बहाणा करत खिडकीच्या दिशेने रोखून पाहत होता. एमाने घाईघाईत पडदा सरकवला. लाजेने लाल झालेले गाल तिने खसाखसा पुसले. धाडधाड जिना उतरत ती स्वयंपाकघरात डोकावली. तमाम भावंडं टेबलाभोवती बसून तिची वाट पाहतं होती. बाजूच्याच पलंगावर निजलेल्या आजारी आजीला थोपटत ती त्यात सामील झाली. डॅनिअल पटकन तिच्या कानाशी कुजबुजली,
"जेकब?"
मान खाली घालत एमाने तिला पायाने टोकरलं आणि ती घास घेण्यात गर्क झाली. कशात लक्ष लागत नव्हतं पण तरीही ती गप्पा मारत राहिली.

निजानीज झाली आणि माडीवरच्या आठ भावंडांमध्ये झोपलेल्या एमा आणि डॅनिअलची कुजबूज सुरू झाली.
"एमा, मी लहान आहे तुझ्यापेक्षा, पण रोज सांगते तेच पुन्हा सांगते. आपल्या समाजाचे नियम पाळायलाच हवेत आपण. बाहेरच्या जगाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही तसंच तिथल्या माणसांशीही. जेकबशी लग्न होईल या वेड्या आशेवर असशील तर सावर स्वतःला. अजून हे तुझ्या माझ्यातच आहे तोपर्यंत ठीक आहे. नुसता संशय जरी आला कुणाला तर वाळीत टाकतील तुला."
डॅनिअलने एका दमात बोलणं संपवलं आणि मिचमिच्या नजरेने ती एमाकडे पाहत राहिली. दोघींचा डोळा लागला तेव्हा पहाटेचे दोन वाजले होते.

चार वाजले तसं घर जागं झालं. घरात तेलाचे दिवे लागले. जिना उतरताना एमाने पुन्हा खिडकीतून बाहेर नजर टाकली. जेकबचं घर अंधारात बुडून गेलं होतं. तिला मनापासून हसायला आलं. चार म्हणजे या लोकांची मध्यरात्र. संध्याकाळी ते विसावतात तर आमची निजानीज. अंधार प्रकाशाचा खेळ सतत  चालूच रहातो तो हा असा. स्वत:शीच पुटपुटत ती खाली उतरली.

आता एकदा काम सुरु झालं की डोकं वर काढायलाही फुरसत मिळणार नाही हे माहीत होतं एमाला. भरभर आंघोळ उरकत तिने स्कर्ट, ब्लाऊज घातला. डोक्यावर टोपी चढवता चढवता स्वयंपाकघरातल्या एकमेव आरशात तिने चेहरा न्याहाळला आणि तिला अस्वस्थतेने घेरलं. कायम हेच. लांब बाह्यांचा ब्लाऊज, स्कर्ट, पांढरी टोपी, कपड्यांचे रंगही इनमिन तीन ते चार, तेही एकरंगी. कुठे फुलं नाहीत की ना कसलं नक्षीदार काम. सपक जीवन नुसतं. म्हणे बायबलमध्ये हेच सांगितलं आहे. चेहर्‍यावरच्या बदलणार्‍या भावांकडे पाहताना मागे कुणीतरी उभी असल्याची जाणीव झाली एमाला. प्रयत्नपूर्वक चेहरा कोरा करत तिने मान वळवली. आईकडे पाहून ती मोहक हसली आणि तिच्या कामात मदत करायला पुढे झाली. घरातली कामं आटपून शेतावर जेवण घेऊन जायचं होतं. वडिला आणि भावडांना तिथे मदत करुन मग एकत्रच घरी परतायचं.
संध्याकाळी सगळी घरी परतली. कणसाची टोपली एमाकडे देत तिची ममा स्वयंपाकाच्या तयारीला लागली. दोघं मोठे भाऊ वडिलांबरोबर  दूध काढण्यासाठी गोठ्याकडे निघाले. एमाने पुन्हा पुन्हा आपला गडद निळ्या रंगाचा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज हाताने नीट केला. आरशात पुन्हा पुन्हा डोकावून ती लगबगीने जेकबच्या घराच्या दिशेने निघाली.

प्रकाशाने उजळलेल्या त्या रस्त्यापलीकडच्या घराकडे पाहत एमाने वळून आपल्या घराकडे नजर टाकली. सगळीकडे अंधाराला फाडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे दिवे.
’जेकबच्या घरातली विजेची तार आपल्या घराकडे वळवली तर?’ मान झटकत तिने तो विचार बाजूला ढकलला आणि दार वाजवलं. जेकबच्या हातात कणसाची टोपली देताना तिचे डोळे त्याच्यावर खिळून राहिले.
"कशी आहेस तू एमा?" जेकबचा उत्साह त्याच्या आवाजातूनही झिरपत होता. आता पावलं उचलायला हवीत हे जाणवूनही एमाचा पाय तिथून निघत नव्हता. जेकबचं बोलणं ती कानात साठवत होती.
"एमा, आपण बाहेर भेटू या?" घोगर्‍या आवाजात जेकबने विचारलं आणि एमा घामाने थबथबली.
"नाही, छे, छे अशक्य आहे हे. शक्यंच नाही." ती अक्षरश: पळत सुटली.

"डॅनिअल, डॅनिअल" एमाची नजर घरभर फिरली. घरात शांतता पसरली होती. तिचाच आवाज सार्‍या घरभर घुमत होता.  संध्याकाळचे पाच वाजून गेले आहेत. निजायची वेळ हे आईच्या विचित्र नजरेला तोंड देताना तिच्या लक्षात आलं आणि ती माडीच्या दिशेने धावली. आजूबाजूला लवंडलेल्या इतर भावंडांचं अस्तित्वं विसरुन तिने डॅनिअलला मिठी मारली.
"शूऽऽऽऽ एमा, नंतर बोलू आपण. आत्ता नाही." तोडांवर बोट ठेवत तिने एमाला गप्प रहायला बजावलं. एमाला  नसली तरी डॅनिअलला बाकीच्या भावंडांच्या उपस्थितीची जाणीव होती. एमा डॅनिअलच्या शब्दांनी भानावर आली.  संतरजीवर अंग टाकून ती निवांतपणा मिळण्याची वाट पाहत राहिली.

सगळीकडे सामसूम झाली, बाकीची भावंडं झोपली आहेत याची खात्री झाली तशी दोघी बहिणी ताडकन उठून बसल्या.
"डॅनिअल, किती दिवस वाट पाहत होते मी या क्षणाची. आज संध्याकाळी कणसं द्यायला गेले त्या वेळेस आपण बाहेर भेटू या का असं विचारलं त्याने. इतके दिवस वाट पाहत होते या प्रश्नाची. शेवटी विचारलं त्याने." एमाच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. डॅनिअल एमाकडे नुसतीच पाहत होती. कोणत्या शब्दात एमाला समजावावं हे तिला ठरवता येईना. एमाला निराश करणं तिच्या जीवावर आलं.
"पण लगेच होकार  नाही दिलेला मी. इतके दिवस वाट पाहतं होते पण वेळ आली तेव्हा ’नाही’ म्हटलं गं मी जेकबला. काय करु मी?  मला आवडतो जेकब. अगदी मनापासून आवडतो. पण तसं म्हणणंही पाप आहे हे ठाऊक आहे मला, मग त्याच्याबरोबर भटकायला जाणं तर दूरच्या गोष्टी."  हुंदके देत एमाने डॅनिअलच्या कुशीत तोंड खुपसलं.

जेकबच्या घराकडे एमाच्या खेपा वाढल्या आणि डॅनिअलची काळजी वाढली. कुणाच्या लक्षात आलं तर काय होईल या कल्पनेने एमाही  अस्वस्थ असायचीच. आमिश समाजातली मुलगी अमेरिकन मुलाच्या प्रेमात पडली तर कोणत्या दिव्यातून जावं लागेल या धास्तीने  एमाने जेकबला टाळण्याचा प्रयत्नही करत होती. काही केल्या तिला ते साधत नव्हतं.

जेकबने तिच्या लिपस्टिक धरली आणि तिच्या अंगावर सरसरुन काटा आला.
"जेकब, आमच्या पंथाच्या नियमाप्रमाणे आम्ही मेकअप करु शकत नाही, दागिने घालू शकत नाही. मी सांगितलंय तुला हे मागेच." एमाने लिपस्टिकच्या कांडीचं टोपण उघडत म्हटलं.  तो लालचुटुक रंग पाहून पटकन कांडी ओठावर फिरवायची ऊर्मी तिने कशीबशी दाबली.  स्कर्टच्या खिशात घाईघाईने तिने ती लिपस्टीक लपवली.  रस्त्यावर  शॉर्ट्समध्ये  मेकअप केलेल्या, केस कापलेल्या, स्पोर्ट्स  कारमधून मोठ्या दिमाखाने जाणार्‍या तिच्याच वयाच्या असंख्य मुली ती रोज पाहत होती. असं नखशिखान्त वेगळं रूप पाहिलं की एमाला आपला पोषाख बदलून टाकण्याची तीव्र इच्छा होई, केसाच्या नाना तर्‍हा करुन पहाव्याशा वाटत.  डॅनिअलला तर तिने कितीवेळा विचारलं होतं.
"डॅन, तुला नाही का माझ्यासारखं वाटत? तेच तेच कपडे घालायला वैतागत नाहीस तू? केस कापावेत, मोकळे सोडावेत असं नाही वाटत तुला? मनासारखं काही करायला म्हणून मिळत नाही आपल्याला. मला सगळ्याचंच आश्चर्य वाटतं. आजूबाजूला जगं पूर्णत: बदलतंय. आपण मात्र तसेच. बायबलमध्ये हे सांगितलं आहे आणि बायबलमध्ये ते सांगितलंय" डॅनिअलला हसू फुटायचं.
"एमा, तू वाचताना असं का, हेच डोक्यात ठेवून वाचतेस. बंडखोर आहेस तू.  बाकी सारी बायबलमय होऊन जीझसच्या भेटीच्या ओढीने बायबलचं आचरण करतात. त्यांची जीझसच्या भेटीची इच्छाशक्ती जास्त तीव्र आहे एवढंच म्हणू शकतो आपण फार तर."
"नाही हे खरं नाही. याचा अर्थ बाकी पूर्ण जगाला जीझसशी देणंघेणं नाही असाच होईल; बदल स्वीकारतही जीझसला मानतातच की लोकं." जीझस, बायबल आणि नियम. किती वाद, चर्चा दोघी घालत. निष्पन्न काही न होता दोघींची तास न तास चर्चा चाले. त्या दिवशी स्कर्टच्या खिशात लपवून आणलेली लिपस्टिक दोघींनी हळूच एकमेकींना लावून पाहिली. एकदा भल्या मोठ्या कपड्यांच्या दुकानातल्या बाथरूममध्ये जाऊन लिपस्टिक लावल्याचं डॅनिअलनं सांगितलं आणि आपणच एकट्या वेगळ्या नाही या सुखद जाणिवेने एमा खूश झाली.

हिवाळी सुट्टी संपली. शाळा सुरु झाल्या. यानंतर एमाच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळणार होता.  ती यंदा शेवटच्या वर्गात म्हणजे आठवीत होती. आठवीच्या पुढे शिकणं बायबलच्या नियमाप्रमाणे शक्य नव्हतं, पण जेकबच्या तोंडून तो वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणार असल्याचं एमाने खूपदा ऐकलं होतं. आमिश सोडता सारं जग त्यांना पाहिजे तसं वागू शकतं, पाहिजे तितकं शिकू शकतं हेही सांगायला तो विसरला नव्हता. एमाच्या विचारातला बंडखोरपणा त्यामुळे उफाळून येत होता.  पंथाच्या बाहेर पडून काहीतरी करावं असं तिला तीव्रपणे वाटायला लागलं.

"ही सगळी माहितीपत्रकं आपण मागवलेल्या अभ्यासक्रमाची"  जेकबने भलामोठा गठ्ठा तिच्यापुढे टाकला. एमा हरखून गेली.
"एमा दिवस कमी आहेत. तू खरंच यातलं काही करु पाहत असशील तर नक्कीच मदत करेन मी तुला. तू वसतिगृहामध्ये राहून शिकू शकतेस. शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करु आपण. तुला सगळा खर्च भागवायचा तर नोकरीही करावी लागेल. एकदा तू स्थिरावलीस,  माझं शिक्षण पूर्ण झालं, मी वैद्यकीय व्यवसायात शिरलो की लग्न करु आपण. माझ्याकडून मी सारं स्पष्ट सांगितलं आहे. पण तुला मात्र धाडस करावं लागेल. तुझ्या विश्वातून बाहेर पडावं लागेल." जेकबच्या बोलणं ऐकण्यात गर्क झालेली एमा त्याच्या शेवटच्या वाक्याने भानावर आली. तिच्या डोळ्यापुढे भविष्यकाळाचं चित्र उभं राहिलं. अनिश्चित भविष्याकडे झेपावण्याचा उत्साह तिला आपली सारी सोळा वर्ष तशीच मागे टाकून, पुसून टाकण्याच्या कल्पनेने मागे खेचत होता. जेकबसमवेत जग पाहण्याच्या स्वप्नापायी आई, वडील, भावंडं, सगळा आमिश समाजच सोडायचा? ती विचारात गढून गेली. जेकब काहीतरी बोलला आणि तिची तंद्री भंगली.
"जेकब, मी तुझ्याबरोबर आले तर आमचा समाज परत मला सामावून घेणार नाही."
"पुन्हा बायबल." जेकबच्या स्वरात कडवटपणा डोकावला.
"एमा, शिक्षणासारखी गोष्ट स्वीकारायलाही बायबल मना करतं आणि आंधळ्यागत तुमचा समाज ही तत्त्वं अनुसरतो. मती कुंठीत होते हे पाहून. खूपदा बोललोय आपण ह्या विषयावर. माझं प्रेम आहे तुझ्यावर पण त्याचा अंत नको पाहूस. फार काळ नाही मी वाट पाहू शकत. तुझा निर्णय लवकरात लवकर समजू दे."
एमा रडायलाच लागल्यावर जेकबने समजुतीने घ्यायचा प्रयत्न केला.
"एमा, आम्ही मोकळेपणाने मैत्री करु शकतो, ठराविक मर्यादेपर्यंत शारीरिक जवळीकही त्यात आलीच. तुला हे लग्न होईपर्यंत करणं पटणार नाही हे ठाऊक आहे. पण नव्या गोष्टी स्वीकारताना तुला वाटणारी भिती, कुचंबणा, शरम पाहिली की वाटतं, तुमच्या समाजाच्या नियमाबाहेर जाणं तुला जमणार नाही. एवढ्यासाठीच वेळेवर निर्णय हवा आहे मला."
"जेकब, तू म्हणतोस ते सगळं खरं आहे. पण माझा निर्णय नकारार्थी असला तर? काय करशील तू?" घाबरत, धडधडत्या मनाने एमाने प्रश्न टाकला.
"हू केअर्स?" जेकब ताडकन म्हणाला आणि एमाचं डोकं भणाणून गेलं. थोड्याशा उद्धटपणाने विचारलेल्या प्रश्नाला जेकबकडून तसं च उत्तर मिळालं होतं. तिरमिरीतच ती घराच्या दिशेने वळली.

आता फक्त एक वर्ष होतं. शाळा संपली की लग्नं. तिला माहीत होतं, चर्चमध्ये गेलं की आई वडील स्टीव्हन आणि तिने एकत्र यावं म्हणून प्रयत्न करतात. स्टीव्हनच्या मनात काय आहे हे एमाच्या लक्षात येत नसलं तरी ते निश्चितच मैत्रीपूर्ण होतं. जर त्याने लग्नाबद्दल विचारलं तर सुटका नव्हती याची तिला जाणीव होती. दिवसेंदिवस एमाच्या मनावरचा ताण वाढत होता. जेकबचं ’हू केअर्स’ हे उत्तर पुढे पाऊल टाकायला मना करत होतं. समजा नाहीच पटलं नंतर तर काय करु शकतो आपण? आठवीपर्यंतच्या शिक्षणाचा किती उपयोग होणार? शिकता शिकता नोकरी करावी लागेल म्हणतो जेकब, पण कोण देणार नोकरी काहीही येत नसताना? पदवी मिळाली नाही, जेकबशी पटलं नाही तर? असंख्य प्रश्नांनी मनात थैमान घातलं होतं.

रविवारी चर्चमध्ये गेल्यावर, एमाने स्टीव्हशी बोलायचं ठरवलं. जेकबच्या बायबल, ऑमिश लोकांच्या चालीरितीबद्दलच्या कडवट मतांमुळे ती त्याच्यापुढे कधी मोकळी होऊ शकली नव्हती; पण मैत्रीच्या नात्याने स्टीव्हनचं या बाबतीत मार्गदर्शन होऊ शकेल याबाबत तिच्या मनात संदेह नव्हता.
"एमा, मला कल्पना नाही तुझ्या मनातल्या वादळाची. पण आपण लहानपणापासून वेगळ्याच वातावरणात वाढलोय. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत आपण आई वडील वाढवतात तसे वाढतो. त्यानंतर या धर्मात राहायचं की नाही हा निर्णय आपला असला तरी ज्या संस्कारातून आपण जातो त्यातून बाहेरच्या जगाचं आकर्षण असलं तरी तिथे पोचू शकत नाही कारण मुख्यत्वे आपलं अपुरं शिक्षण. तूच सांग एमा, या घडीला तुला सर्व बंधनातून मोकळं केलं तर लागेल तुझा निभाव तुझा तिथे? म्हणूनच कोणी सहसा धाडस करत नाही समाजातून बाहेर पडण्याचं."
"तुला नाही वाटत कधी इथून बाहेर पडावं म्हणून?" एमाने निराश स्वरात विचारलं आणि स्टीव्हनं हसला.
"वाटतं ना, पण रक्ताची नाती, प्रेमही त्याच्याबरोबर गमावून बसेन हेही ठाऊक आहे मला. मला कल्पना आहे हे तू मला का विचारते आहेस. जेकब आवडतो तुला. हो ना?"
"स्टीव्हन!" एमाला बसलेला धक्का लपवता आला नाही.
"बर्‍याचदा पाहिलं आहे मी तुला त्याच्याशी गप्पा मारताना. दर वेळेस तुझे डोळे, चेहरा तू किती जेकबमय झाली आहेस ते सांगतात. नशीब समज, अद्यापपर्यंत तुझ्या आई वडिलांपर्यंत हे पोचलेलं नाही."
"स्टीव्हन!" एमाने त्याचा हात घट्ट धरला आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत राहिली.
"एमा, सर्वांनाच माहीत आहे, आपले आई वडील आपण दोघांनी जवळ यावं या प्रयत्नात आहेत. मला आवडतेस तू. पण तुझं प्रेम जेकबवर आहे याचीही कल्पना आहे मला. एवढंच सांगतो, निर्णय तुझा आहे. खरंच या समाजाच्या चालीरीती झुगारून तुला त्याच्याबरोबर जायचं असेल तर मी पाठीशी आहे तुझ्या." निशब्द अवस्थेत स्टीव्हनच्या हातातला हात सोडवला एमाने. मुकपणे निरोप घेत एमा तिथून निघाली.

जेकबने दिलेल्या प्रत्येक ठिकाणी एमाने धडधडत्या हृदयाने अर्ज भरुन पाठवले आणि हुरहुरत्या मनाने ती वाट पाहत राहिली. डॅनिअलला सगळ्या प्रकाराची कल्पना असली तरी अपेक्षेप्रमाणे तिचा प्रतिसाद नव्हता. अस्वस्थ मनाने ती एमाच्या हालचाली निरखीत राही. एमाला पाठिंबा द्यावा की घरात सांगून मोकळं व्हावं या कात्रीत ती सापडली होती.
अखेर न राहवून पुन्हा दोघी बायबल उघडून बसल्या. ओळ न ओळ वाचताना आपला समाज सगळ्या नियमाचं किती काटेकोरपणे पालन करतो याचंच आश्चर्य एमाला वाटत होतं. परतीचा मार्ग नाही या विचाराने पुन्हा एकदा तिला ग्रासलं. सोबत डॅनिअललाही.

जेकबने तिच्यासाठी आलेली पत्र पुढे केली. उत्सुकतेने एमा पत्र फोडत होती. तिच्या चेहर्‍यावरचे भाव जेकब निरखीत होत.
"एमा, दहापैकी एखादंच पत्र आशेचा किरण असेल, पण ते एखादंच खूप नाही का?"
"जेकब, एकदेखील पत्र नाही आशा पुरं करणारं...सगळ्यांनी प्रवेश नाकारला आहे."
शरीरातलं त्राण गेल्यागत एमा म्हणाली आणि जेकबने तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं. बराच वेळ तो तिला थोपटत राहिला. त्याच्या स्पर्शाने तिचं अंग रोमांचित झालं.
हे थांबवायला हवं, असं याच्या मिठीत..., कुणी अचानक आलं तर, पाहिलं तर अनेक शंका मनात होत्या, मन मागे परतायची खूण करत होतं पण शरीर साथ देत नव्हतं.
’मी नाही पडू शकत यातून बाहेर. खरंच हवाय मला जेकब, सर्वार्थाने.’ स्वत:ला बजावता बजावताच ती त्याच्या मिठीत विरघळत गेली.
"एमा, अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहूनही तुम्ही फटकून राहिल्यासारखे का करता तेच समजत नाही."
"जेकब, आत्ता नको ना हा विषय. " एमाने जेकबच्या छातीशी डोकं घुसळत  त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव केला आणि दोघं भोवतालचं जग विसरले.

घडलं ते चुकीचं या विचाराने एमाच्या डोळ्याखालची वर्तुळं वाढायला लागली. डॅनिअलकडेही तिला हे सांगता येत नव्हतं.  पण तिच्या आईच्या ते लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही. एकदोनदा तिने एमाला आडवळणाने विचारण्याचा प्रयत्न केला पण एमाने कसलीच दाद लागू दिली नाही. थोडे दिवस ती जेकबकडे फिरकलीही नाही. पण त्या निर्णयावर तिला ठामही राहता येईना.
जेकबही तिच्या भेटीसाठी आतुर झाला.  एमाच्या स्पर्शसुखाने तो हरखून गेला होता.   एमाच्या त्याच्या भेटीचा समारोप त्याच्या एकमेव मागणीने व्हायला लागला. एमाच्या ठाम नकाराने जेकब आक्रमक होत होता. आणखी किती दिवस जेकबला आपण विरोध करु शकू या काळजीने एमा खंगत चालली. परिस्थितीवर मात कशी करायची या एकाच प्रश्नाने तिची झोप उडाली. खूप विचार करुन तिने मनाशी काहीतरी निश्चित केलं.

रविवारी आपणहून स्टीव्हच्या भोवती घोटाळताना एमाला पाहिलं आणि दोघांचे आई वडील सुखावले. जेवण झाल्यावर त्यांना गप्पा मारत बसण्याचा आग्रह करत घरी परतले. स्टीव्हनच्या बाजूला चर्चच्या मागच्या आवारात थोड्याशा आडजागेला बसलेली एमा मूक झाली.
"एमा, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? गेले दोन तास पाहतोय तू अधीर आहेस काही तरी सांगायला. काय झालं आहे नक्की?"
"स्टिव्हन, हे सगळं तू कसं स्वीकारशील  माहीत नाही, पण तुला आठवतंय? तू म्हणाला होतास, निर्णय तुझा आहे. तू आवडतेस मला. " स्टीव्हनने आठवल्यासारखी मान डोलावली.
"स्टीव्हन, मी..., मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. आता तुझा निर्णय हवा आहे स्टिव्हन." एकदम मुद्द्याला हात घालत ती मोकळी झाली. मनावरचं प्रचंड दडपण दूर झाल्यासारखं वाटत होतं. स्टीव्हनही तिच्याकडे पहात होता. कितीवेळ ती दोघं नुसतंच एकमेकांकडे पहात होती. तिच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत होती एमा.
सगळ्या प्रश्नांना मुकं करत एमाच्या तळव्यावर स्टीव्हननं हळुवारपणे ओठ टेकवले आणि तिने त्याला थांबवलं.
"थांब स्टिव्हन, तू विचारलं नाहीस तरी मला पूर्ण बोलू दे. काहीही ऐकायची, कोणत्याही स्वरुपात मला स्वीकारायची तयारी आहे तुझी?"
"असं का विचारते आहेस तू? माझा मनापासून जीव आहे तुझ्यावर आणि तू काही वेडंवाकडं वागणार नाहीस याची खात्री आहे मला."
"नाही. हे खरं नाही. माझं पाऊल वाकडं पडलं आहे. मी माझं सर्वस्व जेकबला दिलंय."तटकन स्टिव्हनला तोडत एमा बोलली आणि स्टीव्हन अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिला. त्याचीच मान खाली झुकली. काहीही न बोलता तो तसाच बसून राहिला.
"भावनेच्या भरात मी जेकबला सर्वस्व देऊन मोकळी झाले हे खरं आहे. माझ्या सुदैवाने हे एकदाच घडलं आणि नशिबानं त्याचे काही परिणाम भोगावे लागले नाहीत.  हे झाल्यावर जेकबने माझ्याकडे  अनेकदा मागणी करुनही मी स्वीकारली नाही याचं कारण एकच. आमिश समाज सोडून मी जगू शकणार नाही हे पटलंय मला. नाईलाजाने का होईना, हे सत्य स्वीकारलं आहे मी. अरे, कुठेही माझा अर्ज स्वीकारला जात नाही यातच पुढली फरफट समजते आहे मला. यश मिळालं नाही तर जेकब मला साथ देईल याचीही शाश्वती वाटत नाही. दुसरं म्हणजे जेकबच्या समाजातलं घटस्फोटाचं प्रमाण माझं पुढे पडणारं पाऊल मागे ओढतंय. मला निश्चितपणे माहीत आहे की मी जेकबपुढे हुशारी, हरहुन्नरीपणात कमी पडले तर पर्वा न करता तो पुढे जाईल. त्याच्या आक्रमक, तुसड्या आणि दुसर्‍याला नगण्य मानण्याच्या स्वभावाचा अनुभव घेतलाय मी. बराच विचार करुन आपला पंथच झुगारुन त्याच्याबरोबर जाण्यात काही अर्थ नाही या मतावर येऊन ठेपलेय मी. आहे त्या परिस्थितीत ज्याला हे सर्व माहीत आहे त्याच्याशीच लग्न करावं असं वाटतं मला. तुला हे सर्व जड जाणार नसलं, मान्य होणारं वाटलं तरच हो म्हण तू. माझा आग्रह नसला तरी आमिश समाजातच राहायचं तर तुझ्याशीच विवाह होणं आवडेल मला."
एमाने एका दमात बोलणं संपवलं आणि खोल श्वास घेत ती स्टीव्हनकडे एकटक बघत राहिली.

कपाळावरचे केस सारखे करत दोन बोटात स्टीव्हनने माथ्यावरची शी घट्ट पकडली. एमा जेकबच्या बाबतीत इतकी पुढे जाईल याचा त्यानं कल्पनेतदेखील विचार केला नव्हता, आणि गेलीच तर मग आगाऊपणे मला का विचारते आहे लग्नाचं? तारवटलेल्या डोळ्यांनी अर्थशून्यपणे तो बराच वेळ एमाकडे पाहत राहिला. वेळ मागून घ्यावा, आत्ताच निर्णय घ्यावा त्याला काही म्हणजे काही समजत नव्हतं.

नाही म्हणावंसं वाटत असूनही त्याने एमाला जवळ ओढलं. तिच्या मिटल्या पापण्यांवर ओठ टेकत तो पुटपुटला,
"किती वाट पाहायला लावलीस एमा तू. मी तुझ्या प्रतिक्षेत होतो गं. पण तू जेकबच्या प्रेमात पडलेली. या जन्मात तू माझी होशील ही आशाच सोडली होती मी. आता मात्र कधी असं फसवू नकोस माझीच राहा फक्त तू. माझीच राहा." एमाने हळुवार होत स्टीव्हनच्या डोळ्यात डोकावलं. त्या नजरेतलं प्रेम, ओढ तिला पहिल्यांदाच खर्‍या अर्थाने दिसली आणि अलगद ती त्याच्या कुशीत विसावली.

Tuesday, May 8, 2012

व्होट अगेंस्ट...


मेरी आजी आणि डेव्ह आजोबानी लावलेला फलक पाहिलास का? लेक तणतणत घरात आला.
"काय झालं?"
"व्होट फॉर अमेंडमेंट" चा लावलाय फलक. असं का करतात ते?"
"ते मागच्या पिढीतले आहेत. इतकं सोपं नसतं नवं काहीतरी रुजणं. तू जाऊन बोल त्याच्यांशी."
"माझं थोडंच ऐकणार आहेत?"
"शांतपणे बोललास तर ऐकतील. तुझा दृष्टीकोन पटला नाही तरी निदान काहीतरी विचार तरी करतील."
"बरं येतो जाऊन."

मेरी आणि डेव्ह हे माझे अमेरिकेतले मानलेले आई वडिल. या हक्काच्या नात्याने लेकाला त्याच्यांशी वाद घालायला परवानगी तर दिली पण माझ्याच मनात प्रचंड गोंधळ होता. मत द्यायला तर जायचं होतं, पण विरोधी का द्यायचं हेच कळत नव्हतं. निदान  ’व्होट अगेंस्ट’  म्हणजे काय हे नीट समजून घेतलेलं बरं म्हणून लेकाला ’शाळा’ घ्यायची परवानगी दिली :-)

मराठीत सांगणं थोडं कठीण जाईल म्हणून इंग्लिश सारांश,
 Amendment One states that "Marriage between one man and one woman is the only domestic legal union that shall be valid or recognized."

माझ्या लेकाच्या शब्दातलं स्पष्टीकरण.
This means that civil unions (benefits of marriage without being married) between a man and woman will also no longer be recognized. As a result, Voting “for” this proposal could ban ALL civil unions and domestic partnerships throughout the state. It could take away the ability of committed couples to take care of one another when making medical, financial, and other important life decisions. Same-sex marriage is already banned in NC, meaning the law is redundant and a waste of taxpayer money.

त्याचं म्हणणं पटलं त्याहीपेक्षा ही सोळा सतरा वर्षाची मुलं किती जागरुक आहेत याचं कौतुक वाटलं.  गे, लेसबियन हे वेगळेच प्रश्न आहेत, ते नाकारणं, स्वीकारणं हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आधीच असलेल्या कायद्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुन्हा एकदा हे सोपस्कार कशाला?. आजचं हे मतदान नुसतं नॉर्थकॅरोलायना पुरतं मर्यादित न रहाता यामुळे राष्ट्रीय बातम्यामध्ये जाऊन पोचलं आहे.

जोपर्यंत आपल्या घरात असे प्रश्न उद्बभवत नाहीत तोपर्यंत कुठलीतरी एक बाजू घेऊन वाद घालणं नक्कीच सोपं आहे पण या कायद्यामुळे या जातकुळीत मोडणार्‍या लोकांना आधीच अग्निपरिक्षेतून गेल्यासारखं आयुष्य असताना आणखी एक अडथळा अशी गत होईल.

वयोवृद्ध मंडळी नक्कीच या कायद्याला पाठिंबा देणार, ज्यांची संख्या या राज्यात खूप आहे. सतरा वर्षांपासून मुलांना मतदानाचा हक्क आहे, पण त्यात ह्या कायद्याला पाठिंबा अगर विरोध ही मुलं देऊ शकत नाहीत. त्याच्यांसाठी मतपत्रिका वेगळी आहे. एकंदर सूर आहे की, जरी ह्या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं तरी पुढच्या काही वर्षात पुन्हा यात बदल करावा लागेलच.  पाहू काय होतं ते.

Monday, May 7, 2012

पेच

कार्यालयात कसलातरी उग्र दर्प पसरला होता. बरीचजणं काम सोडून त्याची चौकशी करण्याकरता इकडे तिकडे करत होती. सहा सात जण  घरुन काम करायची परवानगी मिळवण्यात यशस्वीही झाले. कार्यालय अर्थातच ओस पडलं. आम्ही आपले एकदोघं जण टकटक करत संगणक बडवत होतो.  एकदम माझ्या लक्षात आलं, कालच नव्याने रुजू झालेली श्रीदेवी कुठे दिसत नाही. हिला आधीच समजलं की काय आज घरुन काम करता येईल म्हणून. आम्ही जेमतेम तिघंजणं उरलो होतो. पोनीटेलला (पोनीटेल बांधतो म्हणून मी केलेलं त्याचं बारसं.) विचारलं,
"श्रीदेवी कुठे आहे?"
"सिरी इज नॉट कमिंग बॅक."
धक्काच बसला.
"का? कालच तर तिचा पहिला दिवस होता. "
"हो, पण नो कम्युनिकेशन स्किल्स म्हणून शी गॉट फायर्ड यस्टरडे." पोनीटेलला मला हे सांगताना जरा जड जात असावं. म्हणजे मी भारतीय, श्रीदेवी भारतीय.... नाही म्हटलं तरी  दडपण आलं असणार. मी घरी गेल्यावर झालेलं दिसतंय हे प्रकरण, मनाशी खुणगाठ बांधत म्हटलं,
"ती नुकतीच आली आहे भारतातून." काल कॅन्टीन दाखवायला नेलं होतं तेव्हा तिच्याकडून मिळालेल्या माहितीवर मी घोडं दामटवलं. खरं तर विचारायचं होतं. एका दिवसात कसं समजलं कम्युनिकेशन स्किल्स नाहीत ते? आणि मुलाखतीत नाही हे लक्षात आलं? पण हे विचारण्याचं धाडस माझ्यात नव्हतं.  माझं वक्तव्य वरपर्यंत पोचायला वेळ लागला नसता ना; म्हणूनच असले काही प्रश्न न विचारता मी आपलं ती नुकतीच आली आहे भारतातून हे विधान मांडलं.
"मल विशेष काही माहिती नाही. तू आपल्या बॉसला विचार. " पोनीटेलने संभाषण आवरतं घेतलं.

 एक रुखरुख, चुटपुट  लागून राहिली मनाला. केवढ्या उत्साहात होती श्रीदेवी. अमेरिकेतली पहिली नोकरी म्हणून खुष होती काल. अशी एका दिवसात ती संपलीही. खरं कारण होतं का, 'लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल', की चुकीच्या जागी चुकीच्या वेळी आल्यामुळे बळीचा बकरा... कुणास ठाऊक.

या गोष्टीला पाच सहा महिने झाले आणि  माझ्याबरोबर काम करत असलेल्या एकमेव दुसर्‍या भारतीय मैत्रीणीने नोकरी सोडली. कारण? ती ’बोलते’ ते कार्यालयात कुणाला कळत नाही.  तिची सहकारी  तिला याबाबतीत फार त्रास देत होती. अर्थात हे अनधिकृत. दुसरी नोकरी मिळाल्यावरच तिने ही सोडली आणि ’बेटर फ्युचर विथ बेटर मनी’ हे कारण देत तिने राम राम ठोकला. दक्षिण भारतीय आहे लक्ष्मी. तिने मला विचारलं,
"तू तर इथे बरीच वर्ष आहेस, तुझ्यावर नाही का अशी वेळ आली कधी?"
मी नुसतंच हसून सोडून दिलं. पण पट्ठी माघार घेणारी नव्हती.
"हसू नकोस."
"अगं पण ही अडचण तर प्रत्येक ठिकाणी येणार ना, कितीही प्रयत्न केला तरी थोडा फरक पडतोच हे गृहीत धरायला हवं. आणिउत्तर भारतीय लोकांप्रमाणे तोंड वेडीवाकडी करुन बोलणं मला नाही जमत. मग आगीतून पडून फुफाट्यात का पडा असा विचार करुन टिकले आहे मी इथे.  आणि तशी बरी आहेत की सगळी. खरं सांगू का मला तर या लोकांची दयाच येते, म्हणजे किती वेगवेगळ्या देशातून आलेल्या लोकांचं बोलणं समजून घ्यावं लागतं यांना. मग आपण पण नको का जरा सहनशीलता दाखवायला?"

माझं म्हणणं काही तिला पटलं नाही. स्वत:ला शहाणे समजातात हे ’गोरे’ हे तिचं म्हणणं तिच्या दृष्टीने तिने पुराव्यासहित शाबित केलं.
"हे बघ, सुझनने तिला काहीतरी जमत नव्हतं म्हणून हाक मारली. तिच्या खुराड्य़ात (क्युबिकल) गेले तर म्हणाली, डोंट वरी, आय वोंट अंडरस्टॅट."
"मग बोलावलं कशाला? तू विचारलं नाहीस का?"
"त्यावेळेस नाही, पण एस कसा लिहायचा, नी टी असा लिही असल्या फालतू गोष्टी शिकवायला लागली तेव्हा  धडा शिकवला तिला."
"काय केलंस म्हणजे?"
"तिला एकदा सांगितलं, इट इज बेटर इफ यु राईट टू..., आय डोंट अंडरस्टॅड व्हाट यू से."
"असं सांगितलस तू तिला? खरंच?."
"मग काय करु? कंटाळा आला. नोकरीच्या सुरुवातीलाच म्हणाली होती इट इज डिप्रेसिगं टू टिच यु."
"त्यांना आपली सवय होऊ द्यायला वेळ लागतो."
"गेली दोन वर्ष तेच तर करते आहे. मला तरी आपल्या रंगाचाच हा परिणाम वाटतो." तिला वर्णद्वेष वाटत होता, मला ज्याचा त्याचा स्वभावदोष.

 आश्चर्य वाटलं. आम्ही दोघी एकाच कार्यालयात, एका रेषेत आमची खुराडी आहेत. आम्ही सहाजणं वेबटीममधली आणि नंतर पुढचा प्रशासकीय  विभाग. ती पाच सहा जणं. त्यातच लक्ष्मी.

पहिल्या सहा खुराड्याचं तसं बरं होतं. म्हणजे मी एकच भारतीय, दोन वर्षापूर्वी लक्ष्मी येईपर्यंत.  श्रीदेवी आली कधी, गेली कधी तेच कळलं नव्हतं. आमचं एकत्रित काम करणं, हसणं खिदळणं व्यवस्थित चालू असतं. अधून मधून माझे उच्च्चार त्यांना कळत नाहीत. पण मलाही ही समस्या येतेच. खूपदा असं झालं की उगाचच समजल्यासारखं मी दाखवते, मान डोलवते. माझ्या सहकार्‍यांनी मात्र तसं कधी केलं नाही. ते पुन्हा पुन्हा विचारुन मला काय म्हणायचं आहे ते समजून घेतात. त्यामुळे आनंद तर वाटतोच पण  बोलायची भितीही वाटते, म्हणजे नाही कळलं तर परत परत विचारत रहाणार याची. अधूनमधून खिल्ली उडवतात माझ्या उच्चारांची म्हणा.  आत्तापर्यंत हे कधी खटकलं नव्हतं. पण लक्ष्मीकडून तिला आलेले अनुभव ऐकताना  माझा दृष्टीकोन हळुहळु बदलत गेला.

परवा असंच काहीतरी झालं. कुठल्या तरी शब्दाच्या उच्चारावरुन रोझी हसली. आधी दुर्लक्ष केलं, पोनीटेललाही एकदम हसायला आलं. लक्ष्मीचं काय झालं ते मनात खोलवर नकळत रुजलं असावं. एकदम डोळे भरुन आले. कुणाच्या लक्षात येऊ नये याचा आटोकाट प्रयत्न केला खरा पण तितक्यात तिथला माझा तिसरा सहकारीही काहीतरी बोलला आणि वाटलं, हे थांबायला हवं, त्यांना कळत नसेल तर मी काहीतरी बोलणं भाग आहे.
"यु  आर मीन...." रोझीकडे पहात मी  म्हटलं आणि ताडकन माझ्या खुराड्यात येऊन बसले. सगळ्यांचेच आवाज बंद झाले. बराच वेळ फक्त संगणकावर मारलेल्या बोटांचा टकटक आवाज येत होता. मी उठून मोकळा श्वास घ्यायला, खरं म्हणजे बाथरुममध्ये मुक्तपणे रडायला तिथून बाहेरच पडले.

परत आले तर रोझी खुराड्यात आली.
"मला माफ कर. गंमत करत होतो आम्ही."
"ठीक आहे." मी तुटक पणे उत्तरले.
"तुला इतकं का वाईट वाटलं? तुमची नावं आम्हाला घेता येत नाहीत तेव्हा तू नाही का चेष्टा करत आमची."
"अगं बाई, केव्हातरी चेष्टा करणं निराळं आणि मुद्दाम छेडत रहाणं वेगळं." पण मला हे बोलणं जमलं नाही.  डोळे पुन्हा भरुन आले. कसंबसं म्हटलं,
"रोझी, मी ठिक आहे. नंतर बोलू आपण." माझा एकंदर नूर पाहून ती तिथून गेली. मी मात्र विचारात पडले.

गेली कितीतरी वर्ष या लोकांबरोबर मी काम करते आहे. आत्तापर्यंत हे असे प्रसंग सर्वांवर येतच असणार म्हणून सोडून द्यायलाही शिकले होते. हे एकदम काय होतं आहे मला. श्रीदेवीला काढण्याचा, लक्ष्मीने नोकरीच सोडण्याच्या प्रसंगाने सगळं वाकडंच दिसायला लागलं आहे मला, की त्याच्यांमुळे डोळे उघडून बदललेला हा दृष्टीकोन? पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं  हाती लागायच्या आधीच जाणवलं की चुकूनही कुणी माझ्या उच्चारांची टवाळकी करत नाही. खुष झाले. म्हटलं चला, माझ्या अश्रुंचा उपयोग झालेला दिसतोय. खरंही ठरलं ते.  निदान काही दिवस.

पण रोझी  तिच्यादृष्टीने मी तिचा सर्वांसमोर केलेला अपमान विसरली नव्हती. मी,  ’यु आर मीन टू मी’ म्हटलेलं तिला रुचलं नव्हतं. आता नवीनच सुरुवात झाली आहे. मी काहीही बोलले की,
"आय  अम सॉरी, व्हॉट डिड यु से?" मी निमुटपणे मला काय म्हणायचं आहे ते पुन्हा सांगते नाहीतर काही बोलायचं  असेल ते आधी IM करते आणि नंतरच तिच्या खुराड्यात प्रवेश करते. पण हे झालं कामाचं. साध्या गप्पा मारताना  असं कसं करणार?.

बघू आता कोण माघार घेतं, म्हणजे रोझी थांबवते का हा पोरखेळ याची वाट पहायची नाहीतर काही दुसरा मार्ग सुचतो का या पेचातून सुटण्याचा ते शोधायचं... तुमच्या शुभेच्छाच्या प्रतिक्षेत! दुसरं काय. :-).

Friday, April 27, 2012

श्रद्धा


मध्यंतरी मैत्रीणीकडे वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनासाठी गेले होते. देवीचं महात्म्यं सांगताना कुणीतरी म्हणालं.
"सगळं नीट करावं लागतं नाहीतर प्रत्यय देतेच देवी."
"म्हणजे?"
 तिने आपल्या मैत्रीणी बाबत घडलेली घटना सांगितली. व्रताच्या दिवशी मैत्रीण अचानक आजारी पडली.  रुग्णालयात हलवावं लागलं. पोटदुखीने बेजार झाली होती. विचार केल्यावर लक्षात आलं की व्रताच्या दिवशी आंबट खाल्लं होतं.

 देवीचा महिमा म्हणून दिलेलं हे उदाहरण. हळदीकुंकु, पादुका आगमन, व्रतं, भोंडला असं परदेशात राहूनही करतात म्हणून कौतुक करायचं की माणसाच्या श्रद्धेचा, भक्तीचा अतिरेक कुठे पोचवणार याची चिंता करायची? असं काही ना काही मनात  घोळत राहिलं. त्या अस्वस्थतेतून जन्माला आलेली ही कविता.

माणूस

भग्न मंदिराच्या एकेक पायर्‍या
ती चढत होती
देवळातल्या देवीलाच जाब विचारायला
जात होती
चढताना तिला कळलंच नाही
तिची वाट बंद होत होती
पायरी पायरी ढासळत होती!

देवीने सुटकेचा श्वास सोडला
बाई गं, किती जणांचे प्रश्न सोडवू?
त्यापेक्षा दोघी एकदमच ब्रम्हदेवाकडे जाऊ!

रस्त्यावरुन,
एक भक्त विस्मयाने पहात होता,
 आपलं गार्‍हाणं कुठे घालावं हा मोठा पेच होता
समोर, देऊळ स्त्रीसह
जमीनदोस्त होत होतं
आणि त्याचं ’माणूसपणही’!
कोणतातरी देव शोधायचंच
काम महत्त्वाचं होतं
त्यापुढे त्या स्त्रीचं जीवन क्षुल्लक होतं
हेच तर त्या देवाचंही दु:ख होतं!



Friday, March 23, 2012

काय म्हणायचं याला?

"गोष्ट वाचली तू लिहलेली" माझी  मैत्रीण म्हणाली.
"वाचलीस का?" माझा निरर्थक प्रश्न.
"तुला इतकं का वाटतंय, म्हणजे  तुझ्या आईचं वय अगदी चाळीस, पंचेचाळीस नव्हतं. एकोणसत्तर ना? "
 एकदम अस्वस्थपणा भरुन आला मनात.  उत्तर सुचेना म्हणून म्हटलं.
"मी लांब असते म्हणून वाटत असेल."  खरं तर म्हणावंस वाटत होतं. परदु:ख शीतलच असतं बाई, जोपर्यंत आपले आई वडिल जात नाहीत तोपर्यंत माणसाला नाही समजत त्यातली वेदना. हे असं काही म्हटलं तर तिला राग येईल, ती दुखावली जाईल म्हणून गप्प बसले.
ती माझ्या ’पूल’ कथेबद्दल (ब्लॉगवर आहे) बोलत होती.  आई गेल्यावर मनातल्या भावना कागदावर उतरलेली ती कथा आहे.

फेसबुकवर गप्पा चालल्या होत्या चुलत चुलत बहिणीबरोबर.
"मागच्यावेळसारखं, तू आलीस  की भेटायचं मनात होतं."
"हो ना." माझा त्रोटक प्रतिसाद.  भारतात होते तेव्हा फोन करायला जमलं नाही का? असं विचारावंसं वाटत होतं तेवढ्यात तिच म्हणाली,
"काकू गेल्यावर वेळच झाला नाही फोन करायला."
"मी, ताई (माझी बहिण) आम्ही वाट पाहिली तुझ्या फोनची."
"रात्री एक दोन वाजेपर्यंत अभ्यास, दिवसा नोकरी...." तिने ती कशी कार्यमग्न होती तेच सांगायला सुरुवात केली.
माणसं खरंच इतक्या व्यापात असतात की फेसबुकवर गप्पा मारु शकतात पण सात्वनाचे चार शब्द बोलायला वेळच्या वेळी त्यांना जमत नाही?.

"आता वडिलाचं काय करणार?"
वडिलाचं काय करणार? ती काय एखादी वस्तू आहे की इथे ठेवणार की तिथे ठेवणार?
"बघू." अजून विचार नाही केलेला.  त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं.
"एकटे कसे रहातील. तुम्ही घेऊन जा बहिणीपैकी कुणीतरी."
"हो, पण त्यांना काय वाटतं ते महत्त्वाचं ना." मग इथून पुढे त्याच अर्थी पण वेगवेगळे शब्द असलेल्या संभाषणाचं दळण.
 आई गेल्यावर पहिल्या दहा दिवसात हे असंच, खूप जणांबरोबर.

आई गेल्यावर सवाष्ण म्हणून आलेल्या बाईंचा वडिलांना फोन,
"तुम्ही घर विकता आहात असं कानावर आलं. विकणार असाल तर आम्हाला हवं आहे."
"पण आम्ही तर कोणाकडे बोललेलो नाही घर विकायचं आहे म्हणून." शांतपणे वडिल.
"नाही म्हणजे आम्हाला वाटलं, आता तुम्ही एकटे कसे रहाणार, मुलींकडे जाणार असाल...."
वडिल नुसतेच हसले. त्या बाईंनी पुन्हा खुंटा बळकट केला.
"पण विकणार असाल तेव्हा आम्हालाच सांगा पहिल्यांदा."
या बाईं आईसाठी आल्या तेवढ्यात किती निरिक्षण केलं असेल नाही? म्हणजे, मुलीच आहेत यांना, जातीलच इथून, घर विकतील वगैरे....
याला काय म्हणायचं? येतात का असे अनुभव तुम्हाला देखील? म्हणजे, माणसं नको त्या ठिकाणी नको ते बोलतात, नको तसं वागतात.....आणि आपण काही आक्षेपार्ह करतो आहोत हे त्यांच्या गावीदेखील नसतं. उत्तर द्यायला गेलं तर आम्ही तर प्रेमाने, चांगल्यासाठी.....इत्यादी ऐकावं लागतं. काय करायचं अशावेळेस?  मनुष्यस्वभाव, ज्याचं जळतं त्याला कळतं असं मनात म्हणत गप्प बसायचं?, की होता है  ऐसा....असं म्हणून सोडून द्यायचं?

Saturday, March 17, 2012

आस

कुणीतरी म्हणालं,
सांभाळ आता तुझ्या बाबाना
बाई गेल्यावर खचतो माणूस
माझं उदास हसु,
मनातला डोंब फूटून
तांडव घालायला लागलेले आसू
दडवले शब्दांच्या मखरात,
म्हटलं,
असं कसं होईल
त्याच्या मायेची पाखर
आणखी काही वर्ष तरी राहिल

ती गेली तेव्हाच मी का नाही गेलो
दचकून पाहिलं बाबाकडे
वाटलं,
घट्ट मारावी मिठी
आई गेली आत्ताच, तू नको जाऊ
शब्दाच्या आजूबाजूला
घुमायला लागलं पारव्यासारखं,
कुणाचंतरी  म्हणणं
बाई गेल्यावर खचतो माणूस....

खरचं का रे तसं झालं...
खचलास का रे बाबा तू?
केलास ना पुरा तुझाच ध्यास
ती गेली त्याच वाटेवर टाकलंस पाऊल
लेकींसाठी नाहीच ना अडला पाय

कधीतरी का होईना,
कुणाचंतरी म्हणणं खोटं का नाही ठरलं
आई गेल्यावर, बाबा तुला आमच्यासाठी रहायला
का नाही जमलं?


Tuesday, March 13, 2012

क्षितीज - भाग १०

 टेक्सास राज्यातल्या विद्यापीठाकडून त्याचा अर्ज स्विकारल्याचं पत्र आलं आणि त्याची धांदलच उडाली. आईचा थोडा हिरमोड  झाल्यासारखा झाला. जवळपासच्या विद्यापीठांमध्ये त्याने अर्ज केले होते तिथेच प्रवेश मिळाला असतातर जाणं येणं सोयीचं झालं असतं, असं तिला वाटत होतं. आता टेक्सास म्हणजे विमानप्रवासाशिवाय मार्गच नाही. त्याचाच दुसरा अर्थ सारख्या सारख्या भेटीही  नाहीत. पण नेहालाही तिथेच प्रवेश मिळाल्याचं समजल्यावर दोघांच्याही आईबाबांना फार बरं वाटलं. दोन्ही मुलांना आता एकटेपणा वाटणार नव्हता. किंबहुना एकमेकांच्या सहवासात आपली आठवण रहिली तरी खूप असही त्यांच्या मनात येवून गेलं.

एकेक करुन सगळं आवरलं आणि त्याला अगदी मनापासून वाटलं यावेळेस तरी आईला सांगायला हवं तिच्या पत्रांबद्दल. तो  धाडधाड जिने उतरत अर्ध्यावर आलादेखील तिला सांगायला. पण एकदम त्याने विचार बदलला. तशीच दमदार पावलं टाकत तो त्याच्या खोलीत शिरला. टेबलावर पडलेला कागद त्याने उचलला आणि कोर्‍या कागदावर शब्द उमटायला लागले.

’प्रिय आई  ......’


शुभम आज कॉलेजसाठी निघणार. खरं तर तिला खूप वाटत होतं त्याची तयारी करावी, बरोबर खायचे पदार्थ करुन द्यावेत.  त्याच्या आवडत्या चकल्या तिने आधीच केल्या होत्या. पण आणखी काय करायचं? स्वतःची तयारी तोच करत होता. लहान असताना छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिच्यावर अवलंबून असणार्‍या शुभमने आधीच घोळ न घालण्याबद्दल बजावलं होतं. गेल्या आठवड्यात त्याला पत्र लिहायचं राहूनच गेलं. खरं तर तिला प्रचंड काळजी वाटायला लागली होती ती त्याच्या सेलफोनच्या वापराची. बातम्यांमध्ये हल्लीच तिने ऐकलं होतं की हे देखील एक व्यसनच आहे. आणि शेवटी आजार म्हणूनच त्याच्याकडे पहावं  लागणार अशी चिन्ह आहेत इतकी मुलं, मोठी माणसही सेल फोनचा वापर करतात. कधीही शुभमला पहा, कानात कायम हेडफोन नाहीतर फोनवर बोलणं चालू.  एकदोनदा तिने शुभमला सांगायचा प्रयत्न केलाही. पण त्याचं नेहमीसारखच.
"कुठे वापरतो मी इतका?"
"तास न तास गाणी ऐकत असतोस सेलफोनवर. नाही तर मग गाणी डाऊनलोड करणं चालू असतं कॉम्प्युटरवरुन. ते नाही तेव्हां मित्रमंडळींशी गप्पा."
"पण  अभ्यासात प्रथम श्रेणी आहे की कायम"
"अभ्यासाचा आणि एखाद्या गोष्टीचं व्यसन असण्याचा काय संबंध आहे, शुभम?"
"व्यसन कुठे?"
"नाहीतर काय? त्यादिवशी एकदिवस तुझा फोन मागितला वापरायला तर किती कटकट केलीस. मला लागतो, मी वापरतो, धावायला गेलं तर तुम्हाला फोन कसा करु? कुणाशीच गप्पा मारता येणार नाहीत. कारणच कारणं."
"हो पण त्याला व्यसन काय म्हणतेस? खरी तर कारणं आहेत सगळी."
तिने मग तो नाद सोडून दिला. शब्दा शब्दाचे खेळ करण्यापेक्षा त्याला पत्र लिहलेलं चांगलं. टेक्सास विद्यापीठाकडून प्रवेश मिळाल्याचं कळल्यानंतर घरात गडबडच उडाली. पत्र लिहायचा विचार बाजूला राहिला. शुभमने जेव्हा क्रिमिनल टेक्नॉलॉजीमध्ये (गुन्हा अन्वेषण तंत्रज्ञान) पदवी घ्यायचं ठरवलं तेव्हां ती नाराज झाली होती. शुभमचा मेडिकलचा ओढा कळल्यावर जेवढी ती खूष  होती तितकीच त्याच्या बदललेल्या बेताने ती निराश झाली. माहेरी, सासरी शुभम पहिला होणारा डॉक्टर याच कल्पनेत ती गेली तीन चार वर्ष रमली होती. पण हेही खरं होतं की शुभमच्या आवडीने त्याला काय करायचं ते त्याने ठरवावं याबद्दल पालक म्हणून दोघांची भूमिका ठाम होती. शेजारी आलेल्या नेथनच्या उदाहरणाने तो हेलावून गेलेला तिला जाणवलं होतच पण त्यासाठी तो  त्याचं क्षेत्रच बदलेल याची अपेक्षा नव्हती. पण एकदा ते स्विकारल्यानंतर दोघांनी त्याचं कौतुक केलं, पाठिंबा दिला.

तिला काय काय आठवत राहिलं. तो लहान होता तेव्हां त्याच्या शाळेच्या आंतरराष्ट्रिय सोहळ्यात तिने मागे लागून त्याला  घालायला लाववेला कुडता पायजमा. शाळेत पोचल्यावर रडून रडून त्याने तो बदलायला लावला तेव्हां झालेली तिची चिडचिड. रस्त्यावर दिसलेलं जंगली कासव. दोघांनी ते कासव  घरी आणलं. पण कायद्याने कासव घरात ठेवता येत नाही हे समजल्यावर त्याला जवळच्या तळ्यात परत सोडावं लागलं. हिरमुसल्या शुभमची समजूत घालण्याचा तिने केलेला आटापिटा, सायकलवरुन  पडल्यावर कपाळाला घालावे लागलेले टाके, शुभमचा गोल्डफिश गेल्यावर प्रथमच माणसंही मरतात ह्या सत्याला स्विकारताना  त्याला झालेला त्रास. कधी खोटं बोलल्याबद्दल, कधी दिलेल्या वेळेत घरी परत न आल्याबद्दल, वेळोवेळी त्याला मिळालेल्या शिक्षा,  आणि बाकिच्या मुलांप्रमाणे निन्टेंडो, गेमबॉय असले खेळ दिले नाहीत तेव्हां सगळ्यांना सगळं मिळतं, प्रत्येकाकडे ह्या गोष्टी असतात असं म्हणत त्याने केलेलं आकांडतांडव. तिला आत्ताही हसायला आलं. त्यावेळेस शांतपणे तिने  तू त्या सगळ्यांकडे  खेळायला जातोस तेव्हां वापरतोसच की त्या गोष्टी असं म्हटल्यावर 'दॅट्‌स्‌ नॉट फेअर' म्हणत दाणदाण पाय आपटत केलेला त्रागा...  त्यावेळेस  तू त्यांच्याकडेच जाऊन रहा, पहा ती लोकं दत्तक घेतात का, असं म्हटल्यावर तो गप्प झाला होता. कधीतरी शुभमने  स्वतःच अशा गोष्टी नव्हत्या म्हणून त्याला लागलेलं वाचनाचं वेड मान्य केलं तेव्हां तिला मनस्वी आनंद झाला होता. त्यानंतर  पुस्तकाचं जग हा मायलेकातला मोठा दुवा बनला. आत्ताही तिला खात्री होती की फोन करुन अगदी टेक्सासमधूनही तो त्याने  वाचलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा करेल. पण आता त्याच्या भेटी सुट्टीतच. घर अगदी सुनंसुनं होवून जाणार तो गेल्यावर. कल्पनेनेच  आत्ताही ते भलं मोठं घर तिला अंगावर आल्यासारखं वाटायला लागलं. तिचे डोळे पाणावले. पाखरांना पंख फुटल्यावर ती उडणार हे  सत्य स्विकारणं भाग असलं तरी जीव कासावीस व्हायचा थोडाच थांबतोय?

आज पाच वाजताचं विमान होतं त्याचं. तयारी झाल्यावर तो गप्पा मारायला खालीच येवून बसला. त्याचा बाबा आणि तो बराच  वेळ टेक्सास बद्दलच बोलत बसले. शुभमचा उत्साह पाहिल्यावर तिने प्रयत्नपूर्वक आपली अस्वस्थता दूर सारली.
"तू बॅग नीट भरलीस ना?"
"अगं भरली गं."
"नंतर आठवतं तुला, हे राहिलं, ते राहिलं. यावेळेस परतही येता येणार नाही राहिलं म्हणून."
"घेईन मी तिकडे विकत."
"मग काय? बोलायलाच नको."
"सायकल नाही ना नेता येणार माझी?"
"नाही. आणि इतक्यात विकत पण घ्यायची नाही. कॅम्पसमधल्या कॅम्पसमध्ये कशाला लागेल?"
"बरं नाही घेणार मी विकत"  शुभमने फारसा वाद घातला नाही.
"रोज रात्री फोन करायचा." बाबाने असं म्हटल्यावर शुभमला हसायला आलं.
"पण तुम्ही तर म्हणता मी फार जास्त वापरतो फोन"
"कामासाठी वापरायला कुठे मना करतो आम्ही? आणि आम्हाला रोज रात्री फोन करायचा म्हणजे तुझ्या दृष्टीने कामच की."
"यु आर राईट." शुभमने असं म्हटल्यावर सगळ्यांनाच हसायला आलं.
आई-बाबाला घट्ट मिठी मारत त्याने दोघांचा निरोप घेतला. एअरपोर्टवर ती त्याला सोडायला जाणार नव्हती. दारापाशी उभं राहून हात हलवताना डोळ्यातलं पाणी बाहेर ओघळू नये म्हणून ती आटोकाट प्रयत्न करत होती. तितक्यात गाडीपाशी पोचलेला शुभम परत आला.
"तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं."
"आय लव्ह यू म्हणणार आहेस का इकडच्या पद्धतीने?" तिने कसनुसं हसत विचारलं.
"नाही, माझ्या खोलीत एक खोका आहे. तो जपून ठेव. मी नंतर कधीतरी तो नेणार आहे."
ती पुढे काहीतरी विचारणार तितक्यात  बाबाची जोरदार हाक आली.
"चल पळतो मी. बाय मॉम, आय लव्ह यू मॉम." तो हात हलवत निघून गेला.
दार बंद करत ती त्याच्या खोलीकडे वळली. पलंगा खाली  पडलेला खोका तिने अतीव उत्सुकतेने ओढला आणि तिला आनंदाश्रु आवरेनासे झाले. शुभमने लिहलेलं पत्र त्यावर चिकटवलेलं होतं. तिला लिहलेलं पत्र. उतावळेपणाने तिने पत्र  उघडलं.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
प्रिय आई,
मराठीत पत्र लिहतोय मी. खूप चुका असतील पण माझं मराठी पत्र पाहून तुला झालेला आनंद माझ्या  डोळ्यासमोर येतोय. मी कधीच तुला सांगितलं नाही पण तुझ्या प्रत्येक पत्राची मी फार आतुरतेने वाट पाहिली. नेहानेही. कधीतरी तू पत्र लिहायची नाहीस तेव्हां फार बेचैन व्हायला व्हायचं. एकदा तर मुद्दाम भांडण कर म्हणजे आई पत्र लिहेल असं नेहाने सुचवलं होतं. बाय द वे, बाबाकडून मला 'ता. क.', 'चि.', 'सौ.' अशा शब्दांचे अर्थ समजले. कुठलीही गोष्ट फार जास्त स्पष्ट करत राहतो तो, त्यामुळे समजलं नाही असं होतच नाही. तुझे शाळेतले दिवस तर फारच छान होते. तू लिहायला कशी लागलीस ते नंतर लिहलं नाहीस. पण मी बाबाला विचारलं. तो म्हणाला तुझा निबंध एकदा शाळेतल्या भिंतीवर लावला होता. वर्गात सरांनी वाचून  दाखवला आणि त्यांनी सांगितलं की इतकी वर्ष शिक्षक म्हणून काम केलं पण पहिल्यांदाच निबंधाला पैकीच्या पैकी गुण दिले. त्यानंतर मग तू लिहायला लागलीस. हाच प्रसंग लिहणार होतीस ना तू शिक्षकांमुळे विद्यार्थी कसे घडतात ते सांगताना? पण अशा  कितीतरी गोष्टी लिहशील म्हटलस आणि विसरलीस बहुधा. का मी विचारेन म्हणून वाट पहात होतीस? या गोष्टी विसरलीस की काय असं विचारावसं वाटायचं पण असही वाटायचं की पत्र वाचण्यात जी मजा आहे ती वेगळीच. एकदा का मी तुला विचारलं असतं की मग बाकिच्या पत्रांबद्दलही बोललो असतो आपण. मला नेमकं तेच नको होतं. तू लिहलेली सगळी पत्र मी या खोक्यात  जपून ठेवली आहेत. ती तशीच ठेव. मला ती माझ्या मुलांसाठी ठेवायची आहेत.... हं हं, हसू नकोस काय माझे बेत म्हणून. तुझ्या पत्रांमुळे माझ्यात किती बदल झालाय याची तुला कल्पनाही करता येणार नाही. प्लीज सगळी पत्रं जपून ठेव. कितीदातरी मी ती  परत परत वाचतो. आत्ताही मला ती घेवून जाता आली असती पण कधीतरी तुला कळायला हव्यात नं पत्रांबद्दल, माझ्या भावना.  पुढच्या वेळेस नेईन मी. प्रॉमिस कर की त्या पत्रांच्या गट्ठ्यात भर पडलेली असेल. नाहीतर असच का नाही करत? तू मला चक्क  पोस्टानेच का नाही  पत्र पाठवत? हसु आलं ना मी ई मेलच्या जमान्यात पोस्टाने पत्र पाठव म्हणतोय. अगं, मलाही तुम्ही जशी आतुरतेने पोस्टमनची वाट पहायचात तसं करुन बघायचं आहे. पाठवशील ना?
                                                                                                                                                                                      तुझा,
                                                                                                                                                                                           चि. शुभम

ता. क. : लव्ह यु मॉम. लव्ह यु मॉम, लव्ह यु मॉम .......... आय नो! बाबा म्हणेल, 'शुभम! असं लव्ह लव्ह व्यक्त करत नाही होत प्रेम; यु हॅव टू फीऽऽऽल द लव्ह'. पण तू म्हणतेस तसं रोज नाही तरी कधीतरी सांगितलं तर काय बिघडलं, इथल्या लोकांसारखं? खरं ना?
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
तिच्या हातातलं पत्र डोळ्यातल्या अश्रुंनी ओलचिंब झालं होतं. खोक्यातलं एकेक  पत्र काढत तिनेच लिहलेल्या त्या पत्रांवर ती मायेने अलगद हात फिरवत राहिली.



समाप्त

पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता

Wednesday, March 7, 2012

क्षितीज - भाग 9

 शुभम खिन्न मनाने खिडकीतून मागच्या अंगणातलं ते झाडाजवळचं बाकडं न्याहाळत होता. अपघात झाल्यानंतर सहा महीने ते बाकडं त्याचा विसावा झाला होता. घरातल्यांचा राग आला, खूप थकवा आला, निराशा झाली की, आणि आनंद झाला तेव्हां देखील तिथेच तो बसायचा. दुसरीत असताना त्याने त्याच्या प्रिय माशाला, ’बेट्टा’ला, तो मेल्यानंतर  बाजूलाच पुरलं होतं.  शुभमने त्या ठिकाणी लावलेल्या रोपट्याचं मोठं झाड झालं होतं. आज त्याला एकीकडे कॉलेज जीवनाची उत्सुकता, काहीशी भिती, दडपण होतं आणि या घराचा आता निरोप घ्यावा लागणार म्हणून आलेली अस्वस्थता. शुभम शर्टांच्या घड्या करुन व्यवस्थित बॅगेत भरत होता. सगळं लहानपण या घरात गेलेलं. आणि आई-बाबा हा तर गृहित धरलेला त्याच्या आयुष्याचा भाग होता. तेच तर काळजी घ्यायचे त्याची. जमेल एकट्याने रहायला?

विचारांचं चक्र मनात गरगर फिरत होतं पण हात नकळत एकेक काम आटपत होते. कपडे भरता भरताच बाजूला पडलेला पुस्तकांचा ढीग त्याला खुणावत होता.  सगळी पुस्तक वाचनालयात आईलाच परत करावी लागणार. या पुस्तकांनी त्याला आईच्या खूप जवळ आणलं होतं. शाळेत  ऐकलेलं, शिक्षकांनी सांगितलेलं पुस्तक याबद्दल तो बोलला की आई आवर्जून ते पुस्तक वाचनालयातून आणायची. शुभमही झपाटल्यासारखा वाचायचा. अभ्यासाच्या व्यापात वेळ मिळाला नाही की कधी गाडीत, कधी जिन्यात असं करुन पुस्तक कधी संपायचं ते कळायचही नाही. आईलाही तो गोष्टीत खेचून घ्यायचा. तीही उत्साहाने ऐकायची, पुढे काय होत असेल त्याचा अंदाज  व्यक्त करायची. त्यामुळेच त्यालाही प्रत्येक पुस्तकं कधी वाचून संपवतोय असं व्हायचं. आता हे सगळं संपणार होतं. पुढच्या  आठवड्यात तो कॉलेजसाठी बाहेर पडणार होता. कुणाला सांगणार आता गोष्टी? नेहाला गोष्टींमध्ये  रस नव्हता. ती कवितात रमणारी. बाबाही 'बोअर नको करुस, पटकन संपव'  म्हणायचा. त्यातून आईने त्याला लिहलेली पत्र! आता लिहेल आई  पत्र? आत्तापर्यंत त्याने तिच्या पत्रांचा पुसटसा उल्लेखही कधी केला नव्हता. आईला गोष्ट सांगताना, गप्पा मारताना कितीतरी वेळा  त्याला तिला सांगावसं वाटायचं की तूही फार छान लिहतेस. तू का नाही अशा गोष्टी लिहीत? पण जणू तिची पत्र ही त्याची  खाजगी मालमत्ता होती. तोंडातून शब्दच फुटायचा नाही. कदाचित आईने विचारलं असतं तर तो बोललाही असता पण तिनेही कधी एका शब्दाने विचारलं नाही. त्याच्या घशात कड दाटून आले. आई, नेथन आणि रहस्यकथा यानीच तर डॉक्टर व्हायचा ध्यास  सोडून टाकावसा वाटला की काय? गेली चार वर्षं कार्यानुभव म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेळ्या विभांगाचीच त्याने चाचपणी केली  होती. आणि प्रत्यक्षात त्यालाही शक्यता न वाटलेलं क्षेत्र त्याने निवडलं. सगळं तसं अचानकच बदललं होतं. गेल्या काही  आठवड्यातल्या घडामोडींची तो उजळणी करत राहिला.

हायस्कुलचं शेवटचं वर्ष. बारावी. शुभमने कितीतरी ठिकाणी कॉलेज प्रवेशाचे अर्ज भरायचे ठरवले होते. ज्या शाखांसाठी अर्ज कराल  त्याला अनुसरुन त्याच्याबरोबर लिहावे लागणारे निबंध. या निबंध लिहण्याच्या प्रकारातून बरीच मुलं लेखक होतील असच त्याला  वाटायला लागलं होतं. चार वर्षात त्याने दर मे महिन्याच्या सुट्टीत वेगवेळ्या क्षेत्रात काम करुन पाहिलं होतं. माध्यमिक शाळेत  असतानाच केलेला वैद्यकीय क्षेत्राची ओळख करुन देणारा पंधरा दिवसाचा कॅम्प त्याला आठवला. सगळ्या विभागांची तोंडओळख  तेव्हां झाली. त्यावेळेस मिळालेल्या कितीतरी गोष्टी त्याने अजून जपून ठेवल्या होत्या. कॅलक्युलेटर, कंम्पास पेटी, मॅग्नेटिक पॅड  ..... नववीत गेल्यावर हॉस्पिटलमध्ये घेतलेला कार्यानुभव. आत्ताआत्तापर्यंत होईन तर डॉक्टरच म्हणणार्‍या शुभमचं मत अचानक बदललं. त्याला क्रिमिनल जस्टीस टेक्नॉलॉजीने (गुन्हा अन्वेषण तंत्रज्ञान) वेड लावलं.
गेल्या वर्षी शेजारच्या घरात आलेला नेथन हेच  त्याचं मुख्य कारण होतं. नेथनला बाबा नव्हते. आई किरकोळ कामं करत चार मुलांचं कसंबसं भागवत होती. घर म्हणजे, हाऽ कचरा. भावंडांची खडाजंगी. एकदा चढे आवाज ऐकून कुणीतरी पोलिसांना बोलावलं आणि ती सगळी भावंडं विखुरली गेली. घराची विकट अवस्था आणि मुलांकडे दुर्लक्ष या कारणाने आईकडून चारी भावंडं सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतली. कायद्याने त्यांचा ताबा सरकारकडे होता. आता अशी मुलं स्विकारतील त्यांच्या घरी रहायचं. गेल्या  तीन वर्षात नेथन दोन तीन घरात राहून आता  शेजारच्या घरी आला होता. त्याची त्यांच्या भावडांबरोबर भेट दुर्मिळ झाली. आई कोर्टाच्या पायर्‍या झिजवून थकून गेली होती. दुखावलेला, संतप्त, बेफिकीर नेथन फुटबॉलसारखा वेगवेगळ्या घरात टोलावला जात होता. सतत बदलल्या जाणार्‍या  पालकांना स्विकारायचा अयशस्वी प्रयत्न करत होता. कधीतरी त्याच्याशी बोलण्याची वेळ यायची तेव्हां म्हणायचा,
"आम्ही कुणीच काही गुन्हा केला नव्हता. ना आईने, ना भावंडांनी. तरी ही वेळ का आली आमच्यावर? का, का असं झालं? मी  घरात मोठा पण मला काहीच करता आलं नाही" जेमतेम तेरा वर्षाचा नेथन स्वतःला मोठा समजत होता.  नेथनने बेसबॉल, बास्केटबॉल खेळायला यावं म्हणून शुभमने केलेल्या प्रयत्नांना त्याने दादच दिली नाही. त्याचं लहानपण त्याला सोडून गेलं होतं. मनात दडलेली भिती सतत फणा काढून उभी राही. या घरात त्याचं वागणं आवडलं नाही तर पुन्हा रवानगी दुसर्‍या घरी. शुभमला वाटायचं या यंत्रणेतच काहीतरी बदल करायला हवा. असं दुसर्‍यांच्या घरी जबरदस्तीने रहाण्याऐवजी त्याच मुलांच्या घरची  परिस्थिती बदलायचा का प्रयत्न करत नाहीत? मुलांना काय हवय, कुठे रहायचं ते का नाही विचारत? त्याचं मन, भावना नको का जाणून घ्यायला. ह्याचाच परिपाक म्हणून त्याने गुन्हा अन्वेषण मध्ये पदवी घ्यायचं ठरवलं. त्याने हा विचार नेहाला बोलून  दाखवला तेव्हां तिला धक्काच बसला.
"नेथनमुळे वाटतय तुला हे. पण खरच त्या विषयाची आवड आहे का ते कसं कळणार तुला आता. इट्‌स्‌ टू लेऽट टू ट्राय समथिंग लाईक धिस."
"आवड आहे की नाही हा प्रश्नच नाही. तू पहायला हवस नेथनला. किती एकलकोंडा झालाय तो. आमचे शेजारी अथक प्रयत्न  करतात त्याने सर्वांशी मिळून मिसळून वागावं, हसतमुख रहावं म्हणून. पण हा कायम निर्विकारच. कुठल्याही भावना चेहर्‍यावर येवूच देत नाही. त्यामुळे त्यानांही समजत नाही काय करावं. मग शेवटी त्यांनी त्याला परत पाठवलं तर? खूप भिती वाटते मला या विचाराने. नेथनला हे समजावून सांगितलं पण तो बदलतच नाही."
"अरे पण त्यासाठी तू तुझं वैद्यकीय शाखेचं स्वप्न सोडणार?"
"स्वप्न म्हणजे काय गं? इतर क्षेत्रं तशी फारशी माहित नसतात. आपणच डोक्यात घेवून बसतो काहीतरी. डॉक्टर, इंजिनिअर होणार म्हटलं की कोण कशाला नाही म्हणतय? त्यामुळे तेच मनात रहातं. पण लेट मी पुट धिस इन अनदर वर्डस्‌. नाऊ धिस  इज माय ड्रीम. आय वाँट टू मेक अ चेंज इन सिस्टिम अँड दीज किड्‌स्‌."
"एल ओ एल." नेहाने पटकन टाईप केलं.
"हसतेस काय, तुला नाहीच कळणार एखाद्या गोष्टीसाठी वेडं होणं म्हणजे काय."
"अरे तू दीज किड्‌स्‌ म्हटलस म्हणून हसतेय मी. तू काय असा मोठा माणूस झालायस का? आणि वेडं होणं म्हणजे काय ते  माझ्यापेक्षा कुणाला कळणार चागलं? झालेय की मी तुझ्यासाठी वेडी."
त्याने हसर्‍या चेहर्‍याचं चिन्ह (स्माईली फेस) पडद्यावर ओढलं.
"तू जर आता हे करायचं ठरवलयस तर मग माझं काय?"
"तुझं काय? तू जाऊ शकतेस की मेडिकलला."
"अरे हो, ते कळतय रे मला. पण मग आपली स्वप्नं? दोघांनी एकत्रच शिकायचं ठरवलं होतं ना?"
"अगं मी नुसतं म्हणतोय. अर्ज केले की ते स्विकारले गेले पाहिजेत ना."
"आणि तुझा सगळा कार्यानुभव आहे तो मेडिकलचा."
"हो, म्हणूनच थोडीशी धाकधुक वाटतेय. त्यामुळे मी मेडिकेलसाठीही अर्ज भरणार आहे. ते तर आपण एकत्रच भरु. म्हणजे माझं  नाही झालं क्रिमिनल जस्टीसचं तर निदान मेडिकलला एकत्र असू."
"आय होप सो. "
"आणि मी क्रिमिनलला आणि तू मेडिकलला असं असलं तरी कदाचित एकाच युनिव्हर्सिटीत मिळेलही प्रवेश. कॅम्पस असतील  वेगळे. पण मग भेटूच की आपण. आणि तू म्हणतेस तसं दगडी चौथर्‍यावर झाडांच्या सावलीत गप्पा मारु"
"खरच तसं झालं तर बरच. बेस्ट लक शुभम."
"बेस्ट लक टू यु टू नेहा."

त्यानंतर त्याने घरात सांगितलं होतं. आई-बाबा दोघांनाही थोडसं आश्चर्य वाटलं पण कुणीच नाकं मुरडली नाहीत. कदाचित नेथनचं  जितंजागतं उदाहरण समोर होतं म्हणून? त्याने त्यावर फारसा विचारच केला नाही. मेडिकललाच गेलं पाहिजे म्हणून मागे लागले  नाहीत हेच  खूप होतं. शाळेत म्हणतात की भारतीय मुलांचे आईवडीलच त्यांनी काय करायचं, व्हायचं ते ठरवतात. पण तो काय किंवा नेहा काय दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना पुरेपुर स्वांतंत्र्य दिलं होतं.  स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे ही वारंवार बजावायला विसरले नव्हतेच म्हणा ते. आता फक्त वाट पहायची होती...



क्रमश:
पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता