Thursday, August 30, 2012

दैनिक ’प्रहार’ मधील माझा लेख

’जिज्ञासा थिएटर्स’ या  रत्नागिरीतील संस्थेसाठी, दैनिक ’प्रहार’ साठी लिहलेले अनुभव. इथे फक्त मी काय केलं ते सांगण्याचं प्रयोजन नाही तर अभिनय, दिग्दर्शन करताना येणारे अनुभव हा महत्वाचा उद्देश आहे. हे अनुभव तुम्हालाही आवडतील ही अपेक्षा.

"अवं असं डोसक्यात राक घालून..."  रंगीत तालमीचे संवाद सुरु होते.  उत्साह, गडबड, हास्य विनोद असं वातावरण होतं. कलाकाराचे संवाद सुरु झाले की थोडीशी शांतता, कुजबुजते आवाज. आत्ताही प्रकाशव्यवस्थेसाठी एक दोन वाक्य प्रत्येक कलाकाराला म्हणायची होती. मी प्रकाशव्यवस्था करणार्‍या माझ्या नवर्‍याला, विरेनला हातवारे करुन सूचना देत होते. तितक्यात माझी तीन वर्षाची मुलगी मला येऊन फक्त बिलगली. बस, तेवढ्याने कलाकाराची तंद्री भंग पावली.
"आय कॅन्ट डू धिस...." रागाने लाल झाले ते. आजूबाजूला कुजबुजणारे, जोरजोरात सूचना देणारे सगळे आवाज बंद पडले. असह्य शांतता वातावरणात पसरली. काय करावं ते सुचेना. प्रसंगावधान राखून विरेनने दुसर्‍या कलाकाराला संवाद म्हणायची सूचना केली. तो कलाकारही शांत झाला. दुसर्‍या दिवशी प्रयोग, आदल्या दिवशी हा प्रकार. रात्रभर एकच प्रश्न मनाला छळत होता.
"कशाला पडतो या फंदात? फायदा तर काहीच नाही. वेळ आली तर आपलाच खिसा सैल सोडायचा, महिनेच्या महिने तन, मन, धन ओतायचं. आणि असा प्रसंग आला की मूग गिळून गप्प बसायचं. कशासाठी हे सगळं?"

दुसर्‍या दिवशी एकांकिका मस्त रंगल्या. पडद्यामागचे, पुढचे कलाकार असे  पिझ्झा खायला बसलो आणि त्या क्षणाला पुढच्या वर्षीच्या एकांकिकेचे बेत सुरु झाले. झालं गेलं सारं विसरुन पुन्हा ताजेतवाने झालो ते पुढच्या एकांकिकेसाठी.  इतकी असते ही नशा? कटु आठवणी पुसट होत पुन्हा पुन्हा त्याच मार्गाला नेणारी? नकळत मन मागे गेलं. नुसता अभिनय करण्याचं समाधान होतं त्या वेळेपर्यंत पोचलं, किंबहुना अभिनय म्हणजे काय हेही कळत नव्हतं तिथे जाऊन उभं राहिलं.  पालक मुलांना वेगवेगळ्या छंद वर्गात घालून पूर्ण गुंतवून टाकत नसत. शाळेतर्फे भाग घ्यायचा, शिक्षक म्हणतील ते करायचं, त्यावेळची ही गोष्ट.

"ऊठ, ऊठ" रात्री कधीतरी स्टेजवर डुलकी काढत बसलेल्या मुलांमधून बाईंनी उठवलं. कुणीतरी कळ दिल्यासारखं धडपडत उठून मी, ’मी ही ही एकटीच नाचते...’ हे गाणं म्हणत नाच केला तो पहिलीत असताना. देवरुखच्या भोंदे शाळेच्या पडवीसमोर पुढे फळ्या वगैरे घालून  वाढवलेलं स्टेज. शाळेतली कार्यक्रम करणारी मुलं मागे रांगेत बसलेली.  सर्वच मुलं रात्र बरीच झाल्याने  डुलक्या काढत होती . नाव पुकारलं  की उठायचं, नाच, गाणं असं काहीतरी उरकायचं आणि परत मागे जाऊन बसायचं...

त्यानंतर आम्ही देवरुखहून वडिलांच्या बदलीमुळे पालघरला आलो.  एक दिवस, मोगरे बाईंनी वर्गातल्या दोघा तिघांना शाळा सुटल्यावर भेटायला सांगितलं. तो दिवस आजही जसाच्या तसा लक्षात आहे. कोणी काय केलं आणि बाई किती ओरडणार हेच विचार मनात घोळवत ’त्या’ वर्गात पोचलो.
"शाळेचा रौप्यमहोत्सव आहे. तेव्हा दहा मिनिटांचा प्रवेश बसवणार आहोत." पालघर ठाणे जिल्ह्यात  गुजरातच्या सीमेवर आहे पण, नाटकांचा प्रभाव अजिबात नाही; निदान तेव्हा तरी नव्हता. त्यामुळे बाई  प्रवेश बसवणार म्हणजे नक्की काय करणार हे ही ठाऊक नव्हतं, अभिनय वगैरे गोष्टी फार दूरच्या. बाई काहीतरी करायला सांगताहेत ते करायचं इतकंच.
आज त्या प्रवेशातले आनंदीबाईचे फोटो पाहताना शाळेच्या मोठ्या मैदानावर उभारलेला रंगमंच, नऊवारी नेसलेली, नथ घातलेली आनंदीबाई, राघोबा, पेशवे  इतकंच डोळ्यासमोर येतं आणि नंतर घरी, शाळेत झालेलं कौतुक. त्यानंतर एखाद्या वर्षाने शाळेत केलेला टिळकांवरचा प्रवेश. मला टिळक केलं होतं आणि खुर्चीवरून उठताना धोतर सुटल्याने टिळक खुर्चीवरच बसून राहिले इतकं आठवतं.

वडिलांची बदली कणकवलीला झाल्यावर चित्र पालटलं. कोकण भाग नाट्यप्रेमी.  एस. एम. हायस्कूलच्या करंबेळकर बाई, लोखंडे आणि साळुंके सरांच्या तालमीत  नाथ पै एकांकिकेसाठी शाळेतर्फे एकांकिका नेत त्यामध्ये भाग घेणं सुरु झालं; तेव्हा स्पर्धेत भाग घेणं, अभिनय करणं त्यासाठी मेहनत घेणं म्हणजे काय ते समजायला लागलं.  पालघरला असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे तर फार अप्रूप होतं या सार्‍या गोष्टींचं. बच्चू बर्वेची अफलातून दिवास्वप्ने, गजरा अशा एकांकिका त्या वेळेस स्पर्धेसाठी शाळेने केल्या. डिंसेबरच्या शेवटच्या आठवड्यात असणार्‍या या एकांकिका स्पर्धांवर स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी असीम प्रेम केलं. जेव्हा जेव्हा अभिनयासाठी  पारितोषिक  मिळालं त्या वेळेस  झालेला आनंद अवर्णनीय होताच,  पण त्याचबरोबर शाळा सुटल्यावरच्या तालमी,  शिक्षकवर्गाने केलेलं कौतुक  हे  फार मोलाचं होतं.

काही वेळेस आनंद आणि निराशेचा अनुभव एकाचवेळी पदरी येतो. अबोल झाली सतारमधील  सविताच्या भूमिकेला नाथ पै एकांकिका स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं, आनंद द्विगुणित झाला कारण स्त्री गटात दुसरं तिसरं पारितोषिक कुणालाही मिळालं नव्हतं. पण या आनंदाला गालबोट लागलं ते परिक्षकेच्या शब्दांनी.  एकांकिका, सतारवादक रमेशला झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात सविता त्याच्यावर होणार्‍या शस्त्रक्रियेची वाट पहात असताना घडते. अपघात झालेल्या रमेशची बायको इतकी नटून थटून, सुंदर साडी नेसून कशी असा प्रश्न परिक्षक बाईंना पडला आणि प्रेक्षागृहात हास्याची लकेर उमटली. दीपक परब एकांकिकेचे दिग्दर्शक. हा दिग्दर्शनाचा भाग आहे, मी वाईट वाटून घेऊ नये असं म्हणत त्यांनी  माझी समजूत घातली. बहुधा परिकक्षकांबरोबरही ते बोलले असावेत. खरी हकिकत अशी होती की सविता रमेशच्या आवडीची साडी नेसून, नटून थटून तयार झालेली असते.  तो रस्ता ओलांडून त्याच्या सतार वादनासंदर्भात आलेल्या बातमीसाठी वर्तमानपत्र आणायला जात असताना ती गॅलरीत उभी असते. रस्त्यापलीकडच्या दुकानात तो वर्तमानपत्र घेतो आणि ते फडकवत भान विसरून रस्ता ओलांडतो. अपघात होतो. आता अश्या वेळेस ती साडी न बदलता असेल तशीच रुग्णालयात पोचणार ना? याचा उल्लेख एकांकिकेत अर्थातच आहे. हा अनुभव माझ्या मनावर खोल रुतून राहिला आणि नकळत तो पुढे उपयोगी पडत राहिला.

 एकांकिकेतल्या कामाचा आनंद घेत असतानाच  अविनाश मसुरेकरांनी बसवलेल्या मंतरलेली चैत्रवेल नाटकात पन्नाशीच्या आसपासच्या स्त्रीची,  अत्यंत करारी, काहीशी क्रुरपणाकडे वळणारी लीलाबाईंची भूमिका केली ती बहुधा अकरावीत असताना. प्रौढ बाईची रंगभूषा केल्यावर वेगळंच वाटायचं. या नाटकाचे खूप ठीकाणी प्रयोग झाले. बहुतेक ठिकाणी प्रयोगाला तुफान गर्दी असायची. गर्दीची नशा उतरली ती मसूर गावात. जेमतेम पाच पंचवीस लोकं भल्या मोठ्या नाट्यगृहात पाहिल्यावर नाटक कुणासाठी करायचं ह्या  चिंतेने सार्‍यानाच घेरलं.
"भरपूर लोकं समोर आहेत असं समजून आपापली भूमिका करायची." स्वत:ची निराशा लपवीत दिग्दर्शकांनी कानपिचकी दिली आणि त्या पाच पंचवीस प्रेक्षकांसाठी प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलं. खरं तर अविनाशनी सांगितलं त्याची अंमलबजावणी केली.
अपंग मुलीला सांभाळण्याचं काम करण्यासाठी आलेल्या लिलाबाई त्या मुलीचा आत्यंतिक द्वेष करतात. लिलाबाईंच्या कोड्यात टाकणार्‍या वागण्याचं रहस्य उलगडतं ते शेवटी. त्यानंतर लिलाबाईंबद्दल कीव, सहानुभुती वाटायला लागते. पण तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनातला राग पराकोटीला पोचत असे.
नाटक संपल्यावर मला कुणी ओळखतच नसे याचं थोडंसं दु:ख होई पण तो रंगभूषेचा प्रभाव होता, रंगभूषाकाराला मिळालेली ती दादच. लिलाबाई अशी ओळख करून दिल्यावर आधी आश्चर्य आणि नंतर लिलाबाईंवर दगड टाकावेत असं वाटत होतं शेवटपर्यंत अशा भावना  प्रेक्षक व्यक्त करत. भूमिकेच्या पसंतीची ती वेगळीच पावती होती.

कणकवलीहून रत्नागिरीला आम्ही आलो त्या वर्षी जे. के. फाईल्सच्या ’वर्कर्स’ या सुहास भोळे लिखित आणि दिग्दर्शित एकांकिकेने नाथ पै स्पर्धेत बरीच बक्षिसं मिळवली होती. त्याचवेळेस मलाही अबोल झाली सतार एकांकिकेसाठी स्त्री कलाकारांमध्ये अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. यामुळेच रत्नागिरीला आल्याआल्या सुहास भोळेंशी संपर्क साधता आला आणि फक्त दोन महिन्यात त्यांच्या पालखी एकांकिकेतून पुन्हा कणकवलीला स्पर्धेसाठी जाता आलं. नंतर त्यांच्या जिज्ञासा संस्थेतर्फे भिंत, दंगल अशा एकांकिका, प्रतिबिंब नाटक या सर्वाचे स्पर्धांसाठी आणि इतर ठिकाणी असंख्य प्रयोग केले.  बक्षिसं मिळवली. मंतरलेले दिवस होते. दंगलची भूमिका तर आठ दिवसात सुहासनी बसवली होती. शिर्के हायस्कूल मध्ये केलेल्या तालमी, नाटक, एकांकिकेसाठी सर्व कलाकारांनी केलेला प्रवास. गप्पा, गोष्टी, रुसवे फुगवे....मनाच्या कोपर्‍यात दडलेल्या आठवणी उलगडताना हे सारं पुन्हा अनुभवल्यासारखं वाटतं.  वटवट सावित्री, गाठ आहे माझ्याशी, माणूस नावाचं बेट, मोरुची मावशी अशी अनेक नाटकं, अविनाश फणसेकर, श्रीकांत पाटील अशा रत्नागिरीतील नामवंत दिग्दर्शकांबरोबर करता आली.  फणसेकर सरांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या एकांकिकेला दिग्दर्शन करण्याचीही संधी दिली तो दिग्दर्शनाचा पहिला अनुभव.

तेव्हा कधी जाणवलं नव्हतं ते पार साता समुद्राकडे आल्यावर जाणवतं. इतकी वर्ष नुसतं अभिनय करण्याचं सुख पदरी पडलं असं नाही तर सर्वांशी झालेली कायमस्वरुपी मैत्री हा ठेवा मला  मोलाचा वाटतो. यातल्या काही सहकलाकारांबरोबर आज इतक्या वर्षांनीही संपर्क आहे ही जाणीव सुखद आहे.

अमेरिकेत येऊन सतरा वर्ष झाली. सुरुवातीला छोट्य़ा गावात असताना कथाकथन, लेखन यावर अभिनयाची तहान भागवावी लागली.  काही वर्षापासून आम्ही म्हणजे मी आणि माझा नवरा विरेन, ’अभिव्यक्ती’ या आमच्या संस्थेतर्फे व्यावसायिक पातळीवर एकांकिका करतो.  भिंत, महाभारताचे उत्तर रामायण, खेळ, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर या एकांकिका आत्तापर्यंत आम्ही केल्या. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, नाट्यमंदिर आरक्षण, ध्वनी, संगीत, जाहीरात, तिकीट विक्री अशा अगणित बाजू सांभाळणं पार पडलं ते इथल्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने. हे करत असताना गाठीशी जमते अनुभवाची पुंजी. माणसांचे स्वभाव उलगडत जातात, आपण केलेल्या चुका लक्षात येतात. दिग्दर्शनाची तारेवरची कसरत करताना तर वर उल्लेख केलेल्या सार्या दिग्दर्शकांची कमाल वाटत राहते.

 भारतात संस्था, कलाकार, प्रेक्षक यांची उणीव भासत नाही. परदेशात मोठी शहरं सोडल्यास साधारण १०० - १५० मराठी कुटुंब छोट्या गावांमध्ये असतात. केरीमध्येही तितकीच संख्या आहे.  इथे काम करणार्‍यांचा दृष्टिकोन हौस म्हणून अभिनय करण्याचा असतो. पण तिकिटं लावून प्रयोग करायचं ठरवलं की काय पर्याय? त्यामुळे हौशी कलाकारांकडून व्यावसायिक पातळीची अपेक्षा केली की कुरकुर होत राहते. दिग्दर्शक या नात्याने समाधान होईपर्यंत तो तो प्रसंग झोप उडवून टाकतो.

विनोदी प्रसंगात वाहवत जाऊन आमच्या एका कलाकाराने रंगमंचावर स्त्री कलाकाराशी केलेल्या लगटीने आम्हाला शहाणं केलं. नट रंगभूमीवर गेला की दिग्दर्शकाच्या हातात काही उरत नाही याची विदीर्ण करणारी जाणीव अशा प्रसंगी होते. असं काही घडतं तेव्हा मनात विचार तरळून जातो. त्या वेळेस आमच्या दिग्दर्शकांनाही वेगवेगळ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागलं असणारच. आशा निराशेचा लपंडाव, कटू गोड प्रसंग हे या खेळाचे अविभाज्य भाग. पण तरीही पुन्हा त्याच उत्साहाने पुढच्या डावाची तयारी सुरु होते. एकदा तोंडाला रंग लागला की....हेच खरं, नाही का?

एकांकिका झलक पहाण्याचा दुवा -   http://marathiekankika.wordpress.com

Wednesday, August 15, 2012

भरारी

मीनाताईंनी जेवणाचा डबा उघडला. मख्खपणे त्यांच्या हालचाली बघत बसलेल्या अनिताकडे त्यांनी एक नजर टाकली. काही क्षण त्या नुसत्याच बारा वर्षाच्या अनिताकडे पहात राहिल्या. केस कसेतरी जेमतेम बांधलेले, तिचे तिनेच विंचरलेले असावेत. कपाळावरची छोटी टिकली. काळासावळा रंग आणि निस्तेज डोळे.स्वतःतच हरवलेल्या हालचाली. ती स्वतःहून काही करणार नाही हे लक्षात आलं तसं मीनाताईंनी पोळीचे तुकडे, थोडीशी भाजी जे काही डब्यात होतं ते काढून समोर ठेवलं.
"अनिता जेवणाची वेळ झाली आहे. बघ तुझ्या डब्यात काय काय आहे, खाणार ना?"
निर्विकार चेहर्‍याने अनिताने पोळीचा तुकडा तोडांत टाकला. तिला पोळीबरोबर भाजी खायला बजावून मीनाताई दुसर्‍या मुलाकडे गेल्या. पुन्हा सगळं त्याच क्रमात झालं आणि त्या आपला डबा आणण्यासाठी वळल्या. धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांच्या काळजात धडधडलं. गर्रकन मीनाताईंनी मागे वळून पाहिलं. त्यांनी पाठ फिरवल्या फिरवल्या अनिताने डबा बाकड्यावरुन जोरात ढकलला होता. डब्यातलं अन्न खाली सांडलं. आधीच जेमतेम बांधलेले केस अस्ताव्यस्त झाले होते. पिंजारलेले केस ओढत अनिता तारस्वरात किंचाळत होती. चेहर्‍यावर अतीव आश्चर्य, दु:ख आणि वेदना. धावत मागे होवून मीनाताईंनी अनिताला घट्ट मिठीत धरलं. तिचं डोकं छातीत रुतवलं आणि त्या अनिताला बराचवेळ थोपटत राहिल्या, केसावरुन हात फिरवत राहिल्या. आपल्या स्पर्शाने, मायेने तिची वेदना नाहीशी व्हावी असं त्यांना मनापासून वाटत होतं. हळूहळू सगळं शांत झालं. मीनाताईंनी आजूबाजूला पाहिलं. त्या छोट्याशा खोलीतले दहा, बारा डोळे अनिताकडे रोखून पहात होते.  काय झालं हे आकलन होण्याइतकी जाण नव्हती कुणालाच. त्यामुळे कुणीही अनिताच्या रडण्या, ओरडण्याने घाबरलं नव्हतं की वैतागलं नव्हतं. शारिरीकदृष्टया निरोगी, अव्यंग, पण मनाने कमकुवत, सार्‍या भावनांच्या पलिकडे गेलेली ही मुलं. मीनाताईंच्या हातापायातलं त्राण गेल्यासारखं झालं. या मुलांच्या जगात आपणच वेगळे असल्याच्या भावनेने त्यांच्या हातापायांना सुक्ष्म थरथर सुटली.  एकटेपणाचा विळखा मनातून देहापर्यंत पोचला. थोडावेळ त्या तशाच बसून राहिल्या. मुलंही सारं काही समजल्यासारखी पुस्तकात डोकं खुपसून बसली. सुमाला दारात उभं राहिलेलं पाहिलं आणि त्यांना एकदम आधार वाटला. त्यांच्या चेहर्‍याकडे पहात सुमाने विचारलं.
"पुन्हा तेच?"
"तुला कसं कळलं?"
"तुमचा चेहरा सांगतोय ना."
"हं"
"तुम्ही घरी जा बाई, काही वाटलं तर मी हाक मारेन तुम्हाला."
"नको बसते थोडावेळ. या मुलांसाठी काय केलं की आत्मविश्वास वाढेल त्यांचा तेच कळत नाही. शारिरिकदूष्ट्या सक्षम आहेत हे समाधान मानायलाच हवं. पण त्यांच्या हृदयातल्या वेदनेवर फुंकर घालून आत्मविश्वास कसा जागृत करायचा? जे झालं ते मागे टाकून पुढे व्हायला कसं शिकवायचं तेच कळत नाही. कुठल्यातरी एका घटनेने स्वत्व गमावलेली ही मुलं,"
"आणि पोरकीदेखील" सुमाने असं म्हटल्यावर त्यांनी आश्चर्यानेच तिच्याकडे पाहिलं.
"पोरकी कशानं गं? आई वडिल आहेत, आपणही आहोत की." त्यांना थोडासा रागच आला सुमाचा.
"हो, पण तरी पोरकीच. आई, बाप असूनही पोरकी हे कटु सत्य आहे त्यातलं."
"असं कसं बोलवतं ग तुला?"
"मी फक्त सत्य परिस्थिती सांगतेय बाई. तुम्हाला वाटतं की हे सगळं आपण बदलू शकतो. इतकं सोपं नसतं ते."
"मला माहित का नाही ते. पण सोपं नसलं तरी बदलू शकतो. आणि आपण एकटे थोडेच आहोत. समाजसेवक,  डॉक्टर, सेवाभावी संस्था कितीतरी लोकांच्या मदतीचे हात आहेत. काहीतरी असं सुचायला मात्र पाहिजे की त्यांच्या आत्मविश्वासाची पातळी एकदम उंचावेल. तसं झालं ना की सापडेल त्यांचा त्यांना मार्ग."
सुमाने नुसतीच मान डोलावली. बाईंर्पुढे बोलण्यात काही अर्थ नव्हता. ज्या तळमळीने त्याचं काम चालू असतं, त्या अशा मुलांमध्ये गुंतून जातात त्याला कुठेतरी मर्यादा असायला हवी असं सुमाला  वाटायचं. वेळ आली तर स्वतःचा जीव देतील. फार त्रास करुन घेतात, शरीराला, मनाला. पण सांगणार कोण? स्वतःशीच पुटपुटत सुमा मुलांकडे वळली.

मीनाताई मुलांचे कागद काढून वाचत राहिल्या. प्रत्येक मुलाची म्हटलं तर परिस्थिती वेगळी आणि म्हटलं तर सारखीच.  अंतिम परिणाम एकच. त्यातूनच आपली वाट शोधायची प्रत्येकाची धडपड, कुणीतरी दाखवलेल्या मार्गाने चालायची कसरत. हातात आलेला कागद त्या पुन्हा पुन्हा पहात राहिल्या. झोपडीच्या बाहेर झोपलेल्या सुरेशचं चित्र होतं ते. त्यानेच काढलेलं. त्यांचा जीव गलबलला. त्या छोट्याशा खोलीत सहा सात भावडांसाठी जागा पुरणं अशक्यच. नेहमी कुणी ना कुणी बाहेर झोपणं प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेलं. दोन्ही पाय गुडघ्याशी घेवून झोपलेला सुरेश. दहा वर्षाचा. आईला मदत म्हणून दुकानात पोछा मारायचं काम करायचा. अनुभवाने बेरड झालेला सुरेश शाळेत तसा व्यवस्थित वागायचा. चित्र तर फार सुंदर काढत होता. पण कधी काही बिनसलं की वागण्यात विचित्रपणा यायचा. आणि ते बिनसायला फार वेळही लागायचा नाही. शिव्यांची लाखोलीच वहायला सुरुवात करायचा तो. सुरुवातीला असं झालं की मीनाताई आणि सुमाला संकोच वाटायचा. बाकिच्या मुलांवर विपरीत परिणाम होईल याची भिती वाटायची. सुमा लागलीच त्याला शाळेच्या आवारात फिरायला न्यायची, त्याच्याशी गप्पा मारायची. तेव्हाच कधीतरी सुमाला त्याच्या वागण्याचं कारण कळलं. आधी वाटलं होतं तो हे असं वागणं, शिव्या घालणं घरातच शिकत असेल. तो अंदाज चुकला होता. दुकानातला त्याचा मालक तो पोछा करायला लागला की उगाचच काहीतरी खुसपट काढून त्याला बडबडायचा, सुरेश काही बोलला की शिव्यांचा भडिमार. हळूहळू मालकाने मारहाण चालू केली. एकदोनदा सुरेशने ते काम सोडूनही दिलं, पण दुसरीकडे लगेच काम मिळालं नाही की पुन्हा नाक घासत तो तिथे जाई. बाकीच्या मुलांची या ना त्या तर्‍हेने अशीच परिस्थिती. मीनाताईंचं मन अनिता या शाळेत आली त्या दिवसाकडे वळलं ...

त्या दिवशी संध्याकाळी त्या घरी आल्या तेव्हा मुलं, नवरा वाटच पहात होते.
"कुठून शाळा सुरु केली आहे असं झालय." नवर्‍याने पुढे केलेल्या चहाचा घोट त्या म्हणाल्या. कुणीच काही बोललं नाही तसं त्याच पुढे म्हणाल्या.
"हे असं मी म्हणते,  ते काही ना काही घडतं तेव्हाच.  आपल्या हातात काही नाही ही भावना काळीज कुरतडून टाकते तेव्हा शेवटी असं वाटायला लागतं.   ही मुलं अशा प्रसंगातून जातात तेव्हा तर आपण नसतोच तिथे, पण आता तरी परिस्थिती बदलता येईल का, मुलांना हसा खेळायला शिकवू का आपण. एक ना अनेक शंका येत राहातात."
"आज काय झालं?" नवर्‍याने नेहमीच्या शांतपणे विचारलं.
"आज दाखल झालेली अनिता, तिचे वडीलच तिच्यावर.... " त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा भडकलाच.
"बलात्कार म्हणायचं आहे आई तुला?"
"हं" त्यांच्या स्वरातला संकोच त्या हं मधून डोकावत राहिला.
"रस्त्यावर आणून उभं आडवं झोडपून काढायला हवं." त्याचा तो आवेश बघून त्यांना बरं वाटलं. पण नूसतं बोलून काय होणार?
"कशी आहे अनिता? तू बोललीस तिच्याशी?" त्यांच्या सोळा वर्षाच्या मुलीने विचारलं.
"ठीक आहे, एकदम नाही असं बोलता येत. तशी चांगली वागते. पण मध्येच तिला बलात्काराचं आठवतं, मग स्वतःलाच बोचकारत सुटते, मारुन घेते, केस ओढते स्वतःचेच. तिला कसं थांबयाचं तेच कळत नाही."
"आई-वडील कुठे आहेत?"
"नाही माहीत मला. आणि मला वाटतं हा प्रकार खूप दिवस चालला असावा, ती या संस्थेकडे कशी आली ते माहित नाही. पण नेहमीप्रमाणे समाजसेवकांनी आणून सोडलं आपल्या शाळेत. आता अशा मुलांना सांभाळतील त्यांची यादी आहे ना त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तोपर्यंत त्यांच्या संस्थेने व्यवस्था केली आहे तिच्या रहाण्याची."
"तुला आमची मदत लागली तर सांग." दोन्ही मुलांनी मनापासून म्हटलं. त्यांनीही मान डोलावली. पण यातलं काही होणार नव्हतं हे त्या जाणून होत्या. मुलं चांगली होती, त्यांना मनापासून आईच्या व्यापात सहभागी व्हायचं होतं. पण आत्ता कुठे त्यांच्या आयुष्याला सुरुवात होत होती. भविष्याचे वेध, महत्वाकांक्षा यातून वेळ मिळाला तरच ती दोघं या कशाचाच पत्ता नसलेल्या, घर हरवलेल्या मुलांसाठी काहीतरी करणार नं. त्यांना तरी कसा दोष देणार? मदतीचा हात पुढे करतायत हेच खूप.  नवरा मात्र त्यांच्या बरोबरीने धडपडत होता.

मीनाताई समाजसेवेची पदवी घेतल्यानंतर वेगळं काहीतरी करण्याच्या कल्पनेने भारुन गेल्या होत्या. या शाळेची कल्पना त्याचीच. अनाथ, अत्याचार झालेल्या मुलांसाठी शाळा. अशा प्रकारच्या शाळा कार्यरत आहेत की नाही याची त्यांना कल्पना नव्हती आणि असल्या तरी एकदा काम सुरु झालं की तिथेही वेगवेगळे प्रयोग सुचतील, मार्ग सापडतील असं त्यांना वाटत होतं.  सर्वसामान्य जीवन जगण्याची संधी अशा मुलांना मिळावी या इच्छेने त्यांना झपाटलं. समाजसेवी संस्थाना भेटून नवर्‍यानेच या शाळेची माहिती, जाहिरात केली. शाळेची जागा म्हणजे घराच्या मागच्या बाजूला असलेली एक खोली. मुलं वाढली की नंतर त्या जागेबाबतचा निर्णय घेणार होत्या.   व्याप वाढतोय असं वाटेपर्यंत मानसोपचारतज्ञ सुमा मदतीला आली, मीनाताईंबद्दल कुठेल्यातरी संस्थेनेच तिला माहिती दिली. एक दोनदा शाळेत येऊन तिने त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. एक, दोन म्हणता म्हणता सहा, सात मुलं होती आता. सगळी मुलं झोपडपट्टीतली. रोजच्या रोज मार खाणारी, शिवीगाळ करणारी, सेवाभावी संस्था मागे लागल्या की अधूनमधून शाळेत जाणारी. आला दिवस काय वाट्टेल ते करुन ढकलणारी. सतरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरातून त्यांना बाहेर कसं काढणार आणि आई वडिलांना सोडून ती तरी येतील का? जिथे घरातच त्रास होतो त्या मुलांचं काय करायचं? त्यांची कायमची व्यवस्था करता येईल का?  शाळा सुरु झाल्यावर या प्रश्नांच्या अंगाने त्यांनी खूप माहिती जमविली होती. त्यातूनच परदेशातल्या एका संस्थेचं काम त्यांच्या मनात खोलवर रुतलं होतं. सरकारने अशा मुलांचा ताबा घेतला की या संस्थेचं काम सुरु होई. पहिल्या काही दिवसात ते मूल तात्पुरत्या पालकांकडे पाठविलं जाई. नंतर मीनाताईंसारखे समाजसेवक त्या मुलाशी, पालकांशी, मुलाच्या शिक्षकाशी बोलून त्या मुलाने परत त्याच्या पालकाकडे जावं, का त्याचा ताबा इतर कुणाला मिळावा ते ठरवत. मुलाची बाजू कोर्टात मांडत. अशा समाजसेवकांना विशेष समाजसेवक म्हणूनच ओळखतात. मुलाची बाजू मांडणं हेच त्या समाजसेवकाचं काम. त्यासाठी विशेष समाजसेवकाला वकिल, मुख्य समाजसेवक, न्यायाधीश यांच्याबरोबर संवाद साधावा लागे. इतकं सगळं आपल्या देशात करता येईल की नाही याचा त्यांना अंदाज येत नव्हता पण त्यातूनच अशा मुलांना काही दिवसतरी आपलं मानतील असे पालक शोधायची कल्पना मीनाताईंना सुचली. मुलांना वेगळ्या वातावरणाची सवय होईल. त्यामुळे कदाचित मुलं आपलं घर बदलण्याचा प्रयत्न करतील. मानलेले पालक. फार नाही पण थोडीफार लोकं तयारही झाली या निराळ्या प्रयोगासाठी. प्रयोग चालू असतानाच बर्‍याच गोष्टी उमजत जाणार होत्या, तसतसे बदल केले जाणार होते.

अनिता त्यांच्यापुढ्यात काहीतरी घेवून आली तशा मीनाताई तंद्रीतून बाहेर आल्या. आता कशी थोडीशी सावरल्यासारखी वाटत होती, चेहर्‍यावर हलकसं हसू. मीना ताईंना बरं वाटलं. त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटलं. ती परत अभ्यासाला लागली. सुमाने मुलांचा ताबा घेतला होता, त्यामुळे आता काही काम नव्हतं. प्रत्येक दिवस म्हणजे नवीन परीक्षा. या मुलांचं वागणं समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी दरवेळी आज अनिताचं जे झालं तस काही झालं की,  परिस्थितीत बदल झालेला कसा  पहायला मिळेल, काय करावं लागेल तो मार्ग शोधण्याचा वेध लागायचा. थोडा निवांत वेळ मिळाला तसं त्यांनी समोरचं वर्तमानपत्र पुढे ओढलं. वाचता वाचता एका बातमीने त्यांचं लक्ष वेधलं. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी एका शाळेने पारंपारिक खेळाचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा नाही तर फक्त तुमच्या कलागुणांचं कौतुक करण्याचा एक प्रयत्न असंच शीर्षक होतं. आलेल्या अर्जातून ती शाळा ५ शाळा निवडणार होती. हा कार्यक्रम पहायला मान्यवर व्यक्तिंची, प्रयोगशीलतेला महत्त्वं देणार्‍या सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती लाभणार होती. मीनाताईंनी ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली. घ्यावा का यात भाग? शाळा सुटायची वेळ झाली तरी घरी परतताना त्या प्रश्नानेच त्यांचा पुढचा दिवस खिळून ठेवला.

"घ्यायला हवा तुमच्या शाळेने भाग." मीनाताईंच्या मुलाला त्यांची कल्पना एकदम आवडली.
"अरे, पण काय करणार ही मुलं?" शाळेत एकूण मुलं सहा की सात, ती मुलं नक्की काय करु शकतील याचा अंदाज नाही, खात्री तर कशाचीच नाही.
उत्साहाने काही करायला गेलं आणि नेमकं आयत्यावेळी एखाद्याचं काही बिनसलं तर? शाळेत रहावलं नाही म्हणून मुलांना विचारलंच मी. नाच, कथाकथन, गाणं, चित्रकला, कविता एक ना दोन मुलं वेगवेगळे पर्याय सुचवित होती. सुमा विचार करते म्हणाली. पण खरंच जमेल का हे मुलांना?"
"लेझिम किंवा कवायत अशा खेळांचा का नाही विचार करत.  तो सांघिक प्रकार आहे, पुन्हा बोलावं लागणार नाही."  मीनाताईंना हा पर्याय एकदम आवडला. त्यांनी वर्तमानपत्रातून आलेला अर्ज बाहेर काढला.
"संघाचं नाव घालावं लागेल."
"भरारी" मुलगी पटकन म्हणाली. घरातल्या प्रत्येकालाच ते नाव आवडलं.
"गणवेष?" कुणीच काही बोललं नाही.
"झोपडपट्टीतल्या मुलांकडे कुठला आलाय गणवेष." मीनाताईंच्या आवाजातलं दुःख लपलं नाही.
"मुलींसाठी निळ्या रंगाचा फ्रॉक आणि मुलांसाठी पांढरा शर्ट, खाकी पॅट असं लिही." मुलाने उत्साहाने सुचवलं, त्याच्या बाबा आणि बहिणीनेही मान डोलावली.
"काहीतरीच काय? उगाच कशाला खोटं बोलायचं. आणि तेही मुलांच्या शिक्षकांनीच." मीनाताईंना ही कल्पनाच पसंत नव्हती.
"हे बघ, मुलं झोपडपट्टीतली आहेत हे लिहायची आवश्यकता नाही. खास मुलं एवढाच उल्लेख कर. सहानुभूती मिळून तिथे प्रवेश नको घ्यायला. आणि हे टाळायचं तर गणवेष लिहावाच लागेल. आपली प्रवेशपत्रिका स्विकारली जाईलच असंही नाही. स्विकारली गेली तर बघू गणवेषाचं."
काही न बोलता मीनाताईंनी ती तिघं सुचवतील तसा अर्ज भरुन टाकला. सुमाला दाखवून त्यांनी तो अर्ज पाठवायचा निश्चित केलं. त्या रात्री त्यांच्या घरातली, सुमा, शाळेतली मुलं आणि त्या..., एक भलं मोठं कुटुंब एखाद्या कार्याला सज्ज होतय असच वाटत राहिलं त्यांना.  पुढच्या चार पाच महिन्यात करावे लागणारे अथक परिश्रम, मुलाचं मनोधैर्य वाढविण्यासाठी करावी लागेल ती खटपट, लेझिम, कवायतीसाठी लागणारं साहित्य मिळवण्यासाठी घालाव्या लागतील त्या खेपा....बर्‍याच गोष्टीचं समीकरण जुळवावं लागणार होतं. पण मीनाताईंना खात्री  होती. आता मागे फिरायचं नाही हे त्यांनी मनात पक्क केलं.

घरातली सगळी, सुमा आणि मीनाताई भरुन आलेल्या डोळ्यांनी समोर चालू असलेला आपल्या मुलांचा कार्यक्रम पहात होत्या. लेझिम वाजवणार्‍या सुरेश, महेश, अमर बरोबर अनिता, सुरेखा आणि कमल कवायती करत होत्या. मुलांच्या प्रत्येक हालचालींबरोबर त्यांना शाबासकी द्यावी असं वाटत होतं मीनाताईंना. त्यांच्या खुललेल्या चेहर्‍याकडे पहाताना सार्‍या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. अर्ज स्विकारला गेल्यावर मुलांनी धावपळ करुन गणवेष मार्गी लावले. लेझिमही त्यांच्या मुलांनीच कुठूनतरी जमवले होते. टाळ्यांच्या कडकटाने त्या भानावर आल्या. एव्हांना मुलं धावत खाली आली होती.  मुलांच्या लेखी सुमा आणि मीनाताई हेच त्यांचं कुटुंब.  सुमाला आणि त्यांना, दोघांनाही मुलांनी मिठीच मारली. महेश आणि अमरचे आई-वडील आले होते. ते कौतुकाने मुलांच्या बाईंकडे पहात होते. बाकिच्या मुलांचं  कुणीही  नव्हतं. सुमाच  एकेकाला घरी नेऊन सोडणार होती. सुमा मीनाताईंकडे बघत होती.
"छान होती कल्पना यात भाग घेण्याची. तुमच्या मुलाचंही कौतुक करायला हवं" त्या हसल्या.
"हो, त्या दोघांनी मला मदत करायची म्हणून तयारी दाखविली. पण नंतर माझ्याबरोबर घरातले सगळेच गुंतले. तू तर हक्काचीच. मस्त झाला कार्यक्रम. आपले श्रम सार्थकी लागले. मुख्य म्हणजे मुलांनी छान साथ दिली. बघ, गेल्या दोन महिन्यात अनिताला एकदाही झटका आला नाही की सुरेशची शिवीगाळ ऐकू आली नाही."
"याचाच अर्थ अशाप्रकारच्या कार्यक्रमात त्यांना गुंतवायला हवं. आज तर निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली आहे. असंच पुढे झालं तर कदाचित सामान्य जीवन जगतीलही ही मुलं. नाही का?" मीनाताईंनी सुमाकडे नुसतच हसून पाहिलं. पुढचा विचार आत्तातरी करावासा वाटत नव्हता. हा क्षण त्यांना मनापासून मुठीत धरुन ठेवायचा होता. घरातल्यांनी जीव ओतून त्यांना केलेल्या मदतीचा अभिमान वाटत होता. इथून त्यांच्या घरीच सर्वांनी जायचं ठरलं होतं.

घरी आल्यावर शाळेतल्या मुलांनी ताबा घेतला. मीनाताईंना मदत करायची स्पर्धाच. त्याही कौतुकाने छोटी छोटी कामं सांगत होत्या. खाता खाता मीनाताईंच्या मुलांनी कार्यक्रमाचं केलेलं चित्रिकरण सर्वांनी एकत्रच पाहिलं. फोटो पाहिले. मीनाताई मात्र मुलांच्या चेहर्‍याकडे पहात राहिल्या. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची किल्ली त्यांच्या हाती लागली होती. अपेक्षेप्रमाणे फरक होत गेला, मुलांचा आत्मविश्वास वाढला की खास मुलांच्या शाळेतलं त्याचं शिक्षण संपलं. ही मुलं नेहमीच्या शाळेत जायला लागतील. कदाचित अधूनमधून भेटायला येतील, नाहीतर कधीच फिरकणारही नाहीत. नकोशा भूतकाळाला मनातून पूसूनच टाकतील. नाहीतर खूप वर्षांनी एखाद्या मुलाचं, त्यांची आठवण काढणारं, धन्यवाद देणारं पत्र.... ही त्यांची पहिली मुलं. त्यांना निरोप देणं सोपं नाही जाणार, या मुलांच्या सर्वसामान्य आयुष्याचेही आपण साक्षीदार असायला हवं असं त्यांना तीव्रपणे वाटत होतं. पण ते शक्यं नाही याचीही त्यांना जाणीव होती. मुलं मोठी झाल्यावर सार्‍यांच्या हृदयातलं आपलं स्थान अढळ आहे याची मात्र त्यांना खात्री होती. त्यानी प्रयत्नपूर्वक आपलं लक्ष समोर चालू असलेल्या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाकडे वळवलं. स्वतःच्या फोटोकडे टक लावून बघणार्‍या अनिताला मायेने जवळ ओढलं. बरोबरच्या प्रश्नाला निकराने त्यांनी बाजूला ढकललं,  पण मनाआड केला तरी त्यांच्या खास मुलांसारखा तोही गळ्यात पडलाच. काय दडलं असेल भविष्यकाळाच्या पोटात...?