Thursday, July 22, 2021

अंतराळ भरारीचे कोंदण

 ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या प्रवासी यानाचा अवकाशातील ११ मिनिटांचा
प्रवास अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.  वॉली फंक ही ८२ वर्षांची स्त्री अंतराळवीर आणि नेदरलॅडचा १८ वर्षीय ऑलिव्हर डेमेन. सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अंतराळवीर. जेफ आणि मार्क बेजोस या बंधूसमवेत या दोघांनी अंतराळ सफर केली. 

वॉली फंक नासाच्या (National Aeronautics and Space Administration)  पहिल्या १३ स्त्री अंतराळ प्रवासाच्या प्रशिक्षणार्थीपैकी एक. मर्क्युरी १३ या नावानेही या स्त्री अंतराळवीरांची ओळख आहे. या स्त्रियांनी विविध चाचण्यांतून स्वतःला सिद्ध केलं. काहीवेळा पुरुष अंतराळ प्रशिक्षणार्थींनाही त्यांनी  मागे टाकलं. मात्र नासाने कधीही या स्त्री वैमानिकांना अंतराळात जाण्याची  संधी दिली नाही. याबाबत नासाकडे बोट दाखवलं जात असलं तरी हे प्रशिक्षण नासाचं होतं हा गैरसमज असल्याचं म्हणतात. ज्या चाचण्या नासाने अंतराळवीरांसाठी स्वीकारल्या होत्या त्या चाचण्यांचा जनक लवलेस. लवलेसनी पुरुषांइतकीच अंतराळात प्रवास करण्याची  स्त्रीची क्षमता आहे का हे पाहण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं. शारिरिक, मानसिक, बौद्धिक सार्‍या पातळ्यांवर स्त्रिया पुरुषांइतक्याच अंतराळ प्रवासाला सक्षम आहेत हे  अगणित चाचण्यांच्या आधारे त्यांनी सिद्धही केलं. मात्र नासाने पुढील काही चाचण्यांसाठी लागणारी मदत लवलेसनी विनंती करूनही नाकारली. नासाने स्त्रियांना अंतराळात पाठवण्याचा विचारच केला नव्हता त्यामुळे लवलेसना माघार घ्यावी लागली.   

या प्रशिक्षणात समाविष्ट झालेल्या स्त्रियांचं अंतराळ प्रवासाचं स्वप्न धुळीला मिळाल्यावर त्यांनी आपल्या प्रवासाचा मार्ग बदलला. प्रत्येकीने वेगवेगळ्या क्षेत्रात  पाऊल टाकलं. वॉली फंकनी जग फिरून येण्याचं ठरवलं. काही वर्षांनी त्या वैमानिक झाल्या, विमान चालवण्याचं प्रशिक्षण देऊ लागल्या आणि अखेर अपघातग्रस्त विमानांच्या तपासणीचं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्‍या अडचणींचा अभ्यास करून त्यावर सरकारला उपाय सुचवण्याचं काम त्या करू लागल्या. आतापर्यंत १९,६०० तास त्यांनी उड्डाण केलं आहे तर ३,००० वैमानिकांना प्रशिक्षण दिलं आहे. 

१९६१ साली नासाने स्त्रियांचा विचारही अंतराळकक्षेत जाण्यासाठी केला नव्हता त्यामुळे वॉली फंक आणि तिच्याबरोबरीने प्रशिक्षणात भाग घेतलेल्याचा प्रवास सुरू होण्याआधीच संपला. अखेर नासातर्फे १९८३ साली  सॅली राइड अंतराळात प्रवास करणारी पहिली स्त्री ठरली तरी १९९५ पर्यंत यान चालवण्याची जबाबदारी स्त्रियांवर नासाने सोपवली नाही. एलिन कोलिन्स ही पहिली स्त्री जिने यान चालवलं. एलिनने वॉली फंक आणि इतर स्त्री अंतराळवीरांना या उड्डाणांच्यावेळी आमंत्रित केलं होतं. तब्बल ६० वर्षानंतर वॉली फंक यांचं अंतरिक्षात झेपावण्याचं स्वप्न साकार झालं ते न्यू शेफर्ड यानामुळे आणि जेफ बेजोसनी प्रवासासाठी आमंत्रित केल्यामुळे!

ऑलिव्हर डेमेन या नेदरलॅडच्या १८ वर्षांच्या मुलाला अनपेक्षितपणे ही संधी मिळाली. ब्लू ओरिजिन कंपनीने तिकिटाचा लिलाव बारा जूनला जगभरात सुरू केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १५९ देशांतून ७,६०० लोकांची अंतराळात जाण्यासाठी वाट्टेल तितके पैसे मोजण्याची तयारी होती. बोलीचा आकडा वाढत गेला आणि २८ दक्षलक्ष डॉलर्सला  तिकीट विकलं गेलं. ऑलिव्हर यानंतरच्या यानातून अंतराळात जाणार होता पण आयत्यावेळेला ज्या माणसाने तिकिट जिंकलं त्या ग्राहकाने वेळ जुळत नसल्याने माघार घेतली आणि ऑलिव्हरची वर्णी या पहिल्यावहिल्या प्रवासी यानात लागली. अंतराळात जाणारा सर्वात तरुण मुलगा म्हणून त्याचं नाव नोंदलं गेलं.

उरलेल्या दोन प्रवाशात स्वतः जेफ बेजोस आणि त्यांचा भाऊ मार्क बेजोस.  अपोलो ११ हे यान चंद्रावर गेल्याला जुलै महिन्यात ५२ वर्ष झाली. हाच मुहूर्त साधून आज या व्यावसायिक यानाने यशस्वी अंतराळ प्रवास पार पाडला. या अंतराळप्रवासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अॲमेझॉनचा राजीनामा देणार्‍या जेफ बेजोससाठी आजचं उड्डाण यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्याची चिन्ह आहेत. आता लवकरच पुन्हा हे यान अंतरिक्षात झेपावेल. अंतरिक्षात झेपावण्याची तुमचीही इच्छा असेल तर तुम्हाला फक्त $200,000 किंवा थोडेसे जास्त पैसे भरावे लागतील.

या मोहिमेबद्दल अर्थातच टिकेचं वादळही उठलं आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणूकीला उभ्या राहिलेल्या बर्नी सॅन्डर्सनी आपली नाराजी आधीच तीव्र शब्दात व्यक्त केली आहे. ’पृथ्वीवरच्या सर्वात श्रीमंत गणल्या जाणार्‍या अमेरिकेसारख्या देशात लोकांना रोजच्या उदरनिर्वाहाची भ्रांत आहे, वैद्यकिय उपचार घेण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाहीत पण त्याचं कुणाला काय? जगातली  श्रीमंत व्यक्ती अंतरिक्षात झेपावली आहे. अब्जाधीशांनी करही तेवढाच भरला पाहिजे.’ अशा अर्थी त्यांनी ट्विट केलं आहे.

बेजोसना मात्र भविष्यकाळाकडे नागरिक आणि प्रजातीचा दृष्टिकोन ठेवून म्हणून पाहण्याची आवश्यकता वाटते. आज आपण जे करतोय तो पुढच्या पिढीसाठी अंतरिक्षात काम करण्याचा पाया असेल आणि पृथ्वीवरच्या समस्या त्यामुळे काही प्रमाणात सुटतील असं त्यांना वाटतं.

२० जुलैच्या यशस्वी अंतराळ सफरीनंतर नवं क्षेत्र जेफना खुणावत असलं तरी जेफ बेजोसना तीव्र स्पर्धेलाही तोंड द्यावं लागणार आहे याची चिन्ह कधीच दिसू लागली आहेत. स्पेसएक्सचे इलॉन मस्क, व्हर्जिन गलॅक्टिकचे रिचर्ड ब्रॅनसन यांनी आधीच एक पाऊल पुढे टाकलेलं आहे.  गेल्याच आठवड्यात रिचर्ड ब्रॅनसननी अवकाशात झेप घेतली होती. तेही त्यांच्यावर होणार्‍या टिकेला तोंड देताना, त्याचं ध्येय मंगळावर मनुष्यवस्तीला हलवण्याचं असल्याचं सांगतात. मनुष्य हा एकाच ग्रहावरचा प्राणी असता कामा नये असं त्यांना वाटतं. 

आणि आजच ब्लू ओरिजिनाने  तिकिटविक्रीतून आलेल्या २८ दशलक्ष डॉलर्सपैकी १९ दशक्षलक्ष डॉलर्स अंतराळ संबंधित सेवाभावी संस्थांना देण्याचं जाहीर केलं आहे. यातील एक संस्था आहे अॲस्त्राफिमेना (AstraFemina) इथे संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील स्त्रिया एकत्रितपणे काम करून मुलींपुढे आदर्श उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

ब्लू शेफर्ड अंतरिक्षात झेपावून ११ मिनिटात परतही आलं. त्यातून प्रवास केलेल्या चौघांना एका अविस्मरणीय अनुभवाची सफर घडली. सर्वसामान्यांना थेट प्रक्षेपणाचा आनंद अनुभवता आला.  कितीही टिका झाली तरी आता गर्भश्रीमंतांना अंतराळाचा रस्ता खुला झाला आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी अशावेळी ८२ वर्षाच्या  वॉली फंकला तिच्या अथक प्रयत्नांचं, चिकाटीचं फळ ६० वर्षांनी का होईना मिळालं यात आनंद मानायला हवा, साजरा करायला हवा, वय हा नुसता आकडा आहे हे खर्‍या अर्थी सिद्ध करणार्‍या या तरुणीला मानाचा मुजरा आणि पुन्हा पुन्हा अंतराळात झेपावण्याच्या तिच्या कामनेला पूर्तीची सदिच्छा!

सकाळमधील लेखाचा दुवा:

https://www.esakal.com/global/jeff-bezos-space-trip-11-minutes-know-details-ssy93

Thursday, July 15, 2021

लेखक तुमच्या भेटीला

बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात मला भेटायला नक्की या.
भारतीय वेळ -  शनिवार, १७ जुलै, रात्री ९:३० वाजता. 
अमेरिका - शनिवार, १७ जुलै, सकाळी ११ CST.