Thursday, July 25, 2013

तुझं माझं जमेना...

(बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या (BMM) स्मरणिकेतील माझा विनोदी लेख)


 "आई  रात्रभर गाडीत राहायचं? कसली मज्जा येईल."
"अगं हरवलो आहोत आपण. मजा कसली सुचते आहे तुला." माझ्या सुरावरून नूराची कल्पना आलीच तिला. तितक्यात फोन वाजला. न पहाता नवर्‍याचाच असणार या खात्रीने नेहमीप्रमाणे खेकसले,
"काय हेऽऽऽ? किती वेळा फोन केला."
"मॅम..."
"ऑ...?" नवरा नाही हा. माझे पुढचे शब्द घशात अडकले.
"कॉलिंग फ्रॉम एटी. अ‍ॅन्ड टी." कोणतीतरी नवीन योजना असणार.
"धिस इज नॉट द राइट टाइम टू कॉल मी." मी घाईघाईत म्हटलं.
"मॅम..." आवाजातल्या गोडव्याला दाद देण्याची मन:स्थिती नव्हतीच.
"सर, आय अ‍ॅम नॉट इंटरेस्टेड." धाडकन फोन आपटला.
"आई, तू बाबाशी बोलतेस तशी ओरडलीस त्या काकावर."
"बरोबर, त्या काकालापण वाटलं असेल, चुकून बायकोला फोन केला की काय." मुलगी खदखदून हसली.
आरशातून तीक्ष्ण कटाक्ष फेकला तसं तोंड वाकडं करत तिने खिडकीकडे नजर वळवली.
दोन मैलाऐवजी बावीस मैल प्रवास करून शेवटी चुकून दोघी आपोआप घरी पोचलो.
"जी. पी. एस. न्यायचा. स्मार्ट फोन घे म्हणून कधीचा सांगतोय." नवर्‍याचं हल्लीचं नवीन अस्त्र बाहेर आलं. ते न लागल्यासारखं केलं, पण नकळत मन पार मागे, नकाशे घेऊन गाडीत बसायचो तिथपर्यंत पोचलं.

"कॉम्प्रमाईज विथ देम"
"सॉरी, नो कॉम्प्रमाईज. इफ यू वॉट यू कॅन कॉल द अ‍ॅथॉरिटी"  मोटेल व्यवस्थापक आणि टॅक्सी चालकाचा वाद चालू होता. सॅनफ्रनस्किस्को ते सॅटारोझा असं टॅक्सीचं भाडं दोनशे डॉलर्स झालं होतं. चालक दिडपड मागत होता तर मोटेलचे व्यवस्थापक नियमाप्रमाणे घ्यायला सांगत होते.  दोनशे म्हटल्यावर माझ्या पोटात खड्डा पडला, त्याचे  दीडपट... मनातल्या मनात हिशोब चालू झाला.  भांडण ऐकायचं की हिशोब करायचा? त्यात त्या दोघांच्या  उच्चाराची प्रचंड गंमत वाटत होती. भारतात आम्ही  बिल क्लिंटनचं भाषण लागलं की अपूर्वाईने  ऐकायला बसायचो (नुसतंच पाहायचो) तेवढाच माझा अमेरिकन इंग्लिशशी संबंध त्यामुळे  ’कसे इंग्लिशमध्ये भांडतायत बघ...’ अशा  नजरेने मी नवर्‍याकडे पाहत होते. तो आपला पाकिटातले डॉलर्स पुन्हा पुन्हा तपासत होता.  पाचच मिनिटात पोलिसांची गाडी हजर झाली. आता त्यांच्या ऐटदार पोषाखाकडे पाहत मी मंत्रमुग्ध. हे सगळं असंच चालू राहावं असं वाटायला लागलं.  पण मी कुरकूर न करता उभी आहे हे पाहून नवर्‍याला काहीतरी गोंधळ आहे याची जाणीव झाली.  बायको नक्की कशावर भाळली आहे  या  कोड्याने त्याच्या कपाळावर एक आठी उभी राहिली. आठ्या एकाच्या दोन  आणि दोनाच्या काहीपट व्हायच्या आत सगळं आटोपलं आणि वेगवेगळ्या अर्थी आम्ही तिघांनी निःश्वास सोडले.

अमेरिकन  भूमीवरच्या या पहिल्या प्रसंगाची उजळणी करत मोटेलच्या मऊ  गाद्यांवर अंग टाकलं. सकाळी खिडकीतून बाहेर पाहिलं. कार्ट पडलेली दिसली.  अमेरिकेत गाड्या जुन्या झाल्या की रस्त्यावर टाकून देतात हे  लहानपणी ऐकलं होतं तेव्हापासून आपण त्यातली एखादी उचलून आणावी असं वाटायचं. मी नवर्‍याला जोरात हलवलं.
"काहीतरी हातगाडी सारखं पडलंय बघ. आपण आणू या?"
"अं...काऽऽऽय?" असं काहीसं पुटपुटत त्याने कूस वळवली.
" इकडे लोकं गाड्या टाकून देतात ना, तशी गाडी असावी असं वाटतंय. जरा वेगळीच आहे पण आणते मी."  त्याचं घोरणं म्हणजे मूक संमती असं माझं सोयीस्कर गृहीतक. कुणी बघत नाही हे पाहून पहिली ’चकटफू’ गाडी मोटेलच्या दारासमोर लावली.  त्याने ती पाहिली आणि हबकलाच,
"अगं ही सामानाची गाडी आहे. तुला कसं बसता येईल यात? आणि ते फुकट बिकट सोडा आता."  तो चांगलाच चिडलेला.
"मग सामान आणू यातून." वैतागाने त्याच्या तोंडातून शब्दही फुटेना. राग आला, नक्की काय करावं ते कळत नसलं की तो मूक धोरण स्वीकारतो. कार्ट घेऊन आमची वरात थोड्याच वेळात बाजारात  निघाली.

रस्त्यात माणसं फार नव्हतीच पण गाडीतली लोकं कुतहलाने आमच्याकडे पाहतं होती.
"भारतीय नसावेतच इथे. सगळे पाहतायत." मला एकदम माधुरी दीक्षित झाल्यासारखं वाटत होतं. नवर्‍याला असं कधी कोणासारखं झाल्यासारखं वाटत नाही. तो कायम तोच असतो.
"तू  भुरळल्यासारखी चालू नकोस. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो परदेशात येऊन हे विसरू नकोस."
 "चालते आहे की नीट."
"हवेत असल्यासारखी चालते आहेस."
"मी नेहमी तशीच चालते, शाळेत उड्या मारत चालते म्हणायचे मला."
"इथे नका मारू तशा उड्या."
"आधी माहीत होतं ना कशी चालते ते? मग..." विषय वेगळ्या दिशेने वाहू लागला तो पर्यंत  दुकानापाशी आलो म्हणून थांबावं लागलं आणि त्या नजरांमधला छुपा अर्थ कळला. इतर लोकं कार्टमधून सामान आणून गाड्यांत भरत होते. जिथे तिथे कार्ट आवाराच्या बाहेर नेऊ नका असं लिहिलेलं. मग ती कार्ट आमच्या मोटेलपर्यंत कशी पोचली? कुणीतरी माझ्यासारखंच.....?

कार्ट सोडून देताना जड झालं मन. परत निघालो तेव्हा लक्षात आलं की रस्त्यात तुरळक दिसणारी माणसं तोंडभरून हसतात.  इकडे तिकडे बघत आपलं लक्षच नाही असं भासवत ओळखीच्या लोकांनाही टाळण्याची स्वदेशातली कला इथे उपयोगी पडणार नाही. आधी अवघडल्यासारखं, मग जिवणी ताणून चेहर्‍यावर मोकळं हास्य ठेवत मोटेलमध्ये पोचलो. पण तोपर्यंत तोंड इतकं दुखायला लागलं की हुप्प करून गप्प राहावंसं वाटायला लागलं.  नवरा मात्र एकदम खूश होता. सारखं आपलं, रस्त्यावर रस्त्यावर चल... सुरू झालं त्याचं.

दुसर्‍या दिवशी नवर्‍याचा मित्र आला. तोही नवीनच होता  पण जुना झाल्यासारखा वागत होता.  रस्ता ओलांडायचा धडा देणार होता. आम्ही, आणि त्याने पकडून आणलेले एक दोन नवखे त्याच्या मागून निघालो. रस्ता ओलांडण्याच्या जागी आलो आणि त्याने कॉग्रेसच्या पुढार्‍यासारखा हात वर केला 'थांबा'.  सगळे पावलांना ब्रेक दाबल्यासारखे जागच्या जागी खिळले.
एकदम पावलं जड झाली. भरधाव वेगाने धावणार्‍या मोटारी, रस्त्यावर कर्फ्यू असल्यासारखा माणसांचा शुकशुकाट आणि लाल, पिवळा, हिरवा असे झटपट बदलणारे दिवे; रस्ता फक्त वाहनांसाठीच चा सूर लावून दटावतायत असंच वाटत होतं. यातून पलीकडे जायचं कसं? मित्राने खाबांवरचं बटण दाबलं.  माणसाची आकृती दिसायला लागली. टेचात, त्याने आता निघा अशी खूण केली. मी लांब उडीच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखी रस्त्यावर उडी टाकली. माझ्या मागून बाकीच्यांनी चार पावलं टाकली आणि भयाने  थरकाप उडाला. लाल हात डोळे मिचकावल्यासारखा थांबण्याची खूण करायला लागला. नजर टाकू तिथे  चारी बाजूने खदखदा हसणार्‍या गाड्या आमच्याकडे पाहतं उभ्या. आता काय करायचं? मागे जायचं की पळत पुढे? आमच्यातले निम्मे आले तसे मागे गेले, उरलेले धावत पुढे. मी थोडं मागे पुढे केलं आणि  नवर्‍याच्या मागून पुढे धावले. पलीकडे जाऊन मागे गेलेले परत येतील याची वाट पाहत उभे राहिलो, तितक्यात पाहिलं की आमच्याबरोबर रस्त्यावर उतरलेली  अमेरिकन माणसं हलत डुलत मजेत येत होती.
त्यांच्या त्या हलत डुलत चालीचं रहस्य कळायला मात्र बरेच दिवस लागले. तोपर्यंत वॉकिग सिग्नल दिसला  की अरे, चलो, चलो म्हणत आम्ही सगळे धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखं पळत सुटायचो. कधीतरी  वाहन चालनाचा परवाना वाचताना  कळलं की लाल हात डोळे मिचकावायला लागतो ते रस्त्यावर पाऊल न टाकलेल्यांसाठी. हे कळल्यावर मग आम्हीही कुणाच्या बापाचं काय जातं थाटात......चालायला लागलो.

मोटेलचे दिवस संपले आणि अपार्टमेंटमध्ये राहायला आलो. मोठा प्रश्न पडला, या घरात कपडे वाळत कुठे घालायचे? इथली माणसं काय करतात कोण जाणे. सारखी मेली स्विमिंग पुलामध्ये धपाधप उड्या मारताना तर दिसतात. यांच्या ओल्या कपड्याचं काय? बाल्कनीतून स्विमिंग पुलाजवळ अर्धवस्त्र नार्‍यांकडे बघत मी विचारात गुरफटले. तितक्यात ’ हे ’ आलेच.
"स्विमिंग पूल बघायचाय?" माझा खोचक प्रश्न.  पण तो माझ्या बाजूला उभा राहून  निसर्ग सौंदर्य पाहण्यात इतका मग्न झाला की प्रश्न त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. ती संधी साधून म्हटलं,
"कपडे धुवायचे आहेत."
"मी आणतो ना धुऊन."
"तू?" मी नुसतीच अवाक होऊन पाहत राहिले. स्विमिंग पूल  दारूसारखा चढला की काय?
"अगं पुलाच्या बाजूलाच असतं यंत्र कपडे धुवायचं. तिथे येतात धुता."
"तरीच" मी माझ्या नजरेत ’तरीऽऽऽच’  मधला भाव आणला.
"अरे पण पैसे, आय मीन डॉलर्स?"
"पंचाहत्तर सेंट मध्ये कितीही कपडे धुता येतात."
"बाप रे, मग रांगच असेल मोठी"
"यंत्र नाही गं यंत्रे असतात तिथे."
"बरं बरं कळलं." असं म्हणत मी भारतातून आणलेली सगळी पोतडी रिकामी केली.
"एवढे कपडे?" तो दचकलाच ढीग पाहून.
"७५ सेंट मध्ये कितीही धुता येतात ना?" तो कपडे घेऊन घाटावर म्हणजे... यंत्राच्या दिशेने गेला.

मी जेवणाच्या तयारीसाठी आत वळले.  पोळीसाठी कुणीतरी ऑल परपज फ्लॉवर मिळतं ते वापरायचं म्हणून सांगितलं होतं. आम्हीही बिनदिक्कत पोतंच आणलं. मी खा किती खायच्या त्या पोळ्या या थाटात आणि नवरा घे गं बाई तुझी एकदाची कणीक या आनंदात.  त्याच उत्साहात मी ते पोतं उघडलं.
’अगं बाई इकडची कणीक पांढरीशुभ्र असते की काय?’ अमेरिकेचं सगळंच बाई पांढरं या कौतुकात मी पिठाकडे पाहत राहिले, विचारायला कुणी नव्हतं म्हणून पिठालाच विचारल्यासारखं. पाणी घातलं तर त्या पिठाचं पिठलं झालं. पोळ्याऐवजी आंबोळ्या मिळाल्या आणि आम्ही आपले, नाहीतरी आंबोळ्या होतच नाहीत फारशा तर खाऊया आता असं दोन महिने ते पीठ संपेपर्यंत म्हणत राहिलो.

घरात रुळलो तसे काही वर्षांनी बाहेरच्या जगात रुळायचा ध्यास लागला आणि मी अमेरिकेतल्या शाळेत बदली शिक्षक (Substitute) म्हणून शिकवायला जायचा बेत जाहीर केला. खिजवल्यासारखा हसला नवरा. तिकडे केलं  दुर्लक्ष पण मुलगा म्हणाला,
"आई, तू गणित शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"तुला काय करायचं आहे?"
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
 पहिले धडे नाण्याचे घ्यावे लागणार हे लक्षात आलं. नाणी पुठ्ठ्यावर चिकटवून खाली नावं लिहिली. मुलांसमोर फजिती नको.

पहिला दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच? मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला, "तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."

निमूटपणे मी त्याचा वर्ग टाळला. दुसर्‍या दिवशी थेट संगीताच्या वर्गावर.  सारेगमप ही मला कधी सुरात म्हणता आलं नाही तिथे मी काय संगीत शिकवणार आणि तेही इंग्लिशमध्ये.
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
धक्काच बसला, माझं काम वेळ मारून नेणं होतं.  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुण्णाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची.
रागारागातच वर्गात  सूर लावला. दिवसभर भारंभार मुलं येत होती संगीत शिकायला.  आऽऽऽऽ लावता लावता थकून जायला झालं.  कुणी काही विचारलं की थातूर मातूर उत्तरं देऊन भागत नाही, उलट सुलट विचारत राहतात ही पोरं. एकदा बिंगं फुटतंय असं वाटलं तसं एका मुलाला वर्गाच्या बाहेर काढलं. तो हटून बसला.
"मिस, मी का जायचं वर्गाच्या बाहेर?"
"मला तोंड वर करून विचारतो आहे कार्टा. जा म्हटलं की व्हायचं बाहेर."  तो हटूनच बसला. कारण सांगितलं तसा शेवटी गेला बाहेर. थोड्यावेळाने एक उंच शिडशिडीत माणूस दारावर टकटक करत.
’हा शिक्षक की पालक?’ विचार मनात येतोय तोच तो म्हणाला,
"बरं दिसत नाही मूल बाहेर, आत घे त्याला."
'बरं दिसायला काय ती झाडाची कुंडी आहे?'  हे मनातल्या मनात
मी घरात नाही पण बाहेर जरा टरकूनच वागते. तू कोण सांगणारा वगैरे न विचारता मुकाट्याने त्याला आत घेतलं. नंतर कळलं की शाळेचा प्रिन्सिपॉल होता तो किडकिड्या.

त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी, कारण इतकं सगळं होऊनही त्या शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली होती. मुलं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले.

सगळी गोरी मुलं मला तरी सारखीच दिसतात.  त्यामुळे एखाद्या भारतीय मुलाला मी माझं ’लक्ष्य’ बनवायची मैदानावर जाताना.  तिथेही थोडाफार गोंधळ होतोच. सगळी दाक्षिणात्य मुलंही मला एकसारखीच वाटतात.  त्या दिवशी मुलांना खेळायला घेऊन गेले मैदानावर. कसं कोण जाणे पण बाहेर जाताना नेलेली मुलं आत येताना बदलली. ती सुद्धा मुकाट्याने, चलाऽऽऽ म्हटल्यावर रांग करून उभी राहिली आणि आली आपली माझ्याबरोबर. वर्गापाशी पोचल्यावर कुणाचं तरी धाडस झालं,
"मिस...."
"मिस एम" माझ्या नावाची आठवण करून दिली मी.  नुसतं मिस काय...., आदर  म्हणून नाही कार्ट्यांना.
"आम्ही तुमच्या वर्गातली मुलं नाही."
"ऑ?" मला पुढे काय बोलावं ते कळेना. दातखिळी बसल्यागत विचारलं,
"मग माझा वर्ग कुठे आहे? आणि तुमच्या शिक्षिकेला कळलं नाही तुम्ही माझ्याबरोबर निघालात ते?"
"ती सुद्धा तुमच्यासारखीच आहे."
काळजातली धडधड लपवीत विचारलं,
"म्हणजे बदली शिक्षक का?"
"हो."
 हुऽऽऽऽश
आम्ही दोघी बदली शिक्षिकांनी परत मुलांची अदलाबदल केली.

रडत खडत मी बदली शिक्षिकेचं कार्य पार पाडत होते. घरी आले की नवरा आणि मुलगा जादूच्या गोष्टी ऐकायला तयार असल्यासारखी सज्ज असायची. नवरोजी चहाचा आयता कप हातात देत श्रवण भक्तीला तयार. रोज एका चहाच्या कपावर इतकी करमणूक?  त्यांना त्याची फार सवय व्हायला लागली तसा त्यांचा तो आनंद माझ्या पचनी पडेना त्यामुळे एक दिवस हे शिकवण्याचं महान कार्य सुरू केलं तसंच ते बंदही केलं ते दुसर्‍या साहसाला सुरुवात करण्यासाठी.

चाचपडत पावलं टाकायला सुरुवात केलेली ही भूमी आता आम्हाला आमचीच वाटते. नवर्‍यासारखं नातं आहे माझं आणि अमेरिकेचं. म्हणजे, तुझं नी माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना....आम्ही अमेरिकेला ढीग नावं ठेवू पण भारतातले नातेवाईक, मित्रमंडळी  अमेरिकेबद्दल वेडंवाकडं बोलले की नकळत मुलांची कड घेतो तशी या ही देशाची घेतली जाते. असे हे इथले ऋणानुबंध, मायदेशाइतकेच घट्ट!