Wednesday, January 15, 2014

जोडीदार


मीरा नेहमीच्या सवयीने धावत धावत रुग्णालयाच्या पायर्‍या चढली. कोपर्‍यातल्या तिच्या छोट्याश्या खोलीकडे ती वळणार तेवढ्यात चढलेल्या आवाजाने तिची पावलं थबकली.
"तुम्हाला आत जाता येणार नाही. मी शेवटचं सांगतेय." नर्सच्या आवाजात ठामपणा होता.
"जाता येणार नाही म्हणजे काय? माझ्या जीवाभावाचं माणूस अंतिम घटका मोजतंय."  एव्हांना त्याच्या सहनशक्तीपलिकडे  गेलं होतं सगळं.
"अहो पण फक्त जवळचे नातेवाईकच राहू शकतात अतिदक्षता विभागात." नर्सने त्याला पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न केला.
"आयुष्य काढलं आहे आम्ही एकत्र." राग, अगतिकता, दु:ख; सारं काही सामावलं होतं त्याच्या आवाजात.
"पण कायद्याने काहीही नातं नाही तुमचं. नियमाप्रमाणे असं कुणालाही नाही सोडता येत आम्हाला. मला माफ करा पण नाही काही करू शकत मी." त्याच्याशी बोलता बोलता ती काहीतरी लिहीत होती.
त्याने संतापाने तिच्या हातातलं पेन ओढलं, इथे त्याच्या जोडीदाराच्या जीवनमरणाचा प्रश्न होता आणि ही बया बोलता बोलता काहीतरी खरडतेय. किती सहजपणे मरणाच्या दारात उभ्या असलेल्या  जीवलगाला भेटता येणार नाही म्हणून सांगतेय. दोन तुकडे करत ते पेन त्याने तिच्याच चेहर्‍यावर भिरकावलं. ती ताडकन उभी राहिली. संतप्त, रागाने थरथरत. तिथलं वातावरण बदललं. सगळ्या नजरा त्याच्यावर स्थिरावल्या.
"सिक्युरिटी, सिक्युरिटी..." घसा ताणून कुणीतरी ओरडलं. कुणीतरी त्याला आवरायला धावलं, पण त्याच्या शरीरात जोर चढला होता, त्या माणसाला मागच्यामागे ढकललं त्याने. आता धावपळ आणखी वाढली. त्या गोंधळातच तो ओरडत होता.
"मी काही गुन्हा नाही केलेला. गेली कितीतरी वर्ष तो आणि मी राहतोय एकत्र. आमचं आयुष्य आम्ही जगत होतो, शांतपणे. आणि हे काय चालवलंय तुम्ही? केवळ कायद्याला आमचं लग्न मान्य नाही म्हणून मी त्याला बघू शकत नाही? त्याच्याजवळ नाही जाऊ शकत? असं नका करू हो. कृपा करा आमच्यावर. आहे कोण दुसरं आम्हाला एकमेकाशिवाय." सुरक्षा अधिकारी धावत आले तसा त्याचा आवेश बदलला. आवाजातली अगतिकता संपली. तो ओरडायलाच लागला. त्या ओरडण्यातला करुणपणा बघ्यांचा जीव हेलावून टाकत होता पण कुणालाच आपण नक्की काय करायला पाहिजे ते कळत नव्हतं.
"नालायक, साले मला पकडताय? पकडा. हाकलून द्या इथून. मरु दे तो एकटा. पोचवा मग तुम्ही त्याला. हे असच होणार आमचं. सांगितलं होतं मी हे त्याला. म्हणायचा, पुढचं कुणी बघितलंय. आला क्षण उपभोगायचा. भविष्याची काळजी सोडून दे. बघ आता काय होतं आहे ते. बाहेर काय चालू आहे ते सांगा रे त्याला कुणीतरी. अरेऽऽऽ, त्याला म्हणावं, झोपलायस का असा, उघड डोळे. डोळे उघड म्हणतोय ना. मी म्हटलं ते कसं खरं ठरतंय ते बघ उघड्या डोळ्यांनी. आणि आमचं नातं काय हे तुम्ही ठरवणारे कोण? कोण तुम्ही? कायद्याच्या गोष्टी सांगतायत." त्याला आवरणार्‍या अधिकार्‍याचा शर्ट त्याने पकडला. टरकवायचा होता तो त्याला. फाटायलाच पाहिजे. तुकडे तुकडे करून भिरकावून देता येईल तो शर्ट. सगळा राग त्या कृतीतून दिसायला हवा. पण हे काय होतंय? हाताची पकड सैल का होतेय? त्याने त्या माणसाचा शर्ट जीव एकवटून पकडला. आधारासाठी. त्याच्या हृदयात कळ उठली. काही केल्या आवाज फुटेना. संपलं सगळं. त्याचं त्यालाच ते जाणवलं. चेहर्‍यावर तीव्र वेदना पसरली. छातीवर हात दाबत तो कोसळला. डॉक्टर, नर्स, तिथे असलेले सगळे त्याच्यादिशेने धावले.

मीरा खोलीकडे वळता वळता त्याच्या आवाजाने थांबली होती. डोळ्यातलं पाणी निपटत ती तशीच उभी राहिली. गोठल्यासारखी. सगळं शांत झाल्यावर तिची पाऊलं नकळत त्याच्या जोडीदाराला ठेवलेल्या खोलीकडे वळली. बराचवेळ ती तिथेच बसून राहिली. उद्या ती त्यालाही भेटणार होती. आजचा दिवस तरी मध्ये जायला हवा. मनाच्या कोपर्‍यात ते दोन पुरुष तिच्या मनात दिवसभर घर करून राहिले.

दुसर्‍या दिवशी ती त्या दोघांच्या ओढीने जरा लवकरच रुग्णालयात आली. खरं तर तिच्या नेहमीच्या वेळेपेक्षा खूपच आधी. खोलीत पाऊल टाकलं आणि समोरचा रिकामा पलंग पाहून तिला भडभडून आलं. निर्वासीत म्हणून गेला असेल की आलं असेल कुणी? आता याच्या जोडीदाराचं काय? त्याला न भेटताच जग सोडलं की ह्याने. कायद्यापुढे माणुसकीला किंमत नव्हती. आता सगळं बदलतंय, कायद्याने अशा लोकांना अधिकार मिळायला सुरुवात झाली आहे ह्या सगळ्या वल्गनाच म्हणायच्या का? का फक्त ते मोठ्या शहरात? लहान गावातली विचारसरणी बदलणारच नाही? आणि हे सगळे नियम, आडकाठ्या माणूस मरणाच्या दारात उभा असताना? तिचा जीव कोंडला. मन गोठलं. त्या रिकाम्या पलंगाकडे पाहत ती तशीच उभी राहिली. हे असं, असलंच काहीतरी शमाच्या वाट्याला येईल की काय? कसं निभावणार मग? शमा आणि मेगनचं भविष्य काय असेल? साठ वर्षाच्या आसपास असलेल्या त्या दोन पुरुषांना आता तिला तिची गोष्ट सांगायची होती. आधार चाचपडायचा होता. एक पलंग रिकामा होता. दुसर्‍याची परिस्थिती काय आहे हे बघायला जायचं धाडस तिच्यात उरलं नव्हतं. त्या दोघांमध्ये तिला शमा आणि मेगनच्या भविष्याचं अक्राळविक्राळ स्वरूप लपल्यासारखं वाटत होतं.

"आई, मेगन आणि मी एकत्र राहायचं ठरवतोय." भूतकाळात जमा झालेली ती संध्याकाळ मीराच्या मन:पटलावर दु:खद छायेसारखी स्थिरावली होती. त्या संध्याकाळी शमाने आपलं मन मोकळं केलं आणि घाला घातल्यासारखे साध्या शब्दांचे संदर्भ बदलले गेले. वातावरण गढुळलं. दवाखान्यातून थकून आलेल्या मीराला सुरुवातीच्या शब्दांनी खूप बरं वाटलं होतं. किती ठिकाणी अर्ज करत होती उच्चशिक्षणासाठी शमा.
"मिळाला दोघींना एकाच कॉलेजमध्ये प्रवेश?" तिने उत्साहाने विचारलं.
"छान झालं. तुम्ही दोघी एकत्र असलात की आम्हालाही काळजी नाही." माधवनी मीराच्या मनातला विचार शब्दात मांडला.
शमा जराशी गोंधळली. तिला काय सांगायचं होतं आणि या दोघांनी काय समज करुन घेतला होता. एम. एस. च्या प्रवेशाचंच दोघांच्या मनात घोळत होतं तर. पण विषयाला तोंड फोडलं आहे तर बोलून टाकायला हवं या निर्धाराने तिने पोटात उठलेल्या गोळ्याला थोपवलं.
"मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. जे बोलायचं आहे ते इतकं साधं नाही. तुमच्या कल्पनेपलीकडचं आहे. धक्कादायक आहे. पण कधीतरी सांगावं लागणारच. आत्ता वेळ आहे तुम्हाला दोघांना की नंतर बोलूया?" मीराने गोंधळून माधवकडे पाहिलं. ते काही न बोलता शमाकडेच पाहत होते.
"लग्न जमवलं आहेस का तुझं तू? शिकलेला मुलगा असला की झालं. बाकी काही बघायचं नाही ठरवलंय आम्ही. म्हणजे तसंही आहेत कुठे भारतीय लोकं इकडे. फक्त आधी शिक्षण, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे बघायला हवं आणि त्यानंतरच लग्न." खुंटा बळकट करायला हवा म्हणून ती माधवकडे पाहणार तोच शमाचा पांढराफटक चेहरा, अस्वस्थ हालचाली पाहून मीरा घाबरली.
"अगं काही चुकीचं बोलले का मी? तू मेगनबरोबर राहायचं म्हणत होतीस. मी उगाचच लग्नाचा विषय काढला. बोल तू आत्ताच. मला दवाखान्यात चक्कर टाकायची होती पण नाही जात आता. माधव तुम्ही पण बाहेर नका पडू आज रात्रीची चक्कर मारायला."
शमाच्या ओठाच्या कोपर्‍यात कडवट हसू रेंगाळलं. असाच वेळ आधीही माझ्याबरोबर घालवला असता दोघांनी तर, सांगायचा प्रयत्न केला तेव्हा ऐकलं असतं तर....ती अंगं चोरून बागेतल्या आरामखुर्चीवर बसली. रात्रीचे साडेआठ वाजायला आले तरी काळोखाच्या सावल्या गडद झाल्या नव्हत्या. व्हरांड्यात बसलं की लांबपर्यंत नुसतं हिरवंगार रान. ती एका कोपर्‍यातल्या लहानश्या तलावातल्या माशांकडे पाहत राहिली. एरव्ही लयदार, चपळ वाटणार्‍या त्यांच्या हालचाली तिला सैरभैर, कासावीस वाटत होत्या. घराच्या बाजूने जाणार्‍या पायवाटेवरही शुकशुकाटच होता. अवकाश भरून टाकणारी जीवघेणी शांतता आणि भरीला चेहर्‍यावर रोखलेले ते चार डोळे. मनातल्या भितीला घट्ट कवटाळून ती अवघडल्यासारखी बसून राहिली.
"तुला काहीतरी सांगायचं होतं." मीरा बसल्या बसल्या जोरात पाय हलवायला लागली. बेचैन झाली की उजवं पाऊल जोरात हलवत राहायची ती. एवढं काय आहे या दोघींच्या एकत्र राहण्यात वेगळं, का वेळ लावते आहे ही सांगायला?
"मी आणि मेगन एकत्र राहायचा ठरवतोय ते वेगळ्या अर्थी." मनात चमकून गेलेल्या शंकेला तळाशी गाडत काही न कळल्यासारखी मीरा शमाकडे पाहत राहिली. माधवनी खुर्चीचा दांडा हाताने घट्ठ दाबला. पुन्हा एकदा तेच वाक्य शमाने उच्चारलं. तिच्या बोलण्याचा अर्थ एक खोलवर वेदना देत हृदयात घुसला तेव्हा मीराचेच कान शरमेने लाल लाल झाले.
"कायऽऽ? अग तू काय बोलते आहेस ते तुला तरी समजतंय का?" ती किंचाळल्यासारखी ओरडलीच. शरीर घामाने थबथबलं. हातपायाला कापरं भरलं एकदम. पटकन उठत माधवनी आत जाऊन पाणी आणलं आणि गडबडीने तिच्यापुढे फुलपात्र धरलं
"तिला बोलू तरी दे पूर्ण. तू शांत हो आधी. शांत हो मीरा." माधवचा आश्वासक स्पर्श तिला धुडकावून टाकावासा वाटला पण तिने काहीच हालचाल केली नाही.
"तिने ओळखलंय मला काय म्हणायचं आहे ते. मला माफ करा, पण यात बदल करण्याच्या पलीकडे गेलेय मी, म्हणजे आम्ही दोघी. खूप दुखावतेय मी तुम्हाला. मला नव्हतं असं करायचं, खरंच नव्हतं. हे सोपं नाही माझ्यासाठी, अजिबात सोपं नाही तुम्हाला सांगणं..." डोळ्यातलं पाणी गालावर ओघळू न देण्याची पराकाष्ठा करीत शमा अगतिकपणे तिच्या आई, बाबांकडे पाहत राहिली.

चुकार शांततेला बाजूला न सारता माधव मीरा आपल्या तरुण लेकीकडे पाहतं राहिले. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. मीरा इतक्या जोराने पाऊल हालवीत होती की माधवना तिच्या अंगावर खेकसावं असं वाटून गेलं, पण ते नुसतेच तिच्याकडे पाहतं राहिले. या क्षणी समोर बसलेल्या नतद्रष्ट कार्टीला नाहीशीच करावी एवढंच त्यांच्या मनात घोळत होतं. व्यवसायाने वकील होते ते. बघता आलं असतं पुढचं पुढे. आपल्याच विचारांची माधवना लाज वाटली. पोटच्या गोळ्याबद्दल असे विचार यावेत? स्वतःलाच दोन चार मुस्कटात माराव्यात असं वाटलं त्यांना. निराश मनाने, शरमेने खुर्चीवर डोकं मागे टेकून ते तसेच बसून राहिले. शमाला राहवलं नाही.
"काहीतरी बोला तुम्ही दोघं. रागवा, चिडा, पाहिजे तर दोन थोबाडीत द्या, मारा, अगदी लाथाबुक्क्यांनी तुडवलंत ना तरी चालेल. पण काही तरी बोला, काहीतरी बोल ना तू आई." शमाने आईच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न केला. पण मीरा तशीच बसून राहिली. शमा अवघडली. आईच्या देहबोलीतून बोचकारणारा परकेपणा डोकावत होता. असं होवून नाही चालणार. होतं कोण तिला त्या दोघांशिवाय. शमाने चिकाटीने आपलं डोकं तिच्या मांडीवर टेकवलं. मीराने हळुवारपणे तिच्या केसातून हात फिरवला. पण आपण काहीतरी चुकीचं करतोय असं वाटलं तिला. या स्पर्शाने शमाच्या कृतीला पाठिंबा देतोय असं वाटलं तिला तर? ती तटस्थ झाली. हरवलेल्या नजरेने भिंतीकडे पाहत राहिली. आईच्या मांडीत डोकं खुपसलेल्या शमाला हुंदके आवरता येत नव्हते. आई जवळ घेईल, बाबा आपलं मन समजून घेतील असं वाटलं ते चुकीचं होतं या भावनेने तिला फार एकटं वाटायला लागलं. ओठ चावत ती तिच्या भावना आवरायचा प्रयत्न करत होती. वर मान करून त्या दोघांकडे पाहायचंही धाडस होत नव्हतं. माधवनी पुढे होत शमाच्या हातावर हात ठेवला.
"आता आणखी काय बोलायचं आहे शमा तुला? तुझ्या त्या एका वाक्यात बरंच काही बोललीस बेटा तू. तुझा ठाम निर्णय अंगावर कोसळलाय आमच्या. हा प्रसंग कधीतरी येणार, आई वडिलांना हे सांगावं लागणार याची तू तयारी केलीस. पण आमचं काय? अनपेक्षित विचित्र धक्का बसल्यावर लगेच काय मत व्यक्त करणार बेटा आम्ही? तू असं भलतंच काहीतरी ठरवशील अशी स्वप्नातही कल्पना नव्हती."
माधवच्या बेटा संबोधनाने शमाचा जीव शांत झाला. बाबांना तिची खूप काळजी वाटायला लागली की हमखास त्यांच्या तोंडून येणारा हा शब्द. ती एकाएकी मोकळी झाली. या निर्णयाला पोचेपर्यंतची तगमग या क्षणाला सांगून टाकावी असं आतून आतून वाटलं तिला. हीच वेळ आहे सांगायची. आत्ता नाहीतर कधीच नाही जमणार. ती शब्द जुळवणार तेवढ्यात माधवच बोलले.
"बेटा तुझ्या बोलण्यावरूनच कळतंय की खूप दिवस घेतले असशील तू निर्णय घ्यायला आणि त्यावर आता ठाम आहेस तू. पण काही दिवस दे आम्हाला. आपण तिघं बोलू, त्यातून काही निष्पन्न झालं तर ठीकच. मेगनशीही बोलू दे तुझ्या आईला."

शमाने गप्प राहायचा आटोकाट प्रयत्न केला. आत्ता फटकळपणे काहीतरी बोलून तिला तिच्या आई, बाबांना दुखवायचं नव्हतं. इतक्या वेळा आडून आडून त्यांना सांगायचा केलेला प्रयत्न, तिच्या वागण्यावरुन त्यांना काहीतरी शंका येईल आणि विषयाला तोंड फुटेल, कदाचित त्यातूनच काहीतरी मार्ग निघेल ह्या अपेक्षा फोल ठरल्या होत्या. किती वर्ष, किती दिवस वाट पाहिली होती तिने. आता आज शेवट करायचा होता याचा. आहे त्या स्थितीत बदल घडावा म्हणून त्यांनी प्रयत्न करावेत असं तिला मुळीच वाटत नव्हतं. आणि तशा भ्रमात त्यांना राहू देणंही तिला उचित वाटत नव्हतं. कशाला बोलायचं आहे मेगनशी ह्यांना? आम्हाला एकत्र राहण्यापासून परावृत्त करायला? ते नाही आता शक्य. हीच वेळ होती बोलून टाकायची. आहे ती गुंतागुंत अधिक नाही वाढू द्यायची. तिचा निश्चय उद्धटपणा न वाटता आई, बाबांना कळायला हवा होता. पण उशीर झालाच.
"फार लवकर सुचलं तुम्हाला हे." असं बोलायचं नव्हतं तिला. असं बोलून आई, बाबांना दुखवायची तिची इच्छा नव्हती. पण फेकलेला बाण आता परत घेता येणार नव्हता. परिणामांच्या भितीने शरीरभर भितीची लाट हेलखावे खात राहिली. तिला एकदम कोंडीत सापडल्यासारखं वाटलं. माधव वाचत होते ते वर्तमानपत्र समोरच पडलं होतं. तिने त्यात डोकं खुपसलं. अश्रु लपवले. तिच्या शब्दांनी माधवची सहनशक्ती संपली. शमाच्या हातातलं वर्तमानपत्र ओढून त्यांनी तिच्या चेहर्‍याच्या दिशेने भिरकावलं.
"फार लवकर. हो, फारच लवकर सुचलं. हे जे आम्ही राबतोय ते कुणासाठी? एम.एस. करायचं, एम.एस. करायचं हा धोशा आमच्या जीवावरच पार पडला ना? नुसती बघत नको राहू. काय? अं?  हं, हं, बोलू नकोस एक शब्द. उभी आडवी झोडून काढेन. तू नोकरी करतेस, शिष्यवृत्ती मिळते हे सगळं खरं असलं तरी इथलं उच्च शिक्षण तेवढ्यावर नाही पुरं करता येत हे माहीत आहे तुलाही. नोकरी करून दमड्या मिळवता त्या जातात खाणं आणि कपड्यांवर. आता ही थेरं. आजतागायत मला नाही वाटत आमच्या दोघांच्या घराण्यात कुणी केला असेल असला विचित्रपणा. खुळसटपणा काहीतरी. नालायक नुसती. दोन लगावून द्याव्यात असं वाटतंय."

रागाने थरथरत ते उभे राहिले तशी हिरमुसलेली, शरमेने लाल झालेली शमाही उभी राहिली. लहानपणी बाबा उभा राहिले की त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारून ती त्यांना हालूच देत नसे. तेही गुडघ्यावर बसून तिला कुशीत घेत. आत्ताही अलगद बाबांच्या कुशीत शिरावं असं तिला आतून आतून वाटत होतं. पण ती नुसतीच उभी राहिली. कुठून शब्द गेले तोंडातून हे दुःख तर होतच, पण तिच्या निर्णयाची गणना बाबांनी खुळसटपणात करावी याचं तिला फार वाईट वाटत होतं.
पुतळ्यागत बसलेल्या मीराच्या छातीत धडधडलं. बापलेक ताठपणे एकमेकांच्या समोर उभे होते. खरंच थोबाडीत द्यायचा हा माणूस तिच्या. सगळं शांतपणे घेणारे माधव चिडले तर कुठच्या थराला जाऊ शकतात याचा अंदाज होता तिला. लगबगीने ती उठली. माधवना तिने अक्षरशः बाजूला ढकललं.
"तू काय उभी राहिली आहेस मख्खासारखी. कृपा कर आणि जा आता तुझ्या खोलीत. जाऽऽ म्हणते ना लगेच. आपण बोलू नंतर." शमाला तिथून घालवलंच मीराने.
गर्रकन पाठमोर्‍या झालेल्या शमावरची नजर काढून तिने माधवना जबरदस्तीने खुर्चीवर बसायला लावलं. तीही बाजूच्या खुर्चीवर बसून राहिली. शब्दांची काठी नकोशी वाटत होती. मनाला, शरीराला घेरलेल्या त्या विचित्र शांततेत विरून जावं, गुप्प होवून जावंसं वाटत होतं. दोघांनाही.
"फार वाटत होतं गं तिला जवळ घ्यावं, केसातून हात फिरवावेत, पाठीवर थोपटावं. पण शरीर साथच देईना." माधवच्या हताश स्वराने ती खजील झाली.
"चुकलंच माझं. तिला नको होतं खोलीत पाठवून द्यायला. एकदा आपल्याला सांगून टाकल्यावर उन्मळून गेली असेल. आता एकटीच बसेल रडत." मीरा पुटपुटली.
माधवनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तशी ती उजवा पाय हालवीत बसून राहिली.
"तू बोल तिच्याशी. कधी कुठून अशी या विचित्र आकर्षणात ओढली गेली ते विचार तिला."

ते एकदम उठले. तीही मागोमाग धावली. हे चालले की काय तिला विचारायला? पण पायर्‍या वर चढून मागोमाग जाण्याचं त्राण तिच्यात उरलं नव्हतं. ती पायर्‍या चढणार्‍या पाठमोर्‍या माधवना निरखत राहिली. त्यांच्या ओढल्यासारख्या हालचालींनी तिच्या हृदयात कळ उठली. माधव शमाच्या खोलीसमोर उभे होते. वर जावंसं वाटूनही ती जिन्याला धरून तिथेच थिजल्यासारखी उभी राहिली. माधव तसेच उभे राहिलेले पाहून पाहून शेवटी ती हळूहळू पायर्‍या चढायला लागली. दोघही शमाच्या खोलीसमोर उभे होते. आतून जोरात रेडिओचा आवाज येत होता. माधवनी हळूच दरवाजा ठोठावला. उत्तर आलं नाही. ऐकू गेलं नसेल, की दार उघडायचं नाही? का रेडिओ लावून जीवाचं काही बरं वाईट करून घेणार ही मुलगी? मीरा एकदम घाबरली. जोरजोरात दारावर धक्के मारायला सुरुवात केली तिने. रेडिओ बंद झाल्याचा आवाज, पावलांची चाहूल... शमा दाराला टेकून उभी राहिल्याचा अंदाज आला तेव्हा तिच्या छातीतली धडधड थांबली.
"मला नाही बाहेर यायचं आत्ता. उद्या सकाळी बोलेन मी." दारावर डोकं आपटल्याचा आवाज ऐकून दोघांचा जीव तिळतीळ तुटत होता. आत शमा दारालाच टेकून रडत बसली असणार याची खात्री होती तिला. लहान असताना रागावली की बसायची अशीच रडत. दरवाज्याची भिंत मध्ये ठेवून बसलेल्या शमासाठी काय करावं हेच समजत नव्हतं दोघांना. मीरा, माधव पराभूत नजरेने एकमेकांकडे पाहत उभे राहिले. माधवनी मीराच्या बोटात बोटं गुंतवली. दोघही तिथेच दाराला टेकून बसले, कितीतरी वेळ….

आई, बाबांच्या हालचालींचा मागोवा घेत शमा दाराशी बसून राहिली. बराचवेळ. दोघंही आसपास रेंगाळत नाहीत ही खात्री पटल्यावर ती पुन्हा येऊन पलंगावर बसून राहिली. काय नको ते घडतंय हे. चूक का बरोबर ते कळत नाही आणि त्याला पूर्णविरामही देता येत नाही. पण माझ्यासारखी, मेगनसारखी कितीतरी माणसं आहेत या जगात. का लाज वाटून घ्यायची उगाचच. जसं मी स्वीकारलंय तसं आई, बाबांनी स्वीकारलं की सगळं सुरळीत होवून जाईल. दुसर्‍या कुणाची पर्वा करायची गरजच नाही उरणार. जागरूकता वाढतेय या विषयावर आता. पूर्वीही ठेवायची माणसं असे संबंध पण त्यातली शरमेची किनार पुसून टाकायला सुरुवात झाली आहे. शमा पलंगाच्या समोरच्या भिंतीवर लटकलेल्या आरशातल्या प्रतिबिंबाला समजावून सांगितल्यासारखं पुटपुटत होती. मेगनच्या मिठीत स्वतःला मोकळं करायची आस तिला लागली. आई, बाबा फार परके वाटत होते. परग्रहावर असल्यासारखे. त्यांच्या जवळ जायचा जितका ती प्रयत्न करत होती त्याच वेगात तिला त्यांच्यापासून लांब, दूरवर पळावं मेगनपाशी पोचावं असं होवून गेलं. पण शनिवार, रविवार इथे राहून तिला हे सगळं संपवायचं होतं. विषयाला तोंड फुटलं होतं. वर्षानुवर्षांचं मनावरचं दडपण झुगारून देता येईल या नुसत्या कल्पनेने शमाचं मन सैलावलं. वादळ वार्‍यात झोडपल्या सारखा थकवा हळूहळू तिच्या देहावर पसरला. मनातली रुखरुख काट्यासारखी टोचत होतीच. डॉक्टर असूनही आई फक्त आईसारखीच वागली होती. तिच्या मनात आईबद्दल राग उफाळून आला. तिला आईला पत्र लिहावं, आपल्या भावना मोकळ्या कराव्या असं वाटायला लागलं. कागद पुढे ओढत कितीतरी वेळा ती अडखळत शब्द चाचपडत राहिली.
’आई, तू तरी मला समजून घ्यायला हवं होतस. वाटलं होतं तुझा तरी दृष्टीकोन वेगळा असेल. डॉक्टर आहेस ना गं तू.  कदाचित तुला कल्पना असेल. म्हणशील, तुझ्याकडून कधी समजतंय याची वाट पाहत होते. तुला वाटत असेल की मला तुझा चेहरा वाचता येत नाही, भावना कळत नाहीत पण तुझा चेहरा बोलका आहे. शब्दांपेक्षाही बोलका. अशी मुलगी देवाने तुझ्याच माथी का मारावी, ही मुलगी जीव देऊन मोकळी का होत नाही हा भाव वाचता आलाय मला आई. आईला असं पण वाटतं का गं, स्वतःच्याच मुलांबद्दल? तुला जे वाटलं तसं मलाही वाटत असेल याची कल्पना आहे का तुला? या क्षणी वाटतंय की अशी आई मला असण्यापेक्षा ती नसतीच तर बरं झालं असतं. आणि तुला जे वाटलं ना तसं मरून जावं, हा खेळ संपवून टाकावा असं मलाही वाटलंय, खूपदा वाटलय. पण जमलं नाही. नाहीतर नक्की केलं असतं. तुम्ही पण सुटला असतात, हो ना? आणि मगाशी बाबांना थांबवलंस तू. पण शक्य असतं तर तूही मला मार मार मारलं असतस, झोडून काढलं असतस, खरं आहे ना मी म्हणतेय ते?" तिने चिट्ठी पुन्हा पुन्हा वाचली. अश्रुचा पडदा बाजूला करत ती शब्दांची खाडाखोड करत राहिली. आईला हे पत्र द्यावं का नाही हे तिला ठरवता येईना. कागद चुरगळून, बोळा करत तिने पँटच्या खिशात कोंबला. पुन्हा पँटच्या खिशातून काढून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले तिने. रात्रभर ती कूस बदलत राहिली ते सकाळी आई, बाबांशी बोलायचं ठरवूनच.
"फार सुखाने नाही गं ठरवलेलं आम्ही हे. मी आणि मेगन चार वर्षं याच विषयावर बोलतोय. थोडा काळ नाही हा."
"अग पण आमच्याकडे नको होतस का यायला तू आधी?. आणि खरंच तू ते मेगन वगैरे डोक्यातून काढून टाक. किती झालं तरी आपण परक्या देशातले. ही लोकं म्हणजे...."
"काहीही काय बोलतेस आई. तुम्हाला वाटत नसलं तरी मला हाच देश माझा वाटतो.  आणि आई, ही लोकं म्हणजे? मेगन आणि तिच्या घरातले सगळे सुसंस्कृत आहेत. इतके दिवसात हे लक्षात आलं नाही तुमच्या? तिचे बाबा तर भारतीयच आहेत ना? का मेगनमुळे मी बिघडले आहे असं वाटतय तुम्हाला? इतकी साधी गोष्ट नाही ही. आणि त्यांनाही तुला आणि बाबांना झाला तसा आणि तितकाच त्रास झाला आहे, पण  त्या दोघांनी, तिच्या भावाने तिला समजून घेतलं आहे.  पुन्हा नको बोलूस असं त्यांच्याबद्दल."
कुणीतरी चपराक दिल्यासारखी मीरा गप्प झाली तसं  शमाने समजूतीने घेतलं.
"गेली दोन तीन वर्षं मी बाहेर राहतेय. नाही म्हटलं तरी कधी आणि कसं अंतर पडत गेलं ते समजलं नाही. तुला आठवणार नाही कदाचित पण कितीतरी वेळा दिवसातून चार पाच वेळा फोन केले आहेत मी तुला. हेच हेच सांगायचं होतं. पण अभ्यास कसा चाललाय, नोकरी झेपतेय का, खरेदीला जायचं का एकत्र, यापुढे आपली गाडी कधी गेलीच नाही. इतकी स्थळं सांगितलीस तू तरी लग्नाबद्दल मी का उत्सुक नाही हे तू मला विचारलं नाहीस, कधीच."
माधव आणि मीराने एकमेकांकडे पाहिलं. बोलू का नको या संभ्रमात पडलेली मीराच बोलली.
"अगं, बारीकसारीक बाबीतही मी लहान नाही, स्वतंत्र राहते, मला घेऊ दे माझे निर्णय हे तूच सांगितलंस ना दरवेळेस? "
"वाटायचं, तुला कळेल मला काय वाटतंय ते. लहान असताना म्हणायचीस तसं म्हणशील, ’लपवते आहेस तू काहीतरी शमे माझ्यापासून. आई आहे मी तुझी. कळणार नाही असं वाटतंय होय तुला?’ आई, एकदा जरी हे आलं असतं ना तुझ्याकडून तर केव्हाच कळली असती माझी भिती, मरून गेले तर बरं ही भावना." रडायचं नाही हे ठरवूनही शमाला स्वतःला सावरणं अशक्य झालं. तिचं अंग हुंदक्यांनी गदगदलं. मीरा माधव दोघंही नुसतेच तिच्याकडे पाहत राहिले. मनं खचली होती. उत्साह हरपला होता.
"तुला बोलून दाखवलं नाही, विचारलं नाही तरी जाणवलं होतच. काय ते मात्र नव्हतं समजत. मी बोलले होते माधवना. पण त्यांना वाटत होतं की या देशातल्या लोकांच्या विचारांचा पगडा आहे तुझ्या मनावर. तुझ्या मनासारखं वागू देणं हेच उत्तम असं ठरवलं आम्ही. भारतात जाऊ, तिथे गेल्यावर तुला लग्न करावं असं वाटायला लागेल असं वाटायचं. पण पाच पाच वर्षात जाणं जमत नाही आपल्याला. पण काही असलं तरी ही शक्यता नव्हती गृहीत धरली. आपल्या घरात असं काही होवू शकतं याचा आम्ही कल्पनेतसुद्धा विचार नव्हता केला." शमाने समजल्यासारखी मान डोलवली.
"माझ्या या निर्णयाला पोचेपर्यंत घडलेल्या घटनांचे तुम्ही साक्षीदार नसलात तरी काय काय झालं ते सांगायचं आहे मला." दोघांनाही तेच हवं होतं. शमापासून मनाने दोन ध्रुवावर उभं असल्याची काळीज कुरतडून टाकणारी भावना, नकळत झिरपलेला परकेपणा सारं पुसून टाकायचं होतं. शमाचं मन, भावना जितक्या जपता येतील तितक्या जपायच्या होत्या. वेदनेवर मायेची फुंकर घालायची होती. दोघंही ती काय सांगते ते ऐकत राहिले. मन नाकारत असलं तरी शमा गेलेल्या दिवसांमध्ये स्वत:ला त्रयस्थासारखी निरखीत राहिली .
हल्ली हल्ली शमाला बाहेर पडणं नकोसं झालं होतं. कॉलेज, घर आणि वाचन. तिला फार मित्रमैत्रिणी नव्हत्याच. सावळा रंग, स्थूलतेकडे झुकणारी देहयष्टी. थोडासा न्यूनगंड होता या बाबींचा मनात. शमा एकलकोंडी झाली ती त्यामुळेच. वाचनाशिवाय कुठला छंदही नव्हता. ना कुणाशी फारशा गप्पा, ना कुणाबरोबर कुठे जाणं. शाळेत असल्यापासून ती स्वतःचा जीव पुस्तकात रमवायला शिकली होती. शाळेत मुलींच्या मुलांबद्दलच्या गप्पा, त्याचं एकमेकांच्या मागे मागे फिरणं, हसणं खिदळणं तिने लांबूनच पाहीलं होतं. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर तर ती फारच एकटी पडली. तिच्या बरोबरच्या जवळजवळ सर्वचजणींचं कुठल्या ना कुठल्या मुलासंदर्भात बोलणं चालू असायचं. शमाच्या मैत्रिणींचे त्यांना आवडणार्‍या मुलांबरोबर चालणारे नजरांचे खेळ पाहिल्यावर शमा कानकोंडी होत होती. तिच्या मागे कुणी लागत नव्हतं हा भाग होताच, पण तिलाही त्यात रस वाटत नव्हता. असं आकर्षण आपल्याला का वाटत नाही हेच तिला कळत नव्हतं. त्यातच रेडिओ, दूरदर्शनवर अधूनमधून समलिंगी संबंध असल्यामुळे गमावलेली नोकरी, आत्महत्येच्या बातम्या, त्यांना दिला जाणारा त्रास अशा बातम्या ऐकल्या, पाहिल्या की शमाच्या मनात स्वतःबद्दल शंका डोकावून जायची. मुळात हे वेगळेपण कळतं कसं हेच तिला माहीत नव्हतं. तसं असणं म्हणजे गुन्हा असेल का? की कसला आजार? कुणाला विचारायचं?

आजही मनात नसताना ती कॉलेजच्या ग्रुपबरोबर ट्रेकींगला आली होती. तिच्या वर्गातल्या बर्‍याचजणी मुलांच्या घोळक्यात होत्या. एक दोघी इकडे तिकडे करत होत्या. तिने त्याच्यांत मिसळण्याचा प्रयत्न केला. त्या दोघींबरोबर गप्पा मारताना, फिरताना त्याही आपल्यासारख्याच असतील का हा प्रश्न तिला छळत होता, पण हे विचारून तिला पूर्णपणे एकटं पडायचं नव्हतं. तिघींनी मजेत दिवस घालवला.
थकून भागून जंगलातल्या त्या तंबूत पाच सहाजणींनी अंग टाकलं तरी शमाला झोप येत नव्हती. किती दिवसांनी तिचा एकाकीपणा नष्ट झाला होता. वर्गातल्या मुलामुलींचे आणखी काही तंबू आजूबाजूला होते. प्रत्येकातून गप्पांचा, गाण्यांचा आवाज येत होता. शमाला हे सगळं खूप आवडलं होतं. त्या तिघींनी एकाच तंबूत राहायचं पक्कं केलं. गप्पा, हसणं खिदळणं, बारीकसारीक गोष्टींवरून एकमेकींना चिडवणं, खूप दिवसांनी फार छान वेळ गेला शमाचा. तृप्त, शांत मनाने तिच्या देहावर झोपेचं आवरण चढलं. मध्यरात्रीनंतर कधीतरी सगळीकडे शांतता पसरली. शमाला पहाटे पहाटे जाग आली ती कुणाचा तरी अंगावरून हात फिरतोय या जाणिवेने. प्रतिक्षिप्त क्रियेने तो हात एकदम उठत तिने बाजूला ढकलायला हवा होता, पण का कुणास ठाऊक तिने तसं केलं नाही. घाबरलेल्या अवस्थेत डोळे किलकिले करत शमाने श्वास रोखला. त्या दोघीपैकी एकीचा हात होता तो. हवासा वाटतोय हा स्पर्श? ठरवता येईना. तिने पुन्हा डोळे मिटून घेतले. थोड्यावेळाने सारं शांत झालं. सकाळी उठल्यावर शमाला अवघडल्यासारखं झालं, पण त्या दोघींच्या वागण्यात सहजपणा होता. शमा दिवसभर एकटीच राहिली. तिला कुणात मिसळावं असं वाटतच नव्हतं. रात्र येऊच नये असं तिला वाटत राहिलं. ठरलेले कार्यक्रम पार पडले तोपर्यंत संध्याकाळ झाली. शमाच्या छातीत धडधडायला लागलं. नकळत आपण रात्रीची वाट पाहतोय हे लक्षात आलं तिच्या. हे टाळायला हवं, असं आवडणं, आकर्षण अनैसर्गिक. शमाच्या अंगावर काटा उठला. अशा आर्वतनात अडकलेल्या व्यक्तींना किती त्रास सहन करावा लागतो हे ऐकत नव्हती का ती. रात्री झोपायचं नाही अशा निश्चयाने तिने सर्वांना जागं ठेवण्यासाठी काय काय केलं. पत्ते, भेंड्या, गप्पा. पण हळूहळू सगळ्याजणींचा डोळा लागलाच. शमालाही नाही नाही म्हणता झोप लागली. मन, देह नकळत अपेक्षा करत होता. पण तसं काही घडलं नाही. गाढ झोप लागल्यामुळे समजलं नसेल का? तो विचार तिने झटकला. एकाचवेळी तिला काहीतरी गमावल्यासारखं पण सुटल्यासारखंही झालं.
त्या दोन दिवसांनी शमाच्या आयुष्याची दिशा बदलली. नक्की कळत नव्हतं पण स्वतःमधला वेगळेपणा चाचपडून पाहावासा वाटत होता. उगाच काहीतरी मनाने घेतलंय, की ही विकृती आहे, तसं असेल तर यावर उपाय असेल? प्रश्न पाठलाग सोडत नव्हते. पण कुणाला विचारणार? चेष्टा न करता कुणी समजून घेईल? मुलांशी मैत्री करण्याची इच्छा होत नव्हती आणि मुलींच्या निरर्थक, साध्या साध्या होणार्‍या स्पर्शानेही अंग फुलून येत होतं. सगळंच अवघड, अशुद्ध.
"तुला कितीतरी वेळा सांगायचा प्रयत्न केला मी." निर्विकार नजरेने आईकडे पाहत शमा म्हणाली.
मीरा मन लावून तिचं बोलणं ऐकत होती. तिच्या मनात एकदम आशा पालवली. म्हणजे तिला हे असं काही वाटायला लागलंय त्याला फार वर्ष नाही झालेली. कॉलेजमध्ये गेल्यावर म्हणजे गेल्या चार पाच वर्षातलं हे. बदलायचं ठरवलं तर अजूनही जमलं असतं. फारसा विचार न करताच ती म्हणाली.
"नाही आठवत फारसं." तरी मनात पाल चुकचुकत होती. या गोष्टी फार आधी जाणवायला लागतात असं म्हणतात. तिला एकदम शमाचं लहानपण आठवलं. तेव्हा फार साध्या वाटलेल्या गोष्टी शुल्लक नव्हत्याच का? हौसेने मीराने आणलेले दागिने, अगणित कपडे. पण शमाने फार उत्साहाने दागिने, कपडे घातले नाहीत कधी. तिची आवडही पुरुषी खेळांची. तेव्हा कौतुकाने मुलगाच आहे शमा असं ती म्हणायची. त्याचवेळेस हे लक्षात यायला हवं होतं का? पण अशा वरवरच्या लक्षणांवरून निष्कर्ष काढणंही मूर्खपणाच. मनावर कब्जा करणार्‍या विचारांना निकराने मीराने थांबवलं.
"दोन वर्षं मी प्रयत्न केला तुला माझ्यातल्या बदलाची ओळख पटावी म्हणून. तुझ्या लक्षात येत नाही, मला सांगता येत नाही म्हणून मग पत्र लिहायचं ठरवलं. कितीवेळा पत्र लिहिली आणि नंतर फाडून टाकली ते मलाच माहिती. पण मेगन भेटली आणि सगळं बदललं." ती हळूहळू गतकाळातली एकेक पायरी चढत होती. प्रत्येक पायरी चढताना आधीच्या पायरीवर रेंगाळत होती. माधव, मीराही नकळत प्रत्येक प्रसंगाची उजळणी करत होते, त्यांच्या दृष्टिकोनातून.
नेहमीप्रमाणे मीरा दूरदर्शनवरच्या बातम्या ऐकत होती. शमा आणि मेगन, दोघी तिच्या बाजूला येऊन बसल्या तेही तिला कळलं नाही.
"आम्ही एक चक्कर टाकून येतो." शमाने तिच्या खांद्याला स्पर्श करत सांगितलं. तिने मान डोलवली.

 हल्ली नाहीतरी शनिवार, रविवारीच शमा यायची. मेगनशी मैत्री झाल्यापासून माणसात आल्यासारखी वाटायला लागली होती. एकटी, घुम्यासारखी वावरायची त्यात बदल झाला होता. शमाचा वेळ मेगनच्या सहवासात जातो यातच मीरा खूश होती. भार्गव कुटुंब राहायला आल्यादिवशी शमाच्या बोलण्यात पॅम, अमर, मेगन आणि नीलचा उल्लेख दिवसभर येत होता. त्या चौघांना रात्री चक्कर टाकायलाही शमा बजावून आली होती परस्पर. ती चौघं येऊन गेल्यावर दोन दिवस त्यांच्या घरात भार्गवांशिवाय दुसरं काही बोललंच जात नव्हतं. दोन्ही कुटुंबांची मैत्री होत गेली त्यालाही दोन तीन वर्षे होवून गेली. आत्ताही त्या चक्कर टाकायला जातायत म्हटल्यावर मीराने मान डोलवली. नाहीतरी ती खूप दमून आली होती. छोट्याशा गावातल्या या रुग्णालयात मीराला अजूनही सर्वांनी स्वीकारलं नव्हतं. तिच्या कुठल्याही निर्णयाला होणार्‍या विरोधाने तिला निराशेने ग्रासलं होतं. त्या दोघी निघून गेल्यावर बैठकीवर तिचा डोळा लागला ते माधव येईपर्यंत. माधवनी मात्र तिला घराबाहेर काढलं. विमनस्क मन:स्थितीत हिरवीगार टेकडी चढणारी मीरा, माधवना आयुष्यातला रस गमावल्यासारखी भासत होती. क्षितिजापलीकडे लपू पहाणार्‍या सूर्याची किरणं तिच्या चेहर्‍यावरची उदासीनता गडद करत होती. तिची निराशा कशी घालवावी, मनोबळ कसं वाढवावं ते माधवना समजत नव्हतं. मूकपणे दोघं चढ चढत राहिले. तिची मनोवस्था हळूहळू बदलली. टेकडीवरच्या दोघांच्या आवडत्या जागी ते पोचले आणि त्यांची पावलं थबकली. त्यांच्या पासून सात आठ पावलांच्या अंतरावर वेड्यावाकड्या शीळेवर बसलेली शमा आणि मेगनची जोडी पाहून ती दोघं तशीच उभी राहिली. दोघी एकमेकीला चिकटून गळ्यात गळे घालून बसल्या होत्या. माधव, मीरा तिकडे पाहत जागच्या जागी थबकले, तसेच उभे राहिले. इतक्या कशा एकमेकीला चिकटून बसल्या आहेत? तिच्या मनात शंका तरळली. माधवही त्या दोघींकडे पहात होते. त्यांना वाटतंय काही निराळं? मीराला त्यांच्या चेहर्‍यावरून अंदाज येईना. तिने पुन्हा दोघींकडे पाहिलं. शमाचा हात मेगनच्या मांडीवरून फिरत असल्यासारखं तिला वाटलं आणि भितीची एक लहर तिच्या शरीरात वरपासून खालपर्यंत पसरली. ती काहीतरी बोलणार इतक्यात मेगनचं लक्ष त्या दोघांकडे गेलं. स्कर्ट सावरत ती चटकन उठून उभी राहिली. जीन्स झटकत शमाही गोंधळल्यासारखी त्या दोघांकडे पाहत राहिली. माधव शांतपणे म्हणाले.
"काळोख पडतोय. थोडावेळ आम्ही बसतोय. तुम्ही दोघी चला आमच्याबरोबरच परत जाताना."
त्या दोघी न बोलता मीरा, माधवच्या बाजूला बसून राहिल्या. अबोल, बेचैन, अस्वस्थ. मीरा, माधवही नजर पोचेल तिथपर्यंतचा हिरवा रंग आणि त्या पलीकडचं ते निळसर लाल छटा ल्यायलेलं आकाश टक लावून पाहत बसले. ढगांच्या वेगवेगळ्या आकारांचे अर्थ लावत बसायचं मीराला केवढं वेड, पण आता तिला काही सुचत नव्हतं. डोक्यात किडा वळवळायला लागला होता. मेगन आणि शमाची मैत्री. काहीतरी विचित्र वाटत होतं, खुपत होतं. माधवच्या चेहर्‍यावरुन त्यांच्या मनातल्या विचारांचा अंदाज येत नव्हता. तिच्याच्याने तिथे बसवेना. ती उठली तसं निमूट बसलेल्या सर्वांना उठावं लागलं. मेगनला तिच्या घरी सोडून ती तिघं वळले तसं न राहवून ती बोललीच.
"दोघीच कशाला जाता दिवेलागणीच्या वेळेला टेकडीवर?"
"कशाला म्हणजे काय? नेहमीच तर जातो." शमा फणकारली.
"इतक्या लांब जाऊ नका पण." तिच्या स्वराकडे लक्ष ने देता मीराने घोडं दामटलं.
"तू काय आम्हाला कुकुलं बाळ समजते आहेस का?" शमाच्या चढलेल्या आवाजाला थोपवलं माधवनी,
"तू शांत हो. तिला म्हणायचं आहे फार शांत असतो तो भाग. त्यात काळोख पडल्यावर दोघी मुलीच तुम्ही, तर काळजी घेतलेली बरी."
"आणि किती ते गळ्यात गळे घालून बसणं." गप्प राहणं मीराला जमलं नाही.
"तुला मी करेन ते चुकीचंच वाटतं." शमाने कपाळाला आठ्या घालत, हात उडवत म्हटलं.
"शमा, गप्प बसशील का? आई दमलेली आहे."
"बरं" संभाषण संपवीत शमा घुम्यासारखी चालत राहिली. मेगनच्या हातात गुंतवलेल्या हाताची पकड घट्ट झाली.
घरात पाऊल टाकल्या टाकल्या शमा खोलीत निघून गेली. मनातली शंका बोलून दाखवावी का नाही या विचारात मीरा तिथेच घुटमळत राहिली.
"काय चाललंय तुझ्या मनात? शमावर पण केवढी वैतागलीस." माधवना विचारल्याशिवाय चैन पडेना.
"हिची ही लक्षणं, मला काही ठीक वाटत नाही."
"लक्षणं?"
"मला त्या दोघींबाबत काहीतरी वेगळं वाटायला लागलंय."
"तू स्पष्ट बोल. त्यांची मैत्री आवडत नाही का तुला? पण शमाला आहे कोण आजूबाजूला. मेगनमुळे फार बदलली शमा असं आपणच म्हणतो ना." माधवना मीराच्या बोलण्याचा रोख समजेना.
"हो पण, शमा आणि मेगन.... तुमच्या लक्षात कसं येत नाही? म्हणजे मला म्हणायचं आहे… तसलं काही नाही ना या दोघीत? म्हणजे .... समलिंगी संबंधाबाबत...! आजकाल ऐकू येतं ना अधूमधून." मीराला एवढं बोलतानाही शरमल्यासारखं झालं.
"त्याचा या दोघींशी काय संबंध?" माधव बुचकळ्यात पडले.
"या दोघी तशा तर नाहीत ना?"
"मीरा...?" माधवचा धक्का त्यांच्या आवाजात जाणवत होता.
"शमा मेगनच्या मांडीवरून कसा हात फिरवीत होती ते पाहिलं नाहीत? आणि मेगन सुद्धा केवढ्याने खिदळत होती. आपल्याला पाहिल्यावर दचकण्यासारखं काय होतं? पण दोघी एकदम घाबरल्यासारख्या वाटल्या. पुन्हा मेगनशिवाय कुणाचच नाव येत नाही तिच्या बोलण्यात."
"काहीतरीच तुझं. मला नाही वाटत तसंलं काही असेल असं." माधवनी मीराचं बोलणं उडवून लावलं. विषयच थांबवला. पण त्याच्याही नकळत डोक्यात किडा वळवळायला लागला. उगाच काहीतरी कसं बोलून जाईल मीरा. आपणही त्या विचारात ओढले जातोय की काय या जाणिवेने माधवना अंगातली शक्ती नष्ट झाल्यासारखं वाटलं. खरी असेल मीराच्या मनातली शंका? आणि तसं असेल तर कल्पना असेल का मेगनच्या घरात? अंदाज घ्यायला हवा का, अमर आणि पॅमशी बोलून? खरंच आपण घरात म्हणतो तशी आली आहेत का आपली दोन्ही कुटुंब जवळ? ओळखतोय का आपण खर्‍या अर्थी मेगनच्या कुटुंबाला?

मेगन आणि शमाची ओळख वाढायला लागली. त्या कॉलेजमध्ये एकत्रच असल्या तरी तिथे त्यांची फार भेट होत नसे. पण सुट्टीत घरी आलं की गप्पा रंगत. त्या जवळ यायला लागल्या तेव्हा शमाची द्विधा मन:स्थिती तिला वेढून राहिली. शमा आपल्यासारखीच आहे हे कळायला मेगनला फारसा वेळ लागला नाही. दोघी एकमेकीत गुंतत गेल्या तसं शमाने घरात आपलं नातं सांगून टाकावं म्हणून मेगन शमाच्या मागेच लागली. तिच्या घरातही अजून तिचं तसं असणं हे स्वीकारणं अजूनही जमलेलं नसलं तरी आपापल्यापरीने सर्व कसे प्रयत्न करतायत ते मेगन शमाला वारंवार सांगत होती. शमाच्या घरातही समजून घेतील याची तिला खात्री देत होती. पण शमाचं धाडस होत नव्हतं. ती मेगनबरोबर असली की विचित्र ताणाने तिचे खांदे दुखायला लागत. किती डॉक्टरी उपचार झाले पण मीरा, माधवना तिच्या खांदे दुखण्याचं कारण कधीच लक्षात आलं नाही. कधीतरी सत्य सांगितलं की आई बाबांना या खांदे दुखण्याचा उलगडा होईल हे तिला कळत होतं. त्यातच कुणीना कुणी शमासाठी स्थळ सुचवलं की मीरा मागे लागत होती. प्रत्येक वेळेला नाही म्हणताना तिच्यामुळे घरातलं वातावरण गढूळ होतं याची तिला खूप शरम वाटत होती. मेगनही आता शमाने काहीतरी निर्णय घ्यायला हवा यावर ठाम होती. कॉलेज संपणार होतं. त्यानंतर एम. एस. साठी एकत्र प्रवेश घेऊन मेगनला लवकरात लवकर नवीन आयुष्याला सुरुवात करायची होती. असं लपत छपत किती दिवस काढणार? शेवटी काय होईल ते होईल असं ठरवून शमाने शनिवार रविवारी घरी येऊन सांगायचा निर्णय घेतला.

कितीही नाकारायचं म्हटलं तरी आलेल्या शंकेवर शमाने शिक्कामोर्तब केलं तेव्हा सुरुवातीला आपल्याला कशाचं वाईट वाटतंय हेच ठरवता येईना मीराला. मुलीला आरपार ओळखता आलं नाही की मेगनच्या आईवडीलांनी त्यांच्या मुलीतला हा वेगळेपणा स्वीकारला होता एवढंच नाहीतर स्वतःच्या लेकीला जपत शमालाही आधार दिला होता याचं दुःख अधिक होतं हे ठरवणं कठीण जातंय असं तिला वाटायला लागलं. आईपणाचा पराभवच वाटत होता तिला असं मूल जन्माला घातलं म्हणून. हा रोग नाही हे डॉक्टर असूनही कबूल करणं जड जात होतं. शमा स्वतःबद्दल बोलून थांबली नव्हती. उद्या मेगन आणि तिचे आई वडील भेटायला येणार असल्याचंही तिने सांगून टाकलं.
"हे म्हणजे मुलीला मागणी घालायला आल्यासारखं झालं." मीराचा कुणाला लागेल असं बोलण्याचा स्वभाव नसूनही तिच्या तोंडून निघून गेलं.
"ती आज माझ्याबरोबरच येणार होती. मी थांबवलं म्हणून ती लोकं एक दिवस धीर धरतायत आई. किती नाही म्हटलं तरी पॅममावशी तुझीही मैत्रीण आहे. ती म्हणत होती, ती असेल तर बरं तुझ्याबरोबर. जसं तुम्हाला अतीव दुःख होतंय तसंच काही वर्षापूर्वी ती दोघही या चक्रात भरडली होतीच."
त्या दिवशी रात्रभर ती आणि माधव जागेच राहिले. या विषयावरची पुस्तकं, वाचनालय…  अशी दोन तीन साधनं डोळ्यासमोर येत होती माहितीसाठी. तिथे काही लागेल हाती. नाहीतर पॅमने काय काय केलं ते विचारायचं. विचारचक्र सुरू होतं.
"मेगनचं आणि तिचं भेटणंच बंद केलं तर?" माधव आश्चर्याने मीराकडे बघत राहिले.
"कसं शक्य आहे? कोंडून ठेवणार आहेस का खोलीत? लहान मूल आहे का ती आता?"
"लहान मुलासारखं वागतेय ना पण." डॉक्टर असूनही आपण असं बोलतोय याचं तिला दुःख होत होतं. विषय बदलायचा ठरवलं तरी मनातलं काहीही निसटत होतं.
"नशीब आपण भारतात नाही. फार लाजिरवाणं वाटलं असतं."
"तिथे काय, इथे काय यायचे ते अनुभव येणारच मीरा." माधव शांतपणे म्हणाले.
"आणि अशी माणसं जगात सर्वत्र असणारच. कुठे त्यांचा स्वीकार समाज सहज करतो तर कुठे नाही. भारतात असतो तर इथल्यापेक्षा जास्त नजरा झेलाव्या लागल्या असत्या, इतकंच. आणि असा विचार कर ना की किती वर्ष आपली मुलगी हे सहन करतेय. आत्महत्येचे विचार घोळत होतेच ना तिच्या मनात? सुदैवाने तसं काही केलं नाही तिने. तसं काही झालं असतं तर, या कल्पनेनेच दडण येतं. तिच्या काळजीचं ओझं तिने आपल्यावर टाकलंय. नीट वाहायला हवं ते आपल्याला. आता खरी परीक्षा असेल ती आपली." माधवच्या बोलण्यावर मान डोलवताना मीराला तिच्या महाविद्यालयतली एक मुलगी आठवली. केवढी कुजबुज चालायची. मुलींबरोबर तिचं जोडलेलं नाव. पण तेव्हा याचा अर्थच कळला नव्हता. माधवना तिने ते सांगितलं. ते हसले.
"बघ म्हणजे हे ह्याही आधी कितीतरी वर्ष, तेही भारतात. मलाही एका साप्ताहिकात याबाबत काही ना काही वाचलेलं आठवतंय. सूचक फोटोदेखील असायचे."
"जाऊ दे तिथे असलो काय इथे असलो काय. आहे हे असं आहे. उद्या पॅम, अमरशी बोलणं झाल्यावरच शांतता लाभेल."
"हो पण लक्षात घे. इथे आपल्या होकार नकाराचा प्रश्नच नाही. त्या दोघी ठरवतील त्याला पाठिंबा देणं हेच उरलंय हातात."
दोघही एकमेकांना सावरत राहिले. पुढचे बेत, पेच यासंदर्भात बोलत रात्रभर जागले.
"तुम्हाला दोघींना कल्पना आहे नं रूढार्थाने तुमचं एकत्र राहणं समाजमान्यं होणार नाही. आपण फार छोट्या गावात राहतोय. तुम्ही एकत्र राहता आहात हे समजलं की अंतर पडत जाईल. लोकांच्या नजरा झेलणं सोपं नसतं." मीरा त्या दोघींकडे पाहत म्हणाली. अमर, पॅम दोघं तिथे उपस्थित असले तरी बोलणार काहीच नव्हते. त्या दोघांनाही ही चर्चा काय असेल त्याची पूर्ण कल्पना होती.
"आणि एकत्र राहायचं तर लग्न करायचं हे तुमच्या डोक्यात नसावं हे गृहीत धरून मुलं होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हेही दोघींना स्वीकारावं लागेल याची कल्पना आहे ना? माधवनी मनातली शंका बोलून दाखविली.
"केलाय आम्ही विचार. " शमा पटकन म्हणाली पण सांगताना काहीसं अवघड वाटून तिने मेगनकडे नजर टाकली.
"मी सांगते काका. आम्ही हा विचार आधीच केलाय. मुलाबाळांचा विचार अशक्य हे तर ठाऊकच आहे पण तुम्हाला चौघांना अगदी स्पष्टच कल्पना द्यायची तर हे आकर्षण किती काळ टिकेल हे ही सांगू शकत नाही आम्ही." माधव, मीराच्या चेहर्‍यावरची प्रश्नचिन्हं पाहून अमरनी त्याच्या लेकीला काय सांगायचं आहे ते अधिक स्पष्ट केलं.
"डॉक्टरांच्या मते अशा उदाहरणांमध्ये अचानक हे आकर्षण संपुष्टात येऊन सर्वसाधारण आयुष्य जगता येतं."
"खरंच? पण असं निश्चित किती काळानंतर होवू शकतं?"
"ते नाही सांगता येत. आणि कधी कधी स्त्रीला पुरुष आणि स्त्री दोघांचंही आकर्षण निर्माण होतं." पॅमकडे विस्फारलेल्या नजरेने मीरा पाहत राहिली तसं तिच्या चर्येवर हसू उमटलं.
"मीरा मला ठाऊक आहे पुरुषाचंही आकर्षण वाटेल म्हटल्यावर नकळत आशा उंचावल्या तुझ्या. अगदी हाच विचार मानसोपचारतज्ज्ञासमोरच्या खुर्चीवर बसून मीही केला होता काही वर्षापूर्वी. वेड्यासारखी त्या आशेवर जगायची उमेद बाळगू नकोस. यात दोष कुणाचाच नाही, ना आपल्या मुलांचा ना आपला. आपली साथ त्यांना मिळणं एवढंच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे." बोलता बोलता पॅमचे शब्द घशात अडकले. ती खाली मान घालून डोळे पुसायला लागली. प्रत्येकजण एकमेकांची नजर टाळत बसून होते. शमाला आता अगदी बसवेना. ती उठून येरझार्‍या घालायला लागली.

"एकदा मोकळं व्हायचं ठरवलंय तर बोलू द्या आम्हाला. मी आणि मेगनने ह्या पेचातून बाहेर पडायचं किंवा आमचं आम्हालाच पडताळून पाहायचं म्हणून; पण ठरवून मुलांशी मैत्री केली, प्रणयाचा मन: पूर्वक प्रयत्न केला. नाही, नाही, तुम्हाला वाटतं तसं नाही. चुंबनापर्यंतच मजल पोचली दोघींचीही. किळसवाणा प्रकार होता तो आमच्या दृष्टीने. आमच्यातल्या आकर्षणावर मात करायची केविलवाणी धडपड होती ती. ठरवून केलेली." शमा आई वडिलांच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत राहिली. कुणीच काही बोलेना. अमर पुढे झाला.
"आम्हाला मेगनबद्दल कल्पना होती. सुदैव की दुर्दैव पण शमा भेटली तिला. वेळोवेळी मी आणि पॅमने तुमच्या कानावर घालायचा प्रयत्न केला. आमचे प्रयत्न कमी पडले किंवा शमावर अवलंबून राहिलो बहुधा. मेगनबरोबर शमाही डॉक्टरांकडे आली आहे खूपदा. मनोधैर्य वाढण्यापलीकडे अशा भेटीचा उपयोग नसतो हे कळूनही या दोघींनी हे नाकारायचा, बदलायचा केलेला प्रयत्न आम्ही पाहिलाय. आमच्याकडून त्यांच्या निर्णयाला परवानगी आहे. तुम्हाला सावरायला, निर्णय घ्यायला त्या दोघी काही दिवस देतील असंही त्यांनी कबूल केलंय." खूप बोलल्यासारखं अमर एकदम गप्प झाला. पॅमला राहवलं नाही.
"रागावू नकोस मीरा पण कुठेतरी या भिन्नतेचा धागा तुझ्या हाताला लागला होता असं वाटतं मला. नाही म्हणू नकोस. कितीही व्यग्र असलीस तरी शमाबाबत जागरूकही होतीस. त्यातून तू डॉक्टरही आहेस. नाकारायचा मार्ग होता का तुझा? असावा. त्यामुळेच माधवना पण अज्ञानात ठेवलंस. हा अंदाज आहे. तसं नसेलही कदाचित. पण परिस्थिती टाळून नुकसानच होतं. अशा अवघड क्षणी शमाला तुम्हा दोघांची नितांत गरज होती." मीरा मान खाली घालून गप्प बसून राहिली. काहीवेळ थांबून पॅम, अमर उठले. माधव, मीरा नुसतेच टक लावून दोघींकडे पाहत बसून राहिले. त्या दोघीही एकमेकींचे हात हातात धरून धाडसाने नजरेला नजर देत राहिल्या.
"पोरींनो एवढी वर्षे थांबलात तसं आणखी काही दिवस थांबाल? माझ्यासाठी? मीरासाठी?"
"निश्चितच काका. आणि मावशी तुला काही शंका असतील तर आमच्याबरोबर तूही ये डॉक्टरांकडे. मम्मीच्या डोळ्याला डोळा न लागलेल्या रात्री तुझ्याही वाट्याला यायला नकोत. डोळ्यातले ओघळ पुसण्याचा प्रयत्नही न करता मीरा, माधव दोघींकडे पाहत राहिले.
"जाणवली होती ही भिन्नता?" मीरा स्वतःच्याच विचारांना घाबरली. एकदा कधीतरी तिने हे स्वतःशी कबूल केलं होतं, बोलूनही दाखविलं होतं माधवना. पण तेवढंच, त्या वेळेस माधवनी तिच्या शंकेला उडवून लावलं होतं आणि नंतर तिने अशा विचारांना जवळ फिरकूच दिलं नव्हतं. गोष्टी खटकल्या तरी मनापर्यंत पोचू दिल्या नव्हत्या.
"चुकलंच माझं. गोष्टी इतक्या थराला जातील असंही वाटलं नव्हतं." तिचे विमनस्क भाव पाहून माधवना दया आली.
"मीरा झालं ते झालं. आता पुढच्या गोष्टी पाहायला हव्यात. सगळी शक्ती पणाला लावून पाठीशी घालावं लागणार आहे आपल्याला शमाला आणि मेगनलाही, त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली की."
"आपलं प्रेम, आपुलकी मिळणारच त्यांना. पण मला एकदा शमाची पूर्ण शारीरिक तपासणी करायची आहे डॉक्टर म्हणून. मेगन तयार झाली तर तिचीही."

ध्यास घेतल्यासारखी मीरा मेगन आणि शमाच्या मागे लागली. तिने आपल्या कामातलं लक्ष कमी केलं. मिळेल त्या मार्गाने ती या विषयावर माहिती गोळा करत राहिली. तपासणीच्या, माहितीसत्राच्या चक्रात दोघी भरडल्या गेल्या पण शमाला तिच्या आईला दुखवायचं नव्हतं. काही राहिलं असं नको व्हायला. तिच्या मनातल्या शंका कुशंका दूर झाल्या तरच तिला हे स्वीकारणं सोपं जाईल याची शमाला कल्पना होती. आज वाचनालयातून त्या विषयावरचा आणलेला चित्रपट पाहायला त्या चौघी बसल्या होत्या. अमर, माधवना शक्य नव्हतं पण पॅम आवर्जून आली. वातावरणात मोकळेपणा आणण्याचा मीरा आपल्यापरीने प्रयत्न करत राहिली. काजूगर, वेफर्स समोर ठेवून काही ना काही विषय काढत तिने व्ही. सी. आर. सुरू केला. चित्रपटातील घटना उलगडायला लागल्या तसं वातावरण एकदम शांत झालं. एक विचित्र तणाव त्या खोलीत पसरला. ती त्याही परिस्थितीत दोघींच्या चेहर्‍याचं निरीक्षण करीत राहिली. त्यांचे निर्विकार चेहरे पाहून तिचा जीव गलबलला. ’एवढ्या निर्ढावल्या असतील या मुली?’ तिची चलबिचल पॅमच्या लगेचच लक्षात आली. जाता जाता ती मीराच्या कानात कुजबुजली.
"त्या दोघींनी माझ्याबरोबर पाहिला होता हा चित्रपट. चार दिवस अस्वस्थ होत्या. पण आता सरावल्या आहेत गं दोघीही." एका अवघड डावात पॅमची सरशी झाल्यासारखं वाटलं तिला.
पॅम निघून गेली पण त्या दोघी तशाच बसून होत्या. समोरचे काजूगर संपले, एकेक वेफर्स तोंडात टाकत दोघी शांतपणे बसल्या होत्या.
"चहा करतेस? चहा पिता पिता गप्पा मारल्या तर बरं वाटेल तुला. डोकं दुखायला लागलंय ना? खरं सांग आई." शमाच्या समजूतदारपणाने तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. काही न बोलता ती चहा ठेवण्याकरता उठली.
दोघींसमोर चहाचे कप ठेवत तिने आपला कप तोंडाला लावला. कुणीच काही बोलत नव्हतं. शेवटी मीराने म्हटलं.
"अग तुम्ही दोघींनी सांगायचं तरी बघितलेला चित्रपटच पाहतोय आपण."
"पण तू हा चित्रपट बघणं आवश्यक होतं. तू जो आम्हाला स्वप्न आणि वास्तवातला फरक सांगतेस तेच तर दाखवलंय ना त्यात. एकटीने पाहू नसती शकलीस तू म्हणून काही बोललोच नाही आम्ही तुला." आईला समजावता समजावता बाजूला बसलेल्या मेगनच्या खांद्यामागे शमाने हात टाकला आणि तेवढ्या अस्वस्थतेतही मीराच्या अंगावर शहारा आला, काटा उठला.
"ही देखील परीक्षाच आहे आई. तुझी आणि आमचीही. तुझ्या चेहर्‍यावरुनच भावना कळतायत. बाहेरच्या जगात आम्हाला याच्याशीच सामना करायचा आहे." मेगनने शमाचा खांद्यावरचा हात अलगद बाजूला केला. निमूटपणे सगळीजणं चहा पीत राहिले. चहाचे रिकामे कप शमा उचलून ठेवून आली. दोघींचं तिथून हालण्याचं मात्र लक्षण दिसेना. प्रश्नार्थक नजरेने तिने पाहिलं.
"मावशी गेले चार महिने तू सांगशील ते आम्ही करतोय. आता आम्हाला दोघींना तुला न्यायचं आहे कुठेतरी." मेगनने ती कोंडी फोडली.
"कुठे?"
"एक नवीन संस्था सुरु झाली आहे आमच्यासारख्या लोकांची नुकतीच. आम्ही दोघीही आहोत त्यात. तू आलीस तर खूप गोष्टी लक्षात येतील तुझ्या."
मीराने नकळत मान डोलवली. त्या दोघी हातात हात घालून बाहेर पडल्या त्या दिशेने तिची नजर बराचवेळ रेंगाळत राहिली.
मीराला आता पुढच्या पायरीवर चढायचं होतं. आपल्या मुलीची हरवलेली चार पाच वर्ष पॅमकडूनच तिला परत घ्यायची होती. ती वरचेवर पॅमकडे जायला लागली. त्या दोघींचा इथे पोचेपर्यंतचा प्रवास समजावून घेत राहिली. पॅमही कसोशीने तिच्या मनाला जपत होती. समजावून सांगत होती.
"तुला वाटत नाही जावयाचं कौतुक, नातवंडाची आजी होणं हे मूलभूत सुखच गमावतोय आपण?"
"आता नाही वाटत. काही वर्षांपूर्वी इथे यायचं ठरवलं तेव्हा वाटलं, फार वाटलं. आपलाच काहीतरी दोष असल्यासारखं वाटायचं असं मूल जन्माला घातलं म्हणून. मी भारतीय नाही त्यामुळे अमरच्या घरचे माझाच दोष म्हणतील याची धाकधूक वेगळीच. तुमच्याकडे इथल्या संस्कृतीबद्दल फार आपुलकी नाही ते माहीत आहे मला. वाटायचं इथलं काहीतरी वेड घेतलंय डोक्यात असंही म्हटतील. पण आमच्या नीलने आधी तिला नंतर आम्हाला खूप मदत केली म्हणूनच मेगनला आपुलकी, प्रेम देऊ शकलो. नजरा झेलायचा आत्मविश्वास नीलने दिला."
"बरोबर आहे तुझं. गेले चार महिने सतत हाच विचार रुंजी घालत असतो माझ्या. जसं आपण नातवंडं, जावयाचं कौतुक, लग्नाची खरेदी अशा गोष्टींचा विचार करतो, नेमके हेच विचार त्या दोघींच्या मनातही आले असतीलच ना? त्यांना किती दिव्यं पार पाडावी लागणार आहेत, लागली असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण त्यांचे पालक म्हणून येईल त्या प्रसंगाला सामोरं जायची तयारी ठेवायला हवी. नातेवाईक, आपला समाज कुठे कुठे आणि कसं पाठीशी घालणार गं आपण या दोघींना?" पॅम मीराच्या चढलेल्या आवाजाकडे पाहत राहिली.

त्या दोघींनी कबूल केल्याप्रमाणे मीरा, माधवना वेळ दिला होता. आता अधिक ताणायचं नव्हतं मीराला. तिने दोघींना समोर बसवलं. पॅम, अमर, माधव होतेच.
"खरं तर खूप जड जातंय मला पण आहे ही वस्तुस्थिती मान्य करायलाच हवी. मला जे जमलं नाही ते पॅमने तुम्हा दोघींसाठी केलं. मेगनसाठी ते हक्काचं होतच पण शमासाठी माझी भूमिकाही तिनेच केली. माझं समाधान म्हणून मी पुन्हा पुन्हा सगळं उकरून काढलं. जे तिच्या हाती आलं तेच माझ्या. तुम्हाला दोघींना मात्र मनस्ताप झाला." दोघींनी नकारार्थी माना हलवल्या. ती हसली.
"माझ्या समाधानासाठी नका माना हलवू. आता फक्त तुमचा जगावेगळा संसार उभारून द्यायचा आहे." बाजूलाच ताठरपणे बसलेल्या शमाचं डोकं तिने मांडीवर ओढलं. बराचवेळ ती तिच्या केसातून हात फिरवत राहिली. अचानक घरातलं कुणीतरी गेल्यागत तिला हुंदका फुटला. माधव तिच्या पाठीवर थोपटत राहिले. सगळ्यांचेच डोळे पाणावले. शमाने एकदम हाताच्या तळव्यात चेहरा झाकला.
"माझ्या आणि मेगनच्याच वाट्याला हे असं जीवन का आलं ?" तिच्या अस्फुट शब्दांनी सर्वांना मुकं केलं. तिथे बसलेल्या चेहऱ्यांवर हेच प्रश्नचिन्ह नव्हतं का?
घणाचे घाव घातल्यासारखं मीराचं डोकं दुखायला लागलं. आठवणींनी भोवर्‍यात सापडल्यासारखं झोडपून काढलं होतं. ती बसल्या बसल्या जोरात पाय हलवायला लागली. भरून आलेल्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहायला लागले ते पुसत राहिली. निकराने अश्रु थोपवता थोपवता घशातून आलेला हुंदका तिने आतल्याआत गिळला. एक दुखरा कोपरा तिने म्हटलं तर त्रयस्थापुढे, म्हटलं तर खूप जवळच्या माणसापुढे उघडा केला होता. तो तिथे नसूनही तिला आपल्या मनातलं त्याला समजलं आहे असंच वाटत होतं. रुग्णालयातल्या त्या रिकाम्या पलंगाकडे ती पाहत राहिली.

जोडीदाराचा तो एकमेव आधार निसटून गेला होता. गेला तो एकटाच, अगदी एकटा. सर्वांशी झगडूनही त्याचा तो जोडीदार नव्हताच बाजूला. ना निरोप घ्यायला, ना निरोप द्यायला. पण तिला जी गोष्ट सांगायची होती ती सांगून झाली होती, त्याला, तो तिथे नसला तरी. ती उठली. काल तो ’जोडीदार’ कोसळला त्यानंतर त्याचं काय झालं? कुठल्या खोलीत हलवलं? कसा असेल तो आता? तो सोडून गेलेला समजलं असेल त्याला, की त्याचंही काही…...? तिला एकदम अंगातलं त्राण नष्ट झाल्यासारखं वाटलं. त्याचं काही बरं वाईट होवून चालणार नव्हतं. तो कुठे आहे ते तिला शोधायचंच होतं. ते दोघंही तिला खूप जवळचे वाटत होते. खोलीच्या बाहेर दारात मीरा उभी राहिली. परिचारिकेला विचारलं की समजलं असतं जोडीदाराबद्दल. ती त्या दिशेने वळली. पण तशीच थबकली. हातात घालून तिच्याच दिशेने येणार्‍या मेगन, शमाकडे पाहत राहिली. त्या दोघी जश्या जवळ यायला लागल्या तसं झडून गेलेल्या पावसाने तिला आभाळ स्वच्छ झाल्यासारखं वाटलं. आंतरिक ओढीने मनात दाटून आलेल्या ममत्वाने तिची पावलं आपोआपच त्या दोघींच्या दिशेने वळली.