Friday, December 3, 2021

गळ


जोगळेकर कुटुंब घरातल्या घरात एकत्र आलं आणि त्यांनी ’गळ’ टाकला म्हणजे ’गळ’ करण्याचा घाट घातला. खरंतर तो घाट घातला मीच पण गळ लावून त्यात सगळ्यांना ओढलं. नेहमीप्रमाणेच मी काही काम करायला सांगितलं की जसे सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलात तसंच झालं; विशेषत: नवर्‍याचं. त्याने तोच भाव ठेवून काम केलं आहे त्यामुळे अभिनय अगदी सहज आणि भूमिकेला साजेसा झाला आहे. लेकिने काय करेन ते एकाच ’शॉट’ मध्ये असंच आधी सांगितलं होतं त्यामुळे दिग्दर्शकाला कुणालाही ’वाकवण्याची’ संधीच मिळाली नाही. तरी मी सगळ्यांना म्हणत होते मानधन घ्या म्हणजे मुकाट माझं ऐकाल पण नाही; एका पैशाचीही अपेक्षा न बाळगता तिघांनी मला ’वाकवायची’ संधी सोडली नाही. तरी मी चिकाटीने हा ५ मिनिटांचा लघुपट केलाय. बघा आणि बेधडक मुलीला, नवर्‍याला नावं ठेवा. आता नेपोटीझमवाल्यांचं दु:ख कळलं. आमच्यासारख्यांचं फाफटीझम होतं घरातल्याच लोकांना काम दिलं (करायला लावलं) की. 

गमतीचा भाग सोडला तर खरंच माझ्या लेकिने खूप मन लावून काम आणि चित्रिकरण केलं आहे आणि नवर्‍याने नेहमीप्रमाणे हं, हू, बरं, नक्की असं तो नेहमी करतो तसंच इथेही उत्तम केलं आहे. लेकाने त्याचा आवाज चार चार वेळा आठवण करुन दिल्यावर लगेच दिला. या सगळ्या घाटात आमच्या मित्रमैत्रिणींनी उत्साहाने विचारल्याक्षणी उपस्थिती लावली आहे आणि अभिजय काणेने उत्कृष्ट पार्श्वसंगीत दिलं आहे. बघा तर आमचा ’गळ’.

For my non Marathi Speaking friends: Mohana, Viren, Parnika and Rutvik have created a short film 'Lure' and it is with subtitles. Enjoy our family production. 

Monday, September 27, 2021

अलास्काला जाऊ

खाण्यासाठी जगणारे आम्ही आणि जगण्यासाठी खाणारी आमची मुलं प्रवासाला निघाली की  घोळ व्हायला सुरुवात
होते. कधीकधी विमानंही त्यात सामील होतात. अॲकरेंजला जायला अटलांटा विमानतळावर वाट बघत बसलो आणि विमान कर्मचारी ओरडून, ओरडून विमानात कुणाला तरी शेंगदाण्यांचा त्रास होतो म्हणून चणेफुटाणे देणार नाही सांगायला लागली.

"हे काय, त्रास होत असेल त्यांना नका देऊ. आम्ही काय केलंय?" देणार नाही म्हटल्यावर एकदम हवंसं वाटायला लागतं.

"आई, तू इथेच खाऊन घे. विमानात चढलीस की खायला कधी मिळेल याचीच वाट बघत असतेस." लेकीने आयती संधी साधली आणि तिच्या कुसकटपणाकडे दुर्लक्ष करत मी विमानतळावर हादडून घेतलं. शेंगदाणे मिळणार नाहीत असं पुन्हा एकदा ऐकत विमानात जाऊन बसलो. उडायच्या आधी विमान चालायला लागलं आणि तोंड, नाक मुस्क्या बांधल्यासारखं झाकलेलं असलं तरी शेंगदाणे जळल्यासारखा वास यायला लागला. 

"काहीतरी जळतंय. तू हवाई सुंदरी  जीव कसा वाचवायचा सांगते ते ऐकतेस का?" लेकीच्या कानात कुजबूजले. कानातल्या बोळ्यांमुळे ते आत शिरलं नाही.

"विमान जळलं तरी कानात खुपसून गाणी ऐकत बसणार आहेस का?" दातओठ खात मी विचारलं. ती समोर बघत राहिली. आपत्कालीन सुटकेचा मार्ग शोधायचा की तसंच बसून राहायचं हे कळेना. 

"बाकी कुणाला कसा वास येत नाही?" मी  पुटपुटले. तेवढ्यात विमानात झालेल्या बिघाडाची घोषणा झाली. आता विमान जळलं तरी विमान जळतंय हा माझा अंदाज बरोबर ठरला यातच मी खूष होते.  लेकीनेही कानातले बोळे काढलेले बघितले आणि तिलाही मी माझा अंदाज कसा चुकत नाही ते ऐकवलं.  तासाभराने विमान उडालं.

हे विमान उडालं तरी भरवसा काय?  अॲकरेजला पोचेपर्यंत पोचलो तर पोचलो म्हणत अखेर आम्ही हवेत उडालो. तासाभरात ताणाचं प्रमाण इतकं वाढलं की प्रचंड भूक लागली. पोटपूजा होण्याची  नामोनिशाणी दिसेना. सात तासांच्या विमानात नुसते द्रव पदार्थ देऊन विमानवाले सकस आहाराचं महत्त्व पटवून देत होते. लेक फक्त पाणी पित होती आणि मी जितक्या फळांचे रस मिळतील तेवढे पित होते. खायला मिळणार नाही म्हटल्यावर पिण्याची इच्छा तीव्र! उतरलो की  कुठे खाता येईल याचे मनातल्या मनात मी बेत करुन टाकले. 

ॲकरेंजला लेक न्यायला आला तोच खुषीत.

"रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटला. मी तुमच्यासाठी खायला करुन आणलंय. " 

"तू केलयंस?" या दोन शब्दांत तीव्र निराशा होती पण लेक स्वत:वर खूष होता. 

"हो. अलास्कात सगळं महाग असतं. बाहेर परवडणार नाही." आल्या विमानी परत जावं असं वाटायला लागलं. 

"बाहेरचं खायचं नाही मग काय मजा." मी फुरंगटले. मुलांनी सात्विक जीवनशैलीचे धडे दिले आणि मुकाट्याने हातात आलेलं घरगुती सॅडविच मी घशात घातलं. 

"बिंग बेंडला गेलो होतो तेव्हा दहा दिवस जे खाल्लं तेच परत?" आवंढा गिळत मी विचारलं.

"ते पिनट बटर होतं हे टोफरकी आहे." लेकाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.

"कसली फिरकी? काय तरी नावं पदार्थांची." मी टोफरकी तोंडात फिरवत पुढच्या दहा दिवसासाठी माझं तोंड तयार करत राहिले.

"अस्वलं असतात इकडे. फवारा घ्या. अस्वल आलंच समोर तर काय करायचं?" मी त्याला माकडचेष्टा करुन अस्वलाला पळवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं पण मुळात अस्वलांच्या जगात यायचंय कशाला असा कळीचा मुद्दाही उपस्थित केला.  अस्वल फवार्‍यासह आम्ही बाहेर पडलो आणि निसर्गात रममाण झालो. मुलाने सगळं ठरवलं होतं त्यामुळे सेंकदा सेंकदाला तो मस्त आहे ना असं विचारुन खात्री करत होता. अस्वल आगमनावर डोळा ठेवणं, लेकाने मस्त आहे का विचारण्याआधीच मस्त आहे म्हणणं यात इतकी तारांबळ उडाली. अलास्कात फक्त अस्वल नाहीतर मी फिरेन असं मी ठामपणे सांगितलं आणि तळ्याकाठी ठिय्या ठोकला. निसर्गसमाधी लावली. प्रत्येक दिवशी अस्वल दिसलं नाही की फवार्‍यासाठी खर्च केलेले ४० डॉलर्स अस्वलासारखे डोळ्यासमोर नाचायचे.

आम्ही प्रवासात भाड्याच्या गाडीने फिरतो आणि भाड्याच्या घरात तात्पुरते थांबतो. मुलं स्वयंपाकाचा ताबा घेतात आणि आठ - दहा दिवस सतत एकच पदार्थ खायला घालतात.  त्या एकाच पदार्थाला आम्ही रोजच्यारोज चविष्ट, मस्त, तू म्हणून इतके श्रम घेतलेस असंही म्हणतो. दर दोन दिवसांनी बाजाररहाट नावाचा एक कार्यक्रमही या प्रवासात असतो. जितकं अरबट चरबट दुकानात घेता येईल तेवढं मी घेते. फुकट गेलेली आई म्हणून मुलं नाकं मुरडतात आणि मुक्कामाला परत आलं की माझ्याआधी स्वत: सगळं फस्त करतात. 

"पुढच्यावेळी जरा चांगलं काहीतरी करा." टोफरकी तोंडात घोळवत मी पुटपुटले. होमर गावातून २ तासांच्या सफरीवर बोटीने जायचं होतं. धक्क्यावर भरपूर टपर्‍या आणि गंध दरवळत होते. आम्ही आपले टोफरकी खात बसलो होतो.

"आई, आपण खाण्यासाठी येत नाही फिरण्यासाठी येतो."  मुलं आलटून पालटून हे एक वाक्य फिरायला गेलो की कधीही ऐकवतात. 

"बरं, बरं आम्ही जरा बसतो इथे. तुम्ही या फिरुन बोटीची वेळ होईपर्यंत." मुलांची जोडी गेली आणि आम्ही नवरा - बायको ताडकन उठलो. आत्तापर्यंत  तो उगाचंच इकडे - तिकडे फिरत होता असं मुलांना वाटत होतं पण त्यांचा बाबा खाद्यपदार्थांची चाचपणी करुन आला होता.

"ती यायच्या आत उरकू." धक्क्यावरच्या सुग्रास पदार्थांच्या दिशेने आम्ही धाव घेतली,  ताव मारला. मुलं लांबून बघत असावीत. बाजूला येऊन उभी राहिली. 

"तुमच्यासाठीपण मागवलंय." मी साळसुदपणे म्हटलं.

"बिल." मुलाने  तरी आम्ही सांगत होतो नजरेने कागद फडफडावला. डोळे पांढरे व्हायची वेळ आली.

"तू किंमती बघितल्या नव्हत्यास?" अलास्कामध्ये प्रत्येक गोष्ट चौपट महाग असते. मुलांनी पढवलेली वाक्य म्हणत मी खाऊ की गिळू नजरेने  नवर्‍याकडे पाहिलं.

"तू खायला काय मिळतंय ते बघ, मुलांना पिटाळून गुपचूप खाऊ एवढंच म्हटलं होतंस." नवर्‍याने नेहमीप्रमाणे हात - पाय म्हणजे त्याचं जे काही या प्रकरणात अडकेल ते झटकलं.

"आता बोटीत काही मागवू नका." मुलाने त्याच्या मुलांना म्हणजे पालकांना सुनावलं. आम्ही माना डोलावून बोटीत खायला काय असेल याचा विचार करत राहिलो.

"कॅनाबिस कुठे मिळेल रे?" चमचमीत खाल्ल्याचे पैसे भरताना आमचे डोळे पांढरे झाले तसे कॅनाबिस विचारल्यावर मुलांचे डोळे विस्फारले.

"तुला गरज नाही. तू धुंदीतच असतेस नेहमी." नवर्‍याने त्याच्यामते सत्य सांगितलं आणि माझ्यामते नको तिथे नको ते बोलला. जागोजागी कॅनाबिसची छोटी छोटी दुकानं दिसायला लागली आणि मला प्रत्येकजण कॅनाबिस घेऊन गाडी चालवत असणार अशी शंका यायला लागली. आधीच अस्वल, मूस अशा प्राण्यांची धास्ती आता कॅनाबिस घेतलेल्या मनुष्यप्राण्यांचीही.  तेवढ्यात नवर्‍याने विचारलं.

"सारा पेलन कुठे राहते?" कॅनाबिसवरुन एकदम सारा पेलन!

"तिच्याकडे गेलं तर रशियाही दाखवेल ती आपल्याला." निवडणुकीच्या वेळी इतक्यावेळा ऐकलेलं होतं पेलनबाईंच्या अंगणात उभं राहिलं की रशिया दिसतं. आलोच आहोत तर बघावं.

"आपण फिरायला आलोय, सारा पेलनना बघायला नाही." सारा पेलनना भेटण्याचं नवर्‍याचं स्वप्न धुळीला मिळवलं. त्याने आपलं दु:ख निसर्गाच्या कुशीत लपवलं. निसर्ग हा असा असतो. कसंही करुन तो तुम्हाला आपलासा करतो. आजूबाजूचं जग विसरायला लावतो. आम्हीही कॅनाबिस न घेता धुंद झालो, रंगून गेलो!

 निसर्ग बोलला

 कवेत घे मजला!

 पृथ्वीसंगे प्रणय रंगला

 हिरवाईचा शेला खुलला!

 हिऱ्यानिळ्या जली डोंगर रमला

 हिम त्याच्या अंगी बागडला!

 भूलोकी सृष्टीचा देखावा सजला

 अलास्का स्वर्गीय गंधाने दरवळला!


(आम्ही अनुभवलं:

Matanuska Glacier guided tour, Exit pass glacier, Seward - Alaska Sea Life Museum, Kenaai Beach, Homer  - Rainbow Tour, Bishop Beach.

Alaska Wildlife Conservation Park, Denali NP.

निसर्गाच्या सानिध्यातून पुन्हा यावंसं वाटत नाही इतकं अलास्का सुंदर आहे. माणसांना माणसांची ओढ आहे. अगदी आपुलकीने स्थानिक गप्पा मारतात. राहण्याची ठिकाणंही रम्य होती. अलास्कामध्ये बहुतांश गोष्टी बाहेरुन येतात त्यामुळे सगळं  महाग आहे.)



Friday, August 20, 2021

दृश्यकथन - प्रारंभ!

अमेरिका: २१ ऑगस्ट २०२१ - सकाळी ११:३० वाजता (EST)

भारत: २१ ऑगस्ट २०२१ - रात्री ०९:०० वाजता

आमच्या youtube वाहिनीचे सभासद (Subscribe) नक्की व्हा

सत्य घटनेवर आधारित! कथा तरुण मुलाच्या फाजील उत्सुकतेची, अकल्पित वळणाची, समाज माध्यमांच्या उथळपणाची, उठलेल्या वादळाची आणि निर्माण झालेल्या मूलभूत प्रश्नांची! गुंतवून टाकणारं दृश्यकथन - प्रारंभ!
सत्य घटनेवर आधारित! कथा तरुण मुलाच्या फाजील उत्सुकतेची, अकल्पित वळणाची, समाज माध्यमांच्या उथळपणाची, उठलेल्या वादळाची आणि निर्माण झालेल्या मूलभूत प्रश्नांची! गुंतवून टाकणारं दृश्यकथन - प्रारंभ! 

या नाट्याचा प्रारंभ आम्ही गेल्यावर्षी अगदी जोरात केला. जोरात म्हणजे पार अगदी zoom गिरी रत्नागिरीलाच पोचली. रत्नागिरीत मी असतानाचे कलाकार आणि काही नव्या दमाचे कलाकार सज्ज झाले. सराव सुरु झाला. आनंदीआनंद पसरला आणि मग आला पाऊस, मग आला पाऊस, मग आला पाऊस. काहीवेळा कलाकार पावसाने गारठले तर काहीवेळा zoom!

प्रारंभचा शेवट होण्याची काही लक्षणं दिसेनात पण सुरू केलं आहे तर शेवट हा झालाच पाहिजे. इथेही रत्नागिरीशिवाय काही पान हलेना. रत्नागिरीच्या अनुप बापटचा मी ’आऽऽऽ’ ऐकला होता गाण्यातला. त्याला म्हटलं आता गद्यातला ’आ’ जमव. तो ’आ’ करुन बसला. पंकज शेट्ये, मिलिंद डबली, महेश जोशी सगळे एकापेक्षा एक. आम्ही एकत्र कामं केलेली पण आता वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावलो. उत्साहाने सगळे प्रारंभचा शेवट करण्यासाठी सज्ज झाले. निलेश माझा लेखक मित्र. तो सामील झाला आणि जोरदार प्रारंभ पाहून त्याने त्याच्या भूमिकेचा शेवट करुन टाकायचं ठरवलं. त्याचे दोर तोडून टाकल्यावर राहिला बिचारा शेवटपर्यंत. विक्रांत आणि अभिजय या दोघांनीही ढाणढाण संगीत द्यायला आणि कात्री मारायला सुरुवात केली. आम्ही आपले आमचे संवाद म्हणून मोकळे झालो पण त्यांच्या मनाला येईपर्यंत त्यांनी प्रारंभचा शेवट होऊ दिला नाही. एकेक भन्नाट कल्पना लढवत ते धावत होते. इतके की कधी थांबतायत तेच कळेना. थांबले तेव्हा उत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि संकलनाची अनोखी भेट आम्हा कलाकारांना त्यांच्याकडून मिळाली. प्रारंभचा शेवट होणे नाही असं वाटायला लागलं असतानाच जी काही अफलातून कामगिरी सर्वांनी केली आहे ती पाहायला या हे आमचं सगळ्याचं आग्रहाचं निमंत्रण.


Thursday, July 22, 2021

अंतराळ भरारीचे कोंदण

 ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या प्रवासी यानाचा अवकाशातील ११ मिनिटांचा
प्रवास अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.  वॉली फंक ही ८२ वर्षांची स्त्री अंतराळवीर आणि नेदरलॅडचा १८ वर्षीय ऑलिव्हर डेमेन. सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अंतराळवीर. जेफ आणि मार्क बेजोस या बंधूसमवेत या दोघांनी अंतराळ सफर केली. 

वॉली फंक नासाच्या (National Aeronautics and Space Administration)  पहिल्या १३ स्त्री अंतराळ प्रवासाच्या प्रशिक्षणार्थीपैकी एक. मर्क्युरी १३ या नावानेही या स्त्री अंतराळवीरांची ओळख आहे. या स्त्रियांनी विविध चाचण्यांतून स्वतःला सिद्ध केलं. काहीवेळा पुरुष अंतराळ प्रशिक्षणार्थींनाही त्यांनी  मागे टाकलं. मात्र नासाने कधीही या स्त्री वैमानिकांना अंतराळात जाण्याची  संधी दिली नाही. याबाबत नासाकडे बोट दाखवलं जात असलं तरी हे प्रशिक्षण नासाचं होतं हा गैरसमज असल्याचं म्हणतात. ज्या चाचण्या नासाने अंतराळवीरांसाठी स्वीकारल्या होत्या त्या चाचण्यांचा जनक लवलेस. लवलेसनी पुरुषांइतकीच अंतराळात प्रवास करण्याची  स्त्रीची क्षमता आहे का हे पाहण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं. शारिरिक, मानसिक, बौद्धिक सार्‍या पातळ्यांवर स्त्रिया पुरुषांइतक्याच अंतराळ प्रवासाला सक्षम आहेत हे  अगणित चाचण्यांच्या आधारे त्यांनी सिद्धही केलं. मात्र नासाने पुढील काही चाचण्यांसाठी लागणारी मदत लवलेसनी विनंती करूनही नाकारली. नासाने स्त्रियांना अंतराळात पाठवण्याचा विचारच केला नव्हता त्यामुळे लवलेसना माघार घ्यावी लागली.   

या प्रशिक्षणात समाविष्ट झालेल्या स्त्रियांचं अंतराळ प्रवासाचं स्वप्न धुळीला मिळाल्यावर त्यांनी आपल्या प्रवासाचा मार्ग बदलला. प्रत्येकीने वेगवेगळ्या क्षेत्रात  पाऊल टाकलं. वॉली फंकनी जग फिरून येण्याचं ठरवलं. काही वर्षांनी त्या वैमानिक झाल्या, विमान चालवण्याचं प्रशिक्षण देऊ लागल्या आणि अखेर अपघातग्रस्त विमानांच्या तपासणीचं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्‍या अडचणींचा अभ्यास करून त्यावर सरकारला उपाय सुचवण्याचं काम त्या करू लागल्या. आतापर्यंत १९,६०० तास त्यांनी उड्डाण केलं आहे तर ३,००० वैमानिकांना प्रशिक्षण दिलं आहे. 

१९६१ साली नासाने स्त्रियांचा विचारही अंतराळकक्षेत जाण्यासाठी केला नव्हता त्यामुळे वॉली फंक आणि तिच्याबरोबरीने प्रशिक्षणात भाग घेतलेल्याचा प्रवास सुरू होण्याआधीच संपला. अखेर नासातर्फे १९८३ साली  सॅली राइड अंतराळात प्रवास करणारी पहिली स्त्री ठरली तरी १९९५ पर्यंत यान चालवण्याची जबाबदारी स्त्रियांवर नासाने सोपवली नाही. एलिन कोलिन्स ही पहिली स्त्री जिने यान चालवलं. एलिनने वॉली फंक आणि इतर स्त्री अंतराळवीरांना या उड्डाणांच्यावेळी आमंत्रित केलं होतं. तब्बल ६० वर्षानंतर वॉली फंक यांचं अंतरिक्षात झेपावण्याचं स्वप्न साकार झालं ते न्यू शेफर्ड यानामुळे आणि जेफ बेजोसनी प्रवासासाठी आमंत्रित केल्यामुळे!

ऑलिव्हर डेमेन या नेदरलॅडच्या १८ वर्षांच्या मुलाला अनपेक्षितपणे ही संधी मिळाली. ब्लू ओरिजिन कंपनीने तिकिटाचा लिलाव बारा जूनला जगभरात सुरू केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १५९ देशांतून ७,६०० लोकांची अंतराळात जाण्यासाठी वाट्टेल तितके पैसे मोजण्याची तयारी होती. बोलीचा आकडा वाढत गेला आणि २८ दक्षलक्ष डॉलर्सला  तिकीट विकलं गेलं. ऑलिव्हर यानंतरच्या यानातून अंतराळात जाणार होता पण आयत्यावेळेला ज्या माणसाने तिकिट जिंकलं त्या ग्राहकाने वेळ जुळत नसल्याने माघार घेतली आणि ऑलिव्हरची वर्णी या पहिल्यावहिल्या प्रवासी यानात लागली. अंतराळात जाणारा सर्वात तरुण मुलगा म्हणून त्याचं नाव नोंदलं गेलं.

उरलेल्या दोन प्रवाशात स्वतः जेफ बेजोस आणि त्यांचा भाऊ मार्क बेजोस.  अपोलो ११ हे यान चंद्रावर गेल्याला जुलै महिन्यात ५२ वर्ष झाली. हाच मुहूर्त साधून आज या व्यावसायिक यानाने यशस्वी अंतराळ प्रवास पार पाडला. या अंतराळप्रवासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अॲमेझॉनचा राजीनामा देणार्‍या जेफ बेजोससाठी आजचं उड्डाण यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्याची चिन्ह आहेत. आता लवकरच पुन्हा हे यान अंतरिक्षात झेपावेल. अंतरिक्षात झेपावण्याची तुमचीही इच्छा असेल तर तुम्हाला फक्त $200,000 किंवा थोडेसे जास्त पैसे भरावे लागतील.

या मोहिमेबद्दल अर्थातच टिकेचं वादळही उठलं आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणूकीला उभ्या राहिलेल्या बर्नी सॅन्डर्सनी आपली नाराजी आधीच तीव्र शब्दात व्यक्त केली आहे. ’पृथ्वीवरच्या सर्वात श्रीमंत गणल्या जाणार्‍या अमेरिकेसारख्या देशात लोकांना रोजच्या उदरनिर्वाहाची भ्रांत आहे, वैद्यकिय उपचार घेण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाहीत पण त्याचं कुणाला काय? जगातली  श्रीमंत व्यक्ती अंतरिक्षात झेपावली आहे. अब्जाधीशांनी करही तेवढाच भरला पाहिजे.’ अशा अर्थी त्यांनी ट्विट केलं आहे.

बेजोसना मात्र भविष्यकाळाकडे नागरिक आणि प्रजातीचा दृष्टिकोन ठेवून म्हणून पाहण्याची आवश्यकता वाटते. आज आपण जे करतोय तो पुढच्या पिढीसाठी अंतरिक्षात काम करण्याचा पाया असेल आणि पृथ्वीवरच्या समस्या त्यामुळे काही प्रमाणात सुटतील असं त्यांना वाटतं.

२० जुलैच्या यशस्वी अंतराळ सफरीनंतर नवं क्षेत्र जेफना खुणावत असलं तरी जेफ बेजोसना तीव्र स्पर्धेलाही तोंड द्यावं लागणार आहे याची चिन्ह कधीच दिसू लागली आहेत. स्पेसएक्सचे इलॉन मस्क, व्हर्जिन गलॅक्टिकचे रिचर्ड ब्रॅनसन यांनी आधीच एक पाऊल पुढे टाकलेलं आहे.  गेल्याच आठवड्यात रिचर्ड ब्रॅनसननी अवकाशात झेप घेतली होती. तेही त्यांच्यावर होणार्‍या टिकेला तोंड देताना, त्याचं ध्येय मंगळावर मनुष्यवस्तीला हलवण्याचं असल्याचं सांगतात. मनुष्य हा एकाच ग्रहावरचा प्राणी असता कामा नये असं त्यांना वाटतं. 

आणि आजच ब्लू ओरिजिनाने  तिकिटविक्रीतून आलेल्या २८ दशलक्ष डॉलर्सपैकी १९ दशक्षलक्ष डॉलर्स अंतराळ संबंधित सेवाभावी संस्थांना देण्याचं जाहीर केलं आहे. यातील एक संस्था आहे अॲस्त्राफिमेना (AstraFemina) इथे संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील स्त्रिया एकत्रितपणे काम करून मुलींपुढे आदर्श उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

ब्लू शेफर्ड अंतरिक्षात झेपावून ११ मिनिटात परतही आलं. त्यातून प्रवास केलेल्या चौघांना एका अविस्मरणीय अनुभवाची सफर घडली. सर्वसामान्यांना थेट प्रक्षेपणाचा आनंद अनुभवता आला.  कितीही टिका झाली तरी आता गर्भश्रीमंतांना अंतराळाचा रस्ता खुला झाला आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी अशावेळी ८२ वर्षाच्या  वॉली फंकला तिच्या अथक प्रयत्नांचं, चिकाटीचं फळ ६० वर्षांनी का होईना मिळालं यात आनंद मानायला हवा, साजरा करायला हवा, वय हा नुसता आकडा आहे हे खर्‍या अर्थी सिद्ध करणार्‍या या तरुणीला मानाचा मुजरा आणि पुन्हा पुन्हा अंतराळात झेपावण्याच्या तिच्या कामनेला पूर्तीची सदिच्छा!

सकाळमधील लेखाचा दुवा:

https://www.esakal.com/global/jeff-bezos-space-trip-11-minutes-know-details-ssy93





Thursday, July 15, 2021

लेखक तुमच्या भेटीला

बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात मला भेटायला नक्की या.
भारतीय वेळ -  शनिवार, १७ जुलै, रात्री ९:३० वाजता. 
अमेरिका - शनिवार, १७ जुलै, सकाळी ११ CST.

Thursday, June 3, 2021

डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार

 जागतिक स्तरावर स्वयंसेवक म्हणून दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अमेरिकेतील डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार यांच्या कार्याचा, अनुभवांचा दृकश्राव्य खजिना!

सेवाव्रती - डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार.
संवादक - मोहना जोगळेकर
काव्यपंक्ती - प्रमोद जोशी
गायन - ज्योती कुलकर्णी
शनिवार, ५ जून २०२१.
सकाळी ११ वाजता (EST)
भारत - रात्री ८:३० वाजता

नक्की पहा.

युट्युब दुवा: https://www.youtube.com/watch?v=e6k3FqrTxAw

Wednesday, March 17, 2021

त्सुनामी

"ती खूप आरडाओरडा करतेय. घरी घेऊन जाऊ शकाल का तिला?" हे शब्द ऐकले आणि काळजीत पडलेले आम्ही हसायलाच लागलो. नवर्‍याने फोन ठेवला,

"डॉक्टर म्हणतायत, ’त्सुनामी इज व्हेरी व्होकल.’ ती जवळ येऊ देत नाही कुणाला. घरी घेऊन जा. तुमच्या हातून नाही खाल्लं तरच परत आणा."  ’त्सुनामी’ हो, खरंच आमच्या मांजराचं नाव  त्सुनामी आहे. 

प्रत्येकाने हातातली कामं टाकली आणि एरवी आवरायला तास न तास लागणारी (मी सोडून) आमच्या घरातली मंडळी अक्षरश: दहाव्या मिनिटाला हॉस्पिटलसमोर उभे होतो. कोविडच्या काळातच बाईंनी केलेले उद्योग नडले होते. आत जायला परवानगी नव्हती. अर्धातास बाहेर वाट बघत उभे होतो. त्सुनामीला पिंजर्‍यातून बाहेर आणलं आणि बराच वेळ पंधरा दिवस त्सुनामीची काळजी कशी घ्यायला लागेल ते ऐकत होतो. त्सुनामीही पिंजर्‍यात निपचीत पडून होती. मी काहीतरी प्रश्न विचारला आणि  पिंजर्‍यात गडबड उडाली. त्सुनामीने आतमधून धडका द्यायला सुरुवात केली. वाघाची मावशी तेवढ्याशा जागेत सैरभैर होऊन गुरकावत होती.

"आपला आवाज आत्ता ऐकला तिने. आता नाही राहणार ती. चला, निघूया." आम्ही भरधाव वेगाने घरी पोचलो. कधी एकदा त्सुनामीची सुटका करतोय, तिला खाऊ घालतोय, जवळ घेतो असं झालं होतं. पिंजर्‍याचं दार उघडलं आणि बिचारीला तिच्या गळ्याभोवती बांधलेल्या नरसाळ्यामुळे पटकन आमच्याकडे येताही येईना. लेकीने भरून आलेल्या डोळ्यांनी आपला तळवा पुढे केला. तिच्या तळव्यावरचं खाणं हावरटासारखं क्षणार्धात त्सुनामीने गट्टही केलं.

’शी इज नॉट लेटींग अस टच हर ॲड नॉट इटींग’, ’शी इज व्हेरी व्होकल.’ आम्ही सगळेच डॉक्टरांची वाक्य जशीच्यातशी म्हणून त्सुनामीने त्यांना कसं नको जीव करून सोडलं असेल याची कल्पना करत होतो,  हसत होतो. एक दिवसही ती आम्हाला सोडून राहू शकत नाही, घरी आल्याआल्या कसं पटकन खाल्लं हे परत परत एकमेकांना सांगत होतो. तिच्या पुन्हा प्रेमात पडण्याच्या हा क्षण अवर्णनीय आहे. त्सुनामीच्या आमच्यावरच्या प्रेमाचा साक्षात्कार नव्याने झाल्यामुळे पुन्हा पुन्हा तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करत होतो. तिला दोन आठवडे फिरण्याची, उड्या मारण्याची परवानगी नव्हती पण आम्हाला मात्र घरभर आनंदाने फिरावं, उड्या माराव्यात असं उत्कटतेने वाटत होतं. त्सुनामीला या सगळ्यातून का जावं लागलं हे सांगण्याआधी त्सुनामीचं आगमन आमच्याकडे कसं झालं ते सांगते.

"आणायचाच तर कुत्रा आणू तो माणसांवर प्रेम करतो. मांजरं फक्त  घरावर करतात." लहानपणापासून मांजरांना घर धार्जिणं हे ऐकलेलं.
"मांजरं स्वच्छ असतात. कुत्रे घाणेरडे." मुलीने पेचात टाकलं.
"असं असेल तर दोन्ही नको. इथे नियमपण खूप असतात." कुत्रा, मांजर की काहीच नको यावर बरीच चर्चासत्र झडली, गूगल चाचपणी झाली. लहानपणी आमच्याकडे खूप मांजरं होती, शेजार्‍यांचे किंवा आजूबाजूचे कुत्रे असायचे पण कायम वस्तीला असल्यासारखा प्राणी कधीच नव्हता. कोणता प्राणी येणार हे अखेर ठरलं. कुणाला तरी नको म्हणून किंवा त्यांचा छळ झाला म्हणून सुटका केलेल्यांपैकीच आणायचा हे मात्र एकमताने ठरलं होतं.  ’हयुमेन सोसायटी’ या संस्थेत शिरल्या शिरल्या कुत्रे आणि मांजरंच जिकडेतिकडे. मला पुन्हा कुत्रा हवासा वाटायला लागला. मांजरं तर काय आमच्याकडे होतीच लहान असताना पण माझ्या मनात हिचिकोचा पुतळा होता. मालकाचं निधन झाल्यावर त्याचा कुत्रा टोकियो स्थानकावर रोज ठरल्यावेळी वाट पाहत थांबायचा. हिचिको वारल्यावर तिथे आता त्याचा पुतळा आहे. मी तिथल्यातिथे मुलीला आणि नवर्‍याला कोपर्‍यात घेतलं.
"हे बघा आपण कुत्राच घेऊ."
"का पण? किती पटकन तू तुझी मतं बदलतेस." मुलगी एकदम माझ्या क्षणाक्षणाला बदलणार्‍या निर्णयांवर घसरली. आत्ता मला कुत्रा हवा होता त्यामुळे मी ते मनावर घेतलं नाही.
"मी मेल्यानंतर माझा पुतळा होण्याची कितपत शक्यता आहे?" मी दोघांच्या हृदयाला हात घातला.  निर्विकारपणे मुलगी म्हणाली.
"शून्य आहे अशी शक्यता. भलत्या आशेवर जगू नकोस."
"आम्हीच उभारू तुझा पुतळा. खूष?" नवरा आधीच मोठ्या मुष्किलीने कुत्र्या, मांजराचा वास सहन करत होता त्याला परिस्थितीतून पटकन सुटका हवी होती.
"ऐका ना. माझा नकोच पण माझ्या कुत्र्याचा पुतळा झाला तर चालेल." 
"अच्छा अच्छा हिचिकोसारखं. आई, अगं त्याचा मालकपण किती प्रेमळ होता." घरात मुलगी असण्याचा आनंद पुन्हा नवर्‍याच्या चेहर्‍यावर झळकला. माझा कुत्र्याचा आग्रह बाजूला फेकला गेला.

मांजरामागून मांजरं आम्ही बघितली. सगळीच आवडत होती पण घ्यायचं एकच होतं. आम्हाला विल्सन आवडला. तसा अर्ज आम्ही भरला. हो. अर्ज. अगदी उत्पन्नासहित सर्व माहिती त्यात भरणं आवश्यक. आता एकदा का हा अर्ज कार्यकारिणीच्या डोळ्याखालून गेला की आलाच विल्सन आमच्याघरी असं म्हणत आम्ही घरी परत आलो.
"एका दिवसात कळवतो आम्ही." असं त्यांनी सांगितलं आणि आवश्यक गोष्टींची यादी हातात दिली.  तशी गडबडच उडाली. नवजात बालकाच्या आगमनासारखीच ही तयारी होती. डॉलर्सचा आकडा जसा वाढत होता तशी माझी कुरकूरही.
"आमच्याकडे मांजरं खोक्यात राहायची. गोणत्यात घालून आणायचो. दूध, पोळी जे घालू ते खायची. तुम्ही अमेरिकन फारच स्तोम माजवता प्रत्येक गोष्टीचं." माझं अमेरिकनत्व आणि भारतीयत्व मी सोयीप्रमाणे वळवते हा मुद्दा यायच्या आत मी विल्सनच्या गुणगानाला सुरुवात केली. सांगितलेलं सामान धावाधाव करून आणलं. आता प्रतिक्षा सुरू. फोन काही येईना. चौकशीसाठी फोन केला. उडवाउडवीची उत्तरं मिळाली. मोठ्या मुष्किलीने दोन दिवस वाट पाहिली. तिसर्‍या दिवशी मुलीने बाबाला विल्सनला आणायलाच पाठवून दिलं. बाबा हात हलवत परत आला. "विल्सन कुठे आहे?" एखादा मुलगाच आणायला गेल्यासारखं मला सारखं विल्सन नावामुळे वाटत होतं.
"नाही देत ते विल्सन आपल्याला." बाबा आता त्याचे फक्त हातच हलवत नव्हता, निराशेने मानही उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे वळत होती.
"का पण?" विल्सन आपल्या आयुष्यात येणार नाही या कल्पनेनेच मुलीच्या काळजाचे शतश: तुकडे झाले. "माझ्यामुळे." आता खरंतर मला वाईट वाटायला हवं होतं पण नवर्‍यामुळे काहीतरी बिघडलं याचा आनंदच झाला. कारणं मरू देत. मुलीच्या हातून आता तो काही सुटत नाही हे तर समोरच दिसत होतं. विल्सनला विसरून जुगलबंदीवर मी लक्ष केंद्रित केलं.
"तू काय केलंस?" मुलीचा स्वर बाबाने नेहमीप्रमाणे काहीतरी घोळ घातला असाच होता. 
"मी प्रश्न विचारले होते त्यांना. आठवतंय?" बाबाने लेकीलाच विचारलं.
"काय विचारलं होतंस?"
"मला प्राण्यांच्या वासाने शिंका येतात असं सांगितलं होतं आणि खूप त्रास झाला तर विल्सनला परत आणून दिलं तर चालेल का असा प्रश्न विचारला होता. आठवलं?"
"हो. पण त्यांनी सांगितलं होतं तुमच्या शंका बिनदिक्कत विचारा. तुझी शंका बरोबर होती." मुलीने चक्क बाबाची बाजू घेतली त्यामुळे मलाही त्याचं बरोबर आहे हे पटलं. 
"म्हणूनच विल्सन येणार नाही." तो पडेल स्वरात म्हणाला.
"तू भांडला नाहीस त्यांच्याशी? आपण किती तयारी केली." मुलीचा चेहरा एवढुसा झाला. आम्ही तिलाच एकदा त्यांच्याशी बोलायला सांगितलं. पंधरा वर्षाच्या मुलीचा आवाज ऐकून बहुतेक त्यांनाही पाझर फुटला. विचार करून उद्या कळवतो असं आश्वासन तिला मिळालं. अस्वस्थ मनाने लेकीने इतर ठिकाणं शोधून काढली. तिचं मन मोडायचं नाही, एवढासा झालेला चेहरा जरा फुलेल म्हणून आम्हीही मांजरं बघायला बाहेर पडलो.
"इथे ’विंडो शॉपिंग’ च करा नाहीतर दोन दोन मांजरं घरी. लगेच देणार नाहीत ना?" विल्सन येईलच घरी असं माझं मन सांगत होतं.
"बोका आणि भाटी अशी जोडी बिलकूल नको. नाहीतर त्यांची बाळंतपणं आणि मग पिल्लाचं काय असा प्रश्न पडतो." मी माझी भूमिका कधी नव्हे ती ठामपणे मांडली.
"पिलं नाही होणार. आधीच ऑपरेशन करतात." मुलीचं दांडगं संशोधन होतं तर.
"आणि लगेच नको आणायला. बघून ठेवू. विल्सनचं समजलं की ठरवू." मी पुन्हा पुन्हा हे सांगून तिच्या मनाची तयारी करत होते.
"तोपर्यंत एखादं मांजर आवडलं आणि  गेलं तर?" मुलीला आता काही झालं तरी मांजर हवंच होतं.
"सगळी सारखीच तर दिसतात. ते गेलं तर दुसरं." या विधानाने काय घोडचूक केली ते लक्षात आलं.  रंग, जाती, वागणं, दिसणं यावर चर्चासत्र झालं आणि त्यानंतरच आम्ही बाहेर पडलो.

या संस्थेत दाराशीच दोन मुली चेहरा पाडून बसल्या होत्या.
"बघ, बहुतेक त्यांच्या आई - बाबांना मांजर हवंय. दोघींना ओढून आणलंय त्यांनी. मला आणलंत तसं. " मी पुटपुटले."त्या मांजर परत करायला आल्यायत." मुलगी कुजबुजली. माझा जीव एकदम भांड्यात पडला. नाही म्हटलं तरी मांजराला आम्ही रुळलो नाही, मांजर आम्हाला रुळलं नाही तर काय ही चिंता होतीच.
"बाबाच्या शिंका वाढल्या तर आपल्याला काळजी नाही." मी निःश्वास टाकून म्हटलं.
"तुम्ही ’एशियन’ घ्यायच्या आधीच परत कसं करता येईल याचा विचार का करता? प्राण्यांना तरी सोडा यातून." यात मला कितीतरी मुद्दे चुकीचे दिसत होते. जसं ती सगळ्या एशियन्सना एकाच पारड्यात टाकत होती.  चायनिजांपेक्षा स्वत:ला उच्च समजणार्‍या भारतीयांचा घोर अपमान त्यामुळे होत होता. स्वत:ला कट्टर ’अमेरिकन’ समजत होती. मांजर महत्त्वाचं होतं म्हणून मी मांजरांच्या दिशेने तोंड वळवलं. वेगवेगळ्या रंगांची, आकाराची, चेहर्‍याची मांजरं बघताना प्रेमातच पडायला झालं. आता घरातल्या सर्वांनी एकाच मांजराच्या प्रेमात पडलं तर काही बिघडलं असतं का? लगेचच तिघांना तीन वेगवेगळी मांजरं आवडली.
"दादाला फोन करून दाखवून घे नाहीतर त्याचा पापड मोडेल." मी गुंता आणखी वाढवत होते पण लेकीने लगेच जाहीर केलं.
"तो कुठे आपल्याबरोबर राहतो. मांजर माझं आहे. मी कॉलेजमध्ये जाताना बरोबर घेऊन जाणार."
"आधी मांजर येऊ दे घरी मग कॉलेजमध्ये नेण्याच्या गोष्टी." लेकीच्या उत्साहाला आवर घालत आवडलेलं मांजर त्यांच्या पिंजर्‍यातून काढण्याचा, त्यांनी आम्हाला बोचकारण्याचा, म्याव करून रागारागाने बघण्याचा कार्यक्रम पार पाडला.
"हेच, हेच मांजरांचं मला आवडत नाही. फारच फिस्कारतात." मी अगदीच नाराज झाले.
"म्हटलं की करा प्रेम अशी नसतात ती कुत्र्यांसारखी. स्वत:चं मत असतं त्यांना." लेकीने मांजरांचं समर्थन केलं.
"मांजरांना? मला वाटलं फक्त तुलाच असतं स्वत:चं मत." मी हळूच पुटपुटले. तिने लगेच तिचं मत जोरात व्यक्त केलं.
"असायलाच हवं आणि ते मांडताही आलं पाहिजे. सापांनासुद्धा स्वत:चं मत असेल." मी बघतच राहिले.
"साप कुठे आला आता यात? मांजरं पुरे की." प्राण्यांचा मित्रमेळावा जमेल की काय थोड्याच दिवसात या कल्पनेनेच धास्तावले मी.
"मांजर अडवतं सापाला असं तू सांगतेस ना नेहमी म्हणून साप आठवला. तोही मांजराला विरोध करतच असेल ना?"
"मला नाही बाई माहीत. मी कधी त्याला बोलावलं नाही मुद्दाम हे तपासायला." माझ्या निरागस वक्तव्यावर ’मूर्ख कुठली’ असा तिने चेहरा केला आणि मांजराला जवळ ओढलं. फोटाफोटी झाली, दादाला फोटो पाठवून त्याला आवडेल ते मांजर घ्यायचा निर्णय झाला.
"इथपर्यंत यायचं आपण, बघायची आपण आणि फोटोवरून ठरवणार तो?" हा अन्याय होता पण लोकशाहीत मतदानाने जिंकता येतं त्यामुळे त्या एका मतावर तीन मांजरांचं भविष्य अवलंबून होतं.
"हनीबनी" लेकाने शिक्कामोर्तब केलं. मी मनातल्या मनात आनंदाने उड्या मारल्या. वरवर म्हणाले,
"हनीबनी काय किंवा तुम्हाला आवडलेली मांजरं काय. शेवटी एका प्राण्याला घर मिळणं महत्त्वाचं."
"खोटारडी." लेक पुटपुटली तरी ते ऐकू न आल्यासारखं केलं.
"उद्याशिवाय मिळणार नाही ना? अर्ज भरायचा असेल ना? विल्सनचंही समजेल तोपर्यंत." मी खात्री करणार त्याआधीच हे प्रश्न विचारायला लेक गेली आणि आली ती उड्या मारतच.
"लगेच देतायत."
"नको, नको. लगेच नाही नेता येणार आपल्याला. विल्सनलापण आणायचं झालं तर?" तीन माणसांच्या घरात दोन मांजरांचा धुमाकूळ मला  दिसायला लागला.
"ते बघू नंतर." हनीबनीला आता घरी न्यायचं हेच लेकीने ठरवलं. बोका आणि भाटी घरात येणार या धास्तीत मी असतानाच हनीबनी तिच्या परडीत विसावलीही. एवढुशी. चार महिन्यांची. कागदपत्र भरत असतानाच दिडशे डॉलर्स देऊ ना असं विचारत नवर्‍याने  पैसे भरलेही.
"मला वाटलं फुकट आहे."
"तुला सगळंच फुकट पाहिजे असतं." मुलीने हटकलं.
"कुणालातरी नको म्हणून आपण घेऊन जातोय ना." दिडशे डॉलर्स माझ्या डोळ्यासमोर नाचत होते.
"आपल्याला हवी आहे हनीबनी म्हणून आपण घेऊन जातोय ना." लेकीने खडसावलं.
"दिडशे काय, तीनशे दे. माझ्या बापाचं काय जातंय." मी म्हटलं. नवरा लगेच पुढे झाला,
"तुझ्या बापाचं गेलं तर तिला काही फरक पडत नाही." त्याने लेकीला समजावलं.
"बाप म्हणजे काय?" लेकीने शांतपणे विचारलं. उत्तर देण्यातला फोलपणा लक्षात आला आणि हनीबनीला घेऊन आम्ही निघालो.

घरी येऊन हनीबनीच्या कौतुकात आम्ही मग्न होतोय तेवढ्यात विल्सनच्या घरून फोन खणखणला. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.
"आता?" मी धसकून विचारलं.
"आधी बघा तर काय म्हणतायत." तेवढ्यात व्हिडिओ कॉलवरून हनीबनीचं कौतुक करण्यात मग्न असलेले पुत्ररत्न म्हणाले.
"न्या म्हणत असतील तर आणूया विल्सनलाही. एखाद्याच्या तोंडचा घास नको हिरावून घ्यायला." मांजरच नको म्हणणारी मी विल्सनलाही आणायला तयार झाले. मुलीला दोन- दोन मांजरं घरात येणार म्हणून अपरिमित आनंद झाला. तिनेच फोन घेतला. काय बोलणं चालू आहे हे तिच्या चेहर्‍यावरुन लक्षात येत होतंच. 

"जाऊ दे. आपल्याकडे हनीबनी आहे ना." त्यांचा नकार तिला पचवता यावा म्हणून आम्ही म्हटलं आणि हनीबनीचं बारसं करू, नाव बदलू असंही सुचवलं. तिच्या मित्रमैत्रिणींना म्हणायला सोपं पाहिजे म्हणून मराठी नको हे जसं ठरलं तसं इंग्रजी नको हेही. नावाचा शोध सुरू झाला आणि अचानक  कधीतरी  त्सुनामी ठरलंही. पाहता पाहता त्सुनामी आम्हाला रुळली आणि आम्ही तिला. कुत्रा, मांजर कुणाच्या घरी पाहिल्यावरही नाकं मुरडणारे आम्ही त्सुनामीच्या प्रेमात पडलो. त्सुनामीच्या फिस्कारण्याचं, शेपटी हलवण्याचं, मागे मागे फिरण्याचं घरातल्या लहान मुलासारखं कोडकौतुक व्हायला लागलं. त्सुनामी लाडाने बिघडली आहे असं म्हणत एकमेकांकडे बोटही दाखवायला लागलो. कुत्रा आणि मांजर यांची तुलना अधूनमधून होत राहिली तरी ती उगाच एकमेकांना चिडवायला. त्सुनामीचं घरभर हैदोस घालत धावणं, तिच्या झाडावर सरसर चढणं, उंटासारखी पाठ करत आम्हाला तिच्याशी खेळायला लावणं यात रमून गेलो. पाहता पाहता वर्ष झालंही त्सुनामी आमच्या घरात येऊन.

सकाळी उठल्या उठल्या तिचं पायात येणं इतक्या सवयीचं झालं की ज्या दिवशी ती तशी आली नाही तेव्हा अगदीच अस्वस्थ व्हायला झालं. वाटलं, काहीतरी खाल्लं असेल, पोट बिघडलेलं दिसतंय. नंतर मात्र ती बसल्या जागेवरून उठेना. घाबरल्यावर प्रतिकारासाठी अंग फुलवतात तसं संपूर्ण शरीर फुललेलं. काय करावं कळेना. आम्ही डॉक्टरांकडे धावलो. एक्सरेतून तिने काय खाल्लं असेल ते काही कळेना. औषधं देऊन एक दिवस वाट पाहायचं ठरलं. रात्री आम्हाला उगाचच थोडं खातेय, बरी दिसतेय असं वाटत होतं. बहुतेक आमच्या मनाचं समाधान. तिने काहीतरी खाल्लं आहे हे नक्की होतं त्यामुळे ते काय या विचाराने हैराण झालो. ती पडलेलं काही खाईल अशी शक्यताच वाटत नव्हती कारण तसं आमच्या घरात प्रत्येकजण नीटनेटका असल्याने पसारा असा नसतोच. मग खालं काय, कुठे आणि कधी? उत्तर सापडत नव्हतं. दुसर्‍या दिवशी पुन्हा डॉक्टर. एका रात्रीत त्सुनामी इतकी हवालदिल झाली होती. हात लावू देत नव्हती, आवाज फुटत नव्हता. सकाळी माझ्या पायाशी येऊन बसलीच. डोळ्यात पाणी. आमचा जीव अगदी तुटला.  अपराधीही वाटत होतं. आपल्या हलगर्जीपणामुळे तिच्या पोटात काहीतरी अडकलं ही भावना फार वेदनादायी. आता डॉक्टरांनी वाट पाहू असं सांगितलं तरी आम्हाला थांबवेना. आमच्या डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. कोविड१९ मुळे अर्थातच आम्हाला आत प्रवेश नव्हता. 

एकदा तिला आत सोडल्यावर रात्री बारा वाजता नर्सकडून; शस्त्रक्रिया झाली आणि फोमचा तुकडा पोटातून काढला हे कळलं.  हा फोमचा तुकडा कुठे होता या विचाराने आम्ही हैराण. विचार करकरूनही लक्षात येईना. त्सुनामीबरोबर जेव्हा तो तुकडाही आला तेव्हा सारा उलगडा झाला. अधूनमधून ती कोट, स्वेटरच्या क्लॉजेटमध्ये जायची. तिथे मायक्रोव्हेव कार्टच्या मागे फोमची चटई होती. त्सुनामी जेव्हा जेव्हा तिथे जाई तेव्हा ती चटई कुरतडत असणार. आम्हाला  त्याचा पत्ताच नव्हता. मोठा तुकडा गेल्यावर कोणत्याच मार्गाने तो बाहेर पडेना. क्षकिरणांनीही (X - ray) काय खाल्लं ते कळलं नव्हतं.  अखेर शस्त्रक्रिया हाच शेवटचा मार्ग होता. शस्त्रक्रियेचा खर्च ऐकताना क्षणभर मन द्विधा झालं होतं पण खर्चापेक्षा तिचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं, वेदनामुक्त होणं आवश्यक होतं. विमा न घेतल्याचा पश्चात्ताप झाला. भारतातल्या मांजरांच्या अनुभवांवरून आम्हाला तशी गरजच वाटली नव्हती. तिथली मांजरं दिवसभर घरात नसायची हे आम्ही विसरलोच होतो. 

"तिला घेऊन जा घरी. शी इज व्हेरी व्होकल ॲड नॉट लेटिंग अस टच." या वाक्याने आम्ही गहिवरलो तेवढ्यात पुढच्या
"तिने काहीतरी खाणं आवश्यक आहे. तुमच्या हातून खाईल. नाहीच खाल्लं तर परत आणा." या शब्दांनी आपल्या हातून नाही खाल्लं तर अशी भितीही वाटायला लागली. तिला परत आणतानाही तेच मनात होतं.

"काळजी करू नकोस आई. खाईल ती घरी आली की." लेकीने आश्वासन दिलं. घरी पोचलो. पिंजर्‍याचं दार उघडलं. त्सुनामीला तिच्या गळ्याभोवती बांधलेल्या नरसाळ्यामुळे पटकन आमच्याकडे येताही येईना. लेकीने भरून आलेल्या डोळ्यांनी आपला तळवा पुढे केला. तिच्या तळव्यावरचं खाणं हावरटासारखं क्षणार्धात त्सुनामीने गट्टही केलं आणि लेकीला, आम्हाला ती पुन्हापुन्हा चाटत राहिली. त्सुनामीच्या आणि आमच्या नात्यातले बंध नव्याने आम्हाला  कळले आणि  त्याक्षणी हजाराच्या आकड्यात केलेला तिच्या शस्त्रक्रियेचा खर्च अगदी क्षुल्लक वाटून गेला.












Monday, March 1, 2021

श्री ठाणेदारांची मुलाखत - youtube

 शनिवारी श्री ठाणेदारांची घेतलेली मुलाखत म्हणजे आनंदाचा ठेवा!  कितीतरी गोष्टींना वेळेअभावी फक्त स्पर्श 


करता आला.  २००५ साली ही ’श्री’ ची इच्छा हे पुस्तक हातात पडलं तेव्हा विलक्षण भारावून जायला झालं होतं. त्यांच्यासारखाच आपणही काहीतरी भलाथोरला उद्योगधंदा उभारावा असंही वाटून गेलं होतं. वेळेअभावी तो विचार लवकरच बाजूला पडला :-) पण पुस्तक मात्र कायमचं मनातला एक कोपरा अडवून राहिलं.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मी  त्यांना त्यांच्या पुस्तकातला एखादा उतारा वाचून ते चित्रीत करुन पाठवतील का असं विचारलं आणि ते मुलाखतीसाठीच तयार झाले. इतकंच नाही तर त्यांचं दुसरं पुस्तकही ताबडतोब मला पाठवून दिलं. अधाशासारखी दोन्ही पुस्तकं मी परत वाचली. ठाणेदारांच्या जीवनप्रवासाने अचंबित होत राहिले. दीर्घकाळ लक्षात राहील अशी ही मुलाखत मला घ्यायला मिळाली याबद्दल ठाणेदारांचे मन:पूर्वक आभार. या निमित्ताने त्यांच्याशी आधी आणि नंतर झालेल्या गप्पा म्हणजे सकारत्मकतेचा आणि उत्साहाचा उत्सव!

ही मुलाखत पाहून त्यांची पुस्तकं वाचण्याची इच्छा कितीतरीजणांना व्हावी ही इच्छा आणि पुस्तकं वाचायची असतील तर मुलाखत पाहिली नसेल तर पाहा आणि प्रतिक्रियेत इमेल नोंदवा. पुस्तक लगेच तुमच्यापर्यंत पोचेल. श्री ठाणेदारांनी दोन्ही पुस्तकं तुमच्यासाठी उपलब्ध करुन दिली आहेत. विनामूल्य!

Youtube:

https://www.youtube.com/watch?v=MxQsMDgRfBs

Facebook:

https://www.facebook.com/CharlotteMarathiMandal/videos/1037898120037119/  


Sunday, February 28, 2021

अमेरिकेतील काही लेखकांच्या गप्पा आणि अभिवाचन

 मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम.

ज्यांचं साहित्य पुस्तकरुपात प्रसिद्ध झालं आहे अशा अमेरिकेतील काही लेखकांच्या गप्पा आणि अभिवाचन.
आपली माती आपले लेखक!

दिनांक - २८ फेब्रुवारी २०२१
वेळ - सकाळी 11 वाजता (EST)
भारतीय वेळ - रात्री ९:३० वाजता.
सहभाग :
मोहना जोगळेकर, प्राजक्ता पाडगावकर, प्रियदर्शन मनोहर
गिरीश देसाई.

Youtube:

Wednesday, February 24, 2021

श्री ठाणेदार यांची मुलाखत - २७ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता (EST)

 वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात विलक्षण चढ उतारांना जिद्द, चिकाटीने सामोरे गेलेले श्री ठाणेदार हे नाव सुपरिचित आहे ते त्यांची ही कहाणी सांगणार्या पुस्तकांनी. व्यवसाय, लेखन आणि आता राजकारण अशा वेगवेगळ्या प्रांतात आपल्या नावाची मोहोर उठवणार्या या व्यक्तिमत्त्वाला भेटू या २७ तारखेला ११ वाजता (EST) मराठी भाषा दिनानिमित्त!

शनिवार, दिनांक २७ फेब्रुवारी
वेळ - सकाळी ११ वाजता (America - East Coast Time )

Thursday, January 7, 2021

संकल्प , मंत्र - गोंधळात गोंधळ

 मी गेली काही वर्ष जग सुखी व्हावं म्हणून एक प्रार्थना करते पण अचानक आधी आपणच सुखी व्हावं, जगाचं नंतर बघू असं मी ठरवलं. त्याकरता मला प्रार्थना बदलावी लागली. मी माझा स्वत:चा मंत्र निर्माण केला आणि तिथेच सगळा गोंधळ झाला. आधी मंत्र सांगते, मग गोंधळ. सोडून दे, सोडून दे स्वत:ला शांती दे हा तो मंत्र. आता गोंधळ. 

आमच्या घरात प्रत्येकजण सदगुणाचे पुतळे आहेत, म्हणजे तसं प्रत्येकाला वाटतं. छोटा पुतळा इतके दिवस बाहेर होता त्यामुळे छोट्या पुतळीला सदगुणाचं प्रदर्शन करायला  ’वाव’ मिळाला नव्हता.  मार्चपासून कोविडमुळे छोटा पुतळा घरी आला आणि संगतीने छोटी पुतळी बिघडली. गोंधळ सुरु झाला. गोंधळाची कारणं दोनच. एकत्र बसून पाहिलेले सिनेमे आणि जेपर्डी (T.V. show). त्याआधी मी मुलांवर संस्कार झाले पाहिजेत म्हणून जेवायला एकत्रच बसलं पाहिजे असा हट्ट धरला होता. एकत्र बसायचं तर एक पक्की वेळ ठरायला हवी. आई  वेळेत स्वयंपाक करेल का हा इतरांचा मुद्दा आणि स्वयंपाकांचं कंत्राट नक्की कुणाचं हा माझा आवेशपूर्ण प्रश्नात्मक मुद्दा. या दोन मुद्द्यावरुन गाडी पुढे सरकलीच नाही  म्हणून ती गाडी मीच दुसर्‍या दिशेला वळवली. जेपर्डी आणि सिनेमे! 

छोटा पुतळा एकदा ’ब्रेन गेम’ (T.V. show) मध्ये जाऊन आल्यापासून घरात फक्त त्यालाच ’ब्रेन’ असल्यासारखा वावरत असतो. तुला एकही उत्तर देता आलं नव्हतं. मित्रामुळे जिंकलात तुम्ही असं मी म्हटलं की त्याच्या बालपणातल्या आठवणींवर मीठ चोळू नये अशी नेत्रपल्लवी मोठा पुतळा करतो. मी त्याला जोराने ’काय?’ विचारते. तो परत नेत्रपल्लवी करतो. आमच्या ’पल्लव्या’ चालू असतानाच जेपर्डी सुरु झालेलं असतं. जेपर्डीच्या ॲलेक्सनी प्रश्न विचारला की उत्तरासाठी आम्ही ’ब्रेन गेम’ विजेत्याकडे बघायला लागतो. फुशारकीने तो उत्तर देतो. ते चुकलेलंच असतं. एखादं चुकून बरोबर आलं की  ’ब्रेन’ असल्याचा पुरावा दिल्यासारखा तो आमच्याकडे बघायला लागतो. जेपर्डी संपल्यावर छोटा पुतळा जाहीर करुन टाकतो की आईला एकही उत्तर येत नाही म्हणून ती मध्येमध्ये बोलते त्यामुळे त्याला काही सुचत नाही. नाचता येईना अंगण वाकडं ते हे असं; असं मी म्हणते पण मला राग येतो तो; मला उत्तर येत नाही म्हणून मी मध्येमध्ये बोलतेय हे याला कसं कळलं याचा. मी माझ्या रागावर मंत्राने विजय मिळवते. सोडून दे, सोडून दे, स्वत:च्या मनाला शांती दे! मला पुटपुटणं जमत नाही म्हणून मोठ्याने!

आईला जेपर्डीमध्ये  रस नाही म्हणून आपण एकत्र चित्रपट बघू असं छोटा पुतळा - पुतळी ठरवतात. मोठ्या पुतळीची बोलती बंद करण्याचा उपाय. चित्रपट चालू असतानाच पुढे काय याची मला फार उत्सुकता असते. पहिला प्रसंग आटपतोय तोच, ’आता काय होईल?’ हा प्रश्न ऐकला की, आम्ही दिग्दर्शक नाही, माहित नाही वगैरे उत्तरं येतात पण तोपर्यंत चित्रपटातली माणसं काय बोलत होती ते जातं. मग ’ते काय म्हणाले आत्ता?’ असा प्रश्न मला पडतो. तो मी फक्त मलाच पडू न देता इतरांनाही त्यात खेचते. एकीकडे चित्रपट चालूच राहतो. आई खूप बोलते हे  सांगण्यासाठी छोटे पुतळा - पुतळी चर्चासत्रच आयोजित करतात. छोटी पुतळी,  मला आईबरोबरच राहावं लागतं, ती म्हणेल ती पूर्वदिशा असते वगैरे म्हणत दर्दभरे नि:श्वास टाकायला लागते.  छोटा पुतळा, आता फार दिवस राहिले नाहीत, कॉलेजसाठी तू लवकरच बाहेर पडशील असा दिलासा तिला देतो. मोठा पुतळा स्मितहास्य देऊन नक्की कुणाला पाठिंबा देतोय ते लपवतो.  आता इतकं झाल्यावर  मोठी पुतळी तिचा मंत्र मांजर नखं काढतात तसा बाहेर काढणारच ना. 

सोडून दे, सोडून दे, स्वत:च्या मनाला शांती दे! ज्या टिपेला चर्चा त्या टिपेला मंत्र!

या मंत्राचा महिमा फक्त जेपर्डी आणि सिनेमापुरताच राहिलेला नाही. तो वाक्यावाक्याला वापरावा लागतो. मंत्रातला ’सो’ तिने सुरु केला की मोठी पुतळी शांत व्हायला लागते पण तो ’सो’  कानावर पडला तरी उरलेल्या पुतळ्यांचं मस्तक फिरायला लागलं आहे.  त्यावर उपाय म्हणून घरातले सगळे सदगुणाचे पुतळे तोच मंत्र म्हणतात. जोरात! सगळ्यांच्या सुरात सूर म्हणून पुतळ्यांच्या घरातलं मांजर, त्सुनामीही वेगळा स्वर त्यात मिसळून द्यायला लागली आहे. शांती कुणाला मिळते हा प्रश्न तसाच!