Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Tuesday, May 5, 2026

निरभ्र

आज तसं काम खूप होतं. आटपून घरी जायलाच रात्रीचे दोन वाजणार याची स्पंदनला खात्री झाली. पण इलाज नव्हता. कॉफीचे घोट रिचवत तो काम करत राहिला. घरी परतण्यापूर्वी गेल्या तासाभरातली इ मेल त्याने डोळ्याखालून घातली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.

’आनंदी...’ इथे? आपल्याच गावात? कधीही भेटू शकतो तिला? स्पंदनचा विश्वास बसत नव्हता. मैत्रिणीने पाठवलेलं इ मेल त्याने पुन्हा पुन्हा वाचलं. आनंदी नोकरीच्या शोधात होती. झटकन निर्णय घेत स्पंदनने पटकन चार ओळी लिहिल्या. इ मेल पाठवून झालं आणि नंतर मात्र कितीतरी प्रश्न मनात सतावत राहिले. मैत्रिणीशी  बोलून त्याला वाटणारी तीच ही आनंदी आहे याची त्याने खात्री केली. आणि इ मेल पाठवणं ही चूक झालेली नाही याबद्दल खात्री पटल्यावर तो निश्चिंत झाला. दोन्ही हात मानेमागे गुंफवून खुर्चीच्या पाठीवर त्याने डोकं टेकलं. विचारात गढून गेला तो. जवळजवळ चार वर्षांनी आनंदी पुन्हा संपर्कात येण्याची चिन्ह दिसत होती. या चार वर्षात काय झालं असेल? आता भेटून खरंच काय साध्य होईल? स्पंदन हे नाव तरी तिला आठवत असेल? इ मेल मिळाल्यावर आनंदीची प्रतिक्रिया काय होईल?

रात्री उशीरापर्यंत नोकरीचे अर्ज इकडे - तिकडे पाठवून देत आनंदी कंटाळली होती. पण इलाज नव्हता. ओळखीच्या लोकांना तिने नोकरी बघत असल्याचं कळवलं होतं. घाई नव्हती पण नुसतं बसूनही चालणार नव्हतं. एक प्रोजेक्ट संपायच्या आधीच दुसरा मिळाला तर मधले दडपणाचे दिवस वाट्याला येणार नाहीत. तेच या क्षणी आनंदीच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. इतके दिवस दोन - दोन आघाड्यावर लढणं चालू होतं.  एकीकडे नवीन नोकरी शोधावी लागणार याची चिन्ह आणि एकीकडे विशाल. अखेर मनावरचं ओझं उतरलं.  फरफट थांबली. मनावरचे काळे ढग आता दूर व्हायला हवे होते, मनःशांती हवी होती.  स्वत:च्या कर्तृत्वावर ती मिळेल याची तिला खात्री होती.  विशालचं मात्र तिला राहून राहून आश्चर्य वाटतं होतं. ऐन उमेदीच्या काळात पंख गमावलेलं पाखरू झालं होतं त्याचं. त्याचं त्याला तरी हे कळेल? कळलं तर कधी? का खूप उशीर झालेला असेल तेव्हा? त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तिच्या चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. नंतर तिला हसायलाच यायला लागलं. त्याच्या वेडेपणाचं की भोळसटपणाचं तेच तिला समजेना. पण तो प्रसंग मात्र लख्ख आठवायला लागला तिला. आणि तसेच कितीतरी.

त्या दिवशी विशाल कामावरून परतला तोच चेहरा पाडून.

"आई ओरडल्यावर होतो तसा झालाय चेहरा. काय झालं?" आनंदीने हसत विचारलं.

"आपले लोकच त्रास देतात गं.  सातासमुद्राकडे गेलं तरी आपली वृत्ती बदलत नाही.  पाय ओढणं, दुसर्‍याचा दुःस्वास अगदी रक्तात भिनलेल्या गोष्टी आहेत या आपल्या." 

"चालायचंच."

"हो. पण मी अडकतो ना. दरवेळेला होतं असं. वैताग आलाय मला."

"तू रोखठोक बोलायला लाग विशाल. दरवेळी पडतं घेतोस त्यामुळे होतं तसं. आपली बाजू चुकीची नसेल तर कधीकधी लढूनच ते सिद्ध करावं लागतं." तिच्या आवाजातल्या ठामपणाकडे विशाल पाहत राहिला.  तिच्यातल्या आत्मविश्वासानं दरवेळी तो चकित व्हायचा आणि  त्याचवेळेला मनावर प्रचंड दडपणही यायचं.  तिच्यासारखं वागणं का जमत नाही याचा विषादही वाटायचा. त्याने तिला तसं बोलूनही दाखवलं कित्येकदा. आजही पुन्हा तितक्याच कौतुकाने त्याने त्याला काय वाटतं ते सांगितलं. आनंदी हसली. कामावर काय झालं ते तिने नीट समजून घेतलं. विशालचं कुठे चुकतंय, तो कुठे कमी पडतोय ते समजावून सांगितलं आणि काय करता येईल याबद्दल वेगवेगळे मार्गही सुचवले. आनंदीच्या बळावर हे करणं सहज जमेल असं त्याचं त्यालाच वाटलं. आनंदीच्या आश्वासक मिठीत स्वत:ला गुरफटवून तो शांतपणे झोपला.

सकाळी दोघं दचकून जागे झाले ते फोनच्या आवाजाने. टेबलावरच्या फोनकडे दोघांनी पाहिलं आणि परत डोळे मिटले. फोन वाजतच राहिला.  आनंदीने विशालला हातानेच ढकललं.  कूस वळवत विशाल पुन्हा झोपला. नाईलाजाने डोळे चोळत आनंदीने फोन उचलला. कुणाचा फोन आहे हेही तिने पाहिलं नव्हतं. फोनवर विशालची आई होती. आनंदीशी थोडंफार बोलून विशालला उठवायला लावलं तिने.

"तो झोपलाय. काल खूप उशीरा आला. आज शनिवार आहे तर निवांत झोपायचा बेत आहे त्याचा." आनंदी झोपलेल्या विशालकडे पाहत उत्तरली. 

"आम्हाला नंतर बाहेर जायचं आहे म्हणावं." बाबांचा आवाज तिच्या कानावर पडला. आनंदीने मुकाट्याने विशालला उठवलं. विशाल कुरकूर करत उठला. पण एकदा आईशी गप्पा सुरू झाल्यावर खुलला. कालचं सारं प्रकरण त्याने पुन्हा एकदा त्याच क्रमात त्याच्या आई - बाबांना सांगितलं. त्याचं आनंदीला विशेष वाटलं नाही. पण विशालचे बाबा जेव्हा भारतातून अमेरिकेत त्याच्या साहेबांशी बोलायला यायचं म्हणायला लागले तेव्हा तिला नवल वाटलं आणि धक्का बसला तो विशालच्या मान डोलावण्याचा. त्यांचं बोलणं संपल्यावर विशालकडून तिने फोन घेतलाच.

"बाबा, तुम्ही विशालच्या साहेबांशी बोलायला यायचं म्हणताय?" कानावर विश्वास बसत नसल्यासारखा स्वर होता तिचा.

"हो. का ? त्याची आईसुद्धा यायचं म्हणतेय." आनंदीला हसावं की रडावं तेच कळेना.

"त्या पण साहेबांना भेटणार आहेत का?" तिच्या आवाजातला उपरोधिकपणा विशालच्या बाबांना जाणवला असावा.

"हे बघ आनंदी. विशाल काही तुझ्यासारखा स्वतंत्र वातावरणात वाढलेला नाही. तू शिक्षणासाठी बाहेर राहिलीस. विशाल लग्न होईपर्यंत आमच्याच बरोबर होता. आमचं कायम लक्ष असायचं त्याच्यावर. जर त्याला त्रास होत असेल तर धावणारच ना आम्ही मदतीला?"

"बाबा, कामातल्या बारीकसारीक कुरबुरी सोडवण्यासाठी तुम्ही भारतातून इथे येणार? विशाल काही लहान नाही. तुम्हाला त्याला भेटायला यायचं असेल तर जरूर या. पण त्याच्या साहेबांना भेटण्यासाठी नक्कीच नाही. त्याचं त्याला तोंड देऊ दे या प्रसंगाला." आनंदीच्या स्पष्टवक्तेपणाचा विशालच्या बाबांना राग आला. त्यांनी काही न बोलता फोन ठेवून दिला.

"कशाला दुखवलंस तू बाबांना?" विशालचे डोळे भरून आल्यासारखे वाटले आनंदीला.

"विशाल, तू कमालच करतोस. मान काय डोलवतोस ते दोघं तुझ्या बॉसशी बोलायला येणार म्हणाले तर? स्वत:चं स्वत:  बाहेर पडायचं असतं अशा अडचणींतून..." विशालला आनंदीच्या बोलण्याला खीळ कशी घालावी ते समजत नव्हतं. फोन वाजला तसा त्याने सुटकेचा श्वास टाकला. आईचा फोन पाहिल्यावर मात्र कुचंबणा झाल्यासारखं त्याने आनंदीकडे पाहिलं.  लहान मुलाची समजूत घालतात तशी समजूत त्याची आई फोनवर तिकडून घालते आहे हे आनंदीला विशालच्या स्वरावरून जाणवत होतं. विशालची कीव आली आनंदीला. ती तिथून निघून गेली. स्वत:च्या मनाचा उद्वेग शांत कसा करावा तेच तिला समजेनासं झालं होतं. कणा नसलेल्या पुरुषाबरोबर वैवाहिक जीवनाची सुरुवात तर झाली होती. पण हे असंच चालू राहिलं तर...?

आनंदीने टाकलेला रागीट कटाक्ष पाहून विशालला आईबरोबरचं बोलणं थांबवावं असं वाटत होतं. पण आईच्या मृदू स्वराने त्याला बरं वाटत होतं. आनंदी रागाने तिथून गेली तसं घाईघाईने त्याने बोलणं आटोपतं घेतलं. तिचा राग शांत करायचा एकच मार्ग त्याला ठाऊक होता. त्याने कडक कॉफीचा कप आनंदीसमोर धरला. पण आनंदीची कळी खुलली नाही.

"आई रागवेल बरं बाळाला बायकोसाठी कॉफी केली म्हणून." धुसफुसत तिने कॉफीचा कप तोंडाला लावला.

"मी नाही सांगणार तिला तुझ्यासाठी कॉफी केली ते." निरागस चेहर्‍याने विशाल उत्तरला आणि आनंदीला पुढे काय बोलावं तेच कळेना. ती निमूटपणे कॉफीचे घोट घेत राहिली. पण तिला राहवलं नाही.

"किती बारीकसारीक चौकशा करत असते रे तुझी आई. जेवायला काय केलं. नीट जेवलास ना, पुरेसं होतं ना आणि तू पण श्रावणबाळासारखा उत्तरं देत असतोस." 

"आनंदी जाऊ दे ना." तो काकुळतीने म्हणाला. ती गप्प बसून राहिली. 

"आनंदी, मी एकुलता एक आहे त्यामुळे काळजी वाटते त्यांना आणि मलाही काही चुकीचं वाटत नाही." आनंदीचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. कसल्या विचारात गुंतली होती कुणास ठाऊक. विशालही कॉफीचा कप हातात धरून तसाच बसून राहिला. आनंदी समोर बसलेली असूनही त्याला खूप एकटं वाटत होतं. आनंदीचा आग्रह म्हणूनच तो नागपूर सोडून पार या देशात आला होता. आतापर्यंत नागपूर सोडून कुठे बाहेर स्थिर व्हायचा विचारही त्याच्या मनात डोकावलेला नव्हता. एकुलता एक. आई - बाबा दोघं वकील. बाबांनी मुद्दाम घराचा वरचा भाग त्याच्यासाठी ठेवला होता. सारं कसं छान सुरळीत चालू होतं. आनंदी आयुष्यात येईपर्यंत. आनंदीचं स्थळ सांगून आलं तेव्हा आई - बाबांचंच नक्की ठरत नव्हतं. मुंबईची मुलगी. नागपूरला कशी राहील हाच प्रश्न दोघांना छळत होता. आणि झालंही तसंच.

"मला संधी मिळाली तर परदेशात जायचं आहे."

"अमेरिका?" त्याच्या बाबांनी विचारलं होतं.

"असंच काही नाही. कोणताही देश. तिथे काम करण्याचा अनुभव घ्यायचा आहे. फार वेगळं वातावरण असतं बाहेरच्या देशात कामाबाबतीत असं ऐकलंय. मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे ."

"पण आम्हाला नागपूरमध्येच राहणारी मुलगी पाहिजे." विशालच्या आईच्या ठाम स्वराला उत्तर म्हणून आनंदीने फक्त विशालकडे पाहिलं. विशाल तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिला त्याचा निरागस चेहरा विलक्षण आवडला.  सार्‍या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून नागपूर तर नागपूर असंही तिच्या मनात येऊन गेलं. पण क्षणभरच. कुणालाच काही बोलण्याची संधी न देता ती म्हणाली.

"जिथे माझं काम असेल तिथे राहायला आवडेल मला. काम न करता राहणं ही कल्पनाच करू शकत नाही मी." नंतरचं बोलणं, उपचाराचं, वरवरचंच होतं. दोन्ही बाजूंनी मनातल्या मनात नकार पक्के केले होते. 

आणि तरीही विशालचं लग्न आनंदीशीच झालं. विशालने कितीतरी मुली पाहिल्या पण आनंदी काही त्याच्या मनातून जाईना. आनंदीही मुलं पाहत होतीच. विशाल जसा तिच्यात अडकला होता तेवढं स्वत:ला गुंतवून घेण्याचा आनंदीचा स्वभाव नव्हताच. विशालकडून काही कळलं नव्हतं त्यामुळे तिने नकार गृहीत धरला आणि ती मुलांना भेटत राहिली. होकार, नकार चालू होते. तेवढ्यात त्याच्या घरुन होकार आला. नकार देण्यासारखं, मुद्दाम बोट ठेवण्यासारखं काही नव्हतंच. विशालने परदेशात जायची तयारी दर्शविली होती. त्याची शैक्षणिक कारकीर्द पाहता त्याला ते सहज शक्यही होतं. आनंदीला परदेशात काम करण्याच्या अनुभवाचं महत्त्व जास्त वाटत होतं. काही वर्षांनी ते परत गेलेच असते नागपूरला. 

"चूक झाली?" विशालला कॅनडात आल्यावर काही महिन्यातच हा प्रश्न पडायला लागला होता. सतत आई - वडिलांच्या छायेत वाढलेल्या विशालला स्वतंत्रपणे निर्णय घेणं म्हणजे दडपणच वाटायचं. नागपूरचे दिवस आठवायचे. कामावरून परत आलं की तिघं प्रत्येक गोष्टीची चर्चा करायचे. मतं मांडायचे. दोघांच्या मतानुसार वागणं विशालच्या अंगवळणी पडलं होतं. आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याने कधी नुकसान झालं नव्हतं. आतापर्यंत सुरळीत पार पडलं होतं. घरी - दारी दोन्ही ठिकाणी. आनंदी घरात आल्यावर तिच्याशीही तो सहज जमवून घ्यायला शिकला. आनंदी मधला आग्रही ठामपणाही त्याला आवडायचा. तिच्या म्हणण्यानुसार आपसूकच तो वागायचा. मुळात त्याच्या स्वभावात आक्रमपणा नव्हता, निर्णयक्षमता होती की नाही हे त्याने कधी अजमावून पाहिलंच नव्हतं. कुणाचं मन मोडणं त्याच्या फार जीवावर येई आणि त्यासाठी स्वत:च्या मनाला थोडी मुरड घालण्यात त्याला कमीपणा वाटत नसे. पण आनंदी आल्यावर या त्याच्या भूमिकेमुळे येणार्‍या अडचणी त्याला जाणवायला लागल्या होत्या.  ना तो आई - बाबांना खूश ठेवू शकत होता, ना आनंदीला. त्याला त्याचा त्रास होत होता पण पर्याय सापडत नव्हता. आनंदीचे स्वाभिमान, कणा, आत्मविश्वास हे शब्द त्याच्या कानात घुमत राहायचे त्याचवेळेस त्याला त्याच्या आईचं म्हणणंही पूर्णपणे पटायचं. दरवेळी ती म्हणायची,

"कधी नजरे आड केलं नाही तुला आणि आता एकदम कुठच्या कुठे गेलास. त्यामुळे..." काय खाल्लं, कुणी केलं  पासून कंपनीत काय घडलं आणि तो नागपूरलाच असल्यासारखं चर्चासत्र. रोजची तीच प्रश्नोत्तरं. त्याला त्यात काही वावगं वाटायचं नाही. पण आनंदी काय म्हणेल हा विचार मनामध्ये असायचाच.  आनंदीचं म्हणणंही चुकीचं नव्हतंच.

"प्रत्येकवेळी तेच तेच विचारतात. आता लहान आहेस का तू? मी करून नाही घातले तुझा आवडीचे पदार्थ तर तू घे ना करून. बाहेर जाऊन खा. नाहीतर जरा तोंड उघडून सांग आईला इथे कसं असतं ते. स्वत: वकील आहेत. दिवसभर बाहेर असतात. कळत कसं नाही एकट्याने शक्य नसतं सर्व. दोघांनाही करावी लागतात कामं इकडे. नाहीतर हे पाहिजे, ते पाहिजेचा आग्रह तरी सोडायला हवा."  

"अगं, तिला नाही गं सांगून पटत. नागपूरला मी कधी इकडची काडी तिकडे केली नाही. आणि सगळी ऐकीव माहिती आहे तिच्याकडे बाहेरच्या देशाची. स्वत:ला करावं लागतं इतकंच माहीत आहे तिला. "

"पण म्हणजे तुला करावं लागत असेल तर ते आनंदीने करावं? मला पण तेच विचारतात. तू स्वयंपाक करून कामावर जातेस का? रात्रीचा स्वयंपाक कोण करतं, दिवसा कोण करतं. ऐकेन, ऐकेन आणि तुम्ही येऊन राहा म्हणून सांगेन." आनंदीचं असं बोलणं ऐकलं की विशाल धास्तावून जायला लागला. घरी बोलायचं तर शक्यतो आनंदी नसताना, नाहीतर ती आसपास नाही याची खात्री करायला लागला.

दोन वर्षांनी दोघं भारतात आले. मुंबईच्या विमानतळावर आनंदी आणि विशाल, दोघांचेही आई - बाबा आले होते. चौघांकडे पाहतानाच  प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचा तणाव आनंदीला जाणवला.  खारला घरी पोचल्यावर दुसर्‍याच दिवशी सकाळी नागपूरला जायला निघायचं आहे असं विशालच्या बाबांनी म्हटल्यावर तिला धक्काच बसला.

"बाबा, आम्ही चार दिवस मुंबईत राहू आणि नागपूरला येऊ असं ठरवलं होतं ना आपण सर्वांनी? थोडे दिवस नागपूरला राहून मी परत मुंबईला येईन. विशाल राहील दोन आठवडे तिकडे. तुम्ही अशी घाई का करताय?"

"आम्हाला सुट्ट्या नाहीत. दोघांच्याही कोर्टाच्या तारखा आहेत लागलेल्या."

"पण तुम्ही आलातच का मुंबईला?" आनंदीच्या रोखठोक प्रश्नाने विशालची आई गडबडली. पण लगेच सावरून म्हणाली.

"मुलाला भेटावंसं वाटलं म्हणून आलो."

"अहो, पण त्यांनी बेत कळवला होता ना. तुम्हाला विचारूनच सगळं ठरवलं होतं." आनंदीचे बाबा मध्ये पडले आणि वादाला वेगळंच वळण लागलं. विशाल अस्वस्थ होऊन नुसताच बसून होता. विशालच्या बाबांनी सामान उचललं तशी त्याची आईही त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली.

"विशाल, तुला जायचं तर जा तू त्यांच्याबरोबर." आनंदीने विलक्षण शांत स्वरात म्हटलं आणि आता काय वादळ उठणार या शंकेने आनंदीच्या आईचा जीव भांबावला. ती न सुचून विशालकडे पाहत राहिली. विशाल दारात येऊन उभा राहिलेला पाहून आनंदीचा अगदी संताप संताप झाला. "विशाल, तू खरंच निघतोयस?"

"हो. तू पण चल." चाचरत तो म्हणाला. आईने तिलाही निघायची खूण केली. बाबांनीही तिला बाजूला घेऊन समजूत घातली. आनंदीने झाला तितका तमाशा पुरे म्हणत निघायची तयारी दर्शविली.

"मी पण निघते तुमच्याबरोबरच. पण सलग इतका प्रवास त्रासाचा होईल. आज इथे राहू. सकाळी निघू." ती स्वत:चं सामान आणायला वळली आणि विशालच्या आईच्या शब्दांनी थबकली. 

"विशालच येईल फक्त आमच्याबरोबर." 

"ठीक आहे. मी येईन ठरल्याप्रमाणे चार दिवसांनी." राग आवरत आनंदीने उत्तर दिलं.

"तू आली नाहीस तरी चालेल." विशालच्या आईच्या शब्दांचा अर्थ कुणाच्याच पटकन लक्षात आला नाही. पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला तसं आनंदीची आई पुढे झाली.

"जे झालं त्याबद्दल माफ करा. आता आणखी ताणू नका. चूक झाली असेल तर आपली सर्वांचीच. आनंदीला का शिक्षा करताय तुम्ही?"

"आणि विशाल, आनंदी बायको ना तुझी. मग तू का नाही काही बोलत? जो बेत ठरला आहे तसा पार पाडू इतकं साधं तू तुझ्या आई - बाबांना सांगू शकत नाहीस?" आनंदीच्या बाबांनी विषादाने विचारलं.

"तुम्ही आमच्याबद्दल त्याच्या मनात अढी निर्माण करताय." विशालचे बाबा ताठर स्वरात म्हणाले.

"का? त्याला स्वत:चं मत नाही? प्रत्येकाने त्याच्या मनात भरवायचं आणि त्याप्रमाणे तो भरून घेणार." आनंदी विशालसमोर जाऊन उभी राहिली. "असा उठसूठ प्रत्येकाला खूश ठेवायला लागलास ना विशाल तर कुणीच सुखी होणार नाही. ना तू, ना मी आणि ना तुझे आई बाबा. विचार कर विशाल. खरं सांगतेय मी." आनंदी ताडताड बोलली आणि आतल्या खोलीत जाऊन बसून राहिली. विशाल त्याच्या आई - बाबांबरोबर निघून गेला. ते त्याचं शेवटचं दर्शन. नंतर सगळे धागे उसवतच गेले. विशालला त्याच्या आई - बाबांच्या शब्दाबाहेर जायचं नव्हतं. आनंदीच्या ठाम मतांपासून तिचे आई - बाबा तिला परावृत्त करू शकत नव्हते. आनंदीला होईल तेवढी तडजोड तिने हे लग्न टिकवण्याकरता केली होती. विशालने संसार कुणाशी करायचा हे ठरवावं या मतावर ती ठाम होती. कॅनडाहून भारतात येताना एकत्र झाल्या आहेत असं वाटणार्‍या दोघांच्या वाटा वेगळ्या कधी झाल्या तेच कळलं नव्हतं दोघांनाही. सुट्टी संपल्यावर कॅनडात परत जायचा आनंदीचा निर्णय बदलला नाही. त्याचवेळी विशालच्या आई - बाबांनी विशाल नागपूरलाच राहील हे पक्कं केलं. 

कॅनडाला आल्यावर विशालचं सामान दोन खोक्यात भरून तिने एका खोलीत ठेवून दिलं. सहा महिने वाट बघायची, नाही आला तर कुठल्या तरी संस्थेला सामान दान करायचं तिने ठरवून टाकलं. रिकाम्या खोलीत मोकळा श्वास घेतला आणि एकदाच फक्त एकदाच ती हमसून हमसून रडली. आयुष्यभरासाठी घेतलेला हात निसटून जाण्याच्या मार्गावर कधी पोचला? चूक कुणाची? परिस्थिती बदलेल? बदलावी अशी इच्छा तरी राहिली आहे का? विचार करून करून तिचं मन थकून जात होतं. दोन टोकाच्या स्वभावाची माणसं एकत्र आल्याचा हा परिणाम? आई - वडिलांचा पदर न सुटलेल्या विशालला दोष द्यायचा, त्याच्या आई - बाबांना की स्वत:लाच आणि तडजोडीचं बाळकडू पाजायला विसरलेल्या स्वत:च्या आई - वडिलांना? उत्तर सापडत नव्हतं. बरेच दिवस विचार करत पर्याय शोघत राहिली आनंदी. अखेर कंटाळून तिने  तो नाद सोडून दिला. एका वळणावर येऊन ती स्थिर झाली. अलिप्ततेने मनाला वेढून टाकलं. तरी कितीतरी दिवस तिला वाटत राहिलं. एकदा तरी विशाल आणि ती दोघं, दोघांनी बोलायला पाहिजे  सारं संपवण्यापूर्वी. कदाचित विशाल इथे असता तर ते शक्य होतं. भारतात गेलं की अस्तित्व हरवून जातं. दुसर्‍यांच्या मताचं ओझं बाळगून वावरायला लागतो आपण हे तिचं तिलाच जाणवत होतं. मग आज्ञाधारक विशालचं दुसरं काय होणार. संबंध कायमचे संपवण्याआधी तिला काय वाटतंय ते मनापासून तिने लिहून काढलं. विशालला पाठवूनही दिलं. त्याचे आई - बाबा प्रत्येक शब्द  वाचतील ही कल्पना असूनही तिला स्वत:च्या मनाचं समाधान करून घ्यायचं होतं. 

आनंदीचं पत्र वाचल्यानंतर अगदी लगेच तिला भेटावं, तो तिच्या प्रेमात कसा आकंठ बुडालेला आहे हे सांगावं असं वाटत राहिलं विशालला. लग्नानंतरची दोन वर्ष आठवत राहिली. आनंदीचा उत्साही स्वभाव, तडफदार वागणं याचंच तर त्याला आकर्षण होतं. किती पटकन ठरवायची ती कोणतीही गोष्ट. अगदी लांब पल्ल्याचा प्रवास असला तरी दोन मिनिटात ठरवून निघायचं. सुरुवाती सुरुवातीला राहायचं कुठे, जायचं कसं असे प्रश्न विचारून तो तिला हैराण करे. अनुभवाने, तिला सगळं जमतं असंच त्याला वाटायला लागलं होतं. साध्यासाध्या बाबतीत तिच्यावर अवलंबून राहायला लागला तो. तेच चुकलं? तो विचार करत राहिला. तसंही ठाम निर्णय त्याने कधी कुठे घेतले होते? आत्ताही त्याला आपलं चुकलं की नाही ते ठरवता येईना. सवयीने त्याने ते पत्र आईला दिलं. आनंदीच्या वागण्याची पुन्हा चिरफाड झाली. तिला उत्तर पाठवायचीही तसदी घेऊ नकोस असं त्याच्या आईने त्याला बजावलं आणि त्याने ते मानलं. आनंदी उत्तराची वाट पाहत असेल या विचाराने अधूनमधून तो अस्वस्थ होई.

महिना दोन महिने खरंच त्याच्या उत्तराची वाट पाहिली आनंदीने. पण हळूहळू ती स्वत:च्या व्यापात गर्क झाली. एकटी राहत होती. कामाचा ताण वाढत होता. संध्याकाळी परत आलं की जेमतेम पोटात काहीतरी ढकलून ती दिवस संपवे. विचार करायला वेळ नव्हता, इच्छाही नव्हती. शनिवार - रविवार मात्र एकटेपणाची भावना वेढून टाके. भूतकाळ अस्वस्थ करत राही. अशावेळी ती भटकंतीत मन रमवायला शिकली. धावणं, फिरणं झालं की मन प्रसन्न होऊन जाई. मरगळ झटकून ती पुन्हा आपल्या कामात व्यग्र होऊन जाई. निराशावादी ती नव्हतीच त्यामुळे लवकरच एकटेपणातला आनंदही  लुटायला शिकली. चालू असलेला प्रोजेक्ट संपण्याची चिन्ह दिसायला लागल्यावर  पुन्हा  नोकरी शोधण्याच्या वणवणीला तयार झाली. ओळखीपाळखीच्या लोकांना लगेचच तिने कळवलं. हे काम संपायच्या आधीच दुसरं काम मिळेल तर किती बरं असं वाटत असतानाच आलेल्या इ मेलने क्षणभर तिच्या छातीत धडधडलं. स्पंदन? हा तोच स्पंदन असेल? चार वर्ष तरी झाली असतील भेटून. त्याच्या इ मेल मध्ये काही उल्लेख नाही पण हा तोच आहे.... भेटायचं की टाळायचं? 

अस्वस्थपणे ती ’स्टार बक्स’ च्या बाहेर येरझारा घालत होती. जरा लवकरच पोचली होती. लांबून स्पंदन येताना दिसला आणि तिच्या हृदयाचे ठोके चुकले.

"ओळखलंस?" त्याने हसत हात पुढे केला. त्याच्याशी हस्तांदोलन करून तिने फक्त मान डोलवली.

"चल. आत बसू." तिला काय बोलायचं तेच सुचत नव्हतं. मनातले प्रश्न ओठावर येऊ द्यायचे नाही असं ठरवूनही ती बोलून गेली.

"नोकरीसाठी खरंच मदत करणार आहेस की मला ओळखत होतास म्हणून..." तो हसला.

"दोन्ही."

"दोन्ही? म्हणजे?" त्याला काय म्हणायचं आहे ते तिच्या लक्षात येत नव्हतं.

"तुझ्याशी बोलायचं होतं. पुन्हा भेटशील असं कधी वाटलंच नव्हतं. आणि माझ्याच कंपनीत नोकरी मिळू शकते. म्हणून दोन्ही म्हटलं."

"चार वर्ष झाली स्पंदन आपण भेटून. एकदाच तर भेटलो होतो आणि एक दोन वेळा फोनवर बोललो होतो. म्हणजे तुला काय बोलायचं असेल तेच समजत..."

"मी अजून लग्न केलेलं नाही आनंदी." तिला तोडून टाकत त्याने म्हटलं आणि ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली.

"आणि त्याचं कारण तू आहेस." तो घाईघाईने बोलला.

"मी?" आता तर ती अगदीच गोंधळली.

"हो."

"अरे, पण मी होकार कळवला होता. नकार तुझ्याकडूनच होता स्पंदन."

"खरं आहे तुझं. तुला भेटलो तेव्हा असं एखाद्या मुलीला ठरवून भेटणं वगैरेचा पहिलाच प्रसंग होता. माझ्या अपेक्षा काय आहेत हे माझं मलाच कळलेलं नव्हतं. मग सर्वांचं म्हणणं पडलं की घाई करू नये. पटलं मला ते. पण नंतर प्रत्येक मुलीची मनातल्या मनात तुझ्याशी तुलना करायला लागलो. शेवटी तुला फोन केला."

"फोन केलास?"

"हो. विसरलीस?" आनंदी विचार करत राहिली.

"फोन केला पण माझ्या मनातलं बोलायची संधी दिलीच नाहीस तू." तो काय म्हणतो आहे ते हळूहळू तिच्या लक्षात आलं. विशाल बरोबर लग्न पक्कं झालं आणि स्पंदनचा फोन आला होता. त्या वेळेस क्षणभर प्रश्न पडला होता स्पंदनने फोन का केला असेल म्हणून. पण विशालमय झाली होती ती. स्पंदनने भेटायची इच्छा व्यक्त केल्यावर लग्न ठरल्याचं तिने आनंदाने सांगितलं होतं. त्यामुळे पुढे काहीच बोलला नसेल का स्पंदन? तिच्या मनातले विचार वाचल्यासारखं स्पंदन उत्तरला.

"तू इतक्या पटकन तोडून टाकलंस की पुढे काही बोलताच आलं नाही." आनंदी हसली.

"तुझा नकार पचवला होता त्यामुळे झालं असेल तसं.  माझं लग्न ठरलं होतं आणि तू पुन्हा भेटू या का असं विचारत होतास. मी स्पष्ट विचारलं नाही तरी तेव्हा अंतर्मनाला तुला का भेटायचं आहे ते जाणवलं असणारच. पण तुझ्यासारखंच जाणवून घ्यायचं नसेल."

"हं. तुझं लग्न ठरलं म्हटल्यावर पुढचे मार्ग खुंटलेच. मी मुलींना भेटत राहिलो. नकार देत राहिलो. प्रत्येकवेळेला मुलींना असं नकार देणंही रुचत नव्हतं आणि कुठलीच मुलगी मनापासून पसंतीला का उतरत नाही तेही कळत नव्हतं.  आनंदी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण हे माझं मलाच जाणवायला खूप दिवस लागले. कुणालाही भेटून आलो की  तुझा सावळा, तरतरीत चेहरा आठवायचा. त्यापेक्षाही तुझं बोलणं, वागणं..." स्पंदनचं बोलणं मनापासून ऐकत होती आनंदी.  नकळत आनंदीच्या तोंडून निघून गेलं.

"बोलणं, वागणं?" स्पंदनला आपल्या वागण्या बोलण्यात असं काय आढळलं की तो विसरू शकला नसेल? तिचा स्वर उत्सुक होता.

"आपण भेटलो त्या वेळेस उगाच आमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही केलास. बाबांची मतं तर एक दोन वेळा तिथल्यातिथे खोडून काढलीस. आणि त्यात कुठेही उर्मटपणाची झाक दिसली नाही. उलट त्या विषयावरचा अभ्यास जाणवला."

"अरे वा. पण हेच तुझ्या बाबांचं पण मत होतं का?" आनंदीने साशंक स्वरात विचारलं. घाईघाईत तिने ती तसं का विचारते आहे ह्याचाही खुलासा केला. " मला आठवतंय,  माझी आई म्हणाली होती नंतर की मी फार अटीतटीवर येते. पण एखाद्या विषयाचा अभ्यास असेल तर कुणी चुकीचा मुद्दा मांडला की राहवतच नाही."

"बाबांना जाणवला तुझा अभ्यास.  पण महत्त्वाचं ते नाही. मत मांडण्यातला तुझ्यातला आत्मविश्वास, ठामपणा आणि तरीही वागण्यातलं सहजपण. ते वेगळं होतं आणि जसजसं मी मुलींना भेटत गेलो तसतसं ते प्रकर्षाने जाणवायला लागलं. प्रत्येक मुलीशी माझं मन तुझ्याबरोबर तुलना करत राहिलं तेव्हा लक्षात आलं मी तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो आहे.  शेवटी कंटाळून घरी लग्न न करण्याचा निर्णय सांगितला. काही पर्यायच नव्हता. आनंदी..." त्याला काहीतरी बोलायचं आहे हे आनंदीच्या लक्षात आलं  पण अंदाज येत नव्हता. आणि नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहे म्हणून इथे भेटायला बोलावलं स्पंदनने की त्याला विशालबद्दल...?  स्वभावाप्रमाणे ती स्पष्ट विचारणार तेवढ्यात स्पंदनच म्हणाला,

"आनंदी, तुझा घटस्फोट झालेला मला ठाऊक आहे." आता मात्र तिला काय बोलावं ते सुचेना. दोघंही अस्वस्थपणे कॉफीचे घुटके घेत नजर टाळत राहिले. कसंनुसं हसून आनंदी म्हणाली.

"हे सांगायला बोलावलंस की काय?" अवघडल्यासारखा स्पंदन हसला.

"छे. तुला वेगळंच विचारायचं होतं." आनंदीच्या काळ्याभोर डोळ्यात डोकावत तो म्हणाला.

"विचार ना. नोकरीचं म्हणशील तर हा प्रोजेक्ट संपला की लगेच दुसरा शोधणं भाग आहे मला.  तुझ्याच कंपनीत आहे का जागा?" स्पंदनला काय विचारायचं असावं याचा अंदाज आला तरी ती मुद्द्यावर आली. तिला तो विषय नकोच होता. पुन्हा त्या वाटेकडे वळायचा विचार तिच्या मनात आतापर्यंत क्षणभरही डोकावला नव्हता. बेसावध क्षणात तिला स्वत:ला गुंतवू द्यायचं नव्हतं. पण आनंदीच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत स्पंदनने विचारलं,

"माझ्याशी लग्न करशील?" आनंदीच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहून तो हसला. मोकळेपणाने हसला. मनावरचा ताण निघून गेला होता. आनंदीच्या उत्तराचीही आता त्याला काळजी नव्हती. मनावरचा दडपण उतरल्याचा आनंद त्याला जास्त वाटत होता.  आनंदी आपल्याच गावात आहे आणि  नोकरी शोधते आहे या योगायोगाचं त्याला आधी आश्चर्य वाटलं होतं.  साशंक मनाने त्याने चौकशी केली होती. तिच्या घटस्फोटाचं कळल्यावर किंचित हळहळ वाटली होती. पण लगेच मनाने उचल खाल्ली. सुखाचा शोध संपल्यासारखं वाटायला लागलं. पण विषय कसा काढायचा? ती ’हो’ म्हणेल? आधी आपल्याकडून मिळालेला नकार तिच्या लक्षात असेल? एका अनुभवाने पोळल्यावर पुन्हा त्या फंदात पडेल? मनात प्रश्न असंख्य होते पण उत्तरं ठाऊक नव्हती. आनंदीशी बोलल्याशिवाय तिच्या मनाचा थांग लागलाही नसता. पण त्या क्षणापासून जी अस्वस्थता आली होती ती एकदाचा तो प्रश्न विचारल्यावर एकदम नाहीशी झाली. जास्तीत जास्त काय ’नाही’ म्हणेल. त्याने प्रसन्न चेहर्‍याने तिच्याकडे पाहिलं. आनंदी त्याच्याकडेच टक लावून पाहत होती.

"बोल ना." तो काकुळतीने म्हणाला.

"मला नाही काही सुचत."

"ठीक आहे. विचार कर."

"पण माझ्या नोकरीचं?" त्याला हसायला आलं.

"तुझ्या निर्णयामुळे त्यात काही बदल होणार नाही." दोघंही मनापासून हसले. आनंदीने अचानक विचारलं.

"तू घरी सांगितलं आहेस तुझ्या?" त्याने मान डोलवली.

"परवानगी दिली?"

"सहज. लग्न करायचंच नाही या बद्दल ठाम होतो. लग्नाला तयार झालो यातच खूष आहेत. त्यात जिच्या प्रेमात पडलोय तिच्याशीच लग्न करतोय याचं समाधान असेलच ना."

"पण घटस्फोटित बाईशी लग्न. आधीची परिस्थिती वेगळी होती."

"माझ्या दृष्टीने प्रेमात पडलेल्या मुलीशी लग्न आनंदी!" आनंदीकडे एकटक पाहत स्पंदन म्हणाला. त्याची नजर टाळत ती म्हणाली,

"मी उत्तर दिलेलं नाही स्पंदन."

"मग दे ना. म्हण ना हो. आधी होकार होताच की तुझा."

"स्पंदन, तुझं हे पहिलं लग्न असणार आहे. मी नुकतीच वेगळी झाले आहे. आणि कितीही म्हटलं तरी अजून त्यातून सावरलेले नाही."

"लगेच नाही गं लग्न करायचं. थांबू आपण काही दिवस. इतकी वर्ष थांबलो मी तसं अजून थांबेन. पण तुझा होकार ऐकायचा आहे मला आनंदी." 

"माझ्या विस्कटलेल्या संसाराचे व्रण तुला दुखावतील वेळोवेळी. माझं विटलेलं मन पाहून तू वैतागशील. माझं तोलूनमापून वागणं तुला निरुत्साही करेल. झेपेल?" स्पंदन हसला.

"इतकी बदलली आहेस?"

"हो. माझं मलाच जाणवतं ते. आणि माझा घटस्फोट का झाला याबाबत तू काहीच विचारलेलं नाहीस अजून."

"त्या आठवणींनी तुला त्रास व्हायला नको म्हणून विचारलं नाही."

"मी जे सांगेन ती अर्थात माझी बाजू असेल स्पंदन. विशालचीही बाजू असेलच."

"खरं आहे. पण त्याची बाजू काय होती हे तुला ठाऊक असणारच ना? तूच सांग दोन्ही बाजू." स्पंदनकडे  आनंदी मूकपणे पाहत राहिली. 

"हो म्हण आनंदी. उभं आयुष्य आहे आपल्यासमोर. होशील पुन्हा तू हसतीखेळती. मी करेन तुला तुझ्या नावाप्रमाणे आनंदी." स्पंदनने आनंदीचा हात हात धरला आणि तो तिच्या डोळ्यात खोल डोकावला. आनंदीच्या सार्‍या शरीरावर रोमांच उभे राहिले. मनावर रेंगाळत राहिलेले काळे ढग विरून निरभ्र आकाश दृष्टिक्षेपात आल्यासारखं वाटत होतं. इतक्या पटकन कोणत्याच निर्णयाप्रत पोचायला नको हे कळत असलं, व्यावहारिक मन मागे ओढत असलं तरी आनंदीचे  बोलके डोळे भावुक झाले, भविष्याची स्वप्न अलगद त्या डोळ्यांमध्ये उतरली.  स्पंदनच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू उमटलं.  एकमेकांच्या डोळ्यातील भविष्याची रांगोळी अधीर मनं  निरखीत राहिली. मधली चार वर्ष पुसून नव्याने आयुष्याच्या रांगोळीचे ठिपके जोडण्यासाठी आतूर झाली.



Monday, September 15, 2025

अंतराय

ही कथा मी मुग्धा गोडबोलेंच्या वाचनव्रत उपक्रमात वाचली आहे. इथे वाचा किंवा तिथे ऐका. अभिप्रायही नक्की द्या.

शमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि आबांड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोघीतिघी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.

"केवढं बदललं आहे नाही सर्व? बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खरंच बदललंय सगळं?"

रतन मनापासून हसली.

"अगं तू नाहीस का या बावीस वर्षात बदललीस? मग आम्हीही बदललो तर नवल का वाटतंय तुला?"

"खरं आहे तुझं." शमिकानं विषयच थांबवला. आपण उगाचच धाडस करतोय का सांगोल्याला जायचं हे तिचं तिलाही ठरवता येईना. ती ऑस्ट्रेलियाहून तीन आठवड्यांसाठी सोलापूरला येते काय आणि अचानक बाजारात रतनची गाठ पडते काय, सगळीच अपूर्वाई.

रतननेच तिला ओळखलं. बघता बघता आठवतील त्या मैत्रिणींना फोन करुन रात्र जागवायला त्या एकत्र जमल्याही. सगळ्यांच्या आयुष्यांची बेरीज वजाबाकी झाली.  तिच्या ऑस्ट्रेलियन दिनक्रमाबद्दल तर सर्वांनाच कोण उत्सुकता. त्यांच्या कंपूतली परदेशात स्थायिक झालेली ती एकटीच. नकळत गप्पांचा ओघ तिच्याभोवती केंद्रित झाला. पण नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात गेलेल्या शमिकाकडे  सांगण्यासारखं फारसं काही नव्हतं. बोलण्याच्या ओघात सांगोल्याचा विषय आला तेव्हा मात्र शमिकाला उत्साहाचं भरतं आलं. शाळेतली आणि कॉलेजमधली काही वर्षे रतन आणि ती सांगोल्याला एकत्र होत्या. एकदम दोघींनी सांगोल्याला जायचं ठरवूनही टाकलं. हॉटेलमध्ये उतरायचं  की एखाद्या मैत्रिणीकडे ते मात्र ठरता ठरेना. शेवटी दोघींचीही चांगली मैत्रीण असलेल्या नीनाकडे उतरायचं पक्कं झालं. दोन दिवसात त्या निघाल्याही. कधी एकदा सांगोला गाठतोय असं होऊन गेलं तिला. बावीस  वर्षांनी ती पुन्हा त्या गावाला चालली होती. अस्वस्थ, अस्थिर, उत्सुक!

गाडी कुरकूर करत थांबली ती विचारांची साखळी खेचत. नीनाचे विचार डोकावायला लागले मनात. अबोल, तशी अलिप्तच राहणारी नीना धर्माच्या बाहेर लग्न करण्याचं धाडस करेल अशी पुसट शंकासुद्धा तिच्या मनात कधी डोकावली नव्हती. नीनानं लग्न केलं तेव्हा ती ऑस्ट्रेलियात होती. तिच्या आईनं ही बातमी सांगितल्यावर शमिकाला धक्काच बसला होता. मनात येऊनही नीनाला पत्र पाठवणं, फोन करणं राहूनच गेलं होतं. आता मात्र मधली सगळी वर्ष पुसून काढायची होती. कसं असेल तिचं घर, नवरा, घरातली मंडळी? मनात विचार फुगडी घालत होते; पण नजर गाडीतल्या त्या बायकांवर खिळली होती.  अचानक, या क्षणी रेल्वेतून उतरावं, सांगोल्याला जाऊच नये असं फार तीव्रतेने वाटलं तिला. त्याच तंद्रीत तिने तोंड उघडं टाकून घोरत पडलेल्या रतनला हलवलं. ती गडबडून उठली. 

"परत जाऊया सोलापूरला रतन."

"तुला वेड तर नाही ना लागलं? नीना न्यायला येणार आहे स्टेशनवर." झोपमोड झालेली रतन भडकलीच.

"घर मोठं आहे म्हणत होती. तू गेली आहेस कधी?" तिच्या मनात दडून राहिलेल्या शंकांना अचानक तिने वाट मोकळी करून दिली, तरीही शमिकाला स्वच्छता, बाथरूम, घरातली माणसं याबद्दल फटकन विचारता येईना. 

"नाही पण एकदम तिच्या घराबद्दल का उत्सुकता वाटतेय तुला?"

"भेटतेस सगळ्यांना?" रतनचा प्रश्न न ऐकल्यागत शमिकाने विचारलं.

"नाही गं. कामासाठी येते ना. ठरवते दरवेळेस पण नाही होत भेटणं कुणाला. आपल्या वर्गातली मुलं दिसतात बर्‍यांचदा, पण मुली तर लग्नं होऊन बाहेरगावीच असणार."

ती गप्प झाली. रतननेही पुन्हा डोळे मिटून घेतले. सांगोल्याला जायचा उत्साह नष्ट होतो आहे असं वाटत होतं. तेवढ्यात रेल्वेचा वेग कमी होत फलाट दिसायलाही लागला.

"ती बघ नीना!" रतन एकदम ओरडली. अंगात वीज संचारल्यागत आता तिनेही खिडकीतून डोकावायचा प्रयत्न केला. 

तरीही गाडी थांबल्यावर ती तशी सावकाशच उतरली. पुढे झेपावत रतनने नीनाच्या मुलीला कौतुकाने जवळ घेतलं. शमिका मात्र अवघडून उभी होती.

"शिष्ट कुठली." तिचा हात आनंदाने हातात घेत नीना पुटपुटली.

"चल गं, काहीतरीच काय बोलतेस? मी आहे तशीच आहे."

"म्हणजे शिष्ट म्हणायचं आहे तिला." रतनही नीनाच्या बोलण्यात सामील झाली.

रिक्शात बसल्याबसल्या बाहेर डोकावत कॉलेजच्या दिवसातल्या खुणा तपासणं सुरू झालं तिचं.

"शमे, तू प्रयत्नसुद्धा नको करू काही आठवण्याचा, सांगोला फार बदललंय."

"माझ्या सगळं लक्षात आहे. पाच वर्ष काढली आहेत ना. काय धम्माल करायचो आपण."

जुन्या आठवणीत घर कधी आलं तेही तिला कळलं नाही. रतनने उत्साहाने घरातल्या प्रत्येकाची ओळख करून घेतली. गरम वाफाळलेला चहा घेत शमिका अवघडल्यासारखी बसली, गर्दीत श्वास कोंडल्यासारखी. छोटं घर आणि भरपूर माणसं हे समीकरण ती कधीच विसरली होती. रतन गप्पामध्ये रमलेली बघितल्यावर ती उठली.

स्वयंपाकघरात दाराला टेकून बराच वेळ ती नीनाच्या हालचाली निरखत राहिली.

"कोण मुलं आहेत गं इथे आपल्या वर्गातली?"

"खूप आहेत."

"नावं सांग ना. भेटेन तरी कुणाला ना कुणाला."

"उद्या जा सावकाश. आज गप्पा मारू रात्रभर तिघींजणी."

नीनाने म्हटल्याप्रमाणे खरंच रात्रभर तिघींच्या गप्पा रंगल्या. रतनने नीनाच्या लग्नाबद्दल विचारलंच.

"तू धाडसी नीना. नोकरीसुद्धा नव्हती ना शशांकला तुम्ही लग्न केलंत तेव्हा?"

क्षणभर नीना गप्प राहिली. शमिकाला राहवलं नाही.

"आम्ही सहज विचारतोय गं. तुझ्या मनात नसेल तर राहू दे."

"नाही, तसं नाही. पंधरा वर्ष होऊन गेली. इतक्या वर्षांनंतर लग्नानंतर पहिल्यांदाच हा विषय निघतोय. त्यामुळे जरा अडखळल्यासारखं झालं." ती पुढे बोलत राहिली.

"तुला माहीत आहे ना सांगोल्याला मी बहिणीकडे राहायचे. इतकी कटकट, सूचना, त्यातून विरंगुळा म्हणजे शशांकची मैत्री. त्या मैत्रीवरूनही संशय घ्यायला लागली बहीण. गावालाच पाठवून दिलं परत. कोंडल्यासारखं झालं होतं आयुष्य. एक दिवस शशांक गाडी घेऊन आला आणि मागचा पुढचा विचार न करता आले मी निघून." बराचवेळ नीना तिच्या बदललेल्या आयुष्याबद्दल बोलत राहिली.

"पण माहेरी जातेस ना आता?" शमिकाने विचारलं.

"नाही. ते दु:ख मात्र आता शेवटपर्यंत राहणार." 

नीनाचे डोळे तुडुंब भरून आले.  रतनने पुढे होऊन पटकन नीनाला कुशीत घेतलं.  हुंदक्यांनी गदगदलेल्या नीनाकडे शमिका भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली.

"तुझी आई हल्लीच गेली ना? तेव्हाही नाही गेलीस?

"कोणी कळवलंच नाही गं मला. कळलं तेव्हा फार उशीर झाला होता." थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही."

"तू केदारच्या घरी जाणार असशील ना?" अचानक नीनाने शमिकाला विचारलं.

"अर्थात. भावासारखाच होता तो मला."

"बघवत नाही त्याचा भितींवर लावलेला फोटो."

"आपल्यात तुमची दोघांची मैत्री जास्त."

"काय हुकूमशाही चालायची तुझ्यावर केदारची. आठवतंय? रक्षाबंधनाच्या दिवशी राखी घेऊन आला होता स्वत:च. आम्ही होतो ना तिथेच." शमिकाला तो प्रसंग आताच घडतोय असंच वाटत होतं.  

तिच्या घरी त्या सर्वजणी जमल्या होत्या. तावातावाने, एखाद्याला मित्र तर मित्र म्हणा ना, भाऊ मानायची कसली नाटकं वगैरे बोलणं चाललं होतं. अशा वादविवादात शमिकाचा नेहमीचा पुढाकार. तेवढ्यात केदार टपकला तो राखी घेऊनच. शमिकाच्या पुढ्यात त्याने राखी धरल्यावर सगळ्या हसायला लागल्या.

"शमिका, केदार तुझा मित्र आहे ना? मग राखी नको बांधू." तिच्यावर हल्लाच चढवला प्रत्येकीने. शमिका गांगरली, केदारला आपलं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करत राहीली.  शेवटी केदारच्या हट्टापुढे तिने हात टेकले. तो खर्‍या अर्थी तिचा भाऊ झाला. ती एकाएकी उदास झाली.

सांगोला सोडून दोन वर्ष झाली असतील तेव्हा. अधूममधून तो सोलापूरला आला की भेट होत होती. एकमेकांना पत्र तर सारखी पाठवत होते दोघं. आणि अचानक त्या बातमीने सारं बदललं. मित्रांबरोबर फिरायला गेलेला केदार परत आलाच नव्हता. पडला कड्यावरुन पाय घसरुन. तिला समजल्यावर  मिळेल ती गाडी पकडून ती धावली होती सांगोल्याला.  तुषारच्या, केदारच्या भावाच्या खांद्यावर मान टाकत तिने दु:खाला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर या गावात ती परतली नव्हती. पण केदारच्या घराचा तीही एक भाग बनून गेली होती हे तिला कधीच विसरता आलं नाही. अधूनमधून पत्र लिहीत राहिली. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर हळूहळू सगळं मागे पडत गेलं.

"तुषारला बोलले आहे मी तू येणार आहेस ते." तिच्या मनातलं ओळखल्यासारखं नीना म्हणाली.

"कधी येणार आहे तो? नाही तर मीच सकाळी जाऊन भेटून येईन."

"रात्रीच चक्कर टाकेन म्हणाला होता. नऊ वाजलेयत. येईल कदाचित अजूनही."

तिचे कान तुषारच्या पायरवाची चाहूल घेत राहिले. तुषार आलाच नाही.  केदार असता तर झालं असतं असं? केदारबरोबरच्या गप्पा, एकत्र केलेला अभ्यास, सहली, रुसवेफुगवे सगळं आजूबाजूला ठाशीवपणे उभं राहिलं. एकमेकांची घरं तर अगदी जवळ. सारखं भेटणं चालू असायचं. केदारची शांत स्वभावाची आई फार आवडायची तिला. त्याही मुलीसारखं कौतुक करायच्या. तिची आई फिरतीच्या निमित्तानं वरचेवर बाहेर, वडील तर तिला आठवतही नव्हते. सहाजिकच केदारचं घर म्हणजे विसावा होता तिच्यासाठी. आज तुषार आला नाही म्हटल्यावर क्षणभर तिला केदारच्या मैत्रीत ती उगाचच घरादाराला तर गुंतवत नव्हती ना असा प्रश्न पडला. एक माणूस जीवनाचा खेळ अर्ध्यावर सोडून गेला तर सगळी नातीच बदलावीत?

सकाळी भराभर सगळं आटपून दाराच्या चौकटीत ती उभी राहिली. जुन्या दिवसांचा लवलेश शोधूनही सापडत नव्हता. ती तशीच नजर लावून उभी राहिली. बराचवेळ. भरभर चालत येणारी चाल ओळखीची वाटल्यावर ती टक लावून पाहत राहिली. केदार? छातीत धस्स झालं. कितीदा तरी कुठून तरी अचानक तो समोर उभा ठाकेल असं वाटायचं तिला. इतक्या वर्षात तो या जगात नाही हे सत्य तिने  स्वीकारलं होतंच कुठे?

"रात्रीच यायचं होतं पण आलोच अकरा वाजता. तरी निघालो. आई म्हणाली, उद्या सकाळी जा लवकर. कशी आहेस? चल आता आमच्याकडे." घाईघाईत खुलासा करणार्‍या तुषारकडे ती पाहत राहिली. बावीस वर्षात कुणामध्ये काहीच कसा फरक नाही पडला? नीना, रतन आणि आता तुषार. सगळी आहेत तशीच वाटतात. तुषारकडे बघता बघता ती रतन आणि नीनाला विसरलीच. कुणालाही काहीही न सांगता पटकन इथून तुषारबरोबर निघावं असं तीव्रतेने वाटलं तिला. कधी एकदा केदारच्या घरी पोचतोय असं झालं होतं का? तिने स्वत:लाच प्रश्न केला. नीना म्हणत होती तो भितींवर टांगलेला त्याचा फोटो पाहायला की केदारची मैत्री ती विसरू शकलेली नाही हे दाखवायचा वेडा प्रयत्न करायला?  केदारचं घर  कर्त्या सवरत्या मुलाला मुकलं होतं तसं तिने नव्हता का तिचा परममित्र गमावला? त्या घराचं दु:ख सर्वांनी गृहीत धरलं; पण तिच्या चिघळत्या जखमेवर कोण मारणार फुंकर? केदार गेल्याचं कळल्यावर फार एकटं पडल्यासारखं वाटायचं तिला बरेच दिवस. दोन दिवस पत्रांचा गठ्ठा उलगडून बसली होती ती. 

’तुझं आणि माझं नातं काय आहे कुणास ठाऊक; पण मागच्या जन्मात बहीण असावीस बहुधा माझी तू... काय दादागिरी करतेस गं, तुझ्याशी गप्पा मारताना मी स्वत:शीच बोलतो असं वाटतं मला. तू माझ्या आयुष्यात आलीस ती मैत्रीण म्हणून. हळूहळू भाऊ, बहीण अशी सगळी नाती मला तुझ्यातच सापडली.’ पत्र वाचताना ती हमसून हमसून रडली होती. 

तुषारला पाहिल्यावर मनातल्या विचारांबरोबर कुठल्या कुठे भरकटली ती. नीनाच्या घरातल्या माणसांबरोबर तुषार इकडचं तिकडचं बोलत होता. हरवल्या नजरेने तुषारकडे बघताना तिला ओरडून सांगावंसं वाटत होतं. अरे, मी सुद्धा तुमच्या घरातलीच आहे. सगळे बारीकसारीक, छोटे मोठे प्रश्न ठाऊक आहेत मला तुमच्या घरातले. पण मनातले तरंग बाहेर उमटू न देण्याची खबरदारी घेत शमिका तुषार बरोबर निघाली.

"तू चांगलं केलंस शमिका. बाहेर पडलीस या खुराड्यातून. ऑस्ट्रेलिया काय म्हणतंय? किती वर्ष झाली गं तुला तिकडे जाऊन? मी पाठवलं होतं तुला एक पत्र. नंतर राहिलंच."

घडाघडा बोलणारा तुषार तिला वेगळाच वाटत होता. तिच्या डोळ्यांसमोर केदारच्या घरी आलं की भेटणारा तुषार आला. अलिप्त, तुटक. आज मात्र भडभडून बोलत होता. केदारसारखा!

तिला एकदम जवळचा वाटला तो. घरी पोचल्यावर चप्पल काढतानाच ती काहीतरी शोधत राहिली. कुणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत केदारच्या फोटोकडे तिने पाहून घेतलं. छातीत एक सूक्ष्म कळ उठली. तिला किती तरी बोलायचं होतं केदारबद्दल. पण मन अस्वस्थ झालं होतं. केदार असताना त्या घराची लेकच असल्यासारखी वावरलेली ती आज गोंधळून उभी होती. अंतर राखून केदारच्या आईशी ती बोलत राहिली. आठवणींची उजळणी झाली. कोण कोण भेटतं, सगळीजणं कशी आहेत असं वरवरचं बोलणं चाललं होतं. क्षणभर तिला वाटून गेलं की नाही म्हटलं तरी जखमेवर खपली धरली आहे. आज आपण येऊन ती खसकन ओढल्यासारखं तर नाही ना होत? काळ काही कुणासाठी थांबत नाही. त्याच्याबद्दलच्या आठवणी त्याच होत्या पण तो गेल्यानंतर दोन तपांचा कालावधी गेला होता. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. तिला मात्र केदारच्या आठवणींनी घेरून टाकलं होतं. ती आडून आडून पुन्हा पुन्हा तेच बोलत राहिली. अचानक कुठेतरी एकदम संभाषणाला खीळ बसल्यासारखं वाटलं तिला. नाक्यावर गेलेला तुषार परत आल्यावर मात्र ती सैलावली.

"चल, अख्खा गाव परत एकदा बघ. मगच कळेल तुला सांगोला किती बदललंय." त्याच्या आपुलकीने ती सुखावली. तुषारचं हे रूप तिला नवीन होतं. त्याने म्हटल्याप्रमाणे खरंच सगळं सांगोला पालथं घालून झालं. तिच्या जुन्या घरावरून चक्कर मारून झाली. खरं तर आत जाऊन डोकावायचं  होतं, पण तसं तुषारला सांगणं तिला जमलं नाही. केदारने न सांगताच ओळखलं असतं माझ्या मनातलं. ती स्वत:शीच पुटपुटली. जरा अतीच होतेय ही तुलना असं तिचं तिलाच वाटून गेलं. तुषार काही तिचा मित्र नव्हता तरी तो भावाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न नव्हता का करत? त्यांच्या मैत्रीचा साक्षीदार असल्यासारखा प्रत्येक ठिकाणी केदारची जागा घेत होता. त्याच्यासारखेच प्रश्न, त्याच्याचसारखं तिच्या मनातलं ओळखून एकेका ठिकाणी तिला नेणं. आणि तरीही केदार असता तर... असा आपण विचार करतोय आहोत या जाणिवेने ती ओशाळली, पण न राहवून म्हणालीच,

"तू बदललास तुषार."

पुन्हा तो हसला

"त्या वेळेस माझा कंपू वेगळाच होता. मला कल्पना आहे तुला आश्चर्य वाटत असेल मी इतका रस घेऊन तुला नेतोय सगळीकडे, पण हल्ली हल्ली जाणवायला लागलंय की केदारच्या मित्रमैत्रिणींत मी सहज सामावून जातो. तीच जवळची वाटतात मला."

शमिका त्याच्याकडे बघत राहिली. त्या वेळेस केदारचा मोठा भाऊ म्हणून केवढं आकर्षण होतं सगळ्यांना. तो मात्र त्याच्याच 

तोर्‍यात! तुटक, अलिप्त. त्यांच्या घरी गेलं की कितीदा तरी तो बोलायचाही नाही. आज त्याच्याकडून हे ऐकणं कठीण जात होतंच, पण त्यापेक्षाही ते स्वीकारणं फारच अवघड होतं. तिला वाटलं ओरडून सांगावं त्याला की नको प्रयत्न करू तू केदारची जागा घेण्याचा. तू तसाच राहा. आपल्याच धुंदीत, रुबाबात! प्रत्यक्षात मात्र ती बोलून गेली,

"केदारच बरोबर आहे असं वाटतंय मला आज."

तुषार एकदम गप्प झाला.  तिच्या मनाला वाटणारं  विचित्र अवघडलेपण तिला अधिकच घेरुन गेलं.

रात्री आग्रह करूनही ती थांबली नाही. तिला सोडायला आलेल्या तुषारशीही तिला फार बोलावंसं नव्हतंच वाटत. नीनाकडे तिला सोडल्यावर ’उद्या स्टेशनवर येत’ म्हणून त्याने तिचा निरोप घेतला. रात्र जागवून रतन आणि नीना गप्पा मारत राहिल्या. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत राहिल्या; पण झोप येते आहे म्हणत तिने बोलणं टाळलं. स्वत:च्या मनालाच विळखा घातल्यासारखी मुक होऊन गेली.

सकाळी तुषार तसा लवकरच आला. नीनाचा निरोप घेऊन रतन आणि तुषारबरोबर ती स्टेशनवर पोचली. 

"आता केव्हा येणार तू? केदार असता तर खूश झाला असता." तुषारच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं तिला.

"तुषार, केदार व्हायचा नको रे प्रयत्न करू. तू आहेस तसाच राहा." त्याचे दोन्ही हात हातात घेऊन सांगावंसं वाटत होतं, पण ती फक्त पाणावल्या डोळ्यांनी पाहत राहिली.

"येईन रे, नक्की येईन भारतात आले की...." पुढे काही बोलण्याआधीच रेल्वे आली.  गाडीने वेग घेतला तशी ती हात हालवत राहिली. गजातून जाईल तेवढं डोकं बाहेर काढून ती तुषारला डोळे भरून साठवून घेत होती. केदारला तर काळाने हिरावून नेलं होतं, पण केदारने जाताजाता तुषारलाही बरोबर नेलं होतं. बावीस वर्ष, एकदा तरी सांगोल्याला जायला हवं म्हणणारी शमिका आता पुन्हा कधीही इथे येणार नव्हती.                


(मेल्टिंग पॉट या कोकण साहित्य परिषद उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कारप्राप्त कथासंग्रहातील कथा.)


Friday, August 22, 2025

सावट

चतुरस्त्र अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले रानडेंनी रिक्त कथासंग्रहातील वाचलेली माझी 'सावट' कथा.


Saturday, August 16, 2025

प्रस्तर

कथा आणि अभिवाचन दुवा. वाचा किंवा ऐका.

तापाने फणफणलेली शीला कसल्याशा आवाजाने झोपेत चाळवली. चाहूल घेत ती डोळे किलकिले करणार तेवढ्यात दार दाणदिशी भिंतीवर आपटत सॅम आत शिरला.

"खायला कर काहीतरी. मला भूक लागली आहे."

शीलाने कसेबसे डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतला विखार तिचे शब्द गोठवून गेला.

"मॉम, गेट अप." त्याने तिचा हात ओढलाच. सणकन थोबाडीत ठेवून देण्याची उर्मी शीलाने पुढच्या रामायणाची आठवण येऊन टाळली. तिच्या डोळ्यात भिती तरंगली. मागचा पुढचा विचार न करता सर्व शक्तीनिशी उठत तिने चहा ठेवला.  तिची नजर शांतपणे ब्रेड ऑमलेट खाणार्‍या सॅमकडे वळली.

’क्षणात मनस्थिती इतकी बदलते? सोळा वर्षाच्या मुलाला रागावर नियंत्रण नाही ठेवता येत? आईच्या आजारापेक्षा खाणं महत्वाचं वाटतं? नालायक कार्टा, हलकट.’ स्वत:च्याच शब्दांची शीलाला लाज वाटली तरी मनातल्यामनात चार शिव्या दिल्या की बरं वाटतं हे तिने स्वत:शीच कबूल केलं.

"का उठले मी? घाबरुन?" आधीच्या प्रसगांची उजळणी करत शीलाने धागा जोडण्याचा प्रयत्न केला.

"मॉम, पैसे पाहिजेत मला. स्केटिंग शूज घ्यायचेयत." सॅमच्या स्वरातला उद्धट ठामपणा शीलाला झोंबला.

"नाहीयेत माझ्याकडे आत्ता इतके पैसे." तोपर्यंत सॅमने पायातले शूज भिरकावले.

"भिकारडे शूज. मी नाही घालणार." दार धाडदिशी आपटत अनवाणी पायाने सॅम बाहेर पडला. शीला अवाक होऊन तो गेला त्यादिशेने  पाहत राहिली. डोळ्याची पापणी लवतेय तोच पुन्हा दरवाजा खाडकन उघडत तो आत आला. शीलाचा डावा हात त्याने असा काही पिरगळला की ती वेदनेनं तळमळली. त्याक्षणी ती निकराने पैसे न देण्याच्या निर्णयावर ठाम राहिली होती.  ते धाडस आज तिची तापाने फणफणलेली कुडी दाखवू शकली नाही.

"चुकलं माझं. तोल गेला माझा. ताप कमी होतोय?" गोळी, पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरत त्याने विचारलं.

"सॅम, तुला उपचाराची गरज आहे. मानसोपचारतज्ञाची. " पाण्याच्या घोटाबरोबर गोळी घशात ढकलत तिने सॅमवर नजर रोखली.

"गप्प बस. मी कुकुलं बाळ नाही. समजलं ना." तिच्या हातातलं रिमोट हिसकावत त्याने  टी. व्ही. लावला. क्षणापूर्वी हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभ्या असलेल्या आणि लगेचच तोल गेलेल्या मुलाकडे ती भ्रमनिरास झालेल्या नजरेने पाहात राहिली. सतत पोखरणार्‍या शंकेने तिला पुन्हा ग्रासलं.

"हा बापाच्या वळणावर तर नाही ना चालला?"

रॉन  निघून गेल्यानंतर वर्ष सुखाची गेली. सॅम तर अवघा सहा वर्षांचा होता.

ती खुर्चीवरुन उठली पण आता तिचं लक्ष समोर उभ्या ठाकलेल्या दहा वर्षांवरुन हटेना. रॉनची तिची सुरुवाती वर्ष तशी सुखाचीच म्हणायला हवीत. फिजी सोडलं तेव्हा ती दहा वषांची होती. पन्नास टक्के भारतीय वंशाची मुळं असणार्‍या फिजीमध्ये सरकारी नोकरदार भारतीय फिजीकरांनी नाकारले, उठाव केला आणि भारतात परतण्याऐवजी शीलाच्या उच्चपदस्थ वडिलांनी अमेरिका गाठली. ’इथे नसतो आलो तर?" विचारातल्या निरर्थकपणाने शिलाने विषादाने मान हलवली.

जर इथे नसतो आलो तर सॅम भेटला नसता. पुढचं रामायण टळलं असतं; पण या जर तरने आता काय फरक पडणार होता?

 टी. व्ही. मध्ये नजर खुपसलेल्या सॅमकडे तिचे डोळे वळले. एकीकडे काम करता - करता सॅमच्या वर्गशिक्षिकेशी झालेल्या बोलण्याकडे तिचं मन ओढलं.

"तुझा मुलगा हुशार आहे शीला पण काहीतरी चुकतंय. एकदम स्फोट झाल्यागत भडका उडतो त्याचा. खूप दिवस निरीक्षण करतोय आम्ही. खेळताना मुलं टाळतात त्याला. घाबरतात सगळी. एकटा पडून काही विचित्र घडायला नको म्हणून तुला बोलावलं मुद्दम."

शीलाने वेळ न घालवता मानसोपचारतज्ञ गाठला. काहीशा जबरदस्तीनेच सॅम तिच्याबरोबर आला. बाहेर बसल्याबसल्या बंद दाराआड शीला रॉनला पाहत होती. असाच रॉनचा स्वभाव. तिला  किरकोळ कारणावरुन त्याने एका विद्यार्थ्याच्या नाकावर बुक्का मारुन रकतबंबाळ केलं होतं ते आठवलं. हॉस्पिटल, कोर्टकचेरी यातून बाहेर पडताना त्यावेळेला शीला निम्मी झाली. सोबत रॉनची चिडचिड, उद्धटपणा.

शीलाने नकळत तसाच उसासा सोडला. डॉक्टरांनी आत बोलावलं तेव्हा ती भानावर आली.

"सॅमला वर्षभर इथे यावं लागेल. तो..." बर्‍याचवेळाने ती बाहेर आली तेव्हा वाट बघून कंटाळलेला सॉम घरी निघून गेला होता.

"सॅम, मानसोपचारतज्ञाकडे जाणं म्हणजे वैगुण्यच असलं पाहिजे असं नाही. तू चांगला मुलगा आहेस. आहे त्यातून अधिकाधिक निर्माण करायचा प्रयत्न आहे हा. " त्याच्या न सांगता निघून जाण्याचा उल्ल्खेही न करता तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. सॅमने त्यानंतरचे तीन दिवस न खातापिता मौनव्रत धरलं. त्याही परिस्थितीत त्याच्या रागाचे आपण बळी ठरलो नाही यातच शीलाने समाधान मानलं.

ह्या गोष्टीलाही दोन वर्ष झाली होती. सुरुवातीला ती आवर्जून सॅमबरोबर दवाखान्यात जात असे पण प्रत्येक भेटीत बराच वेळ जायला सुरुवात झाल्यावर तिच्या वेळचं गणित जमेना. डॉकटारांनी फोन केल्यावर सॅमने तिथे जाणंच बंद केल्याचं तिला कळलं.

"निर्लज्ज मुलगा आहेस" फोन दाणदिशी आपटला तिने.

"बापासारखाच मनस्ताप भोगायला लाव. दोघांनी मिळून जगणं कठीण केलंयत माझं. तो तसा, तू असा. डोक्यात राख घालून तूही तोंड काळं करायला हवं होतंस त्याच्याबरोबर. चीड येते मला तुझी, खरंच चीड येते." रागारागाने ती सॅमसमोर उभी राहिली आणि क्षणभर आपण काय बोलतोय तेच विसरली.

’केवढा उंचापुरा वाढलाय.’

कौतुकाने तिने मान वर करत त्याच्याकडे नजर टाकली. त्याचा शांत पण खिन्न चेहरा पाहाताना तिचं काळीज तुटलं. एकाएकी दोन्ही हात धरुन तिने त्याला गदागदा हलवलं.

"सॅम, उपयोग होतोय उपचारांचा. बघ, तुझ्या बापाचा उद्धार करुनही तू शांत आहेस. रागाचा स्फोट नाही होऊ दिलास. उपयोग होतोय रे, उपयोग होतोय." सॅमला मिठी मारत ती गदगदून रडायला लागली. अलगद तिची मिठी सोडवत सॅम बाजूला झाला.

त्या प्रसगानंतर ती थोडीफार निश्चिंत झाली. ’सॅम बदलतोय? कुणास ठाऊक. रॉन बदलला?" उत्तर मिळवताना ती दचकली. कॉलेजच्या कॅन्टीनमधली त्याची मूर्ती तिच्यासमोर तरळली. काहीतरी जोरजोरात वादावादी चालली होती. रॉनचा आवाज सर्वात चढा. एकदा दोनदा जोरात त्याने टेबलावर मूठ आपटली तेव्हा 

कोपर्‍यातल्या टेबलावर खात बसलेलेल्या शीलाचं लक्ष तिकडे गेलं.

शाळकरी मुलांसारखं भांडतायत. शीला स्वत:शीच हसली. जाताना पाहिलं न पाहिल्यासारखं करत रॉनने ’हाय’ केलं तेव्हा त्याच्या देखण्या रुपाने शीला हरखलीच. आताही रॉनचा स्पर्श हवाहवासा वाटला तिला. सोफ्याच्या कडेवर हात घट्ट दाबत तिने पुरुषी स्पर्शाला आसुसलेलं मन बाजूला सारलं. रॉनच्या आणि तिच्या भेटी वाढत गेल्या आणि फिलीपाईन्सहून अमेरिकेत आलेल्या रॉनने अमेरिकन रिवाजाने तिला मागणी घातली.

"लग्न करशील माझ्याशी?"

होकार दर्शवित ती त्याच्या कुशीत शिरली. कॅन्टीनम्ध्येच त्याच्या प्रेमात पडल्याचं गालाला खळ्या पाडत तिने कबूल केलं. रॉननेही सगळ्यागाठीभेटी सहजपणे घडवून आणल्या होत्या असं हसतहसत सांगितलं तेव्हा शीलाने त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव केला.

दोघं संसारला लागण्याआधीच त्याच्या स्वभावाची चुणूक तिला जाणवली. बदलेल, आपण बदलू त्याचा स्वभाव. नाही तर करु थोडी तडजोड. तारुण्याचा जोष तिच्या आजूबाजूला घुटमळत होता. पण वर्षाच्या आत दोघं मेटाकुटीला आले. लग्न टिकवण्याची धडपड किती निष्फळ आहे हे तिला जाणवत होतं पण कुणाचाच आधार नसलेल्या शीलाला तुटकी काडीही मोडण्याचं धाडस झालं नाही. तिने रॉनच्या मागे मुलाचा आग्रह धरला. ते वर्ष बरं गेलं. नवीन जीव घरात येणार ह्या आनंदात दोघंही कडवटपणा विसरले.

सॅममध्ये शिलाने स्वत:ला पार अडकवलं. बघता बघता तो सहा वर्षांचा झाला पण बापलेकांचे संबंध यथातथाच होते. सॅम रॉनला भिऊनच असायचा. तिने दोघांचं जमावं, त्यांनी एकत्र खेळावं, रमावं याचा आटोकाट प्रयत्न केला. सॅमसमोर वाद टाळले तरी रॉनच्या रागाची झळ त्याला पोचत होतीच. वर्ष जातील तसा रॉनचा आक्रमकपणा वाढत होता. शेवटी तर त्याने कळस गाठला. सॅममध्ये ती गुंतलेली त्याला चालेनासं झालं. त्याच्या शारीरिक भुकेला पुरं पडणंही तिला अशक्य झालं.

त्या दिवची रात्र तिच्या डोळ्यापुढून सरेना.

"रॉन, नको ना. आज नको. सॅम आत्ताच झोपलाय." ती काकुळतीला येऊन विनवत होती. दोघांचे आवाज चढले तसा सॅम दारात येऊन उभा राहिला.

"मॉम, डॅड बास ना, बास..."

त्याचं रडणं, ओरडणं रॉनच्या मस्तकात गेलं. त्याने जोरात सॅमला दाराबाहेर ढकललं. सॅम तोल जाऊन पडला. कपडे सावरत शीला पुढे धावली. जीवाच्या आकांताने तिने रॉनच्या गालावर थप्पड मारली. क्षणभर रॉनलाही काय झालं ते समजलं नाही; पण दुसर्‍याक्षणी शीलाला त्याने लाथाबुक्क्यांनी तुडवलं. पुढे धावलेला सॅमही त्यातून सुटला नाही. हातात येईल तो शर्ट खसकन अंगावर चढवत रात्री एक वाजता घराबाहेर पडणार्‍या आपल्या नवर्‍याकडे सॅमला कुशीत घेत शीला अगतिकपणे पाहत राहिली.

त्यादिवसी प्रथमच तिला रॉनच्या आणि तिच्या आईवडिलांची चीड आली. सगळे बंध नाकारत ह्यांनी देश सोडला. प्रत्येकाचे एकुलते एक आम्ही. ना बहीण, ना भाऊ.  स्वत: सगळ्या पाशातून मुक्त झाले पण आम्ही मात्र एकटे पडतोय. हा देश परका म्हणून आणि आपल्या देशात कुणाशी संबंधच नाहीत म्हणून.

उमटलेल्या वळांवर हात फिरवत ती सॅमला थोपटत राहिली. त्यानंतर रॉन परतला नाही. ’येईल पुन्हा डोकं ताळ्यावर आलं की’ शीलाने स्वत:ला बजावलं. सॅम गप्प, गप्प होता. नेहमीप्रमाणे चार दिवसता रॉन आला नाही. तेव्हा कर्तव्य म्हणून तिने त्याच्या शाळेत फोन केला. आज येईल, उद्या येईल म्हणत महिना गेला आणि अखेर सॅमला समोर घेत तिने समजावलं. मिटलेले ओठ घट्ट दाबत सॅम शीलाकडे एकटक पाहात राहिला. रडावंसं वाटूनही ती रडली नाही. कुठे तरी सुटकेचा नि:श्वास सॅमला ऐकू न येण्याचा प्रार्थना मात्र करत राहिली.

दोघांचं जीवन सुरळीत सुरु झाल्यावर ती संथावली. सततचा तणाव, भांडणांना पूर्णविराम मिळाला या समाधानात सॅमभोवती तिच्या वेळेची वेणी गुंफली गेली आणि सॅमच्या स्वभावातला उग्रपणा तिला टोचायला लागला. स्वत:च्या मनाची अनेक वेळा तिने समजूत घातली. रॉनच्या जाण्याची जखम ताजी आहे, तसा लहानच आहे, हळूहळू येईल समज. एक ना अनेक. यातून ती बाहेर पडण्यापूर्वीच अचानक रॉनचे फोन येणं सुरु झालं. प्रत्येकवेळी फोन ठेवावासा वाटूनही तिने तसं केलं नाही पण दुखावलेल्या मनाने, अहंकाराने त्याचा ठावठिकाणाही विचारु दिला नाही, त्यानेही कधी आपणहून काही सांगितलं नाही. सॅमनं मात्र रॉनशी बोलायला ठामपणे नकार दिला. एकदोनदा बोलला तेव्हाही संभाषण एकतर्फीच झालं. शीलाही त्याला समजावण्याच्या भागगडीत पडली नाही. हळूहळू त्यांचे फोन कमी झाले. मग बंदच पडले. बरीच वर्ष रॉनचा उल्ल्खेखही त्या घरात झाला नाही.

पण अचानक रॉन दारात उभा रहिला. शीला गोंधळली. सॅम डोळे ताठ करुन बघत राहिला पण लगेचच जोरात आपटलेल्या दाराचा आवाज शीलाच्या कानात घुमला. द्विधा मन:स्थितीत ती तशीच उभी राहिली. 

’काय अवस्था झाली आहे देहाची” एकटक  ती रॉनला न्याहाळत राहिली.

"बोलणार नाहीस?"

’हा माणूस एवढा हळूवार होऊ शकतो?’ त्याच्या स्वराचं तिला आश्चर्यच वाटलं.

"सॅमच्या मनात किती राग धुमसतोय ते दिसतंय मला; पण आता फार थोडे दिवस उरले आहेत माझे"

"काय होतंय तुला?" विचारावं वाटूनही ती अस्वस्थ हालचाली करत राह्यली.

"चहा करतेस? भूकही लागली आहे."

रॉनचा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न चालू होता. काही न बोलता ती चहाच्या निमित्तानं स्वयंपाकघरातच घुटमळत राहिली.

’कधी जाणार हा? का परत आला कायमचा?’ तिचं हृदय धडधडलं.

’नको, आता आणखी ताण मी नाही सहन करु शकत.’ उलटसुलट विचारांनी तिचं डोकं भणभणून गेलं.

गोड शिर्‍याची प्लेट तिने जरा जोरातच टेबलावर ठेवली.

"अजूनही लक्षात आहे तुझ्या मला काय आवडतं ते?" न ऐकल्यासारखं करत तिने ग्लासमध्ये पाणी ओतलं.

"मॉम लगेच इकडे ये. ताबडतोब." शीला सॅमच्या खोलीकडे धावली.

"त्या माणसाला घराबाहेर व्ह्ययला सांग. लगेच. आत्ताच्याआत्ता." तांबारलेल्या डोळ्यांनी सॅम शीलाकडे पाहत राहिला.

"त्याची अवस्था बघ तू. आणि तो माणूस तो माणूस काय करतोस? वडील आहेत तुझे ते."

"तू सांगतेयस हे? प्रथमच ऐकतोय मी वडील शब्द. नेहमी तुझा बाप, तुझा बाप असचं असायचं.

"गप्प बस. मी जायला सांगणारच आहे रॉनला; पण तो का आलाय ते तर कळू दे."

"गरज नाही. काय संबंध आहे आपला आता त्यांच्याशी? मीच सांगतो." सॅमला थोपवून ती बाहेर आली. रॉनच्या चेहर्‍याकडे पाहताच त्याने दोघांचं बोलणं ऐकलंय हे तिने ताडलं.

"तो तुझ्यासारखाच आहे. संतापी. उपचार चालू आहेत म्हणून बर्‍यापैंकी शांतपणे घेतलं तुझं आगमन."

"मी बदललोय. बघू नकोस असं. मला माहित आहे तुझा विश्वास बसणार नाही यावर. माझा तसा प्रयत्नही नाही. मला शेवटचे दिवस तुम्हा दोघांबरोबर या घरात काढायचे आहेत. सॅमला बोलव. मला बोलायचं आहे तुम्हा दोघांशी." तिने हाक मारायच्या आत सॅम शीलाच्या बाजूला येऊन बसला.

"त्यादिवशी मी रागाच्या भरात बाहेर पडलो त्याला दहा वर्ष होतील. नेहमीप्रमाणे राग शांत झाल्यवरही परत यावंसं वाटलं नाही. कुठेतरी स्वत:चा शोध घ्यावासा वाटला. सामान्य माण्सासारखा कधी तरी राग येणं आणि माझं वागणं यातला फरक पटत होता. तू फार भरडून निघत होतीस. सॅमला माझ्या रागाची झळ लागत होती, ते टाळायचं होतं."

काहीतरी विचारण्यासाठी मायलेकांनी एकदमच तोडं उघडलं पण दोघंही काही न बोलता रॉनकडे बघत राहिले.

"सॅमसाठी उपचार चालू आहेत हे चांगलं झालं. जे मला जमलं नाही ते तुला सुचलं. शेवटी हेही अनुवंशिकच म्हणायला हवं. मी थकलोय आता. बरेच दिवस सरकारी दवाखान्यात  राहिलो. तिथून पळून आलो इथे. रोगाने शरीर पोखंरलंय. जास्तीत जास्त सहा महिने. तू घालवणार नाहीस या विश्वासावर आलोय मी इथे पण सॅमचंही मत महत्वाचं आहे." सॅम हसला,

"माझं मत? या घराला माझंही मत महत्वाचं वाटतं? तर मग माफी मागा आमची. पायावर नाक घासून. आहे शक्य?" दाणकन सोफ्यावरची उशी आपटत सॅम उठला. शीला, रॉन एकमेकांची नजर उगाचच चुकवत राहिले. शेवटी शीलानेच संभाषण चालू ठेवलं.


"तुझं बोलणं कितीही मान्य केलं तरी काही प्रश्न उरतातच रॉन. तू का गेलास हे कधीच स्पष्ट झालं नाही. तीन चार वर्ष फोन केलेस पण तुला जाणवलं नाही की सॅमला तुझ्या प्रेमाची, आधाराची गरज असेल? मुलांना वडिलांच्या सहवासात आश्वासक वाटतं हे ठाऊक नाही तुला? तुला वाटलं म्हणून तू स्वत:चा शोध सुरु केलास, तुझी इच्छा म्हणून फोन करायला सुरुवात केलीस आणि तुला वाटलं म्हणून अचानक फोन करणंही बंद केलंस. त्यात आम्ही दोघं कुठे होतो रॉन?"

"वर्षभर मी हॉस्पिटलमध्ये होतो शीला."

"सहा वर्षांबद्दल म्हणतेय मी." काही न बोलता रॉनने बोटात बोटं गुंतवली.

"आता विषय वाढवणं निर्थक आहे रॉन. तू राहा इथे पण आपलं नातं नवराबायकोसारखं नसेल हे मान्य असेल तर... तू निघून गेलास तेव्हा शारीरिक भुकेला आसुसलेल्या लांडग्यापासून सुटका झाल्यागत वाटलं; पण नंतर तुझ्या आधाराची उणीवही भासली अनेकदा. सॅमच्या स्वभावातला विचित्रपणा जाणवला तेव्हा तुझ्या आश्वासक स्पर्शासाठी रात्र जागून काढली मी. अनेकदा शरीरानेही बंड पुकारलं पण तू समोर आल्यावर सगळ्या इच्छांची राख झाल्यासारखं वाटतंय."

"तू म्हणशील ते मान्य आहे. तुम्हा दोघांबरोबर राहायचं एवढीच इच्छा आहे माझी." रॉनने सोफ्यावर अंग टाकलं.

शीलाने चार दिवस मोकळे ठेवले. रॉनला डॉकटरांकडे नेणं, औषधं, नवीन कपड्यांची खरेदी या सगळ्याला वेळ पुरत नव्हता. बापलेकात फारसं संभाषण नाही हे तिला जाणवत होतं पण त्याबाबतीत काही करण्याचं त्राण तिच्यात नव्हतं आणि इच्छा तर अजिबातच नव्हती. शुल्लकशा कारणानेही सॅम संतापत होता. पुन्हा आपण या दुष्टचक्रात अडकत नाही ना या शंकेनं तिचा जीव त्रासला. हे असंच चालू राहणार असं वाटत असतानाच अचानक सॅमच्या निर्णयाने तिला काही तरी गमावल्यासार्खं तरीही मोकळं झाल्यागत झालं.

"मॉम, मला नोकरी मिळतेय. मुख्य म्हणजे स्टुडीओत बस्तान हलवतोय मी उद्याच."

स्वतंत्र राहण्याची अनिवार इच्छा आणि उतावळेपणा त्याच्या चेहर्‍यावरुन ओसंडत होता. बोलण्यासारखं काही नव्हतंच. तिने त्याला अलगद कुशीत  घेतलं.

सॅमला निरोप देत ती दारापाशीच घुटमळली.

सॅम सोळा वर्षांचा झाल्यापासून ती या क्षणाची वाट बघत होती; पण त्याचवेळेस रॉनच्या परतण्याची शक्यता जमेला धरणं मात्र राहून गेलं होतं.

रॉन नसता तर याक्षणापासून आयुष्य वेगळं असतं. मोकळं, तणावरहित. सॅमचं स्वाववलंबीपण सुखद वाटतंय तस रॉनचं आगमन का नाही स्वीकारु शकत मी? नाकारायचं तर ते तरी ठामपणे करायला हवं होतं. आता फक्त शेवट कधी होईल याची वाट पाहणं एवढंच उरलंय माझ्या हातात. मागे वळून रॉनकडे पाहताना तिचे डोळे भरुन आले.

बंद दारापलीकडे निघून गेलेल्या सॅमच्या आणि दाराअलिकडच्या रॉनच्या मधोमध उंबरठ्यावर अश्रू रोखत ती उभी राहिली... ठामपणे!


(मेल्टिंग पॉट या कोकण साहित्य परिषद उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कारप्राप्त कथासंग्रहातील कथा.)



Wednesday, February 21, 2024

पाश



मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा त्याच्या जोडीदारासह अनपेक्षित पाऊल उचलतो.‌ दोघांच्या वागण्याने घरादाराची फसवणूक होते, घरातल्यांना समाजाला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न पडतो. प्रेमाचे पाश या कुटुंबाला बांधून ठेवतात की ते पाश गळ्याभोवती आवळले जातात?

Monday, October 24, 2022

लेखन फराळ

 यावर्षी दिवाळी अंकातील माझ्या लेखनाचा फराळ. एकूण १० दिवाळी अंकात कथा, लेख आहेत. यावर्षी मला विशेष आनंद होतो आहे तो बालकथांचा. मी लिहिलेल्या बालकथांना माझ्या मराठी शाळेच्या (Online) विद्यार्थ्यांनी छायाचित्र रेखाटली आहेत.  

यातील काही अंकांचे विनामूल्य वाचण्यासाठी दुवे:

Marathi Culture & Festivals -  

https://www.marathicultureandfestivals.com/

बृहनमहाराष्ट्र वृत्त: 

https://bmmonline.org/vrutta-archive/2022-2/

१  आमचं दिनांक: अंतर्दाह कथा - एका तरुण मुलीच्या मनातील वादळ आणि तिच्याबरोबरच त्या वादळात झोडपून, तावूनसुलावून सुखरुप बाहेर पडलेल्या सर्वांच्या मनाचा अंतर्दाह 

२. पुढारी (कोकण): अमेरिकेत कोकण - अमेरिका हा ’मेल्टींग पॉट’ आहे त्यात असणार्‍या कोकणाबद्दल लेख.

३.  बृहनमहाराष्ट्रवृत्त: रोख -  देश सोडलेली ती जेव्हा आजारी वडिलांना भेटायला जाते तेव्हा नजरा आणि बोलण्यातून तिच्या अंगावर आदळणारा हा ’रोख’.

४. अनुराधा: - चुकामूक - बर्‍याच वर्षांनी भारतात गेल्यावर अचानक बालमित्राला भेटायची संधी मिळते खरी पण त्यातून निर्माण झालेला गोंधळ म्हणजे ही कथा.

५. रंगदीप: डॉ. गंगाधर मद्दीवार आणि सुरेखा मद्दीवार यांचं भारत आणि अमेरिकेसाठी योगदान अमोल आहे. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून झालेली त्यांच्या कार्याची ओळख म्हणजे हा लेख.

६.सामना: वादळ - एका तरुण मुलाला त्याच्या जन्माचं रहस्य कळल्यावर गुप्तहेर नेमलेल्या मुलाची आणि स्वत:च्या जन्माचं रहस्य शोधता, शोधता त्याच्या हाती लागलेल्या वेगळ्याच गुपिताची ही कथा ’वादळ’.

७.शब्दरुची: दीपस्तंभ -  कोणाकडून कोणता धडा आपण शिकू ते कधीच सांगता येत नाही तसंच कोण, कोणाकडून प्रेरणा घेईल हेही. स्वत: प्रेरणा घेऊन आपल्यासाठी प्रेरणादायी काही    व्यक्तीमत्वांच्या रंजक कहाण्या म्हणजे हा लेख.

८.  अभिरुची: थोबाडीत - घरातली लहान मुलं मोठ्या माणसांचं बोलणं ऐकतात आणि काय होतं त्यावरची ही चिमुकली कथा. चित्र - कौशल दलाल.

९.   प्रसाद: भगदाड - आता मुलंच ती. काय करतील ते सांगता येत नाही. त्यातलंच हे भगदाड. चित्र - अवनी किरकिरे.

१०. मराठी कल्चर आणि फेस्टीवल - बेअक्कल: आता लहान मुलंच ती. कधीकधी वागणारच ना मनाला येईल ते. लगेच काय आम्हाच्या अकलेचे तारे काढायचे. चित्र - तेजल हिंगे.



Monday, November 16, 2020

दिवाळीचा साहित्य फराळ



 नमस्कार मित्र मैत्रिणींनो ,

माझा दिवाळीचा फराळ हा असा आहे:
१ सामना दिवाळी अंकात ’चोरीचा मामला’ ही माझी हलकीफुलकी कथा आहे.
२ प्रसाद दिवाळी अंकात पाचशे मैल ही गोर्डन वेन (Gordon Wayne) या
युवकाच्या जीवनावर प्रेरणादायी कथा आहे.
३ अनुराधा दिवाळी अंकात काटशह ही कथा नावाप्रमाणेच एकमेकांवर कुरघोडी
करण्याच्या प्रयत्नात असणार्या काही प्राध्यापक आणि विद्यार्थीनीची आहे.
४ मेहता ग्रंथ जगतच्या दिवाळी अंकात मांजर, नवरा आणि मुलं हा ललित लेख
आहे. कोणाची, कुणाशी तुलना केलेली आहे हे लेख वाचलात तरच कळेल 🙂
५ माझा मराठीचा बोल (मामबो) या इ दिवाळी अंकात ती वही ही पती - पत्नी
आणि त्यांच्या मित्राच्या वहीची हलकीफुलकी कथा आहे.
६ बृहनमहाराष्ट्र वृत्तच्या दिवाळी अंकात दृष्टी ही कथा विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या
नात्याचे पदर उलगडणारी कथा आहे.
७ अभिरुची दिवाळी अंकात त्सुनामी या आमच्या मांजराच्या आगमनाची,
तिच्यावर ओढवलेल्या संकटाची कथा म्हणजेच माझा ललित लेख आहे.
यातले मामबो आणि बृहनमहाराष्ट्र वृत्त आंतरजालावर वाचण्यासाठी हा दुवा -
मामबो - https://www.mazamarathichabol.org/
(इथे गेल्या चारवर्षांचे दिवाळी अंक वाचता येतील)
बृहनमहाराष्ट्र वृत्त - https://bit.ly/3kvwbEN
वाचा आणि अभिप्रायही कळवा ही विनंती.

Thursday, October 8, 2020

कथा अभिवाचन

 

दुवा - https://www.facebook.com/artistsharmony/

अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात सुधारणेचं वारंही
जवळपास पोहोचू न देणारी जवळजवळ २,००,००० लाखांच्यावर लोकवस्ती आहे यावर विश्वास बसेल? पण हे खरं आहे. अमेरिकेतल्या पेनसेलव्हिनिया आणि ओहायो या भागात  आमिश/ऑमिश नावाची ही जमात आहे.

आपल्याकडच्या ग्रामीण जीवनाशी थोडंफार साम्य असलेल्या या जमतीच्या चालीरीती फार वेगळ्या आहेत. यामुळेच सर्वसामान्य अमेरिकन आणि पर्यटकांनाही यांचं आकर्षण वाटतं. ’फॉर रिचर ऑर पुअरर’, ’विटनेस’ यासारखे चित्रपट आमिश समाजजीवनावर बेतलेले आहेत.

साधारण १५१२ च्या दरम्यान युरोपमध्ये होऊ घातलेल्या सुधारणा धर्मांबद्दलही उलथापालथ करणार्‍या होत्या. शिशुबाप्तिसाविरोधी आणि धर्म व राज्यकर्त्यांचा संबंध नसावा या मतांचा आग्रह धरत १५२५ मध्ये उलरिच त्स्विलग्लीने वेगळा पंथच निर्माण केला. या पंथात सामील होणार्‍यांना हद्दपार किंवा मृत्यूदंड या मतप्रवाहाला विरोध असणार्‍या स्थापितांकडून सुनावला गेला. बायबलमध्ये शिशुबाप्तिसामाचा उल्लेख नसल्याने हा पंथ आपल्या विश्वासावर ठाम होता. कठोर परिश्रमावर विश्वास ठेवणारा हा पंथ म्हणजेच आमिश/ऑमिश जमात.

युरोपमधून धर्ममुक्त वातावरणाचा शोध घेत ही मंडळी अमेरिकेत पोचली.‍ दुसऱ्या महायुद्धानंतर भोवताल बदलला.  जनजीवन अत्याधुनिक बनलं पण आमिश तसेच राहिले. अधूनमधून बंडखोरीची उदाहरणं पुढे येत असतात तसंच या लोकांचा तिटकारा करणार्‍या गटांकडून मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात. युरोपमध्ये आता आमिश नाहीत. वाढती कुटुंबसंख्या आणि त्यामानाने कमी पडणारी शेतीची जमीन यामुळे इतर देशांमध्ये हे हळूहळू विखुरले जात आहेत. त्यांच्या विश्वासानुसार, नियमांनुसार त्यांना जगण्याची मुभा मिळावी इतकीच माफक अपेक्षा ते करतात.

Tuesday, March 31, 2020

इटुकल्या पिटुकल्या गोष्टी

माझ्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी  सांगितलेल्या माझ्या गोष्टी -  FB - Live




आजोबा
 'चष्मा आण, पाणी दे. चहा कर.आजोबा दिसेल त्याला पकडतात. कामांची रेल्वेगाडी सोडतात. आई म्हणते, नाचवतात सगळ्यांना.
मी त्यांना  काम सांगितलं की मात्र ओरडतात,
 'हातपाय आहेत ना? स्वत:ची कामं स्वत: करायची' असं म्हणतात आणि आरामखुर्चीत डुलत बसतात.
मी आज खोलीत लपून बसलो. कामांची रेल्वेगाडी आजीने हाकली.  आजोबा गेले. मी हळूच विचारलं.
"गेले का जमदग्नी?"
"कोण जमदग्नी? बाहेर ये." आजोबा खेकसले. मी घाबरलो.  आजोबा होते की इथेच. मी पळणार होतो पण आजोबांनी मला धरून आणायला आजीला पाठवलं असतं.
"बाहेर ये." आजोबा परत जोरात ओरडले. मी बाहेर आलो.
"कोण जमदग्नी?" आजोबांनी डोळे वटारुन विचारलं.
"आजी तुम्हाला जमदग्नी  म्हणते.  जमदग्नी म्हणजे काय?" आजोबानी मला उत्तर दिलं नाही. ते  आजीवर वसकन ओरडले.  आजी आहे कुठे? आजी तिथे नव्हतीच.  नेहमी मी पळतो. आज आजी पळाली.
पण मला कुणीतरी सांगा ना,  जमदग्नी म्हणजे काय?
                                      -----------------------------------------
 भगदाड

"उठ गं" आईचा आवाज चढला.
"झोपले की उठवतेस. उठले की झोपवतेस." मी कुरकुरले.
"लाडात येऊ नकोस." ती चिडली. निघून गेली.  मी उगाच भिंतीवर पाय मारला. इकडच्या भिंती पोकळ. भगदाडच पडलं. मी घाबरले.
"काय झालं?" आईने खालून जोरात विचारलं
"पुस्तक पडलं."  मी भगदाड झाकलं. त्यावर उशी ठेवली. धावत खाली गेले.
"खरं सांगितलं की तू ओरडत नाहीस ना?"
"काय केलंस?" आई चिडली. मी गप्प.
"सांग. नाही ओरडणार." नाईलाजाने आई म्हणाली.
तिला मी खोलीत नेलं. भगदाड दाखवलं.
"?" आईचं तोंड उघडंच राहिलं. ती मटकन बसलीच.  चिडली, बडबडायला लागली.
"तू ओरडणार नव्हतीस." मी रडायला लागले.
"मी ओरडत नाहीये." ती ओरडत म्हणाली.
मोठी माणसं! बोलतात एक, वागतात वेगळं. मोठी माणसं! 
-----------------------------------------
मजा
 एकदा मजा झाली. आईने न सांगता मी सगळं केलं. दात घासले, आंघोळ केली. नाश्ता कटकट न करता खाल्ला, गृहपाठ केला. एकदम शहाण्यासारखी वागले. आईला धक्काच बसला. बाबाला वाटलं मला अक्कल आली.
दादा म्हणाला,
"काहीतरी गडबड आहे." तो  गडबड शोधायला खोलीत गेला.  माझ्या, त्याच्या. परत आला.
"काय रे? काय उद्योग केले आहेत कार्टीने?" आईने विचारलं.
"काही नाही." तो पुटपुटला. मी दादाची फजिती झाली म्हणून टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात बाबा दादाचं चित्र घेऊन आला. मी घाबरले. आईच्या मागे लपले.
"पिकरुने काढलंय?" आईने विचारलं.
"नाही. दादाचं नाव पुसलं..." बाबा म्हणाले.
"म्हणजे?" आईला काही कळलं नाही.
"चित्र कुणी काढलं?" बाबानी विचारलं.
"मी काढलं." दादा म्हणाला.
"नाव कुणाचं दिसतंय?" बाबानी विचारलं. दादाने नीट पाहिलं.
"माझं नाव पुसून हिने तिचं घातलं."  दादा किंचाळला.
"म्हणून शहाण्यासारखी वागत होती." आई पुटपुटली. दादाने मला ढकललं,  केस ओढले.  मी पुन्हा बेअक्कल झाले.  भोकाड पसरलं.

-----------------------------------------
थोबाडीत
 आमच्याकडे मायाताई काम करते. उशीरा येते. कधीकधी येतच नाही. आजही तिचा पत्ता नव्हता.
"एक लगावणार आहे तिच्या." आई म्हणाली. दार वाजलं.  मायाताई आली.
"आई, तुझ्या एक लगावणार आहे." मी तिला सांगितलं. मायाताई थांबलीच नाही. पळाली.
आईने माझ्या एक लगावली. मी कोपर्‍यात रडत बसलो.
"नको तेव्हा नको ते बोलतेस. तुझ्या बाबांसारखं."
"मग त्यांना लगाव." बाबा आला आणि कोपर्‍यात बसला.
"त्याला लगाव ना." मी पुन्हा म्हटलं. आई हसली आणि तीही कोपर्‍यात येऊन बसली.
या मोठ्या माणसांचं काही समजत नाही. आई - बाबांनी  मला जवळ घेतलं.
"मायाताईची भांडी बाबा घासणार आहे." आई म्हणाली
"म्हणजे?" मला काहीच कळत नव्हतं.
"अरे, तू बाबांना लगाव म्हणालास ना?"
"हो."
"मग बाबांनी भांडी घासली की झालं."
आई ना. नेहमी कोड्यात बोलते.
तुम्हाला कळलं का? कळवाल का याचा अर्थ?







Friday, January 31, 2020

संकोच

"तोच तोच विनोद तू मला का सांगतेस?" आईवर मी चिडले आणि दाणदाण पाय आपटीत
माझ्या खोलीत आले. खोलीचं दार धाडकन बंद केलं.
"दार मोडेल. हळू आपट." घ्या, माझ्या रागापेक्षा आईला दाराची काळजी. पुन्हा एकदा दार उघडून जोरात आपटावं असं वाटलं मला; पण तसं केलं तर संपलंच. आईची बडबड जी चालू होईल ना ती थांबणं कठिण. मी पलंगावर अंग टाकलं आणि माझा राग हळूहळू शांत होत गेला. हो, आता मी चौदा वर्षांची आहे तर आई गेल्यावर्षीपासून तिच्या कामाच्या ठिकाणी पोनीटेलने केलेला विनोद सांगते दरवेळेस. कधी मला, कधी सर्वांना. इतकी लाज आणते ना. सगळे हसतातही तिच्या या विनोदावर. मूर्ख नुसते. आजही तेच म्हणाली,
"पोनीटेल म्हणतो तसं तुला एका पिंपात घालायला पाहिजे आणि १९ वर्षांची झालीस की बाहेर काढू." हेच, दरवेळेस हेच. मग मी वर लिहिलंय ते म्हटलं आणि पुढे पुस्ती जोडली.
"त्यापेक्षा तुला पिंपात ठेवते आणि मी १९ वर्षांची झाले की बाहेर काढते." संपलं. खरं तर मी हे मनातच म्हणते नेहमी पण वर्षभर ऐकून एकदम आलंच तोंडून बाहेर. खरं सांगू? मला खो, खो हसायला येतंय आता म्हणजे मी कल्पना करतेय की आईला खरंच पिंपात टाकलं तर? एकवेळ मी राहीन पडून कितीही वर्ष पिंपात पण आई? छे, आतून पिंपाच्या झाकणावर बडवत बसेल, ’मला बाहेर काढा, काढा’ म्हणत. पिंपाला भोकं मात्र ठेवायला हवीत. श्वास घेता यायला हवा नं आणि भोकातून ठेव म्हणावं पूर्ण घरावर लक्ष. पण ते जाऊ दे. आमची खरी समस्या ही नाहीच. ही होती त्यावरची प्रतिक्रिया. मी हे असंच बोलते याला कारण आहे माझी आई. या पोनीटेलच्या सहवासाचा तिच्यावर परिणाम झालाय आणि तिच्यामुळे माझ्यावर.  आई पोनीटेलकडे काम करते.  तिथेच तिचा हा पोनीटेल काहीतरी पाचकळ विनोद करतो आणि आईला ते आवडतात. पोनीटेल हे त्याचं नाव नाही. तो पोनीटेल बांधतो म्हणून आई त्याला पोनीटेल म्हणते. माझ्या प्रत्येक प्रश्नावर, अडचणीवर आईकडे एकच उपाय, पिंपात टाकणे. जाऊ दे. पिंपाबद्दल खूप झालं.

सरळच सांगायचं तर माझा बाबा ही आमची समस्या. नाही, नाही माझा बाबा मला छळत नाही, त्रास देत नाही. उगाच कान टवकारू नका. मला ठाऊक आहे तुम्ही वाचताय पण मला वाटतंय की मी तुम्हाला सांगतेय, तुमच्याशी बोलतेय म्हणून म्हटलं, कान टवकारू नका. हे असं होत चाललंय माझं. आईसारखं. आई मला म्हणते मी विषय भलतीकडे नेते पण मी तिच्याकडूनच हे शिकले आहे पटतच नाही तिला.  तर मुद्दा असा आहे की मला असं वाटतं, माझ्या बाबाचं माझ्यावर प्रेम नाही. कदाचित तुम्हालाही पुढे मी जे सांगणार आहे त्यावरून ते लगेच पटेल, खात्री होईल.

माझ्या आईने बाबाशी लग्न केलं त्याला १० वर्ष झाली. चार वर्षांची होते मी. बाबाला त्याची आधीची दोन मुलं आहेत. मुलगे. आई त्यांना टोणगे म्हणते म्हणून मीही इथे आता त्यांना टोणगेच म्हणेन. माझ्या आईचं आणि बाबाचं, दोघांचीही ही दुसरी लग्न आहेत. पहिल्या जोडीदाराशी पटलं नाही म्हणून घटस्फोट घेऊन केलेली. माझे आई - बाबा का वेगळे झाले हे लहान असताना मला माहीत नव्हतं. दोन - दोन बाबा माझे लाड करतात याचा आनंद जास्त होता. तेच टोणग्यांचं. त्यांना दोन आया लाड करायला. एका गावात नसल्यामुळे दुसर्‍या बाबाशी कधीतरीच भेट व्हायची त्यामुळेही सर्व सुरळीत चाललं असावं किंवा आम्ही सर्वच लहान होतो त्यामुळे जाणही तितकीच. काय कारणं असतील ती असतील पण  मी मोठी होत असताना सगळं व्यवस्थित चालू होतं. कधीतरी वाढत्या वयाबरोबर वास्तव कळलं असेल. नातेवाईक आणि आजूबाजूची माणसं असतातच तुमच्या मनाचा तळ ढवळून काढायला असं आई म्हणते. काय असेल ते असेल पण गेल्या वर्षापासून मला जाणवायला लागलं की बाबा पूर्वीसारखा नाही वागत माझ्याशी. फक्त माझ्याशीच.  टोणग्यांशी त्याचं वागणं मला जास्त प्रेमाचं, जवळीक साधणारं वाटतं. आईला सांगावंसं वाटत होतं पण मी ते टोणग्यांनाच ऐकवलं. दोन्ही टोणगे माझ्यापेक्षा मोठे आहेत. दोन आणि तीन वर्षांनी. त्यांनी शांतपणे ऐकलं. एक टोणगा म्हणाला,
"तुझ्या मनाचे खेळ आहेत. उगाच काहीतरी डोक्यात भरवून घेतेस स्वत:च्या आणि आमच्या डोक्याला त्रास देतेस." दुसरा टोणगा म्हणाला,
"असेल. तसंही ते तुझे बाबा नाहीतच ना?" मला एकदम रडायलाच यायला लागलं. हेच असेल का खरं कारण? आतून कळलेलं का मला म्हणून इतक्या पटकन रडायला आलं? मला आता माझ्या स्वत:च्या बाबाकडे जावं असं वाटायला लागलं. आतापर्यंत खरंच असं कधी वाटलं नव्हतं पण जर माझ्या  बाबाला मी त्याची रक्ताची मुलगी  नाही म्हणून प्रेम वाटत नसेल तर कशाला राहायचं मी इथे? फक्त आई हवी म्हणून? तो विचार तिने करावा. हा तिढा ती सोडवू शकत नसेल तर तिच्यासाठी माझी किंमत तितकीच असा अर्थ मी काढलाय. मी रडता रडता विचार करत होते त्या वेळात टोणगे एकमेकांशी भांडायला लागले. ते तुझे बाबा नाहीतच असं एका टोणग्याने म्हणणं हे दुसर्‍या टोणग्याला क्रूरतेची परिसीमा असं काहीतरी असतं ना तसं वाटलं त्यामुळे त्यांची चांगलीच जुंपली. मी रडायचं विसरून त्यांच्या भांडणात सामील होणार तितक्यात आई डोकावलीच.
"काय चाललंय?" तिला आम्ही तिघं एकत्र असलो की भांडतो असंच वाटतं. भांडण सोडवताना ती आमच्या अंगावर  खेकसून सुरुवात करते,
"काय चाललंय?" तिने पुन्हा खेकसून विचारलं.
"ती रडतेय." दोघांमधलं कुणीतरी पुटपुटलं.
"ते दिसतंय मला. कुणामुळे रडतेय असं विचारतेय मी." कुणीच काही बोललं नाही. मला मजा बघायची होती पण माझ्या रडण्यामुळे टोणग्यांना बोलणी खावी लागणार असतील तर जाणं भाग होतं. मी रडत-रडत माझ्या खोलीत जाऊन बसले. मग वाटायला लागलं, माझी आई वागते का टोणग्यांशी चांगलं? त्यांना काय वाटत असेल? त्यांना जावंसं वाटत असेल का त्यांच्या आईकडे कायमचं? डोकं भणभणायला लागलं. या घरातून पळून जावं असंही मनात यायला लागलं. पण कुठे जाऊ? कसं जायचं? नुसतंच पळायचं की गरजेपुरतं सामान घ्यायचं बरोबर? रस्त्यावर राहिले तर सुरुवातीला लागेल इतकं? कोण देईल अधिक माहिती? एकही पळून गेलेली मैत्रीण किंवा मित्र आठवेना. काय करू खरंच? शेवटी एका मैत्रिणीलाच सांगितलं. तिला सांगायला थोडीशी भिती वाटत होती. तिने तिच्या आईला सांगितलं तर माझ्या आईला सांगणारच ना ती. पितळ उघडं पडेल लगेच. मैत्रीण म्हणाली,
"तू तुझ्या बाबांशीच बोल ना नाहीतर आधी आईशी बोल."
"नाही बोलायचं मला त्या दोघांशी या विषयावर." मैत्रीण माझ्यासारखीच आहे ती तटकन म्हणाली,
"मग जा पळून."
"कुठे जाऊ त्याचं उत्तर दे. तू येतेस माझ्याबरोबर? मजा येईल. नाहीतर पळायला मदत तरी कर."
"मूर्ख आहेस. तुझ्या भावाचं बरोबर आहे. काहीतरी डोक्यात भरवून घेतेस. ते काढ. वेगळा चष्मा घाल डोळ्यावर."
"आणि काय करू?"
"अगं जसा आपला दृष्टिकोन तसं समोरचं दिसतं असं तुझ्याच आईकडून ऐकलंय मी खूपदा."
"ते काय लक्षात ठेवतेस तू? पोनीटेलकडे काम करता करता ती पोनीटेलचे सल्ले आणि विचार स्वत:च्या नावावर खपवते." तिला उडवून लावलं मी पण नंतर खरंच मी बदलायला हवं का असं वाटायला लागलं. पण म्हणजे मी नक्की करायचं काय? बदल मला झेपेल? मुळात बाबा सांगतो ते मी करते, त्याच्याशी उगाच वाद घालत नाही; हे मी का सांगतेय कारण आईला वाटतं मी वाद घालण्यात फार पटाईत आहे. सत्य असं आहे की मी वाद घालायला सुरुवात करते ते त्यांच्यामुळेच. कोणत्याही विषयावरची या दोघांची मतं ऐकली की धक्काच बसतो मला. या मोठ्या लोकांची विचित्र मतं फारच विचित्र आहेत. मागासलेले नुसते. असा कसा विचार करतात? अविश्वसनीय. त्यांची मतं, म्हणणं सगळंच चुकीचं असल्यामुळे खोडून काढणं भाग असतं.  मी मतं खोडून काढायला सुरुवात केली की आई थांबवते. तेवढं सोडलं तर मी नीट वागते, शाळेत काय झालं ते सांगते, त्याच्या कामातही मदत करते लहर आली की. तोही ऐकतो सगळं, करतोही सारं माझ्यासाठी पण ’आय लव्ह यू’ म्हटलं की जबरदस्ती ’आय लव्ह यू टू’ म्हणतो. कधीकधी तर उत्तर न देताच निघून जातो. हे फक्त माझ्याशी. आईशी आणि टोणग्यांशी त्याचं वागणं नेहमीसारखंच आहे. एकदा न राहवून मी विचारलंच त्याला,
"बाबा, मी आवडत नाही का तुला?"
"आवडतेस." फोनमधली मान वरदेखील काढली नाही त्याने. ’आम्ही हेच केलेलं चालत नाही तुम्हाला’ असं पुटपुटत मी टक लावून त्याच्याकडे बघत राहिले. त्याची मान वर झाली नाही.
"आम्हाला व्याख्यान ऐकवता फोनमध्ये डोकं खुपसलं की." मी जोरात म्हटलं. तो वैतागला.
"बोल." कपाळावर आठ्या घालत त्याने माझ्याकडे पाहिलं.
’स्वत:च्या टोणग्यांकडे बघतोस का असा कधी? सारखं ’आय लव्ह यू चालू असतं.’ मी मनातल्या मनात धुमसत होते. प्रत्यक्षात गप्प राहिले. निघूनच गेले तिथून. जाताना तो किती वाईट आहे याची उजळणी केली मनात. मला माझा बाबा माझ्यावर प्रेम करत नाही हे लक्षात आल्यापासून त्याच्या सगळ्या वाईट सवयी अगदी प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. उठसूठ ढेकर देत असतो, एकदा शिंकायला लागला की झालं; थांबतच नाही. लहान असताना आम्ही सगळे मोजायचो शिंका. आता दिलं सोडून. कळकट बनियन आणि चिटुकली चड्डी आणि पादणं...शी, शी, शी काय सांगतेय मी हे. माझ्या वयाला शोभत नाही पण इतकी चिडलेय मी की हे सगळं जगाला ओरडून सांगायची माझी तयारी आहे. मला माझा बाबा ’कूल’ पाहिजे पण त्याला काय फरक पडतोय. मुळात तो मला त्याची मुलगी समजतच नाही त्यामुळे कशाला माझ्यासाठी तो त्याच्या सवयी बदलेल? आता काहीतरी करायला हवं. आहे हे स्वीकायरायचं इतकंच उरलंय की काय माझ्या हातात? का सापडेल मला मार्ग?

"मला माझ्या बाबाकडे जायचं आहे कायमचं राहायला." मी आईसमोर जाऊन उभीच राहिले. मला वाटलं आता स्फोट होईल. तसं झालं नाही. चला, म्हणजे आईसुद्धा बाबाला सामील. ही ब्याद कधी टळते असं हिलाही वाटतंय की काय? माझे डोळे भरून आले. आई शांतपणे म्हणाली,
"तू तुझ्या बाबाकडेच आहेस. खूळ काढून टाक हे डोक्यातून."
"खूळ? मला हे सांगतेस तसं बाबाशी बोललीस का?"
"बोलले."
"मग?"
"मग काय? त्याला नाही वाटत तसं."
"त्याने ते मला सांगायचं ना? दुसरं म्हणजे तोंडाने बोलून काय उपयोग, वागण्यात दिसायला हवं."
"तू विचार हे त्याला. नाहीतर असं करू आपण सगळे बसू आणि बोलू. हल्लीच घेतलं आहेस तू हे काहीतरी तुझ्या मनात."
"आधी कळलं नव्हतं. उशिरा आलं लक्षात."
"असं कसं अचानक बदलेल? तुझा दृष्टीकोन बदललाय. बाबाच्या प्रत्येक कृतीत तू अर्थ शोधायला सुरुवात केली आहेस हल्ली."
"टोणग्यांवर तू तरी करतेस का प्रेम? ती तुझी थोडीच आहेत." मी अगदी तिच्या मर्मावर बोट ठेवलं. माझंच चुकलं म्हणत राहते. आता कर विचार माझ्या प्रश्नावर.
"बास हं. अती झालं हे." त्या दोघांना टोणगे म्हणण्याचा अधिकार तिचाच असल्यासारखं आई चिडली आणि नेहमी बोलते तसं तेच तेच परत बोलत राहिली. आईला उसकवलं म्हणून मला बरंच वाटलं. घरातल्या सर्वांना असाच त्रास द्यायचं मी ठरवलंय. तिची ’टेप’ थांबल्यावर मी म्हटलं,
"टोणग्यांवर तू प्रेम करतेस का हा प्रश्न चिडण्यासारखा नाही तर स्वत:च्या मनात डोकावून पाहायला हवं असं वाटण्यासारखा आहे. माझ्या मनात हे खूळ आलंय तसं त्यांच्या मनातही येऊ शकतं ना?"
"येऊ शकतं पण मला नाही वाटत ती दोघं तुझ्याइतकी चक्रम आहेत." आईने संभाषण थांबवलंच.
आमच्या घरातलं वातावरण माझ्या या खुळामुळे बदललं असं प्रत्येकालाच वाटतंय. आई तर हवालदिल झाली. इतकी वर्ष त्या दोघांनी एकमेकांची मुलं आपली मानली, भेदभाव केला नाही आणि आता हे काय भलतंच? असं तिला वाटत होतं. बाबा तर घरातच टिकेनासा झाला. माझ्याशी बोलायचीही त्याची तयारी नव्हती. मी प्रयत्न केला तेव्हादेखील तेच उत्तर.
"तुझ्या मनातल्या खेळांना मी काही करू शकत नाही. चार वर्षांची होतीस तू या घरात आलीस तेव्हा. त्या क्षणापासून मी तुला माझीच मुलगी समजतो. आता ते सारखं कसं दाखवून द्यायचं मला ठाऊक नाही आणि इच्छाही नाही." तो हुप्प होऊन माझ्याकडे बघत राहिला. मला वाटलं त्याचे गाल ओढावे आणि कुशीत शिरावं पण माझ्या भावनांना खूळ म्हणणार्‍या लोकांचा मला आता प्रचंड राग यायला लागलाय. बाबाच काय, कुणीच माझ्यावर प्रेम करत नाही असं  वाटतंय. मला आता या विषयावर कुणाशीही बोलायचंच नाही. तशी आता किती वर्ष राहिली आहेत या घरातून बाहेर पडायची. शिक्षण संपलं की यांचा संबंध संपला. माझी मी कमावेन आणि खाईन पण या माणसांचं तोंड पुन्हा बघायचं नाही. मनातल्या मनात मी दृढनिश्चय केला तेवढ्यात आई आली. नको तेव्हा ती टपकतेच नेहमी.
"चल. लगेच निघायचं आहे."
"कुठे?"
"तू चल तर खरी." आईने जवळजवळ मला फरफटतच घराबाहेर काढलं. काय करणार आहे ही माझं? एकदा एखाद्याचं प्रेम उडालं की माणूस कुठल्याही थराला जातो...!


"तुझी आई मला तुझ्याबद्दल रोज सांगते." आईने मला पोनीटेलसमोर आदळलं. मी रागाचा कटाक्ष आईकडे टाकून निर्विकारपणे पोनीटेलकडे पाहत राहिले.
"ऐकलंस का?" त्याने मृदू स्वरात विचारलं.
"ऐकलं. तुमच्याबद्दलपण ती आम्हाला रोज सांगते." कुसकटपणे मी म्हटलं.
"अरे वा. चांगलंच बोलते ना?" मी उगाचच द्विअर्थी मान हलवली, त्याला त्याचा काहीच फरक पडला नाही.
"पिंपाचा विनोद सांगते. पाठ झालाय आमचा." मी तसं रागानेच म्हटलं हे पण ते दोघं आयुष्यात पिंपाचा विनोद पहिल्यांदा ऐकल्यासारखे हसले. मी ढिम्म. अखेर पोनीटेल म्हणाला,
"हे बघ. मला सगळं ठाऊक आहे त्यामुळे आधी उपाय काय ते सांगतो मग तू तुझं म्हणणं सांग. उलट्या पायर्‍या चढू." मी काहीच बोलले नाही तसं त्याने उलट्या पायर्‍या चढायला सुरुवात केली.
"तू आता किती वर्षांची झालीस?"
"चौदा." गुरकावल्यासारखं मी उत्तर दिलं.
"तुझी पाळी कधी सुरू झाली?" मी आईकडे डोळे मोठे करून पाहिलं. माझ्या पाळीशी माझ्या समस्येचा काय संबंध? आई शांत होती म्हणून नाईलाजाने उत्तर दिलं.
"गेल्यावर्षीपासून."
"म्हणजेच तुझ्या शरीरात बदल होत चालले आहेत. यौवनावस्था म्हणतात याला."
"शिकलेय शाळेत." हेच ऐकायला आले की काय इथे? म्हणजे माझ्या वागण्याला मीच जबाबदार. चिडणं, आक्रस्ताळेपणा, निराशा असं काय काय होतं म्हणे या वयात त्यामुळे या बदलाशी जुळवून घेताना काही प्रश्न निर्माण होऊ शकतात असं शाळेत शिकलेलं भलंथोरलं वाक्य पाठ झालंय. हे इतकं सगळं सांगण्याऐवजी दोन शब्दांत मी उत्तर दिलं.
"तू शिकली आहेस पण तुझा बाबा नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय त्याला तू जबाबदार नाहीस. तुझ्या आईला वाटतंय तसं हे खूळ नाही." पोनीटेल काय म्हणतोय ते कळलंच नाही मला क्षणभर. प्रकाश पडला तसं मला खुर्चीतल्या खुर्चीत टुणकन उडी मारावीशी वाटली. उडी मारली नाही पण माझा चेहरा खुलला.
"बाबाचं प्रेम नाही हे बरोबर आहे ना?"
"नाही. ते साफ चुकीचं आहे पण तुझे बाबा तुझ्याशी जे वागतायत ना त्याचं कारण तुझं वय आहे."
"अं?" पोनीटेल सल्लागार आहे हे ठीक पण इतकं गहन कशाला बोलायचं? माझ्या चेहर्‍यावरचे भाव वाचत तो म्हणाला,
"तुझ्या बाबाला तुझ्या शरीरातल्या होणार्‍या बदलामुळे थोडंसं अवघडलेपण आलंय. त्याचं तुझं रक्ताचं नातं नाही हेही कारण असेल पण तेच एक कारण असेल असं म्हणता येणार नाही. सख्ख्या नात्यातही हे होतं. नकळत होतं. मला खात्री आहे तुझ्या बाबाला स्वत:लाही हे कळलेलं नसेल."
"खरंच? म्हणून तो चार हात दूर राहत असेल माझ्यापासून? तुम्ही त्याला सांगाल समजावून?" मला आत्ता याक्षणी बाबाला इथे आणावं असं वाटत होतं.
"ते येणार नाहीत कारण ते तुझ्यावर प्रेम करतात यावर ते ठाम आहेत. ही समस्या नसून हे तुझ्या डोक्याने घेतलेलं खूळ आहेत हेच त्यांच्या मनाने घेतलंय."
"मी जाते लगेच घरी. तुम्ही जे सांगितलंत ते सांगेत." मी उतावीळ झाले.
"नको. लगेच नको. आधी मी सांगतो ते अमलात आणू. नंतर हा बदल तुझे बाबा कसा स्वीकारतात ते पाहा. एकदा का तुझं मन शांत झालं की जे आपण बोललो ते सांग तुझ्या बाबांना. चालेल?" पहिल्यांदाच मला पोनीटेलने स्वत:च्या तोंडून पिंपाचा विनोद पुन्हा सांगितला तरी चालेल असं वाटलं. मी आनंदाने पोनीटेल सांगेल ते करायचं ठरवलं. येताजाता बाबाला, ’आय लव्ह यू’ स्वत:हून पुढाकार घेऊन  म्हणायचं अगदी लगेच ठरवलं. माझी तक्रार तीच होती ना की तो कधीही स्वत:हून हे म्हणत नाही. यापुढे मी ’आय लव्ह यू’ म्हणून थांबणार नाही, त्यालाही उलट म्हणायला लावेन. पोनीटेल म्हणाला, ’पुरुषांना भावना  व्यक्त करणं जमत नाही. ते तुमच्यासाठी सतत काही ना काही करत राहतात. तेच त्याचं प्रेम असतं. ते एकदा ओळखता आलं की झालं.’  मला ते पटलं. आतापर्यंत त्याने माझे सगळे लाड पुरवले. मला शाळेत तोच सोडतो, अभ्यास घेतो, माझं जगाबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून माहिती देतो, पुस्तकं भेट देतो...अशा अनेक गोष्टी करतो. आता फक्त त्याला प्रेम बोलून दाखवायला शिकवायचं होतं. आता तुम्ही म्हणाल, तुझ्या बाबांचं प्रेम आहे हे कळलं हे खूप नाही का? खरं आहे पण मला आवडतं प्रेम व्यक्त केलेलं, शब्दांनी व्यक्त केलेलं प्रेम! मुलीचा इतका हट्ट बाबाने पुरवला तर बिघडतं कुठे? मी मोठी होतेय, माझ्या शरीरात बदल होतायत यामुळे त्याच्या नकळत तो माझ्यापासून दूर जात असेल तर पोनीटेलने सांगितलेलं काम अगदी सोपं होतं.  माझ्या मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला. कधी नव्हे ती आई मला आवडली आणि पोनीटेलही. पोनीटेलचा निरोप घेऊन मी आईसह घरी निघाले. घरी गेले की मी बाबाला घट्ट मिठी मारणार आहे. हो, हो. पोनीटेलने हळूहळू पावलं टाकायला सांगितली आहेत ते आहे लक्षात. बाबा नक्कीच अवघडून जाईल माझ्या मिठीमुळे पण मला आता कारण कळलंय ना त्यामुळे मला राग न येता हसायलाच येईल. तो चिडेल पण होईल सवय  आणि जाईल त्याचं अवघडलेपण.  माझ्या नजरेसमोर दिसतंय मला  दृष्य. आता मी अगदी उतावीळ आहे झाले आहे. एका नविन बदलासाठी माझ्या बाबाला तयार करायला. नव्याने आमचं नातं रुजवायला!

माझा मराठीचा बोल (मामबो) दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रसिद्ध.