Wednesday, August 15, 2012

भरारी

मीनाताईंनी जेवणाचा डबा उघडला. मख्खपणे त्यांच्या हालचाली बघत बसलेल्या अनिताकडे त्यांनी एक नजर टाकली. काही क्षण त्या नुसत्याच बारा वर्षाच्या अनिताकडे पहात राहिल्या. केस कसेतरी जेमतेम बांधलेले, तिचे तिनेच विंचरलेले असावेत. कपाळावरची छोटी टिकली. काळासावळा रंग आणि निस्तेज डोळे.स्वतःतच हरवलेल्या हालचाली. ती स्वतःहून काही करणार नाही हे लक्षात आलं तसं मीनाताईंनी पोळीचे तुकडे, थोडीशी भाजी जे काही डब्यात होतं ते काढून समोर ठेवलं.
"अनिता जेवणाची वेळ झाली आहे. बघ तुझ्या डब्यात काय काय आहे, खाणार ना?"
निर्विकार चेहर्‍याने अनिताने पोळीचा तुकडा तोडांत टाकला. तिला पोळीबरोबर भाजी खायला बजावून मीनाताई दुसर्‍या मुलाकडे गेल्या. पुन्हा सगळं त्याच क्रमात झालं आणि त्या आपला डबा आणण्यासाठी वळल्या. धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांच्या काळजात धडधडलं. गर्रकन मीनाताईंनी मागे वळून पाहिलं. त्यांनी पाठ फिरवल्या फिरवल्या अनिताने डबा बाकड्यावरुन जोरात ढकलला होता. डब्यातलं अन्न खाली सांडलं. आधीच जेमतेम बांधलेले केस अस्ताव्यस्त झाले होते. पिंजारलेले केस ओढत अनिता तारस्वरात किंचाळत होती. चेहर्‍यावर अतीव आश्चर्य, दु:ख आणि वेदना. धावत मागे होवून मीनाताईंनी अनिताला घट्ट मिठीत धरलं. तिचं डोकं छातीत रुतवलं आणि त्या अनिताला बराचवेळ थोपटत राहिल्या, केसावरुन हात फिरवत राहिल्या. आपल्या स्पर्शाने, मायेने तिची वेदना नाहीशी व्हावी असं त्यांना मनापासून वाटत होतं. हळूहळू सगळं शांत झालं. मीनाताईंनी आजूबाजूला पाहिलं. त्या छोट्याशा खोलीतले दहा, बारा डोळे अनिताकडे रोखून पहात होते.  काय झालं हे आकलन होण्याइतकी जाण नव्हती कुणालाच. त्यामुळे कुणीही अनिताच्या रडण्या, ओरडण्याने घाबरलं नव्हतं की वैतागलं नव्हतं. शारिरीकदृष्टया निरोगी, अव्यंग, पण मनाने कमकुवत, सार्‍या भावनांच्या पलिकडे गेलेली ही मुलं. मीनाताईंच्या हातापायातलं त्राण गेल्यासारखं झालं. या मुलांच्या जगात आपणच वेगळे असल्याच्या भावनेने त्यांच्या हातापायांना सुक्ष्म थरथर सुटली.  एकटेपणाचा विळखा मनातून देहापर्यंत पोचला. थोडावेळ त्या तशाच बसून राहिल्या. मुलंही सारं काही समजल्यासारखी पुस्तकात डोकं खुपसून बसली. सुमाला दारात उभं राहिलेलं पाहिलं आणि त्यांना एकदम आधार वाटला. त्यांच्या चेहर्‍याकडे पहात सुमाने विचारलं.
"पुन्हा तेच?"
"तुला कसं कळलं?"
"तुमचा चेहरा सांगतोय ना."
"हं"
"तुम्ही घरी जा बाई, काही वाटलं तर मी हाक मारेन तुम्हाला."
"नको बसते थोडावेळ. या मुलांसाठी काय केलं की आत्मविश्वास वाढेल त्यांचा तेच कळत नाही. शारिरिकदूष्ट्या सक्षम आहेत हे समाधान मानायलाच हवं. पण त्यांच्या हृदयातल्या वेदनेवर फुंकर घालून आत्मविश्वास कसा जागृत करायचा? जे झालं ते मागे टाकून पुढे व्हायला कसं शिकवायचं तेच कळत नाही. कुठल्यातरी एका घटनेने स्वत्व गमावलेली ही मुलं,"
"आणि पोरकीदेखील" सुमाने असं म्हटल्यावर त्यांनी आश्चर्यानेच तिच्याकडे पाहिलं.
"पोरकी कशानं गं? आई वडिल आहेत, आपणही आहोत की." त्यांना थोडासा रागच आला सुमाचा.
"हो, पण तरी पोरकीच. आई, बाप असूनही पोरकी हे कटु सत्य आहे त्यातलं."
"असं कसं बोलवतं ग तुला?"
"मी फक्त सत्य परिस्थिती सांगतेय बाई. तुम्हाला वाटतं की हे सगळं आपण बदलू शकतो. इतकं सोपं नसतं ते."
"मला माहित का नाही ते. पण सोपं नसलं तरी बदलू शकतो. आणि आपण एकटे थोडेच आहोत. समाजसेवक,  डॉक्टर, सेवाभावी संस्था कितीतरी लोकांच्या मदतीचे हात आहेत. काहीतरी असं सुचायला मात्र पाहिजे की त्यांच्या आत्मविश्वासाची पातळी एकदम उंचावेल. तसं झालं ना की सापडेल त्यांचा त्यांना मार्ग."
सुमाने नुसतीच मान डोलावली. बाईंर्पुढे बोलण्यात काही अर्थ नव्हता. ज्या तळमळीने त्याचं काम चालू असतं, त्या अशा मुलांमध्ये गुंतून जातात त्याला कुठेतरी मर्यादा असायला हवी असं सुमाला  वाटायचं. वेळ आली तर स्वतःचा जीव देतील. फार त्रास करुन घेतात, शरीराला, मनाला. पण सांगणार कोण? स्वतःशीच पुटपुटत सुमा मुलांकडे वळली.

मीनाताई मुलांचे कागद काढून वाचत राहिल्या. प्रत्येक मुलाची म्हटलं तर परिस्थिती वेगळी आणि म्हटलं तर सारखीच.  अंतिम परिणाम एकच. त्यातूनच आपली वाट शोधायची प्रत्येकाची धडपड, कुणीतरी दाखवलेल्या मार्गाने चालायची कसरत. हातात आलेला कागद त्या पुन्हा पुन्हा पहात राहिल्या. झोपडीच्या बाहेर झोपलेल्या सुरेशचं चित्र होतं ते. त्यानेच काढलेलं. त्यांचा जीव गलबलला. त्या छोट्याशा खोलीत सहा सात भावडांसाठी जागा पुरणं अशक्यच. नेहमी कुणी ना कुणी बाहेर झोपणं प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेलं. दोन्ही पाय गुडघ्याशी घेवून झोपलेला सुरेश. दहा वर्षाचा. आईला मदत म्हणून दुकानात पोछा मारायचं काम करायचा. अनुभवाने बेरड झालेला सुरेश शाळेत तसा व्यवस्थित वागायचा. चित्र तर फार सुंदर काढत होता. पण कधी काही बिनसलं की वागण्यात विचित्रपणा यायचा. आणि ते बिनसायला फार वेळही लागायचा नाही. शिव्यांची लाखोलीच वहायला सुरुवात करायचा तो. सुरुवातीला असं झालं की मीनाताई आणि सुमाला संकोच वाटायचा. बाकिच्या मुलांवर विपरीत परिणाम होईल याची भिती वाटायची. सुमा लागलीच त्याला शाळेच्या आवारात फिरायला न्यायची, त्याच्याशी गप्पा मारायची. तेव्हाच कधीतरी सुमाला त्याच्या वागण्याचं कारण कळलं. आधी वाटलं होतं तो हे असं वागणं, शिव्या घालणं घरातच शिकत असेल. तो अंदाज चुकला होता. दुकानातला त्याचा मालक तो पोछा करायला लागला की उगाचच काहीतरी खुसपट काढून त्याला बडबडायचा, सुरेश काही बोलला की शिव्यांचा भडिमार. हळूहळू मालकाने मारहाण चालू केली. एकदोनदा सुरेशने ते काम सोडूनही दिलं, पण दुसरीकडे लगेच काम मिळालं नाही की पुन्हा नाक घासत तो तिथे जाई. बाकीच्या मुलांची या ना त्या तर्‍हेने अशीच परिस्थिती. मीनाताईंचं मन अनिता या शाळेत आली त्या दिवसाकडे वळलं ...

त्या दिवशी संध्याकाळी त्या घरी आल्या तेव्हा मुलं, नवरा वाटच पहात होते.
"कुठून शाळा सुरु केली आहे असं झालय." नवर्‍याने पुढे केलेल्या चहाचा घोट त्या म्हणाल्या. कुणीच काही बोललं नाही तसं त्याच पुढे म्हणाल्या.
"हे असं मी म्हणते,  ते काही ना काही घडतं तेव्हाच.  आपल्या हातात काही नाही ही भावना काळीज कुरतडून टाकते तेव्हा शेवटी असं वाटायला लागतं.   ही मुलं अशा प्रसंगातून जातात तेव्हा तर आपण नसतोच तिथे, पण आता तरी परिस्थिती बदलता येईल का, मुलांना हसा खेळायला शिकवू का आपण. एक ना अनेक शंका येत राहातात."
"आज काय झालं?" नवर्‍याने नेहमीच्या शांतपणे विचारलं.
"आज दाखल झालेली अनिता, तिचे वडीलच तिच्यावर.... " त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा भडकलाच.
"बलात्कार म्हणायचं आहे आई तुला?"
"हं" त्यांच्या स्वरातला संकोच त्या हं मधून डोकावत राहिला.
"रस्त्यावर आणून उभं आडवं झोडपून काढायला हवं." त्याचा तो आवेश बघून त्यांना बरं वाटलं. पण नूसतं बोलून काय होणार?
"कशी आहे अनिता? तू बोललीस तिच्याशी?" त्यांच्या सोळा वर्षाच्या मुलीने विचारलं.
"ठीक आहे, एकदम नाही असं बोलता येत. तशी चांगली वागते. पण मध्येच तिला बलात्काराचं आठवतं, मग स्वतःलाच बोचकारत सुटते, मारुन घेते, केस ओढते स्वतःचेच. तिला कसं थांबयाचं तेच कळत नाही."
"आई-वडील कुठे आहेत?"
"नाही माहीत मला. आणि मला वाटतं हा प्रकार खूप दिवस चालला असावा, ती या संस्थेकडे कशी आली ते माहित नाही. पण नेहमीप्रमाणे समाजसेवकांनी आणून सोडलं आपल्या शाळेत. आता अशा मुलांना सांभाळतील त्यांची यादी आहे ना त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तोपर्यंत त्यांच्या संस्थेने व्यवस्था केली आहे तिच्या रहाण्याची."
"तुला आमची मदत लागली तर सांग." दोन्ही मुलांनी मनापासून म्हटलं. त्यांनीही मान डोलावली. पण यातलं काही होणार नव्हतं हे त्या जाणून होत्या. मुलं चांगली होती, त्यांना मनापासून आईच्या व्यापात सहभागी व्हायचं होतं. पण आत्ता कुठे त्यांच्या आयुष्याला सुरुवात होत होती. भविष्याचे वेध, महत्वाकांक्षा यातून वेळ मिळाला तरच ती दोघं या कशाचाच पत्ता नसलेल्या, घर हरवलेल्या मुलांसाठी काहीतरी करणार नं. त्यांना तरी कसा दोष देणार? मदतीचा हात पुढे करतायत हेच खूप.  नवरा मात्र त्यांच्या बरोबरीने धडपडत होता.

मीनाताई समाजसेवेची पदवी घेतल्यानंतर वेगळं काहीतरी करण्याच्या कल्पनेने भारुन गेल्या होत्या. या शाळेची कल्पना त्याचीच. अनाथ, अत्याचार झालेल्या मुलांसाठी शाळा. अशा प्रकारच्या शाळा कार्यरत आहेत की नाही याची त्यांना कल्पना नव्हती आणि असल्या तरी एकदा काम सुरु झालं की तिथेही वेगवेगळे प्रयोग सुचतील, मार्ग सापडतील असं त्यांना वाटत होतं.  सर्वसामान्य जीवन जगण्याची संधी अशा मुलांना मिळावी या इच्छेने त्यांना झपाटलं. समाजसेवी संस्थाना भेटून नवर्‍यानेच या शाळेची माहिती, जाहिरात केली. शाळेची जागा म्हणजे घराच्या मागच्या बाजूला असलेली एक खोली. मुलं वाढली की नंतर त्या जागेबाबतचा निर्णय घेणार होत्या.   व्याप वाढतोय असं वाटेपर्यंत मानसोपचारतज्ञ सुमा मदतीला आली, मीनाताईंबद्दल कुठेल्यातरी संस्थेनेच तिला माहिती दिली. एक दोनदा शाळेत येऊन तिने त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. एक, दोन म्हणता म्हणता सहा, सात मुलं होती आता. सगळी मुलं झोपडपट्टीतली. रोजच्या रोज मार खाणारी, शिवीगाळ करणारी, सेवाभावी संस्था मागे लागल्या की अधूनमधून शाळेत जाणारी. आला दिवस काय वाट्टेल ते करुन ढकलणारी. सतरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरातून त्यांना बाहेर कसं काढणार आणि आई वडिलांना सोडून ती तरी येतील का? जिथे घरातच त्रास होतो त्या मुलांचं काय करायचं? त्यांची कायमची व्यवस्था करता येईल का?  शाळा सुरु झाल्यावर या प्रश्नांच्या अंगाने त्यांनी खूप माहिती जमविली होती. त्यातूनच परदेशातल्या एका संस्थेचं काम त्यांच्या मनात खोलवर रुतलं होतं. सरकारने अशा मुलांचा ताबा घेतला की या संस्थेचं काम सुरु होई. पहिल्या काही दिवसात ते मूल तात्पुरत्या पालकांकडे पाठविलं जाई. नंतर मीनाताईंसारखे समाजसेवक त्या मुलाशी, पालकांशी, मुलाच्या शिक्षकाशी बोलून त्या मुलाने परत त्याच्या पालकाकडे जावं, का त्याचा ताबा इतर कुणाला मिळावा ते ठरवत. मुलाची बाजू कोर्टात मांडत. अशा समाजसेवकांना विशेष समाजसेवक म्हणूनच ओळखतात. मुलाची बाजू मांडणं हेच त्या समाजसेवकाचं काम. त्यासाठी विशेष समाजसेवकाला वकिल, मुख्य समाजसेवक, न्यायाधीश यांच्याबरोबर संवाद साधावा लागे. इतकं सगळं आपल्या देशात करता येईल की नाही याचा त्यांना अंदाज येत नव्हता पण त्यातूनच अशा मुलांना काही दिवसतरी आपलं मानतील असे पालक शोधायची कल्पना मीनाताईंना सुचली. मुलांना वेगळ्या वातावरणाची सवय होईल. त्यामुळे कदाचित मुलं आपलं घर बदलण्याचा प्रयत्न करतील. मानलेले पालक. फार नाही पण थोडीफार लोकं तयारही झाली या निराळ्या प्रयोगासाठी. प्रयोग चालू असतानाच बर्‍याच गोष्टी उमजत जाणार होत्या, तसतसे बदल केले जाणार होते.

अनिता त्यांच्यापुढ्यात काहीतरी घेवून आली तशा मीनाताई तंद्रीतून बाहेर आल्या. आता कशी थोडीशी सावरल्यासारखी वाटत होती, चेहर्‍यावर हलकसं हसू. मीना ताईंना बरं वाटलं. त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटलं. ती परत अभ्यासाला लागली. सुमाने मुलांचा ताबा घेतला होता, त्यामुळे आता काही काम नव्हतं. प्रत्येक दिवस म्हणजे नवीन परीक्षा. या मुलांचं वागणं समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी दरवेळी आज अनिताचं जे झालं तस काही झालं की,  परिस्थितीत बदल झालेला कसा  पहायला मिळेल, काय करावं लागेल तो मार्ग शोधण्याचा वेध लागायचा. थोडा निवांत वेळ मिळाला तसं त्यांनी समोरचं वर्तमानपत्र पुढे ओढलं. वाचता वाचता एका बातमीने त्यांचं लक्ष वेधलं. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी एका शाळेने पारंपारिक खेळाचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा नाही तर फक्त तुमच्या कलागुणांचं कौतुक करण्याचा एक प्रयत्न असंच शीर्षक होतं. आलेल्या अर्जातून ती शाळा ५ शाळा निवडणार होती. हा कार्यक्रम पहायला मान्यवर व्यक्तिंची, प्रयोगशीलतेला महत्त्वं देणार्‍या सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती लाभणार होती. मीनाताईंनी ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली. घ्यावा का यात भाग? शाळा सुटायची वेळ झाली तरी घरी परतताना त्या प्रश्नानेच त्यांचा पुढचा दिवस खिळून ठेवला.

"घ्यायला हवा तुमच्या शाळेने भाग." मीनाताईंच्या मुलाला त्यांची कल्पना एकदम आवडली.
"अरे, पण काय करणार ही मुलं?" शाळेत एकूण मुलं सहा की सात, ती मुलं नक्की काय करु शकतील याचा अंदाज नाही, खात्री तर कशाचीच नाही.
उत्साहाने काही करायला गेलं आणि नेमकं आयत्यावेळी एखाद्याचं काही बिनसलं तर? शाळेत रहावलं नाही म्हणून मुलांना विचारलंच मी. नाच, कथाकथन, गाणं, चित्रकला, कविता एक ना दोन मुलं वेगवेगळे पर्याय सुचवित होती. सुमा विचार करते म्हणाली. पण खरंच जमेल का हे मुलांना?"
"लेझिम किंवा कवायत अशा खेळांचा का नाही विचार करत.  तो सांघिक प्रकार आहे, पुन्हा बोलावं लागणार नाही."  मीनाताईंना हा पर्याय एकदम आवडला. त्यांनी वर्तमानपत्रातून आलेला अर्ज बाहेर काढला.
"संघाचं नाव घालावं लागेल."
"भरारी" मुलगी पटकन म्हणाली. घरातल्या प्रत्येकालाच ते नाव आवडलं.
"गणवेष?" कुणीच काही बोललं नाही.
"झोपडपट्टीतल्या मुलांकडे कुठला आलाय गणवेष." मीनाताईंच्या आवाजातलं दुःख लपलं नाही.
"मुलींसाठी निळ्या रंगाचा फ्रॉक आणि मुलांसाठी पांढरा शर्ट, खाकी पॅट असं लिही." मुलाने उत्साहाने सुचवलं, त्याच्या बाबा आणि बहिणीनेही मान डोलावली.
"काहीतरीच काय? उगाच कशाला खोटं बोलायचं. आणि तेही मुलांच्या शिक्षकांनीच." मीनाताईंना ही कल्पनाच पसंत नव्हती.
"हे बघ, मुलं झोपडपट्टीतली आहेत हे लिहायची आवश्यकता नाही. खास मुलं एवढाच उल्लेख कर. सहानुभूती मिळून तिथे प्रवेश नको घ्यायला. आणि हे टाळायचं तर गणवेष लिहावाच लागेल. आपली प्रवेशपत्रिका स्विकारली जाईलच असंही नाही. स्विकारली गेली तर बघू गणवेषाचं."
काही न बोलता मीनाताईंनी ती तिघं सुचवतील तसा अर्ज भरुन टाकला. सुमाला दाखवून त्यांनी तो अर्ज पाठवायचा निश्चित केलं. त्या रात्री त्यांच्या घरातली, सुमा, शाळेतली मुलं आणि त्या..., एक भलं मोठं कुटुंब एखाद्या कार्याला सज्ज होतय असच वाटत राहिलं त्यांना.  पुढच्या चार पाच महिन्यात करावे लागणारे अथक परिश्रम, मुलाचं मनोधैर्य वाढविण्यासाठी करावी लागेल ती खटपट, लेझिम, कवायतीसाठी लागणारं साहित्य मिळवण्यासाठी घालाव्या लागतील त्या खेपा....बर्‍याच गोष्टीचं समीकरण जुळवावं लागणार होतं. पण मीनाताईंना खात्री  होती. आता मागे फिरायचं नाही हे त्यांनी मनात पक्क केलं.

घरातली सगळी, सुमा आणि मीनाताई भरुन आलेल्या डोळ्यांनी समोर चालू असलेला आपल्या मुलांचा कार्यक्रम पहात होत्या. लेझिम वाजवणार्‍या सुरेश, महेश, अमर बरोबर अनिता, सुरेखा आणि कमल कवायती करत होत्या. मुलांच्या प्रत्येक हालचालींबरोबर त्यांना शाबासकी द्यावी असं वाटत होतं मीनाताईंना. त्यांच्या खुललेल्या चेहर्‍याकडे पहाताना सार्‍या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. अर्ज स्विकारला गेल्यावर मुलांनी धावपळ करुन गणवेष मार्गी लावले. लेझिमही त्यांच्या मुलांनीच कुठूनतरी जमवले होते. टाळ्यांच्या कडकटाने त्या भानावर आल्या. एव्हांना मुलं धावत खाली आली होती.  मुलांच्या लेखी सुमा आणि मीनाताई हेच त्यांचं कुटुंब.  सुमाला आणि त्यांना, दोघांनाही मुलांनी मिठीच मारली. महेश आणि अमरचे आई-वडील आले होते. ते कौतुकाने मुलांच्या बाईंकडे पहात होते. बाकिच्या मुलांचं  कुणीही  नव्हतं. सुमाच  एकेकाला घरी नेऊन सोडणार होती. सुमा मीनाताईंकडे बघत होती.
"छान होती कल्पना यात भाग घेण्याची. तुमच्या मुलाचंही कौतुक करायला हवं" त्या हसल्या.
"हो, त्या दोघांनी मला मदत करायची म्हणून तयारी दाखविली. पण नंतर माझ्याबरोबर घरातले सगळेच गुंतले. तू तर हक्काचीच. मस्त झाला कार्यक्रम. आपले श्रम सार्थकी लागले. मुख्य म्हणजे मुलांनी छान साथ दिली. बघ, गेल्या दोन महिन्यात अनिताला एकदाही झटका आला नाही की सुरेशची शिवीगाळ ऐकू आली नाही."
"याचाच अर्थ अशाप्रकारच्या कार्यक्रमात त्यांना गुंतवायला हवं. आज तर निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली आहे. असंच पुढे झालं तर कदाचित सामान्य जीवन जगतीलही ही मुलं. नाही का?" मीनाताईंनी सुमाकडे नुसतच हसून पाहिलं. पुढचा विचार आत्तातरी करावासा वाटत नव्हता. हा क्षण त्यांना मनापासून मुठीत धरुन ठेवायचा होता. घरातल्यांनी जीव ओतून त्यांना केलेल्या मदतीचा अभिमान वाटत होता. इथून त्यांच्या घरीच सर्वांनी जायचं ठरलं होतं.

घरी आल्यावर शाळेतल्या मुलांनी ताबा घेतला. मीनाताईंना मदत करायची स्पर्धाच. त्याही कौतुकाने छोटी छोटी कामं सांगत होत्या. खाता खाता मीनाताईंच्या मुलांनी कार्यक्रमाचं केलेलं चित्रिकरण सर्वांनी एकत्रच पाहिलं. फोटो पाहिले. मीनाताई मात्र मुलांच्या चेहर्‍याकडे पहात राहिल्या. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची किल्ली त्यांच्या हाती लागली होती. अपेक्षेप्रमाणे फरक होत गेला, मुलांचा आत्मविश्वास वाढला की खास मुलांच्या शाळेतलं त्याचं शिक्षण संपलं. ही मुलं नेहमीच्या शाळेत जायला लागतील. कदाचित अधूनमधून भेटायला येतील, नाहीतर कधीच फिरकणारही नाहीत. नकोशा भूतकाळाला मनातून पूसूनच टाकतील. नाहीतर खूप वर्षांनी एखाद्या मुलाचं, त्यांची आठवण काढणारं, धन्यवाद देणारं पत्र.... ही त्यांची पहिली मुलं. त्यांना निरोप देणं सोपं नाही जाणार, या मुलांच्या सर्वसामान्य आयुष्याचेही आपण साक्षीदार असायला हवं असं त्यांना तीव्रपणे वाटत होतं. पण ते शक्यं नाही याचीही त्यांना जाणीव होती. मुलं मोठी झाल्यावर सार्‍यांच्या हृदयातलं आपलं स्थान अढळ आहे याची मात्र त्यांना खात्री होती. त्यानी प्रयत्नपूर्वक आपलं लक्ष समोर चालू असलेल्या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाकडे वळवलं. स्वतःच्या फोटोकडे टक लावून बघणार्‍या अनिताला मायेने जवळ ओढलं. बरोबरच्या प्रश्नाला निकराने त्यांनी बाजूला ढकललं,  पण मनाआड केला तरी त्यांच्या खास मुलांसारखा तोही गळ्यात पडलाच. काय दडलं असेल भविष्यकाळाच्या पोटात...?

Sunday, May 20, 2012

कालचक्र

(अमेरिकेतील आमिश समाजातील चालीरितीवर आधारित कथा)

मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात एमाने खिडकीवरचा गडद रंगाचा हिरवा पडदा थोडासा सरकवला आणि ती शहारली. रस्त्यापलीकडे घरासमोरच्या पडवीत जेकब वाचत असल्याचा बहाणा करत खिडकीच्या दिशेने रोखून पाहत होता. एमाने घाईघाईत पडदा सरकवला. लाजेने लाल झालेले गाल तिने खसाखसा पुसले. धाडधाड जिना उतरत ती स्वयंपाकघरात डोकावली. तमाम भावंडं टेबलाभोवती बसून तिची वाट पाहतं होती. बाजूच्याच पलंगावर निजलेल्या आजारी आजीला थोपटत ती त्यात सामील झाली. डॅनिअल पटकन तिच्या कानाशी कुजबुजली,
"जेकब?"
मान खाली घालत एमाने तिला पायाने टोकरलं आणि ती घास घेण्यात गर्क झाली. कशात लक्ष लागत नव्हतं पण तरीही ती गप्पा मारत राहिली.

निजानीज झाली आणि माडीवरच्या आठ भावंडांमध्ये झोपलेल्या एमा आणि डॅनिअलची कुजबूज सुरू झाली.
"एमा, मी लहान आहे तुझ्यापेक्षा, पण रोज सांगते तेच पुन्हा सांगते. आपल्या समाजाचे नियम पाळायलाच हवेत आपण. बाहेरच्या जगाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही तसंच तिथल्या माणसांशीही. जेकबशी लग्न होईल या वेड्या आशेवर असशील तर सावर स्वतःला. अजून हे तुझ्या माझ्यातच आहे तोपर्यंत ठीक आहे. नुसता संशय जरी आला कुणाला तर वाळीत टाकतील तुला."
डॅनिअलने एका दमात बोलणं संपवलं आणि मिचमिच्या नजरेने ती एमाकडे पाहत राहिली. दोघींचा डोळा लागला तेव्हा पहाटेचे दोन वाजले होते.

चार वाजले तसं घर जागं झालं. घरात तेलाचे दिवे लागले. जिना उतरताना एमाने पुन्हा खिडकीतून बाहेर नजर टाकली. जेकबचं घर अंधारात बुडून गेलं होतं. तिला मनापासून हसायला आलं. चार म्हणजे या लोकांची मध्यरात्र. संध्याकाळी ते विसावतात तर आमची निजानीज. अंधार प्रकाशाचा खेळ सतत  चालूच रहातो तो हा असा. स्वत:शीच पुटपुटत ती खाली उतरली.

आता एकदा काम सुरु झालं की डोकं वर काढायलाही फुरसत मिळणार नाही हे माहीत होतं एमाला. भरभर आंघोळ उरकत तिने स्कर्ट, ब्लाऊज घातला. डोक्यावर टोपी चढवता चढवता स्वयंपाकघरातल्या एकमेव आरशात तिने चेहरा न्याहाळला आणि तिला अस्वस्थतेने घेरलं. कायम हेच. लांब बाह्यांचा ब्लाऊज, स्कर्ट, पांढरी टोपी, कपड्यांचे रंगही इनमिन तीन ते चार, तेही एकरंगी. कुठे फुलं नाहीत की ना कसलं नक्षीदार काम. सपक जीवन नुसतं. म्हणे बायबलमध्ये हेच सांगितलं आहे. चेहर्‍यावरच्या बदलणार्‍या भावांकडे पाहताना मागे कुणीतरी उभी असल्याची जाणीव झाली एमाला. प्रयत्नपूर्वक चेहरा कोरा करत तिने मान वळवली. आईकडे पाहून ती मोहक हसली आणि तिच्या कामात मदत करायला पुढे झाली. घरातली कामं आटपून शेतावर जेवण घेऊन जायचं होतं. वडिला आणि भावडांना तिथे मदत करुन मग एकत्रच घरी परतायचं.
संध्याकाळी सगळी घरी परतली. कणसाची टोपली एमाकडे देत तिची ममा स्वयंपाकाच्या तयारीला लागली. दोघं मोठे भाऊ वडिलांबरोबर  दूध काढण्यासाठी गोठ्याकडे निघाले. एमाने पुन्हा पुन्हा आपला गडद निळ्या रंगाचा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज हाताने नीट केला. आरशात पुन्हा पुन्हा डोकावून ती लगबगीने जेकबच्या घराच्या दिशेने निघाली.

प्रकाशाने उजळलेल्या त्या रस्त्यापलीकडच्या घराकडे पाहत एमाने वळून आपल्या घराकडे नजर टाकली. सगळीकडे अंधाराला फाडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे दिवे.
’जेकबच्या घरातली विजेची तार आपल्या घराकडे वळवली तर?’ मान झटकत तिने तो विचार बाजूला ढकलला आणि दार वाजवलं. जेकबच्या हातात कणसाची टोपली देताना तिचे डोळे त्याच्यावर खिळून राहिले.
"कशी आहेस तू एमा?" जेकबचा उत्साह त्याच्या आवाजातूनही झिरपत होता. आता पावलं उचलायला हवीत हे जाणवूनही एमाचा पाय तिथून निघत नव्हता. जेकबचं बोलणं ती कानात साठवत होती.
"एमा, आपण बाहेर भेटू या?" घोगर्‍या आवाजात जेकबने विचारलं आणि एमा घामाने थबथबली.
"नाही, छे, छे अशक्य आहे हे. शक्यंच नाही." ती अक्षरश: पळत सुटली.

"डॅनिअल, डॅनिअल" एमाची नजर घरभर फिरली. घरात शांतता पसरली होती. तिचाच आवाज सार्‍या घरभर घुमत होता.  संध्याकाळचे पाच वाजून गेले आहेत. निजायची वेळ हे आईच्या विचित्र नजरेला तोंड देताना तिच्या लक्षात आलं आणि ती माडीच्या दिशेने धावली. आजूबाजूला लवंडलेल्या इतर भावंडांचं अस्तित्वं विसरुन तिने डॅनिअलला मिठी मारली.
"शूऽऽऽऽ एमा, नंतर बोलू आपण. आत्ता नाही." तोडांवर बोट ठेवत तिने एमाला गप्प रहायला बजावलं. एमाला  नसली तरी डॅनिअलला बाकीच्या भावंडांच्या उपस्थितीची जाणीव होती. एमा डॅनिअलच्या शब्दांनी भानावर आली.  संतरजीवर अंग टाकून ती निवांतपणा मिळण्याची वाट पाहत राहिली.

सगळीकडे सामसूम झाली, बाकीची भावंडं झोपली आहेत याची खात्री झाली तशी दोघी बहिणी ताडकन उठून बसल्या.
"डॅनिअल, किती दिवस वाट पाहत होते मी या क्षणाची. आज संध्याकाळी कणसं द्यायला गेले त्या वेळेस आपण बाहेर भेटू या का असं विचारलं त्याने. इतके दिवस वाट पाहत होते या प्रश्नाची. शेवटी विचारलं त्याने." एमाच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. डॅनिअल एमाकडे नुसतीच पाहत होती. कोणत्या शब्दात एमाला समजावावं हे तिला ठरवता येईना. एमाला निराश करणं तिच्या जीवावर आलं.
"पण लगेच होकार  नाही दिलेला मी. इतके दिवस वाट पाहतं होते पण वेळ आली तेव्हा ’नाही’ म्हटलं गं मी जेकबला. काय करु मी?  मला आवडतो जेकब. अगदी मनापासून आवडतो. पण तसं म्हणणंही पाप आहे हे ठाऊक आहे मला, मग त्याच्याबरोबर भटकायला जाणं तर दूरच्या गोष्टी."  हुंदके देत एमाने डॅनिअलच्या कुशीत तोंड खुपसलं.

जेकबच्या घराकडे एमाच्या खेपा वाढल्या आणि डॅनिअलची काळजी वाढली. कुणाच्या लक्षात आलं तर काय होईल या कल्पनेने एमाही  अस्वस्थ असायचीच. आमिश समाजातली मुलगी अमेरिकन मुलाच्या प्रेमात पडली तर कोणत्या दिव्यातून जावं लागेल या धास्तीने  एमाने जेकबला टाळण्याचा प्रयत्नही करत होती. काही केल्या तिला ते साधत नव्हतं.

जेकबने तिच्या लिपस्टिक धरली आणि तिच्या अंगावर सरसरुन काटा आला.
"जेकब, आमच्या पंथाच्या नियमाप्रमाणे आम्ही मेकअप करु शकत नाही, दागिने घालू शकत नाही. मी सांगितलंय तुला हे मागेच." एमाने लिपस्टिकच्या कांडीचं टोपण उघडत म्हटलं.  तो लालचुटुक रंग पाहून पटकन कांडी ओठावर फिरवायची ऊर्मी तिने कशीबशी दाबली.  स्कर्टच्या खिशात घाईघाईने तिने ती लिपस्टीक लपवली.  रस्त्यावर  शॉर्ट्समध्ये  मेकअप केलेल्या, केस कापलेल्या, स्पोर्ट्स  कारमधून मोठ्या दिमाखाने जाणार्‍या तिच्याच वयाच्या असंख्य मुली ती रोज पाहत होती. असं नखशिखान्त वेगळं रूप पाहिलं की एमाला आपला पोषाख बदलून टाकण्याची तीव्र इच्छा होई, केसाच्या नाना तर्‍हा करुन पहाव्याशा वाटत.  डॅनिअलला तर तिने कितीवेळा विचारलं होतं.
"डॅन, तुला नाही का माझ्यासारखं वाटत? तेच तेच कपडे घालायला वैतागत नाहीस तू? केस कापावेत, मोकळे सोडावेत असं नाही वाटत तुला? मनासारखं काही करायला म्हणून मिळत नाही आपल्याला. मला सगळ्याचंच आश्चर्य वाटतं. आजूबाजूला जगं पूर्णत: बदलतंय. आपण मात्र तसेच. बायबलमध्ये हे सांगितलं आहे आणि बायबलमध्ये ते सांगितलंय" डॅनिअलला हसू फुटायचं.
"एमा, तू वाचताना असं का, हेच डोक्यात ठेवून वाचतेस. बंडखोर आहेस तू.  बाकी सारी बायबलमय होऊन जीझसच्या भेटीच्या ओढीने बायबलचं आचरण करतात. त्यांची जीझसच्या भेटीची इच्छाशक्ती जास्त तीव्र आहे एवढंच म्हणू शकतो आपण फार तर."
"नाही हे खरं नाही. याचा अर्थ बाकी पूर्ण जगाला जीझसशी देणंघेणं नाही असाच होईल; बदल स्वीकारतही जीझसला मानतातच की लोकं." जीझस, बायबल आणि नियम. किती वाद, चर्चा दोघी घालत. निष्पन्न काही न होता दोघींची तास न तास चर्चा चाले. त्या दिवशी स्कर्टच्या खिशात लपवून आणलेली लिपस्टिक दोघींनी हळूच एकमेकींना लावून पाहिली. एकदा भल्या मोठ्या कपड्यांच्या दुकानातल्या बाथरूममध्ये जाऊन लिपस्टिक लावल्याचं डॅनिअलनं सांगितलं आणि आपणच एकट्या वेगळ्या नाही या सुखद जाणिवेने एमा खूश झाली.

हिवाळी सुट्टी संपली. शाळा सुरु झाल्या. यानंतर एमाच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळणार होता.  ती यंदा शेवटच्या वर्गात म्हणजे आठवीत होती. आठवीच्या पुढे शिकणं बायबलच्या नियमाप्रमाणे शक्य नव्हतं, पण जेकबच्या तोंडून तो वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणार असल्याचं एमाने खूपदा ऐकलं होतं. आमिश सोडता सारं जग त्यांना पाहिजे तसं वागू शकतं, पाहिजे तितकं शिकू शकतं हेही सांगायला तो विसरला नव्हता. एमाच्या विचारातला बंडखोरपणा त्यामुळे उफाळून येत होता.  पंथाच्या बाहेर पडून काहीतरी करावं असं तिला तीव्रपणे वाटायला लागलं.

"ही सगळी माहितीपत्रकं आपण मागवलेल्या अभ्यासक्रमाची"  जेकबने भलामोठा गठ्ठा तिच्यापुढे टाकला. एमा हरखून गेली.
"एमा दिवस कमी आहेत. तू खरंच यातलं काही करु पाहत असशील तर नक्कीच मदत करेन मी तुला. तू वसतिगृहामध्ये राहून शिकू शकतेस. शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करु आपण. तुला सगळा खर्च भागवायचा तर नोकरीही करावी लागेल. एकदा तू स्थिरावलीस,  माझं शिक्षण पूर्ण झालं, मी वैद्यकीय व्यवसायात शिरलो की लग्न करु आपण. माझ्याकडून मी सारं स्पष्ट सांगितलं आहे. पण तुला मात्र धाडस करावं लागेल. तुझ्या विश्वातून बाहेर पडावं लागेल." जेकबच्या बोलणं ऐकण्यात गर्क झालेली एमा त्याच्या शेवटच्या वाक्याने भानावर आली. तिच्या डोळ्यापुढे भविष्यकाळाचं चित्र उभं राहिलं. अनिश्चित भविष्याकडे झेपावण्याचा उत्साह तिला आपली सारी सोळा वर्ष तशीच मागे टाकून, पुसून टाकण्याच्या कल्पनेने मागे खेचत होता. जेकबसमवेत जग पाहण्याच्या स्वप्नापायी आई, वडील, भावंडं, सगळा आमिश समाजच सोडायचा? ती विचारात गढून गेली. जेकब काहीतरी बोलला आणि तिची तंद्री भंगली.
"जेकब, मी तुझ्याबरोबर आले तर आमचा समाज परत मला सामावून घेणार नाही."
"पुन्हा बायबल." जेकबच्या स्वरात कडवटपणा डोकावला.
"एमा, शिक्षणासारखी गोष्ट स्वीकारायलाही बायबल मना करतं आणि आंधळ्यागत तुमचा समाज ही तत्त्वं अनुसरतो. मती कुंठीत होते हे पाहून. खूपदा बोललोय आपण ह्या विषयावर. माझं प्रेम आहे तुझ्यावर पण त्याचा अंत नको पाहूस. फार काळ नाही मी वाट पाहू शकत. तुझा निर्णय लवकरात लवकर समजू दे."
एमा रडायलाच लागल्यावर जेकबने समजुतीने घ्यायचा प्रयत्न केला.
"एमा, आम्ही मोकळेपणाने मैत्री करु शकतो, ठराविक मर्यादेपर्यंत शारीरिक जवळीकही त्यात आलीच. तुला हे लग्न होईपर्यंत करणं पटणार नाही हे ठाऊक आहे. पण नव्या गोष्टी स्वीकारताना तुला वाटणारी भिती, कुचंबणा, शरम पाहिली की वाटतं, तुमच्या समाजाच्या नियमाबाहेर जाणं तुला जमणार नाही. एवढ्यासाठीच वेळेवर निर्णय हवा आहे मला."
"जेकब, तू म्हणतोस ते सगळं खरं आहे. पण माझा निर्णय नकारार्थी असला तर? काय करशील तू?" घाबरत, धडधडत्या मनाने एमाने प्रश्न टाकला.
"हू केअर्स?" जेकब ताडकन म्हणाला आणि एमाचं डोकं भणाणून गेलं. थोड्याशा उद्धटपणाने विचारलेल्या प्रश्नाला जेकबकडून तसं च उत्तर मिळालं होतं. तिरमिरीतच ती घराच्या दिशेने वळली.

आता फक्त एक वर्ष होतं. शाळा संपली की लग्नं. तिला माहीत होतं, चर्चमध्ये गेलं की आई वडील स्टीव्हन आणि तिने एकत्र यावं म्हणून प्रयत्न करतात. स्टीव्हनच्या मनात काय आहे हे एमाच्या लक्षात येत नसलं तरी ते निश्चितच मैत्रीपूर्ण होतं. जर त्याने लग्नाबद्दल विचारलं तर सुटका नव्हती याची तिला जाणीव होती. दिवसेंदिवस एमाच्या मनावरचा ताण वाढत होता. जेकबचं ’हू केअर्स’ हे उत्तर पुढे पाऊल टाकायला मना करत होतं. समजा नाहीच पटलं नंतर तर काय करु शकतो आपण? आठवीपर्यंतच्या शिक्षणाचा किती उपयोग होणार? शिकता शिकता नोकरी करावी लागेल म्हणतो जेकब, पण कोण देणार नोकरी काहीही येत नसताना? पदवी मिळाली नाही, जेकबशी पटलं नाही तर? असंख्य प्रश्नांनी मनात थैमान घातलं होतं.

रविवारी चर्चमध्ये गेल्यावर, एमाने स्टीव्हशी बोलायचं ठरवलं. जेकबच्या बायबल, ऑमिश लोकांच्या चालीरितीबद्दलच्या कडवट मतांमुळे ती त्याच्यापुढे कधी मोकळी होऊ शकली नव्हती; पण मैत्रीच्या नात्याने स्टीव्हनचं या बाबतीत मार्गदर्शन होऊ शकेल याबाबत तिच्या मनात संदेह नव्हता.
"एमा, मला कल्पना नाही तुझ्या मनातल्या वादळाची. पण आपण लहानपणापासून वेगळ्याच वातावरणात वाढलोय. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत आपण आई वडील वाढवतात तसे वाढतो. त्यानंतर या धर्मात राहायचं की नाही हा निर्णय आपला असला तरी ज्या संस्कारातून आपण जातो त्यातून बाहेरच्या जगाचं आकर्षण असलं तरी तिथे पोचू शकत नाही कारण मुख्यत्वे आपलं अपुरं शिक्षण. तूच सांग एमा, या घडीला तुला सर्व बंधनातून मोकळं केलं तर लागेल तुझा निभाव तुझा तिथे? म्हणूनच कोणी सहसा धाडस करत नाही समाजातून बाहेर पडण्याचं."
"तुला नाही वाटत कधी इथून बाहेर पडावं म्हणून?" एमाने निराश स्वरात विचारलं आणि स्टीव्हनं हसला.
"वाटतं ना, पण रक्ताची नाती, प्रेमही त्याच्याबरोबर गमावून बसेन हेही ठाऊक आहे मला. मला कल्पना आहे हे तू मला का विचारते आहेस. जेकब आवडतो तुला. हो ना?"
"स्टीव्हन!" एमाला बसलेला धक्का लपवता आला नाही.
"बर्‍याचदा पाहिलं आहे मी तुला त्याच्याशी गप्पा मारताना. दर वेळेस तुझे डोळे, चेहरा तू किती जेकबमय झाली आहेस ते सांगतात. नशीब समज, अद्यापपर्यंत तुझ्या आई वडिलांपर्यंत हे पोचलेलं नाही."
"स्टीव्हन!" एमाने त्याचा हात घट्ट धरला आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत राहिली.
"एमा, सर्वांनाच माहीत आहे, आपले आई वडील आपण दोघांनी जवळ यावं या प्रयत्नात आहेत. मला आवडतेस तू. पण तुझं प्रेम जेकबवर आहे याचीही कल्पना आहे मला. एवढंच सांगतो, निर्णय तुझा आहे. खरंच या समाजाच्या चालीरीती झुगारून तुला त्याच्याबरोबर जायचं असेल तर मी पाठीशी आहे तुझ्या." निशब्द अवस्थेत स्टीव्हनच्या हातातला हात सोडवला एमाने. मुकपणे निरोप घेत एमा तिथून निघाली.

जेकबने दिलेल्या प्रत्येक ठिकाणी एमाने धडधडत्या हृदयाने अर्ज भरुन पाठवले आणि हुरहुरत्या मनाने ती वाट पाहत राहिली. डॅनिअलला सगळ्या प्रकाराची कल्पना असली तरी अपेक्षेप्रमाणे तिचा प्रतिसाद नव्हता. अस्वस्थ मनाने ती एमाच्या हालचाली निरखीत राही. एमाला पाठिंबा द्यावा की घरात सांगून मोकळं व्हावं या कात्रीत ती सापडली होती.
अखेर न राहवून पुन्हा दोघी बायबल उघडून बसल्या. ओळ न ओळ वाचताना आपला समाज सगळ्या नियमाचं किती काटेकोरपणे पालन करतो याचंच आश्चर्य एमाला वाटत होतं. परतीचा मार्ग नाही या विचाराने पुन्हा एकदा तिला ग्रासलं. सोबत डॅनिअललाही.

जेकबने तिच्यासाठी आलेली पत्र पुढे केली. उत्सुकतेने एमा पत्र फोडत होती. तिच्या चेहर्‍यावरचे भाव जेकब निरखीत होत.
"एमा, दहापैकी एखादंच पत्र आशेचा किरण असेल, पण ते एखादंच खूप नाही का?"
"जेकब, एकदेखील पत्र नाही आशा पुरं करणारं...सगळ्यांनी प्रवेश नाकारला आहे."
शरीरातलं त्राण गेल्यागत एमा म्हणाली आणि जेकबने तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं. बराच वेळ तो तिला थोपटत राहिला. त्याच्या स्पर्शाने तिचं अंग रोमांचित झालं.
हे थांबवायला हवं, असं याच्या मिठीत..., कुणी अचानक आलं तर, पाहिलं तर अनेक शंका मनात होत्या, मन मागे परतायची खूण करत होतं पण शरीर साथ देत नव्हतं.
’मी नाही पडू शकत यातून बाहेर. खरंच हवाय मला जेकब, सर्वार्थाने.’ स्वत:ला बजावता बजावताच ती त्याच्या मिठीत विरघळत गेली.
"एमा, अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहूनही तुम्ही फटकून राहिल्यासारखे का करता तेच समजत नाही."
"जेकब, आत्ता नको ना हा विषय. " एमाने जेकबच्या छातीशी डोकं घुसळत  त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव केला आणि दोघं भोवतालचं जग विसरले.

घडलं ते चुकीचं या विचाराने एमाच्या डोळ्याखालची वर्तुळं वाढायला लागली. डॅनिअलकडेही तिला हे सांगता येत नव्हतं.  पण तिच्या आईच्या ते लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही. एकदोनदा तिने एमाला आडवळणाने विचारण्याचा प्रयत्न केला पण एमाने कसलीच दाद लागू दिली नाही. थोडे दिवस ती जेकबकडे फिरकलीही नाही. पण त्या निर्णयावर तिला ठामही राहता येईना.
जेकबही तिच्या भेटीसाठी आतुर झाला.  एमाच्या स्पर्शसुखाने तो हरखून गेला होता.   एमाच्या त्याच्या भेटीचा समारोप त्याच्या एकमेव मागणीने व्हायला लागला. एमाच्या ठाम नकाराने जेकब आक्रमक होत होता. आणखी किती दिवस जेकबला आपण विरोध करु शकू या काळजीने एमा खंगत चालली. परिस्थितीवर मात कशी करायची या एकाच प्रश्नाने तिची झोप उडाली. खूप विचार करुन तिने मनाशी काहीतरी निश्चित केलं.

रविवारी आपणहून स्टीव्हच्या भोवती घोटाळताना एमाला पाहिलं आणि दोघांचे आई वडील सुखावले. जेवण झाल्यावर त्यांना गप्पा मारत बसण्याचा आग्रह करत घरी परतले. स्टीव्हनच्या बाजूला चर्चच्या मागच्या आवारात थोड्याशा आडजागेला बसलेली एमा मूक झाली.
"एमा, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? गेले दोन तास पाहतोय तू अधीर आहेस काही तरी सांगायला. काय झालं आहे नक्की?"
"स्टिव्हन, हे सगळं तू कसं स्वीकारशील  माहीत नाही, पण तुला आठवतंय? तू म्हणाला होतास, निर्णय तुझा आहे. तू आवडतेस मला. " स्टीव्हनने आठवल्यासारखी मान डोलावली.
"स्टीव्हन, मी..., मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. आता तुझा निर्णय हवा आहे स्टिव्हन." एकदम मुद्द्याला हात घालत ती मोकळी झाली. मनावरचं प्रचंड दडपण दूर झाल्यासारखं वाटत होतं. स्टीव्हनही तिच्याकडे पहात होता. कितीवेळ ती दोघं नुसतंच एकमेकांकडे पहात होती. तिच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत होती एमा.
सगळ्या प्रश्नांना मुकं करत एमाच्या तळव्यावर स्टीव्हननं हळुवारपणे ओठ टेकवले आणि तिने त्याला थांबवलं.
"थांब स्टिव्हन, तू विचारलं नाहीस तरी मला पूर्ण बोलू दे. काहीही ऐकायची, कोणत्याही स्वरुपात मला स्वीकारायची तयारी आहे तुझी?"
"असं का विचारते आहेस तू? माझा मनापासून जीव आहे तुझ्यावर आणि तू काही वेडंवाकडं वागणार नाहीस याची खात्री आहे मला."
"नाही. हे खरं नाही. माझं पाऊल वाकडं पडलं आहे. मी माझं सर्वस्व जेकबला दिलंय."तटकन स्टिव्हनला तोडत एमा बोलली आणि स्टीव्हन अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिला. त्याचीच मान खाली झुकली. काहीही न बोलता तो तसाच बसून राहिला.
"भावनेच्या भरात मी जेकबला सर्वस्व देऊन मोकळी झाले हे खरं आहे. माझ्या सुदैवाने हे एकदाच घडलं आणि नशिबानं त्याचे काही परिणाम भोगावे लागले नाहीत.  हे झाल्यावर जेकबने माझ्याकडे  अनेकदा मागणी करुनही मी स्वीकारली नाही याचं कारण एकच. आमिश समाज सोडून मी जगू शकणार नाही हे पटलंय मला. नाईलाजाने का होईना, हे सत्य स्वीकारलं आहे मी. अरे, कुठेही माझा अर्ज स्वीकारला जात नाही यातच पुढली फरफट समजते आहे मला. यश मिळालं नाही तर जेकब मला साथ देईल याचीही शाश्वती वाटत नाही. दुसरं म्हणजे जेकबच्या समाजातलं घटस्फोटाचं प्रमाण माझं पुढे पडणारं पाऊल मागे ओढतंय. मला निश्चितपणे माहीत आहे की मी जेकबपुढे हुशारी, हरहुन्नरीपणात कमी पडले तर पर्वा न करता तो पुढे जाईल. त्याच्या आक्रमक, तुसड्या आणि दुसर्‍याला नगण्य मानण्याच्या स्वभावाचा अनुभव घेतलाय मी. बराच विचार करुन आपला पंथच झुगारुन त्याच्याबरोबर जाण्यात काही अर्थ नाही या मतावर येऊन ठेपलेय मी. आहे त्या परिस्थितीत ज्याला हे सर्व माहीत आहे त्याच्याशीच लग्न करावं असं वाटतं मला. तुला हे सर्व जड जाणार नसलं, मान्य होणारं वाटलं तरच हो म्हण तू. माझा आग्रह नसला तरी आमिश समाजातच राहायचं तर तुझ्याशीच विवाह होणं आवडेल मला."
एमाने एका दमात बोलणं संपवलं आणि खोल श्वास घेत ती स्टीव्हनकडे एकटक बघत राहिली.

कपाळावरचे केस सारखे करत दोन बोटात स्टीव्हनने माथ्यावरची शी घट्ट पकडली. एमा जेकबच्या बाबतीत इतकी पुढे जाईल याचा त्यानं कल्पनेतदेखील विचार केला नव्हता, आणि गेलीच तर मग आगाऊपणे मला का विचारते आहे लग्नाचं? तारवटलेल्या डोळ्यांनी अर्थशून्यपणे तो बराच वेळ एमाकडे पाहत राहिला. वेळ मागून घ्यावा, आत्ताच निर्णय घ्यावा त्याला काही म्हणजे काही समजत नव्हतं.

नाही म्हणावंसं वाटत असूनही त्याने एमाला जवळ ओढलं. तिच्या मिटल्या पापण्यांवर ओठ टेकत तो पुटपुटला,
"किती वाट पाहायला लावलीस एमा तू. मी तुझ्या प्रतिक्षेत होतो गं. पण तू जेकबच्या प्रेमात पडलेली. या जन्मात तू माझी होशील ही आशाच सोडली होती मी. आता मात्र कधी असं फसवू नकोस माझीच राहा फक्त तू. माझीच राहा." एमाने हळुवार होत स्टीव्हनच्या डोळ्यात डोकावलं. त्या नजरेतलं प्रेम, ओढ तिला पहिल्यांदाच खर्‍या अर्थाने दिसली आणि अलगद ती त्याच्या कुशीत विसावली.