Wednesday, December 3, 2014

मंडळोमंडळी

राधाने पलंगाच्या बाजूला ठेवलेली डायरी उघडली.
... दिवाळीच्या कार्यक्रमात मी छान गाणं म्हटलं.  ते गाणं आईने आल्याआल्या टी.व्ही. वर लावलंही. आम्ही सगळेच उत्साहाने पहायला, ऐकायला लागलो. पण माझं गाणं ऐकूच येत नव्हतं. आजूबाजूच्या गोंधळाचा, इतरांचा आवाज माझ्या आवाजाहून मोठा होता. माझं गाणं कुणी ऐकलंच नाही म्हणायचं तर. आई चिडली. म्हणाली, फक्त स्वत:च्या  मुलांचे कार्यक्रम पहातात लोकं. ते झालं की झालं गप्पाष्टक सुरू. पण इतरांचे कार्यक्रम चालू असतात तेव्हा ती पण गप्पा मारत असतेच की बाजूला बसलेल्या मावशीशी. मी तिला तसं म्हटलं तर आणखी चिडली. ते वेगळं असं काहीतरी पुटपटली. पण मग मी कशाला म्हटलं तिथे जाऊन गाणं? मला तर बाकीची मुलं पूर्ण वेळ  दंगा करत होती त्यांच्याबरोबर खेळायला आवडलं असतं. बाबा आणि आईच गाणं ऐकणार असतील तर त्या साठी देवळाच्या रंगमंचावर कशाला जायला हवं? घरी रोज  जवळ जवळ १ महिना गाणं म्हणण्याचा सराव आई करून घेतंच होती की.

दिवाळीच्या कार्यक्रमाबद्दल  काय वाटलं ते राधाने चार वाक्यात तिच्या वहीत बंदिस्त केलं आणि क्षणात ती झोपलीही.

*************************
नरेनने घरी आल्या आल्या भारतात फोन केला. तिथल्या नाटकवेड्या मित्रमंडळीपैंकी कुणाशीतरी कार्यक्रमानंतर बोलणं हा त्याचा आवडता छंद. शाळेपासून एकत्र अभिनय केलेली त्याची मित्रमंडळी त्याच क्षेत्रात कार्यरत होती. त्याच्यांशी बोललं की मन शांत व्हायचं नरेनचं. आत्ताही मनातली मळमळ बाहेर पडली. "अरे, चाळीस मिनिटांचा कार्यक्रम केला आज दिवाळीच्या कार्यक्रमात. मजा नाही रे येत तिकडच्यासारखी. इथले कार्यक्रम म्हणजे सगळा हौसेचा मामला. आमच्याच कार्यक्रमाचं ऐक, आवाज, आवाज असं लोकांनी म्हटलं की आम्ही कलाकारांनी आवाज चढवायचे. थोडावेळ सगळं सुरळीत, मग पुन्हा तेच. कार्यक्रम चालू असतानाच वैताग यायला लागला होता. सगळ्यांनी सरावासाठी काढलेला वेळच डोळ्यासमोर येत होता. कार्यक्रम धड ऐकूच जाणार नसेल तर कशाला करायचा? तरी रेटत नेला शेवटपर्यंत आम्ही सर्वांनी. पण त्यातली मजा गेली ती गेलीच. मुळात कार्यक्रमात खरा रस असणारी मंडळी मूठभर. ती बसतात पुढच्या काही रागांमध्ये. उरलेल्यांचा कल स्नेहसंमेलनाला आल्यासारखा. रंगमंचार काय चालू आहे यात रस नसतोच त्यांना. आमच्या कलाकारांनी नंतर मंडळाच्या कार्यकारिणीला घेरलंच. आगपाखड केली. वर्षानुवर्ष हेच चालू आहे. माहीत आहे ना नीट ऐकू येण्याचा प्रश्न येतो दरवेळेस. मग दुसरीकडे का नाही करत? मंडळ आणि देऊळ हेच समीकरण का? नाहीतर आधीच जाहीर करा ना फक्त ध्वनिमुद्रित कार्यक्रमच करा म्हणून. करा फक्त नाच गाण्यांचा कार्यक्रम. आणि तसाही कुणाला काय फरक पडतोय? पहातं कोण नी ऐकतं कोण अशी परिस्थिती. उगाच वेळ फुकट गेला. डोक्याला ताप नुसता. आता पुन्हा पुन्हा तेच सांगू नका,  बाहेर कार्यक्रम करा म्हटलं तर पैशाचा प्रश्न येतो म्हणे. अरे, सभासदांकडून घेता ना तो पैसा वापरा की. करायचा कार्यक्रम तर दर्जेदार करायला नको का? नाहीतर मग जेवण आणि गप्पा असंच ठेवा ना कार्यक्रमाचं स्वरूप. हे आणि अशा प्रकारचं सगळं एकेक करून प्रत्येकजण बोलत होता.  कार्यकारिणीतली माणसं मुकाट ऐकत होती. मला तर वाटलं, कार्यक्रमाला आलेल्या लोकांना अख्ख्या दिवाळीच्या कार्यक्रमात हाच कार्यक्रम अधिक आवडला असेल. सगळी जमली होती ऐकायला." नरेनच्या डोळ्यासमोर फोन ठेवल्यावरही दिवाळीची फटफजिती आणि मंडळाच्या कार्यकारिणीबरोबरची बोलाचाली चांगलीच नाचत होती.
**************************
तबला करून टाकतात लोकं मंडळाच्या कार्यकारिणीवर असलं की. वर्षानुवर्ष आवाज पोचत नाही ही अडचण आहेच. ती सोडवायचा प्रयत्नही करतोय आम्ही. आमच्यापरीने मार्ग काढतो पण येऊन जाऊन पब्लिक झापणार आम्हालाच. कौतुकाचे शब्द नाहीतच. तो साला नरेन पारगावकर आणि त्याचे ते सगळे कलाकार वचावचा ओरडत होते. असं रंगमंचावर ओरडला असतात ना तर तुमचा कार्यक्रम छान ऐकू गेला असता असं सांगायला हवं होतं. पण जाऊ दे. तुम्ही कामं करताय ना मग ऐकाही मुकाट तुम्हीच.  आणि बाहेर करा म्हणे कार्यक्रम. देऊळच कशाला हवं दरवेळेस? एकामागून एक प्रश्न नुसते. प्रश्न सरळ असले तरी उत्तरं अवघड आहेत.  थांब पुढच्या वेळेला तुलाच भाग पाडतो कार्यकारिणीवर यायला मग करा पाहिजे ते. तेव्हा कळेल कशा लोकांच्या मागण्या, दबाब असतो ते. राजकारणच असतं इथेही हे काय माहीत नाही का लेको तुम्हाला? कार्यकारिणीवर नसणार्‍या लोकांच्या मतांचा कसा प्रभाव असतो ते समजायला चालवाच तुम्ही मंडळ पुढच्यावेळेला.  आपलेच दात आपलेच ओठ याची प्रचिती आली की बसाल गप्प. आणि सगळं उच्च दर्जाचं पाहिजे ना, मग मंडळाला पैसे देताना कुरकूर का करता? वर्षाचे पैसे वाढवले  तरी बोंबलणार तुम्ही लोकं.  तोंडाची वाफ झाली दवडून सगळ्यांसमोर. अख्ख्या मंडळाला एक चर्चेचा विषय दिलात बरं पारगावकर तुम्ही. आता पुढचे दोन तीन महिने हा विषय सगळ्यांकडच्या मेजवान्यांना तोंडी लावणं म्हणून पुरणार.... चांगलं केलंत हो, दिवाळी सार्थकी लावलीत.... मनातले विचार कृतीत उतरवल्यागत शेवटची खुर्ची दाणकन भितींशी आपटून केशव देवळाच्या बाहेर पडला.
**************************
नाना सरवटे, मंडळाचे नाना आजोबा संथपणे बाहेर पडले. मनात पाहिलेल्या कार्यक्रमाची उजळणी नाही म्हटलं तरी चालू होतीच. नेमेची येतो....सारखा यावेळचाही दिवाळीचा कार्यक्रम.   मुलांचा किलबिलाट, मोठ्यांचं हसणं, खिदळणं, गप्पा. पण मजा राहिली नाही आता. म्हणजे कार्यक्रमापासूनच सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे सुरुवात व्हायलाच उशीर. लोकांची वाट पहात वेळेवर आलेल्यांवर अन्याय करतात हे कसं समजत नाही?  एकदा कार्यक्रम दिलेल्या वेळेवर सुरु होतो हे कळलं की पाळतील वेळा पुढच्या वेळेस. पण लक्षात कोण घेतो? आणि मराठी लोकांचा कार्यक्रम म्हटल्यावर सारा कार्यक्रम मराठीतून असेल असं वाटलं होतं. इथे तर मुलांच्या कार्यक्रमांची सुरुवातच हिंदी गाण्याच्या नाचावर झाली. एवढी एवढीशी मुलं कंबरा हलवून नाचतात. विनोदीच वाटत होतं. एकातरी शेंबड्याला त्यातला एखादा तरी शब्द समजत असेल तर शप्पथ. ते होतंय तितक्यात घरच्या देवासमोर म्हणायचं अथर्वशीर्ष रंगमंचावर  येऊन एखादं कार्ट म्हणून दाखवणार. आई, वडिलांची हौस. दुसरं काय? कीर्तन, तमाशा सारं एकाच जागी असं वाटून गेलं क्षणभर. गेली तीस वर्ष गावातच रहाणारे नाना आजोबा गाडीपाशी पोचले. विचारातच त्यांनी  गाडीचं दार ओढलं. आता सवयीने येऊन बसायचं कार्यक्रमांना हेच खरं. ओळखीची जुनी माणसं तर फार फिरकतच नाहीत. तरी कुणी आलं असलं तर म्हणून बसल्या बसल्या ओळखीचा चेहरा धुंडाळायचा. तशी ही नवीन पिढी बरी आहे. मान देतात, विचारपूस करतात. पण ते तितकंच. नवीन ओळखी अशा कुणाशी होत नाहीत. मग बसायचं खुर्चीवर ठिय्या देऊन. पूर्वी कसं, मोजकी कुटुंब, छोटासा कार्यक्रम आणि चहा फराळ झाला की संपली दिवाळी. घरगुतीपणा होता त्यात आणि तोच भावायचा जास्त. आता सगळेजण स्पर्धा असल्यासारखे कार्यक्रम सादर करतात,  तास न तास. जेवणाचा घोळ घालतात. आणि माणसं तर इतकी वाढली आहेत की जत्रा भरल्यासारखी वाटते. नवीन येणार्‍या माणसाचं काही खरं नाही. म्हणजे जत्रेत ओळखी होणार तरी कशा? बसलेली असतात बिचारी हरवललेल्या मुलांसारखी.  पुढच्या वर्षी  फिरकतच नाहीत पुन्हा.  मग आम्ही तयारच मंडळात लोक येत नाही म्हणायला.  आम्ही आपले येतो ते घरी बसून करायचं काय म्हणून. पण घरीच बसावं असं वाटायला लागलं आहे. म्हणजे झालंय काय की  हे संस्कृतीचं वेड अजीर्ण होत चाललं आहे. लादतात नुसते कार्यक्रम एकामागून एक. आणि ही असली अर्धवट संस्कृती किती दिवस उराशी बाळगायची? नीट धरा नाहीतर पूर्णपणे सोडून तरी द्या.... नाना आजोबांनी दिव्यांच्या माळा लावून सजवलेल्या देवळाकडे दृष्टी टाकत गाडी चालू केली. देवळापासून संथ गतीने गाडी दूर दूर जायला लागली पण विचारांचा घोळ कमी न होता नाना आजोबांच्या मनात  सोसाट्याच्या वार्‍यासारखा घोंघावतच राहिला...


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Dec2014.pdf