Tuesday, June 2, 2015

जागो हिंदुस्तानी

रंगमंचावर  रंग दे बसंती चोला हे गाणं सुरु झालं आणि एका कडव्याला त्यातील गाण्याच्या ओळी म्हणत  गायक रंगमंचावरुन खाली उतरले, मंचावरचे दिवे अंधुक होत गेले आणि उजळलेल्या प्रेक्षागृहात गायकांमधील एक  कलावंत प्रेक्षकांमधील आजींच्या चरणांशी वाकला. आजींनी डोळ्यांमधून ओघळणारे अश्रू पुसत गायकाला आशीर्वाद दिला. आपल्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली गाणी तितक्याच ताकदीच्या गायकांकडून ऐकण्यात प्रेक्षक रमलेले असतानाच या प्रसंगाने सार्‍यांचीच मनं भारावून गेली. कार्यक्रम होता कोल्हापूरच्या स्वरनिनाद संस्थेचा जागो हिंदुस्तानी.


जागतिकीकरणाने सगळीच समीकरणं बदलली. कोणतंही गाणं इंटरनेटवर आता सहज उपलब्ध आहे. भारतातून सांस्कृतिक कार्यक्रम परदेशात येण्याचं प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, नाटक, संगीत, वादन, चित्रपट अशा कार्यक्रमांची रेलचेल चालू असते. सादरकर्त्यांची आणि पाहणार्‍यांची अभिरुचीही बदलली आहे. मग आवर्जून पहावं असं जागो हिंदुस्तानीमध्ये काय आहे? या कार्यक्रमाचं वेगळेपण कशात आहे? जागो हिंदुस्तानीचं यश आहे ते रंगमंचावर निवेदन आणि गायनाच्या साथीने रसिकांना आठवणींच्या राज्यात नेणं, विस्मृतीत जात चाललेल्या घटनांचा हात हाती घेऊन, प्रसंगाना उजाळा देत अलगद त्या काळात नेऊन सोडणं तर काहीवेळा आपल्या ऐकण्यात, माहितीत नसलेला एखादा प्रसंग, घटना डोळ्यासमोर जसा घडला तसा उभा करणं यामध्ये आहे. दोन - अडीच तासाचा हा कार्यक्रम आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेतो, गत आणि वर्तमान काळाची सैर चालू रहाते ती नव्या - जुन्या गाण्यांच्या साथीने. अभिमान, खेद, हळहळ, चुटपूट, स्फूर्ती, उत्साह अशा सार्‍या भावना या वाटेवर आपल्या सोबतीने येत रहातात आणि एक अविस्मरणीय कार्यक्रम पाहिल्याचं समाधान मनात  तरळत रहातं.
जागो हिंदुस्तानी कार्यक्रमात निवेदक भूषण शेंबेकर आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग ताकदीने उभा करतात. भूत - वर्तमानाची पानं अलगद उलगडत राहतात. प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करण्यात ते यशस्वी होतात. उधमसिंग ह्यांनी पंजाबच्या गव्हर्नर मायकल ओव्हायरची जालियनवाला हत्याकांडाला जबाबदार धरत गोळ्या झाडून हत्या केली. हा प्रसंग ऐकताना उधमसिंगांनी दिलेला कबुलीजबाब ऐकताना आपला उर  अभिमानाने  भरुन येतो. प्लासीच्या विजयानंतरच्या जल्लोषात पराजित हिंदुस्तानी काय करु शकत होते याबद्दल त्या मिरवणुकीत सामील असलेल्या परकीयाचे शब्द ऐकताना चुटपूट लागते, खेद वाटतो. निवेदनातून येणार्‍या या अशा आणि अनेक घटना ऐकता ऐकता  सर्वांच्याच मनात प्रसंगांची गर्दी व्हायला लागते. देशासाठी लढलेल्या, प्राण गमावलेल्या अनामिक वीरांच्या बलिदानाची आठवण येऊन हळहळ वाटते आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतरचा भारत नजरेसमोर आला की आपण काय काय गमावलं, कुठून कुठे पोचलो ह्याचा हिशोब मन मांडायला लागतं. 

भारत १९९७ साली स्वातंत्र्याचं ५० वे वर्ष साजरं करत असताना निर्माते सुनील सुतार आणि दिग्दर्शक सुरेश शुक्ल यांनी आपल्या स्वरनिनाद या संस्थेतर्फे जागो हिंदुस्तानी चा पहिला प्रयोग रंगमंचावर आणला. आणि त्यानंतर सातत्याने त्यांचे प्रयोग भारतभर चालू आहेत. या कार्यक्रमाला नेपथ्य आहे ते भारतीय ठेव्याचं,  रेखाटनं आहेत ती ऐतिहासिक ठिकाणांची. उत्कृष्ट प्रकाशयोजनेमुळे ह्या रेखाटनांचा ३D परिणाम छान साधला जातो. 

स्वरनिनादने गेले २६ वर्ष सातत्याने गर्जा महाराष्ट्र, देस मेरा रंगीला, गीत बहार, लख लख चंदेरी, शब्द सुरांच्या झुल्यावर असे वेगवेगळे हिंदी, मराठी गीतांचे कार्यक्रम भारतभर सादर केले आहेत.

जागो हिंदुस्तानी हा जो कार्यक्रम सध्या अमेरिकेत चालू आहे त्याचे भारतात आत्तापर्यत सर्वत्र प्रयोग झाले आहेत. वाघा सरहद्दीवरही हा कार्यक्रम झाला आहे याचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. इतकंच नाही तर तुरुंगातील कैद्यांना घेऊन त्यांच्याकडूनच हा कार्यक्रम करुन घेण्याचा आगळावेगळा प्रयोगही स्वरनिनादने यशस्वीरीत्या केला. २ राष्ट्रीय तर २ राज्य पातळीवरच्या पुरस्काराने हा कार्यक्रम सन्मानित झालेला आहे. उत्कृष्ट संगीत, गाणी, नेपथ्य, प्रकाशयोजना असलेला हा दोन - अडीच तासांचा कार्यक्रम आपल्याला खिळवून टाकतो.  गाण्यातील भावना थेट हृदयापर्यंत पोचवणारे समर्थ गायक यात आहेत. आणि सध्याच्या काळातील कार्यक्रमांच्या बदललेल्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर संदेशे आते है, फिर भी दिल है हिंदुस्तानी, बोलो मेरे संग,  भारत के रहनेवाला, ए मेरे वतन के लोगो, सारे जहॉंसे अच्छा, वंदे मातरम अशी एकापेक्षा एक सरस गीतं असलेला हा कार्यक्रम पहाताना आपण वेळेचं भान विसरुन जातो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ध्वनी - प्रकाश - नेपथ्य - गायन - वादन - निवेदनाचा जमलेला सूर म्हणजे जागो हिंदुस्तानी हा कार्यक्रम. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवून डोळे आणि कान तृप्त करावेत असा!  


BMM वृत्तमध्ये प्रसिद्ध - http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/2015_6_BMMVrutta_MohanaJoglekararticle.pdf

Wednesday, May 20, 2015

झलक

गेल्या ८ महिन्यांपासून मी मराठी वर्ग घ्यायला सुरुवात केली. खेळ, अभिनय, भेंड्या या  पद्धती वापरुनच मुलांना मराठीची गोडी लावायची हे सुरुवातीपासूनच नक्की केलं होतं. वेगवेगळ्या खेळांमधून शिक्षण हे माझं शिकवण्याचं सूत्र कसोशीने गेले ८ महिने पाळलं त्यामुळेच सुरुवातीला आई - बाबांमुळे आलेली मुलं नंतर नंतर  उत्साहाने स्वत:हून यायला लागली.

मुलांनी रंग, आकडे, वार म्हणून दाखवले. दोन प्रवेश स्वत:च्या कल्पनेने सादर केले. चंपक मधील पंख्याची गोष्ट कधीतरी वर्गात सांगितली होती त्यावरुन मुलांनी मराठीतून अतिशय सुंदर प्रवेश सादर केला. दुसरा प्रवेश  एका विद्यार्थ्याच्या मनातील कल्पना होती. त्या कल्पनेला मूर्त रुप मुलांनीच दिलं. खूप छान वाटलं सर्व मुलांना आत्मविश्वासाने मराठी बोलताना पाहून.  अर्थात पालकांचींही मराठी टिकवण्याची धडपड त्या मागे आहेच. त्यामुळे मुलांचं कौतुक आणि पालकांचे आभार!

या वर्षीच्या शेवटच्या दिवशी मुलांनी आपलं ’मराठी’ त्यांच्या आई - बाबांना दाखविलं.

पर्णिकाने देखील विनोदी किस्से सांगत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक.