Monday, November 21, 2016

आत्ता चोर आला होता!

खरंच! झालं काय मी मुलाशी फोनवर बोलत होते. नाटकाच्या नेपथ्याचं काम गॅरेजमध्ये चालू आहे म्हणून सायकली घराच्या पुढच्या व्हरांड्यात ठेवल्या आहेत. सोफ्यावर बसलं की व्हरांडा खिडकीतून दिसतो. एक तरुण मुलगा घराच्या दिशेने येताना दिसला. म्हटलं, आता हा दार वाजवेल. कुठलं काय तो सरळ सायकलींच्या दिशेने गेला. आमच्या तीन सायकली तो हात लावून पाहत होता.  मी फोनवर कुजबूजत्या आवाजात म्हटलं,
"थांब थांब कुणीतरी सायकल चोरतंय." मुलाला  ते नीट ऐकू जाईना. पण सायकली जायच्या आधी दार उघडणं भाग होतं.  तो मुलगा पटकन वळला.
"काय करतोयस?" मी ओरडून विचारलं.
"काही नाही." हे म्हणजे कुठल्याही प्रश्नाला माझी मुलं उत्तर देतात तसं वाटलं मला. शाळेत काय शिकवलं? ’काही नाही’ पद्धतीचं.
"काही नाही कसं?"
"माझी सायकल चोरीला गेली आहे. यातली कुठली माझी आहे  ते पाहत होतो." तो मुलगा म्हणाला.
"या आमच्या सायकली आहेत."
"तुम्ही चोर आहात असं नाही म्हणत मी." चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा खरा अर्थ त्या क्षणी मला समजला.
"सायकल तुझी नाही ना याची खात्री करायची होती तर तुला दार वाजवायला काय झालं?"
"चुकलं माझं." केसाची झुलपं उडवत तो तरुण मुलगा आला तसा निघून गेला.

आमचं हे संभाषण चालू असताना पुत्ररत्न फोन तसाच धरुन होते. थरथरत्या स्वरात मी  ’हॅलो’ म्हटलं. म्हणजे आताच एका चोराला मी पळवून लावलं होतं. हातापायाला कंप सुटलेला. पण खूश होते. चोर कसा पळाला मला घाबरुन म्हणून.
"अगं आई, तो चोर बाहेर होता तर तू माझ्याशी का कुजबूजत का बोलत होतीस?"
"त्याला ऐकू गेलं असतं ना?" मी कुजबूजले. अजून चोरातच गुंतले होते.
"त्याला कळायलाच हवं ना आता कुणीतरी आहे. तो गेला ना. बोल मोठ्याने आता." मुलगा खिजवल्यासारखा म्हणाला.
"बरं, बरं...अरे तुझ्याएवढा आहे. त्याची सायकल हरवली म्हणत होता." मला जरा त्या चोराचा कळवळा यायला लागला होता.
"माझ्या वयाचा आहे तर कॉलेज किंवा कामावर का नाही तो?"
"तू मलाच काय बडबडतोस. मी नाही विचारलं त्याला." माझी चिडचीड जाणवून त्याने समजूतीने घेतलं.
"आणि पोलिसांना फोन करते सांगायचं ना त्याला."
"आता गेला तो. दिसतोय. बोलवून सांगू का?"
"आई..."
"मग? कोणत्याही बर्‍यावाईट प्रसंगाला तुम्ही उपस्थित नसता. तू असा फोनवरुन भाषण देणार. तुझा बाबा समोर उभं राहून. सतराशेसाठ सूचना तुमच्या."

तेवढ्यात वरती नवर्‍याला काहीतरी गडबड झाली असावीच याचा अंदाज आला. थोडीफार वाक्यही ऐकली असावीत त्याने. तो धाडधाड खाली आला.
"तुला फोडणीला टाकल्यासारखा मी लागतोच का? जिथे तिथे माझं नाव घुसडवतेस. आणि  फोटो काढायचास ना त्याचा. पोलिसाना देता आला असता लगेच. लक्ष ठेवतात मग ते."
"सुचलं नाही. घाबरले होते. पण थांबा तुम्ही दोघं. तू फोनवर थांब तसाच. आणि तू तिथेच जिन्यावर राहा." एकाला समोर आणि एकाला फोनवर बजावलं. दोघंही स्तब्ध झाले.
"काय करायचा बेत आहे तुझा?" बापलेकाने एकाचवेळी तोच प्रश्न विचारला.
"मी धावत जातेय त्या मुलाच्या मागून. त्याला पुन्हा चोरी करायला बोलावते. मग एकाने पोलिसांना फोन करा, दुसर्‍याने फोटो काढा..."

चला, हे लिहून झालं. आता खरंच बघते तो मुलगा कुठपर्यंत पोचलाय :-)