Monday, January 9, 2017

सिद्ध

"तुला स्वत:ला सिद्ध करायला कधी मिळालंच नाही. आता हा प्रसंग म्हणजे संधी समज." तिची अगदी जवळची नातलग म्हणाली. दचकून तिने मुलांकडे पाहिलं. मुलांचं लक्ष नव्हतं की त्यांनी तसं दर्शविलं कुणास ठाऊक. ती मान खाली घालून अश्रू पुसत राहिली. "नवर्‍याने अचानक जगाचा निरोप घेणं ही आपल्यासाठी संधी?" तिला त्या नातलग बाईचा रागच आला. वेळ काळाचं भान ठेवत नाही माणसं. कुठे, काय बोलावं याचा काहीतरी पोच? पण त्या विधानाने तिच्या मनात घर केलंच. हळूहळू तिला तिचा नवरा खलनायक वाटायला लागला. तो तसा होता की नाही हा प्रश्न वेगळा पण तिचीच नातेवाईक त्याचं जाणं एक संधी म्हणून बघ म्हणतेय म्हणजे... आजूबाजूला सांत्वनाला आलेले काय बोलतायत याकडे तिचं लक्ष लागेना. आयुष्याचा पंचनामा मनातल्या मनात तिने सुरु केला. नवर्‍याने कधीही कोणत्याच बाबतीत अडवलं नव्हतं हेच तिला प्रकर्षाने जाणवलं. पण मग त्या नातलग बाईने असं का म्हणावं? आपल्याला स्वतंत्र ओळख नाही हे सुचविण्यासाठी? तिच्या मनाने कारण शोधण्याचा चंगच बांधला. त्याला दोष द्यायचाच तर तिला एक कारण मिळालंही. नवर्‍याने जसं कशाला कधी अडवलं नव्हतं तसं तिच्यातले गुण हेरुन प्रोत्साहनही दिलं नव्हतं. ते करायला हवं होतं त्यानं. तिचं विश्वच मुळी, त्यांना आवडतं, त्यांनी म्हटलं म्हणून, त्यांना नाही चालणार या भोवती होतं हे त्या बाईच्या वक्तव्यामुळे तिला ठळकपणे जाणवलं. तिने त्या बाईकडे पाहिलं. बाई उत्साहाने आजूबाजूच्या लोकांना नवरा गेल्यानंतर अवकाश सापडलेल्या स्त्रियांची उदाहरणं देत होती. काहीजणं ’अचानक’ गेलेल्या माणसांची यादी काढण्यात मग्न होती. तर काहीजणं हे असं ’अकाली’ जाणं कसा टाळता आलं असतं याचा उहापोह करण्यात. कानावर सगळं पडत होतं पण मनापर्यंत संधी या शब्दाव्यतिरिक्त काही झिरपत नव्हतं. स्वत:ला सिद्ध करुन पाहावं असं खरंच तिला वाटायला लागलं. पण काहीक्षणच. तिच्या त्या एका कृतीने तिचा नवरा खर्‍या अर्थी ’खलनायक’ झाला असता. नवरा गेल्यावर अवकाश सापडलेली स्त्री म्हणून तिची नवी ओळख निर्माण झाली असती. पण नवर्‍याच्या हयातीत तिने जसं सारं काही त्याच्यासाठी केलं तसंच पुन्हा एकदा करावंसं वाटायला लागलं तिला. नाहक नवर्‍यावर खलनायकाचा शिक्का बसू नये म्हणून गेलेल्या नवर्‍यासाठी स्वत:ला सिद्ध करायची संधी न साधण्याचं तिने निश्चित केलं. ------मोहना प्रभुदेसाई जोगळेकर