Monday, August 28, 2017

घटस्फोट

हल्लीच मी ठरवलं घटस्फोट घ्यायचा. इतरांनी काही केलं की मला पण तसंच करावंसं वाटतं. वाटलं घेऊन पाहू आपणही.  बाकीच्यांना जमतं मग मला का नाही हा प्रश्न मी स्वत:ला विचारते आणि लागते कामाला.  वरातीमागून घोडं होतं दरवेळेस. पण ठीक आहे नं, वरातीत शिरल्याशी कारण. तसंच हे घटस्फोटाचं. बाकीच्यांचे झाले पण माझा का होत नाही हे काही कळेना. खरं तर मी येता जाता म्हणतंही होते की मला घटस्फोट घ्यायचाय. नवराही तत्परतेने ’घे’ म्हणायचा. आता त्याने एखादी गोष्ट कर म्हटली तर त्याचा छुपा हेतू साध्य होईल असं मला वाटतं त्यामुळे त्याने सांगितलेलं कुठलंच काम मी लगेच करत नाही. पण माझ्या खूप मित्रमैत्रिणींनी घटस्फोट घेतल्यावर मला वाटायला लागलं की त्यासाठी फार गंभीर काही घडायलाच हवं असं नाही. आता मला हे कसं कळलं? आमचेच मित्रमैत्रिणी ते. प्रत्येकाने आपापली बाजू मांडलीच. बाजू ऐकल्यानंतर मला प्रत्येक पक्षाचंच बरोबर आहे हे पटलं. सगळी लक्षणं आमच्याच घरातली. फक्त या कारणासाठी घटस्फोट घ्यायचा असतो हेच मला ठाऊक नव्हतं याचं मला फार दु:ख झालं. सगळीकडे हे असं. सर्वात शेवटी राहते मी दरवेळेस.

अखेर मी पण ठरवलं, घटस्फोट घ्यायचा आणि आजच. येताजाता म्हटल्यासारखं न म्हणता मी अतिशय गंभीर चेहर्‍याने घरातला एक नवरा आणि दोन मुलं, एकूण तिनजणांसमोर उभी राहिले. माझा चेहरा पाहून तिघांनी मला खुर्चीत बसवलं आणि सगळे इकडे - तिकडे सटकले. मी काही बोलणार अशी शंका मनाला चाटून गेली की पळच काढतात ते. मी तशीच बसून राहिले. मग हळूहळू पुन्हा सगळे जमले.
"बरं बोल." मुलगा अगदी जीवावर आल्यासारखा म्हणाला.  मी घटस्फोट घेऊन तिघांच्या आयुष्यातील हिरवळ नष्ट करुन त्याचं वाळवंट करणार आहे याची मला कल्पना होती. आता वाटा वेगळ्या, दिशा वेगळ्या, रस्ते वेगळे त्यावर किती चालायचं ते आपण चालूच. कदाचित मी पुढे जाईन, तू मागे राहशील, दुसरीकडे जाशील, वाट चुकशील, परत येशील मला शोधत... काय होईल ते आताच कसं सांगता येईल? पण या वाटेवर मुलं जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा ती आपलीच हे लक्षात ठेवायचं. असं संवेदनशील भाषण मी तयार केलं होतं ते म्हणायचं होतं. पण त्या ऐवजी मी पुटपुटले,
"मला घटस्फोट हवाय." नजर चुकवायची होती. पण  अपराधी डोळे सर्वांवरुन फिरलेच. धक्क्याने नवरा कोसळला तर ही भिती सर्वात जास्त. पण कुणाच्याच चेहर्‍यावरचे भाव वाचता आले नाहीत कारण तिघांनी इतकी घट्ट मिठी मारली मला. त्या मिठीत विश्वाची आर्तता भासत होती. जीव तिळतीळ तुटायला लागला माझा. कुठून तो साडेचार अक्षरी शब्द उच्चारला असं झालं. तितक्यात तिघांनी एकदम म्हटलं.
"मला दे."
"मलापण."
"मी पहिला." नवरा कसा कोसळेल ते दृश्य मी बर्‍यांचदा चितारलं होतं मनासमोर पण मी कसं कोसळायचं? बरं झालं बाई, सर्वांच्या मिठीचा आधार होता. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आतापर्यंत माझ्या कुठल्याच कल्पनेला मिळालेला नव्हता. उपाशी माणसाला खायला मिळाल्यासारखं झालं की हे. मराठीशी काही संबंधच उरलेला नाही कुणाचा हे  माझ्या लक्षात आलं. divorce न मागता मी जुनापुराणा ’घटस्फोट’ शब्द वापरल्यामुळे हा इतका गोंधळ? मी गडबडीने म्हटलं
"अरे बाळांनो, मी divorce म्हणतेय."
"कळलं की ते. divorce म्हणजे घटस्फोट. ठाऊक आहे." लेकीने मला समजावलं.
"मग तिघंही काय मागताय तेच? मी फक्त तुमच्या बाबाला देऊ शकते घटस्फोट." दोघा मुलांचे चेहरे एकदम पडले. त्यांचे केविलवाणे चेहरे पाहिले की मला राहवत नाही. मागतील ते देऊन टाकते मी.
"बरं, दिला तुम्हालाही घटस्फोट. खूष?" मुलांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. मुलगी म्हणाली,
"मी तुला तेच सांगणार होते. तडजोडीने झालेलं बरं. हल्ली मुलं देतात अगं आई - बाबांना घटस्फोट. नाहीतर सरळ न्यायालयात जातात."
"न्यायालयात?" मला कळेचना.
"कोर्ट गं." पुन्हा लेकीने समजावलं. एकंदर लेक माझ्यापुढे जाणार अशी लक्षणं होती. वरातीमागून घोडं नव्हतं तिचं. कारण ती पुढे म्हणाली,
"अनायसे तू आम्हाला देते आहेस घटस्फोट. कसं वाटतं ते बघू. मग बाबाला पण द्यायचा का ते ठरवू आम्ही."

तिचा बाबा लगेच कागद, पेन घेऊन सरसावला. त्याचे डोळे भरुन आले आहेत असं मला वाटलं पण त्याच्या अंगात उत्साह संचारला होता. त्याने इतक्या भराभर घटस्फोटाची रुपरेषा माझ्यासमोर ठेवली की तो वर्षानुवर्ष तयारीतच असावा.
"अगं गरज पडलीच तर म्हणून गूगल करुन ठेवलं होतं. आणि आपले मित्रमैत्रिणी. तशी भरपूर माहिती जमवली आहे. घे. तुला उपयोगी पडेल."
"मला का?"
"घटस्फोट तुला घ्यायचाय ना?"
"पण तू दे ना मला घटस्फोट." ती रुपरेषा बघूनच माझं घोडं परत मी मागेच ठेवलं.
"छे. मी नाही. तूच दे." जेवायला वाढताना आग्रह करतात तसा आम्ही एकमेकांना करत होतो. मग त्यावर एक जंगी चर्चा झाली. मी माझा नूर आता किंचित बदलला.
"इतक्याजणांना एकाचवेळी घटस्फोट देणं म्हणजे खूप काम पडेल मला. एकाही कामात तुमची कुणाची मदत नसते मला. जर तुमच्या तिघांपैकी कुणी मदत करणार असेल तरच हे काम मी करेन. नाहीतर बसा नेहमीप्रमाणे पंचवार्षिक योजना राबवत." मला माझ्या अंगावर पडलेलं काम टाळायचं असेल तर जो पवित्रा मी घेते तोच पुन्हा घेतला आणि आमच्या घरातलं आणखी एक काम लांबणीवर पडलं. - मोहना

Wednesday, June 21, 2017

प्राणी

मी स्वयंपाकघरात सभा बोलावली. आधी शुकशुकाटच होता. पण  भाषणाचा आवाज नरसाळ्यातून येतो तसा यायला लागल्यावर इथे बसायचं तर तिथे असा विचार झाला असावा. बरीच गर्दी जमली. ३ माणसं आकाश कोसळल्यासारखा चेहरा करुन समोर उभी राहिली. मी जाहिर केलं.
"मी गाय पाळणार आहे." सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सभेतले २ सदस्य नेहमीप्रमाणे तोंडात मीठाची गुळणी धरुन होते. स्त्री सदस्य फारच आगाऊ होती. ती अगदी पटकन माझ्यासारखंच म्हणाली,
"घरातले प्राणी कमी पडतायत वाटतं. हे कसलं अचाट खूळ?" ती माझा वारसा चालवते त्यामुळे ’आगाऊ’ न म्हणता तिच्या उर्मटपणाचं मी कौतुक केलं."
"नशीब, तुला तरी कळलं मानव प्राण्याला सांभाळणं किती कठीण आहे."
"मग आता तू  गाय नावाच्या प्राण्याला का पाळणार आहेस? आधी आम्हाला नीट पाळ." परत आगाऊ स्त्री सदस्य.
"पण आम्हाला पाळायला तुला कुणी सांगितलं?" कनिष्ठ सदस्य रुसक्या स्वरात म्हणाला.
"आता आणलं घरात तर पाळायलाच हवं ना?" मारक्या म्हशीसारखं मी ’वाक्य’ उगारलं. वरिष्ठ सदस्य नेहमीप्रमाणे शांततेचं धोरण स्वीकारत विचारता झाला,
"पण तुला आता गाय का पाळायची आहे? दूध असतं की घरात." खरंतर ते सगळे दुधावरच जगतात. म्हणजे खायला काही नाही, खायला काही नाही, या घरात काही नसंतच असं पुटपुटत फ्रिज उघडतात. तिथे फक्त दुध असतं. बूच उघडून तोंडात धार धरली की झालं. आता गाईच्या आचळाखाली कसं तोंड लावणार? इतकं सहजसाध्य, सकस अन्न नाहिसं होणार हे लक्षात आल्यावर सभेतून प्रश्न यायला लागले.
"गाय का पाळायची? तिचं दुध कोण काढणार? आम्ही उपाशी मरायला लागलो की दुध पितो. तिने तू काही करत नाहीस तसंच दूध न देण्याचं धोरण स्वीकारलं तर आम्ही काय करायचं?" इतक्या प्रश्नांना मी एका वाक्यात उत्तर देऊन धुळीला मिळवलं.
"विकतच्या गायीच्या दुधात माशाचं तेल मिसळतात असं कळलंय नुकतंच." सभेतून वेगवेगळे चित्कार उमटले.
"पण म्हणून इतकं टोक गाठायचं?" आगाऊ स्त्री सदस्य म्हणाली.
"मग? एक दिवस दूध बाजूलाच, नुसतंच माशाचं तेल प्यायला लागाल." मला गाय पाळण्याच्या बेतावर आता पाणी पडू द्यायचं नव्हतं.
"पण दूध काढणार कोण गाईचं?" वरिष्ठाने कालच कोंबडी मारली होती. आता रोज दूध काढायच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा आला.
"ते बघू नंतर." कधी नव्हे तो वर आलेला आवाज दाबून टाकला मी.

तेवढ्यात मागच्या अंगणातून खिडकीतून कुणीतरी डोकावलं. सर्व सदस्याच्या माना तिकडे वळल्या.
"कोंबडा - कोंबडी ऐकतायत." वरिष्ठ म्हणाला.
"आईच्या भाषणाला तिने पाळलेली सगळी येतात." कनिष्ठ कौतुकाने माझ्याकडे बघून म्हणाला. तेवढ्यात घोड्याने दारातून आत पाहिलं. आगाऊ सदस्य फुत्कारली.
"हा अन्याय आहे आमच्यासारख्या पाळीव प्राण्यांवर."
"काय गं ए ठके. अन्याय कसला? आम्ही आया मुलांना सकस अन्न मिळावं म्हणून रक्त आटवतो आणि तुमच्या जीभा नुसत्या वळवळतात सापासारख्या." मी भाषण ठोकतेय हे विसरले. पण ती सभेलाच आली होती. ती ओरडली.
"नीट करा भाषण. अंडी फेकू का?" सभेतल्या समस्त २ जणांनी टाळ्या वाजवल्या.
"कोंबड्या पिंजर्‍यात ठेवतात त्यामुळे त्यांची अंडी, मांस सकस नसतं. म्हणून आपण कोंबड्या पाळतो." मी मृदू आवाजात म्हटलं.
"गाड्या वेळेवर येत नाहीत म्हणून घोडा." आता सभेला तोंड फुटलं.
"हरिण आणि ससे आपलेआपणच या प्राण्यांना भेटायला येतात."
"आणि सतत आपण त्या सर्व प्राण्यांपेक्षा ’सरस’ आहोत हे सिद्ध करत राहावं लागतं. नाहीतर तुमच्यापेक्षा हे प्राणी बरे असं ऐकवतेस तू." आता सभेतलं नक्की कोण बोललं ते समजेनासं झालं होतं.  ’सभे’ चा तोल ढळलाच. वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्य़ांना ऊत यायला लागला. आता सभेत गोंधळ माजणार अशी चिन्ह दिसायला लागली. बाहेरचे प्राणीही पाय हलवून गोंधळ बघायला मिळाला म्हणून नाचत होते. त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला मी सभेतल्या ३ जणांना दार उघडून पाठवून दिलं.

तिघंही सभेतून सुटल्याच्या आनंदात घोडा, कोंबडी, हरिण, ससा या प्राण्यांमध्ये रमले. तेवढ्यात जोरात चित्कार ऐकू आला. मी माझं तोंड काचेला लावलं होतं ते दचकून बाजूला झालं. कोणत्या प्राण्याने कुठल्या प्राण्याला काय केलं ते पाहायला मी दार उघडून बाहेर धावले. सगळ्या प्राण्यांची नजर कुठेतरी लागली होती. मी पुढे होऊन पाहिलं. ॲमेझॉन वरुन मी मागवलेली गाय ड्रोनने खाली उतरत होती. शेजारपाजारचे मानवप्राणी आणि आम्ही पाळलेले प्राणी सारेच एकत्र गोळा झाले आणि ड्रोन मधून उतरलेल्या गायीचं स्वागत करायला पुढे धावले. प्राण्यांची सभा आता खरंच मस्त रंगली! - मोहना


Friday, June 16, 2017

नाट्य: घडवू ते!

साल: कितीतरी वर्षांपूर्वी. स्थळ: अमेरिका, पात्र:  मराठी माध्यमात शिकलेली नवविवाहिता,  नाट्य: घडवू ते!

कोकाट्यांच्या ’फाडफाड इंग्लिश बोला’ मधून मी बाहेर पडले ते थेट अमेरिकेत उतरले. नवर्‍याच्या कमाईवर जिंदगी घालवणं म्हणजे इज्जतीचा फालुदा म्हणून त्याच्याच पैशांनी स्वावलंबी होण्यासाठी  कॉलेजात नाव दाखल केलं. कॉलेजला निघताना नवर्‍याने खात्री केली,
"पंधरा दिवस रोज टी. व्ही. बघत होतीस ना?"
"हो, काय बोलतात ते समजतंय आता." नुकतंच लग्न झाल्यावर त्या काळात मुली लाजत असत म्हणून मी लाजत लाजत उत्तरले.
"पण बोलून पाहिलंस का त्यांच्यासारखं?"
"तोंड खूप वाकडं केलं की येतात उच्चार त्यांच्यासारखे. मी सांभाळेन. काळजी करु नकोस." त्याच्या डोळ्यातली माझ्या इंग्रजीबद्दलची काळजी मी माझ्या मधाळ स्वराने अलगद दूर केली.
"लक्षात ठेव, आधी चायनीज, जापनीज, मेक्सिकन....शेवटी अमेरिकन." एकेक देश ’बोलून’ जिंकायचा होता. त्याने क्रमवारी लावली. मी पण तसंच करायचं ठरवलं. दिवस नवीन लग्नाचे, नवर्‍याचं सारं काही ऐकायचे होते.

"तुझं नाव काय?" मी उत्साहाने चायनीज बाई पकडली.
"हॅ" ती म्हणाली. अशी काय ही? मी नाव विचारलं तर हॅ म्हणून उडवून लावायचं? नम्रता म्हणून नाही भारतीयांसारखी!
"तुझं?" तिने विचारलं.  माझी ट्युबलाईट पेटली. हीचं नाव  "हॅ" आहे तर.
मग हॅ आणि मॅ  बोलायला लागल्या. तिने तिचं नाव ’हॅ’ सांगितलं म्हणून मी माझं ’मॅ’. प्रसंगावधान! असं करावं लागतं तरच जिंकता येतं.  इथे येताना ऐकलं होतं की संजयचं ’सॅम’, देवदत्तचं ’डेव’ करतात. म्हटलं, ’हॅ’ साठी मी ’मॅ’. मग मी तिच्याकडे उगाचच उल्हासनगरचा माल डोळ्यासमोर नाचत असूनही चायनाबद्दल चौकशी केली तर व्हिएतनामी असल्यामुळे त्या बद्दलच बोलायला आवडेल असं हॅ म्हणाली. बराचवेळ  आम्ही दोघीही मंडईत भेटल्यासारख्या तावातावाने बोलत होतो. कळत कुणाचंच कुणाला नव्हतं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.

त्यावेळेस जी आमची मैत्री झाली ती कॉलेजमध्ये परीक्षेच्या वेळेस निम्मा, निम्मा अभ्यास करण्यापर्यंत पोचली. १०० प्रश्न दिलेले असायचे. त्यातलेच येणार. ती ५० मी ५० अशी वाटणी करुन टाकायचो. तितकीच उत्तरं पाठ करायची. उगाच डोक्याला ताप नाही. बाजूला बसून मी माझे ५० झाले की कागद तिच्याकडे सरकवायचे ती तिचा माझ्याकडे. नुसते गोल तर काळे करायचे. शाळेत कधी न केलेले (किती खोटं ते) प्रताप करायला मजा येत होती.  या काळात माझ्या लक्षात आलं की इंग्रजीचा आत्मविश्वास वाढवायचा तर कोकाटे वगैरे क्लासेसना जायची आवश्यकताच नाही. दुसर्‍या देशातल्या माणसांशी बोलायला सुरुवात करायची. बोलायचं, बोलायचं, बोलायचं. त्या व्यक्तीला कळलेलं काहीच नसतं. त्या व्यक्तीचं आपल्यालाही काही कळलेलं नसतं. पण ’बोलणं’ कुणी सोडलेलं नसतं. असंच तर शिकतो ना आपण!

तर ’हॅ’  आणि मी ज्या वर्गात बसायचो तो आमचा शिक्षक पहिल्याच दिवशी म्हणाला,
"नाऊ गो टु सवस."  हा इथिओपीयन माणूस कुठे जायला सांगतोय ते कळेचना. मी सवसला न जाता त्याच्याकडे बघत राहिले. तो सगळ्यांकडे बघत होता. बरेचजण त्याच्याकडे बघत आहेत हे लक्षात आल्यावर सवयीने  त्याने ’सर्वर’ असं फळ्यावर लिहून टाकलं.  मला त्याचं इंग्रजी तिथेच कळलं. मग वर्ग संपल्यावर  मी खूष होऊन त्याच्याशी बोलत राहिले. तो माझ्याशी. आपलं आपण बोलायचं. कळावं अशी काही सक्ती नव्हतीच, कुणाचीच कुणावर. सराव महत्वाचा!

एव्हाना, चायनीज, इथिओपीयन माणसं ’सर’ केली होती. मी खूष होते. मी खूष होते म्हणून नवरा खूष होता. तो म्हणाला,
"छान जम बसतोय. आता मेक्सिकन झाला की गोरा माणूस. मग संपलं. जगात कुठेही गेलीस तरी मराठी माध्यम म्हणून अडणार नाही तुझं." मेक्सिकन कुठे भेटणार ह्या काळजीत होते तेवढ्यात अगदी योग आलाच जमून. शोधायला लागलंच नाही फार. म्हणजे झालं काय, घरात काहीतरी दुरुस्ती करायची होती. ती करायला आला तो. आला तोच बादली घेऊन. म्हटलं, असेल  याची वेगळी पद्धत. मी त्याला काय दुरुस्त करायचं ते दाखवलं. तो मराठी बोलल्यासारखं इंग्रजी बोलायला लागला. मला वाटलं हे मराठीच आहे म्हणून मी मराठीच बोलायला लागले त्याच्याशी. त्याला ते इंग्लिश वाटलं. एकमेकांना काहीतरी नक्कीच समजलं. तो खाली बसला आणि बराचवेळ काहीतरी पुसत राहिला. मी ते बघत. वाटलं, आधी हे पुसून मग खणणार आहे की काय? पुसलं, पुसलं आणि म्हणाला ग्रासियास. काहीतरी गोंधळ होता. मग मी त्याच्याशी खर्‍या इंग्रजीत चार वाक्य बोलले ती कळायला त्याला अर्धा तास लागला. मग आम्हाला दोघांनाही कळलं की तो शेजारच्या घरात जाण्याऐवजी माझ्या घरात आलाय. चुकून!

पण नवर्‍याने दिलेला अभ्यास मी प्रेमाने चुकतमाकत का होईना जवळजवळ पूर्ण केला होता. चायनीज, जापनीज ऐवजी इथिओपीयन आणि मेक्सिकन. आता जायचं होतं गोर्‍या लोकांशी बोलायला.... इतका आत्मविश्वास वाढला होता ना की नवर्‍याला म्हटलं,
"आण रे एखादा गोरा. फाडतेच माझं इंग्रजी. जय कोकाटे क्लास." नवरापण मी सांगितलेल्या माझ्या इंग्रजीच्या कहाण्यांवर जाम खूष होता. तो म्हणाला,
"अगं रस्त्यात दिसतात की. गाठ कुणीही. ही माणसं आपल्यासारखी माणूसघाणी नसतात. छान हसून बोलतात. जा आत्ताच बोलून ये."  रविवार होता. नवर्‍याला ताणून द्यायची असेल म्हणून त्याने मला घालवलं होतं. हे आता कळतंय. लग्न जुनं झाल्यावर. तेव्हा वाटलं होतं, किती प्रेम गं बाई ते. मी त्याच्या सुचनेनुसार लगेच गेले रस्त्यावर. जो पहिला पुरुष दिसला त्याला पकडलं. बोलायला! माझं नेहमीचं तंत्र वापरलं, बोलत राहायचं, बोलत राहायचं.... त्याने शांतपणे ऐकून घेतलं. मला वाटलं आता तो बोलेल, बोलेल, बोलेल....पण तो म्हणाला,
"से इट अगेन..." आता इतकं सारं अगेन कसं से करायचं? मी थॅक्यू, थॅक्यू करुन धावत सुटले.

घरी आले. नवरा झोपला होता. त्याला गदागदा हलवलं. म्हटलं,
"अरे, तो गोरा काय बोलला ते समजलं मला! जिंकली, सगळी माणसं जिंकली!" नवर्‍याने त्याचा आनंद व्यक्त करायला प्रेमाने  जवळ घेतलं आणि रविवार दुपारची वामकुक्षी पुरी करायला तो पुन्हा घोरायला लागला!

Tuesday, June 13, 2017

आडनाव

काल एका मासिकाच्या संपादकांनी म्हटलं की माझं आडनाव फार मोठं आहे. प्रभुदेसाई जोगळेकर. एक निवडा.  मी निवडायला बसले. बरोबर नवर्‍याला पण बसवलं.
"मला एक आडनाव उडवायचं आहे."
"उडव." तो नेहमीसारखंच न ऐकता उत्तरला.
"कुणाला?"
"उडव गं कुणाला पण." जास्तीत जास्त मी पतंग उडवेन अशी खात्री असावी त्याला.
"तुला उडवते." आता मात्र त्याने दचकून मग गोंधळून पाहिलं.
"आडनाव उडवायचं आहे." ’तुझं लक्ष नसतं, ऐकतच नाहीस’ इत्यादी गिळून टाकत मी मुद्यावर थडकले.
"जोगळेकरांना उडवते आहेस का? प्रभुदेसायांना उडव ना." काय बाई ते धाडस या पुरुषाचं असं करुन मी त्याला ’लुक’ दिला. तो गडबडीने म्हणाला,
"बरं उडव जोगळेकरांना."

मग मी जोगळेकरांना उडवलं. संपादकाना सांगितलं, प्रभुदेसाईच ठेवा. ते म्हणाले,
"पण तुमचं माहेरचं आडनाव काय आहे?"
"प्रभुदेसाई."
"मग तुम्ही प्रभुदेसाई जोगळेकर असं लावत होता ते बरोबर नाही. जोगळेकर प्रभुदेसाई असं पाहिजे." एकीकडे एकच आडनाव निवडा म्हणतात दुसरीकडे  ती एकत्र कशी पाहिजेत ते सांगतात असं मनातल्या मनात पुटपुटत मी त्यांना इतक्या वर्षांचा माझ्या मनातला गोंधळ सांगितला.
"मी लहान होते ना तेव्हा वसुंधरा पेंडसे नाईक असं नाव वाचायचे सर्वत्र. त्या काळात इतकं लांबलचक आडनाव एकच ठाऊक होतं. तेव्हापासून अशी दोन आडनावं एकत्र करुन मला लावायची होती. त्यासाठी लग्न करावं लागतं असं आई म्हणाली. मग मी लग्न केलं. पण ती आडनावं कशी लावायची ते कुणालाच ठाऊक नव्हतं त्यामुळे झालं असेल."
"अच्छा" त्यांनी म्हटलं. मग मी म्हटलं,
"आणि तसंही निदान नावात तरी मी नवर्‍याला कुरघोडी करु दिली नसती. ठिक आहे प्रभुदेसाई जोगळेकरच."
"तुम्ही काय स्त्रीमुक्ती वाल्या आहात का?" त्यांनी विचारलं.
"छे हो. ती अवघड मोहीम. मी फक्त मला मुक्त करत असते." ते पुढे काही बोलले नाहीत. मग मीच म्हटलं.
"आणि आता मला ना फक्त मोहना विरेन असं लावायचं आहे. आडनाव गुलदस्तात ठेवायचं. मग कसली उत्सुकता वाढते हो लोकांची आडनाव काय असेल त्याची. आपण काय लिहिलं ते वाचतंच नाहीत. फक्त आडनावावर विचार करत राहतात."
"तुम्हाला आईचं, वडिलांचं, नवर्‍याचं अशी सर्व नावं नाही का वापरावीशी वाटत?" आज ’आडनाव’ घेऊनच बोलत होतो आम्ही.
"नाही हो, आठवत नाहीत इतक्या सर्वांची नावं. दरवेळी लिहिताना क्रम चुकेल अशी पण भिती वाटते मग."
"इतकं काय काय लिहित असता..." माझं लेखन त्यांना वाचावं लागतं याबद्दलची नाराजी दर्शवलीच त्यांनी. काणाडोळा करत मी म्हटलं,
"नाही ते वेगळं. ते काय शब्द सांडतात. इथे नाव, आडनावांचा मामला आहे."
"बरं तर, मग जोगळेकरांना उडवताय ना नक्की."
"हो, हो. प्रभुदेसाईच ठेवा. नाहीतर असं करु या, यावेळेस दोघांनाही उडवा. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला माझं नवीन नाव कळवते." ते बरं म्हणाले. मी डोकं खाजवलं, दहावेळा चष्मा पुसला आणि एक आडनाव तयार केलं. म्हटलं, जोगळेकर प्रभुदेसायांची रत्नपण आता नावात आलीच पाहिजेत. हाय काय नी नाय काय.

मोनाविनजोगसाईपकात्विक!

Tuesday, May 30, 2017

पाखरु

सकाळी, सकाळी,
दूर गावाहून पिल्लं आली!
पक्ष्यांच्या घरट्यात
किलबिलाटाची घंटा किणकिणली!
किती दिवसांनी पाखरं परतली
आई - बाबांची धांदल उडाली!
आवडते घास देण्याची घाई झाली
सहवास, गप्पांची लयलूट जाहली!
सुखदुःखांची, स्वप्नांची
मांदियाळी झाली!
स्वप्न पाखरांच्या मनातली
भरारीसाठी आतुरली!
कोरली मनात पाखरांची छबी
निरोपाची घटीका जवळ आली!
किलबिलाटाची घंटा विसावली
वाजेल ती पुन्हा कधीतरी सकाळी! - मोहना

Friday, May 12, 2017

मदर्स डे

परवा लेकीने विचारलं,
"तू माझी मैत्रीण आहेस की आई?"
"दोन्ही."
"नाही. मला एकच उत्तर हवंय. पटकन सांग ना. पटकन, पटकन." तिच्या ’पटकन’ गाण्याला खीळ घालत मी म्हटलं.
"मैत्रीण." तिने आनंदाने उडी मारली. माझ्याही मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. नाही म्हणजे, आमच्या आईच्या वेळेस आई ही ’आई’ च असायची. त्यात ती खूशही असायची. पण माझ्या वेळेस, आम्हा सर्व तमाम आयांना मुलांची मैत्रीण बनण्यात जास्त रस होता. त्यामुळे मी मुलीची ’मैत्रीण’ आहे याचा दाखला तिने अत्यानंदाने उडी मारुन दिला तसं मी मीही मनातल्या मनात उडी मारली. खरं तर मी मैत्रीण म्हणजे मी पण तिच्यासारखीच, तिच्याबरोबर उडी मारणं हेच खर्‍या मैत्रीचं लक्षण. पण माझ्या उडीची तिला लाजच वाटते आणि मैत्रीण असले म्हणून काय झालं? झेपायला पाहिजे ना आता उड्या मारणं. तर म्हणून मी मनातल्या मनात उडी मारली.  माझी मैत्रीण गं, मैत्रीण गं म्हणत तिचे गालगुच्चे घेतले. तिने माझे दोन्ही हात झटकले.
"मैत्रिणी असं नाही करत गं." तिचं नाक मुरडलं गेलं, कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं.
"तुझ्याबरोबर ही भूमिका बदलण्याची तारेवरची कसरत करते ना मी, त्यामुळे होतो गोंधळ." मी पुटपटले. तिकडे दुर्लक्ष करत तिने विचारलं.
"तुझ्या उत्तरावर ठाम आहेस ना? सारखं उत्तर बदलता येणार नाही." ती खुंटा बळकट करते आहे म्हणजे ही काहीतरी प्रचंड ’चाल’ आहे हे लक्षात न यायला मी काय तिची मैत्रीण होते? माझ्यातली ’आई’ जागी व्हायला लागली. मी रोखून तिच्या डोळ्यात पाहायला सुरुवात केली. मुलांची लबाडी डोळ्यात दिसते म्हणतात ना? पण चोरांनाही चोरी कशी लपवायची हे तंत्र जमलेलं असतं. तिने साळसूदपणे डोळ्यातून ’मैत्रिणी’ बद्दलचं प्रेम वाहील याची दक्षता घेतली. आता मी आई की मैत्रीण याबाबतीत जरा गोंधळच सुरु झाला माझ्या मनात.
"आई मैत्रीण होऊ शकते. पण ती आईच असते." मी काय बोलले ते माझं मलाही कळलं नव्हतं. पण लेकिचा एकच नारा चालू.
"बघ, नक्की ठरव. तू माझी आई आहेस की मैत्रीण? सगळं तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे. दहा सेकंद."  आता  १० सेकंद पटकन संपतील याचं दडपण आलं. विचार करायचा म्हणजे येरझार्‍या, कपाळावर आठ्या, डोकं खाजवणं..., ते सगळं करत १० सेकंदावर नजर ठेवत कुठल्या उत्तराने काय फायदे - तोटे आहेत याचा हिशोबही केला. मल्टिटास्किंग!
"मैत्रीण." १ सेकंद उरला असताना उत्तरले. मैत्रीण उत्तरच बरं वाटलं. हे कसं, सांगायला बरं पडतं. आई काय कुणीही होतं. मैत्रीण! भारीच की. मुलीने तिसर्‍यांदा आनंदाने उड्या मारल्या आणि तिच्याबरोबर उड्या न मारण्याचा निर्णय बरोबर होता याचा मला आनंद झाला. त्या निर्णयाचा आनंद साजरा करत मी म्हटलं,
"मी ना माझ्या मैत्रिणींना नेहमी सांगते की माझं नातं माझ्या मुलांशी अगदी मैत्रिणीसारखं आहे. आमच्यात मनमोकळा संवाद असतो." इतका वेळ तटस्थासारखे बसलेले पुत्रोजी जागे झाले.
 "काही पण सांगतेस आई तू तुझ्या मैत्रिणींना."
"म्हणजे?"
"तुला खरंच वाटतं कॉलेजमध्ये  होतो तेव्हा तुला सगळं म्हणजे अगदी ’सगळं’ सांगत होतो?"
"हो. तूच तर म्हणायचास." तो जोरजोरात हसायला लागला.
"तू आजीला सांगायचीस सगळं?"
"पण ती माझी आई आहे. आईला कुठे कोण सांगतं सर्व?"
"मग? तू पण माझी आधी आईच आहेस." तो काय म्हणाला हे कळेपर्यत लेकीने पुन्हा सुरु केलं.
"तर तू म्हणालीस की तू मैत्रीण आहेस माझी. हो. नं? हो म्हण, हो म्हण." आता दोघंही गळ्यात पडले.
"हो." साशंक स्वरात मी पुटपटले.
 दोघांनी उड्या मारल्या. लेकीची चौथी उडी. एकमेकांना टाळी देत दोघं एकदम म्हणाले,
"मदर्स डे साजरा करायला लागणार नाही!"  साक्षात्कार झाल्यासारखा मी माझा पवित्रा बदलला.
"नाही, नाही त्या दिवशी मी ’आई’ असेन." सकाळी सकाळी आयता मिळणारा नाश्ता, कुरकूर न करता वेळच्यावेळी केली जाणारी कामं, शुभेच्छा पत्र, फुलं, भेटवस्तू, छानशा रेस्टॉरंट मधले पदार्थ असं बरंच काही डोळ्यासमोर नाचलं.
"टू लेट गर्ल, टू लेट." गर्ल? मी मुलाकडे डोळे वटारुन पाहिलं.
"तू मैत्रीण आहेस आमची. गर्ल म्हटलं तर काय झालं?" मुलीने भावाची बाजू उचलली आणि काम फत्ते झाल्याच्या आनंदात दोघं उड्याच उड्या मारत राहिले.

Tuesday, May 9, 2017

पेरुला चला!

"विमान कंपन्यांचा ताबाच घेते आता मी." लालबुंद चेहर्‍याने मी जाहीर केलं.
"कशाला?" तितक्याच शांतपणे नवरोजींनी विचारलं.
"त्यांना सुधारायला." धुसफुसत मी उत्तर दिलं. मुलगा  विनोद झाल्यासारखा खो खो हसला.
"बाबाचा ताबा तुझ्याकडेच आहे की. तो कुठे सुधारला?"
"प्रयत्नांती परमेश्वर बाबा, प्रयत्नांती परमेश्वर." लेकराच्या विधानाने गहिवरलेच मी. माझं दु:ख पोटच्या मुलाने जाणलं होतं. मी लगेच माझा मनसुबा खुला केला.  "तुझ्या बाबांच्या बाबतीत करतेय तेच विमान कंपन्यांच्या बाबतीत.  सुधारण्याचा प्रयत्न. वेळा पाळायला शिका म्हणावं. रद्द करतात विमानं. पेरुला निघाले होते. बसते आता घरीच पेरु खात."
"कसले पी. जे. करतेस गं. आणि पेरु नाही परु." माझ्या शब्दांच्या विमानाला लेकीने खीळ घातली.
"pe पे, ru रु. पेरुऽऽऽ. मला माझं ब्रिटीश इंग्रजी सोडायला लावू नकोस." ब्रिटीश इंग्रजीच्या ढालीकडे दुर्लक्ष करत मुलांनी बॅगेकडे मोहरा वळवला.
"आई, जरा कमी कपडे घे. परु तुला नाही बघणार. तू परु बघायला चालली आहेस." नवर्‍याने भले शाब्बासचा कटाक्ष मुलाकडे टाकला.
"फेसबुकवर फोटो टाकायचे असतात. एकाच कपड्यातले किती काढणार?" एवढंसुद्धा कसं कळत नाही असा चेहरा करुन मी उत्तरले.
"तू तुझे फोटो पोस्ट करणार आहेस की परुचे?" मुलगा फीस करुन हसला आणि सूड म्हणून मी दोन चार कपडे अजून कोंबले. मुलाच्या हातात बॅग सोपवली आणि अखेर पेरुला पोचलो.

एक वर्ष, आठवड्यातून एक तास शाळेत शिकलेल्या स्पॅनिशच्या बळावर लेक स्पॅनिशवर प्रभुत्व मिळवल्यासारखी स्पॅनिश  फाडायला सज्ज झाली. आम्ही आमच्या फोनमधल्या गुगल भाषांतरकाराला तयारीत राहायला सांगितलं. पण पेरुकर आम्हाला परके मानायला तयारच होईनात. रंग, रुप सारं एकच आणि स्पॅनिश न बोलता habla English, habla English का करतोय तेच त्यांना कळेना. महाराष्ट्रीयन लोकांना इंग्रजी फाडताना पाहिलं की माझा चेहरा होतो तसा त्यांचा होत होता.
"तू नो सबेस एसपॅनोअल?" काय बोलतायत ते नाही समजलं तरी, ’मेल्यांना मातृभाषेचं वावडं, फोडून काढायला पाहिजे’ इत्यादी भाव त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत. आपल्यातलं कोण स्पॅनिश दिसतं म्हणून आमच्या नजरा एकमेकांवर रोखल्या जात. मग चौघातलं कुणीतरी घाईघाईत पुढे सरसावायचं,
"वुई इंडियन, वुई इंडियन....यू नो ताजमहाल, करी, बॉम्बे नाऊ मुंबाय...." अख्ख्या देशाचं चित्र एका वाक्यात उभारायची घाई उडायची. ते देखील पूर्ण वाक्य न बोलता एकेक शब्द, हातवारे पद्धतीने. यामुळे समोरच्याला न येणारी भाषा येऊ शकते हा पक्का समज काही क्षणातच त्याच  वेगात स्पॅनिश बोलून समोरचा  खोडून काढे. कोण, काय बोलतंय, सांगतंय याचा कुणालाच ताळमेळ लागत नाही म्हटल्यावर हातातले फोन कार्यरत.  ’गुगल ट्रान्सलेटर’ एकमेकांशी ’संवाद’ साधायला लागायचे.  ती यंत्र तरी मेली धड कुठे बोलतात. एका यंत्राचं बोलणं दुसर्‍या यंत्राला कळत नव्हतं.
"ही यंत्र म्हणजे आपल्या दोघांसारखी आहेत." न राहवून मी नवर्‍याला म्हटलं. नवर्‍याने आधी गडबडून नजर टाकली माझ्याकडे. मला काय म्हणायचं आहे हे लक्षात आल्यावर त्या नजरेचा त्याने रागीट कटाक्ष केला. पण स्पॅनिश माणसाची ही गोड बाई काय बोलली याबद्दलची उत्सुकता चाळवली असावी. यंत्रावर लिहून, हातवारे करत, ओठ हलवत तो विचारत राहिला. मी माझं यंत्र काढलं, मंजूळ आवाजात बोलणं ध्वनिमुद्रित केलं. स्पॅनिश मध्ये कधी नव्हे ते नीट भाषांतरही झालं असावं कारण स्पॅनिश माणूस खो खो हसला.
"आमच्या देशात पण असंच असतं. " त्याने उत्साहाने यंत्राकरवी माझ्यापर्यंत त्याचा आनंद पोचवला. लेक गोंधळली.
"गुगल ट्रान्सलेटर नवरा- बायकोसारखे कसे असतील?"
"अगं आहेत. तुझ्या बाबाला नाही का मी विचारते एक आणि तो उत्तर दुसरंच देतो. तसंच आहे या यंत्रांचं." स्पॅनिश माणसाला झालेल्या आनंदाने मलाही उकळ्या फुटत होत्या.

पेरुत असेपर्यंत हे असंच चालू होतं. मुखदुर्बळ नवरोजी यंत्राद्ववारे संभाषण साधण्यात इतके रमले की नंतर नंतर तर  इंग्रजी येणार्‍या माणसासमोरही स्पॅनिश फाडायला लागले. त्याच्याबरोबर आम्हीही. आमचं वेगवान स्पॅनिश झाल्यावर ’प्लीज स्पीक इंग्लीश’ असं ऐकलं  की स्पॅनिशचा धुव्वा उडाल्यासारखं वाटायचं. एका वाक्यासाठी लागलेली पाच मिनिटं धारातीर्थीच पडायची.  आमचं वाक्य एकच असायचं, मग पाच मिनिटं कशी लागायची? समोरच्याला समजत नाही म्हटल्यावर एकच वाक्य आम्ही चारही जण वेगवेगळे उच्चार काढून बोलायचो. ते समजलं नाही की वाक्यात हातवारे मिळवले जायचे.  आधी संवाद, मग पार्श्वसंगीत असं चढत्या क्रमाने नाटक रंगल्यासारखं दृश्य साकारलं जायचं.  प्रेक्षकही मदतीला धावायचे. नाट्यात सहभागी व्हायचे. एकच वाक्य सर्व परिणामासहित सादर व्हायचं. आणि समोरच्या व्यक्तीने इंग्लिश, इंग्लिश म्हणून त्यावर पडदा पाडला की इंग्रजीही पडद्यामागे दडी मारायचं इतकं स्पॅनिश मुरत चाललं होतं अंगात.  ट्रम्पची अमेरिका सोडून मुक्काम इथेच हलवू इतकं स्पॅनिश यायला लागलं पण तोपर्यंत आमचे पेरुमधले दिवस संपले आणि आम्ही परत मुक्कामाला पोचलो.

तर तुम्हीही घ्या थोडं पेरु दर्शन.