Tuesday, February 19, 2013

आकाशवाणी

काही वर्षापूर्वी, रत्नागिरीला गेले तेव्हा आवर्जून आकाशवाणीत गेले. सगळ्यांची भेट होईल, जिथे काम केलं ती जागा  पुन्हा पहावी, ’ऑन एअर’ चा लाल दिवा डोळ्यात साठवावा, गप्पा झाडायचो त्या भोजनालयात जाऊन पुन्हा हसावं खिदळावं असं काही बाही मनात होतं. पण अवकळा पसरलेलं ते केंद्र विषादाचा चरा उमटवून गेलं मनावर. मी काम करत असतानाची सगळी जणं कामाच्या वेळा वेगळ्या असल्याने ठरवूनही तिथे एकत्र भेटणं कठीणच होतं.  जिथे हक्काने ’आवाज’ फुटायचा तिथे मनातल्या भावना शब्दाने व्यक्त कराव्याशा वाटल्याच नाहीत.  सरकारी आकाशवाणी केंद्रांची अवस्था आता कशी आहे याची कल्पना नाही, पण सात आठ वर्षापूर्वी फार बिकट होती.
परतीच्या मार्गावर ’आकाशवाणी’ मनात पिंगा घालत राहिलं. पार शाळेच्या उंबरठ्यापाशी घेऊन गेलं.

रात्री साडेनऊला लागणारं कॉफीहाऊस, प्रपंच मालिका, सकाळी सात, दुपारी दिड, संध्याकाळी सात आणि रात्री आठ वाजता लागणार्‍या प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्या.
कॉफी हाऊसमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आणि भाग्यश्री जोशी. हसत खेळत युवावर्गांच्या गप्पागोष्टी असायच्या ह्या. प्रपंच मध्ये प्रभाकर पंत, मीना वहिनी आणि टेकाडे भावजी. त्यातल्या मीना वहिनी म्हणजे नीलम प्रभु (करुणा देव), आवाज आणि उच्चारांचा त्यांच्या इतका प्रभावी वापर केलेलं कुणी पाहिलं नाही मी अद्यापपर्यंत.  त्यांनी केलेल्या  एका श्रुतिकेतील मुलगी, मध्यमवयीन आणि वृद्ध स्त्रीचे आवाज ऐकून मला कितीतरी दिवस दुसरी नीलम प्रभु व्हायचं होतं :-).

जुन्या आठवणींबरोबर आकाशवाणीत काम करत असतानाचेही दिवस पिंगा घालत राहिले. ज्या जगाचं आकर्षण होतं त्या जगात डोकावयला मिळालं. काम करायला मिळालं. सुरुवातीला आकर्षण होतं ते आकाशवाणीची गाडी पहाटेच्या कामाच्या वेळेला न्यायला घरी येते त्याचं. कुण्णीतरी अगदी मोठ्ठं झाल्यासारखं वाटायचं गाडीत बसताना. आकाशवाणीत पोचलं की कार्यक्रम काय काय आहेत ते पहायचे, पटापट निवेदन लिहायचं आणि कार्येक्रमाचं सारं सामान घेऊन स्टुडिओत. खाक खुक करुन आवाज नीट आहे ना हे पाहिलं की पहिल्या कार्यक्रमाची तबकडी घालून ठेवायची. आणि मग ’ऑन एअर’ चा लाल दिवा कधी लागतोय त्याकडे नजर ठेवून बसायचं. एकदा का तो दिवा लागला की आपले आपण, म्हणजे  काही गोंधळ होईपर्यंत. तसा तो व्हायचाही अनेकदा. आवाजात चढ उतार आणत सगळं काही बोलून झालं की अचानक गडबडीने तंत्रज्ञ आत घुसायचे. बटनं चुकीची दाबल्यामुळे किंवा न दाबताच बोलल्याने श्रोत्यांनी काहीही ऐकलेलं नसायचं. मग, माफ कराही अशा झोकात यायचं की काही तरी फार मोठं श्रोत्यांना सांगतोय असा आव यायचा त्यात.

निवेदकांमध्ये आपापसात स्पर्धा असायची ती सूर मनी रंगती आणि आपली निवड हा संगीताचा कार्यक्रम सादर करताना. अस्सं काही निवेदन असायचं ना प्रत्येकाचं. एकतर श्रोत्यांकडून वाहवा मिळावी हा हेतू आणि कार्येक्रम अधिकार्‍यांकडून मिळणारी श्रेणीही महत्तवाची.
एक आठवण कायमची मनात रुतली आहे. गाणं होतं, ती गेली तेव्हा.... दोन ओळी ऐकून पूर्ण गाणं काय आहे याचा अंदाज घ्यायचा आणि निवेदन लिहायचं. ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता.... या गाण्याला माझं निवेदन होतं ते प्रेयसी प्रियकराला भेटून निघाली आहे अशा अर्थीचं. वयाच्या २१, २२ वीशीचा हा परिणाम. निवेदन संपलं, गाणं सुरु झालं. आणि हातापायातलं त्राणंच गेलं. ती आई होती म्हणूनी.... ऐकलं आणि काय गोंधळ केला आहे ते लक्षात आलं. कहर म्हणजे, एकाच गाण्याकडे निवेदक किती वेगळ्या दृष्टीने बघू शकतो याचं श्रोत्यांना कौतुक वाटलं होतं.

आकाशवाणी रत्नागिरीहून मुंबईला गेले. कामावर हजर होण्यापूर्वी साहेबांची भेट घ्यावी म्हणून त्यांच्या खोलीत गेले. टेबलाची रचना विचित्र होती की माझा गोंधळ उडाला होता कुणास ठाऊक. खोलीत कुणीच नव्हतं. मी एका खुर्चीवर बसले. थोड्यावेळाने साहेब आले. मी उठून उभी राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. पुन्हा बसले. ते आपले उभेच. काहीतरी चुकतय असं वाटत होतं पण काय ते कळत नव्हतं. काही वेळ असं बोलणं झालं आणि मी म्हटलं,
"सर, तुम्ही बसा ना." ते म्हणाले,
"तुम्ही माझ्या खुर्चीवर बसला आहात."
"ऑ?" विजेचा धक्का बसल्यासारखी उठले. मुंबई आकाशवाणीची सलामीची भेट झडली ती अशी.

एकदा कोणतातरी कार्येक्रम ध्वनिमुद्रित केला होता. चुकून त्यावर आणखी एक कार्यक्रम टेप केला. मग पुन्हा त्या कलाकारांना बोलवून ध्वनिमुद्रण, मुंबईसारख्या ठीकाणी पुन्हा सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेली शाब्दीक कसरत अजूनही आठवते.

एक ना अनेक प्रसंग काही हसवणारे, महान कलाकारांची भेट झाल्याचा आनंद मिळवून देणारे, काही हातपाय गाळणारे तरीही सगळे मंतरलेले...


(इंद्रधनु - तुझ्या पोस्टमुळे या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.)

17 comments:

  1. माझा शाळू मित्र नितीन केळकर पण बातम्या द्यायचा. संध्याकाळी सातला बातम्या सुरु झाल्या आणि " नितीन केळकर आपणास बातम्या देत आहेत ऐकलं" की मस्त वाटायचं. सगळ्यांना तो माझा मित्र आहे म्हणून सांगतांना मजा वाटायची. पण नंतर तो प्रसारभारती मधे एमपीएससी पास होऊन जॉइन झाला. त्याची आठवण झाली हा लेख वाचल्यावर. लेख छान जमलाय.

    ReplyDelete
    Replies
    1. महेंन्द्र,
      तुम्ही म्हणता आहात ते अगदी खरं. मी अगदी कॉलेज संपल्या संपल्या आकाशवाणीत लागले त्यामुळे माझ्या मैत्रीणींची ’कॉलर’ ताठ असायची त्यावेळेस:-).
      कुठे गेलं की तुझा आवाज खूप छान आहेची पावती मिळायची. फार छान होते ते दिवस. नितीन केळकर कोणत्या केद्रावर होते?

      Delete
  2. पोस्टचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद मोहनाताई :)
    लेख खूप आवडला, छान आठवणी आहेत तुमच्या आकाशवाणी बरोबरच्या...
    शाळेत पाचवी-सहावीत असताना वर्गातल्या आम्हा ४-५ जणांना पुणे केंद्रात audition साठी नेलं होतं. selection वगैरे नाही झालं पण तिथे आम्हाला दिलीप प्रभावळकर भेटले होते. आम्ही त्यांच्याकडे पाहताच राहिलो, कारण असं कोणी तिथे भेटेल असं अपेक्षितच नव्हतं. आणि त्यांनी स्वत:हून आमच्याशी संवाद साधला, काय रे पोरांनो इथे कसे वगैरे... तो अनुभव खूपच अविस्मरणीय होता. तोपर्यंत चित्रपटात काम करणारी व्यक्ती इतकी साधी आणि निगर्वी असू शकते असं सांगूनही पटलं नसतं.

    ReplyDelete
    Replies
    1. इंद्रधनु,
      लेख आवडला हे वाचून आनंद वाटला. मला सुदैवाने खूप मोठ्या लोकांचा सहवास कारणाकारणाने लाभला आहे. निरीक्षण असं की जे नुकतेच या क्षेत्रात आलेले असतात/धडपडत असतात ते बहुधा अर्ध्या हळकुडांने पिवळे झाल्यासारखे वागतात पण नंतर जसजसं ते वातावरण रोजचंच होतं, अनुभवाची पुंजी जमा होते तेव्हा ’मी’पणा निघून गेलेला असतो आणि ती ’खर्‍या’ माणसांची भुकेली होतात. एक स्मिता तळवलकर सोडल्यास फार साधी, निर्गवी वाटली ही मोठी माणसं.

      Delete
  3. बापरे आणि आजच्या आकाशवाणी आणि इतर अनेक मराठी वाहिन्यांवरील निवेदन किंवा संवाद ऐकले की जो काही त्रास होतो की वाटतं " हे धरणीमाते, पोटात घे!"

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद स्वाती. कितीतरी वर्षात ’आजचं’ आकाशवाणी ऐकलेलं नाही त्यामुळे याबद्दल काहीच कल्पना नाही.

      Delete
  4. हि अवस्था फक्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची नसून सांगली केंद्रातही अशीच अवस्था आहे ... मी पण रत्नागिरी केंद्रावर केलेला कार्यक्रम आठवला ...चक्क मी नभोनाट्य लिहिले होते तेव्हा ....म्हणून तर मी स्वतंत्र एफ ए म सुरु केले

    ReplyDelete
    Replies
    1. हो आणि तुझ्या कल्पनेवरुन मी आणखी एक नभोनाट्यं लिहलं होतं. आठवतय?

      Delete
  5. very interesting mohana ,got the idea about the atmosphere ,you must have enjoyed a lot.

    ReplyDelete
  6. Grace in one of his interviews said this poem is all about original creative source.

    ReplyDelete
    Replies
    1. वॉव, म्हणजे जो अर्थ कळला असं वाटलं होतं तोही कळला नव्हताच तर...

      Delete
  7. Khup surekh Lekh aahe...gaanyachi gammat ani Mumbai madhli sahebanchi bhet hyacha वर्णन awadla .tula evdhya chaan kalakaran barobar kaam karayla milala you are lucky..these experiences enrich you for lifetime

    ReplyDelete
    Replies
    1. ऋचा,
      हो ना, बिच्चारे आमचे साहेब त्यांना कळेचना काय करावं ते :-)

      Delete
  8. मस्त गं. तू आकाशवाणीला काम करायचीस? मला निवेदन या प्रकाराबद्दल जाम ओढ़ आहे. I am sure you miss it and sure to get nostalgic about :)

    ReplyDelete
    Replies
    1. सहा वर्ष. धम्माल केली नुसती. सगळे काम करणारे व्यक्ती आणि वल्ली होत्या....त्यामुळे तर चन्नाटभ अनुभव. नुसती भेटायला जाते आता सगळ्यांना तेव्हा वाटतं, पटकन स्टुडिओत जाऊन करावा एखादा कार्यक्रम लागलीच!

      Delete
  9. खूप छान लेख. मुंबई आकाशवाणी मधील साहेबांची गम्मत वाचून जाम हसलो.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.