Tuesday, May 30, 2017

पाखरु

सकाळी, सकाळी,
दूर गावाहून पिल्लं आली!
पक्ष्यांच्या घरट्यात
किलबिलाटाची घंटा किणकिणली!
किती दिवसांनी पाखरं परतली
आई - बाबांची धांदल उडाली!
आवडते घास देण्याची घाई झाली
सहवास, गप्पांची लयलूट जाहली!
सुखदुःखांची, स्वप्नांची
मांदियाळी झाली!
स्वप्न पाखरांच्या मनातली
भरारीसाठी आतुरली!
कोरली मनात पाखरांची छबी
निरोपाची घटीका जवळ आली!
किलबिलाटाची घंटा विसावली
वाजेल ती पुन्हा कधीतरी सकाळी! - मोहना

Friday, May 12, 2017

मदर्स डे

परवा लेकीने विचारलं,
"तू माझी मैत्रीण आहेस की आई?"
"दोन्ही."
"नाही. मला एकच उत्तर हवंय. पटकन सांग ना. पटकन, पटकन." तिच्या ’पटकन’ गाण्याला खीळ घालत मी म्हटलं.
"मैत्रीण." तिने आनंदाने उडी मारली. माझ्याही मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. नाही म्हणजे, आमच्या आईच्या वेळेस आई ही ’आई’ च असायची. त्यात ती खूशही असायची. पण माझ्या वेळेस, आम्हा सर्व तमाम आयांना मुलांची मैत्रीण बनण्यात जास्त रस होता. त्यामुळे मी मुलीची ’मैत्रीण’ आहे याचा दाखला तिने अत्यानंदाने उडी मारुन दिला तसं मी मीही मनातल्या मनात उडी मारली. खरं तर मी मैत्रीण म्हणजे मी पण तिच्यासारखीच, तिच्याबरोबर उडी मारणं हेच खर्‍या मैत्रीचं लक्षण. पण माझ्या उडीची तिला लाजच वाटते आणि मैत्रीण असले म्हणून काय झालं? झेपायला पाहिजे ना आता उड्या मारणं. तर म्हणून मी मनातल्या मनात उडी मारली.  माझी मैत्रीण गं, मैत्रीण गं म्हणत तिचे गालगुच्चे घेतले. तिने माझे दोन्ही हात झटकले.
"मैत्रिणी असं नाही करत गं." तिचं नाक मुरडलं गेलं, कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं.
"तुझ्याबरोबर ही भूमिका बदलण्याची तारेवरची कसरत करते ना मी, त्यामुळे होतो गोंधळ." मी पुटपटले. तिकडे दुर्लक्ष करत तिने विचारलं.
"तुझ्या उत्तरावर ठाम आहेस ना? सारखं उत्तर बदलता येणार नाही." ती खुंटा बळकट करते आहे म्हणजे ही काहीतरी प्रचंड ’चाल’ आहे हे लक्षात न यायला मी काय तिची मैत्रीण होते? माझ्यातली ’आई’ जागी व्हायला लागली. मी रोखून तिच्या डोळ्यात पाहायला सुरुवात केली. मुलांची लबाडी डोळ्यात दिसते म्हणतात ना? पण चोरांनाही चोरी कशी लपवायची हे तंत्र जमलेलं असतं. तिने साळसूदपणे डोळ्यातून ’मैत्रिणी’ बद्दलचं प्रेम वाहील याची दक्षता घेतली. आता मी आई की मैत्रीण याबाबतीत जरा गोंधळच सुरु झाला माझ्या मनात.
"आई मैत्रीण होऊ शकते. पण ती आईच असते." मी काय बोलले ते माझं मलाही कळलं नव्हतं. पण लेकिचा एकच नारा चालू.
"बघ, नक्की ठरव. तू माझी आई आहेस की मैत्रीण? सगळं तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे. दहा सेकंद."  आता  १० सेकंद पटकन संपतील याचं दडपण आलं. विचार करायचा म्हणजे येरझार्‍या, कपाळावर आठ्या, डोकं खाजवणं..., ते सगळं करत १० सेकंदावर नजर ठेवत कुठल्या उत्तराने काय फायदे - तोटे आहेत याचा हिशोबही केला. मल्टिटास्किंग!
"मैत्रीण." १ सेकंद उरला असताना उत्तरले. मैत्रीण उत्तरच बरं वाटलं. हे कसं, सांगायला बरं पडतं. आई काय कुणीही होतं. मैत्रीण! भारीच की. मुलीने तिसर्‍यांदा आनंदाने उड्या मारल्या आणि तिच्याबरोबर उड्या न मारण्याचा निर्णय बरोबर होता याचा मला आनंद झाला. त्या निर्णयाचा आनंद साजरा करत मी म्हटलं,
"मी ना माझ्या मैत्रिणींना नेहमी सांगते की माझं नातं माझ्या मुलांशी अगदी मैत्रिणीसारखं आहे. आमच्यात मनमोकळा संवाद असतो." इतका वेळ तटस्थासारखे बसलेले पुत्रोजी जागे झाले.
 "काही पण सांगतेस आई तू तुझ्या मैत्रिणींना."
"म्हणजे?"
"तुला खरंच वाटतं कॉलेजमध्ये  होतो तेव्हा तुला सगळं म्हणजे अगदी ’सगळं’ सांगत होतो?"
"हो. तूच तर म्हणायचास." तो जोरजोरात हसायला लागला.
"तू आजीला सांगायचीस सगळं?"
"पण ती माझी आई आहे. आईला कुठे कोण सांगतं सर्व?"
"मग? तू पण माझी आधी आईच आहेस." तो काय म्हणाला हे कळेपर्यत लेकीने पुन्हा सुरु केलं.
"तर तू म्हणालीस की तू मैत्रीण आहेस माझी. हो. नं? हो म्हण, हो म्हण." आता दोघंही गळ्यात पडले.
"हो." साशंक स्वरात मी पुटपटले.
 दोघांनी उड्या मारल्या. लेकीची चौथी उडी. एकमेकांना टाळी देत दोघं एकदम म्हणाले,
"मदर्स डे साजरा करायला लागणार नाही!"  साक्षात्कार झाल्यासारखा मी माझा पवित्रा बदलला.
"नाही, नाही त्या दिवशी मी ’आई’ असेन." सकाळी सकाळी आयता मिळणारा नाश्ता, कुरकूर न करता वेळच्यावेळी केली जाणारी कामं, शुभेच्छा पत्र, फुलं, भेटवस्तू, छानशा रेस्टॉरंट मधले पदार्थ असं बरंच काही डोळ्यासमोर नाचलं.
"टू लेट गर्ल, टू लेट." गर्ल? मी मुलाकडे डोळे वटारुन पाहिलं.
"तू मैत्रीण आहेस आमची. गर्ल म्हटलं तर काय झालं?" मुलीने भावाची बाजू उचलली आणि काम फत्ते झाल्याच्या आनंदात दोघं उड्याच उड्या मारत राहिले.